न्यूरेंबर्ग. क्रौर्याचा अभ्यास मांडणारा चित्रपट. 

न्यूरेंबर्ग. क्रौर्याचा अभ्यास मांडणारा चित्रपट. 

न्यूरेंबर्ग. क्रौर्याचा अभ्यास मांडणारा चित्रपट. 

।।

 ‘न्यूरेंबर्ग’ ॲमेझॉन प्राईमवर आहे.

।।

न्यूरेंबर्ग हे जर्मनीतलं मोठ्ठं शहर. हिटलरनं याच शहरात १९३५ साली,ज्यूविरोधाचा,ज्यू द्वेषाचा,ज्यू छळाचा, ज्यूंचा जगण्याचा अधिकार काढून घेण्याचा, कायदा केला. याच शहरात (आणि इतरत्र) हिटलरच्या लोकांनी ज्यूंचा छळ केला, ज्यू मारले. याच शहरात, हिटलरनं आत्महत्या केल्यानंतर, नव्हेंबर १९४५ ते ऑक्टोबर १९४६ या काळात, अत्याचार करणाऱ्या २२ जर्मन अधिकाऱ्यांवर अमेरिका, ब्रीटन,फ्रान्स, आयर्लंड आणि रशिया या देशांनी खटला चालवला.  खटल्यात हर्मन गोअरिंगला फाशी झाली.

हा खटला प्रस्तुत चित्रपटाचा विषय आहे.

।।

प्रथम चित्रपट म्हणून.

ज्यूंवरचे अत्याचार एकदाच एका क्लिपमधे दाखवण्यात आलेत. 

 हिटलरचा नंबर टू गोअरिंग आणि अमेरिकन मनोविकार तज्ञ डॉक्टर केली यांच्यातला संवाद चित्रपटभर आहे.गोअरिंगचं मन काय आहे, गोअरिंग हा माणूस कसा आहे त्याचा अभ्यास केलीनं केलाय. केली प्रश्न विचारतो, गोअरिंग उत्तरं देतो. प्रश्न आणि उत्तरं अगदी चुरचुरीत आणि आटोपशीर आहेत. वाक्यं लहान आहेत. भाषणं नाहीत.

चित्रपटात १९४६ सालचं न्यूरेंबर्ग दिसतं. त्या काळातल्या कार दिसतात, त्या काळातले पेहराव दिसतात. कला दिक्दर्शन असं आहे की आपण त्या काळातच वावरतोय असं वाटतं.

 पूर्ण चित्रपट गुन्हेगारांचं म्हणणं काय आहे हे तपासण्यात गुंतलेला आहे.  संवाद हेच चित्रपटाचं मर्मस्थान आहे. संवादांवर लक्ष रहावं या दिशेनं चित्रांची मांडणी केलेली आहे.

गोअरिंग (रसेल क्रो) आणि त्याचा अभ्यास करणारा डॉ. केली (रामि मलेक) यांच्यातली जुगलबंदी विलक्षण आहे, दोघांचा अभिनय विलक्षण आहे. शब्द मोजके पण धारदार. शब्दफेक संथ आणि धारदार. चेहऱ्यावरचे बदलणारे भाव. भेदक डोळे. व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवणारी खांदे, हात यांची आणि धडाची हालचाल. विशेषतः केलीच्या ओठांची हालचाल.  दोन व्यक्तीमधली संभाषणं असूनही प्रेक्षक खिळून रहातो.

चित्रपटाचा विषय माणसाचं अंतरंग. क्लोज अपवर भर आहे. व्यक्ती समजायला मदत होते. 

अत्यंत व्यापक असा प्रश्न आणि त्यात गुंतलेली मोजकी माणसं. म्हणूनच  लाँग शॉट आणि क्लोज अप यांची गुंफण. दृश्य छोट्या लांबीची, भराभर सरकतात. गोष्टीला वेग येतो.

  गुंत्याचा विचार करायला लावायचा असल्यानं चटकदार दृश्यं नाहीत. सेक्स नाही, गाणं नाही, रक्ताच्या चिळकांड्या नाहीत, प्रेतं पुरताना किंवा जळताना दिसत नाहीत. प्रचंड हिंसा घडलीय हे प्रेक्षकानं  मनात ठेवायचं आणि समोरचे संवाद ऐकायचे.  माणसं मारणारा माणूस कसा आहे हे प्रेक्षकानं पहायचं, प्रत्यक्ष माणसं मरताना पहायचं नाही.

चित्रपट सेपिया रंगात आहे. सत्तर पंचाहत्तर वर्षाच्या पूर्वीचा काळ आहे हे लक्षात यावं यासाठी हा रंग, त्याच्या गडद छटा. 

