मेलडी खाओ खुष हो जाओ

मेलडी खाओ खुष हो जाओ

 मेलनी, मेलडी आणि मोदी

नरेंद्र मोदी इटालीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलनी यांना रोममधे  भेटले. त्यांनी मेलनीना मेलडी चॉकलेट दिलं. मोदींचं वय ७५. मेलनींचं वय ४९. मोदींना मुलगी असती तर ती मेलनीच्या वयाची असती. मोदींनी गंमत केली. संबंध गोड रहावेत असा प्रयत्न चॉकटेलच्या प्रतिकाद्वारे केला. 

नरेंद्र मोदी फ्रान्समधे जी७ बैठकीला गेले होते. तिथं मेलनी आल्या होत्या. तिथं त्यांची ओझरती भेट झाली. दोघंही आनंदात होते असं दृश्य दिसलं. मेलनी म्हणाल्या ‘पुन्हा भेटलोत याचा आनंद झाला’. दोघांची भेट माध्यमांच्या नजरेत भरली.

 मोदीनी मेलनीना सवयीनुसार  मिठी मात्र घातली नाही.

मेलनी भारतात आल्या होत्या. विमानतळावर उतरून त्या दिल्ली शहरात निघाल्या तेव्हां वाटेत दिल्लीच्या रस्त्यांवर दिव्याच्या खांबांवर मेलनींचे फोटो होते. शेकडो फोटो. प्रत्येक फोटोखाली मेलनी तुमचं स्वागत आहे असे शब्द होते. भेट आटोपून मेलडी परतल्या तेव्हां विमानतळापर्यंतच्या वाटेवर तेच सारे फोटो लटकलेले होते. मजकूर बदलला होता. तुमच्या भेटीबद्दल आभार असे शब्द होते.

इतके फोटो, इतकी पोस्टर्स, इतके महाकाय फलक पाहून मेलनींचा सहकारी मेलनीना म्हणाला ‘पहा तुम्हाला केवढी प्रसिद्धी दिलीय. तुम्ही दिल्लीत निवडणुकीला उभ्या राहिलात  तर नक्कीच निवडून याल.

मेलनींचं ‘आय एम जॉर्जिया’ हे आत्मचरित्र नुकतंच प्रसिद्ध झालंय. अजून त्यांची पन्नाशी सुरु झालेली नाही, जेमतेम ५ वर्षांचा मंत्रीपदाचा अनुभव गाठीशी आहे. असं असूनही आत्मचरित्र. तर त्या आत्मचरित्राला मोदींनी प्रस्तावना लिहिली आहे. प्रसिद्ध व्यक्तींच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहायला मोदीना आवडतं. हेमा मालिनी यांच्यावरच्या पुस्तकालाही त्यांनी प्रस्तावना लिहिलीय. 

मोदी मेलनीना खुष ठेवायचा प्रयत्न करत आहेत. कां?

भारताला निर्यात वाढवणं फार गरजेचं आहे. तसं म्हटलं तर ती गरज पूर्वीपासून आहे. निर्यात हे एक उत्पन्नाचं साधन असतंच. पण त्याहीपेक्षा अर्थव्यवस्था आयातीवर अवलंबून असते तेव्हां परकीय चलनाची आवश्यकता फार असते. डॉलर,युरो गाठीशी असणं आवश्यक असतं कारण बराचसा आयात व्यवहार डॉलर, युरोमधे होतो. तेल ही मुख्य गरज, तेलाला डॉलर मोजावे लागतात. सध्याची स्थिती अशी आहे की सरकारला साठवलेले डॉलर खर्च करून रुपया सावरावा लागतोय. त्यामुळं डॉलर-युरोची चणचण जीवघेणी आहे. मिळेल तिथून परकीय चलन मिळवणं सरकारला भाग आहे.

भारत इटालीला ८.५५ अब्ज युरोचा माल विकतो. ही निर्यात चार ते पाच अब्ज युरोनं वाढवायची गरज भारताला आहे. मेलनींना मेलेडी त्यासाठी. 

व्यापार वाढणं, निर्यात वाढणं ही एक आर्थिक घटना असते. परदेशी बाजारात खपेल असा माल, परदेशी लोकांना हवा असलेला दर्जा असलेला माल, परदेशी लोक आनंदानं द्यायला तयार होतील अशा किमतीतला माल या निर्यातीच्या मुख्य कसोट्या असतात. ते सांभाळणं महत्वाचं की त्या देशाच्या नेत्यांना लोणी चॉकलेट चाखायला देणं महत्वाचं?

