सिनेमा. दी रीटर्न

सिनेमा. दी रीटर्न

सिनेमा

।।

फकाट रिकामी स्पेस

त्यात अडकलेली एकाकी माणसं

दी रीटर्न

दिक्दर्शक Andrey Zvyagintsev

।।

मुलं गावाबाहेर समुद्राच्या काठावर येतात. एक कसाबसा उभारलेला टॉवर. त्यावरून पाण्यात उड्या घेत असतात.

समोर अथांग समुद्र. समुद्रात गेलेली एक जेटी. पाठीमागं गाव. चार पाच पोरं सोडली तर पुढं,मागं,वरती, खालती,कोणीही नाही. माणुस नाही.प्राणी नाही. वाहन नाही.इमारत नाही. काssssही नाही.

समुद्र, आकाश,डावी उजवीकडचे डोंगर. सारं काही मळकं. समुद्राचं पाणी, ढगाळलेलं आकाश, खडकाळ जमीन, झाडं. साऱ्याचे मूळ रंग दिसत नाहीत. सारं मळकट. 

आंद्रे आणि इव्हान हे दोन भाऊ आणि त्यांचे चार मित्र. मुलं उडी मारताना खाली समुद्र असतो. पाणी काळंच दिसतं. खाली काहीही दिसत नाहीये अशा अज्ञात पोकळीत उडी मारायची. जे दिसतं त्याला संदर्भ नाहीत. फकाट दिसणं.

असा सिनेमा उघडतो.

सिनेमा संपतो तेव्हां आंद्रे आणि इव्हानचा बाप एका होडक्यात बुडालेला आहे. बाप असलेलं होडकं समुद्रात दूर दूर जातंय. मुलं काहीही करू शकत नाही. बाबा बाबा अशा हाका मारत रहातात. 

अथांग मळकट  समुद्र. कोणतेही डीटेल्स दिसत नाहीत असे डोंगर आणि झाडं. आकाशालाही मळकट राखाडी रंग. भिजलेली, थकलेली मुलं दिसतात पण त्यांचेही डिटेल्स दिसत नाहीत. पक्क्या रेषाच नाहीत. सारं काही एकमेकात मिसळलेलं. काळं पांढरं यांच्यातली सीमा रेषा दिसत नाही. मुलं घराकडं परतत आहेत असा निष्कर्ष प्रेक्षकानं काढायचा. मुलंही दिसत नाहीत. रिकामा अवकाश दिसत दिसत सिनेमा संपतो.

सिनेमात मुलांचं घर दिसतं. त्या घरात मोजक्याच वस्तू. कपाटं नाहीत, भिंतीवर तस्वीरी नाहीत. रिकाम्या भिंतीवर वेळ दाखवणारं एक घड्याळ येवढीच प्रॉपर्टी. डायनिंग टेबलवर मोजकेच पदार्थ. मांसाचा तुकडा आणि उकडलेले बटाटे. सिनेमातले मोजके प्रसंग घडतात त्या इमारतीही जुनाट, शेवाळी, जमिनीवर पाणी साचलेलं. गावात माणसं दिसत नाहीत, कार नाहीत. दुकानं आणि घरांची दारं बंद, जिवंतपणाची कुठलीही चिन्हं दिसत नाही.

अशा अवकाशात बाप आणि त्याची मुलं.

आपण सिनेमा पहातो की डार्क पेंटिंगचं प्रदर्शन पहातोय?

कथा पाच सात ओळींची.

आंद्रे आणि इव्हानचा पिता अचानक उगवलाय. १२ वर्षानी. इतकी वर्षं तो कुठं होता? काय करत होता? माहित नाही.

तो अचानक कां उपटलाय? मुलांना तीन दिवस फिरायला न्यायला. बेटावर जाणार. जंगलात मुक्काम करणार. मासेमारी करणार. परत येणार.

