ट्रंप जिहादींशी दोस्ती कां करतात

ट्रंप जिहादींशी दोस्ती कां करतात

  अमेरिकेनं सीरियात ७० ठिकाणांवर ते  इस्लामिक स्टेटचे अड्डे आहेत अशा संशयावरून हल्ला केला. बाँबर, फायटर, हेलेकॉप्टर आणि तोफखान्याचा वापर अमेरिकन सैन्यानं केला. जॉर्डनच्या हवाई दलानं या कामी अमेरिकेला मदत केली. मृतांचा किंवा विघ्वंलाता तपशील अमेरिकेनं जाहीर केलेला नाही. 

काही दिवसांपूर्वी इस्लामिक स्टेटनं अमेरिकन तळावर हल्ला करून दोन सैनिक, एक कर्मचारी मारले होते. प्रस्तुत   हल्ला एक सूड होता. 

सीरियामधे गेलं वर्षभर अल शारा प्रेसिडेंट आहेत. तहरीर अल  अल शाम ही त्यांची संघटना. या संघटनेचे ते आमिर आहेत. या संघटनेचं आणि इस्लामिक स्टेट या संघटनेचं जमत नाही. त्यामुळं इस्लामिक स्टेटची माणसं अमेरिकेनं मारली हे अल शाराना बरंच झालं; पाव्हण्याच्या काठीनं साप मेला.

इस्लामिक स्टेट आणि अल शारा यांची एचटीएस या संघटना म्हणजे बिन लादेननी स्थापलेल्या अल काईदाच्याच शाखा आहेत. इस्लामिक स्टेट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया,अल नुस्र फ्रंट या विविध संघटना बिन लादेनकडून प्रेरणा घेऊनच तयार झाल्या होत्या. त्यांचे आपसात वैचारिक आणि डावपेचांचे मतभेद होते. त्यामुळं त्या संघटना वेगळ्या झाल्या आणि बहुतेक वेळा एकमेकाचे जीव घेण्यात गुंतल्या. 

अशा या गुंत्यातल्या इस्लामिक स्टेट आणि अल शारांची संघटना, त्यांच्यातली मारामारी. दोन्ही संघटना जिहादी, दहशतवादी, हिंसक. काळाच्या ओघात इस्लामिक स्टेट हरली; इस्लामिक स्टेटनं एकेकाळी सीरियात राक्कामधे एक छोटं इस्लामी राज्य स्थापलं होतं. अमेरिकन सैन्यानं ते उध्वस्त केलं होतं. परंतू इस्लामिक स्टेटचे काही तुरळक अनुयायी सीरियात विखुरलेले आहेत, त्यांनी छोटे अड्डे तयार केलेत. ते अड्डे त्रास देत असतात. अमेरिकेच्या  विमानांनी त्यातले काह अड्डे उडवलेत.

अल शारा २०११ पासून असद सरकारच्या विरोधात लढत होते.   त्या काळात त्यांचे अमेरिकन सैन्याशी मित्रत्वाचे संबंघ होते, समान शत्रू हा मुद्दा होता. अल शारा जिहादी असले तरी काही काळ अमेरिकेला मान्य होते. नंतर काही काळ त्यांचं अमेरिकेशी शत्रुत्व होतं. त्या काळात अमेरिकेनं त्यांना दहशतवादी ठरवून त्यांना जिवंत वा मृत पकडून  देणाऱ्याला घसघशीत बक्षीस जाहीर केलं होतं.

आता बशर असद यांची सत्ता उलथवून अल शारा सीरियाचे राज्यकर्ते झालेत. आता त्यांना जिहाद नव्हे राज्य करायचंय. राज्य करायचं म्हणजे आर्थिक सुस्थिती असावी लागते.आज घडीला अमेरिका आणि इस्रायलशी दोस्ती केल्याशिवाय मध्य पूर्वेत पाडाव लागत नाही. इस्रायलशी शत्रुत्व असणाऱ्या कतार, सौदी, बहारीन, अमिराती इत्यादी सर्व देशांनी इस्रायलशी दोस्ती केलीय. अल शारा तेच करत आहेत. टिकण्यासाठी  त्यांना ट्रंप यांना लोणी लावायचंय. 

