धर्मप्रसारासाठी एआय
धर्मप्रसारासाठी एआय
कॅथलिक चर्चची घसरण रोखण्यासाठी पोप लिओ यांनी चार दिवसांचा फ्रान्सचा दौरा केला.
फ्रान्सची लोकसंख्या ६.९० कोटी. फ्रान्समधल्या २.३५ कॅथलिकांपैकी १.८ कोटींनी धर्म सोडला. ५५ भाविक कॅथलिक उरतात. यातले दोन टक्के रविवारी नित्य नियमानं चर्चमधे जातात.
कमी अधिक प्रमाणावर युरोप व अमेरिकेत हीच स्थिती आहे.
कल्पक लोक चर्चच्या उजाड इमारतींचे इतर उपयोग करू लागलेत.
पोप लिओ लुर्ड या प्रसिद्ध जुन्या चर्चमधे गेले. बालवयात धर्मगुरूंनी लैंगिक शोषण केलेल्या सहा जणांना ते भेटले.चर्चमधे उपदेशकाला मदत करण्यासाठी बालकांची नेमणूक होते. उपदेशक काही वेळा/बरेच वेळा सेक्सचे भुकेले असतात. कारण उपदेशक होण्याची एक अट ब्रह्मचर्याची असते. बहुदा चर्चचं हे सुरवातीपासूनचं दुखणं असावं. फ्रान्समधे आजवर लैंगिक शोषणाच्या लाखो घटना घडल्या आहेत.
पोपनी बळींचं सांत्वन केलं. प्रार्थनेनंतर पोप म्हणाले की आजवर झालेल्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत.
बिशप होण्याची ब्रह्मचर्याची अट काढून टाकतील? सेक्स ही माणसाची नैसर्गिक भावना आहे. ती दाबून ठेवली तर त्यातून विकृती निर्माण होतात असा अनुभव आहे, अभ्यास आहे. गेल्या शंभरएक वर्षात ते सिद्ध झालंय.चर्चला ते माहित असायला हवं. बदल करायला इतका वेळ लागायचं कारण नाही. अलीकडं काही पंथ लग्न झालेल्यांना धर्मगुरू होऊ देतात. चर्चमधे चर्चा होत असतात. चर्च ही चेंगट संस्था आहे. बदलाला फार विरोध होतो आणि बहुदा अगदीच नाईलाज झाल्यानंतर बदल होतात. कधी कधी बदल करणाऱ्यांची एक स्वतंत्र पंथ/व्यवस्था/ऑर्डर तयार होते. ख्रिस्त आणि देवावर विश्वास हा समाईक मुद्दा परंतू वेगळा पंथ; अशा शेकडो ख्रिस्ती व्यवस्था निर्माण झालेल्या दिसतात.
चर्चला लिंग बदल मान्य नाही. चर्चला समलिंगी विवाह मान्य नाही.
फ्रान्समधे लिंगबदल झालेले, समलिंगी विवाह झालेले हज्जारो लोक चर्चकडं गेले आहेत, चर्चमधे प्रार्थनेला जातात, उपदेशकांकडं मार्गदर्शनासाठी जातात. लिंगबदल, समलिंगी संबंध ही गोष्ट समाजाच्याच पचनी पडलेली नाही, चर्चचं तर सोडूनच द्या. समाजानं या माणसांना दूर ठेवलंय, याचा खूप त्रास या लोकांना होत असतो. इतर माणसांसारखंच आपल्याला वागवावं अशी त्यांची इच्छा आहे. विकल मानसीक अवस्थेत ही माणसं चर्चकडं, ख्रिस्ती धर्माकडं आधार शोधतात. त्यांचं काय करायचं ते चर्चला कळत नाहीये. आधीचे पोप फ्रान्सिस यांनी त्यांना माणूस म्हणून स्वीकारलं, त्यांना आशिर्वाद दिले. पण त्यांना धर्मात सामिल करून घेतलं नाही.
पोप लिओ पोप फ्रान्सिसच्या पुढं एक पाऊल जातील?
