वटवाघुळ
वटवाघूळ
ताजं संशोधन सांगतय की वटवाघुळाचा जन्म युरोपात झालाय. वट वाघूळ ६.५ कोटी वर्षांपूर्वी आशिया किंवा आफ्रिकेत जन्मलं असं संशोधक मानत होते. वटवाघुळावर आजवर आशिया हक्क सांगत होता, त्याचं पेटंट आशिया मागत होतं. अरेरे.
वटवाघूळ हा शब्द कुठून आला? नेमका उगम सापडत नाही. वट म्हणजे वड किंवा वाघुळ म्हणजे वाघ असा कोणताही अर्थ लागत नाही.
बॅट या इंग्रजी शब्दाची काही मुळं सापडतात. १४ व्या शतकाच्या आधीच्या इंग्रजीत hrēremūs असा शब्द होता. हेरे म्हणजे थरथरणारा, मुस म्हणजे उंदीर. वटवाघुळाचं उडणं थरथरण्यासारखं असतं आणि तो उंदरासारखा दिसतो. त्याचं तोंड उंदरासारखं असतं, उंदराला पंख फुटले तर उंदीर वट वाघुळासारखा दिसेल.
आपल्याला वटवाघूळ झाडाला उलटं टांगलेलं दिसतं. रात्री चिरका आवाज काढून उडताना दिसतं. शहरातला वट वाघुळांचा आपला संबंध येवढाच. भयपटात वटवाघुळं गुहेतल्या काळोखात प्रचंड संख्येत दाखवली जातात. आपण वटवाघुळाला पक्षी म्हणतो, पण तो पक्षी वर्गातला प्राणी नाही. त्याला पंख असतात, तो उडतो, तरीही तो पक्षी नाही. तो सस्तन प्राणी आहे.
वैज्ञानिकांना वटवाघुळात अजब गुण आढळून आले, वैज्ञानिक वटवाघुळाच्या मागं लागले. दोन वर्षापूर्वी जगभर थैमान घालणारा कोविड वटवाघुळाकडून माणसाकडं आला असं सांगितलं गेलं. वटवाघुळ आता एक प्रयोगशाळा झाला आहे.
६४ देशातले १३७ संशोधक वाघुळावर संशोधन करत आहेत. गेली दहाएक वर्षं संशोधन चाललंय.वाघुळांच्या १०३ प्रजाती आणि ४४ जीवाश्म संशोधक तपासत आहेत.
सस्तन प्राण्यांमधे वाघुळ प्रजाती २० टक्के आहे. सस्तन प्राण्यांमधे पहिल्या नंबरवर कोण आहे माहितेय? उंदीर. उंदीर व त्यांचे भाईबंदल ४० टक्के आहेत.
शहरात आपल्याला वाघुळं दिसत नाहीत. जी दिसतात त्यांच्याकडंही आपलं लक्ष नसतं, सगळी वाघुळं सारखीच वाटतात. ती सारखीच नसतात. वाघुळांच्या १७०० प्रजाती आहेत.
संशोधक वाघुळांच्या मागं कां लागलेत?
कारण वाघुळांची काही वैशिष्ट्यं अचाट आहेत, अद्वितीय आहेत.
वाघुळ ईबोला, कोरोना इत्यादी संसर्गाला दाद देत नाही. त्यांना संसर्ग जरूर होतो. विच्छेदन, तपासणी केल्यावर त्यांच्या पेशीत वरील संसर्ग सापडतो. पण त्या संसर्गाचे परिणाम त्यांच्यावर होत नाहीत. वाघुळं त्या विषाणूंसह सुशेगाद जगतात. विषाणू मापात रहातो. वरील व इतर अनेक विषाणू शरीरात बाळगून वाघुळ जगतं. वाघुळ संसर्गाचं वाहक होतं, त्यांच्यामुळं संसर्ग पसरतो.
वाघुळाला हे कसं काय जमतं? अभ्यासक म्हणतात की विषाणूला मारण्याची प्रतिरोधक शक्ती वाघुळाच्या पेशीत नसते. वाघुळाचं एकूण शरीर मिळून विषाणूचे परिणाम रोखतं. सभोवताली ईबोला असतो, वाघुळ तो शरीरात घेतो, त्या सकट जगतं. व्यवस्थित म्हातारं वगैरे होऊन मरतं. त्याची ही शक्ती कधी तरी माणसाच्या जिनोममधे वैज्ञानिक गुंफतील, अभ्यास करण्यापाठचा तो एक महत्वाचा उद्देश असणार.