हातात बंदूक आणि हँडग्रेनेड घेऊन फिरणारे अल शारा आता डिझायनर सुट वापरतात. कारण गबाळे कपडे घातलेले पुढारी ट्रंपना आवडत नाहीत. झेलेन्सकी साधा टी शर्ट घालून व्हाईट  व्हाऊसमधे गेले तेव्हां ट्रंपनी त्यांना हाकलून दिलं होतं. शारा आता चकाचक दाढी करतात. हँडग्रेनेड सोडून आता त्यांनी शांततेचं कबूतर हातात धरलंय.

ट्रंपनी नुकतीच शारा यांची घट्ट भेट घेतली. अल शारा यांच्या कपाळावरचा दहशतवादी हा शिक्का पुसून टाकला, सीरियावरचे सर्व निर्बंध काढून टाकून सीरियाला भरघोस मदत द्यायचं जाहीर केलंय.

शारा मवाळ झालेत पण त्यांनी इस्लामिक राष्ट्राचं स्वप्न सोडलंय?

धर्मराष्ट्र हा विचार एकेकाळी बदनाम होता, आता तो विचार हे एक चलनी नाणं झालंय. त्यामुळं इस्लामी देश स्थापन करू इच्छिणाऱ्या संघटना आनंदी आहेत. अल शारा त्यापैकीच एक असणार. त्यांच्या धर्मराष्ट्र टोळीत आता जगातले किती तरी देश सामिल झालेत. सीरियाला लागून इस्रायल आहे. तिथं नेतान्याहूना ज्यू राष्ट्र  निर्माण करायचं आहे. नेतान्याहूंचे मित्र व्हिक्टर ओरबेन यांना हंगेरीत ख्रिस्ती राष्ट्र आणायचं आहे. ट्रंप यांना अमेरिका गोऱ्या ख्रिश्चनांचा देश करायचा आहे.

टिकलो तर धर्मराष्ट्र करू शकणार, त्यासाठी टिकायला हवं, त्यासाठी समविचारी लोकांच्या टोळीत सामिल व्हायला हवं.

लोकांना धर्मराष्ट्रं कां हवीत? ज्यू देश, ख्रिस्ती देश, इस्लामी देश झाला की लोकशाही संपते. व्हिक्टर ओरबेन हंगेरीत हुकूमशहा झालेत. नेतान्याहूंवर भ्रष्टाचाराचे खटले आहेत आणि त्यांना ते धुडकावून लावायचेत. ट्रंपवरच्या आरोपांची मोजदादही करता येत नाही, दोन वेळा त्यांची इंपीचमेंट झालीय.आपण धर्म वाचवण्यासाठी राज्य करतोय म्हटलं की कसले  खटले अन् कसले कायदे. राज्यकर्ता आणि परमेश्वर यांच्यात थेट संबंध, मधे कोणी येण्याचा प्रश्नच नाही.

इस्लामिक स्टेट अशी जगभर पसरलेली संघटनाच नव्हती. इराक आणि सीरियात काही छोटे गट काम करत होते. पण इस्लामी राज्य ही कल्पना काही लोकांना  आकर्षक वाटते. एक प्रकारचा युटोपिया. म्हणजे त्यात वास्तवात येण्यासारखं काही नाही, सारं कल्पना विश्व. अशा कल्पना विश्वात काही माणसं वावरतात. बंदूक घेऊन पाच दहा माणसं मारतात. कुठं एकादी कार उडवतात. ऑस्ट्रेलियात एकादा अक्रम शस्त्रं गोळा करतो आणि निरपराध ज्यूंवर हल्ला करतो. किरकोळ दहशतवादी हल्ला करून माणसं  जिहादची हौस भागवतो. त्यातून निष्पत्ती काहीच होत नाही.

बिनलादेननं साऱ्या जगाशी वैर धरून गैरइस्लामी देशच नष्ट करायचं ठरवलं. ते जमण्यासारखं नव्हतं. अल बगदादीनं बृहत सीरियात इस्लामी राज्य करायचं ठरवलं, राक्कात राज्य स्थापलं. ते टिकलं नाही कारण राज्य चालवणं ही एक स्वतंत्र कला आहे. लादेन, बगदादी यांच्या चुकातून धडा घेऊन अल शारा इस्लामी देश निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

धर्मराष्ट्र ही कल्पना समाईक असल्यानं अल शाराना  इस्रायल आणि अमेरिकेचा पाठिंबा मिळतोय.

Comments are closed.