पाहूया कॉकरोच काय करतंय
झेलेन्सकी मुळात टीव्हीतले, युक्रेनचे राष्ट्रपती झाले. बालेन शहा मुळातले रॅपर. नेपाळचे पंतप्रधान झाले. थलपती विजय नट होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले.
हा काळच वेगळा आहे. इतर कोणतीही विश्वास ठेवण्यालायक माहिती मिळत नसल्यानं आता माणसं प्रतिमेकडं आकर्षित होतात. फार चौकशा करत नाहीत. आकर्षक माणसांच्या हाती सत्ता सोपवतात. आकर्षण माध्यमातून तयार झालेलं असतं.
नेपाळमधे ३६ वर्षीय बालेन शहा नुकतेच पंतप्रधान झाले. त्यांची राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी चारच वर्षांपूर्वी रवी लमिच्छाने या टीव्ही अँकरनं निर्माण केली होती. टीव्हीतल्या कार्यक्रमात रवी राजकारणातल्या भ्रष्टाचारावर टीका करत असल्यानं लोकप्रीय झाला होता. बालेन शहा एक रॅपर होता. रॅप गाण्याच्या कार्यक्रमात तो सरकारवर, भ्रष्टाचारावर टीका करत असे. तरुणांमधील बेकारी हा त्याचा मुख्य मुद्दा असे.
बेकारीचा कळस झाल्यानं नेपाळी तरूण रस्त्यावर आले. सुरवातीला हमी नेपाल या संघटनेच्या वतीनं सुदन गुरुंग या एका एनजीओच्या नेत्यानं आंदोलन केलं. गुरुंग यांच्या संघटनेची घोषणा होती ‘आम्ही करू शकतो. वुई कॅन डू.’ सरकारनं आंदोलन चिरडलं, माणसं मारली. चिडलेले लोकांनी संसदेला घेराव केला,मंत्र्यांना ठोकून काढलं. प्रकरण हाताबाहेर गेल्यावर सैन्यानं कारभार हाती घेतला. निवडणुक झाली. निवडणुकीत बालेन शहानी नेपाळी संसदेच्या २७५ पैकी १८३ जागा मिळवल्या, पंतप्रधान ओली यांचा दणदणीत पराभव केला.
निवडून आलेले बहुतेक राजकारणात नवखे आहेत, उत्साही,बेभान, चिडलेले तरूण आहेत. राजकारणापासून दूर असल्यानंच ते राजकारणातल्या भ्रष्टाचारावर आणि अपयशांवर टीका करू शकत होते.
तरूणांची काही तरी करायची इच्छा आहे या एका गोष्टीवर लोकांनी त्यांना निवडून दिलं. रवी,बालेन यांच्या माध्यमातल्या प्रतिमा निर्णायक ठरल्या.
२७ मार्चला बालेननं शपथ घेतली.
नेपाळची अर्थव्यवस्था लडखडत आहे. कित्येक वर्षं. नेपाळ डोंगराळ आहे. शेतीवर मर्यादा आहेत. उद्योगांवरही मर्यादा आहेत. निसर्ग सोंदर्य, हिमालय, भरपूर पाणी आणि जलविद्युत या नेपाळच्या जमेच्या बाजू आहेत. पैकी हिमालय आणि सौदर्य यावर पर्यटन होऊ शकतं. उद्योग आणि शेतीच्या हिशोबात आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मितीवर फार मर्यादा आहेत. नेपाळी माणसं परदेशात जातात,तिथून पैसे पाठवतात, तो नेपाळच्या उत्पन्नाचा २५ टक्के भाग आहे. परंतू गोळा बेरीज केली तर नेपाळ जेमतेम चालतं म्हणता येईल, विकास होत नव्हता. कारण राजकारणात भ्रष्टाचार फार होता. भ्रष्टाचार हाच प्रगतीतला मोठा अडथळा होता.
