लोकसंख्या-श्रीमंतीतली समस्या. जपान. स्वित्झर्लंड.
जपानची लोकसंख्या घटतेय. १० वर्षांपूर्वी जपानमधे १२ कोटी ६० लाख लोक होते. यंदा ती संख्या १२ कोटी ३० लाख झालीय.
जेवढी माणसं मरतात तेवढीच जन्माला आली तर समाजाचं गाडं ठीकठाक चालू शकतं. मृतांपेक्षा जन्मणारी जास्त झाली की लोकसंख्या वाढीचं संकट उभं रहातं.
साधारणपणे नागरिकांची संख्या संतुलित रहाण्यासाठी सरासरी स्त्रीनं सरासरी २.१ मुलांना जन्म दिला पाहिजे. जपानी सरासरी स्त्री सरासरी १.१ ते १.५ मुलांना जन्म देते. त्यामुळं माणसांची संख्या कमी होत चाललीय.
असं का होतंय?
जपान श्रीमंत देश आहे. श्रीमंतीची सवय जपानला झालीय.
श्रीमंती यायची तर एकूण उत्पादन वाढायला हवं, दर माणशी उत्पादन वाढायला हवं. आताशा घाम गाळावा लागत नाही. यंत्रं काम करतात. पण यंत्रही कोणी तरी चालवायला हवीत. आता यंत्रही यंत्रंच चालवतात. सारी यंत्रं तयार करायलाही माणसं लागतात. डेटा हे जीवन झालंय. पण तो तयार करायला आणि वापरायलाही माणसं लागतातच. नवी तंत्रं आल्यापासून घाम गळत नाही, हातपाय हलत नाहीत, पण मेंदू फार पळतो. मेंदू थकतो.
जपानला श्रीमंती टिकवायची असेल तर मेंदू फार पळवावा लागतो. मेंदू हीच समस्या झालीय.
अमूक इतक्या वस्तू अमूक वाजून अमूक मिनिटापर्यंत तयार झाल्या पाहिजेत. तमूक मिनिटांनी त्या ट्रकवर चढल्या पाहिजेत. तमूक मिनिटानं त्या बोटीवर वा विमानात गेल्या पाहिजेत. तमूक तासाला त्या ढमूक देशात पोचल्या पाहिजेत. एकाही बिंदूवर दिरंगाई झाली तर खल्लास, पगार कपात नाही तर नोकरी गेली. टार्जेट गाठताना प्रचंड टेन्शन असतं.
जपानी माणसं टेंशनमधे असतात. त्या नादात सेक्सचा विचारली करायला वाव नाही. मुलं, शिक्षण, त्यांचे आजारपाजार, घर चालवणं इत्यादी गोष्टीना वेळ उरत नाही, मनस्थिती टिकत नाही. मूल नको. पुरुषांना आणि स्त्रियांना.
लैंगिक गरज कधी कधी भासते. त्यासाठी आता उत्तम आणि सुंदर साधनं (अगदी सशरीर) उपलब्घ आहेत. टेंशन घालवण्यासाठी दारू तर आहेच.
मुद्दा असा की मुलं कमी होतात, प्रजा वाढत नाही. समाज म्हातारा होतोय. पैसे कमावणारे आणि कर देणारे तरुण कमी; न कमावता जगणारे म्हातारे जास्त.
हे सगळं ठीक आहे. पण शेवटी कामावर जायचं तर ट्रेननं जावं लागतं आणि ट्रेन चालवायला मोटरमन लागतो. विमान आणि बोट चालवायला आणि मॅनेज करायला माणसं लागतात. पोलिस लागतो. डॉक्टर आणि नर्स लागते. शिक्षक लागतो. तुंबलेलं ड्रेनेज साफ करायला आणि घरऑफिसमधली वीज व्यवस्था नीट करायला माणूस लागतो. ती कुठून आणायची?
एकेकाळी अमेरिका,इंग्लंड, जर्मनी इत्यादी देशांनी ती माणसं बाहेरून आणली. आता ती बाहेरची ‘वेगळी’ माणसं आणि देशातली ‘आपली’ माणसं यांच्यात जीवघेणा तणाव निर्माण झालाय.
