मीरा नायरचा मुलगा न्यू यॉर्कचा मेयर?

मीरा नायरचा मुलगा न्यू यॉर्कचा मेयर?

 एक भारतीय माणूस न्यू यॉर्कच्या इतिहासात पहिल्यांदाच मेयर होऊ घातलाय.झोरान ममदानी असं त्याचं नाव आहे. मीरा नायर या फिल्म मेकरचा तो मुलगा. १९९८ साली झोरानचे आई वडील युगांडातून न्यू यॉर्कमधे स्थलांतरित झाले. त्या वेळी झोरान सहा वर्षाचा होता. २०१८ साली झोराननं अमेरिकेचं नागरीकत्व घेतलं. गेली तीन वर्ष झोरान न्यू यॉर्कच्या विधानसभेचा सदस्य आहे.

झोराननं अमेरिकेचं लक्ष वेधून घेतलंय. डोनल्ड ट्रंप आणि नरेंद्र मोदी अशा दोघांवरही त्यानं टीका केली. दोघंही वंशद्वेष्टे आहेत असा त्याचा आरोप आहे.  

झोरान ट्रंपवर टीका करतो आणि तो डेमॉक्रॅटिक पक्षाचा उमेदवार आहेत. या दोन गोष्टी ट्रंपचा पारा वर चढायला पुरेशा आहेत. झोरान जिहादी आहे, झोरानचा ११ सप्टेंबरच्या न्यू यॉर्क टॉवरवरील हल्ल्याला त्याचा पाठिंबा होता, झोरान कम्युनिष्ट आहे असे आरोप ट्रंपनी केलेत. त्यासाठी त्याचं नागरीकत्वही रद्द करण्याचा विचार अमेरिकन सरकार करत आहे.

११ सप्टेंबरच्या हल्ल्याच्या वेळी झोरान शाळकरी मुलगा होता. झोरान कम्युनिष्टही नाही. तो जिहादी पण नाही. तसे खुलासे झोराननं केलेत. पण ट्रंप आणि सत्य यांचा कधी संबंध नसल्यानं ट्रंप त्यांच्या आरोपांवर ठाम आहेत. 

झोराननं न्यू यॉर्कसाठी सुचवलेले कार्यक्रम मात्र महत्वाचे आहेत. त्यानं सुचवलेले महत्वाचे कार्यक्रम असे. न्यू यॉर्कमधे बस प्रवास विनामूल्यं. छोट्या मुलांसाठी बालवाड्या इत्यादी सोयी विनामूल्यं असतील. घरभाडी आज जेवढी आहेत तेवढीच थिजवली जातील, वाढणार नाहीत.दैनंदिन गरजा भागवणारी दुकानं, वाणसामानाची दुकानं सार्वजनीक मालकीची ठेवली जातील आणि त्या वाटेनं वस्तूंच्या किमती आटोक्यात ठेवल्या जातील. किमान वेतन तासाला ३० डॉलर केलं जाईल.या सार्वजनीक कामांसाठी पैसे लागतील. न्यू यॉर्कमधील अतीश्रीमंत एक टक्का लोकांवर कर बसवून ते पैसे उभे केले जातील.

सर्व कार्यक्रम न्यू यॉर्कमधल्या गरीब व मध्यम वर्गासाठी आहेत. महागाईनं सामान्य माणूस हैराण झाला आहे. महागाई हा विषय शहराच्या अखत्यारीत येत नाही, तो भाग अमेरिकेच्या व्यापक अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. पण सामान्य माणसावरचा काही भाग तरी हलका करण्यासाठी पालिका काय करू शकते याचा विचार ममदानी यांनी केला आहे. 

ममदानींचा कार्यक्रम अमलात येण्यासारखा आहे. न्यू यॉर्कमधली घरांची टंचाई हा फार निकडीचा आणि किचकट प्रश्न आहे. पण घर निर्माण कार्यक्रम हा एक सापळा असतो. न्यू यॉर्कमधे जमीन शिल्लक नाही. जमीन तयार करणं आणि घरं बांधणं या दोन्ही गोष्टी फार खर्चिक आहे. त्यासाठी आवश्यक घन उभं करणं कठीण असतं. वेळोवेळी तसे कार्यक्रम जाहीर करून सरकारानी माती खाल्ली आहे. ममदानीनी हुशारीनं तो सापळा टाळला आहे.

ममदानींचा कार्यक्रम पाहिल्यावर अरविंद केजरीवाल यांची आठवण होते. दिल्ली हे राज्य असलं तरी एक शहर आहे. त्यामुळे दिल्लीतल्या अनेक गोष्टी नगरपालिका कार्यक्रमासारख्या असतात. केजरीवालांनी हुशारीनं दिल्लीत सुधारणा केल्या होत्या.

