Browsed by
Month: September 2016

अमेरिका अशी(ही) आहे. काळे गोरे दरी.

अमेरिका अशी(ही) आहे. काळे गोरे दरी.

 अमेरिका हा जगातला सर्वात श्रीमंत देश. अमेरिकेचं सैन्य जगात सर्वात प्रभावी. जगातल्या हुकूमशाह्या, कम्युनिष्ट राजवटी, अमानवी कृत्यं करणाऱ्या राजवटी इत्यादी नष्ट करणं हा अमेरिकेचा आवडता उद्योग. स्वतःच नेमून घेतलेले जगाचे पोलिस. अशी ही अमेरिका अध्यक्षीय पद्धतीनं चालते. मतदार थेट मतदान करून अध्यक्षाला निवडतात. अध्यक्षाचं स्वतःचं मंत्रीमंडळ असतं. देशाच्या सेनेचा तो कमांडर इन चीफ असतो. तो संसदेसमोर जात नाही, तो संसदेला जबाबदार नसतो. त्यानं घेतलेले निर्णय संसद तपासत असते, त्याचे निर्णय मंजूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. त्यानं मांडलेलं बजेट नामंजूर करून देशाचा आर्थिक कारभार थांबवून ठेवण्याचा अधिकार संसदेला असतो. संसद अध्यक्षाची चौकशी करून त्याला हाकलू  शकते, तुरुंगात पाठवू शकते. न्याय व्यवस्थाही स्वतंत्रपणे अध्यक्षाची चौकशी करून त्याला शिक्षा करू शकते.
तर असा हा जगातल्या बलवान देशाचा बलवान (पण काढण्या घातलेला) अध्यक्ष. हा अध्यक्ष कसा असेल याकडं साऱ्या जगाचं लक्ष असतं. अध्यक्षानं आपलं भलं करावं असं अमेरिकन जनता अपेक्षित असते. डोनल्ड ट्रंप आणि हिलरी क्लिंटन असे दोन उमेदवार उभे आहेत. अमेरिकेत आर्थिक, सामाजिक, आर्थिक समस्या आहेत हे दोघांनाही मान्य आहे. त्या समस्या सोडवण्यासाठीच तर आपण अध्यक्ष होऊ पहातोय असं त्यांचं म्हणणं आहे.
ट्रंप आणि क्लिंटनमधलं कोणी तरी एक अध्यक्ष होईल. 
जो कोणी अध्यक्ष होईल त्याला अमेरिकेतल्या वास्तवाला सामोरं जायचं आहे.
  अमेरिकेतलं वास्तव काय आहे?
।।
  ५ जुलै २०१६.
एल्टन स्टर्लिंग या काळ्या माणसाला  पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलं. एल्टन एका दुकानाबाहेर सीडीज विकत होता. कोणीतरी अनामिकानं तक्रार केली की एका काळ्या माणसानं सीडी विकताना आपल्यावर बंदूक उगारली. तक्रारीवरून तीन पोलिस त्या ठिकाणी पोचले. तिथं एल्टन सापडला. त्यांनी एल्टनला घेरलं. एल्टन कोणताही विरोध करत नव्हता.  तीन पोलिसांनी त्याला एका कारवर दाबून ठेवलं, नंतर खाली पाडलं.   एक जण त्याच्या छातीवर बसला, दुसरा मांड्यांवर. तिसरा दूर उभा होता. ‘ पहा, पहा हा माणूस बंदुक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय ‘  असं म्हणत एका पोलिसानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. छातीत.  तिथंच तो खलास झाला असताना काही क्षणात दुसऱ्यानं आणखी तीन गोळ्या झाडल्या.
अमेरिकाभर पोलिसांच्या निषेधाची लाट उसळली, निदर्शनं झाली. टेक्ससमधे झालेल्या  निदर्शनांमधे  मिका जॉन्सन या काळ्यानं पाच गोऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारलं.
गोऱ्या पोलिसांचा बदला घेण्यासाठी  गेविन लॉंग हा कन्सासमधे रहाणारा २९ वर्षाचा काळा तरुण १६ जुलै २०१६ रोजी लुईझियाना राज्यातल्या बॅटन रूज या गावात पोचला. पूर्ण तयारीनिशी. असॉल्ट रायफल, भरपूर गोळ्या. त्याच्याजवळ बंदुक बाळगण्याचा परवाना होता.  
१७ जुलै रोजी आपल्या  वाढदिवसाच्या दिवशी  सकाळी साडेआठच्या सुमाराला काळे सैनिकी कपडे घालून, बंदूक घेऊन गेविन बाहेर पडला. एका चौकात आला. समोर पाच पोलिस होते. गेविननं गोळीबार केला. तीन पोलिस मेले, दोन जखमी झाले. मेलेल्यात दोन पोलिस गोरे होते एक काळा होता.पोलिसांनी केलेल्या प्रतीगोळीबारात गेविन मेला.
  गेविननं गोऱ्या पोलिसांना मारायचं आधीपासून ठरवलं होतं. २०१३ साली मिसुरीत फर्ग्युसनमधे काळ्या मायकेल ब्राऊनला गोऱ्या पोलिस अधिकाऱ्यानं गोळ्या घातल्यापासून गेविन संतापला होता. गेल्या दोन तीन वर्षात अनेक काळ्या निरपराध, निःशस्त्र तरूणांना गोऱ्या पोलिसांनी पकडलं होतं, तुरुंगात ढकललं होतं, मारलं होतं. काळ्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल काळ्यांच्या संघटना नुसते मोर्चे काढतात, निदर्शनं करतात याबद्दल गेविनला राग होता. गेविननं सोशल मिडियात लिहिलं, आपल्या भाषणाचे व्हिडियो टाकून आपली नाराजी जाहीर केली होती. अहिंसक पद्धतीनं काहीही साधणार नाही, गोऱ्या पोलिसांना ठार मारलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. 
गेविन. आफ्रिकन अमेरिकन, काळा. २००५ ते २०१० या काळात तो अमेरिकेच्या फौजेत, मरीन्स विभागात सैनिक होता. काही काळ तो इराक युद्धातही  होता. सैन्यात असताना वरिष्ठ अधिकाऱ्याशी गेविनचा वाद झाला. गेविननं पडतं घ्यायला नकार दिला, भांडला.  लष्करानं त्याला काळ्या यादीत टाकलं.  त्याला नोकरी मिळेनाशी झाली. 
गेविनचं लग्न झालं होतं पण त्याचा  काडीमोड झाला  होता.
गेविन सोशल मिडियात खूप सक्रीय होता. cosmo setenpenra या टोपण नावानं तो लिखाण करीत असे, स्वतःच्या  भाषणांच्या क्लिप्स वेबवर टाकत असे. सेटेनपेन्रा हे टोपण नाव कुठून आलं? आफ्रिकेतल्या रामसेस या राजाचं  ते आफ्रिकन नाव आहे. २०१५ साली गेविन काही महिने इजिप्त, इथियोपिया, केनया आणि युगांडात होता. तिथं त्यानं काय केलं याचा खुलासा झालेला नाही पण त्या प्रवासाचा परिणाम गेविनच्या विचारावर झाला असण्याची दाट शक्यता दिसते. 
पूर्व आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतल्यावर त्यानं मिसुरीतल्या जॅक्सन काऊंटी कोर्टात जाऊन आपण Washitaw de Dugdhmoundyah Mu’ur Nation या संघटनेचे सदस्य आहोत असं नोंदवलं. ही संघटना Sovereign Citizen Movement या संघटनेचा एक फुटवा आहे. या संघटनेच मूलतत्व म्हणजे न्यायाधीश, कोर्टं, पोलीस, सैन्य इत्यादींच्या म्हणण्याप्रमाणं आम्ही वागणार नाही, आम्ही कसं वागायचं ते आमचं आम्ही ठरवणार. हे ठरवत असताना आम्ही वेळप्रसंगी न्यायाधीश, पोलिस, सैनिक यांना मारून टाकणार. आम्हीच सार्वभौम.
 ही संघटना गोऱ्या वर्णद्वेषी लोकांनी स्थापन केलीय. काळे आणि ज्यू यांच्या विरोधात. काळ्या नागरिकांना नागरीकत्व देणारी अमेरिकन राज्यघटनेतली १४ वी सुधारणा या संघटनेला मान्य नाही.ती संघटना काळ्यांचा नायनाट करण्यासाठी जन्मली हे गेविनला स्वतः काळा असून उमगलं नाही. गेविन अभ्यासात कच्चा असावा. त्या संघटनेची  मनःपूत वागण्याची मुभा या तत्वाची भुरळ त्याला पडली. 
गेविननं सॉवरिन सिटिझन सदस्य असल्याचा दावा केला तरी त्या संघटनेत तो सक्रीय नव्हता. गेविन काळ्यांच्या कुठल्याच संघटनेचा सदस्य नव्हता. इस्लामबद्दल त्यानं थोडं फार वाचलं होतं, पण मुसलमान व्हायची त्याची इच्छा नव्हती.
।।
बॅटन रूज, लुईजियाना, मिसुरी या ठिकाणाना  दीर्घ संदर्भ आहे. अमेरिकेतली सर्वात जास्त काळ्यांची वसती या विभागात आहे. अमेरिकेत काळे गुलाम याच राज्यात प्रथम आणले गेले.
बॅटन रूज हे गाव लुईझियाना राज्याची राजधानी. १८०३ साली  लुईझियाना प्रदेश अमेरिकन संघराज्यानं फ्रेंचांकडून विकत घेतला तेव्हां  आसपासचा  कन्सास, मिसुरी इत्यादी प्रदेशही लुइझियानाचा भाग होता. या प्रदेशावर एकेकाळी फ्रेंच, नंतर स्पॅनिश, नंतर पुन्हा फ्रेंच राजांची मालकी होती. स्पेनची मालकी होती तेव्हां स्पॅनिश लोक काळ्या गुलामांची खरेदी विक्री करत असत. स्पॅनिशांनी आफ्रिकेत पकडलेले, खरेदी केलेले  काळे गुलाम लुइझियानात शेत मजूर म्हणून आणले. अमेरिकन संघराज्यानं काळ्या गुलामांसह, गुलामीसह लुईझियाना विकत घेतलं होतं. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यानं या भागात काळ्या गुलामांची संख्या अमेरिकेतल्या इतर प्रदेशांपेक्षा खूपच जास्त होती.
गुलामी निर्मूलन याच मुद्यावरून अमेरिकेत १८६१ ते १८६५ अशी पाच वर्षं यादवी झाली. लुझियाना व इतर दक्षिणेतली राज्यं  गुलामी टिकवण्याचा आग्रह धरत होती, गुलामांना-काळ्यांना नागरीक मानायला तयार नव्हती. १८५७ मधे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं आफ्रिकेतून आलेल्या गुलामांच्या प्रजेला नागरीकत्वाचा अधिकार देऊ नये असा निर्णय दिला होता. तोच निर्णय दक्षिणेतली राज्य उचलून धरत होती.  यादवीत दक्षिणी राज्यांचा पराभव झाला.  १८६७ मधे अमेरिकन घटनेत १४ वी दुरुस्ती करून काळ्यांना नागरीकत्व आणि समानता दिली गेली.
 लुईझियानातल्या गोऱ्यांनी ही घटना दुरुस्ती कधीच मान्य केली नाही. गोरेवर्चस्ववादी सतत आंदोलन करून, नवनव्या संघटना स्थापून काळ्यांचा द्वेष पसरवत असतात.  जॉन एफ केनेडी यांचा खून याच लोकांनी डॅलसमधे घडवून आणला होता.  सॉवरिन सिटिझन मुव्हमेंट ही वर्णद्वेषी संघटना आजही लुईझियाना आणि आसपासच्या विभागात सक्रीय आहे.
।।
कलीफ ब्राऊडर, वय वर्षे १६, ब्राँक्समधे रहाणारा. काळा, अनाथ,  आफ्रिकन अमेरिकन. एका अनाथालयात रहात असे. अनाथालय एका महिलेनं चालवलं होतं. ती महिला म्हणजे कलीफची आई. 
१५ मे २०१० च्या रात्री ब्राऊडर घरी परतत होता. मित्रांसोबत. एका पार्टीनंतर. ईस्ट १८६ स्ट्रीटवर पोचले असताना समोरून एक पोलिसांची गाडी आली. समोर उभी राहिली. पाठोपाठ आणखी गाड्या आल्या. ब्राऊडरच्या तिन्ही बाजूनी उभ्या राहिल्या. त्यांच्या लकाकत्या दिव्यांमुळं ब्राऊडरचे डोळे दिपले.
पोलिस ब्राऊडरला म्हणाला ” एका माणसानं तक्रार केलीय की तू त्याला लुबाडलय.”
ब्राऊडर म्हणाला ” मी कोणालाही लुबाडलेलं वगैरे नाहीये. मी एका पार्टीतून आताच बाहेर पडलोय. हवं तर माझी झडती घ्या.”
पोलिसानं झडती घेतली. ब्राऊडर आणि त्याच्या मित्राकडं काहीही सापडलं नाही.
पोलिस  गाडीकडं गेला आणि गाडीत बसलेल्या माणसाशी काही तरी बोलला. तक्रार करणारा माणूसच गाडीत होता.
पोलिस परत ब्राऊडरकडं आला आणि म्हणाला ” तक्रारदार म्हणतोय की आज नव्हे पंधरा दिवसांपुर्वी त्याला लुटलंय.”
पंधरा दिवसांपूर्वी लुटलेल्या गोष्टी आता कशा सापडणार?
पोलिसानं ब्राऊडरला हातकड्या घातल्या.
” मला कशासाठी पकडलंय? माझा गुन्हा काय?” ब्राऊडरनं विचारलं.