बाप बोलत नाही. मोजकेच शब्द. मुलांनी प्रश्न विचारावेत, बाप उत्तर देत नाही. प्रवासात असताना मोठ्या इव्हानला काही टारगट मुलं लुटतात. इव्हान प्रतिकार करत नाही. बाप थंड. प्रतिकार करायला हवा होतास म्हणतो पण स्वतः मधे पडत नाही. बाप जातो. त्या टारगट मुलाची गचांडी धरून आणतो. इव्हानसमोर उभा करतो. त्यानं तुला मारलं ना, मग आता तू त्याला मार. येवढी दोनच वाक्यं बोलतो. इव्हान आणि आंद्रे मारायला नकार देतात. बाप त्या टारगटाला विचारतो-तू यांना कां लुटलस. तो मुलगा म्हणतो मी उपाशी होतो. बाप खिशातलं पाकीट काढतो, पैसे देतो त्या मुलाला जा म्हणतो.

सगळ्या प्रसंगात चार पाचच वाक्यं.

बापाचं प्रेत मुलं ओढून आणतात, गाडीत ठेवतात. मोठा इव्हान ड्राईव करायला बसतो. शांत. आंद्रे म्हणतो माझे शूज ओले झालेत. इव्हान म्हणतो काढून ठेव. शांत.

दिक्दर्शकाची शैली अद्भुत आहे.

सोवियेत युनियन मोडल्या नंतरचा रशिया.

आपल्याला समजत जातं रशियाची अवस्था काय होती. टेबलावर अन्न नसणं. दांडीवर कपडे नसणं. घरात वस्तू नसणं. मांसाचा अगदीच असंस्कृत असा तुकडा आणि नुसता बटाटा.

दुकानं आहेत पण उघडलेली नाहीत. घरं आहेत पण दारं खिडक्या बंद, आत कोणी रहात असेल असं वाटत नाही. एकच रेस्टॉरंट उघडं असतं. त्यातही तुरळकच माणसं असतात.

रस्ते, घरं, ओसाड.

अशा स्पेसमधे एक माणूस अचानक उगवतो. मुलांना जगायचं कसं ते शिकवतो. ॲक्शननं. 

कार चिखलात फसते. झाडांच्या फांद्या गोळा करून आणून चाकाखाली ढोसायच्या आणि नंतर कार सुरु करायची. 

तिघं होडीत बसतात. होडी वल्हवायची. तिघांनीही एकाच सुरात एकाच तालात वल्हं मारायचं. 

बापाचं प्रेत किनाऱ्यावरून ओढत न्यायचं. कसं. दोघंच जण असतात. फांद्या गोळा करतात. जमिनीवर त्याचं स्ट्रेचर तयार करतात. त्यावर प्रेत. स्ट्रेचर खेचतात.

आंद्रेला मासे मारायचे असतात. बाप तर निघालेला असतो. आंद्रे कटकट करतो. बाप त्याला गाडीतून मधेच उतरवतो आणि जा म्हणून सांगतो. तुझं तूच पहा. आंद्रे खाली उतरतो. पाऊस पडत असतो. चिंब भिजतो. थंडीनं कुडकुडतो. किती तरी वेळानं बापाची गाडी येते. बाप दरवाजा उघडतो. तोडानं बोलत नाही, बस असा त्याच्या हावभावाचा अर्थ. 

आंद्रे गळ टाकून मासे पकडत असतो. पिशवीत बरेच मासे गोळा होतात. मासे तडफडत असतात. आंद्रे माशांना समुद्रात सोडतो.

चित्रपटात  घटना घडत असतात. बोलण्याचा प्रश्नच येत नाही. 

मुलांना घडवून बाप निघून जातो.

दिक्दर्शक काहीही सांगत नाही. तुम्ही पहा आणि तुमचं तुम्ही ठरवा.

सिनेमात दिसलेली माणसं कोण आहेत,कोणत्या समाजात ती रहातात, काहीही दिक्दर्शक सांगत नाही.

शब्देविण संवादू म्हणतात ना तशातली गत.

काही वर्षांपूर्वी मी रशियातले बस स्टॉप या विषयावरची डॉक्युमेंटरी पाहिली होती. सोवियेत युनियनचा काळ होता. रंग होते. आर्किटेक्चर होतं. झगझगीत जिवंतपणा होता.

आणि सोवियेत युनियन मोडल्यानंतरच्या काळातला हा सिनेमा.

आंद्रेची भूमिका व्लादिमिर गेरिननं केलीय. दीर्घ काळ आंद्रे लक्षात राहील गेरिनच्या अभिनयामुळं.

।।

Comments are closed.