एका कामोत्सुक बैलाचं चित्र

एका कामोत्सुक बैलाचं चित्र

ही एका बैलाची गोष्ट आहे. जमिनीवर चितारलेल्या मोझाईक शैलीतल्या बैलाच्या चित्राची.

हे चित्र आहे इटालीतल्या मिलान या शहरातल्या एका शॉपिंग मॉलमधलं. १८७७ साली हा मॉल त्या काळातल्या इटालियन राजानं बांधून पूर्ण केला आणि त्या वेळी हे चित्र मोझाईक पद्धतीनं जमिनीवर उतरवलं.

या चित्रात एक बैल होता. बैल माजावर आला होता. त्यानं पुढले दोन पाय उचलले होते. त्याचं लिंग पूर्ण लांबीचं ताठ झालेलं आहे. बहुदा तो गायीवर आरूढ होण्याच्या तयारीत होता. मॉलमधे येणारे लोक बैलाच्या आंडावर टाच ठेवत, टाच तीन वेळा फिरवत. या क्रियेमुळं माणसाला समृद्धी मिळते अशी लोकांची श्रद्धा होती.

या श्रद्धेची मुळं बहुदा कृषीव्यवस्थेत आहेत. जमीन कसायला, पेरणी करायला बैल लागतो. बैलाला मस्ती असते. मस्ती घालवून   आज्ञाघारक करण्यासाठी ठेचण्याची प्रथा आहे. चांगलं पीक येणं, समृद्धीशी या प्रथेचं नातं आहे.

गेली १२९ वर्षं करोडो पर्यटक या मॉलमधे येत होते, आंड ठेचत होते. ते समृद्ध झाले की नाही ते माहीत नाही पण टाच फिरवण्यामुळं आंड मात्र नाहिसा झाला, तिथं खड्डा तयार झाला.

इटालियन सरकारसमोर   समस्या निर्माण झाली. खड्ड्याचं काय करायचं? जुनी चित्र-शिल्प रिस्टोअर करणाऱ्या तंत्रज्ञाना पाचारण करण्यात आलं. त्यांनी खड्ड्याच्या जागी पांढऱ्या टाईल लावून खड्डा बुजवला. त्यातून निर्माण झालेल्या जागेत व्हिज्युअलमधे एक नुसती कोरी पांढरी जागा दिसू लागली, आंड दिसेनेसा झाला.

नव्या चित्राची थट्टा झाली. कदाचित आता समृद्धी कशी मिळणार असंही लोकांना वाटलं असेल.

 पेपरात बोंब झाली. 

काय करणार? चित्रात पुन्हा फेरफार करायचे?

मिलानच्या मेयरनं मार्ग काढला. त्यानं चित्र तसंच ठेवलं पण चित्राभोवती चारही बाजूनी कठडा बांधला. चित्रं नुसतं पहायचं, ठेचायचं नाही. ठेचणार तरी काय?

एक गोष्ट आठवली. फोनो घरात आणायचा की नाही यावर वाद झाले होते. घरातल्या काहींचा फोनोला विरोध होता, कारण शांतता बिघडते. कुटुंब प्रमुखानं फोनो आणला पण हुकूम काढला की तो वाजवायचा नाही. आणीयाचा पण वाजवियाचा नाय.

बैल हाय पण ठेचियाचा नाय. 

आता पर्यटक हातात या चित्राच्या इतिहासाचं पत्रक घेऊन गर्दी करतात. ठेचणं बंद. जॉर्ज क्लूनी हा जगविख्यात हॉलीवूड अभिनेता मिलानमधे येऊन हे चित्र पाहून गेला. समृद्धी मिळणार नाही या कल्पनेनं तो खट्टू झाला असण्याची शक्यता आहे.

असाच  एक समृद्धीचा मार्ग इटालीत व्हेरोनो शहरात आहे. तिथं डेल केपोल्लो कुटुंबाचं विशाल घर आहे. १४ व्या शतकातल्या या घरात  शेक्सपियरच्या रोमियो ज्युलिएट नाटकातल्या ज्युलिएटचा  पुतळा आहे.  या पुतळ्या भोवतीही एक श्रद्धा तयार झाली. पुतळ्याला स्पर्श करून मनात एक इच्छा धरायची. म्हणे ती इच्छा पूर्ण होत असे.

