अरेबियन नाईट्स
अरेबियन नाईट्स.
लेखक केदार वैद्य
भारताच्या कानाकोपऱ्यातून विमानं गोव्याला जातात. गोव्याला जाणाऱ्या विमानात भारतातल्या सर्व भाषा कानावर पडतात. माणसं विमानात बसतात तिथपासून गोव्याला उतरेपर्यंत दंगा करत असतात. गोव्यात जायला निघतात तेव्हांच त्यांचा मूड बदलेला असतो.
गोवा म्हणजे मौजमस्ती असं समीकरण गोव्याबाहेरच्या लोकांनी जमवलेलं असतं. मस्ती करायला निघालेली ही माणसं गोव्याच्या किनाऱ्यावर जातात. तिथं स्वस्तात दारू मिळते. विचित्र कपडे घालून तिथं वाळूत आणि रस्त्यांवर फिरता येतं. महाग दारूत आंधोळ करू शकतील इतकी पैसेवाली लोकंही गोव्यात दारूची किंमत कमी असते म्हणून दारू पितात. मोठ्या आवाजात फडतूस गोष्टींची चर्चा करतात. स्थानिक बारमधे हुश्शारी मारत तिथले वेटर आणि मालक यांना कमी लेखत त्यांना ऑर्डरी सोडतात. तीन चार दिवसात आपापल्या घरी परततात.
गोंगाटी माणसांपासून दूरवर असणारी अनेक परदेशी माणसं किनाऱ्यावरच्या गोव्यात असतात. जगानं लादलेल्या जाचातून मोकळं होण्यासाठीही ही गोव्यात माणसं येतात. युकेमधून येतात, जर्मनीतून येतात, अमेरिका आणि इस्रायलमधून येतात, तुर्कियेतून येतात. महिनोनमहिने रहातात. निरहेतूक रस्त्यावर भटकतात. दारूचा ग्लास समोर ठेवून वाचत बसतात, गाणी ऐकतात, समुद्राकडं पहात बसतात. त्यांच्या मनात त्यांनी एक ठिकाण कल्पिलेलं असतं, ते ठिकाण म्हणजे गोवा असतं. हे गोवा आणि ही माणसं तीन दिवसांसाठी गोव्यात आलेल्या माणसांना दिसत नाहीत.
ही माणसं लेखकानं पाहिलीत, अनुभवलीत. ती माणसं केदार वैद्य यांच्या अरिबियन नाईट्स या पुस्तकात आहेत.
इमरोज नावाचा एक तारूण्याच्या काठावरचा माणूस. तुर्कस्तानातला. घरचा चांगल्या स्थितीतला. आर्किटेक्ट. त्याला फोटो काढण्याचा नाद. तुर्कस्तानातली राजकीय-सामाजिक स्थिती त्याला बोचते. सुस्थितीतल्या आई वडिलांना इमरोजनं ठरावीक समाजमान्य जगावं असं वाटत असतं. इमरोजला ते नको असतं. इमरोजला एक मित्रही असतो. दुर्घटनेत इमरोजचा मित्र मरतो. आधीच समाजाच्या जाचाला कंटाळलेला. त्यातून एकच असलेला तराफा निसटलेला. सैरभैर इमरोज मोटार सायकलनं आशियात येतो. त्याला मानसीक शांतता हवी असते. त्याच्या कानावर योग साधना असते. त्याच्या कानावर मठांची महती आलेली असते. तो गोव्यात पोचतो. तिथं त्याला शांतता लाभते.
लेखकानं इमरोजचं चित्र पुस्तकात रेखलंय.
डेविड. युकेतला. लंडनमधला. तोही शांततेच्या शोधात दलाई लामांकडं जातो. कर्नाटकातल्या मठाकडं जायला निघतो. शेवटी गोव्यात अगोंद किनाऱ्यावर स्थिरावतो.
सुझाना नावाची एक जर्मन युवती आहे. एयर होस्टेस आहे. दररोज ती शेकडो विमान प्रवासी पहात असते, माणसं कशी असतात याचा अनुभव घेत असते. बाहेरचं झगमगाटी, व्यापारी जग तिला सुखावत नाही. भारताबद्दल तिनं ऐकलेलं असतं. योग साधना. मेडिटेशन. गुरु. इत्यादी. तिला वाटतं की भोवतालच्या पश्चिमी जाचातून तिची सुटका भारतात होईल. गोव्यात पोचते. तिथं दारूचा आनंद घेत असताना तिच्या कानावर विपस्यना हे प्रकरण येतं. विपस्यनेच्या ‘जाचात’ जायचं ती ठरवते. निघते. वाटेत तिला ट्रेकिंगला निघालेला तरुणांचा ग्रुप भेटतो. ती ट्रेकला निघून जाते.