” तुला आम्ही चौकीत घेऊन जातोय. बहुदा तुला नंतर सोडून देऊ, तू घरी जाऊ शकशील.”
मित्रासह ब्राऊडर पोलिस चौकीत. रात्रभर पोलिस चौकीत काढल्यावर   कोर्टात नेण्यात आलं. तिथं पोलिस अधिकारी आणि सरकारी वकिलानं ब्राऊडरची जबानी घेतली. ब्राऊडरनं गुन्हा नाकबूल केला. ब्राऊडरच्या मित्राला सोडून देण्यात आलं.
काही महिन्यांपूर्वी अगदी असंच घडलं होतं. ब्राऊडर एका डिलिव्हरी व्हॅनला लटकून काही अंतर गेला होता. गंमत केली होती. पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याच्यावर चोरीचा आरोप ठेवला. व्हॅनला लटकणं आणि चोरीचा काय संबंध? पोलिसांनी ब्राऊडरला कोर्टात उभं केलं. कोर्टानं ब्राऊडरचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, त्यानं गुन्हा केलाय असा निकाल दिला. बालवयात असल्यानं त्याला गुन्हेगार जाहीर न करता प्रोबेशनवर, परीक्षाकाळाचा उमेदवार म्हणून सोडून दिलं.
या वेळी कोर्टानं त्याचा मागला रेकॉर्ड पाहून अजून परीक्षा काळात असल्यानं तीन हजार डॉलरच्या जामिनावर सोडा असा निकाल दिला. मुळात गुन्हाच घडलेला नसतांना जामीन देण्याचा प्रश्नच कुठं येतो?
तीन हजार डॉलर ही रक्कम भरायची कोणी? अनाथ मुलाकडं पैसे कुठून येणार? अनाथालयातली आई ते पैसे आणणार कुठून?  वकील देणंही शक्य नव्हतं.
ब्राऊडरला कोर्टाच्या बाहेर काढून एका बसमधे बसवण्यात आलं. बस निघाली. काही अंतर गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला समुद्र होता. बस रायकर्स तुरुंगात पोचली.
एका मोठ्या हॉलमधे चाळीस कैदी मुलांबरोबर ब्राऊडरची व्यवस्था. प्रत्येकाला एक कॉट आणि प्लास्टिकची बादली. 
तुरुंगातून मिळणाऱ्या साबणानं कपडे धुवायचे आणि कॉटच्या टोकाच्या लोखंडी दांडीवर वाळत घालायचे. ओल्या कपड्यामुळं कॉटचे दांडे गंजलेले. कपड्यांना गंजाचे डाग पडायचे. 
अन्न मिळायचं, तेही अपुरं आणि निकृष्ट.
ब्राऊडरची आई आठवड्यातून एकदा तुरुंगात येई. मळलेले कपडे घेऊन जाई आणि धुतलेले कपडे देई. खाण्यासाठी पदार्थ देई आणि त्याला चांगलं खायला मिळावं यासाठी तुरुंगाधिकाऱ्यांकडं पैसे देऊन जाई.
तुरुंगात दोन चार भाई होते. तुरुंगावर त्यांची हुकूमत चाले. ते ब्राऊडरचे पैसे हिसकून घेत, त्याचे पदार्थ खाऊन टाकत.
  एकदा एक भाई पैसे हिसकावून घेत असताना ब्राऊडरनं अटकाव केला.  मारामारी झाली. जेलर आला. ब्राऊडरची रवानगी एकांत कोठडीत झाली.
दोन आठवड्यांनी ब्राऊडर पुन्हा साध्या तुरुंगात गेला.
कोर्टात तारीख होती. ब्राऊडरनं वकील देण्याचा प्रश्नच नव्हता. एक सार्वजनिक वकील त्याच्या वतीनं उभा होता. त्या वकिलाला सरकार अगदीच कमी पैसे देत असे. त्याच्याकडं फार खटले असत. त्याला काम जमत नसे. तो तारीख मागे. एक आठवड्यानंतरची तारीख मागितली तर कोर्ट त्याला दीड महिन्यानंतरची तारीख देत असे. तारीख पडून ब्राऊडर पुन्हा तुरुंगात.
न्यू यॉर्क राज्याच्या कायद्यानुसार कोणताही खटला सहा महिने उभा राहिला नाही तर आरोपीला सोडून द्यायला हवं. सरकारतर्फे तयारी झालेली नसल्यानं कोर्ट जेव्हां सुनावणी पुढं ढकलते तेव्हां सहा महिन्यांची तरतूद लागू होत नाही. त्यामुळं दर वर्षी तीन चार हजार कैदी तुरुंगात तुंबून पडतात.
आणखी एक गोष्ट. खटले चालवण्यासाठी पुरेसे न्यायाधीश न्यू यॉर्कमधे नाहीत. पोलिस धडाधड लोकाना पकडतात परंतू खटले चालू शकत नाहीत.
तारखा पडत होत्या. दोन वर्ष त्यात गेली.
एका तारखेला ब्राऊडर कोर्टात गेला तेव्हां सरकारी वकीलानं सुचवलं ” गुन्हा कबूल केलास तर फक्त साडेतीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होईल. आपण निर्दोष आहोत असं पालुपद चालू ठेवलंस तर खटला हरशील आणि १५ वर्षाची शिक्षा होईल.”
ब्राऊडर तयार झाला नाही. पुन्हा तुरुंगात रवाना झाला. तुरूंगात गेल्या गेल्या पुन्हा एकांत कोठडीत रवाना.
एकांत कोठडीवर लक्ष ठेवणारे जेलर संधी मिळाली की कैद्यांना धोपटून काढत. काही जेलर विकृत असत. एकदा एका जेलरला हात साफ करायची खुमखुमी आली. तो ब्राऊडरकडं आला आणि म्हणाला ” मला मारामारी करायचीय. ये. ” 
मारामारी म्हणजे काय? ब्राऊडरला ठोसे मारायची परवानगी नव्हती. ब्राऊडरच्या हातात बेड्या असत. जेलर एकतरफी ब्राऊडरला ठोसे मारायचा. ब्राऊडरचं नाक फुटलं. कपाळावर आणि जबड्याला जखमा झाल्या.  रक्तबंबाळ झालातरी जवळपास तो बेशुद्ध पडेपर्यंत जेलरनं ब्राऊडरला बडवलं.
तुरुंगात शिक्षण घ्यायची सोय होती. मोठ्या हॉलमधे असताना पुस्तकं आणि उत्तरं लिहिण्यासाठी वह्या पुरवल्या जात. एकांत कोठडीत आठवड्यातून एकदा पुस्तकं दरवाजाच्या फटीतून आत सरकवली जात आणि चार दिवस गेल्यानंतर उत्तरं लिहिण्यासाठी वही, कागद सरकवले जात. तुरुंगातलं फारसं कोणी या सोयीचा वापर करत नसे. कैद्यांना आपसात मारामाऱ्या करणं, सेक्सच्या गोष्टी करणं यातच रस असे. ब्राऊडरला मात्र वाचायची सवय होती. तुरुंगात जाण्यापूर्वी शाळेतही चांगला विद्यार्थी अशी त्याची ख्याती होती. वाचन आणि परीक्षा देण्याची सोय असली तरी तुरुंगाधिकारी तिथं लक्ष देत नसत.ब्राऊडर ओरड करून पुस्तकं मागवी, परिक्षा द्यायचीय म्हणे. एकदा पुस्तकं आली नाहीत म्हणून ब्राऊडरनं चौकशी केली. तर जेलरनं त्याला बोलावून घेऊन बेदम मारलं.
रक्तबंबाळ केल्यानंतर जेलर म्हणाला ” हे बघ. तू जखमी झालायस. दवाखान्यात जाऊन तू तक्रार नोंदवून औषधं घेऊ शकतोस. परंतू नंतर तुला कसल्याशा गुन्ह्यात गुंतवणून आणखी एकांत कोठडी आणि नव्या आरोपांना सामोरं जावं लागेल, तुझी शिक्षा वाढेल. गप्प राहिलास तर यातलं काहीही होणार नाही. गप्प रहायचं की तक्रार करायची हे तुझं तू ठरव.”
गप्प बसण्यावाचून ब्रॉडला गत्यंतर नव्हतं.
दर चार दोन महिन्यांनी ब्राऊडरची एकांत कोठडीत रवानगी होई. एकदा तो सलग चार महिने एकांत कोठडीत होता. त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्यानं चादरीच्या धांदोट्या करून, त्या एकत्र बांधून केलेला गळफास घेतला. फेरी मारणाऱ्या जेलरच्या लक्षात आल्यामुळं त्यानं ब्राऊडरला बाहेर काढलं. 
औषधोपचार झाले. 
पुन्हा ब्राऊडर एकांत कोठडीत रवाना.
काही दिवसांनी त्यानं प्लास्टिकची बादली तोडली. बादलीचा  एक धारदार तुकडा वापरून मनगटाची शीर कापली. बेशुद्ध अवस्थेत जेलरला सापडला. हॉस्पिटल. उपचार. बरा झाल्यावर पुन्हा तुरुंगात रवाना.
तारखा पडत होत्या. एका तारखेला पुन्हा मांडवळीचा प्रस्ताव सरकारी वकिलानं मांडला. गुन्हा कबूल कर. अडीच वर्षाची शिक्षा होईल. तुला तुरुंगात येईन येव्हाना अडीच वर्षं झालेली असल्यानं सुटका होऊन जाईल.
” मी निरपराध असताना गुन्हा कां कबूल करू?” ब्राऊडरनं भांडण सुरु ठेवलं.
कोर्टातल्या न्यायाधिशांच्या बदल्या होत, ते निवृत्त होत. ब्राऊडरची केस चालूच. सात न्यायाधीश झाले.
२०१३ सालच्या मे महिन्यात ब्राऊडर पुन्हा कोर्टात. न्यायाधीश जरा कडक. जुने खटले निकाली काढायचा सपाटा त्यानी चालवला होता. ब्राऊडरची केस पाहिल्यावर न्यायाधिशानाही आश्चर्य वाटलं. त्यानी सरकारी वकील आणि पोलिसाना फैलावर घेतलं. तेव्हां पोलिस म्हणाले की ब्राऊडरवरचा खटला चालू शकत नाही. कारण ज्या माणसानं तक्रार केली होती तो मेक्सिकोत निघून गेला आहे. त्यामुळं कोणतेही पुरावे नाहीत, फिर्यादी नाहीत. अशा परिस्थितीत खटला उभाच राहू शकत नाही.
ब्राऊडर सुटला. तीन वर्षाच्या तुरुंगवासानंतर.
ब्राऊडर आपल्या घरात परतला. आता सारं वातावरण बदललं होतं. मित्र त्याच्याशी बोलत नसत. दिवसेंदिवस ब्राऊडर पायरीवर बसून आकाशाकडं पहात असे. त्याला कोणी नोकरी द्यायला तयार नव्हतं. नोकरीसाठी गेला की त्याच्या तीन वर्षाच्या तुरुंगवासावर बोट टेवलं जाई. ब्राऊडर सांगे की त्यानं गुन्हाच केला नव्हता आणि गुन्हा सिद्ध न झाल्यानं त्याची सुटका झालीय.  त्याचं कोणीही ऐकून घेतलं नाही. कधे मधे कनवाळू आणि समजूतदार माणसं त्याला नोकरी देत. परंतू नोकरी टिकत नसे.
एकांतवासाचा धक्का त्याला बसला होता. आपल्याला कोणी तरी मारेल, आपल्याला लुटेल अशी भीती त्याला वाटायची. घरात असला की तो खिडक्या दारं बंद करत असे. ट्यूबनं प्रवास करतांना मधेच त्याला भीतीचा झटका येत असे, तो किंचाळे. त्याला उपचाराची गरज होती.  खर्च कोण करणार? कंटाळून एके दिवशी त्यानं नस कापून मरण्याचा प्रयत्न केला. घरातल्या इतरांच्या लक्षात आल्यानं तो वाचला.
समाज ब्राऊडरला जगू देत नाही आणि मरूही देत नाही.
या घडीला ब्राऊडर त्याच अवस्थेत जगतोय. 
।।
(जुलै २००९)
हारवर्ड विश्वशाळेच्या परिसरातला केंब्रिज विभाग.
 पोलिसांना ९११ या नंबरवर एका गोऱ्या बाईनं फोन केला. ”  दोन काळी माणसं घराच्या दाराशी झटापट करत आहेत. कदाचित घरफोडीचा प्रयत्न असेल. कदाचित त्यांची चावी नीट लागत नसेल.” 
सार्जंट जेम्स क्राऊली त्या घरापाशी पोचला. तोवर घराचं दार उघडून ती काळी माणसं घरात पोचली होती.
क्राऊलीनं फोनवरच्या तक्रारीचा संदर्भ देऊन विचारपूस सुरू केली. दारात उभं राहून त्या दोघांना घराबाहेर यायला सांगितलं.  दोघांपैकी एका काळ्या माणसानं आपलं ओळखपत्र दाखवलं. तो काळा माणूस होता प्रो. हेन्री लुई गेट्स. हारवर्डमधे ते इतिहासाचे प्राध्यापक होते आणि  चीनच्या दौऱ्यावरून घरी परतले होते,  चावी नीट लागत नसल्यानं दाराशी थोडी खटपट करावी लागली होती.  
 गेट्स वैतागले. आपलं ओखखपत्र दाखवलं, आपण प्राध्यापक आहोत हे सिद्ध केलं तरी  पोलिस बाहेर यायला कां सांगतोय असं ते म्हणाले. वाद झाला.  प्रो. गेट्सनी सांगितलं की त्यानं हारवर्ड विश्वशाळेच्या पोलिस विभागाला फोन करून माहिती घ्यावी. सार्जंटनं त्या आणि शहरातल्या पोलिस विभागातल्या पोलिस कचेऱ्यांना फोन करून आणखी कुमक मागवली. दिवे लकाकत आणखी पोलिस गाड्या हजर झाल्या. गेट्स वैतागले. आपण प्राध्यापक आहोत हे ओळखपत्रावरूनही सिद्ध झाल्यानंतर आणखी पोलिस मागवणं हा काय प्रकार आहे असा प्रश्न त्यांनी केला.
