पुतीन पुन्हा राष्ट्रपती
पुतीन पुन्हा राष्ट्रपती
रशियाच्या लोकसभेची (ड्यूमा) निवडणूक पार पडली. आधीची निवडणुक २०२२ साली झाली होती. तेव्हां युक्रेन युद्ध सुरु झालं नव्हतं. लोकसभेचे ४५० सदस्य असतात. पडलेल्या मतांच्या ५७.८ टक्के मतं मिळवून पुतीन यांच्या युनायटेड रशियन पार्टीनं ३५५ जागा मिळवल्या आहेत. १३ टक्के जागा मतं घेऊन कम्युनिष्ट पार्टीचे ४० सदस्य निवडून आले. सर्व पक्षांत मिळून ४९ सदस्य लष्करातले आहेत, ते युक्रेन युद्धात लढले आहेत.
१९९९ साली ऑगस्टमधे राष्ट्रपती येल्तसिन यांनी पुतीनना पंतप्रधानपदी नेमलं. रशियात राष्ट्रपतीची निवड मतदार करतात आणि पंतप्रधान राष्ट्रपती नेमतो. या नेमणुकीला नंतर ड्यूमा मंजूरी देत असते. १९९९ च्या डिसेंबरमधे येल्तसिननी राजीनामा दिला, पुतीन हंगामी राष्ट्रपती झाले, नंतर २००० च्या निवडणुकीत निवडून आले. २००० ते २००८ अशा दोन खेपा ते राष्ट्रपती होते. राज्यघटनेनुसार दोनच कार्यकाळ मिळत असल्यानं त्यांना राष्ट्रपतीपदापासून दूर व्हावं लागलं. मेदवेदेव या आपल्या माणसाला त्यांनी राष्ट्रपतीपदी निवडून आणलं आणि मेदवेदेवनी पुतीन यांना पंतप्रदानपदी नेमलं. अर्थातच पुतीनच सर्वेसर्वा होते.
२००८ ते २०१२ पुतीन पंतप्रधान होते. २०१२ साली त्यांनी निवडणूक लढवली, पुन्हा राष्ट्रपती झाले. चार वर्षाच्या दोन खेपा मिळून ते २०२० पर्यंत राष्ट्रपतीपदी राहिले. आता पुन्हा राष्ट्रपतीपदी रहाता येत नव्हतं. पुतीननी दोन घटना दुरुस्त्या केल्या. एक- राष्ट्रपतीपदाची मुदत ६ वर्षं केली. दुसरी म्हणजे पुतीन यांची कामगिरी लक्षात घेऊन रशियन लोकसभेनं दोन खेपांची अट पुतीनच्या बाबतीत रद्द केली. म्हणजे पुतीन ६ वर्षाच्या २ कारकीर्दी मिळवू शकतात. याचा अर्थ २०३२ पर्यंत ते राष्ट्रपतीपदी राहू शकतात.
फक्त निवडणूक जिंकली की झालं.
गेल्या आणि या वेळच्या निवडणुकीच्या आधी अनेक उमेदवारांची पात्रता न्यायालयानं रद्द केली. कधी उमेदवाराच्या अर्जात तांत्रीक चूक असे तर कधी उमेदवार देशहिताला बाधक आहे असं न्यायालय ठरवत असे. कधी उमेदवार नाहिसाच होत असे. कधी परदेशात निघून जात असे. नेवाल्नी सर्व त्रास सहन करत लढत राहिले. नेवाल्नीला दीर्घ काळ तुरुंगात रहावं लागलं आणि शेवटी त्याच्यावर विषप्रयोग झाला.
पुतीन यांच्या होला हो म्हणणारे विरोधी उमेदवार आणि पुतीन यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीत उभे राहू शकतात.
यंदा सरकारी कर्मचाऱ्यांना रजा देऊन मतदान केंद्रावर पाठवण्यात आलं. पुतीन यांच्या उमेदवारांना मतं द्यायचा आदेश होता. पुतीनच्या उमेदवाराच्या नावापुढं शिक्का मारला याचा फोटो काढायचा आणि तो मतदान केंद्राबाहेर आल्यावर वरिष्ठांना दाखवायचा. मतं ठरलेल्या ‘योग्य’ जागीच पडतात.
मतदान केंद्राच्या पातळीवर मत चोरी होते, पुतीन यांच्या उमेदवारांच्या पत्रिकेवर शिक्का उमटवला जातो. मतदान केंद्रावर विरोधी पक्षाच्या निरीक्षकांना मनाई असते. मतदारांच्या यादीतून माणसं गळतात, अस्तित्वात नसलेल्या माणसांची नवी नावं घुसवली जातात.
