एव्हरेस्टवर स्कीइंग
चित्रपट.
एव्हरेस्ट. द अदर साईड
दोन तासांचा माहितीपट. हिमालयातल्या मनस्लू आणि एव्हरेस्ट या दोन शिखरांची मोहिम या चित्रपटात आहे. पाचेक वर्षाची मेहनत आहे. एलिझाबेथ चाय आणि जिमी चिन या दोघांनी हा चित्रपट केलाय.
आयमॅक्स हे प्रभावी तंत्र वापरलंय. सुमारे १७ कॅमेरे. तीन मुख्य कॅमेरे, एक ड्रोनवरचा कॅमेरा आणि मोहिमेत भाग घेणाऱ्यांच्या अंगावरचे कॅमेरे. इतक्या वाटांनी चित्रीकरण झालंय.
अगदी सूक्ष्म तपशील हे कॅमेरे टिपतात. अशा चित्रीकरणासाठी तयार केलेले विशिष्ट कॅमेरे आणि लेन्सेसचा वापर झालाय. सणसणीत सूर्य प्रकाशातही लाईट वापरले आहेत. तीव्र प्रकाशातलं चित्रण ( वाळवंटं, बर्फ) हे कॅमेरे सुखकारक करतात. माणसाला जे दिसणार नाही ते हे कॅमेरे दाखवातात. परिणामी या चित्रपटात दिसलेला हिमालय पूर्वी कोणी पाहिलेला नाही.
हा चित्रपट नॉर्मल पडद्यावर पाहण्यासाठी नाही, विस्तृत आयमॅक्स पडदे-सिनेमाघर हवं. सेलफोनवरही तो पहाता येतो पण हिमालयाचं रौद्रविशाल रूप आयमॅक्स पडद्यावर दिसेल तसं इतर ठिकाणी दिसणार नाही.
चित्रपटात जिम मॉरिसन आणि हिलरी नेल्सन हे गिर्यारोहक जोडपं आहे. दोघेही धाडसी, मनस्वी आहेत. मरण पणाला लावतात. हिमालयात अत्यंत सरळ उंच पर्वतांवर आरोहण सर्वच करतात पण त्यावर स्कीइंग कोणी करत नाही. तीव्र उतार असलेल्या उतारावर स्कीइंग करणं म्हणजे मरणच. म्हणूनच या जोडप्याला त्या स्कीइंगचं आकर्षण. २०१८ साली त्यांनी ल्होत्से पर्वतावर स्कीइंगचा पराक्रम केला होता. एव्हरेस्टवर उत्तर बाजूनं आरोहण आणि स्कीईंग करायचं त्यांचं स्वप्न होतं. कारण ती बाजू अत्यंत कठीण आहे. त्या बाजूनं हिमालयाची चढण अनेक ठिकाणी साठ अंशाच्या कोनात आहे.
सराव करण्यासाठी त्यांनी २०२२ मधे हिमालयात मनस्लू शिखरावर चढाई केली. सोबत चिन आणि चाय यांची चित्रीकरण टीम होतीच. या मोहिमेत खाली उतरतांना एक ॲव्हलान्स आला. क्षणभरात नेल्सन बर्फात गाडली गेली. दुसऱ्या दिवशी तिचं थिजलेलं प्रेत मिळालं.
एव्हरेस्टवर उत्तरेकडून स्कीइंग करण्याचं मॉरिसन-नेल्सन यांचं आणि चिन व चाय यांचं स्वप्न अपुरंच राहिलं. मॉरिसनशी बोलून चिन आणि चायनी एव्हरेस्ट स्कीईंगचं चित्रण केलं. चित्रपटात मनस्लू आणि एव्हरेस्ट ही दोन्ही चित्रणं एकत्र केली आहेत. तसंच चित्रपट परिपूर्ण व्हावा यासाठी इतरही दृश्यं चित्रीत करण्यात आली आहेत.
उत्तर बाजूनं म्हणजे चीनच्या बाजूनं एव्हरेस्टवर जायला चीन परवानगी देत नाही. इतिहासात फक्त ५ जणांनी तो प्रयत्न केला होता. कष्टानं मॉरिसन आणि चिन-चायनी परवानगी मिळवली.
एव्हरेस्टची पहिली मोहिम खराब हवामानानं थांबवावी लागली. दुसऱ्या मोहिमेत एका शेर्पाचा पाय मोडल्यानं मोहिम स्थगीत झाली. तिसरी मोहीम मात्र पार पडली. मॉरिसन एव्हरेस्टवरून स्कीइंग करत करत पाच तासांनी बेस कँपला पोचला.