सार्जंट क्राऊलीनी प्रा. गेट्सना हातकड्या घातल्या, अटक केली आणि पोलिस स्टेशनमधे नेलं. काही तास पोलिस स्टेशनमधे अपमानास्पद वागणूक देऊन डांबून ठेवलं. विश्वशाळेतून फोन आल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. 
सार्जंट क्राऊलीनं आरोप ठेवला की गेट्स यांची वागणूक दंगलखोर होती. त्या आरोपात तथ्थ्य नसल्याचं कोर्टानं ठरवलं आणि गेट्सना आरोपातून मुक्त करण्यात आलं.
सार्जंट क्राऊली आणि त्याच्यासोबतचे पोलिस अधिकारी गोरे होते.
अमेरिकाभर ओरड झाली. प्रेसिडेंट ओबामांनीही या घटनेची दखल घेतली.
सार्जंट क्राऊली यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
।।
न्यू यॉर्क.
जुलै २०१४.
एरिक गार्नर एका दुकानासमोर उभा होता. दुपारची तीन साडेतीनची वेळ. अचानक डॅनियल पँटालियो हा पोलिस तिथं उगवला आणि एरिकला   प्रश्न विचारायला सुरवात केली.
एरिक वैतागला. म्हणाला ” आता पर्यंत तुम्ही मला तीसेक वेळा तरी अटक केलीय. मला त्रास दिलाय. माझी तपासणी केलीय. एकदा तर माझ्या गुदद्वारातही बोटं घालून तपासणी केलीत. प्रत्येक वेळी तुम्हाला माझ्याकडं काहीच सापडलेलं नाही. त्रास देता, सोडून देता. आता मी विटलोय. पुन्हा नको तो प्रकार. प्लीज मला एकटं सोडा, त्रास देऊ नका.”
कोणत्याही वॉरंटशिवाय कोणाही नागरिकाला हटकणं आणि त्याची तपासणी करणं अशी मोहिम न्यू यॉर्क पोलिसांनी सुरु केली होती. भर रस्त्यावर, भर गर्दीत पोलिस कोणालाही हटकत. स्त्री असो की पुरुष. छाती आणि जांघेची तपासणी. कॅविटी सर्च असं या तपासणीच नाव. २०११ साली पोलिसांनी ६.८५ लाख लोकांची तपासणी केली होती. एरिकची तपासणी झाली त्या वर्षी तो पर्यंत ४.५ लाख लोक हटकले, तपासले गेले होते.
  अपवाद सोडता सगळे काळे असत.
” तू सिगरेट्स विकत होतास. ” पोलिसानं आरोप ठेवला.
” तपासणी घ्या. आहेत का माझ्याकडं काही सिगरेट्स ते पहा. मला उगाच त्रास देताय.” एरिक म्हणाला.
एरिकनं नाराजी व्यक्त केल्यावर पोलिसानं त्याला धरलं, त्याचे हात पाठीमागे घेऊन हातकड्या घालायचा प्रयत्न केला. एरिक हातकडी घालून घ्यायला तयार नव्हता. पोलिसानं मागून त्याच्या गळ्यावर कुस्तीत करतात तशी पकड केली. गळा पकड. गळा दाबून धरला आणि त्याला फूटपाथवर पाडलं. 
काही सेकंदात आणखी तीन पोलिस तिथं पोचले. त्यात एक महिला पोलिस होती. महिला पोलिस काळी होती.
पोलिसानं एरिकला जमीनीवर दाबून ठेवलं आणि गळा दाबला. एका वाटसरूनं या घटनेचं चित्रण केलं, त्यात दिसलं की एरीक अकरा वेळा घुसमटलेल्या आवाजात ओरडला की मला श्वास घेता येत नाहीये, मी घुसमटतोय.
तिधे पोलीस बघ्यासारखे उभे होते.
काही सेकंदांनी पोलिसानं गळा सोडला. एरिक बहुदा घुसमटून मेला असावा.
अँब्युलन्स आली. मेडिक खाली उतरले. त्यांच्या मते एरिक श्वासोच्छवास करत होता. त्यामुळं कृत्रीम श्वास देण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. एरिकला हॉस्पिटलमधे नेण्यात आलं. तिथ डॉक्टरनी जाहीर केलं की तो मेला होता. मरणोत्तर तपासणीच्या निष्कर्षातली नोंद सांगत होती की गळा दाबल्यामुळं एरिकचा मृत्यू झाला.
एरिकच्या मृत्यूचं चित्रण प्रसिद्ध झाल्यावर देशभर गडबड उडाली. प्रे. बुश म्हणाले की हा प्रकार फार भयानक आहे. सर्व राजकीय पक्षांनी पोलिसांवर झोड उठवली. न्यू यॉर्क न्याय व्यवस्था पोलिसावर खटला भरायला तयार नव्हती. फारच ओरड झाल्यावर खटला झाला. ग्रँड ज्यूरीसमोर सुनावणी झाली. ज्यूरी आणि न्यायाधिशांनी एरिकचा खून झाला हे मान्य केलं नाही. हटकण्याच्या प्रक्रियेत बळाचा अतिरेकी वापर झाल्यानं एरिकचा मृत्यू झाला, तो खून नव्हता असं न्यायालयानं म्हटलं. पोलिस सुटला. 
एरिकच्या पत्नीनं सरकारवर खटला भरला. नुकसान भरपाईची मागणी केली. कोर्टात न जाता मांडवळ झाली. सरकारनं ५६ लाख रुपये पत्नीला देऊन खटला मिटवला.
पोलिस अधिकारी सुटला. त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
।।
काळ्यांना कसंही वागवा, तुम्हाला कोणीही दोषी ठरवणार नाही असा संदेश या घटना देतात.
अमेरिकेत याला ब्रोकन विंडो इफेक्ट म्हणतात.
इमारतीत एकाद्या खिडकीची काच फुटलेली असते. कोणीही ती खिडकी दुरुस्त करत नाही. याचा अर्थ होतो की या इमारतीकडं कोणाचं लक्ष नाही. त्यामुळं आणखी काचा फोडल्यात तरी कोणी विचारणार नाही. 
खुश्शाल काचा फोडा, इमारतीची वाट लावा.
।।
फेब्रुवारी १९९९.
अमादू दियाल्लो हा गिनीतून स्थलांतरित झालेला काळा तरूण न्यू यॉर्कमधल्या ब्राँक्स या काळे बहुल विभागातल्या आपल्या घराच्या पायऱ्यांवर उभा होता. मध्य रात्र उलटून गेली होती. 
गणवेशात नसलेले चार पोलिस तिथं पोचले. दुरूनच त्यांनी अमादूला हटकलं, थांब, झडती घ्यायचीय असं म्हणाले.
अमादू मागं वळला आणि आपल्या घरात पळू लागला. पळताना त्यानं आपल्या जॅकेटमधून पैशाचं पाकीट काढलं. आपल्याजवळ काहीही नाहीये असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असावा. पोलिस पकडतील अशी भीती त्याला होती कारण तो स्थलांतरित होता,  अमेरिकेचं नागरीकत्व मिळवण्याच्या खटपटीत होता. कामधंदा नसल्यानं तो फेरीव्यवसाय करत असे. मोजे, सिगारेट्स, कॅसेट्स इत्यादी गोष्टी रस्त्यावर विकत असे. अशी विक्री करायला न्यू यॉर्कमधे बंदी असल्यानं पोलिस वेळोवेळी अशी विक्री करणाऱ्याना पकडत असत. आपल्यालाही तसंच पकडलं जाईल अशी भीती अमादूला असावी.
पोलिसांचं म्हणणं की दुरून अंधुक प्रकाशात त्यांना अमादू खिशातून काही तरी चौकोनी वस्तू काढताना दिसला आणि ती वस्तू पिस्तूल असावी असं पोलिसांना वाटलं.
पोलिसांनी त्याला वस्तू टाकून हात वर करायला सांगितलं. अमादू पळत राहिला. चारही पोलिसांनी दूरवरून गोळीबार केला. ४१ गोळ्या झाडल्या. पैकी १९ गोळ्या त्याला लागल्या. गोळ्या लागून तो खाली पडला असतानाही पोलिस गोळीबार करत राहिले.
ब्राँक्समधे खटला झाला. कोर्टानं पोलिसांना खुनी ठरवलं. पोलिस म्हणाले की गावात भारलेल्या वातावरणात आणि प्रचारप्रभावात खटला उभा राहिल्यानं कोर्टावर परिणाम झाला. म्हणून अल्बानी या दुसऱ्या ठिकाणच्या कोर्टात खटला चालवावा. अल्बानीच्या कोर्टात खटला झाला आणि त्यात पोलिस निर्दोष सुटले.
अमादूच्या वडिलांनी सरकावर सहा कोटी डॉलरच्या नुकसान भरपाईचा खटला भरला. सरकारनं कोर्टाबाहेर मांडवळ करून तीस लाख डॉलर अमादूच्या वडिलांना दिले.
गोळ्या चालवणाऱ्या पोलिसांचा म्होरक्या पोलिस अधिकारी केनेथ बॉस पूर्वी किमान दोन वेळा याच प्रकारच्या गुन्ह्यात सापडला होता. काळ्यांना दिसताक्षणीच गोळ्या घालून ठार मारणे असं गुन्ह्याचं रूप होतं. अल्बानीच्या कोर्टातून निर्दोष सुटल्यानंतर केनेथ बॉसला कालांतरानं बढती देण्यात आली.
।।
काळे ही कमी दर्जाची प्रजा आहे आणि ती तशीच राहिली पाहिजे असं बऱ्याच-बहुतांश गोऱ्यांना वाटतं. गोऱ्यांना आपल्या शेजारी, आपल्या वस्तीत काळे नको असतात. गोऱ्यांच्या वस्तीत काळ्यांना घरं मिळत नाहीत. काही कारणानं काळ्यांचा वावर गोऱ्यांच्या वस्तीत वाढला (औद्योगीकरण) की गोरे ती वस्ती सोडून जातात. काळ्यांनाही गोऱ्यांच्या वस्तीत घरं मिळत नसल्यानं काळ्यांच्या वस्तीत जावं लागतं.
परिणामी काळे-गोरे यांच्या वस्त्या वेगळ्या होतात.
अमेरिकेत १४ टक्के काळे आहेत. म्हणजे एकाद्या  वस्तीत, विभागात १४ टक्के काळे असतील तर तो  समाज एकसंध झाला असं म्हणता येईल. एकाद्या वस्तीत जास्तीत जास्त काळे असणं आणि ही वस्ती इतर वस्तीपासून दूर असणं याचा अर्थ समाज वेगळलेला आहे असा होतो. अमेरिकेत विस्कॉन्सिन राज्यात  मिलवॉकी हे शहर सर्वात वेगळलेलं आहे. तिथं वस्तीतला काळ्यांचा हिस्सा ८० टक्के आहे. 
।।
मिलवॉकी, विस्कॉन्सिन राज्य.
विन्सटन विल्यम्स.८४.
नॉर्थ अवेन्यूतल्या एका मॅकडोनल्डमधे ते दररोज जातात. वेळ काढायला. त्यांच्या वयाचे लोक तिथं जमतात.
” मी अरकन्नासमधे जन्मलो. आठ वर्षाचा झालो आणि कापूस वेचणीच्या कामी लागलो. मरमर मेहनत. पैसे कमी दिले जात. मी जादा मेहनत करून पैसे वाचवले. एके दिवशी पैसे खिशात घेऊन थेट शेतातूनच बसमधे बसलो आणि मिलवॉकीला पोचलो. ऐकलं होतं की मिलवॉकीत उद्योग निघत आहेत, तिथं काम मिळेल.”
विल्यम्स आणि इतर दोन वृद्ध काळे गृहस्थ टेबलाभोवती कॉफी घेत बसलेले. विल्यम्स बोलतात आणि बाकीचे दोघे संमती दाखवत माना हलवतात.
विल्यमना पहिला धक्का बसला तो घराचा. रहाणार कुठं अशी चौकशी बसमधून उतरल्यावर त्यांनी केली तर  एका वस्तीकडं बोट दाखवण्यात आलं. पूर्णपणे काळ्यांची वस्ती. तिथंही भाड्यानंच रहायचं. कोणाही काळ्याला घर विकत घ्यायची परवानगी नव्हती.
काळ्यांना शाळा नव्हत्या, कॉलेजात जाता येत नव्हतं. परिणामी त्यांच्याजवळ पदव्या नव्हत्या. परिणामी सर्वांना शेतमजुरी करावी लागे, कारखाने किंवा कचेऱ्यांत चांगल्या नोकऱ्या मिळत नसत.
१९६६ च्या सुमाराला विल्यम्स व त्यांचे तरूण काळे मित्र संघटित झाले. देशभर नागरी अधिकारांचं आंदोलन उसळलं होतं. विल्यम्सनी घरं विकत घेण्याचा, मिलवॉकीत कुठंही रहाण्याचा अधिकार मागितला. गोरे खवळले. नॉर्थ अॅवेन्यूतल्या काळ्या वस्तीच्या बाहेर पडणाऱ्यांना बदडण्यात येई. काळ्या घरांवर हल्ले झाले, पेटते बोळे फेकण्यात आले. 
काळ्यांनी संघटित होऊन गोऱ्यांच्या अत्याचाराना तोंड दिलं.
काळ्यांचा त्रास नको म्हणून एओ स्मिथ, इंटरनॅशनल हारवेस्टर, अमेरिकन मोटर्स इत्यादी कंपन्यांनी माणसं कमी करत करत कंपन्या लहान केल्या आणि नंतर बंद करून टाकल्या. १९८०-९० च्या दशकात मिलवॉकीतले उद्योग बंद तरी झाले किंवा स्थलांतरित तरी झाले. गोरे लोक गाव सोडून गेले. 