निवडणूक तर सहा वर्षानी एकदा होणार. पण निवडणुकीपर्यंत माणूस पोचूच नये याची व्यवस्था पुतीननी केलीय.विष प्रयोग करून विरोध करणाऱ्यांना मारून टाकायचं.
पुतीननी विषप्रयोग करणारी एक टीम तयार केली. लष्करातून माणसं निवडली जातात. या टीममधल्या लोकांची ओळख पूर्ण पुसली जाते. नवं नाव नवा पासपोर्ट. टीम जगात कुठंही जाऊन माणूस मारते.विषारी रसायनं. रुमालावर विष लावणं, डीओडरंटच्या बाटलीतून विष माणसाच्या अंगावर फवारणं. एका माणसाच्या अंडरवेअरला विष फासलं होतं, ती अंडरवेअर वापरल्यावर काही काळानं माणूस खलास.
हे सारं माध्यमांतून प्रसिद्ध होत असतं, अनेक पुस्तकात ही माहिती प्रसिद्ध झालीय. पुतीननी या प्रसिद्धीकडं दुर्लक्ष केलंय, वरील सर्व माहिती खोटी आहे असं जाहीर केलं आहे.
स्लोवानियाचे पंतप्रधान म्हणाले ‘ही कसली निवडणुक, हे तर नाटक आहे, पुतीन नाट्य’
मतदानाच्या आदल्या दिवशी, त्या आधी दोन दिवस, मॉस्कोवर, मॉस्कोच्या परिसरातल्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर, युक्रेनचे ड्रोनबाँब कोसळले. माणसं मेली. शुद्धीकरण कारखान्यावर बाँब पडतो तेव्हां काही दिवस तेलाचा तुटवडा होतो, शहरात तेलपंपावर रांगा लागतात, दहा लीटर मागितलं तर पाच लीटर देतात.
२०२३ साली रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यापासून दररोज सुमारे १४०० सैनिक मरतात/नाहिसे होतात/जखमी होतात. उत्तर कोरियातून भाडोत्री सैनिक आणावे लागत आहेत. नेपाळमधूनही पोटापाण्यासाठी बाहेर पडलेले लोक युक्रेनमधे लढायला पोचले आहेत. सैनिकांना जास्त वेतन देऊ करतात, नातेवाईकांना जास्त भरपाई देऊ करतात. हज्जारो कैद्यांना तुरुंगातून मुक्त केलंय, अट एकच, त्यांनी आघाडीवर जाऊन लढायचं. त्यातही गंमत आहे. बाहेरून आणलेले सैनिक आघाडीवर जातात, मरतात. भूमी सुरक्षित झाली की तिथं रशियाचे सैनिक सरकतात. येवढं करूनही सैनिक कमी पडत आहेत. सक्तीची सैन्य भरती (ड्राफ्ट) केली जाण्याची शक्यता आहे.
रशियन जनता अर्थातच त्रासलेली आहे. तेल, अन्नपदार्थ इत्यादींची टंचाई आहे, महागाई वाढली आहे. रशियानं भारत, चीन इत्यादीना तेल विकून अर्थव्यवस्था कशीबशी टिकवून टेवलीय.
पुतीनना विरोध कोण करणार? पुतीनना मतं पडतात. आपल्याला जनतेची मान्यता आहे असं पुतीन म्हणू शकतात कारण त्यांना ५८ टक्के मतं मिळतात.
निवडणुकीच्या आधी ट्रंप यांचे प्रतिनिधी पुतीन आणि झेलिन्सकीना भेटले. युद्ध थांबवण्यासाठी शिष्टाई केली. कधी दोघांनाही लोणी लावलं कधी दोघांना दमदाटी केली. टॅरिफ लावून रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न ट्रंपनी केला. रशिया दाद देत नाही. टॅरिफचं शस्त्र बोथट झालंय.
युद्ध थांबण्याची लक्षणं नाहीत. (ट्रंपचं शांततेचं नोबेल हुकतंय) युद्ध चालवण्यासाठी पुतीनना सत्तेत रहाणं आवश्यक आहे. २०३० सालाच्या सुमाराला अंदाज घेतील. आवश्यकता असेल तर घटनादुरुस्ती करून आणखी पाच पन्नास वर्षांची सोय करतील.
।।