ट्रंप खूप बिझी असतात

ट्रंप खूप बिझी असतात

ट्रंपनी बीबीसीवर १अब्ज डॅालरचा अब्रू नकसानीचा खटला भरू असं म्हटलंय. बीबीसीनं आपला बदनामी केलीय असं ट्रंप यांचं म्हणणं आहे.

बीबीसीच्या ॲाक्टोबर २०२४ च्या पॅनोरामा कार्यक्रमात ट्रंप यांचं एक भाषण दाखवण्यात आलं होतं. त्यात ट्रंप कॅपिटॅाल हिलवरच्या संसदेवर हल्ला करायला गेलेल्या दंगेखोरांना हल्ला करण्याची चिथावणी देताना दिसले.

गेलं वर्षभर याचा पत्ता ट्रंप यांना नव्हता. हा कार्यक्रम त्यांनी पाहिलाही नसावा. गेल्या आठवड्यात ब्रीटनमधल्या एका पेपरनं हे प्रकरण उकरून काढल्यावर ट्रंपना जाग आली.

प्रकरण उकरलं गेलं याची कारणंही वेगळी आहेत. गेली दोन तीन वर्षं बीबीसीवर पक्षपाती वर्तनाचा आरोप प्रेक्षकांनी केला होता. गाझा, अमेरिकन निवडणुका आणि एलजीबीटी या मुद्द्यांवर बीबीसीच्या बातम्या एक तरफी असतात अशी तक्रार करणारी खूप पत्रं बीबीसीला आली होती. त्या तक्रार पत्रात एक उदाहरण अमेरिकेत २०२१ रोजी कॅपिटॅाल हिलवर झालेल्या हल्ल्यावरच्या पॅनोरामा कार्यक्रमाचं होतं.

बीबीसीच्या अंतर्गत चौकशी समितीत एकूण पक्षपात आणि पॅनोरामा यांचा विचार झाला. पॅनोरामा कार्यक्रमात ट्रंप यांच्या सव्वा तासाच्या भाषणातली दोन सलग नसलेली वाक्यं एकत्र जोडून दाखवण्यात आली होती. वाक्याचा अर्घा भाग ट्रंप जेव्हां बोलले होते त्यापासून ५० मिनिटांनी दुसरा अर्धा भाग बोलले होते. पण कार्यक्रमात तो सलग दाखवल्यामुळं त्या वाक्याचा अर्थ बदलला होता.

संकलन-संपादनात हे तंत्र सर्रास वापरलं जातं. पण ट्रंपसारखी व्यक्ती गुंतलेली असतांना काळजी घ्यायला हवी होती. अर्घं वाक्य झाल्यानंतर क्षणभर रिकामा दाखवता आला असता, रिकाम्या क्षणभरात फ्लॅश वापरता आला असता. संपादकानं ती काळजी घेतली नाही. चौकशी समितीतल्या जाणकारानं सुचवलं की तांत्रीक चूक झाली अशी कबूली बीबीसीनं ताबडतोब द्यावी. तसं केलं असतं तर प्रश्ण तिथंच मिटला असता. बीबीसी घोळ घालत राहिलं, चर्चा करत राहिलं,वर्षभर. याचा सुगावा पेपरला लागला, वाच्यता झाली. तेव्हां ट्रंपना कोणी तरी सांगितलं.

हिटलर क्रूरकर्मा आहे याची खात्री पटल्यावर लेखक-पत्रकार त्याच्या दृश्य आणि वक्तव्यांचे तुकडे जुळवून मजकूर तयार करतात. ते कथन काळाच्या हिशोबात सलग नसतं. कोणते वाक्यांश केव्हांचे आहेत याचा हिशोब लावत बसलं तर खरा हिटलर उभाच करता येत नाही. ट्रंप खोटारडे आहेत, ते हिंसेला चिथावणी देतात हे साऱ्या जगाला माहीत आहे, पत्रकारांनाही ते माहीत आहे. विरोधी लिहीणाऱ्याना ठोकून काढा, तुमचा खटला मी लढवीन असं हल्ला करतील त्यांना उद्देशून ट्रंप म्हणालेले आहेत. आपली निवडणूक चोरण्यात आलीय, तसं ठरवणारी राज्यघटना, निवडणूक यंत्रणा आपण मानत नाही, वॅाशिंग्टनमधलं डीप स्टेट आपण उध्वस्थ करणार आहोत असं म्हणणाऱ्या ट्रंपनी या ना त्या रूपात दंगेखोरांना चिथावणी तर दिलीच पण प्रेसिडेंट झाल्यावर त्यांनी त्या गुन्हेगारांना माफी दिली. याचा अर्थ पत्रकारांना समजतो. ही समजूत पॅनोरामात व्यक्त झाली.