उद्योग गावाबाहेर निघून गेल्यामुळं गावाचं उत्पन्न बुडालं.  पैसे नसल्यानं शिक्षण, आरोग्य, रस्ते, वस्त्या इत्यादीवर मिलवॉकी गाव पैसे खर्च करेनासं झालं. परिणामी गावाचं आरोग्य खालावलं. गाव मुख्यतः काळ्यांचं असल्यानं काळ्यांनाच सोसावं लागलं, लागतंय.  ‘ काळ्यांना नागरी अधिकार हवेत,आंदोलनं करायची आहेत ना, मग करा आंदोलनं आणि मरा ‘ असं राज्यातले गोरे म्हणतात.
।।
मिलवॉकीमधली एक बाग.
डॉंट्रे हॅमिल्टन, ३१, एका बागेत दुपारच्या वेळी बाकावर झोपला होता. कोणी तरी फोन करून हॅमिल्टनची तक्रार केली. दोन पोलिस बागेत पोचले. हॅमिल्टन झोपला होता, काहीही हालचाल करत नव्हता, कोणतीही आक्षेपार्ह हालचाल करत नव्हता. पोलिसांची तपासणी पूर्ण होत असतानाच ख्रिस्तोफर मॅनी नावाचा अधिकारी आला. त्यानं हॅमिल्टनला थोपटून जागं करायचा प्रयत्न केला. 
हॅमिल्टन म्हणाला ” या आधी तुम्ही मला खूप त्रास दिलाय, तुरुंगात घातलंय. आता मला पुन्हा तुरुंगात जायचं नाहीये. मला सोडा. मी काहीही केलेलं नाहीय. “
हॅमिल्टन हातवारे करून बोलत होता म्हणून मॅनीनं त्याचे हात धरले. हॅमिल्टननं हात झटकले. मॅनीनं दंडुका उगारला. हॅमिल्टननं दंडुका धरला. मॅनीनं कंबरेचं पिस्तूल काढलं आणि हॅमिल्टनला १९ गोळ्या घातल्या. हॅमिल्टन जागच्या जागी मेला.
हॅमिल्टन बेकार होता. त्याला स्किझोफ्रेनियाचा त्रास होता. तो चिडत असे पण हिंसक होत नसे. त्याच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळं आधी दोन वेळा पोलिसांनी त्याला पकडलं, छळलं होतं.
मॅन्नीला नोकरीवरून कमी करण्यात आलं. चौकशी करण्यात आली. चौकशीनं दोन निष्कर्ष काढले. १. कोणतंही रास्त कारण नसतांना हॅमिल्टनची झडती घेतली. २. अटक आणि संरक्षण या बाबतच्या पोलिस नियमावलीनुसारच मॅनी वागला.
मॅनीवर कोणतीही कारवाई झाली नाही. ना खटला, ना तुरुंगवास.
।।
अटक झाल्यावर अटकेची जागा ते कोठडी, नंतर कोठडी ते कोर्ट, नंतरक विनाकारणच रस्त्यावर फिरवणं यासाठी पोलिस काळ्यांना गाडीत कोंबतात. पायात आणि हातात बेड्या. सीटवर बसवल्यावर सीट बेल्ट लावत नाहीत. रस्तावरून गाडी वेगानं नेतात, वेगात ब्रेक लावतात, वेगात गाडी सुरु करतात, जाम धक्के बसतात. कैदी सतत आदळतो, मानेला आणि मणक्याला धक्के लागतात. कैदी बेशुद्ध होतो. कधी कधी गाडीत किवा कधी कधी नंतर मरतो.
या पद्दतीला रफ राईड असं म्हणतात.
मिलवॉकीत दोन काळ्यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. रफ राईड.
।।
मिलवॉकीत  दर पाच काळ्या तरुणात एक जण बेरोजगार असतो.
मिलवॉकीत सरासरी काळ्या कुटुंबाचं उत्पन्न २५,६०० डॉलर असतं. गोऱ्या कुटुंबाचं सरासरी उत्पन्न ६२,६०० डॉलर असतं.
काळ्या तरुणांतले तीसेक टक्के तरूण अनेकवेळा तुरुंगात जाऊन आलेले असतात. वस्तूची रस्त्यावर विक्री करणं, शस्त्रं बाळगणं, मारियुआना जवळ बाळगणं, आक्षेपार्ह वर्तणुक असे आरोप त्यांच्यावर ठेवलेले असतात. बहुतेक वेळा ते आरोप सिद्ध होत नाहीत.
।।
गार्डियननं अमेरिकेतल्या पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडलेल्या लोकांचा माग ठेवलाय. सप्टेंबर २०१६ पर्यंत  अमेरिकेत ७९० माणसं पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडली. यामधे स्थानिक अमेरिकन (अमेरिकेतले आदिवासी), काळे आणि लॅटिनोंची संख्या जास्त आहे. यात १९४ निःशस्त्र काळ्यांना गोळ्या घालण्यात आल्या. साधारणपणे दोन गोरे गोळ्यांना बळी पडले तर पाच काळे आणि सहा आदिवासी पोलिसी गोळीबारात मरतात. २०१५ मधे १२०० माणसांना पोलिसांनी गोळ्या घातल्या. अजूनपर्यंत   एकाही पोलिस अधिकाऱ्यावर बेकायदा, पूर्वग्रहानं काळ्याना मारणं असा आरोप ठेवलेला नाही, कोणालाही त्या आरोपाखाली शिक्षा झालेली नाही.
।।
अमेरिकेत १३ टक्के काळे आहेत. २५ ते ४९ या वयोगटात ३५ टक्के काळे बेरोजगार आहेत. काळ्यांना चांगल्या शिक्षण संस्थांत प्रवेश मिळत नाही. शिकले असले तरी त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नाहीत. चांगल्या वस्त्यांत त्यांना घरं मिळत नाहीत. चांगली घरं घेण्यायेवढे पैसेही काळ्यांकडं नसतात. काळी माणसं इतर कोणत्याही समाजाच्या तुलनेत जास्त तुरुंगवासी आहेत. काळ्यांना मतदानाचा अधिकार असला तरी त्यांना मतदान करता येत नाही अशी स्थिती दक्षिणेतल्या राज्यात आहे. उदा. वाहन चालवण्याचा परवाना असणं ही त्या राज्यात मतदानाचा अधिकार मिळण्याची अट आहे. अनेक काळ्यांकडं गाड्या नसल्यानं त्यांच्याकडं परवाने नसतात. काहीही गुन्हा केलेला नसताना काळ्यांचे वाहन चालक परवाने रद्द केल्यानं मतदानाचा अधिकार रद्द होतो. 
अमेरिकेत २००८ साली काळेगोरे संबंध ठीक आहेत असं म्हणणारी माणसं ६४ टक्के होती. २०१४ साली त्यांचं प्रमाण ४६ टक्क्यावर घसरलं आहे.
२०१३ मधे Black Lives Matter ही संघटना निर्माण झाली. ही संघटना मार्टिन लूथर किंग यांच्या अहिंसक वाटेनं जाण्याचा प्रयत्न करते. काळ्यांच्या आंदोलनातली ही एक नवी संघटना. २०१३ मधे फ्लोरिडात जॉर्ज झिमरमन  या गोऱ्या माणसानं ट्रेवन मार्टिन या निःशस्त्र काळ्या तरूणाला गोळ्या घालून मारलं. प्रथम त्याला अटक होत नव्हती. आंदोलन झाल्यानंतर त्याला अटक झाली. नंतरच्या खटल्यात तो सुटला. त्या घटनेचे पडसाद अमेरिकाभर उमटले. Black Lives Matter चा उदय या घटनेनंतर झाला. ब्लॅक पँथर ही हिंसक प्रतिकाराचा पुरस्कार करणारी संघटनाही अमेरिकेत नव्यानं तोंड वर काढत आहे.
।।
अमेरिकेत दक्षिणेतल्या राज्यात काळे गुलाम होते. गुलामी रद्द करणं यावरून दक्षिण आणि उत्तरेतली राज्यं यांच्यात लढाया झाला. हेच अमेरिकेतलं सिविल वॉर. या युद्धात गुलामी रद्द करणं या विषयाचा विजय झाला आणि १८६५ साली गुलामी बेकायदेशीर ठरवणारी तरतूद राज्यघटनेत  करण्यात आली.
१९६८ साली राज्यघटनेत कायद्यासमोर सर्व नागरीक (काळे, गोरे व इतर सर्व) समान आहेत असं सांगणारी १४वी सुधारणा करण्यात आली.
विश्वशाळांत काळ्यांना प्रवेश नव्हता, काळे गोरे अशी विभागणी होती. ती रद्द करणारा कायदा १९५४ साली करण्यात आला. १४वी घटना दुरुस्ती हा आधार घेऊन.
१९६४ मधे माणसागणीक मत हा कायदा झाला, सर्वांना मताधिकार मिळाला. १४वी घटना दुरुस्ती हा आधार.
१९६१ आणि १९६५ मधे अध्यादेश काढून  केनेडी आणि जॉन्सन या प्रेसिडेंटांनी  कोणाही माणसावर त्याचा वंश, धर्म, लिंग इत्यादी कारणांसाठी भेदभाव होता कामा नये असं  जाहीर केलं. आरक्षण किंवा कोटा असणार नाही परंतू काळा माणूस लायक असेल तर त्याला नोकरी-शिक्षण-व्यवसायात संधी नाकारता कामा नये असं या अध्यादेशांनी जाहीर केलं. अमेरिकेत याला सकारात्मक कारवाई (अॅफर्मेटिव अॅक्शन ) असं म्हणतात.
।।
  राज्यघटनेनुसार काळ्यांवर अन्याय करणं, त्यांना विनाकारण अटक करणं, त्यांना बेकायदेशीर मारणं, त्याला न्यायालयात जायला मनाई करणं, त्याला नोकरी नाकारणं बेकायदेशीर आहे.
।।
हिलरी क्लिंटन आणि डॉनल्ड ट्रंप दोघांनीही अमेरिका एकसंध ठेवली पाहिजे असं ठासून म्हटलं आहे. काळे गोरे ही दरी रुंदावत आहे, देश दुभंगत आहे हे दोघांनाही मान्य आहे. ट्रंप यांचं म्हणणं की ब्लॅक लाईव्ज मॅटर व इतर काळ्यांच्या संघटना हिंसक असून त्या विनाकारण गोऱ्यांवर आरोप करत आहेत, त्यामुळंच देश दुभंगण्याच्या वाटेवर आहे. हिलरी क्लिंटन काळे गोरे दरी बुजावी, देश एक व्हावा असं म्हणत आहेत. 
ट्रंप रीपब्लिकन आहेत. काळ्यांना गुलामीतून मुक्त करणारे अब्राहम लिंकन रीपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते.  सामान्यतः रीपब्लिकन हा पक्ष कंझर्वेटिव मानला जातो, बिझनेसवाल्यांचा पक्ष मानला जातो, गोऱ्यांचा पक्ष मानला जातो. ट्रंप यांना गोऱ्यांचा पाठिंबा आहे, काळ्यांबद्दल अढी असणाऱ्या, काळ्यांचा  द्वेष असणाऱ्या गोऱ्या समाजगटांचा पाठिंबा आहे. 
डेमॉक्रॅटिक पक्ष सामान्यतः समानता मानणाऱ्यांचा, नागरी अधिकार काळ्याना मिळाले पाहिजेत असं मानणाऱ्यांचा, काळ्यांना झुकतं माप देणाऱ्यांचा पक्ष आहे. जॉन एफ केनेडी याच पक्षाचे होते. हिलरी क्लिंटन डेमॉक्रॅट असल्या तरी काळ्यांना हिलरींबद्दल आपुलकी वाटत नाही. हिलरी   कायदे करून, आर्थिक मदत करून काळ्यांची परिस्थिती सुधारेल असं म्हणतात. काळ्यांचं म्हणणं आहे की काळ्यांची परिस्थिती कायदे करून सुधारणार नाही. शैक्षणिक संस्थामधे काळ्यांना प्रवेश, काळ्यांचे मानवी अधिकार, काळ्यांचे नागरी अधिकार इत्यादी गोष्टी १९६० नंतर कायद्यानंच ठरवून दिल्या आहेत. त्यात आता नव्यानं करण्यासारखं काहीही नाही. सारे कायदे असूनही   काळ्यांची परिस्थिती सुधारत नाही याचं कारण गोऱ्यांची मनं आणि हृदयं यातच काळ्यांबद्दलचा द्वेष आहे, गोऱ्यांच्या मनात आणि हृदयात दुरावा आहे.   अमेरिकेचं, गोऱ्यांचं मन आणि हृदय बदलत नाही तोवर काळ्यावरचा अन्याय थांबणार नाही असं काळ्यांचं मत झालं आहे. ओबामा हा काळा माणूस आठ वर्षं राष्ट्राध्यक्ष झाला खरा पण गोऱ्यांचं मन त्यांना बदलता आलं नाही असं काळ्यांना वाटतं.
।।
काळे गोरे यांच्यातला अविश्वास, राग हे वास्तव दोन्ही उमेदवारांच्या लक्षात आलेलं दिसत नाही. दोन्ही उमेदवार प्राथमिक निवड मोहिमेत सक्रीय असतानाच अमेरिकेत गोऱ्या पोलिसांनी निःशस्त्र काळ्यांना गोळ्या घातल्याच्या घटना घडल्या. देशभर निदर्शनं उसळली. नंतर काळ्यांनी गोऱ्या पोलिसांना गोळ्या घातल्या. गेली चार पाच वर्ष धुमसत असलेला काळ्यांचा असंतोष या घटनांमधून उफाळून आला तेव्हां उमेदवार या विषयावर बोलू लागले. दोन्ही पक्षांचे पुढारी, गव्हर्नर, खासदार गेल्या आठेक वर्षात या विषयावर फारसं बोलताना किवा काम करतांना दिसले नाहीत. ओबामा भाषणं करत. या भाषणांत काळ्यांच्या स्थितीबद्दलची काळजी व्यक्त होत असे. त्यांचा सूर नेल्सन मंडेला यांच्यासारखा असे.   कोणीही कोणावरही अन्याय करू नये असा. मुख्यतः गोऱ्यांकडून काळ्यांवर अन्याय होत आहे, काळ्यांकडून गोऱ्यांवर नव्हे हे दाहक सत्य ते मांडत नव्हते.
गोऱ्यांच्या मनातला काळ्यांचा द्वेष दूर कसा होणार, दूर कसा करणार?

