मध्य पूर्व बदलतेय

मध्य पूर्व बदलतेय

मध्य पूर्व बदलतेय

इराण युद्धानंतर मध्य पूर्वेचं रूप पालटू घातलंय. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या पुढाकारानं तयार झालेला मध्य पूर्वेचा राजकीय तोल आता बदलतो आहे. अमेरिका आणि आखाती देश यांच्यात अजून तरी फाटाफूट झालेली नाही पण आखाती देश आपलं पारंपरीक अमेरिकेच्या आश्रयाला रहाण्याचं धोरण बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. तसे सूर आता आखाती अरब देशात कानावर येत आहेत. तिथले बिझनेसमन उघडपणे तसं बोलत आहेत.

इराणबरोबर अमेरिका युद्धबंदी करार करण्याच्या खटपटीत होता तेव्हांच ओमाननं जाहीर केलं की ओमान आणि इराण एकत्रितपणे होरमुझ आखाताच्या व्यवस्थापनाचा विचार संयुक्तपणे करणार आहेत.

ही बातमी फुटल्यानंतर डोनल्ड ट्रंप खवळणं साहजिक होतं. इराणबरोबरच्या करारातलं एक कलम होतं होरमुझमधील वाहतूक निरंकुष असेल, होरमुझ आखात वैश्विक मालकीचं असल्यानं इराणला तिथं टोल वसूल करता येणार नाही. या कलमावर इराण आणि अमेरिकेत झकाझकी चालली असतानाच ओमाननं इराणशी वाटाघाटी सुरु करण्याचं सूतोवाच केलं.

समुद्र जगाच्या मालकीचा आहे हे आंतरराष्ट्रीय तत्व इराण झुगारतो आहे. टोल द्या नाही तर जहाज जाऊ देणार नाही अशी इराणची भूमिका आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी इराण ही चाल खेळतंय. ओमान वेगळं म्हणतय. ओमान टोल घेणार नाही, ओमान जहाजांकडून स्वेच्छा पैसे घेणार आहे.   सिंगापूरच्या आखातात एक जपानी कंपनी जहाजांकडून स्वेच्छा पैसे घेतं. ही कायद्यातून काढलेली पळवाट आहे. तीच पळवाट ओमानला वापरायची आहे.

शक्यता अशीही आहे की इराणही तीच पळवाट वापरेल. प्रत्येकानं अर्थ समजून घ्यायचा.

ट्रंप रागावले. ओमानवर हल्लेही करू असं त्यानी सूचित केलं. ओमाननं बऱ्या बोलानं नीट वागावं असं ट्रंप म्हणाले.

इराण आणि ओमान यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत. ओमान म्हणतं की अमेरिकेशी मैत्री याचा अर्थ इराणशी शत्रुत्व असा होत नाही. अमेरिकेनं भले इराणशी लढाई करावी, आपण इराणशी संबंध ठेवणार असं ओमानचं पूर्वीपासूनचं म्हणणं आहे. २०१६ ओबामा यांनी इराणबरोबर अणुबाँब थांबवण्याचा करार केला तेव्हां ओमानची मध्यस्थी होती. खरं म्हणजे ओमानच्या एका बिझनेसमननं ओमानच्या सुलतानाशी चर्चा करून आपणहूनच मध्यस्थीचा प्रस्ताव अमेरिकेला पाठवला होता. त्या कराराचे तपशील ओमानमधेच ठरले होते.

अमेरिकेनं इराणच्या अली खामेनाई यांना ठार मारलं तेव्हां ओमानच्या सुलतानानं इराणला शोकसंदेश पाठवला. मोजताबा खामेनाई नवे नेते म्हणून निवडले गेले तेव्हां त्यांना अभिनंदनाचा संदेश उघडपणे पाठवणारा ओमान हा जगातला एकमेव देश होता.

अमेरिकेनं इराणवर युद्ध सुरु केलं तेव्हां ओमानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यानं  जाहीरपणे नाराजी व्यक्त केली, मुत्सद्देगिरीचा अवलंब केला तर बरं होईल अशी मुलाखत त्यानं अमेरिकन चॅनेलला दिली. ओमानमधे पत्रकारांना गोळा करून परराष्ट्र मंत्री म्हणाले की अमेरिकेनं चालवलेल्या युद्धाला कायद्याचा आधार नाही, ते बेकायदा आहे.

