जगणं धंदा की आनंद

जगणं धंदा की आनंद

जगणं. धंदा की आनंद.

केरी व्हाईट, अमेरिका. १९९१ साली त्या वारल्या. पेपरात आलं की त्यांचा जन्म १८७४ साली झाला होता. म्हणजे त्या ११६ वर्षं जगल्या.

काही वर्षांनी उत्साही मंडळीनी केरीचे सर्व रेकॉर्ड तपासले. त्यांचं खरं जन्मवर्षं होतं १८८४. त्यांची १० वर्षं उगाचच वाढवली होती.

जिरोएमोन किमुरा हा जपानी २०१३ साली वारला तेव्हां त्याचं वय ११६ असल्याचं जाहीर झालं. उत्साही मंडळीनी त्याचं रेकॉर्ड तपासलं. जन्माच्या तीन नोंदी होत्या. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याच्या तीन वेगवेगळ्या नोंदी होत्या. त्यांच्या लग्नाच्या तारखा सारख्या नव्हत्या. त्यांनी स्वतःचं नावंही एकदा बदललं होतं. त्यामुळं ११६ हे वय संशयास्पद आहे असं सिद्ध झालं.

२०१० सालची जपानमधली गोष्ट. सरकारनं वृद्ध दिन साजरा करायचं ठरवलं. सोजेन काटो नावाचे गृहस्थ १११ वर्षाचे आहेत, ते रेग्युलर पेंशन घेतात अशी नोंद सरकारला मिळाली. सरकारनं त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. अधिकारी त्या गावात पोचले. तर ते गृहस्थ जिवंत नव्हतेच. त्यांचा १९७८ सालीच मृत्यू झाला होता. त्यांचे नातेवाईक ते जिवंत आहेत असं दाखवून त्यांचं पेन्शन खात होते.

बिझनेसमनच्या डोक्यात आयडिया आली. शतायुषी माणसांची माहिती मिळवायची. ते काय खातपीत होते, ते कसे जगत होते, ते कसे व्यायाम योगाभ्यास वगैरे करत होते याची माहिती गोळा करायची. त्या माहितीच्या आधारे धंदा करायचा. साधारपणपणे २००४ सालापासून या धंद्याला जोर आला.

हाताशी माहिती हवी. एकाद दोन गावात जायचं. तिथल्या पाच पन्नास माणसांची माहिती गोळा करायची. त्यावर असं लिहायचं की जणू काही तिथल्या गोष्टींचं अनुकरण केलं की साऱ्या जगातली सर्व माणसं शतायुषी होऊ शकतात.

पहाणीकार इटालीत सार्डिनिया बेटावर गेले. तिथं काही गावात फिरले. तिथं शंभर वर्ष जगणारी माणसं ‘खूप’ आहेत असं त्यांना आढळलं. सार्डिनिया बेटाला ब्लू झोन असं नाव देण्यात आलं. पहाणीकार जगभर फिरले, त्या विभागाला त्यांनी ब्लू झोन हे नाव दिलं.

ब्लू झोन कसा जगतो?

जपानातल्या एका ब्लू झोनमधे गेले. तिथं माणसं दिवसाला इतके इतके कप ग्रीन टी पीत होते.

फ्रान्समधल्या एका ब्लू झोनमधे माणसं दिवसाला दोन किंवा अधिक ग्लास वाईन पीत होते.

पेपर आणि पुस्तकं वरील प्रकारची माहिती छापू लागले.

काही माणसं भाकऱ्या खात होती. काही माणसं नुसते दुधाचे पदार्थ खात होती. काही ठिकाणी भरपूर कंदमुळं खात होती. काही ठिकाणी नुसतेच मांसाहार करत होते. सामान्य माणसानं कधीही खाल्ली नसतील अशी धान्यं, बिया, पानं, फळं इत्यादींचे संदर्भ लिहिले गेले.काही ठिकाणी लोक भरपूर प्राणायाम करत होते. काही ठिकाणी लोक भरपूर जिममधे जात होते. काही ठिकाणी लोक दिवसाचे १० तास वगैरे झोपत होते. काही ठिकाणी माणसं ध्यानधारणा आणि योगाभ्यासात योग्य मार्गदर्शनाखाली कित्येक तास खर्च करत होते.