दौऱ्यात पोप फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनना भेटले. युद्धानं प्रश्न सुटत नाही, सामंजस्यानं प्रश्न सोडवले पाहिजेत या मुद्द्यावर दोघांच्यात एकमत झालं. रशियानं युक्रेनशी युद्ध चालवलंय. फ्रान्सनं ते युद्ध थांबावं यासाठी प्रयत्न केले, पण युक्रेनला युद्धात मदत केली.इस्रायलनं गाझात नरसंहार चालवलाय. तो थांबवायचा प्रयत्न मॅक्रॉन करत आहेत. पोपनी दोन्ही युद्दं होऊ नयेत असं म्हटलं. पोपच्या गाझाभूमिकेबाबत ट्रंप नाराज आहेत, पोपनीही नाराजी लपवलेली नाही.
एकेकाळी चर्चनं लढाया केल्या होत्या. इस्लामविरोधातला चर्चचा लढा एकेकाळी हिंसक होता. हिटलरनं केलेल्या ज्यू संहाराला चर्चची मूकसंमती होती. इतर धर्मांबद्दलचं चर्चचं मानस त्यातून व्यक्त होत होतं. पण तो इतिहास झाला. काळाच्या ओघात चर्च अधिकाधीक सहिष्णू होत गेलं यात अनेक पोपांचं योगदान आहे. हा प्रवाह पुढे न्यायचा असेल तर चर्च ही जागतीक शांततेसाठी प्रयत्न करणारी संस्था व्हायला हवी, युनो सारखी. स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे हिंसक राज्यकर्ते (उदा ट्रंप) असतील तोवर चर्चचं काम अवघड आहे. लिओ त्यातून वाट काढण्याच्या प्रयत्नात दिसतात.
फ्रान्सनं कायदा करून इच्छामरण शक्य केलं. माणूस असाध्य व्याधीनं प्रॅक्टिकली मेलेलाच असतो तेव्हां डॉक्टरी सल्ल्यानं, नातेवाईकांच्या संमतीनं त्याचं मरण घडवलं जातं. चर्चचा माणसं मारण्याला विरोध आहे. चर्च अशा मृतप्राय व्यक्तींची काळजी घेतं, त्यांना नैसर्गिक मरण येईस्तोवर जपतं. याच विचारानं चर्चचा गर्भपाताला विरोध आहे. चर्चचा हा विचार योग्यच आहे. जेव्हां केव्हां हा विचार केला गेला तेव्हांची आणि आताची स्थिती खूप वेगळी आहे. तेव्हा चर्चला अशा व्यक्तींची काळजी घेणाऱ्या संस्था चालवणं शक्य होतं. नाना वाटांनी चर्चकडं पैसे गोळा होत. आता चर्च ही समाज चालवणारी संस्था राहिलेली नाही, सरकारनं ते स्थान घेतलंय. एकूण साधनं आणि वैज्ञानिक ज्ञान याच्या आधारे सरकारनं इच्छामरण आणि गर्भपाताचे निर्णय घेतलेत.
फ्रान्सनं चर्च/धर्म या गोष्टी व्यक्तिगत आहेत असं ठरवून चर्च व स्टेट वेगळे केले आहेत. मॅक्रॉन इच्छामरण, गर्भपात कायद्याच्या बाजूनं आहेत; पोप विरोधात आहेत. मॅक्रॉन म्हणतात सरकारचा/स्टेटचा धर्माला विरोध नाही, धर्मानं स्वतंत्र रहावं आणि राज्यकारभारात येऊ नये. धर्मभावनेचा उपयोग मतं मिळवण्यासाठी केला जातो, ते टळायला हवं.
एआय मानवजातच नष्ट करायला निघालीय, ते टाळलं पाहिजे यावर मॅक्रॉन आणि पोप यांच्यात एकमत झालं. तिकडं फ्रेंच उपदेशक लियोनेल डेवाव्रिन नागरिकांशी संपर्क करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करतात. त्यांना इन्स्टाग्रॅमवर ४५ हजार आणि टिकटॉकवर ९० हजार फॉलोअर आहेत. परिक्षेत मदत करावी अशी देवाची प्रार्थना करावी असं आवाहन त्यांनी सोशल मिडियात केलं. त्याला २० लाख विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. म्हणजे एआय तर हवा पण एआयनं मापात रहावं असं पोपचं म्हणणं दिसतंय, मॅक्रॉन यांचंही तेच म्हणणं आहे.
यंदाच्या वर्षात २१ हजार फ्रेंचांनी कॅथलिक धर्माची दीक्षा घेतली याचंही कारण सोशल मिडियाच असेल.
।।