धर्म कसा घडतो
पुस्तकं.
Rome’s Age of Revolution.
Tim Whitmarsh.
।।
धर्म कसा घडतो?
ख्रिस्ती धर्म कसा घडला?
या प्रश्नांची उत्तरं व्हिटमार्श यांच्या प्रस्तुत पुस्तकात मिळतात.
धर्म/संस्कृती या गोष्टी सतत बदलत असतात. धर्म/संस्कृती काळाच्या ओघात परिसराशी देवाण घेवाण करत असतात. काळ पुढं पुढं जात असतो. भवताल बदलत असतो. धर्म त्याच्याशी जुळवून घेत बदलत असतो. धर्म एकसंध कधीही नसतो. हा विचार ख्रिस्ती धर्माचं उदाहरण घेऊन प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे. आजचा ख्रिस्ती धर्म एकसंध (मोनोलिथ) नाही.
इ.स. ३०–१०० या काळात येशू आणि त्यांचे पहिले शिष्य स्वतःला ज्यूच समजत होते. ते मंदिरात जात, ज्यू सण पाळत आणि मोशेच्या कायद्याला महत्त्व देत. संत पॉलने सांगितले की येशूवरील श्रद्धा ही मोशेच्या नियमांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे सुंता, ज्यू आहारनियम यांसारख्या बंधनांशिवाय ग्रीक आणि रोमन लोकही ख्रिश्चन होऊ शकले.
इ.स. १००–३१३ या काळात ख्रिस्त नेमका कोण होता, हा प्रश्न चर्चिला जाऊ लागला. तो देव होता का? माणूस होता का? दोन्ही होता का? हा प्लेटो, स्टोइक आणि ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता.
“लोगोस” (Logos), “स्वभाव” (Nature), “सार” (Essence), “त्रित्व” (Trinity) यांसारख्या संकल्पना बायबलमधून नव्हे तर ग्रीक तत्त्वज्ञानातून विकसित झाल्या.
इ.स. ३१३–५०० या काळात रोमन सम्राट कॉन्स्टंटाइनने ख्रिश्चन धर्माला मान्यता दिली. पुढे थियोडोसियसने तो राज्यधर्म केला. यामुळे चर्चमध्ये मोठे बदल झाले.छोट्या प्रार्थनागृहांऐवजी भव्य चर्च उभी राहिली.बिशप राजकीय नेत्यांसारखे प्रभावशाली बनले.धर्मसभा (Councils) भरू लागल्या.श्रद्धेची अधिकृत तत्त्वे निश्चित झाली. राजधर्म झाल्यानं चर्च संघटित झालं, एका संस्थेच्या रुपात संस्थेची शिस्त घेऊन विकसित झालं.
इ.स. ५००–१५०० मध्ययुग.रोमन साम्राज्य कोसळल्यानंतर चर्च हीच सर्वात स्थिर संस्था राहिली.पोपचे महत्त्व वाढले.मठसंस्था विकसित झाल्या.संतपूजा, अवशेषपूजा, यात्रांचे महत्त्व वाढले.लॅटिन भाषा धर्माची भाषा झाली.राजे आणि पोप यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. पोप स्वतः राजासारखाच वागू लागला, जमीनदारासारखा वागू लागला.
सोळावे शतक. प्रोटेस्टंट सुधारणा. मार्टिन ल्यूथरनं विचारलं, पोप सर्वोच्च का? बायबल लोकभाषेत का नसावे? पापमुक्तीसाठी पैसे का द्यायचे?यातून प्रोटेस्टंट चर्च निर्माण झालं. या काळात छापखाने सुरु झाले, शिक्षण व्यवस्था निर्माण झाल्या, नेशन स्टेटचा उदय झाला. चर्चला या बदलांशी जुळवून घ्यावं लागलं.
सतरावे–अठरावे शतक. विज्ञान आणि प्रबोधन
कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन यांच्यानंतर जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. बायबल हे विज्ञानाचे पुस्तक नाही, ही कल्पना हळूहळू स्वीकारली गेली. तर्क, विज्ञान आणि मानवी बुद्धीला महत्त्व मिळाले.धर्म आणि राज्य यांची विभागणी होऊ लागली.धर्माच्या अधिकारावर मर्यादा आल्या.
