ट्रंप यांचा पराभव
ट्रंप यांचा पराभव कां झाला?
अमेरिकन संसदेत सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव या कनिष्ठ सभागृहात डेमॉक्रॅटिक पक्षाचे २५३ आणि रिपप्लिकन पक्षाचे १५७ सदस्य असतील. २१८ हा बहुमताचा आकडा असतो.
सेनेट या वरिष्ठ सभागृहात डेमॉक्रॅटिक पक्षाचे ५४ आणि रिपब्लिकन पक्षाचे ४४ सदस्य असतील. ५१ हा बहुमताचा आकडा असतो.
डेमॉक्रॅटिक लाट आली. प्रेसिडेंट ट्रंप यांच्यावर लोकांची नाराजी आहे हे गेल्या वर्षभरात लक्षात आलं होतं, चाचण्या तसं सांगत होत्या. लाट इतकी मोठी असेल असं कोणी अपेक्षिलं नव्हतं. दोन वर्षांपूर्वी ट्रंप यांनी लाखोची आघाडी घेतली होती तिथं तिथं डेमॉक्रॅटिक उमेदवार लाखालाखाच्या आघाडीनं जिंकलेत.
टेक्सस या राज्यात गेल्या १०० वर्षात कधीही डेमॉक्रॅटिक सेनेटर झाला नव्हता, गव्हर्नर झाला नव्हता. ते यावेळी घडलं. टेक्ससमधे ट्रंपनी पुरस्कार केलेल्या उमेदवारावर इलॉन मस्कनी कोटी कोटी डॉलर ओतले होते. डेमॉक्रॅट टॅलेरिको हा फाटका माणूस होता. ट्रंपनी त्याच्या बदनामीच्या खोट्या माहितीवर आधारीत जाहिरातींचा मारा केला. उपयोग झाला नाही.
मेन या राज्यात सुझन कॉलिन्स गेली ३० वर्षं रिपब्लिकन तिकीटावर निवडून येत होत्या. जॅक्सन या एका लाकूडतोड्यानं त्यांचा ५० हजार मतांनी पराभव केला. जॅक्सन अगदी नवखा आहे, त्याला राजकारणाचा अनुभव नाही.
कॉलिन्स आजही लोकप्रीय आहेत. जनता त्यांच्या बाजूनं आहे. त्यांनी जनतेसाठी खूप कामं केली आहेत. त्या स्वच्छ आहेत. तरीही त्या पडल्या. एका मतदारानं त्यांना सांगितलं ‘आमचं तुमच्यावर प्रेम आहे. पण आम्हाला ट्रंप नकोयत. ते नकोयत हा आमचा संदेश आम्ही तुम्हाला पाडून ट्रंपना दिलाय.’
ट्रंपचा पराभव कां झाला?
पेट्रोल महाग झालं होतं, जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या होत्या. ट्रंपनी इराण युद्द काढल्यामुळं पेट्रोल महागलं जो पैसा जनतेसाठी वापरला जायला हवा तो इराणवर बाँब टाकण्यात खर्च झाला.ट्रंपच्या जकात लादण्यामुळं परदेशातून स्वस्तात येणाऱ्या वस्तू दुकानातून गायब झाल्या. शिवाय ट्रंपचा भ्रष्टाचार.
ट्रंपनी बेकायदेशीर स्थलांतरीतांना घालवायच्या नादात सरसकट स्थलांतरीतांचा छळवाद मांडला, अनेक राज्यात दहशत माजली होती. स्थलांतरीतात नागरीक असलेले लॅटिन अमेरिकन होते. अमेरिकेन नागरीक खासदार इल्हान ओमर यांच्या घरावर धाड घालून त्यांना देशाबाहेर घालवण्याचा घाट ट्रंपनी घातला. त्या सोमाली मुसलमान होत्या म्हणून.
अमेरिकेच्या ३४ कोटी लोकसंख्येत आफ्रिकी आणि लॅटिनो मिळून १२ कोटी नागरीक आहेत.
ट्रंप यांच्या दुर्गणांची भरपूर वाच्यता झाली आहे.ते चक्रम आहेत. त्यांचा भरोसा नाही. ते खोटारडे आहेत. ते आत्ता एक बोलतील आणि पुढल्या क्षणी नेमकं विपरीत बोलतील. त्यांना विचारधारा नाही, फक्त पैसे मिळवायचं कळतं. पैशासाठी ते काहीही करतात. त्यांनी पदाचा वापर करून भरमसाठ पैसे कमावले. त्यांच्या सेक्सच्या भानगडी आहेत. देश ही आपला खाजगी मालमत्ता आहे असं मानून ते वागतात. कायदा, नियम, लोकशाही इत्यादीना ते फाट्यावर मारतात.