जपानी समाज फार परंपरावादी आहे, फार म्हणजे फारच. तिथं ‘ वेगळा’ माणूस टिकणं कठीण.
काय करायचं? जपान चिंतेत आहे.
अगदी उलट समस्या आता स्वित्झर्लंडसमोर आहे. स्विस लोकसंख्या ९५ लाख आहे. स्वित्झर्लंड श्रीमंत देश आहे. स्वित्झर्लंडचं इन्फ्रास्ट्रक्चर ९५ लाखांची भूक आणि गरज भागवू शकत नाहीये.
घरं, ट्रेन, विमानतळ, रस्ते, हॉटेलं, मद्यालयं इत्यादी उभारण्यासाठी झाडं तोडावी लागत आहेत, सुंदर सरोवरं बुजवावी लागत आहेत, सुंदर हिमाच्छादित डोंगर पाडावे लागत आहेत. रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होतोय. ट्रेनमधे बसायला जागा मिळत नाही. मद्यालयातला कलकलाट वाढलाय. कारण माणसं वाढलीत, त्यांना सांभाळण्याची व्यवस्था कोलमडलीय. स्विस माणूस वैतागलाय.
५२ टक्के स्विस जनतेनं आता लोकसंख्येवर मर्यादा घाला अशी मागणी केलीय. २० पर्यंत स्वित्झर्लंडची लोकसंख्या १ कोटीवर थांबवा. स्वित्झर्लंडमधे दुनियाभरचे लोक स्थलांतरीत होतात कारण स्वित्झर्लंड हा भूलोकातला स्वर्ग आहे. इथून पुढं एक माणूस बाहेरून आला तर बदल्यात एक माणूस बाहेर घालवा, तसा कायदा करा, असं स्विस माणूस म्हणतोय.
जपानची लोकसंख्या ३० लाखानं कमी झाली ही जपानची चिंता, त्याच काळात लोकसंख्या ३० लाखांनी वाढली ही स्वित्झर्लंडची चिंता.
जे लोक आधीच स्वित्झर्लंडमधे स्थायिक झालेत त्यांच्याबद्दलही स्विस लोक नाराज आहेत. मूळ स्विस लोकांपेक्षा बाहेरून आलेले फ्रेंच वरचढ होत आहेत अशी त्यांची तक्रार आहे. स्विस पर्वतावर आणि मद्यालयात फार भाषा बोलल्या जातात, स्विस माणसाचे कान गोंधळले आहेत.
स्विस लोकांना माणसं नकोत कारण ती धरणीला भार होतात. स्विस लोकांना बाहेरची माणसं नकोत कारण ती स्थानिक संस्कृती बिघडवतात.
स्वित्झर्लंड असो की जपान, समस्येचं रूप समान आहे. समाजाचं इन्फ्रा स्ट्रक्चर आणि त्यावर जगणारी माणसं.
प्रवासी इतके झालेत की बसमधे ते मावत नाहीत.
बस मोठी करा किंवा इच्छुकाला तिकीट देऊ नका, बसमधे घेऊ नका.
समस्या अशी की बस मोठी करणं जमत नाहीये आणि प्रवाशाना मज्जाव करणंही जमत नाहीये.
दोन्ही समस्या एकत्र आल्यात.
जर्मनीत जपानसारखीच स्थिती. माणसं कमी पडतात म्हणून जर्मनीनं अरब देशातली माणसं घेतली. आता जर्मन लोक म्हणतात की ही अरब माणसं हीच समस्या आहे. जर्मनी त्यांना हाकलून द्या म्हणू लागलीय.
लोकांना मुळातच आपल्या गरजा कमी कराव्या लागतील. गरजा इतक्या वाढल्यात की त्या पूर्ण करण्यासाठी पृथ्वीची वाट लावावी लागतेय. पण त्यानंही भागत नाही. कारण अगदी बेसिक गरजाही न भागलेल्यांची पृथ्वीवरील संख्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे. इतकी माणसं वाईट अवस्थेत असतील तर जग शांततेत चालणं शक्य नाहीये.
कल्पकतेनं नव्या वाटा शोधाव्या लागतीलसं दिसतंय.
।।