अंगी नाना त्रास असूनही जगण्याची जगण्याची एक कला वाघुळानं विकसित केलीय. ती माणसाच्या अंगी बाणवण्याचा माणसाचा प्रयत्न आहे.
वाघुळाचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे प्रतिध्वनीच्या आधारे परिसरातल्या वस्तूंचं अस्तित्व समजून घेणं. वाघूळ ध्वनीलहरी सोडतं. त्या सभोतालच्या वस्तूंवर आदळून परततात, वाघुळ त्या ऐकतं आणि त्यातून हिशोब मांडतं. ती वस्तू किती अंतरावर आहे ते वाघुळाला कळतं. ती वस्तू टाळून, त्या वस्तूला वळसा घालून वाघुळ उडत जातं. वाघुळाचा प्रवास डोळ्यानं वस्तू पाहून होत नाही, प्रतिध्वनीवरून होतो. वाघुळ दिवसाही याच तंत्राचा वापर करून उडतं.
वाघुळ एकाच फ्रिक्वेन्सीच्या लहरी सोडत नाही. काही फ्रिक्वेन्सी वातावरणातली झाडं, पानं, खांब, भिंती इत्यादी गोष्टी दाखवतात. पण काही फ्रिक्वेन्सी आसपासच्या वरील गोष्टींपेक्षा एक वेगळा प्रतिध्वनी देतात, तो असतो कीटकांवरून आलेला. कीटक हे वाघुळाचं अन्न असतं. झाडं, भिंती, माणसं इत्यादींवरून येणाऱ्या प्रतिध्वनींपेक्षा वटवाघुळावरून येणारा प्रतिध्वनी वेगळा असल्यानं वाघुळ इतर ‘गोंगाट’ टाळून ‘भक्ष्य’ हेरतं. उडत असतांना झपकन कीटकावर झडप घालणं त्यामुळं वाघुळाला जमतं.
माणूस किंवा डोळ्यानं पहाणारे प्राणी समोरच्या वस्तूंचं विश्लेषण करतात, आपल्याला हव्या त्या लक्ष्याकडं वळतात, तसंच वाघुळ करतं. डोळे वापरून नव्हे, प्रतिध्वनी वापरून.
अजब मामला आहे.
वाघुळाच्या या कौशल्यातलं तत्व आधुनिक तंत्रज्ञानी अंगिकारलं आहे. हल्ली ड्रोन किंवा रॉकेट नेमक्या लक्ष्याकडं जातं. एकादी इमारत, त्यातला एकादा फ्लॅट, त्यातली नेमकी एकादी खिडकी आणि आतला नेमका एक माणूस हेरतात. इतर ‘गोंगाट’ टाळून अस्त्रं बरोब्बर ‘लक्ष्यापर्यंत’ पोचतं. हे वाघुळाचं तंत्रज्ञान आहे.
वाघुळाकडं एक नेतृत्वाचं तंत्रही आहे.
उडत असताना वाटेत इतर वाघुळं किंवा पक्षी येतात. वाघुळं थव्यानं प्रवास करतात, त्यात अनेक वाघुळं असतात. वाघुळ ध्वनी तंत्राचा वापर करून इतर वाघुळांच्या जागा हेरतं, वाटेतल्या वाघुळाला टाळून त्याच्या पुढं सरकतं.
अगदी सहज लक्षात येते ती धाव स्पर्धा. स्पर्धक इतर स्पर्धकांना मागं टाकून पुढं पळतात. स्पर्धकांना मारत नाहीत, टाळतात. स्पर्धक जवळ आला की तात्पुरता वेग वाढवणं आणि पुढं सरकणं. पुढं गेल्यानंतर वाढवलेला वेग टिकवून पळत रहाणं. ते जमलं तरच स्पर्धक जिंकतो. पळण्याची स्पर्धा जीवघेणी नसते. वाघुळ किवा प्राण्यांचं पळणं जीवघेणं असतं. शिकारी प्राणी पाठी लागलेला असतो, पळण्याचं गणीत चुकलं तर जीवच जायचा.
वटवाघुळाची ही वैशिष्ट्यं उत्क्रांत झाली की ती त्याच्यात जन्मापासूनच आलीत याचा अभ्यास वैज्ञानिक करत आहेत.
वैज्ञानिकांना जे काही सापडायचं ते सापडेल, जेव्हां केव्हां सापडायचं ते सापडेल. पण आजच माणसाला वटवाघुळाकडून शिकण्यासारखं खूप आहे हे खरं.
।।