अफगाणिस्तानात अजून अल कायदा आहे?

अफगाणिस्तानात अजून अल कायदा आहे?

आज अफगाणिस्तानात अल कायदा शिल्लक आहे?

अल कायदानं सप्टेंबर २००१मधे न्यू यॉर्कमधले ट्विन टॉवर उडवले त्या घटनेला २५ वर्षं झाली. 

ओसामानं अफगाणिस्तानातून हल्ल्याचं नियोजन केल्याचं कळल्यावर अमेरिकेनं ओसामाला पकडण्यासाठी आणि अल कायदा नष्ट करण्यासाठी खूप खटाटोप केला. ओसामाला आश्रय दिला म्हणून तालिबानची राजवट नष्ट केली. अफगाणिस्तानावर आक्रमण केलं, दीड लाखाची फौज तैनात केली, अनंत हल्ले केले. अफगाणिस्तान हे अमेरिकेचं दुसरं वियेतनाम ठरलं. अमेरिकेला तालिबानसमोर नाक घासत अफगाणिस्तानातून बाहेर पडावं लागलं.

रशियाला हुसकण्यासाठी अमेरिकेनं तालिबान वाढवलं. तालिबाननं अल कायदाला वाढवलं. मग अमेरिका तालिबान विरोधात लढली. मग अमेरिका अल कायदाच्या विरोधात लढली. शेवटी अफगाणिस्तानचा नाद सोडून अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडली.

आज अफगाणिस्तानात अल कायदा आहे. त्या तालिबानचा अल अदेल नावाचा एक आमिर आहे. अल अदेल इजिप्शियन आहे, त्याला तालिबान थारा देत नाही, तो इराणमधे लपून आहे. अफगाणिस्तानातलं आजचं अल कायदा म्हणजे जगाचा थरकाप उडवणारं अल कायदा नाहीये. तो हवा गेलेला एक फुगा आहे. अफगाणिस्तानात  १४ विभागात अल कायदाची केंद्रं आहेत.  त्यामधे सुमारे १०० कार्यकर्ते आहेत. विविध जिहादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण या केंद्रांमधे होतं. खुद्द अल कायदाचे जिहादी तिथं तयार होत नाहीत. जगभर उचापत्या करायला तालिबान सरकारचा विरोध आहे.  तालिबानच्या कार्यकर्त्यांचं आणि तहरीके तालिबान या संघटनेच्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण अल कायदा करतं. अल कायदा एक निरुपद्रवी शाळा आहे.  

ओसामा बिन लादेनचं अल कायदा हा जागतीक इस्लामी क्रांतीचा विचार होता. अमेरिका व पश्चिमी देशांतली सरकारं उलथवून तिथं इस्लामी राज्य स्थापणं; मुस्लीम देशातली भ्रष्ट सरकारं उलथवणं; खलिफा या संस्थेचं पुनरुज्जीवन करणं; ही अल कायदाची उद्दीष्टं होती. तो विचार आता अफगाणिस्तानलं अल कायदा करत नाही.

ओसामाच्या मृत्यूनंतर हिंसा आणि राज्य उलथवणं हे कॉमन सूत्र घेऊन अल कायदाचे फुटवे निघाले. पण हे फुटवे सीरिया, इराक, पॅलेस्टाईन, जॉर्डन,अफगाणिस्तान  इत्यादी विभागामधे उलथापालथ करण्यापुरतेच मर्यादित राहिले. प्राचीन पर्शियातल्या खोरासान या विभागासाठी नव्यानं राज्य स्थापण्याचा विचार खोरासान क्रांती गट आज करतो. ती क्रांतीही फक्त खोरासान या  विभागापुरतीच. अख्ख्या जगाचा अल कायदाचा क्रांती  विचार ओसामाच्या मृत्यूनंतर अस्ताला गेलाय.

१९८८ साली अल कायदाची निर्मिती अफगाणिस्तानात झाली. रशिया धार्जिणं सरकार उलथवण्यासाठी जगभरातून जिहादी कार्यकर्ते अफगाणिस्तानात गोळा झाले होते. त्यांचं प्रशिक्षण आणि वैचारिक बैठक अल कायदा देत असे. रशिया धार्जिण्यांना उलथवणं याच्या पलिकडं जाऊन इस्लामी विचारावर आधारित सरकार स्थापणं हे अल कायदाचं मुख्य विचारसूत्र होतं. पॅलेस्टिनी अझ्झ्मनं कार्य सुरु केलं आणि त्याला ओसामा बिन लादेननं बळ पुरवलं. ओसामा  त्या काळात सौदी अरेबियातच होता. ओसामाचं भांडण सौदीतल्या राज्यकर्त्यांशी होतं. सौदी अरेबियाचं सरकार इस्लामी नव्हतं; त्यांनी अमेरिकन काफीर सैनिक सौदीच्या पवित्र भूमीवर ठेवले याचा राग ओसामाला होता. सौदी सरकार बरखास्त व्हावं येवढंच त्याला हवं होतं. त्या जागी ओसामाला स्वतः सत्ताधारी व्हायचं नव्हतं.