दोन्ही महत्वाचं असतं.

पर्सनल केमेस्ट्री नावाची एक गोष्ट असते. देशाच्या प्रमुखाशी सूत जुळलं तर पुढली चक्र जोरात फिरत असतात. म्हणून तर परदेशी पाहुण्यांचं जंगी स्वागत केलं जातं. त्यांच्यासाठी लाल गालिचे पसरले जातात, जंगी मेजवान्या दिल्या जातात, आकर्षक भेटवस्तू दिल्या जातात. व्यक्तीगत दोस्ती व्हायला हवी.

झेलेन्सकी आणि ट्रंप यांचं बिनसलं. एक कारण फालतू होतं. झेलेन्सकी साधा टी शर्ट घाऊन व्हाईट हाऊसमधे गेले. ट्रंपना ते आवडलं नाही. कॅमेऱ्यासमोर त्यांचं भांडण झालं. अमेरिकेकडून युक्रेनसाठी योजलेली मदत रखडली. 

अमेरिकेला ब्रीटनच्या मैत्रीची गरज होती. इराण युद्धात न पडण्याचा निर्णय  ब्रीटननं घेतला होता. ट्रंपनी ब्रिटीश पंतप्रधान स्टार्मर यांच्यावर टीका करून पाहिली. स्टार्मर हलले नाहीत.ट्रंप नाराज होते. त्यांना मस्का लावण्यासाठी ब्रिटीस राजानं जंगी मेजवानी दिली. क्रिकेटच्या खेळपट्टीपेक्षा किती तरी मोठ्या लांबीच्या टेबलावर खाना ठेवला. गौरवपर भाषणं केली. तेही कामी आलं नाही. मग खुद्द राजा अमेरिकेत गेला. तिथं पुन्हा खाना. राजा आणि ट्रंप एकमेकांची स्तुती करत फिरत होते.

मोदीना अमेरिकेची गरज आहे. अनेक कारणांसाठी. मोदी ट्रंपना भेटायला गेले. त्यांच्या समोर याचकासारखे बसले. देशप्रमुख असो की साधा बातमीदार, अमेरिकेत प्रेसिडेंटला मिस्टर प्रेसिडेंट असं संबोधलं जातं. साहेब, जी, इत्यादी जोडण्याची पद्धत अमेरिकेत नाही. अमेरिकेतली ही पद्धत मोडून मोदी ट्रंपना एक्सलन्सी असं संबोधत होते. गंमत म्हणजे मोदीच्या हिंदी वक्तव्याचं ट्रंपसाठी इंग्रजीत भाषांतर करणारा दुभाषा मात्र ट्रंपना मिस्टर प्रेसिडेंट म्हणत होता.

मोदीना गरज होती. ट्रंपना खुष करणं हा मुत्सद्देगिरीचा भाग होता.

मेलनी या बाई वेगळ्या आहेत. त्या खाजगीत किंवा जाहीरपणेही स्पष्ट बोलतात. त्या हांजीहांजी  करत नाहीत,   उद्धटपणेही वागत नाहीत, सहजपणे बोलतात, वावरतात. याचाही परिणाम होतो. एकदा त्या ट्युनिशियात गेल्या होत्या. तिथल्या राष्ट्रपतींशी बोलता बोलता अगदी सहजपणे मेलनी म्हणाल्या की त्यांना सिगारेट ओढायची तल्लफ आली आहे. दोन मित्र एकमेकाशी जितक्या सहजपणे वागतात तसं हे वागणं होतं. ट्युनिशियन प्रेसिडेंट आनंदले. त्यांनी स्वतःच्या खिशातून सिगारेट काढून मेलनीना दिली. इटाली आणि ट्युनिशियात मैत्रीचे संबंध स्थापन झाले.

जीसातच्या बैठकीत मेलनी आपल्यासोबत फोटो काढण्यासाठी भीक मागत होत्या असं ट्रंप म्हणाले. मेलनी भडकल्या. मेलनी ट्रंपना जाहीरपणे म्हणाल्या ‘ आम्ही कोणाकडंही भीक मागत नसतो. तुमचं वागणं शोभादायक नाही’.

आता ट्रंप इटालीवरची टॅरिफ वाढवतात का ते पहायचं.

काहीही असो. मोदींनी मेलनीना खुष ठेवायचा प्रयत्न केलाय. भारताची इटालीला होणारी निर्यात वाढते की कसं ते पहायचं.

।।

Comments are closed.