ट्रंप परदेशात मौज करायला जातात
ट्रंप परदेशात मौज करायला जातात
जागतीक राजकारण किती अस्थिर आहे, त्यात किती अनिश्चितता भरून राहिलीय याचा प्रत्यय ७ जुलै रोजी तुर्कियेची राजधानी अंकारामधे भरलेल्या नेटो परिषदेत आला.
नेटोतल्या सर्व ३२ देशांचे सरकार प्रमुख या परिषदेत तीन दिवस उपस्थित असले तरी सारं लक्ष डोनल्ड ट्रंप आणि तुर्कियेचे अध्यक्ष तय्यप एर्डोगन यांच्यावर होतं. जणू नेटोनं आपलं भवितव्य या दोघांच्या हातात सोपवलं होतं.
नेटोची मुख्य चिंता आहे रशियाचं युक्रेनवरचं आक्रमण. आज युक्रेन, उद्या युरोपमधला आणखी एकादा देश, असं करत करत पुतीन सारं युरोपच रशियन कोंडवाड्यात घालणार अशी भीती युरोपीय देशांना आहे. अमेरिकेनं युक्रेनला आणि युरोपला भरपूर लष्करी मदत, जशी इस्रायलला दिली जाते, तशी द्यावी अशी युरोपीय देशांची अपेक्षा आहे; त्यासाठी ट्रंपना मस्का मारण्यासाठी ही परिषद होती. ट्रंपनी तो विषयच काढला नाही, तुमचं तुम्ही बघा असा त्यांचा सूर होता.
होरमुझची खाडी मोकळी व्हावी, इराणबरोबरचं युद्ध संपावं अशी युरोपीय देशांची इच्छा होती. ट्रंप येवढंच म्हणाले ‘इराणबरोबरचा युद्ध समाप्तीचा करार माझ्यासाठी संपला आहे.’ खाडी मोकळी होणार की नाही, त्यासाठी अमेरिका काय करणार आहे यावर ट्रंप बोलले नाहीत.
खरं म्हणजे ट्रंपकडून काहीही अपेक्षा करणंच चुकीचं असतं. घरंगळत निघालेला दगड कुठं अडेल, कुठं थांबेल हे कधी कोणाला सांगता येतं? ट्रंप आज एक बोलतात, उद्या १८० अंशात बदलतात. येव्हांना एक गोष्ट स्पष्ट झालीय. त्यांची प्रत्येक हालचाल त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न वाढवण्यासाठी असते. जगाचं कल्याण, जागतीक शांतता इत्यादी अर्थ त्यातून काढण्यात अर्थ नाही.
अंकारा परिषद हा गंभीर मामला आहे असं जगाला उगीचच वाटत होतं. ट्रंप यांच्या लेखी ट्रंप तुर्कियेच्या समुद्र किनाऱ्यावर सैरसपाटा करण्यासाठी गेले होते. त्यांची वक्तव्यं तशीच होती.त्यांची जीभ सैल होती.
झेलेन्सकींशी गप्पा मारल्यागत बोलले. समोरच्या माणसाला तंबाखू चोळण्यासाठी चुना द्यावा तसं ट्रंपनी झेलेन्सकीला सांगितलं – युक्रेनला पेट्रियट मिसाईल तयार करायची परवानगी अमेरिका देईल. बस. येवढंच. युक्रेनचा प्रश्न इतका सोपा आहे?
परिषदेतलं ट्रंपचं भाषण परिषदेत सहभागी असलेल्यांसाठी किंवा एकूण जगासाठी नव्हतं. भाषण अमेरिकन मतदारांसाठी होतं. अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होत आहेत, अमेरिकन लोकमत ट्रंपविरोधी आहे.
ट्रंपांच्या भाषणातले मुद्दे. ट्रंपचं परराष्ट्र धोरण ग्रेट आहे, आजवर कोणत्याही अमेरिकन प्रेसिडेंटला जमलं नाही ते ट्रंपनी करून दाखवलंय. ट्रंपनी अमेरिका पुन्हा ग्रेट केलाय. इतिहासात कधीही नव्हती इतकी अमेरिकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे आहे. ओबामा,बायडन आणि डेमॉक्रॅटिक लोकं नालायक आहेत. ट्रंप यांच्या कारकीर्दीत अमेरिकेचं सैन्य, अमेरिकेचा उद्योग, अमेरिकेचं जगातलं स्थान सर्वोच्च शिखरावर पोचलं आहे.