ओसामा श्रीमंत होता. ओसामाला कर्मठ इस्लामी लोकांचा पाठिंबा होता. ओसामाच्या रक्तातच इंजिनियरिंग होतं. कामं आखून पार पाडण्याचं कौशल्य त्याच्याकडं होतं.  सौदी सत्ताधारी परिवाराला तो नकोसा झाला. ओसामानं आपलं कुटुंबं, माणसं विमानात भरली आणि बाहेर पडला. मजल दर मजल करत अफगाणिस्तानात पोचला. तिथं अझ्झमनं अल कायदाचा पाया घातलाच होता. 

तालिबानची सत्ता होती. तालिबानला अल कायदाची मदत झाली. मुल्ला उमरनं अट घातली. ओसामानं खुश्शाल अफगाणिस्तानात रहावं पण जगभर उचापत्या करू नयेत. ओसामानं ते ऐकलं नाही.

 अमेरिकेवर हल्ला करण्याची योजना खालिद अहमदनं अफगाणिस्तानात, तोराबोराच्या गुहेत ओसामा बिन लादेनसमोर मांडली. इच्छा खालिद अहमदची, कल्पना ओसामाची, अमलबजावणी खालीदची. ओसामानं आशिर्वाद दिला. खालीदनं योजना आखली. खालीदनं  माणसं, पैसे गोळा केले, जर्मनीत त्यांचं प्रशिक्षण केलं.

 ट्विन टॉवर कोसळल्यावर अमेरिकेनं ओसामाला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. अमेरिकेनं तालिबानकडं ओसामाची मागणी केली. तालिबानमधला मुल्ला उमर गट ओसामाला अमेरिकेच्या स्वाधीन करायला तयार नव्हता. पण एक गट ओसामानं अफगाणिस्तान सोडून जावं या विचाराचा होता. तालिबान आणि ओसामा यांच्यात प्रेम आणि दुरावा असे विसंगत संबंध होते. अमेरिकेनं अफगाणिस्तानावर हल्ला सुरु केल्यावर ओसामानं पाकिस्तानचा आश्रय घेतला.

शेवटी अमेरिकेनं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला अंधारात ठेवून ओसामाचा माग काढला आणि त्याला ठार केलं.

अल कायदा ही रुढार्थाची संघटना नव्हती. ओसामानं कामगिरीचे आदेश द्यायचे, पैसे व माणसं पुरवून कामगिरी पार पाडायची असा मामला नव्हता. प्रेरणा आणि ब्लू प्रिंट ओसामाचा. सल्ला ओसामाचा. स्थानिक पातळीवरच्या लोकांनी आपापले उद्योग स्वतंत्रपणे करायचे. 

इस्लामी नसलेल्या अश्रद्ध राजवटी उलथवून जगभर इस्लामी राज्य तयार व्हावीत. अख्ख्या जगातल्या मुस्लीम कौमसाठी एक खलिफा असावा. त्याच्या मार्गदर्शनाखाली जगभरची इस्लामी राज्य चालावी. ही कल्पना सेक्सी आहे. अनेक माणसं या कल्पनेच्या प्रेमात पडली. जागोजागी त्यांनी आपापल्या लोकल क्रांत्या केल्या. अगदी मोठी क्रांती जमली नाही तरी अनेक दहशती उद्योग या विचारानं भारलेल्या लोकांनी केले.दहशतवादी कृत्त्यात  झिंग असते. 

ओसामा जिवंत होता तोवर त्याचा दबदबा होता. तो कुठं रहातो, काय करतो याचा पत्ता कधी कोणाला लागत नसे. दहा वर्षं त्यानं अमेरिकेच्या बलाढ्य गुप्तचर संस्थेला झुंजवलं.ओसामा ही दंतकथा त्याच्या मरणात संपली.

अफगाणिस्तानात अल कायदा आहे. हवा गेलीय, फुगा शिल्लक आहे. 

।।

Comments are closed.