एक ॲनिसाही असते. युरोपीय. ती गोव्यात ‘घंदा’ करते. ड्रग विकते, लोकाना नादाला लावते, भडवेगिरीही करते. तिला गोव्याचा किनारा ही धंध्याची जागा वाटते.
लेखकानं अशी माणसं प्रस्तुत पुस्तकात मांडलीत.
ही माणसं किनाऱ्यावर रहातात. किनाऱ्यापासून दूरच्या गोव्यात जात नाहीत. गोवा सोडून भारतात जात नाहीत. कारण? उरलेला भारत हाही एक जाच असतो. त्या भारतात जात असते. त्या भारतात धर्म असतात. त्या भारतात भ्रष्ट नोकरशाही आणि पोलिटिकल लोकं असतात. ज्या गोष्टी त्याना त्यांच्या देशात छळत असतात, त्याच गोष्टी भारतात असतील तर त्यांनी भारतात कां जावं?
लेखकानं मार्टिन हॅरिस या युकेतल्या माणसाचं चित्र पुस्तकात काढलंय. चांगल्या घरातला ब्रिटीश. बेवडा झाला. घर सुटलं. क्षुल्लक कामं करून पैसे मिळवतो. कँपसाईटवर अगदी स्वस्त खुराड्यात रहातो. गोवात सहा महिने एक घर भाड्यानं घेऊन रहातो. अगदी साधं घर. माणसाच्या मुख्य गरजा मुळातच कमी असतात, त्या या घरात भागतात. दारू स्वस्त. रहाणं स्वस्त. त्याला कोणी त्रास देत नाही. तो कोणाला त्रास देत नाही.
मार्टिन हॅरिसवर लिहिताना लेखक म्हणतो की दिवसभर हुंदडणाऱ्या माकडांनाही रात्र झाल्यावर एक निवारा लागतो; विश्रांतीसाठी. मार्टिनला तो अगोंदमधे मिळाला.
गोंद गावात अरेबियन नाईट्स नावाचा एक बार आहे. तिथं रहायची सोयही आहे. तिथं येणाऱ्या पाच माणसांची चित्रं या पुस्तकात आहेत. या माणसांच्या भोवतालची माणसंही या पुस्तकात आहेत. लेखक या पात्रांमधे गुंतला आहे, पण फार नाही. ही माणसं उमटतात, नाहिशी होतात. लेखक त्यांचं नंतर काय झालं यात जात नाही. युरोप, अमेरिका, तुर्किये इत्यादी ठिकाणांच्या खोलात लेखक जात नाही. व्यक्तिचित्रं म्हणजे स्केचेस आहेत. स्केच बऱ्याच गोष्टी सांगतं. स्केच हे पेंटिंग नसतं. दोन शैली वेगळ्या असतात. दोन्ही शैलींची स्वतंत्र वैशिष्ट्यं आहेत. स्केचेस पटापट सरकतात, वाचताना वाचकाला गुंतवतात. लेखक त्यातून फिलॉसफी वगैरे सांगत नाही. तेही बरंच आहे म्हणा. तो भाग वाचकाचं मैदान असतं.
लेखक मूळ मुंबईचा. अगोंदच्या प्रेमात पडून लेखकानं तिथं घर बांधलं, तिथं लेखक वसला. त्या खटाटोपात तो अरेबियन नाईट्समधे पोचला. त्या बारमघे काऊंटरपासून वेटरपर्यंतची कामंही लेखकानं केली. बार मालकाच्या मैत्रीखातर. अगदी सहजपणे मदतीचा हात पुढं करण्याचा लेखकाचा स्वभाव असल्यानं लेखक माणसांत गुंतत गेला. गुंतलाही आणि त्या माणसांवर लिहिता यावं इतकं अंतरही लेखकानं ठेवलं. पुस्तकाच्या शैलीत ते लक्षात येतं.