नाना प्रकारचे पदार्थ. व्यायामासाठी वापरली जाणारी यंत्रं. मन आणि झोपेवर नियंत्रण आणणारे गुरू आणि त्यांचे अभ्यासवर्ग. काय, किती, केव्हां खावं याचे अभ्यासक्रम. प्राणवायू देणारे पार्लर. शंभर टक्के शुद्ध हवा असलेली बेटं. शतायुषी हा एक उद्योग फोफावला. किती ट्रिलियन डॉलरचा धंदा सुरु झाला त्याची गणतीच नाही.

ऑक्सफर्डमधले प्रोफेसर Saul Justin Newman यांनी ‘Morbid: Debunking Modern Longevity Science’ नावाचं पुस्तक लिहून शतायुषी उद्योगांवर नुकताच प्रकाश टाकलाय.

न्यूमन विचारतात की मुळात शंभर वर्षं जगणारी माणसंच किती? अपुऱ्या आणि संशयास्पद नोंदीमुळं ती संख्या मोठी आहे असं भासवलं जातं.चुकीची माहिती प्रत्येक वेळी लबाडीनंच नोंदवली जात असेल असं नाही, नजरचुकीनं किंवा गलथान सवयीमुळंही चुकीच्या नोंदी होत असतील.

न्यूमन विचारतात की शतायुषी होण्याच्या कारणांचा शास्त्रीय विचार केला गेलाय? क्रिश्चन मॉर्टेन्सन हा माणूस सर्व आयुष्यभर धुम्रपान करत होता. जुआने पेरेझ हा माणूस आयुष्यभर मद्यपान करत होता. या पैकी कोणीही ध्यानधारणा केली नाही, जिममधे गेले नाहीत, छानछान अन्नपदार्थ खाल्ले नाहीत. दोघंही शंभर वर्ष जगले. याचा अर्थ काय?

न्यूमननी न सांगितलेलं एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध विन्सटन चर्चील. ९० वर्षं जगले. अनंत रुपातलं अल्कोहोल आणि सिगार ते भरपूर प्रमाणात सेवन करत होते. ते लठ्ठही होते.

न्यू मन विचारतात- खेळाडू लोकांचा आहार,विचार,निद्रा इत्यादी सारं एकदम म्हणजे एकदम नियंत्रीत असतं. ते कुठं शतायुषी होतात?

प्रस्तुत पुस्तकात न्यूमन यांनी शतायुषी कसं व्हावं याचे मार्गदर्शक धडे लिहिलेले नाहीत. त्यांनी या विषयाला वाचा फोडून चर्चेला वाट मोकळी करून दिली. चांगलं जगू नका, व्यसनी व्हा आणि वाट्टेल तसं वागा असं लेखक सांगत नाही. लेखक सांगतो की माणसाच्या जीन्स आणि परिसर यांच्यातल्या संवाद आणि सहवासानं माणसाचं दीर्घ काळ जगणं ठरत असतं. औषधं हाही माणसाला दीर्घ जीवन देणारा एक घटक आहे. परंतू या सर्व गोष्टींचं निश्चित गणित नाही, निश्चित फार्म्युला नाही. प्रत्येकानं आपापली वाट काढायची असते, त्यावर अभ्यासक्रम आणि शंभर टक्के मार्क देणारी परीक्षा असू शकत नाही.

प्रसिद्ध विचारवंत जॉन स्टुअर्ट मिल म्हणतो. जगायचं कशासाठी? आनंदासाठीच ना? आनंदाचा दमछाक करणारा पाठलाग करत सुटलात तर आनंद सापडत नाही. दुसरं काही तरी करा, आनंद आपोआप मिळेल.

मिलचाच विचार जगण्याच्या खटाटोपाला लावता येईल. आपल्याला शतायुषी व्हायचाय याचा ध्यास सोडा. जगात आनंददायक गोष्टी करत रहा, अनेक वर्षं आयुष्यात वाढत जातील

Comments are closed.