ट्रंपनी गाजवलेली (गाझवलेली) शांतता कुठाय?

ट्रंपनी गाजवलेली (गाझवलेली) शांतता कुठाय?

 डोनल्ड ट्रंप भाषण मारतात, जग डोलतं, पुढं काही होत नाही. ट्रंप नवं भाषण करतात, पुन्हा जग डोलतं, काहीही होत नाही. युक्रेन युद्ध थांबवलं म्हणाले, युद्ध सुरुच आहे.

गाझा युद्ध स्थगितीचं उदाहरण घ्या.

गाझा युद्ध स्थगित झाल्याची घोषणा डोनल्ड ट्रंप यांनी २५ जानेवारी २०२६ रोजी गेली. 

ठरलं असं. युद्ध थांबल्यावर हमास शस्त्रं टाकेल; इस्रायलची सेना सुरवातीला ५३ टक्के गाझामधून सैन्य मागं घेऊन पूर्ण माघारीची पावलं उचलेल; एक कारभारी मंडळ स्थापन होईल; हे मंडळ गाझाच्या भविष्याची आखणी करेल; एक शांतता मंडळ स्थापन होईल व ते मंडळ गाझाचा विकास करेल. यथावकाश इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन देश स्थापनेचा विचार केला जाईल.

शांतता मंडळाला (पीस बोर्ड) युनायटेड नेशन्सनं आशिर्वाद दिला खरा पण हे मंडळ स्थापन केलं डोनल्ड ट्रंप यांनी. ट्रंप यांचे जावई कुश्नर, ट्रंप यांचे बिझनेस पार्टनर स्टीव  विटकॉफ, परराष्ट्र मंत्री रुबियो इत्यादी मंडळी या बोर्डात होती. १९ फेब्रुवारी रोजी ट्रंपनी व्हाईट हाऊसमधे शांतता मंडळाची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी जाहीर केलं की गाझाचा पुनर्विकास करण्यासाठी ७० अब्ज डॉलरची योजना असेल आणि सुरवातीला श्रीमंत अरब देश १७ अब्ज डॉलर या विकास फंडाला देतील. 

ट्रंप यांनी जाहीर केलं की या विकास मंडळाचे सदस्य होण्यासाठी देशांना किंवा व्यक्तीना प्रत्येकी १ अब्ज डॉलरची फी द्यावी लागेल. गणित असं की चाळीस पन्नास देश मिळून ५० अब्ज डॉलर देतील. त्यात अमेरिका आणि अरब देश भर घालून ७० अब्जाचा आकडा गाठतील.

हे आकडे आले कुठून? ट्रंपनी कोणाशी चर्चा केली होती? कोणाशीही नाही. अरब देशाचे प्रमुख म्हणाले की त्यांच्याशी सल्ला मसलत न करता वरील आकडे ट्रंपनी जाहीर केले आहेत. मुळात ७० अब्जांचा आकडा कुठून आला तेही कळत नाही. ट्रंप नुसते बोलत सुटले होते.

व्हाईट हाऊसमधे शांतता मंडळाची बैठक झाली आणि लगोलग काही दिवसात अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ले सुरु केले. तसंच इस्रायलनंही गाझावर हल्ले सुरु केले. गाझात युद्ध स्थगिती झाली असूनही इस्रायल हल्ले करत सुटलं.

शांतता मंडळाचं सदस्य कुठल्या कुठल्या देशांनी स्वीकारलं, किती देशांनी पैसे दिले? अमेरिकन सरकार, व्हाईट हाऊस, डोनल्ड ट्रंप कोणतीही माहिती देत नाहीत. युरोपातले देश, चीन आणि रशिया, जपान-कोरिया-ऑस्ट्रेलिया इत्यादी कोणताही देश ट्रंप यांच्या शांतता मंडळात गेला नाही, त्यांनी मंडळाला पैसेही दिले नाहीत.