।।
जुनी पुस्तकं, दर्जेदार कचरा.

जुनी पुस्तकं, दर्जेदार कचरा.

जुनी पुस्तकं, दर्जेदार कचरा.
अमेरिकेत लोकांकडं बऱ्यापैकी पैसे असतात. प्रवास करायला निघताना बरेच अमेरिकन एकादं पुस्तक विकत घेतात आणि प्रवास संपल्यानंतर पुस्तक विमानतळावरच्या किवा रेलवे स्टेशनवरच्या कचऱ्याच्या टोपलीत टाकून देतात. मायामीच्या किवा कुठल्याही समुद्र किनाऱ्यावर अनेक पुस्तकं पडलेली असतात, ओली होऊन कुजत असतात. 
हे जितकं खरं तितकंच अमेरिकन माणसं जुनी पुस्तकं टाकून देत नाहीत, विकतात, विकत घेतात हेही तितकंच खरं. म्हणूनच अमेरिकाभर जुनी पुस्तकं घेणारी आणि विकणारी किती तरी महाकाय दुकानं आहेत.
।।
बेंट कॉर्नर्स युज्ड बुक्स. जुन्या पुस्तकाचं दुकान.  बॉईसी, आयडाहो राज्य, अमेरिका.
शेजारी इतर अनेक दुकानं.
साधारणपणे दुपारी बाराची वेळ. दुकानाच्या दारात एक फोर्ड गाडी उभी रहाते. नव्वदीतली फोर्ड गाडी चालवणारी नव्वदीच्या घरातली ज्युडिथ   हातात एक पुस्तकांची चळत घेऊन उतरते. डाव्या हातानं दुकानाचं दार उघडून आत शिरते.
मालक डेव हॅन्सन ज्युडिथचं स्वागत करतो. ज्युडिथ या दुकानात नेहमीच येत असल्यानं एक जिव्हाळ्याचं नातं दोघांच्या हावभावात दिसतं.
ज्युडिथनं आणलेली पुस्तकं डेव टेबलावर ठेवतो. मोजतो. नोंद करतो, खाली ठेवलेल्या टोपलीत टाकतो.
” दुसरी पुस्तकं विकत घेणारेस की या पुस्तकांचे पैसे हवेत?” डेव  विचारतो.
” चार पुस्तकं पुन्हा घेईन, दोनाचे पैसे दे.” ज्युडिथ.
डेव पैसे देतो, ज्युडिथ दुकानाच्या आत जाते, पुस्तकांच्या रॅकमागे दिसेनाशी होते.
डेवचं दुकान जुन्या पुस्तकांची देवाण घेवाण करतं.
दुकानात सुमारे २५ हजार पुस्तकं आहेत. काही पुस्तकं पुठ्ठा बांधणीची आहेत, काही साध्या बांधणीची, पेपरबॅक सारखी. 
पुठ्ठा बांधणीची म्हणजे जाडजूड उंचीपुरी पुस्तकं. यातल्या काही पुस्तकांवर किमतीची चिठ्टी लावलेली आहे, काही पुस्तकांवर चिठ्ठी नाही. चिठ्ठी लावलेल्या पुस्तकांवर पुस्तकाची किमत लिहिली आहे. किमती पंधरा डॉलर, दहा डॉलर, सतरा डॉलर अशा आहेत. किमती न लिहिलेल्या पुठ्ठा बांधणी पुस्तकाची प्रत्येकी सरसकट किमत दीड डॉलर आहे. कुठलंही पुस्तक घ्या, फक्त दीड डॉलर, म्हणजे सुमारे शंभर रुपये.
 दीड डॉलर किमतीची पुस्तकं नवी कोरीच आहेत. बॉब वुडवर्ड या वॉशिंग्टन पोष्टच्या पत्रकारानं लिहिलेली बुश, क्लिंटन, रेगन इत्यादी प्रेसिडेंटवरची गाजलेली प्रत्येकी चार सहाशे पानांची पुस्तकं दीड डॉलरला मिळतात. वॉटरगेट बॉबनीच बाहेर काढलं होतं. ऑल दी प्रेसिंडेंट्स मेन हे बॉबचं बरंच गाजलेलं पुस्तकही दीड डॉलरला.
बाकीची पुस्तकं त्याच्यावर छापलेल्या किमतीच्या अर्ध्या किमतीत. मुराकामीची अगदी ताजी कादंबरी अर्ध्या किमतीत मिळत होती. आठ डॉलरला. तेच पुस्तक अॅमेझॉनवर चार डॉलरला मिळत होतं. परंतू पाठवणावळ होती चार डॉलर. त्यामुळं दुकानातच जुनं पुस्तक घेणं परवडतं. शिवाय हवं असल्यास वाचून झाल्यावर ते परत करता येतं.
दीड डॉलर किंवा अर्ध्या किमतीतली पुस्तकं पैसे टाकून विकत घ्यायची. वाचून झाल्यावर याच दुकानात आलं तर दीड डॉलरचं पुस्तक डेव विकत घेत नाही पण बाकीची पुस्तकं छापील किमतीच्या पंचवीस टक्के किमतीत विकत घेतो. वाचलेली पुस्तकं ठेवायची, नवी घ्यायची किंवा नवी नको असतील तर पंचवीस टक्केप्रमाणं पैसे घ्यायचे.
ज्युडिथ पुस्तकांच्या रॅकमधे पोचते न पोचते तोवर एक सहा फुटी म्हातारा माणूस काऊंटवर पोचला. त्यानं एक पुस्तक  परत करायला आणलं होतं. त्याला कुठल्याशा लेखकाचं पुस्तक हवं होतं. त्यानं आधी येऊन आणि फोनवरून डेवला त्या लेखकाचं आणि पुस्तकाचं नाव सांगितलं होतं. डेवनं ते पुस्तक बाजूला काढून ठेवलं होतं. या माणसानं ते पुस्तक घेतलं. नव्या पुस्तकाची अर्धी किमत आणि परत केलेल्याची पंचवीस टक्के यातली बेरीज वजाबाकी झाल्यावर डेवनं काही पैसे त्या माणसाला परत केले. तीन चार मिनिटं दोघं एका लेखकाबद्दल बोलले. हे बोलणं सुरु असतानाच आणखी दोन महिला आल्या. एक मध्यम वयीन आणि एक वयस्क. त्या महिला आल्या म्हणून सहा फुटी माणूस दूर झाला आणि निघून गेला.
मध्यमवयीन महिलेनं दोन पुस्तकं ठेवली आणि नवी पुस्तकं घ्यायला तीही रॅकमागे दिसेनाशी झाली. वयस्क महिलेनं दहा बारा पुस्तकं आणली होती. ती सगळीच्या सगळी पुस्तकं विकण्यासाठी होती. डेवनं हिशोब करून पैसे दिले.
“या आजी आणि यांच्यासारखी किती तरी माणसं कुठून कुठून पुस्तकं गोळा करतात आणि विकायला आणतात. हा एक व्यवसायच आहे. त्या पुस्तकं कुठून आणतात ते आम्ही विचारत नाही. कोणीही कुठलीही पुस्तकं आणावीत, पंचवीस टक्के किमतीत ती आम्ही विकत घेतो.” डेव म्हणाला.
डेव पाठ्यपुस्तकं ठेवत नाही. कारण इथल्या विद्याशाळांत पाठ्यपुस्तकं दर वर्षी बदलत असतात. त्यामुळं जुन्या पाठ्यपुस्तकाला किमत शून्य.
मेरिडयनमधे वाचणारी अनेक माणसं आहेत, त्यांना नवी पुस्तकं परवडत नाहीत. ही माणसं लक्ष ठेवून त्यांना हवी ती पुस्तकं घेण्यासाठी डेवच्या दुकानात येतात.
दिवसाला हजारेक पुस्तकं येतात.
या दुकानाच्या मेरिडियन आणि नँपा या लगतच्या शहरात दोन शाखा आहेत. डेव आणि त्याची पत्नी मिळून हे दुकान चालवतात. डेव कंप्यूटर इंजिनियर आहे. त्याला पुस्तकांची आणि वाचनाची आवड आहे. राजकारण, सभोवतालच्या कटकटी, टेररिझम इत्यादी गोष्टींनी त्याचं डोकं पिकतं. म्हणून तो सायन्स फिक्शन वाचतो. नोकरीचा कंटाळा आला म्हणून हे दुकान त्यानं २००५ साली उघडलं.  नंतर नँपामधे २००७ साली आणि मेरिडियनमधे  २०१२ साली दुकान उघडलं. कुठं कुठं माणसं घरं विकतांना पुस्तकं काढून टाकतात तेव्हां ती पुस्तकं घ्यायला डेव स्वतः जातो. माणसं गॅरेज सेल करतात. म्हणजे घरातल्या अनेक वस्तू काढून टाकतात. त्यातली पुस्तकं घ्यायला डेव जातो.
डेवचा उद्योग चांगला चाललाय.
पॉवेल्स बुक्स.
दुकानाचं ब्रीद वाक्य आहे ‘पुस्तकं विकत घ्या, वाचा, विका’
अमेरिकेतल्या महाकाय पुस्तकांच्या गणनेत ओरेगनमधील पोर्टलँड या शहरातल्या पुस्तक दुकानाचा नंबर लागतो. या दुमजली दुकानातल्या किरकोळ विक्रीच्या पुस्तकांचं क्षेत्रफळ १.६ एकर (६८ हजार चौफू) आहे. १९७१ साली हा उद्योग प्रथम शिकागोत सुरु झाला. तिथून तो पोर्टलँडमधे सरकला. पोर्टलँडमधेही तो विविध ठिकाणी हलत हलत सध्याच्या जागी आलाय.  पुस्तक विकत घेणाऱ्या लोकांच्या सोयीची असल्यानं ही जागा निवडण्यात आली.
दुकानात नवी आणि जुनी पुस्तकं विकली जातात. दररोज सुमारे ३००० पुस्तकं हे दुकान खरेदी करतं. दुर्मिळ पुस्तकांचाही साठा दुकानात आहे. सीडी, डीव्हीडी, ऑडियो पुस्तकं, ईपुस्तकं इत्यादी गोष्टीही विकल्या जातात. काऊंटवर व्यवहार होतात आणि इंटरनेटवरही खरेदी होते. आज या दुकाना पुस्तकाचं उत्पन्न सुमारे दहा कोटी डॉलर आहे.
अमेरिकेत कॅलिफोर्निया, मिनेसोटा, नॉर्थ कॅरोलायना, व्हर्जिनिया, वॉशिंगटन, न्यू यॉर्क व इतर राज्यात जुन्या पुस्तकांची पॉवेल बुक्ससारखीच महाकाय दुकानं आहेत. प्रत्येक दुकानाची एकेक खास बात आहे. मिनेसोटात कॉमन गुड बुक्स नावाचं दुकान आहे. दुकानाच्या मालकाचा माणूस जाम विनोदी. दुकानात ठायी ठायी मालकाच्या खुणा दिसतात. जुन्या पुस्तकाच्या कपाटावर एका ठिकाणी फलक आहे दर्जेदार कचरा. quality trash. फुल सर्कल बुक स्टोअर या ओक्लाहोमा सिटीतल्या दुकानात ऊंच छतापर्यंत पुस्तकं ठेवलेली आहेत. खरेदी करणाऱ्यांनी शिड्या लावून पुस्तकं निवडायची. मेगर्स अँड क्विन या मिनिओपोलिसमधल्या पुस्तकाच्या दुकानात जुनी पुस्तकं तर आहेतच पण तिथं पुस्तक-साहित्य या विषयावर जाहीर कार्यक्रम होता, काव्य वाचनाचे जाहीर कार्यक्रम दरमहा होतात.
अशा महाकाय दुकानामधे एक आहे  डेट्रॉईटमधलं John K. King, Used and Rare Books नावाचं १९३० पासून चालत आलेलं दुकान आहे. या दुकानाची गंमत म्हणजे  पोर्नोग्राफी पुस्तकात (मराठीत चावट पुस्तकं) रस असणारी माणसं अमेरिकाभरून या दुकानात येतात. जुनी जुनी चावट पुस्तकं इथं मिळतात. जवळ जवळ ९०० विविध प्रकारची पुस्तकं या दुकानात मिळतात. काही कपाटं केवळ नऊ सेंट किमतीच्या पुस्तकांची. या दुकानात खूप जुनी नियतकालिकंही पहायला, विकायला ठेवली आहेत. एका नियतकालिकात अर्नेस्ट हेमिंगवे च्या पुस्तकाचं परीक्षण आहे. हेमिग्वेनं ते मासिक पाहिलं, त्यातलं आपल्या पुस्तकावरचं परिक्षण वाचलं आणि त्या पानावर स्वतःच्या हस्ताक्षर आणि सहीसह लिहिलं ‘ blah.. blah .. blah ‘ 


