रविवार. ट्रंप खटल्याचं नाट्य

रविवार. ट्रंप खटल्याचं नाट्य

न्यू यॉर्कच्या कोर्टात अमेरिकेचे माजी प्रेसिडेंट आणि आजी उमेदवार डोनल्ड ट्रंप यांच्यावर निवडणूक कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून खटला सुरू झालाय.

अमेरिकेत ज्यूरी असते. त्यांचा निर्णय निर्णायक ठरत असतो. मतदार यादीतून आणि कार चालवण्याच्या परवाना यादीतून ज्युरर निवडले जातात, रँडम पद्दतीनं. ज्यांची नावं येतील त्यांना न्यायालय बोलावतं, त्यांची चाचपणी करतं आणि खटल्याच्या हिशोबात ते निःपक्षपाती आहेत याची खात्री केली जाते. फिर्यादी आणि बचाव या दोन्ही पक्षाचे वकील या यादीची कसून तपासणी करतात, ज्युरर पक्षपाती असू नयेत अशी अपेक्षा असते. 

एक संभाव्य ज्यूरर स्त्री. तिच्या लहानपणी ट्रंपमय होती, ट्रंप हा तिचा आदर्श होता, ट्रंप टॉवर या हॉटेलात कधी तरी आयुष्यात रहायचं असं तिचं स्वप्न होतं.नंतर ट्रंपनं केलेले उद्योग पाहिल्यावर ती ट्रंपविरोधी झाली होती. न्यायालयानं तिला ज्युरर करायला नकार दिला.

एक स्त्री फॉक्स न्यूज, ट्रंपच्या मुलाखती पहात असे. तिला वाटत होतं की खटले भरून ट्रंपवर अन्याय केला जातोय. न्यायालयानं तिला नकार दिला.

न्यू यॉर्कमधला एक शेफ. तो म्हणाला की तो टीव्हीवर फक्त फूड शो बघतो, त्या पलिकडचं त्याला कळत नाही. निवडणुकीच्या बातम्या सर्रकन त्याच्यासमोरून सरकतात.त्याचं राजकारणाबाबत खास असं कोणतंच मत नाही. न्यायालयानं त्याला स्वीकारलं.

एक स्त्री न्यायालयानं निवडली. ती आपणहूनच म्हणाली की केस फार गुंत्याची आहे, माझ्यावर खूप मानसीक दडपण येईल, ते मी हाताळू शकणार नाही, मला नका निवडू.

ज्युरी तयार करायला  खूप दिवस लागले. कोर्टात येण्यापूर्वी न्यायालयानं त्यांना नियम सांगितले. त्यांनी ट्रंप, खटला इत्यादीबद्दल काहीही वाचायचं नाही;कोणाशी चर्चा करायची नाही; खटल्याशी संबंधित कोणाही माणसाशी संपर्क करायचा नाही; इतर ज्युररशीही संपर्क/चर्चा करायची नाही असं सांगण्यात आलं, तसं केलत तर शिक्षा होईल अशी तंबी देण्यात आली.

एका ज्यूररची तपासणी, निवड चालली असताना कोर्टाबाहेर एक माणूस हातात फलक घेऊन उभा होता. धनाढ्य एविल (दुष्ट ) असतात असं फलकावर लिहिलं होतं. कोणाही विशेष धनाढ्य व्यक्तीचा उल्लेख फलकावर नव्हता. पोलिस त्या माणसाच्या आसपास घोटाळत होते. तो माणूस ट्रंपचा धिक्कार करतोय की आणखी कोणाचा ते पोलिसांना कळत नव्हतं, पोलिस गोंधळले होते. या माणसानं स्वतःच्या अंगावर एक द्रव शिंपडला, काडी लावली. हां हां म्हणता त्याला आगीनं वेढलं. पोलिसांनी आग कशीबशी आटोक्यात आणली, त्याला हॉस्पिटलात नेलं. हॉस्पिटलात पोचेस्तोवर तो मेला होता.

सेंटर स्ट्रीटवरच्या १७ मजली इमारतीत १५ व्या मजल्यावरच्या कोर्टात खटला चालला आहे. ही अख्खी इमारत कोर्टांनी भरली आहे. १५ व्या मजल्यावर अनेक कोर्ट होती पण ट्रंपच्या कोर्टात येवढी गर्दी होते की इतर कोर्टं बंद करावी लागलीत. कोर्ट, कोर्टाची इमारत ही पोलिसांची मोठ्ठी डोकेदुखी आहे. दंगल नियंत्रित करणारे, सिक्रेट पोलीस, प्रेसिडेंटचे सिक्रेट सर्विस पोलिस असे मिळून हजारभर लोक पोलिसांनी कामाला लावलेत.

