ट्रंपचा नवा डील

ट्रंपचा नवा डील

ट्रंपचा नवा डील  

 नेतान्याहू पुन्हा एकदा ट्रंप यांना भेटायला वॉशिंग्टनला पोचले. ट्रंप प्रेसिडेंट झाल्यापासूनची ही त्यांची आठवी फेरी. 

नेतान्याहू चिंतीत होते. ट्रंप इराणबरोबर करार करण्याची खटपट सोडत नाहीयेत याचा राग आणि चिंता नेतान्याहूना होती. ट्रंपना घाबरवण्याची एक आयडिया नेतान्याहूनी काढली. वॉशिंग्टनमधे पोचल्या पोचल्या त्यांनी एक माहिती पत्रकारांना सांगितली. Pickaxe पर्वतराजीचे फोटो त्यानी पत्रकारांसमोर ठेवले आणि इराण आता तिथं युरेनियमवर संस्कार करण्याची यंत्रणा उभी करतेय हे दाखवलं. काही सेंट्रीफ्यूज इराण तिथं हलवत होता.

याचा अर्थ २०२५ आणि २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने केलेले हल्ले इराणची अणुसंस्कार यंत्रणा नष्ट करू शकले नव्हते. जेवढा काळ युद्ध थांबलं तेवढ्या काळात इराणनं तयारी जोरात सुरु केली.   गेले पंधरा दिवस अधून मधून अमेरिका इराणवर हल्ले करतेय. हे हल्ले अणुसंस्कार केंद्रांवर नाहीत. अमेरिका पूल,वीज निर्मिती केंद्रं इत्यादींवर हल्ले करतेय. इराणला अणूत पक्ष घालायला उसंत मिळाली. 

२०२५ आणि २०२६ साली इस्रायलनं इराणवर हल्ले केले. इराणचा पूर्ण नायनाट न करता ट्रंपनी दोन्ही वेळा युद्ध स्थगित केलं. स्थगितीमुळं मिळालेली उसंत इराणनं आपला अणुकार्यक्रम दुरुस्त करायला वापरली.  नेतान्याहूना स्थगिती मान्य नव्हती, नाही.

नेतान्याहू आणि इस्रायली ज्यूंची ट्रंपबद्दलची कल्पना योग्यच आहे. ट्रंप डील मेकर आहेत.  कोणतीही गोष्ट करताना शेवटी अमेरिकेच्या पदरात काय पडतं असा त्यांचा हिशोब असतो. गाझामधलं युद्ध असो की इराण युद्ध या निमित्तानं अमेरिका मध्य पूर्वेत आपलं स्थान पक्क करतं, व्यापार करतं. नेतान्याहू अमेरिकेत आले तेव्हां ट्रंप तेच करत होते.ज्यूना नेमकं तेच नकोय. ज्यूंना वाटतं की अमेरिकेचा पैसा ही त्यांचीच मालमत्ता आहे.

 ट्रंपनी तुर्कियेला लढाऊ विमानं विकायचं ठरवलय. तुर्किये हा इस्रायलचा दोस्त नाही.  तुर्कियेची पॅलेस्टाईनबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. इस्रायलनं तिथं चालवलेली घूसखोरी आणि गाझातलं युद्ध आपल्याला मान्य नाही असं तुर्कियेचे एर्डोगन यानी वारंवार जाहीर केलं आहे. तुर्किये बलवान होणं इस्रायलला पसंत नाही. शेवटी काहीही झालं तरी तुर्किये हा सुनी देश आहे. तो सल कोणाही ज्यूच्या मनात असणारच.

अमेरिका  तुर्कियेला ४० नवी लढाऊ विमानं विकेल आणि ७९ विमानं आधुनिक करून देईल. लॉकहीड, नॉर्थरॉप, जीई इत्यादी कंपन्या विमानं, सुटे भाग इत्यादी विकतील. हा व्यवहार सुमारे २३ अब्ज डॉलरचा आहे. ट्रंपचा डील. ट्रंप २३ अब्ज मिळवणार. 