नेल्सनचा मृत्यू झाल्यानंतर तिचं दफन तिबेटमधे मॉरिसननं केलं होतं. काही राख त्यानं जपून ठेवली होती. ती एव्हरेस्टवर पसरली. त्याचं चित्रण. दोघंही तिबेटमधे, नेपाळमधे जात तिथं काही प्रसंगांचं चित्रण झालेलं होतं. चित्रपटात अशी हिमालयातल्या जीवनाचे पैलू दाखवणारी दृश्य मिसळण्यात आली.
नेल्सन ही मॉरिसनची दुसरी पत्नी. त्याची पहिली पत्नी केटी जॉन्सन. ती पायलट होती. मॉरिसन-केटीला दोन मुलं होती. एके दिवशी केटी मुलांना घेऊन विमानानं निघाली असताना विमानाला अपघात झाला आणि त्यात तिघांचाही मृत्यू झाला. मॉरिसनला फार तीव्र धक्का बसला. त्यातून सावरण्यासाठी त्यानं हिमालय आणि नेल्सन यांच्याशी दोस्ती केली. दुर्दैवानं नेल्सनही गेली. हा दुसरा धक्का. त्यातून बाहेर येण्यासाठी मॉरिसननं एव्हरेस्टवर स्वारी केली.
दिक्दर्शक जिमी चिन स्वतः धाडसी गिर्यारोहक आहे. पीएचडीची वाट सोडून विद्यार्थी दशेत तो पर्वत चढू लागला. त्याला छायाचित्रणाचा नाद होता. डोंगर चढत असताना तो त्यावर फिल्म करू लागला. तेच त्याचं करियर झालं.एलिझाबेथ चाय आणि जिम्मी चिन यांच्या फ्री सोलो या माहितीपटाला २०१९ साली ऑस्कर मिळालं होतं. ॲलेक्स होन्नॉल्ड हा गिर्यारोहक एक अत्यंत कठीण कडा चढून गेला होता त्यावर फ्री सोलो हा चित्रपट बेतलेला होता.
प्रस्तुत ‘एव्हरेस्ट द अदर साईड’ २०२६ च्या ऑगस्टमधे तयार झाला, आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखवण्यात आला. त्याला बक्षिसं मिळत आहेत. चित्रपट ऑस्करच्या रांगेत आहे.
चित्रपट करण्याच्या निर्णयाबद्दल मॉरिसन आणि दिक्दर्शक यांच्यावर टीका झाली. चित्रीकरण करणारी टीम आणि शेर्पा इत्यादींचे जीव धोक्यात घालणं अनैतिक होतं अशी टीका झाली. मॉरिसनचं दुःख ठीक आहे, दिक्दर्शकांची व्यावसायिकताही समजण्यासारखी आहे पण त्यासाठी इतक्या लोकांचा जीव पणाला लावणं बरोबर नाही असं काही समीक्षकांचं मत पडलं.
पण…मॉरिसन आणि दिक्दर्शक या प्रकरणात फार गुंतलेले होते. एका परीनं व्यावसायिकतेच्याही पलिकडच्या भावना गुंतलेल्या होत्या. तिघांनी चित्रपट ओढून आणला असं झालं नाही, तिघांनाही चित्रपटानं ओढून नेलं. तिघांच्या अनेक मुलाखती यू ट्यूबवर आहेत.त्या बोलक्या आहेत.म्हणजे तिघंही कमी बोलतात, फार चर्चा टाळतात.
काहीही असो. चित्रपट तयार झाला. एक ऐतिहासिक देखणा ऐवज तयार झाला.
पोस्टमन इन द माउंटन नावाची चिनी फिल्म काही वर्षांपूर्वी आली होती. आपल्याला बायजिंग आणि शांघाय दिसतं, तिथले उंच टॉवर दिसतात. त्या पलीकडचा चीन अत्यंत सुंदर आहे. तो चीन ‘पोस्टमनमधे’ दिसतो. पोस्टमनमधे एक कथानक आहे; दुर्गम भागात लोकांना घरोघरी पत्रं पोचवणारा एक पोस्टमन आहे. या पोस्टमनची रिटायर होण्याच्या आधीची शेवटली फेरी चित्रपटात आहे. उत्तम दृश्य, उत्तम कथानक, उत्तम भूमिका, मन हेलावून टाकणारा माणूस.
‘एव्हरेस्ट’ पहाताना ‘पोस्टमन’ची आठवण आली.
।।