१८६४ वाली बियर
१८६४ मधली बियर प्यायचीय?
उपलब्ध आहे, धीर धरावा लागेल
व्हिस्की जितकी जुनी तितकी चांगली असं ग्लासप्रेमी सांगतात. जुनी झाली की किमत वाढत जाते. लोक शंभर वगैरे वर्षं जुनी व्हिस्की विकत आणून कपाटात ठेवतात,पीत नाहीत. ती व्हिस्की गुंतवणूक आणि प्रतिष्ठेची वस्तू होते.
असं बियरबाबत नाही. बियर जुनी झाली की ती फ्लॅट होते असं म्हणून ग्लासप्रेमी ती नाकारतात.
पण मुळात अशा जुन्या बियर मिळतातच कुठं? कोण कशाला जुन्या बियरची मागणी करेल?
नुकतीच १८६४ मधल्या नोव्हेंबर महिन्यात तयार झालेली एक बियर मिळालीय.सध्या ती लंडनमधे आहे.
(१३ हजार वर्षांपूर्वी बियर तयार झाल्याचे पुरावे सापडतात. ४ हजार वर्षांपूर्वी आजच्या बियरच्या जवळ जाणारी बियर तयार झाली. त्याच सुमारास वाईनची निर्मिती झाली आणि तिथूनच आसवं म्हणजे आज ज्याला हार्ड ड्रिंक म्हणतात त्यांची निर्मिती सुरु झाली.)
त्याचं असं झालं. समुद्रात बुडी मारून बुडालेल्या जहाजातल्या वस्तू वर काढणारे लोक आहेत, कंपन्या आहेत. तो त्यांचा व्यवसाय असतो. अशा एका गटानं लंडनपासून काही अंतरावर समुद्रात बुडी मारून एक जहाज शोधलं. १८६४ साली हे जहाज लंडनहून व्हँकुव्हरला (कॅनडा) निघालं होतं. काही अंतर गेल्यावर ते बुडालं. प्रस्तुत कंपनीच्या लोकांनी त्या जहाजाच्या अवशेषांची छान मारली. त्यात बियरच्या बाटल्या मिळाल्या.
बियर गिनेस या कंपनीची आहे. ही कंपनी आयर्लंडमधे गिनेस नावाच्या माणसानं १७५९ साली सुरु केली. १८६४ सालची बियर त्या काळात एल या प्रकारातली होती. इंग्लंडमधल्या लोकांना १७५९ साली काळसर, दाट एल आवडत असे. एल बियर तयार करण्याचं एक विशिष्ट तंत्र आहे.
बियर धान्यापासून तयार करतात. यीस्ट टाकून धान्याच्या द्रवात अल्कोहोल तयार होतो. कधी उबदार हवामानात तर कधी थंड हवामानात बियर केली जाते.हवामानानुसार यीस्ट निवडलं जातं आणि फर्मेंटेशनचं तंत्र वापरलं जातं.
एलची चव आवडल्यावर इंग्लंडमधली माणसं एल पिऊ लागली. नंतर त्यांना एलच्या चवीचा कंटाळा आला असणार. एलला थोडीशी फळाची खुमारी असते. ग्लासप्रेमीना नवी खुमारी हवीशी वाटली असणार. त्यानुसार गिनेसबाबा नाना प्रकारच्या बियर करू लागला. लोकांच्या चवी पाहून गिनेसनं हा उद्योग केला? बाजारात नवनवे ब्रँड, विविधता, आणून व्यवसाय वाढवण्यासाठी नवा प्रकार शोधला? सांगणं कठीण आहे.
प्रस्तुत १८६४ वाली बियर स्टाऊट या प्रकारची आहे. अलीकडं लागर या तंत्राची बियर आता खूप खपते. इंग्लंमधे एल खपते, भारतात लागर खपते. लागरमधे बियरचा रंग बदलतो, ती थोडीशी पातळ होते, तिची चवही वेगळी असते. लागरमधे बुडबुडे येतात. एलमधले बुडबुडे धाकटे असतात, लागरमधले बुडबुडे मोठे असतात.