येवढं करूनही ट्रंपना मागल्या दारानं कोर्टात आणतात, एका इतर कोणालाही वापरायला परवानगी नसलेली खास लिफ्टनं ट्रंपना १५ व्या मजल्यावर आणतात, एका खास खोलीत त्यांना ठेवलं जातं आणि अगदी आयत्या वेळी कोर्टात हजर केलं जातं.

ट्रंपच्या बाजूनं आणि विरोधात निदर्शनं करायला लोक जमतात. त्यांना सांभाळणं, कोर्टापासून दूरवर नेऊन उभं करणं, किंवा अटक करणं असा उद्योग करावा लागतो. कोर्टाच्या आपसपासचे सर्व रस्ते पोलिस वाहतुकीला बंद करतात, शहरातल्या लोकांची फार अडचण होते. 

कोर्टातून बाहेर पडताना ट्रंप बिनधास्त पत्रकारांना भिडतात. दणादण कोर्टावर, न्यायाधिशांवर टीका करतात. न्यायाधीश पक्षपाती आहेत, ते माझ्या विरोधात असल्यानंच त्यांना हा खटला देण्यात आलाय असं बिनधास्त बोलतात. त्यांचं हे वर्तन न्यायालयाचा अपमान करणारं आहे असं न्यायाधिशांनी वारंवार सांगूनही ट्रंपवर त्याचा परिणाम होत नाही. एकदा न्यायालयानं त्यांना दंडही ठोठावला.   ट्रंपांच्या या आयत्या वेळी घेतलेल्या, न ठरलेल्या पत्रकार परिषदा हाताळणं ही एक मोठ्ठी समस्या पोलिसांसमोर असते.

१९३८ साली बांधलेल्या या इमारतीनं अनेक नामांकित खटले पाहिलेत. आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) चे अध्यक्ष डॉमिनिक स्ट्रॉस कान यांना पोलिसांनी याच कोर्टात उभं केलं होतं. ते फ्रान्सचे प्रेसिडेंट होऊ घातले होते. नाणे निधीच्या बैठकीसाठी न्यू यॉर्कला आले होते, एका हॉटेलात मुक्कामाला होते. तिथं काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यानं पोलिसांत तक्रार केली की कान यांनी तिच्यावर बलात्कार केला, तिच्याशी गैरवर्तन केलं. झालं. कान या कोर्टात हजर. त्यांना याच कोर्टानं शिक्षा दिली. परिणामी त्यांचं अध्यक्षपद हुकलं.

१९८९ मधे न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कमधे त्रिशा मेली या स्त्रीवर बलात्कार झाल्या प्रकरणी चार तरुणांना या कोर्टानं जन्मठेपाची सजा दिली होती. नंतर याच कोर्टानं २००२ साली त्या तरुणांना निर्दोष ठरवलं आणि ४.१ कोटी डॉलर्सची भरपाई देऊन सोडलं.

खटला आणि गुन्हा काय आहे?

स्टॉर्मी डॅनियल्स या एका प्रौढांच्या सिनेमात काम करणाऱ्या मादक स्त्रीला २०१६ साली कोहेन या वकिलांनी ट्रंप यांच्या वतीनं १.३० लाख डॉलर दिले. तसंच प्लेबॉय मॅगझीनमधील मॉडेल केरन मॅकडुगल हिलाही (किती?) पैसे देण्यात आले होते. दोघींशीही ट्रंप यांचे सेक्स संबंध होते आणि त्या संबंधांची वाच्यता त्यांनी करायची नाही या साठी हे पैसे देण्यात आले होते. त्या वेळी ट्रंप प्रेसिडेंटपदाची निवडणुक लढवत होते. ( त्यांनी हिलरी क्लिंटन यांना हरवून निवडणुक जिंकली. हिलरीचे पती प्रेसिडेंट बिल क्लिंटन यांनी त्यांच्या सहकारी तरुणीशी चावटपणा केल्याच्या प्रकरणाचा खूप वापर ट्रंप यांनी केला!)

हे पैसे निवडणुकीसाठी गोळा केलेल्या फंडातून दिले असा आरोप आहे. फंडाचा हा वापर निवडणुक कायद्यानुसार गंभीर गुन्हा मानला जातो.

या खटल्याची गंमत अशी हा सारा खोटारड्यांचा मामला आहे. 

