पॅरिसचं वैभव  पुस्तकांचं दुकान 

पॅरिसचं वैभव  पुस्तकांचं दुकान 

पॅरिसमधल्या नोत्र दाम कॅथिड्रलच्या समोर शेक्सपियर अँड कंपनी या पुस्तकाच्या दुकानासमोर गर्दी होती. युरोपला जाळणाऱ्या उन्हातही माणसं उभी होती. त्यांना या दुकानात जायचं होतं.

गर्दीत खूप तरूण मुलं मुली होती. एक मुलगी मैत्रिणीला म्हणाली ‘मी या पुस्तकांच्या दुकानात नेहमी येते. कां माहितेय? इथे शेक्सपियर येऊन लिहित बसे’ ऐकणारी मुलगी हंहं असा प्रतिसाद देत होती.

शेक्सपियर अँड कंपनी हे पुस्तकाचं दुकान आहे, लायब्ररी आहे, वाचनालय आहे. दुकानाच्या वरच्या मजल्यावर छोट्या खोल्या आहेत. परगावाहून येणाऱ्या गरजू लेखकांना या खोल्या नाममात्र भाड्यानं दिल्या जातात. काही वेळ लेखक अगदीच फाटका असला तर त्याला मोफतही रहाता येतं.

हे दुकान १९५१ साली जॉर्ज व्हिटमन या माणसानं उघडलं. सुरवातीला दुकानाचं नाव ‘ल मिस्ट्राल’ होतं.

शेक्सपियर तर १६१६ साली वारला. या दुकानात तो कसा येणार? हंहं करणाऱ्या मुलीनं हे सत्य त्या तरुणीला सांगितलं नाही. तिनं विचार केला असणार ‘हिच्या मनातला शेक्सपियर जर इथे येऊन गेला असेल तर असू दे. शेक्सपियरची महती तरी तिला कळतेय हे काही कमी नाही.’

या दुकानाबद्दल अनेक आख्यायिका आहेत. शेक्सपियर इथं लिहित असे यासारख्याच. इथे म्हणे अर्नेस्ट हेमिंग्वे येऊन रहात असे. दुकान सुरु झाल्यानंतर ५३ आणि ५६ साली हेमिंग्वे पॅरिसमधे होता, येवढंच. 

 वुडी ॲलनच्या मिडनाईट इन पॅरिसमधली काही दृश्यं या दुकानात चित्रित झाली.  

  दुकानात  बीटनिक्स पिढीतले जगविख्यात  एलिस वॉकर, अ‍ॅलन गिन्सबर्ग, जॅक केरुआक आणि विल्यम एस. बरोज येत असत.  ते इथं पडलेले असतात असं म्हणाना. 

 जॉर्ज व्हिटमन हा अमेरिकन  अवलिया होता. भटक्या होता. त्याचं बालपण चीनमधे. तारुण्यात तो दक्षिण अमेरिकेत, तिथल्या जंगलात भणंग भटकला. खिशात कवडीही नसे.लोकांना भेटण्याचा नाद. अनेक जिंदा दिल लोकांनी त्याला थारा दिला म्हणून तो जिवंत राहू शकला. आपणही लोकांना थारा दिला पाहिजे हा विचार त्याच्या डोक्यात रुजला. दुसऱ्या महायुद्धात भाग घेऊन तो पॅरिसमधे आला, स्थायिक झाला.  ल मिस्ट्रल नुसतं पुस्तकाचं दुकान नव्हतं. मनस्वी लोकांचं ते भेटण्याचं, पसरण्याचं, वाचण्याचं ठिकाण होतं. व्हिटमन म्हणे   हे दुकान म्हणजे दुकानाच्या बुरख्यातला समाजवादी युटोपिया आहे.

व्हिटमन ‘ल मिस्ट्राल’मधे गरजू लेखकांना मोफत रहायला मिळे.  बदल्यात लेखकांना दुकानात काही तास काही ना काही तरी काम करावं लागे. दररोज एक पुस्तक वाचण्याचं आणि १ पान स्वतःबद्दल लिहिण्याचं बंधन असे. 

प्रस्तुत दुकानात आज ३ हजार लेखकांनी लिहिलेली आत्मकथनं साठवलेली आहेत.

व्हिटमन १९४६ साली पॅरिसमधे आला तेव्हां सिल्विया बीच हिचं शेक्सपियर अँड कंपनी हे दुकान नुकतंच बंद झालं होतं. दुकान आणि मालकीण या पॅरिस-युरोप-अमेरिकेत आख्यायिका झाल्या होत्या. १९१९ साली स्थापन झालेलं दुकान म्हणजे व्हिटमनच्या ल मिस्ट्रालची आईमावशीच होती  म्हणाना.  