नेतान्याहू वॉशिंग्टनला पोचले त्या आधी काही तासच अमेरिकेनं सौदी अरेबियाला अणुसंस्कार यंत्रं आणि तंत्रं विकण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन कंपन्या अणु संस्कार केंद्रं उभारतील,इमारती उभारतील, कच्चा युरेनियम   पुरवतील, संस्कार करणारे सेंट्रीफ्यूज उभारून देतील. वेस्टिंगहाऊस, एपी १०००, बेचटेल, जीई, हनीवेल इत्यादी कंपन्या सर्व आवश्यक कामं करून देतील. या व्यवहाराची किमत १०० अब्जाच्या घरात जाईल. तेवढे पैसे सौदी अमेरिका त्या कंपन्याना म्हणजे अमेरिकेला देणार. गाझा आणि इराण प्रकरणात मध्यस्थी वा इतर कारणांसाठी ट्रंप आणि त्यांचे जावई मध्य पूर्वेत चकरा मारत होते तेव्हां ते डील करत होते. ते इस्रायलसाठी भटकत नव्हते, अमेरिकेच्या फायद्यासाठी भटकत होते.

ट्रंप सौदी अरेबियात जात. महंमद बिन सुलतान यांचं कौतुक करत. त्यांच्या महालात जात तेव्हां महाल किती सुंदर,किती महान आहे याचं कौतुक करत. प्रिन्स महंमद बिन हे कसे यशस्वी राजनेता आहेत, कसे कुशल कारभारी आहेत आणि त्यांना बाजार कसा छान समजतो असं ट्रंप सतत बोलत. बाकीचं जग ट्रंपना लोणी लावत होतं तेव्हां ट्रंप सौदी प्रिन्सना लोणी लावत होते. याचं कारण ट्रंपना डील करायचा होता. याची कुणकुण अर्थातच नेतान्याहूना होती. पण ते काही करू शकत नव्हते. ट्रंपच्या विरोधात बोलायची त्यांची हिमतच नाही.

इराणनं अणुविकास करू नये यासाठी इस्रायल इराणशी युद्ध करतं. आणि इकडे अमेरिका सौदीला अणुतंत्र देतेय. अमेरिकेनं अट घातलीय की सौदीचा अणुविकास फक्त शांततेच्या उपयोगासाठी असेल. इराणही तसंच म्हणत होतं. इस्रायलही तसंच म्हणत होतं. पाकिस्तान आणि भारतानंही शांततेसाठी अणुविकास केला आणि स्फोट करून आपली अण्वस्त्रं करायची क्षमता विकसीत केली. अणु इंधनाचा विकास करणारा सेंट्रीफ्यूज हातात आला की तिथून अणुबाँब करणं सोपं असतं. आता ते तंत्रज्ञान जगाच्या बाजारात कुठंही मिळतं. दुकानात जाऊन बिस्कीटं,चॉकलेटं खरेदी करावीत तशी यंत्रं आणि तंत्र मिळत असतात. फक्त त्याची किमत मोठी असते, ती मोजण्याची क्षमता हवी.

आज बिन सुलतान म्हणतात की ते शांततेसाठीच अणुचा वापर करणार आहेत. पाच वर्षांनी ते बदलतील. त्यांच्या नंतर सौदीचा जो कोणी नेता राज्यावर येईल तोही बदललेला असेल. इस्रायलला आपल्या सुरक्षेसाठी अण्वस्त्रं हवीशी वाटत असतील तर त्यांच्या शत्रूनाही तसंच वाटणं स्वाभाविक आहे. सौदीला अणुविकास तंत्रं देऊन अमेरिका अण्वस्त्र स्पर्धेत एका खेळाडूची भर घालत आहे.

अगदी साधी गोष्ट आहे.अमेरिकेला पैसा हवाय. 

सौदी, तुर्किये इत्यादी देश बलवत्तर होणं म्हणजे भविष्यात इस्रायलला प्रबळ शत्रू निर्माण करणं आहे.

नेतान्याहूंची भेट झाली तेव्हां पत्रकारांसमोरच ट्रंप त्यांना म्हणाले ‘पिकएक्स बद्दलची माहिती तुम्ही पत्रकारांना दिलीत, आधी मला ती माहिती द्यावी असं तुम्हाला वाटलं नाही.’

पत्रकारांशी बोलताना ट्रंप म्हणाले ‘मी जसं सांगतो तसंच नेतान्याहूना वागावं लागतं आणि लागेल.’

अमेरिकेला जगभर युद्ध चालावीत असं वाटत असतं. अमेरिकेला शस्त्रं विकायची असतात. इस्रायलला शस्त्रं दिली आता इस्रायल विरोधकांना अमेरिका शस्त्रं देतेय. 

।।

Comments are closed.