आपले सेक्स संबंध नव्हतेच असं ट्रंपनी म्हटलंय. 

आपण फंडातून पैसे दिले नाहीत, स्वतःच्या पदरचे पैसे दिलेत असं कोहेन पहिल्यांदा म्हणाले. नंतर त्यांनी सांगितलं की आपण खोटं बोललो, आपण फंडातूनच पैसे दिलेत. ते न्यायालयात एक बोलले, काँग्रेससमोर दुसरंच बोलले. ट्रंप म्हणतात की कोहेन खोटारडे आहेत. सध्या कोहेन हे माफीचे साक्षीदार आहेत. 

स्टॉर्मी डॅनियल्सनं प्रथम आपले ट्रंपशी संबंध नव्हते असं जाहीर केलं. नंतर म्हणाली की संबंध होते पण आपण कायद्यानं बांधले गेल्यानं संबंध नसल्याचं जाहीर केलं. 

  ट्रंपचे वकील म्हणतात की डॅनियल्स, कोहेन, ट्रंप असे सगळेच खोटारडे आहेत अशा परिस्थितीत त्यांची साक्ष खरी कशी मानायची, त्या आधारे खटला कसा चालवायचा? 

फिर्यादी पक्षांचं म्हणणं की साक्षीत विसंगती असल्या, साक्षी फिरवण्यात आल्या असल्या तरीही शेवटी कागदोपत्री असलेले पुरावेच न्यायालय मन्य करतं. तसे कागदोपत्री पुरावे फिर्यादींकडं, पोलिसांकडं आहेत. 

ट्रंपचे वकील कागदोपत्री पुरावे आणि कोर्ट-काँग्रेसमोरची निवेदनं यातल्या विसंगतीवर भर देऊन गोंधळ घालतील.

थोडक्यात असं की कोर्टात तुंबळ युद्ध चालणार आहे.

गंमत अशी की खटला सुरु असताना ट्रंप प्रचार मोहिम धडाक्यानं चालवत आहेत.खटल्याचा उपयोग करून घेत आहेत. खटल्यात दंड होतोय, खर्च होतोय, तो जनतेनं आपल्याला द्यावा अशी मागणी करून लोकांकडून पैसे गोळा करत आहेत. धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी सरकारची अवस्था झालीय.

खटल्याचा निकाल काय लागेल ते सांगता येत नाही पण बहुदा कायदा भंगाचा आरोप सिद्ध होऊन ट्रंप यांना शिक्षा होईल. ही शिक्षा कोणती असेल ते सांगता येत नाही. तुरुंगवास/दंड या पैकी दोन्ही गोष्टी की एकच गोष्ट ठरेल ते सांगता येत नाही. मुख्य म्हणजे शिक्षा झाल्यावर त्यांना निवडणुक लढवता येईल की नाही?  समजा निवडणुक लढले\जिंकले तरी त्याना राष्ट्रपतीपद भोगता येईल की नाही? तेही कळत नाही कारण या मुद्द्यावर राज्यघटनेत कोणतीही तरतूद नाही. 

लोचा असा की राष्ट्रपतीपद हे राज्यघटनेनं ठरवलेलं पद असल्यानं राष्ट्रपतीला काम करण्यापासून कोणीही वंचित ठेऊ शकत नाही असं राज्यघटना म्हणते. म्हणजे समजा राष्ट्रपतीनं अगदी खूनही केला तर त्या बद्दल कदाचित त्याला शिक्षा होईल पण शिक्षा भोगत असतानाही ती व्यक्ती राष्ट्रपतीपदाची कामं करू शकेल; असं काही वकीलांचं म्हणणं आहे.

अमेरिकेच्या इतिहासात इतके, इतक्या विविध प्रकारचे गुन्हे केलेला दुसरा राष्ट्रपती नाही. राज्यघटनाही उलथवून टाकायचा ट्रंप यांचा इरादा प्रसिद्ध आहे. कुठूनही कशीही मतं गोळा करा आणि मला जिंकवा असा आदेश त्यांनी गव्हर्नरांना दिला होता. ट्रंपनी भक्तांना चिथवून संसदेवर हल्ला करण्यासाठी पाठवलं होतं.

आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, आपण जे काही केलं ते अमेरिकेच्या हितासाठीच,  आपल्यावरचे सर्व खटले खोटे आहेत, तो  आपला राजकीय छळ आहे असं ट्रंप यांचं म्हणणं आहे.

असं आहे अमेरिकेचं राजकारण.

घ्या भडंग.

।।

Comments are closed.