बर्नहॅम प्रश्नांची जाण आणि उत्तरं
बर्नहॅम. प्रश्नांची जाण आणि उत्तरं
ब्रीटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांचं पंतप्रधान होणं ही एक लक्ष देण्यासारखी घटना आहे. ब्रीटनच्या प्रश्नांची जाण त्यांना आहे आणि त्यावर काही निश्चित कार्यक्रम आणि अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आधीचे त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या विरोधात बंड करून बर्नहॅम पंतप्रधान झाले आहेत.
बर्नहॅम यांचं लक्ष आंतरराष्ट्रीय प्रश्नांपेक्षा त्यांच्या देशातल्या प्रश्नांवर अधिक आहे. पंतप्रधान झाल्या झाल्या त्यानी शिक्षणाच्या प्रश्नाला हात घातला आहे.
गेलं दशक ब्रिटीश ऊच्च शिक्षणाचा दर्जा खालावत चाललाय अशी चर्चा होती. ऑक्सफर्डं, केंब्रीज इत्यादी जगविख्यात शिक्षण संस्थांना आता कॉलेजेस चालवता येत नाहीयेत कारण त्यांच्याकडं पुरेसा पैसा नाहीये. विद्यार्थी खूप झालेत. फीमधून पुरेसा पैसा मिळत नाही. सरकार आणि चर्च हे पैशाचे दोन स्त्रोत आटत चालले आहेत. त्यामुळं अनेक महत्वाचे विषय शिकवणं कॉलेजांना जमत नाहीये. परिणामी विद्यापीठांचा दर्जा खालावत चालला आहे असं अहवाल सांगताहेत.
दुसऱ्या बाजूला अनेक अभ्यास सांगतात की ब्रीटनभर १४ ते १६ वर्ष वयोगटातले लाखो तरूण ना कॉलेजात,ना प्रशिक्षणात ना नोकरीत अशा अवस्थेत आहेत. सरकारनं दिलेल्या मदतीवर बरेच तरूण जगत आहेत. मँचेस्टर, ग्लासगो, बर्मिंगहॅम इत्यादी ठिकाणी अनेक उद्योग वाईट अवस्थेत आहेत. त्यांना प्रशिक्षित कामगार मिळत नाहीत. एक विचित्र स्थिती निर्माण झालीय. तरूण बेकार आहेत, उद्योगांना कामगार मिळत नाहीत. बेकारी आणि कामगारांची टंचाई असा विचित्र पेच अनेक शहरांमधे ब्रीटनमधे तयार झाला आहे.
बर्नहॅम यांनी आता योजना आखलीय. प्रतिष्ठा देणारी पदवी देण्यापेक्षा काम देणारं कौशल्य प्रशिक्षण द्या असं त्यांनी विद्यापीठांना सांगितलंय. जागोजागी नाना प्रकारचे कुशल आणि अर्धकुशल कामगार हवे आहेत. ती कौशल्य देणारे विषय पारंपरीक विषयांशी जुळवून विद्यापीठांमधे शिकवा असं त्यांनी सुचवलं आहे.
मुख्य म्हणजे सर्व देशभर एकाच साच्याचं शिक्षण हा प्रकार बंद करा असं त्यांनी विद्यापीठांना कळवलंय. विभागवार जशा गरजा असतील तशा शिक्षणावर भर द्या असं त्यांनी सुचवलंय.
मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.
बहुतांश कामांना लागणारं कौशल्य मर्यादित असतं. बँका,सेवा क्षेत्र, फायनान्शियल संस्था, व्यवस्थापन इत्यादी ठिकाणी काम करण्यासाठी आवश्यक कौशल्य मिळवण्यासाठी ज्ञान फारसं लागत नाही. त्यासाठी तीन वर्ष पदवी आणि दोन वर्षं पदव्युत्तर शिक्षणाची आवश्यकता नसते. पायाभूत साक्षरता, मापन क्षमता, कामाची शिस्त इत्यादी गोष्टी दिल्यानंतर त्या त्या कामासाठी आवश्यक कौशल्यं देणं पुरेसं असतं.कारकुनाच्या नोकरीसाठी पदव्युत्तर पदवी घेणारे आणि पीएचडी घेतलेले लोक अर्ज करतात ही स्थिती विचित्र आहे. वरील कामं करण्यासाठी लागणारं कौशल्य अगदी वर्षभरातही मिळवता येतं.