आर्थिक विकासाची मॉडेलं असतात.त्यात त्रुटी असतात.त्या सुधारताही येतात. मॉनेटरी फंड वगैरे लोकांचं एक मॉडेल असतं. ते प्रत्येक देशात लागू पडेल याची खात्री नसते. देशोदेशीच्या राजकीय व सांस्कृतीक सवयी आड येतात. चांगला नेता कारभार हाकत असेल तर त्यातून वाट निघते. मार्केट अर्थव्यवस्थेतल्या संकटासह भारतात मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्था घसरू दिली नाही. मुद्दा असतो नेतृत्वाचा, राजकीय पक्षाचा, राजकीय संघटनांचा. गाडं तिथंच कोसळत असतं. बांगला देश आणि लंकेतल्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांमुळं अर्थव्यवस्था कोसळली. तेच नेपाळमधे झालं होतं.
बालेन शहा ही कोरी पाटी आहे. शहा काठमांडूचे मेयर होते तेव्हां त्यांनी धडाका लावला होता. शहरातली एक मोठी समस्या होती बेकायदा बांधकामं. गरीब आणि सधन, दोघेही बेकायदा बांधकामं करत असतात कारण सत्ता आणि नोकरशाही पैसे खाऊन त्यांना परवानगी देते. बेकायदा वस्त्या उठवणं कठीण असतं कारण वर्षानुवर्षं एका ठिकाणाची सवय झालेल्यांना दुसऱ्या ठिकाणी वसवणं कठीण जातं. सगळ्या सत्ता इथं मार खातात.
बालेन शहांनी धडाधड वस्त्या उडवल्या. गडबड झाली, टीका झाली. शहांनी निस्तरून नेलं. शहांना पैसे खायचे नसल्यानं, त्यांना ना राजकीय पक्ष होता, ना नेते. त्यामुळं लोकांनीही त्रास सहन केला असेल.
शहांनी तो धडाका सुरू ठेवला आहे. त्यांनी विद्यापीठात राजकीय झेंड्यांना बंदी घातलीय. राजकीय कामगार संघटनांवरही बंदी घातलीय. बेकायदा बांधकामं तर उडवत आहेत. बालेनचे निर्णय नवे आणि मुलखावेगळे असल्यानं वाद सुरू झालेत. बालेन यांचा प्रस्थापित राजकीय पक्ष आणि विचारांवर सॉलिड राग आहे. तो त्यांच्या हालचालीत दिसतोय. त्यामुळं पक्षही नाराज आहेत.
बालेन भाषणं करत नाहीत. बालेन लोकसभेत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कामासाठी वेळ देतात. संसदेत त्यांनी आपल्या सहकारी मंत्र्याला बोलायचे अधिकार दिले आणि स्वतः त्या वेळी सरकारी दफ्तरात बैठक करत होते.
बालेन पठडीतले राजकारणी नाहीत. राजकीय पक्षाच्या अभ्यास वर्ग आणि चिंतन शिबिरात ते गेलेले नाहीत. पाच पन्नास ते हजार वर्षांच्या जुन्या राजकीय विचारधारा आणि विचारवंतांचं जोखड त्यांच्या मानेवर नाही. ते नव्या पिढीचे आहेत. नव्या पिढीच्या समस्या वेगळ्या आहेत, त्यांच्या समजुती वेगळ्या आहेत,त्यांचे हीरो आणि आयकॉन वेगळे आहेत. ही मंडळी काही तरी नवं करू इच्छितात.
आज ज्यांची वयं चाळीसच्या पलिकडं आहेत त्यांना हे सारं समजणं अवघड आहे. कोणतीही समस्या आली की त्या पिढीचे लोक मागं वळून पहातात, जुन्या विचारवंतांच्या पुस्तकात डोकं घालतात. त्यांना आजचं वर्तमान समजत नाहीये. बालेन शहा नव्यानं गोष्टी करू पहात आहेत, असावेत.
झेलेन्सकी टीव्ही कलाकारच होते. त्यांना राजकारणाचा कणभरही अनुभव नव्हता. ते समर्थपणे उभे राहिले, देश सांभाळला, संकटात असताना सांभाळला.
सध्याची राजकीय व्यवस्था, राजकीय पक्ष आणि राजकीय नेते एकजात सडलेले आहेत. त्यामुळं जुनं फेकून देणाऱ्या कोणत्याही गोष्टीकडं आशेनं,उत्सूकतेनं पहायला हवं. मग ते बालेन शहा असोत की थलपती विजय.
आपल्याला आपल्या सवयी आणि विचार बदलायला हवेत.
पाहूया कॉकरोच पार्टी काय करतेय.
।।