दुर्गुणांची इतकी वाच्यता झाली असूनही अमेरिकन लोकांनी त्यांना दोन वेळा निवडून दिलं; आता त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा सणसणीत पराभव केला. याची संगती कशी लावायची? एक संगती लागते. ती म्हणजे अमेरिकन माणसांची सुखानं जगण्याची इच्छा ट्रंपनी पायदळी तुडवली. साठेक टक्के लोकांचं महिन्याचं बजेट कोसळू लागलं. ते वळणावर येण्यासाठी ट्रंप काही करत नव्हते. उलट स्वतःच्या मस्तीत होते, आपल्या धोरणात बदल करायला तयार नव्हते.
या निवडणुकीच्या काळात प्यू, गॅलप या संस्थांनी नागरिकांची मतं जाणून घेतली. ६० टक्क्यापेक्षा जास्त लोकांचा राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नाही; राजकीय पक्ष कामाचे नाहीत असं त्याना वाटतंय, राजकीय पक्षांना सत्ता वापरता येत नाही, एकादा नवा पक्ष हवा असं लोक म्हणालेत. अशा अवस्थेत रिपब्लिकन नकोत म्हणून लोकांनी डेमॉक्रॅटना मतं दिलीत, त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून नव्हे. डेमॉक्रॅटिक पक्षानं हुशारी दाखवली. चाकोरीतले, श्रीमंत, व्यावसायीक राजकारणी त्यांनी उभे केले नाहीत. दोन खासदार डॉक्टर आहेत, एक शिक्षक आहे, एक लाकूडतोड्या आहे, एक अपंग आहे. देशभरातून निवडून आलेले सेनेटर एकमेकाला ओळखतही नाहीत. अनेक उमेदवार सामान्य माणसांना लागलेली झळ जाणतात, तेही व्यक्तिशः भाजलेले आहेत.
अमेरिकन राजकारण म्हणजे डबकं झालं आहे.
डेमॉक्रॅटिक पक्षात विद्वान फार होते. मोठमोठ्या विद्यापीठांत शिकलेले, मोठ्या घराण्यातले वगैरे. बाता फार मारत, वैश्विक आर्थिक विचारधारांवर बोलत. त्यांच्या मतदार संघात रस्त्यांवर खड्डे असत, नाक्यांवर कचऱ्याचे ढीग असत. भाषाबिषा एकदम पॉश असे,असते. वर्षानुवर्षं डेमॉक्रॅटना मतदान करणाऱ्यांनी गेल्या दोन निवडणुकात ट्रंपना मतं दिली ती त्यामुळंच.
रिपब्लिकन पक्ष पारंपरीक कंझर्वेटिव पक्ष उरलेला नाही. हृदय आणि मेंदू योग्य जागी नसलेल्या ईलॉन मस्कची त्या पक्षावर पकड आहे. आयटी, इन्शुरन्स, फायनान्स, औषधं, तेल या क्षेत्रातल्या धनिकांनी सरकारचा उपयोग करून जनतेची लूट चालवलीय. ही माणसं डेमॉक्रॅटिक पक्षाचाही वापर करतात पण गेलं दशकभर त्यानी रिपब्लिकन पक्षाला हाताशी धरलंय, तो पक्षच बदलून टाकलाय. अमेरिकेत पाण्याची तीव्र टंचाई असताना गपागपा पाणी पिणारी डेटा सेंटर उभारणाऱ्यांनी रिपब्लिकन पक्ष ताब्यात घेतलाय.
चंद्र आणि मंगळावर जाण्यापेक्षा, मेंदू गहाण ठेवण्यासाठी एआयचा विकास करण्यापेक्षा माणसाचं जगणं अधिक महत्वाचं आहे; माणूस विचाराच्या केंद्रस्थानी ठेवा असं लोकांनी या निवडणुकीत राजकीय पक्षांना सांगितलंय.
अर्थात पुढली दोन वर्षं ट्रंपना वेसण घालणं, त्यांनी केलेले भ्रष्टाचार आणि राज्यघटनाद्रोही वर्तन सिद्ध करून त्याना तुरुंगात पाठवणं याकडंही नव्या लोकसभेला लक्ष द्यावं लागेल.
।।