किंगमधे दररोज ढिगानं पुस्तकं येत असत. जुनी. मॅनेजरचं एक किचकट काम म्हणजे ती पुस्तकं पहायची आणि त्याची किमत ठरवायची. मॅनेजरला पुस्तकाचं कव्हर पाहूनच पुस्तकाच्या मोलाचा अंदाज येत असे. पुस्तकाचा लेखक कोण, किती जुनं प्रकाशन, लेखकाची किवा नामांकिताची सही असणं इत्यादी कसोट्या होत्या. महत्वाचं वाटलं की पुस्तकाची सगळी पानं मॅनेजर चाळून पहात असे.
१९८७ मधे मार्क ट्वेनचं तीन खंडातलं चरित्र एका माणसानं किंगला विकलं. मॅनेजर ते चाळत असताना एका खंडातून तीन फोटो खाली पडले. फोटो मार्क ट्वेनचे होते. ट्वेन एका गाढवाच्या गाडीतून एका तरुण मुलीबरोबर प्रवास करत होता. फोटोमागे पेन्सिलिनं तारीख लिहिली होती १९०८. ट्वेनच्या चरित्रात १९०८ साली बर्म्युडामधे ट्वेन मार्गारेट ब्लॅकमर या तरुणीला भेटल्याचा उल्लेख होता. मार्क ट्वेनचा अभ्यास असणाऱ्या लोकांनी वरील फोटो आणि नोंद खरी आहे असं सांगितलं. त्या दिवशी डेट्रॉईटच्या पेपरात ती हेडलाईन होती.
किंगनं ते फोटो एका संस्थेला खूप किमतीला विकले.
डेट्रॉईट शहर खलास होतंय. तिथला कार उद्योग खलास झाला आहे. माणसं शहर सोडून चाललीत. डेट्रॉईटमधे शिल्लक असणाऱ्या लोकांची हालत फार वाईट आहे. जगणं कठीण झालंय. त्यामुळं ९ सेंटचं पुस्तकही विकत घेण्याची ताकद डेट्रॉईटवासियांत राहिलेली नाही. त्यामुळं हे दुकान आता बंद होतंय.
।।

ट्रंप हा भीषण माणूस कां लोकप्रिय होतोय?

ट्रंप हा भीषण माणूस कां लोकप्रिय होतोय?