मनाला आणि डोक्याला भोकं पाडणारा विषय, बौद्धिक पातळीवर हाताळायचा, रंजकतेकडं जायचं नाही अशा बेतानं दृश्यांची रचना. पटकथा आणि दिक्दर्शनाची कमाल. अभिनयाचीही कमाल.

आशयाबाबत.

चित्रपट विषयाचे धागेदोरे उसवून आपल्यासमोर ठेवतो.

गोअरिंग या माणसानं छळछावण्या उभारायला परवानगी दिली, माणसांना मारायची परवानगी दिली. जर्मनीची अस्मिता जागी करणाऱ्या हिटलर या नेत्याची-वरिष्ठाची आज्ञा गोअरिंगनं पाळली. आज्ञा पालन हा तर गुण मानला जातो.आज्ञापालनात  गोअरिंग लाखो मारले. कर्तव्य पालन की क्रौर्य? 

 गोअरिंगनं माणसांना त्यांचा दोष नसतांना तुरुंगात घातलं. पर्ल हार्बरवर जपाननं हल्ला केल्यावर अमेरिकेत वसलेल्या निरपराध जपान्यांना अमेरिकेनं तुरुंगात घातलं होतं. दोन गोष्टीत काय फरक?

हिटलरनं लाखो निरपराध ज्यूंना ठार मारलं. अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकीतल्या निर्दोष जपानी नागरिकांना लाखोंच्या संख्येनं मारलं. अमेरिकेनंही होलोकॉस्टच केलं ना?

 हे मुद्दे गोअरिंगनं स्वतःच्या समर्थनासाठी केलीसमोर मांडले.  गोअरिंग हा क्रूरकर्मा आहे हे आपण आधीच ठरवलं असल्यानं त्याचे प्रश्न उडवून लावता येतात. गोअरिंगला बळीचा बकरा करत होते?

गोअरिंगचं वर्तन क्रूर होतं. होतंच. गोअरिंगचा अभ्यास मनाचा अभ्यासक या व्यावसायिक बाजूनं केली यानं केला. त्याचं निरीक्षण असं. गोअरिंग नार्सिसिस्ट, आत्मलुब्ध माणूस होता.

आत्मलुब्ध माणसाला वाटतं की योग्य काय ते त्यालाच माहित असतं आणि तो योग्य तेच करत असतो. ठाम विश्वास असतो त्याचा. अशा माणसाला योग्य गोष्टी अमलात आणण्यासाठी सत्ता हवी असते. सत्ता मिळवणं हे त्याचं कर्तव्य असतं. योग्य गोष्टी अमलात आणताना जे जे करावं लागतं ते योग्यच असतं असं त्याला वाटत असतं. त्यासाठी माणसं मारायला तो तयार असतो, हज्जारो प्रेतांवरून चालत जायला तो तयार असतो, तयार असतो असं नव्हे तर त्याला त्यात आनंद होतो.  केलीचं म्हणणं होतं की मनोविज्ञानाच्या पुस्तकात हे सारं वाचायला मिळतं, तसा सिद्धांतच मनोविज्ञान मांडतं. आत्मलुब्ध माणसं जगात सर्वत्र असतात.  

केली गोअरिंगचं समर्थन करतोय असा आरोप लष्करानं केला.लष्करानं त्याला बडतर्फ केलं.

 केली रेडियोवरच्या चर्चेत भाग घेताना म्हणाला की अमेरिकेतही आत्मलुब्ध माणसं आहेत. म्हणजेच गोअरिंग अमेरिकेतही आहेत. रेडियोवाले भडकले. अमेरिकन सरकार, माध्यमं भडकली. केलीवर टीका झाली. 

चित्रपट संपल्यानंतरच्या निवेदनात आपल्याला कळतं की केलीचं पुस्तक प्रकाशित होऊ शकलं नाही. केली  डिप्रेशनमधे गेला, व्यसनाधीन झाला, त्यानं   आत्महत्या केली.

गोअरिंगने केलेली पापं  केलीनं गोअरिंगच्या पदरात घातली, गोअरिंगला त्याच्या दुष्कृत्यांबद्दल टाकून बोलला. तुरुंगातल्या खोलीतून बाहेर पडत असताना गोअरिंगनं विचारलं ‘निदान मी माणूस होतो हे तरी मान्य करशील?’. केली न बोलता बाहेर पडला. 

प्रस्तुत चित्रपट हे  केली आणि गोअरिंग यांच्यातलं युद्ध आहे. युद्धात कोण जिंकतं?  

गोअरिंगला फाशी झाली. गोअरिंगनं फासावर जायच्या आधीच सायनाईडची कॅप्सुल खाऊन आत्महत्या केली.

केलीनंही आत्महत्या केली.

।।

Comments are closed.