इजिप्त, तुर्किये, सौदी, कतार, अमिराती इत्यादी देश म्हणत होते की गाझात शांतता स्थापन झाल्यानंतरच ते पैसे घालायला तयार होतील. गाझामधे शांतता होतच नव्हती कारण युद्ध स्थगिती करार झाल्या दिवसापासूवन इस्रायलनं गाझावर हल्ले सुरु केले. स्थगिती करारानुसार हमासनं शस्त्रं खाली ठेवायची होती आणि हमासला राज्यकारभारात सामिल करून घ्यायचं होतं. पण हमासचं म्हणणं होतं की इस्रायल एका बाजूनं ठोकाठोकी करत रहाणार असेल तर हमासनं तरी शस्त्रं खाली कां ठेवायची? गाझामधे शांतताच स्थापित होत नसल्यानं अरब देशांनी पैसे द्यायला नकार दिला.

परिणाम असा की शांतता मंडळाकडं एक खडकूही नाहीये, १७ अब्ज आणि ७० अब्ज वगैरेचा प्रश्नच येत नाही. शांतता मंडळही स्थापन झालेलं नाही. ६ महिने होऊन गेले, गाझा विकासाबाबत विकास या शब्दातला विसुद्धा कागदावर उमटलेला नाही. बल्गेरियाचे मुत्सद्दी निकोलाय म्लादेनोव यांना शांतता मंडळाचं प्रतिनिधित्व करायला सांगण्यात आलं. युनायटेड नेशन्सच्या संबंधित कमीटीनं म्लादेनोव्हना बोलावलं आणि गाझाचा विकास कुठवर आलाय याची  विचारणा केली. म्लादेनोव काय सांगणार?

युद्ध एकतरफी होतं. इस्रायलचं आधुनिक बलाढ्य सैन्य हमासच्या अगदी अशक्त सैन्याला कुटून काढत होतं. तोफ विरुद्ध पिस्तूल अशी लढाई होती.इस्रायलला युद्ध थांबवायचं नव्हतं. जगाच्या आणि अमेरिकेच्या दबावाखाली इस्रायलनं युद्ध थांबवलं होतं. युद्ध थांबलं तेव्हां गाझाच्या ५३ टक्के जमिनीवर इस्रायलचं सैन्य पसरलेलं होतं. स्थगितीला सहा महिने झाले, त्या काळात इस्रायलनं ६० टक्के गाझा व्यापलं. मे महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात नेतान्याहू यांनी सैन्याला आदेश दिला की सैन्यानं ७० टक्के गाझा ताब्यात घ्यावं.

जगानं मनगटाला चुना लावून बो बो करत बोंबा मारत बसावं, इस्रायल पुढल्या काही महिन्यात ९० टक्के गाझा व्यापून टाकेल.

युनोचा रीपोर्ट सांगतो की गाझातल्या ८५ टक्के इमारती नष्ट तरी झाल्यात किंवा दुरुस्ती अशक्य आहे इतक्या मोडलेल्या आहेत. गाझाभर सुमारे ७ कोटी टनांचा राडारोडा जमा झाला आहे आणि त्याच राड्यात अनेक न फुटलेले बाँब आणि सुरुंग लपलेले आहेत. 

इस्रायलनं व्यापलेल्या ६५ टक्के जमिनीवर आता एकही पॅलेस्टिनी शिल्लक नाही अशी खबर आहे. जमीन निर्मनुष्य झालीय, तिथं लवकर ज्यू लोकांच्या वस्त्या उभ्या रहायच्या आहेत. इस्रायलच्या प्लॅननुसार जेमतेम १० टक्के जमिनीवर पॅलेस्टिनी जीव मुठीत धरून राहू लागतील, उरलेला सर्व गाझा वास्तवात इस्रायल झालेला असेल.

कुठाय शांतता मंडळ? कुठे आहेत ७० अब्ज डॉलर? कुठे आहे ट्रंप आणि जावयाचा रिव्हियेरा?

इस्रायल आणि अमेरिका जगाला गंडवतंय. वेस्ट बँकची ७० टक्केपेक्षा जास्त जमीन इस्रायलनं आधीच घेतलेली आहे. जग बसलंय ठणाणा करत. लेबनॉनही इस्रायल बळकावतंय.गाझा इस्रायलच्या ताब्यात जाईल. तिथं ट्रंप, कुश्नर, विटकॉफ, अल थानी, महंमद बिन सलमान यांचे टॉवर आणि कसिनो उभे रहातील.

ट्रंप बोलतात एक, त्यांना करायचं असतं दुसरंच काही तरी.

।।

Comments are closed.