  
ट्रंप हा भीषण माणूस कां लोकप्रिय होतोय?
THE WORST PRESIDENT IN HISTORY
THE  LEGACY OF BARACK OBAMA    
MATT MARGOLIS & MARK NOONAN
Victory Books
डोनल्ड ट्रंप एक भीषण माणूस आहे. स्वतःचा ब्रँड तयार करणं हे त्याच्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट आहे. घटं विंद्यात, पटं छिंद्यात. लोकांचं लक्ष वेधणं हेच तंत्र. तो पक्षाचा कार्यकर्ता नाही. त्याचा कुठल्याही विषयाचा अभ्यास नाही. व्यवसायातही लोकांना फसवण्याचा त्याचा इतिहास आहे. देशाचं नेतृत्व करण्यासाठी आवश्यक गुण त्याच्याजवळ नाहीत. सुरवातीलाच त्यांनी सांगून टाकलं की मेक्सिकन लोक बलात्कारी असतात, व्यसनी असतात, स्मगलिंग करतात. ओबामांचं जन्मसर्टिफिकेट खोटं आहे असं ते आजही म्हणतात. नऊ अकराच्या घटनेनंतर न्यू जर्सीत हज्जारो मुसलमानांनी जल्लोष साजरा केला असं ते बोलले. आपल्याजवळ पुरावे नाहीत, आपण तसं ऐकलं होतं असं खुश्शाल सांगतात. नुकतंच ते म्हणाले की ओबामा आयसिसचे संस्थापक आहेत.जाहीर सभेमधे ते म्हणाले की ” आपलं लिंग भरपूर मोठं आहे, विरोधकांनी त्याची काळजी करू नये “. खुद्द त्यांच्याच पक्षातले कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या विरोधात असतात. 
तरीही करोडो लोकांनी त्यांना पाठिंबा दिलाय आणि लोकप्रियतेत ते बरेच वेळा हिलरी क्लिंटन यांच्या पुढं असतात.
हा काय प्रकार आहे?
त्यांच्या लोकप्रियतेचं रहस्य ओबामा यांच्या कारकीर्दीच्या अपयशामधे दडलेलं आहे. ओबामा यांच्या कारकीर्दीत अमेरिकन अर्थव्यवस्था ढेपाळली, सामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती खालावली. काळे गोरे दरी त्यांच्या कारकीर्दीत रुंदावली. बेकारीचा फटका गोऱ्यांनाही बसला. त्यामुळ ना काळे सुखी ना गोरे सुखी अशी स्थिती झाली. ओसामा बिन लादेनला टपकवणं, इराणशी संबंध सुधारणं आणि शेवटी शेवटी क्यूबाशी संबंध प्रस्थापित करणं या अमेरिकन माणसाच्या सुखाशी थेट संबंधित नसलेल्या मोजक्या कामगिरींव्यतिरिक्त ओबामांच्या जमेच्या बाजूला फारशा गोष्टी नाहीत. ओबामा केअर ही सामान्य माणसासाठी तयार केलेली विमा-आरोग्य   व्यवस्था महत्वाकांक्षी जरूर होती परंतू ओबामांना ती पूर्णपणे यशस्वी करणं जमलं नाही.
फारसं काहीही घडलेलं नसलं तरी माध्यमांनी ओबामांवर टीकेची झोड उठवली नाही.  आठेक वर्षं ओबामांच्या विरोधात फारसं काही कानावर आलं नाही.   पहिलाच काळा माणूस राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळं माणसं क्षमाशील झाली असावीत. त्यांच्या कारकीर्दीत आर्थिक भ्रष्टाचार, सेक्स स्कँडल, भानगडी झाल्या नाहीत. आठही वर्षं ओबामा सभ्यपणे वागले, सुसंस्कृत वागले. त्यांची पत्नी, त्यांच्या मुली, त्यांचे सहकारी यापैकी कोणावरही किटाळ उडालं नाही. म्हणून कदाचित त्यांच्या कारकीर्दीचं तटस्थ विश्लेषण घडलं नाही. 
” काही कां असेना.काही गोष्टी भले जमल्या नसतील. निदान जगाचं आणि देशाचं भलं करण्याची भाषा तरी करत होता. निदान सभ्य आणि बुद्धीमान तरी होता.त्यांनी खूप प्रयत्न केला पण काही कारणानं त्यांना जमलं नसेल ” असं जगभरच्या जनतेला वाटल्यानं कदाचित त्यांच्या कारकीर्दीचा जमाखर्च मांडला गेला नसेल.
 २०१० साली म्हणजे निवडून आल्यावर दोन वर्षांनी एका सभेत व्हेल्मा हार्ट या आफ्रिकन महिलेनं ओबामाना थेट सांगितलं ” तुमचं समर्थन करता करता मी थकलेय. तुमच्या प्रशासनाचं समर्थन करता करता थकलेय. तुमच्या कारकीर्दीबद्दल मी निराश आहे. काही घडत नाहीये.”
या सभेनंतर व्हेल्माची नोकरी केली. कशी बशी दुसरी नोकरी मिळाली. २०११ साली व्हेल्माची मुलाखत गार्डियनच्या बातमीदारानं घेतली. व्हेल्मा म्हणाली ” आम्ही ओबामाला मतं दिली ती त्यांनी आम्हाला मिठ्या माराव्यात आणि आम्हाला किस करावं यासाठी नाही. आम्ही मतं दिली आमच्या कुटुंबाच्या, आमच्या समाजाच्या सुखासाठी.  त्यातलं फारसं काही घडत नाहीये. ओबामा ठाम निर्णय घेत नाहीत..” ओबामा  निर्णय अमलात आणत नाहीत, नुसतं बोलतात, छान बोलतात.
मार्गलिस आणि नूनन यांनी लिहिलेल्या वरील पुस्तकात  ओबामांचं अपयश   ठळकपणे मांडलं आहे. ओबामांवर तीव्र टीका ऐकण्याची सवय नसल्यानं जगभरचे वाचक निश्चितच बुचकळ्यात पडतील. 
लेखकांनी मांडलेले मुद्दे असे-
*ओबामा २००८ साली अध्यक्ष झाले तेव्हां अमेरिकेची अर्थव्यवस्था संकटात सापडली होती. आर्थिक प्रगतीचा वेग – ०.९२टक्के  झाला होता. २०१६ साली ओबामांची कारकीर्द संपताना अमेरिकेचा आर्थिक प्रगतीचा वेग फक्त १.३ टक्के आहे. म्हणजे आठ वर्षांच्या खटपटीनंतर फक्त ०.४ टक्केच वाढ  ओबामांना शक्य झाली आहे.
*ओबामांच्या कारकीर्दीच्या सुरवातीला गरीबी (poverty rate)  १२.५  टक्के होती ती २०१६ साली १४.५ टक्क्यावर स्थिरावली आहे. २००८ ते २०१२ या काळात गरीब मुलांची संख्या १७ लाखानी वाढून २.४२ कोटी म्हणजे एकूण मुलांच्या एकतृतियांश झाली.२०१४ साली ६५ टक्के  मुलं सरकारी मदतीवर जगणाऱ्या कुटंबातली होती.
*ओबामांची कारकीर्द सुरु झाली तेव्हां २७ आठवड्यांपेक्षा जास्त काळ बेकार असणाऱ्यांची संख्या २६लाख होती. २०१० साली ती संख्या ६८ लाख होती. परिस्थिती सुधारल्यावर ती संख्या २०१४ साली २८ लाख झाली. म्हणजे परिस्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही. बेकारीच्या संदर्भातली आणखी एक माहिती  अशी. सोळापेक्षा जास्त वयाच्या कामावर असलेल्या माणसांचं  प्रमाण २००७ साली ६६ टक्के होतं, ओबामांची कारकीर्द संपताना ते प्रमाण ६२.९ टक्के झालं. २००८  साली अमेरिकेत ५.८  टक्के बेकारी होती, २०१५साली ती  ५.० टक्के झाली. लेखकांचं म्हणणं आहे की अल्प काळ कामावर असलेले आणि काम करायचं थांबलेले discouraged workers त्यात मिळवले तर खरी बेकारी १०.४ टक्के होते.
ओबामांच्या कारकीर्दीत तूट वाढली,कर्जं वाढली, विद्यार्थ्यांचं कर्जबाजारीपण आणि फी वाढली, सामान्य आणि मध्यम वर्गीय माणसाचं उत्पन्न घटलं, काळे आणि गोरे यांच्यातली विषमता वाढली, मध्यमवर्ग आक्रसला आणि अमेरिकन समाजातली एकूण विषमता वाढली, सामान्य माणसावरचे कर वाढले आणि श्रीमंत कॉर्पोरेन्सवरचे कर कमी झाले इत्यादी गोष्टी लेखकांनी आकड्यानिशी मांडल्या आहेत.
 लेखकांचे निष्कर्ष पुराव्यांवर आधारलेले आहेत. अधिकृत आकडेवारी लेखकांनी पुस्तकात मांडली आहे. पुस्तकं आणि सरकारी प्रकाशनं यांचे ११०० संदर्भ लेखकांनी दिले असून पुस्तकाची ४८ टक्के पानं संदर्भसूचीसाठी खर्च केली आहेत.  
२०१४साली वॉल स्ट्रीटवरच्या निदर्शनांनी सिद्ध झालं की समाजातल्या १ टक्का लोकांकडं देशातली  २० टक्के संपत्ती आहे आणि त्या एक टक्क्यांतही दहा टक्क्यांकडं जास्त संपत्ती गोळा झालीय. ओबामांच्याच पक्षाचे उमेदवार बर्नी सँडर्स यांनी विद्यार्थ्यांचं कर्जबाजारीपण, वाढलेली विषमता आणि बेकारी यांवर बोट ठेवलं. औषधांच्या किमती भरमसाठ वाढवणाऱ्या लोभी औषध कंपन्यांवर पुराव्यासहित हल्ला सँडर्स यांनी केला. चारातला एक माणूस औषध न परवडण्यानं मरतो असं विधान सँडर्स यांनी केलं. ओबामा अपयशी झाले आहेत असं न म्हणता सँडर्स म्हणाले की ओबामा आरोग्य व्यवस्थेत खूप सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
   गेल्या आठ वर्षात गोऱ्या पोलिसांनी काळ्यांना निष्कारण मारलं. काळ्यांनी चिडून ठरवून गोऱ्या पोलिसांना गोळ्या घातल्या. प्रमाणाबाहेर काळी माणसं तुरुंगात आहेत. काळे गोरे दरी वाढल्यानंच दी ब्लॅक लाईव्ज मॅटर ही संघटना अमेरिकेत सक्रीय झालीय. 
आज अमेरिकेतल्या काळे, लॅटिनो माणसांची स्थिती वाईट आहे. गेल्या आठ वर्षात ती सुधारली नाही, उलट खालावली. ५५ टक्के गोऱ्यांमधेही मध्यम वर्गातल्या आणि कामगार वर्गातल्या गोऱ्यांच्या नोकऱ्या जात आहेत.चिनी लोक स्वस्तातली उत्पादनं अमेरिकेत विकत असल्यानं आपली बेकारी वाढतेय, बाहेरून आलेले लॅटिनो कमी पैशावर काम करत असल्यानं आपल्या नोकऱ्या जाताहेत असं गोऱ्या अमेरिकन तरुणांना वाटत आहे.
ओबामा प्रशासनाला वरील प्रश्न हाताळणं जमलं नाही. आर्थिक प्रगती व्हावी व ती प्रगती समाजाच्या सर्व थरात झिरपावी अशी ओबामांची इच्छा होती. त्यांची इच्छा फलद्रूप झाल्याचं अमेरिकन लोकांना पहायला मिळालं नाही. २००७ सालच्या संकटाला कारणीभूत असलेल्या लोभी आणि गुन्हेगार बँकिंग माफियावर ओबामा यांनी कारवाई केली नाही, एकही माणूस तुरुंगात गेला नाही. उलट त्या संकटाचा फटका लाखो मध्यम वर्गीयांना बसला. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी फी आणि कर्ज व्यवस्थेमधे ओबामांनी सुधारणा सुचवल्या. प्रत्यक्षात उलटंच घडलं, शिक्षण महागलं, बेकार शिक्षितांची संख्या वाढली, कर्जाचा डोंगर विद्यार्थ्यांच्या बोडक्यावर बसला. 
अमेरिकन समाजाची एक घडी बसली आहे. जबरी धनीक, कॉर्पोरेशन्स, वकील, नोकरशहा आणि विद्यापीठं यांची एक माफिया टोळी अमेरिकेत तयार झाली आहे. याच टोळीच्या मदतीवर अमेरिकन अध्यक्ष निवडून येतो. ओबामा वरील टोळीच्या दबावाखाली दबले असावेत. त्यामुळं त्यांच्या वैचारिक-मानवी इच्छा फलद्रूप होऊ शकल्या नाहीत.
जनतेला रुपये आणे पैच्या हिशोबात सुखं हवी असतात. शांतता, बंधुभाव, समानता, न्याय इत्यादी शब्दांचं उच्चारण पुढारी जेव्हां करतात तेव्हां भाषण चांगलं झालं असं म्हणून लोक टाळ्या वाजवतात आणि माध्यमं स्तुती करतात. पण त्याचा परिणाम बहुतांश लोकांच्या दैनंदिन जगण्यावर झालेला दिसायला हवा.
याचाच फायदा ट्रंप यांना मिळतो आहे.
अमेरिकेची स्थिती चिंताजनक आहे.
।।

फक्त ३५० पिरहा आदिवासीं उरलेत

फक्त ३५० पिरहा आदिवासीं उरलेत

  पेरू या दक्षिण अमेरिकेतील देशात  पिरहा (Piraha) या १० ते१५ हजार वर्षांपासून रहाणाऱ्या आदिवासी जमातीची आता जेमतेम ३२० माणसं शिल्लक आहेत. Maici या अॅमेझॉनच्या उपनदीच्या काठावरच्या एका जंगलात ते रहातात. ही जमात टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभ्यासकांना पिरहांच्या भाषेचा अभ्यास करतांना भाषा शास्त्रातल्या प्रचलित सिद्धांताला धक्का देणाऱ्या गोष्टी आढळल्या. सापडलेल्या वास्तवामुळं भाषा शास्त्रात एक नवीच खळबळ उडाली.
पिरहा भाषेत संख्या नाही. म्हणजे एक, दोन, पन्नास असे आकडे, मोजदाद नाही. 
पिरहा भाषा केवळ आठ व्यंजनं आणि तीन स्वर आहेत. इतक्या मोजक्या साधनांनिशी बोलत असल्यानं केवळ आवाजातले चढ उतार आणि स्वराची तीव्रता यात बदल करून ते वेगवेगळ्या अर्थांचे शब्द तयार करतात. शब्दातलं शेवटचं अक्षर किती लांबवलं यावरून त्याचा अर्थ बदलतो. मित्र असा शब्द असेल आणि त्याचं शेवटलं अक्षरं लांबवलं की त्याचा अर्थ शत्रू असा होतो. 
पिरहा भाषेतली वाक्यरचना सरळ असते, एकात एक गुंतवलेलं वाक्य त्या भाषेत नाही. म्हातारा आणि काठी. ” घरून निघालेला एक म्हातारा हातात काठी घेऊन बाजारात जात आहे ” असं वाक्य पिरहा वापरत नाहीत. मोजकी नामं. नामांना  जोडण्यासाठी अव्ययं नसल्यानं पिरहा तुटक तुटक बोलतो. त्यांचं बोलणं फक्त त्यांनाच समजतं. बरेच वेळा ते  शीळ वाजवतात, गाण्यासारखं गुणगुणतात, तेच त्यांचं बोलणं. बहुतांश खेळ शब्दांचा नव्हे, स्वरांचा, सुरांचा.
पिरहा भाषेत रंगाला शब्द नाही. लाल, गुलाबी, नारंगी, पिवळा अशा संज्ञा वापरून ते रंगाचं वर्णन करू शकत नाहीत. त्यांच्या लेखी रक्त म्हणजे लाल. एक फळ दाखवून त्याला ते नारंगी म्हणतात.
भाषेबाबत नोएम चॉम्स्की यांचा सिद्धांत प्रमाण मानला जातो.  भाषेचं व्याकरण माणसात जन्मजात असतं असा तो सिद्दांत. मूल जन्मतं.  कुठल्याही भूभागात. कुठल्याही संस्कृतीत. कुठल्याही धर्मात. ते व्याकरण घेऊनच जन्माला येतं. त्याला व्याकरण शिकवावं लागत नाही. 
चॉम्स्कींच्या म्हणण्याचा अर्थ असा की सभोवतालातून माणूस व्याकरण शिकत नाही, ते त्याला जन्मजात मिळतं. परिसर, सहवास याचा व्याकरणाशी संबंध नाही असा त्यांच्या सिद्धांताचा अर्थ.
पिरहांच्या बाबतीत प्रश्न असा पडला की त्यांच्या भाषेचं व्याकरण कां तयार झालं नाही, जगभरच्या इतर भाषांसारखी शब्द आणि व्याक्य निर्मिती त्या भाषेत कां निर्माण झाली नाही. चॉम्सकी यांच्या सिद्धांतानुसार त्यांच्याकडं जन्मजात व्याकरण असायला हवं होतं.
पिरहा जमातीचं जगणं आणि भाषा यातल्या संबंघांचं आता पाहू.
पिरहा १०- १५ हजार वर्षं प्राचीन असले, चौदाव्या शतकापासून अॅमेझॉनमधली संस्कृती बदलत गेली तरी त्या संस्कृतीचा परिणाम पिरहांवर झाला नाही. पिरहा भाषेमधे अव्ययं नाही, संख्या नाही, गुंत्याची वाक्यरचना नाही, नेमकेपणानं एकादा भाव वा ज्ञान व्यक्त करणारे शब्द नाहीत याचं कारण पिरहा माणसांनी सभोवतालच्या समाजात मिसळायला नकार दिला. पिरहांनी बाहेरचं जग नाकारलं.
अॅमेझॉनच्या खोऱ्यात पोर्तुगीझ वसाहतवादी शिरले तेव्हां १७०० सालाच्या सुमारास त्यांना पिरहा जमात दिसली. पोर्तुगिझांना शेती करायची होती, उद्योग उभारायचे होते. त्यासाठी नदीकाठचे भूभाग त्यानी हस्तगत केले. तिथल्या पिरहांचं काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर आला. जगात सर्वत्र घडलं तेच अॅमेझॉन खोऱ्यात घडलं. ऑस्ट्रेलिया, अमेरिका या ठिकाणी स्थानिक आदिवासींना हाकलून देण्यात आलं आणि ज्यांनी जायला नकार दिला त्यांना मारून टाकलं. पिरहा नदीच्या काठावून दाट जंगलात गेले. 
पेरू, ब्राझील या देशांत आधुनिक कसोट्यांवर विकास होत गेला. जंगलं तुटली, शहरं वसली, उद्योग उभे राहिले.काही हजारांची संख्या असलेली  पिरहा माणसं  जंगलातून हे सारं पहात होतं. कधी कधी जंगलाच्या काठावर येऊन बाहेरच्या जगात काय चाललंय ते पहात होती.
पिरहांना शेती करता येत नाही. ते बाण आणि दगडफेक करून मासे मारतात, प्राणी आणि पक्षी मारतात. कंदमुळं खातात. वनस्पती किकंदमुळं किंवा प्राणी शिजवणं, सुकवणं, अन्नाची साठवण करणं या भानगडीत पिरहा पडत नाहीत. भूक लागली की प्राणी खाऊन फस्त करायचे. भूक भागली नाही तर आणखी प्राणी मारायचे. भूक भागली की पुरे. आणखी प्राणी मारायचा नाही, कठीण काळासाठी प्राणी शिजवून-मसाले लावून साठवायचा नाही. 
वीस तीस हजार वर्षांपूर्वीचे व्यवहार पिरहांनी जपले. ते चित्रं काढत नाहीत. ते कपडे वापरत नाहीत. (आत्ता आत्ता ते बाहेरून आलेले टी शर्ट वापरतात. आता आता ते केळीचं झाड लावून केळी खायला शिकले आहेत.). ते दागिने तयार करत नाहीत. बिया आणि प्राण्यांचे दात यांच्या माळा करून ते वापरतात. अलंकरण त्यांना माहित नाही. त्यांच्याच  नृत्य नाही. ते चेहरे रंगवत नाहीत. 
 वस्तू मर्यादित,  व्यवहार मर्यादित, प्रक्रिया मर्यादित. त्यामुळं त्यांचं वर्णन करणारे शब्द मर्यादित. व्यवहारांत सरळपणा असल्यानं काँप्लेक्स वाक्य करायचीही आवश्यकता नाही. 
सोळाव्या शतकापासून सभोवताली एक वेगळं जगणं दिसू लागलं. पिरहा माणसं त्या जगण्यापासून दूर पळून गेली, ते जगणं स्विकारलं नाही, त्या जगण्यातल्या हव्यानकोचा विचार केला नाही. अधिकाधीक खोलवर जंगलात जात राहिली. या त्यांच्या व्यवहाराचा परिणाम म्हणून माणसं कमी जगत, लोकसंख्या कमी झाली, जमात नाहिशी होण्याच्या उंबरठ्यावर पोचली.
परसराशी संपर्क नसल्यानं व्याकरण तयार झाल नाही हा अभ्यासकांचा निष्कर्ष तयार झाल्यावर भाषाशास्त्रात खळबळ उडणं साहजिक होतं. स्टीवन पिंकर या भाषाशास्त्रज्ञानं हा अभ्यास प्रसिद्ध झाल्यावर म्हटलं की अभ्यासकांनी एक बाँब गोळाच टाकलाय.
परिसर आणि भाषा या दोन गोष्टींचा संबंध जेनेटिक्स विज्ञानातल्या सिद्दांतांना समांतर मानायला हवा. जेनेटिक्सची सुरवातीची माहिती अशी होती – जीव-वनस्पतीच्या मुळात गुणसूत्र असतात, जीन्स असतात. ही जीन्स जीव-वनस्पतीचं जगणं ठरवतात. ही गुणसूत्रं त्यांना आईवडिलांकडून मिळतात. कालांतरानं अभ्यास पुढं सरकल्यावर असं कळलं की माणूस काय खातो, कसा वागतो, कसा वावरतो, त्याच्या परिसरात कोणती रसायनं असतात यावरही गुणसूत्रांचं घडणं अवलंबून असतं. सौंदर्य प्रसाधनातली रसायनं हार्मोन्ससारखी वागत असल्यानं जास्त प्रसाधनं वापणाऱ्या माणसांची गुणसूत्रं बदलतात. भरमसाठ कॅलरीज खाणाऱ्या माणसांचीही गुणसूत्र बदलतात हे अभ्यासांनी सिद्ध केलं. 
तसंच भाषेच्या बाबतीत घडत असावं असा पिरहा भाषेचा अभ्यास सुचवतो. ज्या समाजात खूप आणि काँप्लेक्स घटना घडतात त्या भागातल्या लोकांचं व्याकरण अधिक संस्कारित, अर्थवाही, काँप्लेक्स असतं, भाषा अधिक काँप्लेक्स असते. सिंधू, गंगा, तैग्रिस युफ्राटिस, नाईल खोऱ्यातील समाजात, रोम आणि लंडनभोवतालच्या समाजात व्याकरण विकसित झालं. अॅमेझॉनच्या खोऱ्यात पिरहांच्या बाबतीत ते घडलं नाही.
 पिरहांना जन्मतः व्याकरण नव्हतं, ते त्यांनी बाहेरच्या जगातून शिकायलाही नकार दिला.
आता एक विचित्र परिस्थिती निर्माण झालीय. 
पिरहांचं काय करायचं? 
ते आहेत तसंच त्यांना टिकवून ठेवायचं? 
त्यांना समाजाच्या आधुनिक प्रवाहात आणायचं? 
समजा त्यांना आहेत तसंच राहू द्यायचं असेल तरीही अभ्यासासाठी त्यांच्याशी संपर्क करावाच लागेल आणि संपर्क केला रे केला की त्यांचं आदिम जीवन बदलेलच. अलिकडं ते केळी खायला शिकले आहेत. परंतू केळ्याची लागवड त्याना माहित नाही. ते शिकवलं म्हणजेच शेती शिकवली की मुळातले पिरहा शिल्लक रहाणार नाहीत.
काय करायचं? 
पिरहांच्या भाषेचा अभ्यास करताना मानवी समाजाच्या विकासाची प्रक्रिया समजली. हा एक मोठाच फायदा झाला. भाषेमधे,व्याकरणामधे दडलेली सत्यं बाहेर येऊन मानवी ज्ञान समृद्ध झालं. पण त्यातून नव्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. या समाजांना आहेत तसंच मरू द्यायचं की त्यांना आधुनिक करायचं.

