नेपाळमधली सुनामी
२६ ऑगस्ट.
नेपाळ आणि तिबेटमधे हिमालयी सुनामी झाली. दगडमातीचा दाट द्रव झालेल्या पाण्याचा पूर आला. पुराचा वेग आणि जोर येवढा होता की तिबेटमधली एक पाच मजली इमारतीचा मिनिटभरात चुराडा झाला, इमारतीच्या जागी मातीचा ढीग उरला. नेपाळमधली कित्येक गावं अख्खीच्या अख्खी वाहून गेली. नेपाळमधे तिबेटच्या तुलनेत जास्त माणसं मेली. पक्का न झालेला मृतांचा आकडा दोनेक हजारांचा आहे.
ही घटना घडली तेव्हां गडगडाट झाला, भूकंप झाल्यासारखं वाटलं.
ग्लेसियर (हिमनदी) सतत हळूहळू सरकत असते.एकाद्या ठिकाणी ग्लेसियरचा सरकण्याचा वेग वाढतो, ग्लेसियरच्या तळाशी असलेला डोंगर उघडा पडतो, त्यात भेगा पडतात, तो विस्कटतो. बर्फ, माती आणि दगड यांचा वेगवान प्रवाह तयार होतो.तेच २६ ऑगस्टला घडलं.
नेपाळ आणि चीनच्या (म्हणजे तिबेटच्या) सीमेवरच्या हिमालयात ही दुर्घटना घडली. Langtang Lirung या हिमालयाच्या भागातली एक हिमनदी (ग्लेसियर) सरकली. वेगानं. सरकतांना पर्वातातले खडकही बर्फानं ओढले. नदी सरकल्यावर त्या खालचा पर्माफ्रॉस्ट उघडा पडला.
पर्माफ्रॉस्ट म्हणजे कित्येक शेकडो वर्षांपासून गोठलेला बर्फ आणि जमीन. पर्माफ्रॉस्टमधे भेगा तयार होत असतात. या भेगात बर्फ आणि पाणी गेल्यानंतर त्या भेगा रुंदावतात. एका क्षणी त्या इतक्या रुंदावतात की पर्वताचा तो भाग पर्वतापासून सुट्टा होतो, मोकळा होतो, निसटतो, कोसळतो. पर्माफ्रॉस्ट वितळतो तेव्हां त्यातून मिथेनसारखे अनेक घातक वायू बाहेर पडतात.
तर ग्लेसियर आणि कोसळलेले कडे अशांचा मिळून एक गचगचीत राडा तयार झाला. हा राडा ५००० फूट खोलवर वेगानं कोसळला. वजन आणि वेग इतका प्रचंड होता की त्यानं पर्वताचा खूप भाग खरवडला. या सर्वांचा मिळून झालेला चिखल वेगानं वाहत खाली पोचला.
७ अब्ज घनफूट राडा ताशी १०० मैल वेगानं वाहत गेला. वाटेत जे काही आलं ते तुडवत, जमीनदोस्त करत हा राडा तिबेट आणि नेपाळमधे फिरला. सुमारे ६० मैल लांबवर हा राडा नेपाळात त्रिशुली आणि भोटेकाशी या दोन नद्यामधे मिसळल्यानं त्या नद्यांना पूर आला.
आता नेपाळमधली सरोवरं, जलविद्युत प्रकल्प यांच्यात माती घुसली आहे. आधीची सरोवरं आणि नंतर या पाण्यानं तयार केलेली सरोवर यांतील पाणी इतकं वाढलं आहे की ती सरोवरं शेजारचे डोंगर फोडून नवे पूर निर्माण करतील.
ग्लेसियर वाहणं तूर्तास थांबलं आहे. हिमालयात सुमारे १८ हजार हिमनद्या आहेत. हवेतला कार्बन डाय ऑक्साईड वाढत चालल्यानं हवेचं तपमान वाढत चाललं आहे. त्यामुळं हिमनद्या वितळून सरकू लागल्या आहेत. संशोधकांचं म्हणणं आहे की पुढल्या दशकभरात ७५ टक्के हिमनद्या वितळतील. याचा अर्थ २६ ऑगस्टच्या दुर्घटनेच्या अनेक आवृत्या भविष्यात शक्य आहेत.हिमनद्या केव्हां सरकतील आणि दुर्घटना घडेल ते सांगता येत नाही. हिमनदी संकटाचा धोका नेपाळवर सतत टांगता रहाणार.