लाखो पर्यटक. पुतळ्याला स्पर्ष करायचे. पुतळा झिजत गेला, बेढब झाला. ज्युलिएट ओळखू येणार नाही अशी झाली. पर्यटक नाराज.

नवा पुतळा केला. तोही काही काळानं बेढब झाला. आता तिसरा पुतळा बसवलाय. पुढल्या काही दिवसांत रिस्टोअर तंत्रज्ञ काही तरी आयडिया काढतील.असा काही तरी धातू किंवा मटेरियल शोधून काढतील की काही केल्या पुतळा झिजणारच नाही. बोटं झिजतील पण पुतळा झिजणार नाही. तोवर किती पुतळे होतील कुणास ठाऊक.

रोमन हॉलिडे हा ऑल टाईम ग्रेट चित्रपट आठवतो? त्यात एक दृश्य आहे. ग्रेगरी पेक, ऑड्री हेप्बर्नला सांगतो की समोरच्या Bocca della Verità या मुखवटा शिल्पाच्या तोंडात हात घाल, हात घालणारा खोटं बोलला तर त्याचा हात तुटतो. हा प्राचीन मुखवटापुतळा  पहिल्या शतकात तयार झाला आहे. सत्याची पडताळणी करण्यासाठी हा मुखवटा केला गेला असं म्हणतात. 

ऑड्री तयार होत नाही. ग्रेगरी हात घालतो, जणू  पंजा तुटलाय असं भासवत हात बाहेर काढतो. ऑड्री घाबरते. ग्रेगरीला बिलगते.

Bocca della Verità च्या जागी जर नुसतंच एकादं तोंड दिसू लागलं, एकाद्या आधुनिक पुढाऱ्याचा मुखवटा दिसू लागला तर काय होईल?  

मिथकं तयार होतात. मिथकं ही माणसाची गरज आहे. सत्याचं महत्व, समृद्धी इत्यादी गोष्टी मिथकांमधे गुंतलेल्या असल्यानं शेकडो वर्षं टिकल्या. चित्रपट, नाटकं, कादंबऱ्या, कविता, चित्रं, शिल्प यातून मिथकं टिकून राहिली.

मिलानमधलं चित्र, व्हेरोनातलं शिल्प बिघडलं याचं कारण काय? अजिंठा लेण्यातली चित्रं कां खराब होतात?  कारण तिथं जाणाऱ्या पर्यटकांची संख्या. चित्राला किती टाचा लागाव्या यावर काही मर्यादा हवी की नाही? शिल्पाला हात न लावता इच्छा मनी धरावी असं काही करता येणार नाही? अजिंठ्यात जाणारे लाखो लोक इतका कार्बन डाय ऑक्साईड त्या गुहेत सोडतात की चित्रातली पात्रंही घुसमटून जात असतील.

ज्ञान,शहाणपण यांना शॉर्ट कट नसतो. पर्यटन आणि मार्केटिंगनं तो शॉर्टकट पुरवला. विमान प्रवास सुकर आणि सुलभ झाला. लोकांकडं इतके पैसे गोळा होतात की ते कसे खर्च करायचे असा प्रश्न असतो.   ज्ञान मिळवण्याचा शॉर्ट कट असं पर्यटनाचं मार्केटिंग झालं. कलेचा इतिहास, रेनेसान्स इत्यादींच्या अभ्यासाला  शॉर्ट कट. इटालीची पाच दिवसांची टूर. एक दिवस रोम. एक दिवस मिलान. एक दिवस टुरीन. एक दिवस व्हेनिस. एक दिवस खरेदीसाठी मोकळा. बैलाची वाट लागली, ज्युलिएट बेढब झाली. इकडं अजंठाची चित्र निस्तेज होण्याच्या वाटेवर. 

मिथकं, इतिहास टिकवून ठेवायला हवा. माणसानं आपला उथळ उन्मादी उत्साह आवरायला हवा. 

।।

Comments are closed.