एकोणिसावे शतक: औद्योगिकीकरण आणि आधुनिक समाज. औद्योगिक क्रांतीमुळे शहरांची वाढ झाली.कामगारांचे प्रश्न निर्माण झाले.चर्चने सामाजिक न्याय, शिक्षण, रुग्णालये, कामगारांचे हक्क यांवर भर द्यायला सुरुवात केली.
विसावे शतक: लोकशाही, मानवाधिकार आणि जागतिकीकरण. धार्मिक स्वातंत्र्य स्वीकारले. इतर धर्मांबद्दलचा दृष्टिकोन मवाळ झाला. स्थानिक भाषेत प्रार्थना सुरू झाली.स्त्रिया, गरीब, दलित, आदिवासी, स्थलांतरित यांच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष दिले गेले. धर्म अधिक समावेशक झाला.
एकविसावे शतक): आधुनिक आव्हाने. आज चर्चमधे चर्चिले जाणारे विषय वेगळे आहेत, त्या विषयांवर चर्चला भूमिका घ्यावी लागणार आहे. विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान. समलैंगिक विवाह.स्त्रियांचे नेतृत्व. धर्मनिरपेक्षता.कृत्रिम बुद्धिमत्ता.पर्यावरण संकट.
ख्रिश्चन धर्माचा इतिहास हा केवळ धार्मिक श्रद्धेचा इतिहास नाही; तो ज्यू परंपरा, ग्रीक तत्त्वज्ञान, रोमन साम्राज्य, मध्ययुगीन युरोप, राष्ट्रवाद, विज्ञान, लोकशाही आणि आधुनिक मानवी मूल्ये यांच्याशी सतत संवाद साधत झालेल्या परिवर्तनांचा इतिहास आहे. म्हणून आजचा ख्रिश्चन धर्म आणि पहिल्या शतकातील येशूच्या अनुयायांचा धर्म यांच्यात सलगता असली तरी स्वरूप, संस्था, तत्त्वज्ञान आणि सामाजिक भूमिका या सर्व बाबतीत मोठे ऐतिहासिक बदल झालेले दिसतात.
आज पोप यांच्या अखत्यारीतला व्हॅटिकन केंद्रीत रोमन कॅथलिक हा पंथ एकमेव ख्रिस्ती पंथ नाही. ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती आहेत, त्यात ग्रीक, रशियन, सिरियन आणि इतर चर्चेस आहेत. प्रोटेस्टंट आहेत, त्यात लुथरन, कॅल्व्हिनिस्ट, अँग्लिकन, बॅप्टिस्ट, मेथोडिस्ट, पेन्टेकोस्टल अशा शेकडो परंपरा आहेत. याशिवाय आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत स्थानिक संस्कृतींशी मिसळलेली स्वतंत्र ख्रिस्ती चर्च आहेत. आफ्रिकन चर्चमध्ये स्थानिक संगीत, नृत्य आणि आध्यात्मिक परंपरांचा प्रभाव दिसतो. लॅटिन अमेरिकेत ख्रिस्ती धर्म स्थानिक सामाजिक संघर्ष आणि मुक्तीच्या विचारांशी जोडला गेला. देशोदेशी ख्रिस्ती धर्म त्या त्या देशातल्या भाषांतून अनुयायांसमोर येत असतो.
एक गंमत. इंग्लंडनं स्वतःची ख्रिश्चॅनिटी शोधली. अगदी तशीच अमेरिकन ख्रिश्चॅनिटी तयार करण्याच्या प्रयत्नात डोनल्ड ट्रंप आहेत. हंगेरीत व्हिक्टर ओरबन युरोपीय सांस्कृतीक धाटणीचा ख्रिस्ती धर्म संघटित करत आहेत. ओरबन आणि ट्रंप यांचा धर्म राजकीय आहे असं म्हणता येईल. धर्माचा हा एक नवा फुटवा आहे.
व्हिटमार्श यांच्या पुस्तकाचा सारांश असा. रोमन साम्राज्य हा ख्रिस्ती धर्माच्या विकासातला एक महत्वाचा घटक आहे. परंतू रोमन साम्राज्यच जन्माला आलं नसतं तरीही ख्रिस्ती धर्म विकसित झाला असता कारण त्यात लवचिकता आहे.
केंब्रीज विद्यापीठात ग्रीक भाषा हा विषय शिकवणारे प्राध्यापक टिम व्हिटमार्श यांचं हे ताजं पुस्तक आहे. व्हिटमार्श यांची ३० पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
।।