किस्सा खिशाचा

किस्सा खिशाचा

 किस्सा खिशाचा

हॅना कार्लसन पोषाख या विषयाच्या अभ्यासक, प्राध्यापक होत्या. आपल्या पोषाखाला पुरेसे खिसे कां नाहीत असा प्रश्न त्यांना दररोज कॉलेजात जाताना पडत असे. कारकडे जाताना त्या चावी विसरलेल्या असत. किंवा पैशाचं पाकीट विसरलेल्या असत किंवा आयडेंटिटी कार्ड विसरलेल्या असत. पुरुषांच्या कोटाला, पँटला, शर्टला खिसे असतात, पटकन ते खिशातून वस्तू काढतात, आपल्याला त्यासाठी पर्स काढावी लागते याचं वैषम्य त्यांना दररोज त्रास देत असे.

कार्लसन यांनी खिसा या विषयाच्या अभ्यासाला सुरवात केली. पोषाख हा विषय तर त्यांना चांगलाच माहित होता. पोषाखाला खिसे केव्हां आले इथून त्यांनी सुरु केली. झालं. त्यातून त्यांचं Pocket.An intimate History of How We Keep Things Close हे पुस्तक साकार झालं.

पुस्तक वाचतांना आपल्यालाही प्रश्न पडतो की खिसे या बाजूनं आपण कधी इतिहासाकडं पाहिलंच नाही. पर्शियन, मेसोपोटेमियन, इजिप्शियन, हडप्पा इत्यादी संस्कृत्या पाहताना कळतं की ती मंडळी कपडे गुंडाळत असत, पांघरत असत. त्यांच्या पोषाखावर कधी खिसे नव्हते. तलवार किंवा खंजीर बाळगायचा असेल तर तो कंबरपट्ट्यात खोचलेला असे. पैसे किंवा कशाहीसाठी बटवा असे आणि तो खोचलेला असे. कधी कधी एकादी पिशवी अंगाला आत किंवा बाहेरून गुंडाळलेली असे. कोणी एकादा कागद टोपीत खोचलेला असे.

दैनंदिन उपयोगाच्या वस्तू अंगावर बाळगत नसत. सोबत पेटारा असे. किंवा सेवक असे. अरे आण रे अमूक अमूक वस्तू असं म्हटलं की सेवक ती आणून देत असे. वक्त्याना अलीकडं नाक पुसण्यासाठी किंवा घाम पुसण्यासाठी रुमाल लागतो. खिसा नव्हता तेव्हां सेवकानं अंदाज घ्यायचा की पुढाऱ्याला घाम फुटलाय, त्यानं रुमाल पुढं करायचा. वक्ता शिंकला की सेवकानं रुमाल पुढं करायचा. फार तर फार रुमाल कंबरपट्ट्यात खोचलेला असेल.

खिसा केव्हां कपड्यावर आला?

कार्लसननी अभ्यास केला. त्यांना १३७७ सालचं एक शिल्प सापडलं. युवराज्ञी जोन तिचे वडील आठवे एडवर्ड यांच्या कबरीसमोर शोक व्यक्त करताना त्या शिल्पात दिसत होती. तिनं तिचे दोन्ही हात अंगावरच्या झग्याला कंबरेच्या आसपास असलेल्या एका कपड्यातल्या फटीत-चिरेत घातले होते. कार्लसन म्हणतात की आत कदाचीत खिसा असावा.

खिशांचा पहिला पुरावा. 

१५३० वगैरेच्या सुमाराला इंग्लंडमधे पुरुष पँटी वापरत आणि पँटीची रुंदी वाढवत, पँट गबाळी करत. गबाळी करताना ती फुगीर दिसावी म्हणून एक अस्तर शिवत आणि त्या अस्तरात केस, कापडाच्या चिंध्या वगैरे घालत. तो जवळ जवळ खिसाच होता.

त्याच काळात तालीबान विचार उदयाला आला. माणसाचे कपडे कसे असावेत याचे कायदे राजानं जाहीर केले होते. पँट फुगीर असली तरी ती साडेतीन वारापेक्षा जास्त लांब असता कामा नये. जास्त लांबीची पँट असेल तर पोलीस पकडून नेत असत.