ऐन युद्ध सुरु असताना ओमानच्या समुद्रातून जहाजं जगभर तेल पोचवत होती, त्याला इराणनं आक्षेप घेतला नव्हता,अमेरिकेनं ती जहाजं थांबवली नव्हती.

ओमानमधले बिझनेसमन उघडपणे अमेरिकेच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करत असतात.

अमिरातीबद्दल.

इराणनं अमिरातीवर २२६५ ड्रोन सोडले आणि ५५१ मिसाईल डागली. २९ अमिराती नागरीक मेले, २३० जखमी झाले. दुबाई हादरलं. दुबाई व्यापारासाठी प्रसिद्ध आहे, पर्यटन हे दुबाईचं एक महत्वाचं उत्पन्न आहे. तेच धापकन खाली आलं. इराणचं पहिलं मिसाईल दुबाईच्या आकाशात पाडलं गेलं, त्याचे अवशेष खाली कोसळले, त्यात एक माणूस मेला. पण दुबाईला अशा स्थितीची सवय नाही. माणसं हॉटेलं सोडून पळाली. हॉटेलातल्या ९० टक्के खोल्या रिकाम्या झाल्या. विमानतळ ओस पडले. विमान कंपन्या, पर्यटन कंपन्यांचं जबर नुकसान झालं.

दुबाईतले बिझनेसमन म्हणाले अमेरिकेचं इराणशी वाकडं आहे याचा त्रास आम्ही कां सहन करावा? दुबाईचा सारा अर्थव्यवहार शांतता आणि स्थैर्यावर आधारलेला आहे. युद्ध ही गोष्ट दुबाईला परवडत नाही. वरून बाँब पडणार असेल तर कोण माणूस दुबाईत पैसे गुंतवेल? अमेरिका आणि इस्रायलला युद्ध परवडतंय कारण युद्ध इतरांच्या भूमीवर होतंय, अमेरिका आणि इस्रायल सुखात आहेत. उद्या अमेरिकेवर बाँब पडू लागले तर अमेरिकन बिझनेस चालू शकेल?

सात अमिरातींपैकी एक अबु धाबी आहे. अबु धाबीनं आर्टिफिशिअल इंटेलिजन्स उद्योगामधे १५० अब्ज डॉलर गुंतवलेत. ॲमेझॉन आणि इतर कंपन्यांनी अबुधाबीत डेटा सेंटर उभी करायला घेतलीत. युद्ध सुरु झाल्यावर ॲमेझॉनच्या डेटा सेंटरवर इराणी ड्रोन आदळलं. सेंटरचं नुकसान झालं. हे नुकसान ॲमेझॉन आणि अमिराती कसंबसं भरून काढतील. पण इराणनं ड्रोन वर्षाव मोसमी न ठेवता बारमाही केला तर? किती अब्ज पाण्यात जातील? 

बिनघोर बिझनेस करता यावा म्हणून अमेरिकेची संरक्षक छत्री अमिराती, कतार, सौदी इत्यादीनी घेतली. त्या छत्रीचा उपयोग होणार नसेल तर पर्यायी वाट शोधावी असा विचार आखाती देश करू लागले आहेत.

इराणशी मारामारी करू नये, इराणशी काहीही करून सलोख्याचे संबंध ठेवावेत, किमानपक्षी इराणशी युद्ध तरी होऊ नये असा विचार आखाती देशात सुरु झालाय. अमेरिका लहरी आहे, अमेरिकेचे निर्णय गोंधळात टाकणारे आहेत, अमेरिकेचे निर्णय केवळ अमेरिकेच्या हिताचे किंवा लहरीचे असतात. त्यांचा त्रास आपण सहन करू नये असा सूर आखाती देशात आहे.

अमेरिकेच्या डॉलरची एकाधिकारशाही संपवण्यासाठी २०२४ साली BRICS  उपक्रम सुरू झाला. सौदी अरेबिया, अमिराती आणि इराण त्या उपक्रमात सामिल आहेत. ही घटना हे मध्य पूर्वेतल्या बदलत्या वातावरणाचं प्रतीक मानायला हरकत नाही.

।।

  दुबाईतले बिझनेसमन नाराज आहेत. युद्धामुळं दुबाईचं, अमिरातींचं अब्जावधी डॉलरचं नुकसान झालं.

Comments are closed.