रंगेल राजपुत्र
राजपुत्र अँड्र्यू.
राणी एलिझाबेथचा दोन नंबरचा पुत्र. याचा मोठा भाऊ आताचा राजा चार्ल्स.
व्हर्जिनिया जुफ्रे नावाच्या अल्पवयीन अमेरिकन तरूणीशी जबरदस्तीनं संग केल्याचा आरोप अँड्र्यूवर आहे.२००१ साली ही घटना अमेरिकेत घडली. अल्पवयीन मुलीशी संग करणं कायद्यानं गंभीर गुन्हा मानला जातो. जबरदस्ती हा आणखी एक गुन्हा.
एक वेळा नव्हे, तीन वेळा संग केलाय. एकदा तर अनेक मुलींसह ज्युफ्रेनं सामुहीक संग केला.ज्युफ्रेचं आत्मचरित्र नुकतंच प्रसिद्ध झालंय, त्यात या भानगडीची वर्णनं वाचायला मिळतात.
अँड्र्यूच्या या उद्योगाची वाच्यता झाली, राज घराणं पार बदनाम झालं. परिणाम असा की ड्यूक ऑफ यॉर्क, हिज हायनेस, नाईट ऑफ दी गार्टर इत्यादी राणीनं दिलेल्या दागिनेउपाध्या अँड्र्यूला सोडाव्या लागल्या.
परवाच्या दिवशी राजा चार्ल्सनं ब्रिटीश शैलीत पत्रक काढलंय. ‘अँड्र्यूवर अल्पवयीनांशी संग केल्याचे आरोप आहेत; अँड्र्यूनं ते नाकारले आहेत; राजपुत्रपद सोडण्याच्या त्याच्या निर्णयाला राजवाडा मान्यता देत आहे.’ म्हणजे पहा, राजानं त्याचं पद काढून घेतलेलं नाही, त्यानंच पद सोडलं, राजा राजपुत्राच्या रोषातून सुटला.
ब्रीटनच्या परंपरेनुसार राजेपदासाठी असलेल्या रांगेत अँड्र्यू आठव्या नंबरवर होता. प्रिन्सपद गेल्यामुळं तो आता राजा होऊ शकत नाही.
डोनल्ड ट्रंप यांच्या मार ए लॅगो या रिसॉर्टवर जुफ्रे काम करत असे. मॅक्सवेल घिसलीन या बाईनं तिला हेरलं, तिला जेफ्रे एपस्टिन या माणसाकडं सोपवलं. एप्सटिन अतीश्रीमंत आणि मान्यवर लोकांना अल्पवयीन मुली पुरवत असे. एप्सटिननं जुफ्रेवर बळजोरी केली आणि वाच्यता केलीस तर बभ्रा होईल, आयुष्यातून उठशील अशी धमकी दिली. तिथून तिचं ब्लॅकमेलिंग सुरु केलं. बदल्यात तिला मोठमोठ्या लोकांकडं पाठवलं. त्यात डोनल्ड ट्रंप होते, राजपुत्र अँड्र्यू होते.
अल्पवयीन मुलींशी संग करणाऱ्यांचा एक क्लबच होता म्हणा ना. अँड्र्यूला त्या क्लबात घेतलं की इतर बडे लोकही येतील अशी एप्सटिनची कल्पना. त्या क्लबात आपण गेलो तर बडी धेंडं भेटतील आणि पैसे मिळवण्याचा दोन नंबरचा धंदा व मजा अशा दोन्ही गोष्टी करता येतील अशी अँड्र्यूची कल्पना.
अँड्र्यू त्या वेळी ब्रिटीश सरकारचे व्यापारी प्रतिनिधी होता. देशोदेशी फिरून, धनिकांना भेटून त्यांना ब्रीटनमधे गुंतवणूक करायला लावणं हे त्यांचं काम होतं. त्यासाठी ब्रिटीश सरकार त्यांना करोडो पाऊंड देत असे. अँड्र्यूनं ब्रीटनमधे नसले तरी कझाकस्तानमधे लोकांना पैसे गुंतवण्यास मदत केली व त्यातून कमीशन खाल्लं.
एप्सटिनची लफडी बाहेर आली. त्याच्या अत्याचाराच्या बळी झालेल्या स्त्रिया बोलत्या झाल्या. एप्सटिनला तुरुंगवास लागला. त्या भानगडीत एप्सटिन मेला आणि घिसलीन सध्या तुरुंगात आहे. ट्रंप आपला प्रेसिडेंशियल अधिकार वापरून आपल्याला सोडवतील या खटपटीत घिसलीन आहेत. ट्रंपनी अनेक खुनी वगैरेंना माफ केल्यानं त्या आशावादी आहेत.
