सायबर ट्रकची गोष्ट

सायबर ट्रकची गोष्ट

मस्क यांच्या एका ‘अपत्याचा’ मृत्यू. 

सायबर ट्रक या वाहनाचं उत्पादन ईलॉन मस्क यांनी बंद केलं आहे. त्याची गोष्ट.

सायबर ट्रक म्हणजे सामान घेऊन जाता येईल अशी कार. पिकअप म्हणतात ना तसं वाहन. 

टेक्सासमधे ऑस्टिन या गावात सायबर ट्रकचा कारखाना  २०१९ साली   ईलॉन मस्क यांनी सुरु केला. दर वर्षी २.५ लाख वाहनांचं उत्पादन करणार होते.  ८० हजार डॉलरच्या आसपास किमत असणार होती.

२०२४ साली ३९ हजार सायबर ट्रक विकले गेले. २०२५ साली २० हजार आणि २०२६ साली १२ हजार ट्रक विकले गेले. उत्पादन सुरू झाल्यापासूनचा विक्रीचा नेमका आकडा आहे ७०,७८८. तीन वर्षात ७.५ लाख वाहनं बाजारात खपावी अशी अपेक्षा होती.  दोनेक अब्ज डॉलरचा तोटा झाला. मस्क यांची कंपनी नेमके आकडे देत नाही. किती गुंतवले, नेमके किती मिळाले, गुंतवणूक कशाकशावर झाली, खर्च कशाकशावर झाला याचे आकडे मस्क सांगत नाहीत. बाजारात उपलब्ध असणाऱ्या आकड्यांवरून हिशोब लावायचा.

बराच तोटा झाला. हा तोटा ज्यांनी मोठ्या आशेनं या कंपनीत पैसे गुंतवले होते त्यांचाही झाला. अनेकांच्या पेन्शनची रक्कमही नफा मिळेल या आशेनं या कंपन्यांत गुंतवलेली होती.

सायबर ट्रक ही सांस्कृतिक क्रांती आहे असं मस्क म्हणाले होते. बाजारात मर्सिडीझ, बीएमडब्लू, बीवायडी, पोर्श इत्यादी धनिकांनी वापराव्या अशा कार होत्या. त्याच किमतीत किमतीत एक विक्षिप्त कार आपल्याला विकायची आहे असं मस्क म्हणाले. धनिकांच्या कल्पनेला धक्का देण्यासाठी या कारचं डिझाईन तयार करण्यात आलं होतं. कारला तीव्र कंगोरे होते. सायफाय चित्रपटात परग्रहावरून पृथ्वीवरच्या लोकांचा नाश करायला येणाऱ्या वाहनांच्या रुपाशी सायबर ट्रकचं रूप मिळतं जुळतं होतं. कारचा पत्रा पोलादी होता आणि पोलादीच दिसावा असं त्याचं रुप होतं. सारं काही कुरुप.

अमेरिकेत मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या असतात.  अमेरिकन लोक त्यांना डंपस्टर म्हणतात. सायबर ट्रक त्या कचरा कुंडीसारखा होता.

लॉस एंजेलिसमधे कारचं उद्घाटन झालं. प्रकाश झोत, हिंदी फिल्ममधे रोमँटिक दृश्यात  हिरोहिरॉइनच्या सभोवताली असतं तसं धुकं स्टेजवर होतं. कार स्टेजवर आल्यावर कारच्या  काचेवर पोलादी गोळे आदळण्यात आले.  कार बुलेट प्रुफ आहे असं त्यांना दाखवायचं होतं. काचा फुटल्या. दुसरी कार आली, तिच्यावर गोळे फेकले, काचा  फुटल्या. मस्क   डगमगले नाहीत. म्हणाले ‘अजून सुधारणेला वाव आहे’. आपल्याला भविष्यात रणगाडा तयार करायचा आहे, त्याची तयारी आपण करत आहोत असं मस्क म्हणाले. प्रेक्षक चमकले. पण बोलणार कोण?