सिल्वियानी दुकानाच्या पहिल्या मजल्यावर होस्टेल केलं होतं.लेखक तिथं रहात.माफक भाड्यात. पैसे नसले तर मोफत रहात.

१९२० सालची गोष्ट अर्नेस्ट हेमिंग्वे पत्रकारी करण्यासाठी पॅरिसमधे पोचला. त्याला कादंबरीही लिहायची होती. खिशात पैसे नाहीत. बटन तुटलेला कोट. ‘मला तुमच्या लायब्ररीचं सभासद व्हायचंय. पण फी द्यायला आत्ता माझ्याकडं पैसे नाहीत.’  सिल्वियानं हेमिंग्वेकडून एक फॉर्म भरून घेतला. ‘पैसे नसले तरी हरकत नाही, तू हवी ती पुस्तकं वाचायला घेऊन जाऊ शकतोस.’ सिल्वियानं सांगितलं. हेमिंग्वे पुस्तकं घेऊन निघाला तेव्हां सिल्वियानं एका चांगल्या पण स्वस्त रेस्टॉरंटचा पत्ता हेमिंग्वेला दिला.

‘शेक्सपियर’ हेमिंग्वेचं बस्तान  झालं.

जेम्स जॉईसच्या युलिसिस या कादंबरीवर अमेरिकन सरकारनं अश्लीलतेच्या शिक्का मारला होता, बंदी घातली होती, प्रती जप्त केल्या होत्या.

जेम्स पॅरिसमधे पोचला. सिल्वियानं युलिसिस छापलं. प्रती अमेरिकेत स्मगल होतं. हेमिंग्वे प्रती स्मगल करत असे. 

एझरा पाऊंड हा  विश्वविख्यात कवी दुपारी दुकानात जात असे. आत गेला की मोडक्या खुर्च्या, खिळखिळ्या लडखडत्या पुस्तकांच्या अलमाऱ्या दुरुस्त करायचा. हातोडी, खिळे घेऊन. हा उद्योग चालला असताना  होतकरू कवी तिथं पोचत. दुरुस्ती करत असताना त्याचं कविता या विषयावर व्याख्यानी मार्गदर्शन चाले.  दुरुस्ती झाली की कॉफी घेत तो उमेदवारी करणाऱ्या कवींची कॉपी वाचत असे, दुरुस्त्या  सुचवत असे, प्रोत्साहन देत असे. त्यातल्या चांगल्या कविता निवडून तो सिल्वियाकडं सोपवत असे, कविता संग्रह छाप असं तिला सांगत असे.

सिल्वियाच्या दुकानात पर्यटक,लेखक, विद्यार्थी इत्यादींची गर्दी असे. त्यांच्या आपसात चर्चा चालत. अमेरिका, युरोप, आयर्लंड इत्यादी ठिकाणचे बंडखोर कार्यकर्ते दुकानात येत, तावातावानं चर्चा करत.शेक्सपियर अँड कंपनी  लेखक, पत्रकार, कवी, विचारवंत इत्यादींचं एकत्र येण्याचं ठिकाण झालं होतं.

ज्यांना घरंही नव्हती अशा  लोकांची पत्रं, मनी ऑर्डरी वगैरे दुकानात ठेवलेल्या असत. 

पैशाची चणचण असेल तर सिल्विया उधार पैसे देत असे.नावापुढं उधार रक्कम लिहिलेली असे. रक्कम न फेडू शकलेल्यांची एक मोठी यादी दुकान बंद होईपर्यंत सिल्वियाकडं तयार झाली होती.

व्हिटमननं हे सारं पाहिलं होतं. सिल्विया व्हिटमनची रोल मॉडेल होती. सिल्विया डोळ्यासमोर ठेवून  व्हिटमननं ल मिस्ट्राल उघडलं. सिल्वियाच्या परवानगीनं शेक्सपियरच्या ४०० व्या वाढदिवशी १९६४ साली ल मिस्ट्राल, शेक्सपियर अँड कंपनी झालं. 

व्हिटमनला मुलगी झाली, तिचं नाव व्हिटमननं सिल्विया ठेवलं.

व्हिटमन ९९ वर्षं जगला, २०११ मधे वारला. 

आता  सिल्विया बीचची परंपरा सिल्विया व्हिटमन चालवतेय.

।।

Comments are closed.