लॉरेन्स ऑफ अरेबिया

लॉरेन्स ऑफ अरेबिया

सिनेमा. लॉरेन्स ऑफ अरेबिया

 तरूण पिढीत जुन्याकडं वळून पहाण्याचा कल वाढतोय. विशेषतः जुन्यातलं दर्जेदार. जुनी गाणी, जुने गायक तरूण पिढी आवडीनं ऐकतेय,  ती गाणी नव्या पद्धतीनं मांडत्ये. 

नेटफ्लिक्सवरचा ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा चित्रपट तरूण मंडळी पहात आहेत. वयस्क तर नक्कीच पहातील. 

‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’  क्लासिक या सदरात मोडणारा चित्रपट आहे. पहिलं महायुद्ध हा चित्रपट कथानकाचा काळ.

चित्रपट  १९६२ मधे प्रदर्शित झाला. लांबी साडेतीन तास. भव्य. उत्तम संगित. रंजक कथानक. ६५ वर्षांपूर्वीचा चित्रपट तांत्रीकदृष्ट्या अधिक चांगला करून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालाय.

लॉरेन्सची भव्यता आणि संगीत त्याच दशकातल्या ‘डॉ. झिवागो’ मधे पहायला मिळाली. युद्धातला वेगळा थरार ‘गन्स ऑफ नॅवरोन’ या चित्रपटांत पहायला मिळाला. मोठ्या पडद्यावर भव्यता आणि मधुर संगित लोकांनी अनुभवलं. 

त्याच दशकातला हिचकॉकचा ‘सायको’. त्यात भव्यता नव्हती. पण गुन्हेपट-रहस्यपट असं मिश्रण होतं, प्रचंड थरार होता. 

त्याच दशकातला  ‘माय फेअर लेडी’. बर्नार्ड शॉच्या नाटकावरच्या या चित्रपटात भव्यता नव्हती, थरार नव्हता. त्यात  वैचारिक खाद्य होतं.

या चित्रपटांनी ते दशक गाजवलं.

लॉरेन्स मधे डोळ्यात न मावणारी वाळवंटं आणि पर्वत आहेत. मोठ्या पडद्यावरचा अनुभव टीव्हीच्या पडद्यावर येतच नाही. तरीही मी नेटफ्लिक्सवर लॉरेन्स पाहिला.  गुंतलो त्या चित्रपटात. अनेक वेळा पाहिलेला असल्यानं पीटर ओ टूल, अँथनी क्विन, ओमार शरीफ चांगलेच आठवत होते.   तरीही पुन्हा पाहिला, एक मिनीटही चुकवलं नाही. एकादा संवाद नीट समजला नाही, एकादी सिच्युएशन नीट समजली नाही की बॅकवर्ड फॉरवर्ड करता आलं. हा एक फायदाच म्हणायचा.

डेविड लीन हा दिक्दर्शक. त्यानं लॉरेन्स बायोपिक केला. लॉरेन्स या माणसातून एक हीरो उभा केला. त्या हीरोभोवती चित्रपट. चित्रपटात एक फोटोग्राफर आहे. तो लॉरेन्सचे नाट्यमय फोटो काढत असतो. लॉरेन्सचं हीरोपण लक्षात येईल अशा रीतीनं तो फोटोची फ्रेम शोधत असतो. रक्तबंबाळ लॉरेन्स. टोळीतल्या अरबी लोकांबरोबर. अरब पोषाखात. ट्रेन उडवून देत असताना. फैजल या राजपुत्राला भेटून फोटोग्राफर लॉरेन्सचा ठावठिकाणा विचारतो, फैजलचा फोटो काढत नाही. चित्रपटाचा मुख्य धागा सतत बळकट ठेवणारी पटकथा.

 चित्रपट पहिलं महायुद्ध या विषयावर आधारलेला. अनेक देश. त्यांचं कुटील राजकारण.इतिहास घडत होता. डेविड लीननं त्या सर्व गोष्टी पार्श्वभूमीसारख्या वापरल्या. लॉरेन्स कैरो, अकाबा, कैरो, दमास्कस असा शेकडो मैलांचा प्रवास करतो. हा प्रवास अर्थातच राजकीय होता. तो थरारक होता हा मुद्दा महत्वाचा. त्या अंगानं डेविड लीननं चित्रपट रचला. चित्रपटाचा माहितीपट होऊ दिला नाही. त्यामुळं त्या विषयातल्या राजकारणाचे बारकावे समजत नाहीत. ते समजावणं हा चित्रपटाचा हेतूच नव्हता. लॉरेन्स नावाच्या माणसाचा  हा चित्रपट होता.