आपण जगावेगळे धनिक आहोत अशी हौस असणाऱ्या लोकांनी सायबर ट्रक खरेदी केला. एक माणूस या शक्तीवान कारची ताकद दाखवायची म्हणून पत्रकारांना बोलावून घेऊन समुद्राकाठच्या वाळूत गेला. गाडी अडकली. ॲक्सिलरेटरवर  पाय दाबला, गाडी हलेना, बंद पडली.  टोचनवाली क्रेन आणून कार बाहेर काढावी लागली. ॲक्सिलरेटरच्या या दोषामुळं अपघात होऊ शकतात. कार पुढल्या कारवर आदळू शकते.एका कारला अशा खटाटोपात आग लागली. कंपनीनं  ४ हजार ट्रक ग्राहकांकडून परत मागवले, दोष दुरुस्त करण्यासाठी.   कार पार्क करणं फार कष्टाचं असे. सायबर ट्रक पार करताना घडलेल्या कॉमेडी फिल्म सारख्या गोष्टींची रील्स लोकांनी सोशल मिडियावर टाकली. मस्क रागावले. उत्पादन तयार होताना चुका राहून जातात, विरोधक भांडवल करत आहेत असा आरोप मस्क यांनी केला.

  कार खपवण्यासाठी  मस्कनी डोनल्ड ट्रंप यांना हाताशी धरलं. एक मोठी सभा भरवली, लोकं गोळा केले, त्यात ट्रंपना बोलावलं. ट्रंपचं स्वागत करत असताना मस्कनी एक हात उंचावला. तो हिटलरच्या नाझी सॅल्यूटसारखा होता. जर्मनीतले लोक वैतागले. सायबर ट्रक खरेदी करू नका अशी मोहिम जर्मनीत लोकांनी चालवली. ट्रंप जर्मनीवरच  वैतागले. 

सायबर ट्रकचं डिझाईन कुरूप होतं. सायबर ट्रक आणि टेसला कार, दोन्ही विकण्यासाठी मस्कनी केलेली मोहीमही कुरूप होती. त्यांनी ट्रंपना हाताशी धरलं. ट्रंपच्या पार्टीचे उमेदवार निवडण्यासाठी अब्ज अब्ज डॉलर खर्च केले. लोकांना हे पसंत नव्हतं. लोकांनी कारच्या शोरूम समोर निदर्शनं केली. सरकारी खर्च कपात करणारं  एक अजब खातं ट्रंपनी निर्माण केलं, त्याच्या प्रमुख पदी ईलॉन मस्कना नेमलं. खर्चाची कपात म्हणजे करवत चालवणं अशी गावंढळ कल्पना करून मस्कनी मंचावर करवत चालवून दाखवली. हिंदीमधे फूहड असा शब्द आहे, त्यातला प्रकार.

एके दिवशी ट्रंपनी एक लाल रंगाची टेसला कार खरेदी केली. व्हाईट हाऊस समोर उभी केली. ‘एक ग्रेट कार मी माझ्या खिशातल्या पैशानं विकत घेतलीय. व्हाईट हाऊसमधे मी ती ठेवणार आहे. व्हाईट हाऊसमधले कर्मचारी ती वापरणार आहेत’ असं ट्रंपनी कॅमेऱ्यासमोर जगाला सांगितलं. मस्कचा हात गगनाला टेकले. ट्रंपना आपणच मोठं केलंय असं म्हणू लागले,   ट्रंपच्या यांच्या धोरणावर टीका करू लागले. परिणाम? एके दिवशी ती लाल कार व्हाईट हाऊसमधून नाहिशी झाली.  कुठं गेली, तिचं काय झालं? पत्ता नाही. मुळात त्या कारचे पैसे ट्रंप यांच्या खात्यातून गेले होते की नाही हेही कळत नाही. ट्रंपना प्रश्न विचारायचे नसतात. 

टेसलाचा खप कोसळला. सायबर ट्रक बंद पडला. अब्जांचा तोटा. ट्रिलियनचा खेळ करणाऱ्यांना अब्ज म्हणजे काहीच नाही.मस्कचं काय जातंय? त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्याकडं पैसे आहेत.ते मार्केटचा खेळ करू शकतात. ते नवी कंपनी काढतील, नवा प्रॉडक्ट काढतील. लोक येड्यासारखे त्यातही पैसे गुंतवतील.

मोठी माणसं. त्यांचं काय बॉ.

Comments are closed.