बातमी देणाऱ्याला सांभाळणं
पुस्तक
Secrets- A reporters Memoir
बॉब वुडवर्ड
००
बॉब वुडवर्ड या नामांकित बातमीदाराचं सेक्रेट्स-ए रिपोर्टर्स मेमवा हे पुस्तक प्रसिद्ध होतंय. वुडवर्ड वॉटरगेट प्रकरणावरील बातम्यामुळं प्रसिद्ध झाले. प्रेसिडेंट निक्सननी प्रतिस्पर्धी डेमॉक्रॅट्सच्या वॉटरगेट इमारतीतल्या कार्यालयात दरोडेखोर घुसवून तिथून रेकॉर्ड चोरण्याचा प्रयत्न केला होता. वुडवर्ड आणि बर्नस्टिन यानी निक्सनचे गुन्हे शोधले,परिणामी निक्सनना राजीनामा द्यावना लागला होता.
वुडवर्ड वॉशिंग्टन पोस्ट या पेपरमधे ते बातमी दार होते, सहाय्यक संपादक होते, सहाय्यक कार्यकारी संपादक होते. १९७० साली त्यांनी बातमीदारीला सुरवात केली. अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि सरकार हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते. निवृत्त होऊन खूप कालावधी लोटला तरी त्यांचं व्हाईट हाऊसवर लक्ष असतं. डोनल्ड ट्रंप यांच्यावर त्यांनी दोन पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत.
बातमीदार आणि बातमीदाराला बातम्या देणारी व्यक्ती यांच्यातले संबंध हा मुद्दा वुडवर्डनी प्रस्तुत पुस्तकात हाताळला आहे. बातमी देणारा माणूस गुप्त ठेवणं, त्याची वाच्यता न करणं हे बातमीदाराचं व्यावसायिक, नैतिक कर्तव्य असतं. बातमीचा उगम न सांगण्याबद्दल बातमीदार तुरुंगात जातात. बातमीचा उगम सांगितला तर माहिती देणाऱ्या माणसाचं वाट्टोळं होऊ शकतं, त्याला वाचवणं ही बातमीदाराची जबाबदारी असते.
प्रस्तुत पुस्तकात रिचर्ड डार्मन या व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्याबद्दल वुडवर्डनी लिहिलंय. डार्मन प्रेसिडेंट रेगन यांच्या कार्यालयात स्टाफ ऑफिसर होता. प्रेसिडेंट आणि जग यातला दुवा असं महत्वाचं स्थान स्टाफ ऑफिसरला असतं. डार्मनला रेगन, त्यांचं घर, त्यांचे सहकारी, त्यांचे सहकारी मंत्री, ऊच्च पदानवरचे अधिकारी यांची खडानखडा माहिती असे.
डार्मन प्रेसिडेंट बुश यांचा बजेट ऑफिसर झाला. प्रेसिडेंट म्हणजे सरकार. प्रेसिडेंटचं बजेट कसं असेल, असावं याचा सल्ला डारमनना द्यावा लागे. अर्थमंत्री, जाणकार, अधिकारी, पक्षातली माणसं, खुद्द प्रेसिडेंट यांचे विचार आणि त्यांच्याजवळ असलेला डेटा या सर्व गोष्टी डार्मनना हाताळाव्या लागत.अत्यंत महत्वाचं पद. वुडवर्डना बुश सरकारच्या आर्थिक धोरण व विचारांची बित्तंबातमी डार्मनमुळं कळत असे. जगाला हे माहित नव्हतं. डार्मन आणि वुडवर्ड यांचे कौटुबिक संबंध होते. एकत्र जेवत. एकत्र पोहायला जात. एकत्र ड्रिंक घेत. डार्मनचा मुलगा आणि वुडवर्डची मुलगी यांच्यात दोस्ती होती. दोघांच्या कुटुंबांना हे कळलं नाही की डार्मनकडून वुडवर्डना बातम्या मिळत असत. वुडवर्डच्या प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यामधून डार्मन बातमीच्या मुळाशी आहेत याचा पत्ता लागत नसे. इतर अनेक उगमांकडून माहिती गोळा केली जात असल्यानं कोण्या एकट्या माणसाच्या नावावर बातमी खपवली जात नसे.
डार्मन आणि वुडवर्ड यांच्यात घट्ट मैत्री होती. डार्मन आणि वुडवर्ड यांच्यात घट्ट व्यावसायिक संबंधही होते. दोन्ही गोष्टी दोघांनीही मिसळल्या नाहीत.