पेयात बुडबुडे येऊ लागले की ती दिसायला छान दिसते. पिणावळीत प्रकाश योजना हा एक घटक असतो. भगभगीत प्रकाश आणि अगदी काळोखही नाही याच्या मधली एक प्रकाश योजना असते. बियर ग्लासात आल्यावर त्या प्रकाश योजनेत कधी कधी आपण सोन्याचा द्राव पितोय की काय असंही ग्लासप्रेमी माणसाला वाटतं. तसं वाटू लागलं म्हणजे बियर उत्पादकाला आनंद होतो, बियरची मागणी वाढते.
अलीकडं म्हणजे आधुनिक काळात ब्रुअरीपासून ग्लासापर्यंत पोचवण्याची वेगळी व्यवस्था तयार झालीय. हज्जारो वर्षांपूर्वी बियर जिथं तयार होत असे तिथंच प्याली जात असे. चांगले रस्ता आणि वाहनं तयार झाल्यावर लोक दूरदूरवरून आलेली बियर पिऊ लागले. मोठ्या मातीच्या भांड्यातून बियर नेत, स्वतःच्या घरात किंवा पिणावळीत माणसं वाडग्यातून बियर पीत.
मातीची भांडी गेली, लाकडी बॅरल आले.
आता ड्राफ्ट पद्धत आलीय. लाकडी पिंपातून बियर आणतात आणि बियरगृहामधे ती नळानं ग्लासात भरतात. अलीकडं नळ पद्दत बंद झालीय, एका मोठ्या काचेच्या रांजणात, टॉवरमधे बियर भरतात आणि टेबलावर आणून ठेवतात.
ते जाउं द्या. तर ती १८६४ची बियर कशी असेल? जर ती स्टाऊट असेल तर नायट्रोजन मिसळून तिच्यात बु़डबडे आणायची सोय झाली नसणार.कारण तंत्र विसाव्या शतकात, १९६० वेगैरेनंतर विकसित झालंय. तेव्हां बाटलीचं झाकण काढल्यानंतर आतून बियर कशी बाहेर येईल? फसफसेल? आतल्या अल्कोहोलचं काय झाल असेल?
बियर हा प्रकारच मुळातला फारसा संस्कार केलेला प्रकार नाही. व्हिस्की किंवा वाईन होते तेव्हां तिच्यावर रासायनिक आणि काळ असे दोन संस्कार झालेले असतात.व्हिस्की किंवा ज्याला टेबलावरच्या भाषेत दारू असं म्हणतात ती डिस्टिल केलेली असते. द्रवाची वाफ,त्या वाफेचा पुन्हा द्रव या भानगडीतून गेल्यानं त्यातले काही घातक विषारी पदार्थ नाहिसे झालेले असतात. गाळणीही लागलेली असते. दारूत आणि वाईनमधेही हे घडत असतं. बियरवर इतके संस्कार झालेले नसतात.
त्यामुळं प्रस्तुत स्टाऊट उघडल्यानंतर काय होईल?
आता हा विषय पिणाऱ्याचा न रहाता वैज्ञानिकांचा होतो. लंडन आणि जगभरातले वैज्ञानिक आता त्या स्टाऊटची डीएनए तपासणी करतील. ती पिण्यायोग्य आहे की नाही याची पहाणी करतील. दीडेकशे वर्षात काही चमत्कार होऊन त्याचं अमृत झालंय काय हेही वैज्ञानिक तपासतील. ती बियर घेतल्यानं कोलेस्टेरॉलचं काय होतं, त्याचा हृदयावर काय परिणाम होतो,किडनीशी तिची किती दोस्ती होते याचीही तपासणी वैज्ञानिक करतील. मार्केटिंगच्या हिशोबात त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. अमूक इतके घोट घेतले की तमूक टक्के कोलेस्टरॉल नष्ट होतो असाही शोध लागेल. बियरमुळं अमूक रोग आटोक्यात येतो असंही जाहिराती सांगू लागतील.मग काय विचारता. वैज्ञानिक आणि ग्लासप्रेमी ग्लास उंचावून चियर्स म्हणतील.
चियर्स