बर्नहॅम काय म्हणतात ते समजण्यासाठी आपल्या सभोवताली एक नजर टाकूया. मुंबई,पुणे,औरंगाबाद,नागपूर,सांगली इत्यादी ठिकाणी हज्जारो हॉटेलं आहेत, खाणावळी आहेत. तिथं मर्यादित कौशल्य असणारे कामगार लागतात. ती कौशल्य शिकवण्याची सोय नाही. केटरिंग कॉलेजमधे जे शिकवतात ते साधारणपणे स्टार हॉटेलात काम करण्याच्या उपयोगाचं असतं. हॉटेल आणि खाणावळीत काम करण्यासाठी त्या महाग-हायफाय शिक्षणाची जरूर नाही. माणसं मिळत नाहीत. मिळतात ती धड काम करू शकत नाहीत, त्यांना शिकवण्यात मालकांचा जीव जातो.
प्लंबर, सुतार, इलेक्ट्रिशियन, गवंडी ही कामं करणाऱ्या माणसांचा तुटवडा आहे. ती ती कौशल्य शिकवण्याची सोय आहे पण ती अगदीच अपुरी आणि अकार्यक्षम आहे. इंजिनियरिंग, टेक्नॉलॉजीच्या पदव्या देण्याच्या खटपटीत शिक्षण महर्षी असतात. गंमत अशी की दोन्ही कॉलेजमधे अर्ध्या सिटा भरत नाहीत. इंजियनर झालेला माणूस रोजंदारीवर अकुशल काम करणाऱ्याच्या वेतनावर काम करताना दिसतात.
आरोग्य व्यवस्थ चालण्यासाठी नर्सेस, लॅब असिस्टंट, ऑपरेशन थिएटर असिस्टंट, अशा कर्माचाऱ्यांची गरज असते, त्यांचीच कमतरता आहे. कंप्यूटर चालवणं, तो ठीक करणं, कोडिंग करणं ही कौशल्य अगदी सहजगत्या प्रशिक्षण घेऊन आत्मसात करता येतात. त्यासाठी कंप्युटर इंजिनियरिंग वगैरेच्या पदव्यांची आवश्यकता नाही.
जे भारतात आहे तेच ब्रीटनमधे आहे. बर्नहॅम यांनी ते ओळखलं. विद्यापीठांना उपयुक्त अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आवश्यक ती लवचिकता आणि स्वातंत्र्य दिलं पाहिजे, शिक्षणव्यवस्था विकेंद्रीत केली पाहिजे असं बर्नहॅम म्हणत आहेत.
बर्नहॅम मॅचेस्टरचे मेयर होते. मँचेस्टरमधे बस, ट्रॅम, ट्रेन अशी नाना प्रकारची वाहनं होती. वाहतूक व्यवस्था खाजगी होती. कंपन्यांना एकमेकाशी स्पर्धा करावी लागे. त्या पायी कंपन्या भाडी वाढवत असत. भाडी अवास्तव झाली आणि नागरीक वैतागले. बर्नहॅम यांनी वाहतूक व्यवस्था सार्वजनिक केली. सर्व व्यवस्थांचं संयोजन केलं. त्यांचं मिळून एकत्र वेळापत्रक केलं. एक तिकीट काढलं की ते बस, ट्रेन, ट्रॅम कुठंही चालेल अशी व्यवस्था केली. व्यवस्थांचं संयोजन झाल्यानं वाहतूक सुधारली आणि भाडी कमी झाली.
कोविडच्या काळात पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लॉकडाऊन लादला. रेस्टॉरंट बंद, पब बंद, दुकानं बंद.
बर्नहॅमनी मेयर या नात्यानं जॉन्सनना म्हणजे पंतप्रधानाला विरोध केला. कामं बंद केली तर लोकांनी जगायचं कसं? लोकांना जगण्यासाठी सार्वजनिक मदत केली पाहिजे अशी भूमिका बर्नहॅमनी घेतली. त्यांनी छोट्या व्यवसायिकांना नाना प्रकारे मदत केली. कोविडचा त्रास मँचेस्टरला झाला नाही.
आज ब्रीटनमधे महागाईचं संकट आलं असताना बर्नहॅम यांनी अनेक वस्तूंच्या भावात सबसिडी देऊन किमती नियंत्रणात ठेवल्या. दुकानदारांचंही नुकसान नाही आणि ग्राहकांनाही दिलासा मिळाला.
कीर स्टार्मर बरे पंतप्रधान होते. त्यांच्या नावावर लफडी,घोटाळे नव्हते. तरीही ते पुरेसे कार्यक्षम नाहीत असं म्हणून त्यांचाच सहकारी त्यांना दूर सारून पंतप्रधान होतो.
गंमतच आहे.