त्यांच्या बोलण्याची ढब अशी. समोरच बसलेल्या नेटोच्या सरचिटणिसांची भरमसाठ स्तुती आणि इतर युरोपीय नेत्यांवर टीका. स्पेन, ब्रीटन, फ्रान्स,जर्मनी,इटाली, डेन्मार्क या देशांवर टीका.
एर्डोगन हा कसा ग्रेट माणूस आहे आणि तोही माझा कसा ग्रेट फ्रेंड आहे असं सांगितलं. ‘मी खरं म्हणजे अंकाराला यायला तयारच नव्हतो. पण एर्डोगन यांच्या व्यक्तिगत मैत्रीमुळं, त्यांच्या ग्रेटपणामुळंच मी इथं आलोय’ असं ट्रंप म्हणाले.
हजाम एका चामड्याच्या पट्ट्यावर वस्तऱ्याला सतत धार लावत असतो तसं ट्रंप बोलत होते. त्यांनी स्पेनच्या पंतप्रधानांची हजामत केली. नालायक माणूस आहे, मी त्या देशाशी कोणतेही संबंध ठेवणार नाही, जकात तर लादलीच आहे, माझ्या इराण युद्धाला त्यानं विरोध केलाय असं ट्रंप म्हणाले. स्पेननं अमेरिकेच्या लढाऊ विमानांना आपल्या विमानतळावर तेल घेण्यासाठी थांबायला परवानगी नाकारलीय.
इराण हा घाणेरडा देश आहे, तिथले नेते नालायक आहेत, ते संपायच्याच लायकीचे आहेत असं ट्रंप अनेक वेळा अनेक वेगवेगळी विशेषणं वापरत म्हणाले.
‘ग्रीनलँड मला हवंय, अमेरिेकेच्या सुरक्षेसाठी. डेन्मार्क ग्रीनलँड द्यायला तयार नाहीये पण अमेरिका ते मिळवेल’ असं ट्रंप म्हणाले.
एर्डोगन यांच्या अनेक भूमिका अमेरिकेला अडचणीच्या आहेत. एर्डोगन पॅलेस्टाईन देश स्थापन व्हावा या मताचे आहेत, पूर्व जेरुसलेम ही पॅलेस्टाईनची राजधानी असावी असं त्यांचं मत आहे. हमास ही दहशतवादी संघटना नसून पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी राजकीय संघटना आहे असं एर्डोगन यांचं मत आहे. तरीही ट्रंप एर्डोगनच्या प्रेमात आहेत.
कां?
एर्डोगन व्यवहारवादी आहेत. व्यापार,उद्योग आणि संरक्षण यासाठी ते कोणाहीबरोबर हातमिळवणी करायला तयार असतात. पॅलेस्टाईन-गाझा प्रकरणी इस्रायल विरोधी भूमिका घेत असतानाच तुर्कियेचे इस्रायलशी आर्थिक संबंध आहेत. एर्डोगन संकटप्रसंगी मध्यस्थाची भूमिका घेऊन इराणशी समझौता करायला मदत करतील असं अमेरिकेला वाटत असावं. होरमुझ खाडी मोकळी करण्यासाठी एर्डोगन उपयोगी पडतील असं युरोपला वाटत असावं.
त्याही पेक्षा पर्सनल केमेस्ट्री हा घटक महत्वाचा असावा.ट्रंप आणि एर्डोगन यांच्यातलं साम्य.
सत्तेवर आल्यापासून एर्डोगननी लोकशाही आणि मानवी अधिकार धाब्याबर बसवलेत. राज्यघटनेत बदल करून सर्व अधिकार प्रेसिडेंटकडं असतील अशी तरतूद केलीय. तिकडं अमेरिकेत ट्रंप राज्यघटना बदलत नाहीत, गुंडाळून ठेवतात. दोन्हीचा हिशोब एकच.
अंकारा परिषदेच्या आधी काही दिवस एर्डोगननी तुर्कियेत पत्रकारांना तुरुंगात घातलंय. कारण? त्यांनी एर्डोगन यांच्यावर टीका केली. अंकारा परिषद चालली असतानाच अमेरिकन पोलिसानी न्यू यॉर्क टाईम्सच्या पत्रकारांवर वॉरंट काढलंय. कां? कारण कतारनं दिलेल्या विमानातली संरक्षण व्यवस्था पुरेशी नाही अशी माहिती टाईम्सनं छापली. गेली दोन वर्षं ट्रंप दणादण पत्रकारांवर खटले भरत आहेत.
दोन धटिंगण एक होतात, लोकशाही वाटेनं जाणारे हतबल असतात. असाही अर्थ अंकारा परिषदेतून काढता येतो.
।।