अतीश्रीमंत एक टक्क्यांवर कर बसवल्याचा राग श्रीमंतांना येणं सहाजीक आहे. अमेरिकेवर रिपब्लिकन विचारांचा पगडा आहे. देशाच्या कारभारात सरकारची ढवळाढवळ कमीत कमी असावी हे मुक्त बाजारव्यवस्थेचं एक मुख्य सूत्र असतं. त्यामुळं कर कमीत कमी असावेत आणि सरकारनं कमीत कमी सार्वजनिक कल्याणकारी कार्यक्रम हाती घ्यावेत असं मुक्तबाजार विचाराचं म्हणणं असतं. ट्रंप त्याच विचाराचे आहेत. त्यामुळं ममदानी यांच्यावर ट्रंप यांचा राग असणं समजण्यासारखं आहे.

ममदानी यांचा राजकीय उत्कर्ष फार वेगानं झाला. सार्वजनिक जीवनाचा त्यांचा अनुभव फारच कमी आहे. तरीही त्याना निवडणुकीच्या प्राथमिक फेरीत न्यू यॉर्कच्या नागरीकांनी पसंती दिली याचं कारण ममदानी यांची भूमिका न्यायाची आणि समावेशक आहे. 

न्यू यॉर्मधली गरीबी २० टक्के पार करून गेली आहे. नागरिकाचं सरासरी उत्रन्न ७९ हजार डॉलर असलं तरी महागाईमुळं सरासरी माणसाचं भागत नाही. आफ्रिकी, आशियाई, दक्षिण अमेरिकी, ख्रिस्ती गोरे, ज्यू अशा सर्वच माणसांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागत असल्यानं ममदानींच्या कार्यक्रमावर सर्वच जनता ( वरचे एक टक्का सोडता) खुष आहे.

सध्या गाझाचा प्रश्न  न्यू यॉर्कमधे (एकूण अमेरिकेतही) चर्चेत आहे. न्यू यॉर्कमधे १९ लाख मुसलमान आणि १० लाख ज्यू आहेत. म्हणजे न्यू यॉर्कच्या सुमारे २० टक्के जनता. ममदानी यांची भूमिका आणि वर्तन दोन्ही समाजांना समजून घेणारं आहे.

इस्रायलला जगण्याचा अधिकार आहे; पण गाझामधे त्यांची वागणूक क्रूर आहे असं ममदानींचं म्हणणं आहे. ममदानी ज्यूद्वेष्टे नाहीत पण झियॉनिझमच्या विरोधात आहेत. झियॉनिझम म्हणजे पूर्ण पॅलेस्टाईन ज्यूंचा असला पाहिजे. पॅलेस्टाईन आणि इसरायल हे दोन देश असले पाहिजेत आणि इसरायलमधे रहाणाऱ्या अरबांना समान अधिकार असले पाहिजेत अशी ममदानींची भूमिका आहे. ममदानी ही भूमिका घेऊन न्यू यॉर्कमधल्या ज्यूंच्या घरोघरी गेले. इसरायल गाझामधे लढाईचं काहीही होवो, न्यू यॉर्कमधे रहाणाऱ्या ज्यूना सुखात आणि सुरक्षीत रहाता यायला पाहिजे याची हमी ममदानी देतात. न्यू यॉर्कमधे मुसलमान आणि ज्यूनी शांततेनं एकत्र नांदलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. ममदानी मशीदीतही जातात आणि सेनेगॉगमधेही जातात. त्यामुळंच ममदानी यांच्या निवडणुक अर्जावर ज्यू नागरिकांनी सह्या केल्या आहेत.

ममदानी यांची प्रचार मोहीम व्यावसायिक आहे. सेलफोनवरच्या प्रचारावर त्यांचा भर आहे. सेलफोनवरच्या   क्लिपमधे नागरीक बोलतात, ममदानी अगदी कमी बोलतात. त्यांच्या क्लिपमधे शेकडो शेकडो न्यू यॉर्कमधले नागरीक दिसतात, बोलतात. तळातल्या स्वयंसेवक कार्यकर्त्यांची फौज त्यानी गोळा केलीय.डेमॉक्रॅट्सवर कालपर्यंत आरोप होता की तो पक्ष ऊच्चभ्रूंचा आहे. ममदानींचा प्रचार वरील आरोप खोटा ठरवत असल्यानं श्रमिकांचं बहुमत असलेल्या न्यू यॉर्कमधे ममदानींच्या विजयाची शक्यता आहे.

।।

Comments are closed.