कठीण आहे.
नेपाळमधलं नुकसान ५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे. इमारती, विद्युत प्रकल्प, रस्ते, धरणं, शाळा इत्यादींचं नुकसान भरून काढण्याची नेपाळची क्षमता नाहीये. बाहेरून येणाऱ्या मदतीवर नेपाळ अवलंबून आहे.
वाढत्या नैसर्गिक दुर्घटना लक्षात घेऊन देशांना मदत करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय फंड तयार करण्याचं मोठ्या मिनतवारीनं २०२३ साली ठरलं. संपन्न देश त्या फंडात पैसे टाकायला तयार नव्हते, आजही नाहीत.आत्ता पर्यत फक्त ८२ कोटी डॉलरची आश्वासनं आलीत, फक्त आश्वासनं. जगाचं सर्वात जास्त प्रदूषण घडवणाऱ्या अमेरिकेनं बायडन यांच्या काळात या फंडाला १.७० कोटी डॉलरचं आश्वासन दिलं होतं. ट्रंप यांनी ते आश्वासन रद्द केलं. प्रदूषणाला पायबंद घालण्यासाठी जन्माला आलेल्या पॅरिस करारातूनही ट्रंप बाहेर पडलेत. एकीकडं फंडाची तिजोरी रिकामी आहे आणि ११७ देशांनी त्यांच्या त्यांच्या देशात घडलेल्या दुर्घटनांसाठी २.८ अब्ज डॉलरची मागणी केलीय. पैसेच नाहीत,कोणाकोणाला पैसे देणार? नेपाळला केव्हां पैसे मिळणार?
नेपाळची अर्थव्यवस्था कायम वाईट स्थितीत असते. उद्योग नाहीत, शेती नाही, पर्यटन आणि परदेशात कामाला गेलेल्या नेपाळींनी पाठवलेले पैसे यावर नेपाळ कसंबसं भागवत असतं. त्यात पुढारी आणि पक्षांच्या भ्रष्टाचाराची भर. त्यात ही नैसर्गिक संकटं. २०१५ साली झालेल्या भूकंपात ९ हजार माणसं मेली, मालमत्तेचं नुकसान झालं. त्यातून बाहेर पडलेलं नसताना नवं संकट उभं राहिलंय.
बालेन शहा पंतप्रधान होऊन वर्ष होतंय. त्यांचे तरूण सहकारी दिवस रात्र मदत कार्यात लागले आहेत. बालेन शहांना माध्यमांशी चार शब्दही बोलायला वेळ मिळत नाहीये. सर्व कामं दूर सारून नेपाळ सरकार, नेपाळी लष्कर कामाला लागलंय. परंतू निधीची अडचण ते कशी दूर करणार?
पर्यावरण प्रदूषणाची समस्येची भीषणता या निमित्तानं पुन्हा कळलीय. श्रीमंत देश प्रदुषण करतात, त्याची किमत इतराना, गरीब देशांना मोजावी लागते. प्रदूषण पश्चिमेत होतं, त्रास पूर्वेतल्या लोकांना होतोय.
दुर्घटना घडते, आर्थिक व्यवस्था कोसळते, बेकारी वाढते. माणसं कामासाठी बाहेर पडतात, सधन देशाकडं जाऊ पहातात. स्थलांतर ही एक किचकट बिकट समस्या त्यातून उद्भवते.
प्रदूषण, स्थलांतर या समस्या स्थानिक राहिलेल्या नाहीत, त्या वैश्विक झाल्या आहेत. जगाच्या पातळीवर लोकांना एकत्र येऊन त्या सोडवायला हव्यात. युनायटेड नेशन्स सारखी संस्था मोडकळीला आलीय. अमेरिका आणि इतर श्रीमंत देश आता युनोपासून फटकून आहेत. अमेरिका, चीन हे जगातले श्रीमंत देश. आपापली श्रीमंती वाढवण्यात मग्न आहेत. नेपाळला मदत करण्यात त्याना रस नाही. दुर्घटनेतलं नुकसान भरून काढण्यापलिकडं देश उभारण्यासाठी नेपाळला मदतीची आवश्यकता आहे.
नेपाळची परिस्थिती बिकट आहे.