वाच्यता झाल्यावर अँड्र्यूनं मध्यस्थाकरवी जुफ्रेशी बोलणी केली. राणी एलिझाबेथ यांच्या राज्यारोहणाला ७० वर्ष झाल्यानिमित्त ब्रिटीश सरकार मोठ्ठे कार्यक्रम करणार होतं. ही बदनामी त्या काळात नको म्हणून अँड्र्यूनं जुफ्रेला १२ लाख पाऊंड देऊन गप्प रहायला सांगितलं.हे पैसे अँड्र्यूनं कुठून दिले?
जुफ्रेच्या आत्मचरित्रामुळं आपली बदनामी होणार, तेव्हां जुफ्रेला बदनाम केलं तर आपली बदनामी टळेल असा विचार अँड्र्यूनं केला. अँड्र्यूनी ट्रोलर लोकांना धरून जुफ्रेची बदनामी मोहीम चालवायला सांगितलं. अमेरिकेतल्या कोणातरी उच्च पदस्थाला गाठून अँड्र्यूनं जुफ्रेचा सोशल सेक्युरिटी नंबर मिळवला; त्याचा वापर करून जुफ्रेची कुलंगडी आहेत काय ते शोधायचा प्रयत्न अँड्र्यूनं केला.
अँड्र्यूला राजघराण्यातल्या तिजोरीतून वर्षाला २.४९ लाख पाऊंड दर वर्षी मिळत. राणी त्याला आपल्या खाजगी अकाऊंटमधून वेगळे १० लाख पाऊंड देत असे.अँड्र्यूला नौदलात नोकरी केल्याचं २० हजार पाऊंड पेन्शन मिळत असे. ब्रिटीश सरकारचा व्यापारी प्रतिनिधी म्हणून त्याला १३ लाख पाऊंड मिळाले.
आता अँड्र्यूचे खर्च पहा. जुफ्रेला १२ लाख पाऊंड. विंडसरमधे आजीकडून मिळालेल्या प्रासादावर ७५ लाख पाऊंड. स्वित्झर्लंडमधे एक प्रॉपर्टी विकत घेतली तिच्यासाठी १.८ कोटी पाऊंड.
उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसत नाही. तो बसवण्यासाठी केलेले उद्योग. राणीनं अँड्र्यूला लग्नाची भेट म्हणून दिलेली १.२ कोटीची प्रॉपर्टी कझाकस्तानच्या प्रेसिडेंटच्या जावयाला ३० लाखाला विकली. त्या बदल्यात कझाकस्तानात अनेक फेऱ्या ब्रिटीश सरकारी पैशावर. कझाकस्तानात ग्रीक आणि इटालियन धनिकांना पैसे गुंतवायला लावले त्यातून १ टक्का कमीशन खाल्लं. एक लिबियन शस्त्र स्मगलर, शस्त्र विकणाऱ्या कंपन्या, ट्युनिशियन हुकूमशहा यांचा पाहुणचार अँड्र्यू घेत असे. त्यांना त्यांच्या दोन नंबरच्या व्यवहारात मदत करून कमीशन घेत असे.एका तुर्की फायनान्सरनं अँड्र्यूला ७.५ लाख पाऊंड दिले? कां दिले? अँड्र्यूचा एक बिझनेस पार्टनर होता. तो चीनचा हेर निघाला.
अँड्र्यूच्या व्यवहाराची टोटल लागत नाही.
अँड्र्यूनं केलेल्या उद्योगांचा हिशोब लावला तर त्याला पन्नाससाठ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. तरी तो वाचला. कां? ऊच्च पदस्थ आहे म्हणून? राणीचा मुलगा म्हणून? जगभरच्या प्रेसिडेंटांशी ऊठबस आहे म्हणून?
राजाला लाख गुन्हे माफ कारण तो लाखांचा पोशिंदा असतो असं म्हणण्याची पद्धत आहे.
त्याचे रंगेल खेळ नाट्यमय आणि थरारक असल्यानं पेपरांना खाद्य मिळालं. पेपर त्याला धू धू धूत असतात. हे काम खरं म्हणजे पोलिस, सरकार, न्यायालयं यांनी करायला हवं होतं,पेपर ते करतायत.
।।
निळू दामले यांचे ब्लॉग वाचण्यासाठी niludamle.com या वेबसाईटवर जावे.