तरीही थोडी काळजी घेतली असती तर प्रकरण मिटलं असतं हे बीबीसीच्या लक्षात आलं नाही.

ट्रंपनी कोटी डॅालरचा दावा लावणं हे समजण्यासारखं आहे. आजवर ट्रंपनी अनेक पेपरवर दावे लावले, त्यात ट्रंप हरले.अनेक धमक्यांतून शेवटी खटले उभेही राहिलेले नाहीत.ट्रंप धमकी देतात. माणसं विचार करतात की कशाला ट्रंपच्या नादी लागा, मांडवळ करून प्रकरण मिटवतात. त्यातून बरेच पैसे ट्रंपच्या खिशात जातात. असंही म्हणायला हरकत नाही की धमक्या देऊन पैसे मिळतात कां ते पहाणं हा ट्रंप यांचा व्यवसाय आहे. धमकी दिल्यावर समोरच्यानं दाद दिली नाही तर ट्रंप गपचुप माघार घेतात असंही घडलं आहे.

धमक्या देण्याचं तंत्र हे ट्रंप यांचं मुख्य व्यावसायिक हत्यार आहे. रियल इस्टेट, बांधकाम व्यवसायात ते समोरच्या माणसाच्या मनात भीती निर्माण करतात, अनेक वेळा भीतीपोटी कामं होतातही. फियर हे आपलं हातखंडा तंत्र आहे अशी कबुली ट्रंप यांनी बॅाब वुडवर्ड यांना एका मुलाखतीत दिली आहे. त्यांच्यावरच्या एका पुस्तकाचं शीर्षकंच फियर असं आहे.

ट्रंप यांचा माध्यमांवरचा खुन्नस जगप्रसिद्ध आहे. एकदा ते भाषणात म्हणाले की एका शहरात मेक्सिकन इमिग्रंट नागरिकांची कुत्री मांजरं मारून खातात. पत्रकार त्या शहरात गेले. तिथल्या मेयर आणि पोलिस प्रमुखानं सांगितलं की तसलं काहीही त्या गावात कधीही घडलेलं नाही. पत्रकारांचा हा खुलासा फेक आहे, त्यांच्यावर आपण खटला भरणार आहोत, आपली माहिती खरी आहे, कुत्री मांजरं खाल्ली जातातच असं ट्रंप ठासून म्हणाले. पण खटला अजून तरी झालेला नाही.

पॅनोरामा प्रसारित करणारी बीबीसी अमेरिकाद्रोही आहे, ती आपल्या विरोधात मुद्दाम मजकूर करत असते असं ट्रंप म्हणतात. एकूणच ब्रिटीश माध्यमं आणि सरकार मैत्रीन वागत नाहीत असं म्हणून ट्रंप मोकळे झाले आहेत.

ट्रंपची अपेक्षा अशी आहे की ब्रिटीश सरकार नाकदुऱ्या काढत ट्रंपसमोर येईल. बीबीसी ट्रंपचं कौतुक करणारा एकादा कार्यक्रम प्रसारीत करेल, राजा चार्ल्स आणखी एक प्रचंड शाही मेजवानी देतील. ट्रंप एकदा जाहीर म्हणाले आहेत, की जकात मारल्यावर मोठमोठ्या देशांचे प्रमुख माझं ढुंगण चाटायला आले होते.

ट्रंप इतके कामात असतात की शौच आटोपल्यावर ढुंगण स्वच्छ करायला त्यांना वेळ मिळत नसणार. त्याची तजवीज ट्रंप करत असावेत असं त्यांच्या वक्तव्यांवरून वरून वाटतं. बीबीसीनं माफी मागितली, ट्रंपकौतुकाचा कार्यक्रम केल्यावर किंवा तसं न घडल्यावरही ट्रंप काय म्हणतात याची वाट पाहूया.

niludamle.com वर निळू दामले यांचे इतर ब्लॅाग.

Comments are closed.