लॉरेन्स ब्रिटीश आहे.लॉरेन्सच्या रक्तात सैनिक नाही. तो आज्ञाधारक नाही, डोकं बंद ठेवून आज्ञा पालनाचा त्याचा स्वभाव नाही. अरेबिक भाषा आणि संस्कृती हा लॉरेन्सच्या अभ्यासाचा विषय. त्याच्या ज्ञानाचा फायदा करून घेण्यासाठी त्याला सौदी प्रिन्स फैजल यांच्याकडं पाठवण्यात आलं. ब्रिटीश सेनापतींना राजकारण करायचं  होतं. येड्या इमोशनल लॉरेन्सला अरबांची एकता साधायची होती, अरबांवरचा अन्याय त्याला दूर करायचा होता.

लॉरेन्स स्वतःला अरब समजू लागला होता. पण ते कसं जमणार? त्याची कातडी गोरी. त्याचा धर्म ख्रिस्ती. त्याची भाषा इंग्रजी. अरबांच्या लेखी तो ब्रिटीशच राहिला.

  ब्रिटीशांच्या लेखी तो  त्यांच्या सैन्यातला एक अधिकारीच होता. त्याच्या विचारांशी ब्रिटीशांना देणं घेणं नव्हतं.

अरब एकता झाली नाही. ब्रिटीश आणि फ्रेंचांनी अरबांना शेंड्या लावल्या. अरब देशांत फूट पाडली. ठरलेलं असूनही पॅलेस्टाईन अरबांना दिला नाही, ज्यूना दिला.

लॉरेन्सच्या मनाच्या चिंध्या झाल्या. तो न घरका ना घाटका झाला. हताश झाला. हरला. 

वास्तव आणि स्वप्नं यात अंतर  चित्रपटात दिसतं.

पहिल्या महायुद्धानंतर पॅलेस्टाईनचं भवितव्य पॅलेस्टाईनमधल्या लोकांनी नव्हे तर ब्रिटीश आणि फ्रेंचांनी ठरवलं. त्यांच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी पॅलेस्टाईन ज्यूंच्या हाती सोपवला.लॉरेन्सला पॅलेस्टाईन अरबांकडं जायला हवा होता, ब्रिटीशांनी ते केलं नाही. लॉरेन्स हरला. १९६३ नंतर पॅलेस्टाईनमधे किमान ३ युद्धं झाली. नंतर २०२३ पासून इस्रायलनं गाझा चिरडायला सुरवात केली.  आज इस्रायल दरवर्षी ३० ते ४० हजार गाझावासियानं मारतंय.

१९६३ साली आणि नंतरच्या दोन तीन वर्षात  हा सिनेमा मी किती तरी वेळा पाहिला. त्या वेळी  लॉरेन्स जसा समजला होता त्यापेक्षा यंदा तो मला किती तरी वेगळा समजला.राजकारण हा चित्रपटाचा विषय नसला तरी राजकारणाची एक वेगळी समजूत या चित्रपटानं निर्माण केली.

चित्रपट निर्मितीचा अभ्यास म्हणूनही हा चित्रपट पहाण्यासारखा आहे. मोरोक्को, जॉर्डन, स्पेन इथल्या नाना ठिकाणी चित्रीकरण केलं आहे. चित्रपटात  दिसतात त्या  वास्तू स्टुडियोत उभारलेल्या आहेत. त्या वास्तूमधले तपशील प्रेक्षकाला त्या काळात घेऊन जातात. 

लॉरेन्स चक्रम आहे, ऑकवर्ड आहे, सेनापती वगैरे लोक त्याच्या लेखी सामान्य माणसं असतात, त्याला अगदी सामान्य ट्रायबल अरबांचं प्रेम आहे इत्यादी गोष्टी पीटर ओ टूलनं छान उभ्या केल्या आहेत. अरब जमातीचा प्रमुख अँथनी क्वीननं उभा  केलाय. रांगडेपण, अरब माणसातला अगदी शुद्ध  घसघशीतपणा, अरब माणूस, अँथनी क्वीननं उभा केलाय. कायच्या कायच सुंदर. 

भारतीय विनोदी नट आयएस जोहर काही सेकंद या चित्रपटात दिसतो.

 शाळा कॉलेजांत, असे चित्रपट अभ्यासक्रमात अंतर्भूत करावेत. किती तरी गोष्टी अशा चित्रपटातून समजतात.  

समजूत वाढायला अशा चित्रपटांची मदत होते.

 लॉरेन्सला १० नामांकनं, ७ ऑस्करं मिळाली.

 ।।

Comments are closed.