एका माणसाची पॅंट फुगलेली होती, पोलिसानी त्याला पकडलं. कोर्टासमोर उभं केलं. त्याला पँट काढायला लावली. त्यांना आढळलं की त्या पँटला आतून एक खिसा लावलेला होता. हा नवाच प्रकार होता. कायद्यात खिसा या गोष्टीची तरतूद नसल्यानं त्याला पोलिसानी सोडून दिलं.

हा प्रकार १५६० च्या आसपासचा होता.

नंतर येतं कॅप्टन कुकनं १७७० साली लिहिलेलं प्रवास वर्णन. कुक ऑस्ट्रेलियात गेला होता, त्याला कांगारू दिसले. जगाला या प्रवास वर्णनात पहिल्यांदाच मादी कांगारूच्या पोटाजवळच्या खिशात पिल्लं दिसली. पिल्लं घेऊन मादी उड्या मारात उंडारायची.

ही आयडिया बरी होती. पिल्लं खिशातच घेऊन फिरायची.

कुकच्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन शिंपी पोषाखांना खिसे शिवू लागले.

अंगरख्याला खिसे. शर्टाला खिसे. पँटला खिसे. पँट ही अब्रू राखण्याची किंवा तंगड्या झाकायची वस्तू राहिली नाही. साठवण करण्याची सोय अशी भूमिका पँटला मिळाली. कंबरेपासून तर घोट्यापर्यंत मोकळी जागा दिसली की लाव खिसा. पँटीच्या आतल्या बाजूलाही खिसे. दोन. चार. सहा. बारा चौदा खिसेली शिवले गेले.

खिशांचे आकार बदलत गेले. पंजाच्या आकापासून तर पुस्तक, मांजर ठेवता येईल या आकाराचे खिसे झाले. मेकॅनिक लोक त्यांची हत्यारंही खिशात ठेवू लागले.

डेफोनं १७१९ मधे लिहिलेल्या रॉबिन्सन क्रुसोच्या धाडसी प्रवासात क्रुसोनं जहाजावरील वस्तू बेटावर कशा आणल्या याचं वर्णन केलंय. क्रुसो जहाजावरील कापडं गोळा करून त्याचे खिसे आपल्या पोषाखाला शिवतो असं वर्णन आहे.

१८३६ मधे कार्लाईलनं कपड्यांचं तत्वज्ञान सांगणाऱ्या  ग्रंथात माणूस आणि प्राणी (कांगारू) यात फरक होतो तो खिशामुळं असं लिहिलं. 

डॉक्टर आणि मेकॅनिकच्या  एप्रनला खिसे असतात.शेफच्या शर्टला खांद्यावर एक खिसा असतो, त्यात तो पदार्थाचं तपमान तपासण्यासाठी थर्मामिटर ठेवतो. लोक खुर्चीला खिसे टांगतात. पत्रं वगैरे ठेवण्यासाठी भिंतीवर खिसे टांगले जातात. अलीकडं कित्येक जॅकेट आणि पॅंटी म्हणजे खिसे एकमेकाला चिकटवलेलं वस्त्रं अशी स्थिती असते.

ब्रीटनमधे स्कर्टला छोटासा खिसा असे. पण तो दिसण्यापुरता. त्यात वस्तू रहात नसत. मार्गारेट थॅचर आणि राणी एलिझाबेथ पर्स बाळगत असत. 

महाराष्ट्रात स्त्रियांच्या ब्लाऊजला तळाशी एक मोठा खिसा असे. नऊ वारी नेसणात कंबरेवर बेंबीखाली एक केळं असे. त्यात स्त्रिया नथ वगैरे ठेवत.

एच जी वेल्सचं म्हणणं होतं की खिसा हे माणसाच्या संचयी वृत्तीचं प्रतिक आहे. एक वेळ अशी येईल की माणूस निःसंग होईल, माणसाच्या अंगावर खिसे नसतील असं वेल्स म्हणत असे.

गांधीजी पंचा नेसत, वस्त्रं पांघरत, एकही खिसा नसे. घड्याळ  पंचात खोचलेलं असे.

।।

Comments are closed.