बुश दुसऱ्या खेपेची निवडणुक लढवत होते तेव्हां वुडवर्डनी बुश यांच्या आर्थिक धोरणांबद्दल तीन लेख लिहिले. वुडवर्डनी व्हाईट हाऊस आणि सरकार यांच्यातल्या अनेकांशी चर्चा करून लेख तयार केले होते. पण लेखांचा गाभा डार्मन यांच्या माहितीमुळं पक्का झाला होता. धोरण ठरवतांना बुश धरसोड करत होते, पक्के नव्हते, त्यांच्या जवळ स्वतःचा असा पक्का धोरण विचार नव्हता हे या लेखमालेतून सिद्ध झालं. बुश यांच्या आर्थिक धोरणातले दोष या लेखमालेमुळं उघड झाले.
आपण काय लिहितोय हे वुडवर्ड डार्मनशी बोलले. डार्मन म्हणाले की हे लेख निवडणुकीच्या आधी छापू नका. वुडवर्ड म्हणाले की खरी गंमत ते लेख आधी छापण्यातच आहे. डार्मन म्हणाले की आधी छापलेत तर डार्मन एक्सपोज होतील, त्यांची नोकरी जाईल. वुडवर्ड म्हणाले की आधीच छापणं आवश्यक आहे. नोकरी जाईल या मुद्द्यावर ते गप्प बसले. वुडवर्डनी लेखांचा सारांश डार्मनना पाठवला. डारमन पुन्हा म्हणाले छापू नका.
मैत्री की कर्तव्य असा पेच उभा राहिला. वुडवर्डनी लेख छापले. कुठंही डार्मनचा उल्लेख नव्हता.डार्मनना राजीनामा द्यावा लागला. डार्मन आणि वुडवर्ड यांच्यातली मैत्री संपली. दोन्ही कुटुंबातल्या व्यक्ती म्हणाल्या, वुडवर्डनी लेख छापायला नको होते.
डार्मन यांनी खूप वर्षांनी पुस्तक लिहिलं. त्यात अगदी एका ओळीत वरील प्रकरणाचा पुसट उल्लेख केला,आपलं दुःख व्यक्त केलं, वुडवर्ड यांचं नाव न घेता.
वुडवर्ड यांची बातमीदारी या पुस्तकात कळते. पत्रकारी काय असते, काय असू शकते याची कल्पना पुस्तक वाचतांना येते.
वुडवर्ड यानी संपादक असताना एक दीर्घ वृत्तांत छापला होता. वृत्तांत चटकदार होता. वृत्तांत लिहिणाऱ्या माणसाला पुलित्झर पारितोषिक मिळालं. नंतर सिद्ध झालं की वृत्तांत सपशेल खोटा होता. ज्या आठ वर्षाच्या मुलाच्या व्यसनी असण्याबद्दल लिहिलं होतं तो मुलगाच अस्तित्वात नव्हता. पुलित्झर परत घ्यावं लागलं. या वृत्तांताच्या खरेपणाबद्दल सुरवातीलाच अनेक सहकाऱ्यांनी शंका घेतली होती. वुडवर्डनी तपासणी केली नाही, माहितीचा खरेखोटेपणा तपासणं हे व्यावसायिक कर्तव्य वुडवर्डनी पार पाडलं नाही.
वुडवर्डचं संपादकपद गेलं.
१९७० पासून वुडवर्ड बातमीदारी करत आहेत. प्रत्येक मुलाखत, प्रत्येक बातचीत, प्रत्येक कागदोपत्री माहिती ते टिपून ठेवत असत. आज या टिपणांचे अनेक खोके वुडवर्डच्या घरी आहेत. फार म्हणजे फार मेहनत आणि नोंदी. त्यातल्याच एकेक नोंदी काढून वुडवर्ड पुस्तकं लिहीत आहेत. प्रस्तुत पुस्तक तशापैकी एक.
रिसझार्ड कापुश्चिन्सकी नावाचा एक पोलिश पत्रकार होऊन गेला. तोही वृत्तांत लिहितांना ढीगभर नोंदी करत असे. नंतर त्यानं त्या नोंदीवरून पुस्तकं लिहिली. या पुस्तकांचं मोल येवढं होतं की त्यांना साहित्याचं नोबेल देण्याचं ठरलं होतं. दुर्दैवानं पारितोषिक जाहीर होण्याआधी त्यांचा मृत्यू झाला, पारितोषिक हुकलं.
।।