आज काही माणसं म्हणतात की आदिवासींचं जीवन निसर्गाशी एकरूप झाल्यानं उत्तम होतं. आदिवासी जीवन आदर्श आहे असा या लोकांच्या म्हणण्याचा सूर असतो. आधुनिकता पर्यावरणाचा नाश करत असल्यानं आदिवासी भागात आधुनिक विकास होऊ नये असंही त्यांचं म्हणणं असतं. काही माणसं म्हणतात की त्यांना आधुनिक करावं पण सावकाशीनं. 
आधुनिकता म्हणजे काय यावरही अनेकांच्या विचारांत गोंधळ आहेत.
अशा परिस्थितीत पेरू आणि ब्राझिल या देशातल्या सरकारांनी विशेष विभाग तयार करून पिरहा इत्यादी आदिवासींना शेती शिकवणं, उद्योगात रोजगार देणं असे प्रयत्न सुरु केले आहेत. एकेकाळी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी तसे प्रयत्न केले होते. आदिवासी हे ख्रिस्ती नसल्यानं त्यांना मुक्ती मिळत नाही असं परस्पर ठरवून मिशनऱ्यांनी त्यांना ख्रिस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. चारेकशे वर्षं. पिरहांनी तो प्रयत्नही धुडकावून लावला.आता अद्यात्मिक मिशनऱ्यांची जागा आर्थिक मिशनऱ्यांनी घेतली आहे. त्यांना जमीन हवीय, जंगलं हवीयत, पाणी हवंय. त्यासाठीच पिरहा सारख्या जमातींची व्यवस्था लावायची त्यांची इच्छा आहे.
काळाला एकच दिशा आहे. काळ पुढं सरकत असतो, मागं वळत नसतो. माणसाचं मन मात्र  मागल्या काळात रमतं. तो काळ त्याला खुणावतो. कला, ज्ञान, इतिहास इत्यादी साधनांचा वापर करून माणूस मागल्या काळात रमतो. पण प्रत्यक्ष जगतांना पुढंच जातो. 
पिरहांनी पुढं जाणं नाकारलं. ते त्यांना जमलं.त्याची किमतही त्यानी मोजली.
आता पहायचं काय होतंय ते.
( डॅन एव्हरेट हे भाषज्ञ गेली तीसेक वर्षं पिरहा भाषेचा अभ्यास करत आहेत. बराच काळ ते पिरहांच्या काठावर वास्तव्य करतात. भाषाशास्त्र आणि आदिवासींचं जीवन या विषयावर उडालेली खळबळ त्यांच्याच अभ्यासामुळं निर्माण झालीय. )

।।मुंबई आणि भारतात टीबीचा हैदोस

मुंबई आणि भारतात टीबीचा हैदोस

टीबीच्या प्रसाराकडं दुर्लक्ष होतंय.
।।
दहीहंडी खेळून मराठी संस्कृती वाचवण्याचा प्रयत्न मुंबईत चालला असताना, मुंबई पालिकेच्या शाळेत सूर्यनमस्कार घालण्याची सक्ती करण्यावरून वाद चालला असताना, मुंबईत टीबीचे रोगी वाढलेत ही गोष्ट दुर्लक्षित राहिलेली दिसते.
मुंबईत दर वर्षी सुमारे ६० हजार माणसं टीबीनं बाधित होतात. (हा आकडा २०१० सालचा आहे.) ही माणसं सरकारी, खाजगी आणि वैद्यकीचं  अपुरं (चुकीचंही) ज्ञान असणाऱ्या माणसांकडं उपचारासाठी जातात. बहुसंख्य माणसं खाजगी डॉक्टरकडं जातात. मोजक्या  डॉक्टरांचं वर्तन सोडल्यास बहुतेक उपचार केंद्रात पाट्या टाकल्या जातात. नियमितपणे औषध घेणं, रोगाची प्रगती वेळोवेळी तपासणं या बाबतची माहिती रोग्यांना दिली जात नाही. माणसं उपचार काही दिवसांतच सोडून देतात. हॉस्पिटलात दाखल केलं गेलं तर तिथली आरोग्य व्यवस्था आणि उपकरणं निरुपयोगी असल्यानं रोग नाहिसा व्हायच्या ऐवजी इतर निरोगी लोकांना रोगाची लागण होते. औषधांत पंचवीस टक्के औषधं निरुपयोगी, दर्जाहीन असतात. थोडक्यात असं की मुंबईतली टीबीला तोंड देणारी व्यवस्था अत्यंत म्हणजे अत्यंत अपुरी आणि सदोष आहे. परिणाम असा की रोग दूर होत नाही, रोग्यांची संख्या वाढत जाते.
 भयानक गोष्ट म्हणजे औषधांना न जुमानणारे टीबीचे जंतू तयार होतात आणि रोगप्रसार वाढत जातो. कित्येक जंतू आणि रोगी कोणत्याही औषधांना दाद देत नाहीत. अशांची संख्या किती आहे ते कळायला मार्ग नाही.
टीबीची लागण झालेले रोगी, औषधांना दाद न देणारे जंतू घेऊन फिरणारे लोक, मुंबईत हिंडत असतात.मुंबईत रस्त्यावर, मार्केटमधे, बस किंवा ट्रेनमधे, सिनेमाघरात किंवा मॉलमधे, बारमधे किंवा खाणावळीत वावरतांना आपल्या असलेला माणूस टीबीचे जंतू बाळगणारा असण्याची दाट शक्यता असते.
मुंबईत एका किमीमधे ५० हजार माणसं दाटीवाटीनं रहातात. अर्धी माणसं अस्वच्छ वस्त्यांमधे रहातात. तिथं पाणी मिळत नाही. तिथं शुद्ध पाण्यात सांडपाणी मिसळतं. तिथले कचऱ्याचे ढीग कायम शिल्लक असतात, जंतू बाळगत आणि वाढवत. तिथं खड्डे असतात, जागोजागी पाणी साचलेलं असतं, त्यात डास वाढत असतात. माणसांना दररोज एक आंघोळही धडपणे करता येत नाही इतकं पाणी उपलब्ध असतं.
स्वच्छ किंवा सुखवस्तू वस्त्यांची स्थिती वेगळी नाही. तिथं घरामधे एसी असतो आणि आधुनिक फर्निचर असतं. पण घराच्या बाहेर पडलं रे पडलं की मुंबई पालिकेनं मुक्त हस्तानं वाटलेली अस्वच्छता पसरलेली असते. टोलेजंग इमारतीच्या बाहेर कचऱ्याचे ढीग असतात,  अस्वच्छ पदार्थ विकणाऱ्या गाड्यांवर लोक खात असतात, घाण पसरवत असतात.
अस्वच्छ वस्त्या स्वच्छ वस्त्यांना चिकटून असतात. श्रीमंत टोलेजंग टॉवर अस्वच्छ झोपड्यांमधे विसावलेले असतात. अस्वच्छ वस्तीत राहून टीबी बाळगणारी माणसं स्वच्छ घरात विविध कामं करायला जातात. घराची झाडलोटच नव्हे तर स्वयंपाकही ही टीबीग्रस्त माणसं करत असतात. टीबीग्रस्त माणसं शहरभर फिरत असल्यानं ती रोग मुक्तपणे पसरवत असतात.  स्वच्छ वस्तीतल्या सुखवस्तू लोकांमधे दर एक लाखांत ४५८ माणसं टीबीचे रोगी असल्याचं पाहणीत आढळून आलं होतं. अस्वच्छ वस्त्यात हे प्रमाण लाखात ६०० इतकं पडतं. म्हणजे रोगाबाबत मुंबईत समता आहे असं म्हणायला हरकत नाही.
मुंबईतल्या टीबीची आठवण निघाली याचं कारण लॅन्सेट या प्रतिष्ठित आरोग्य मासिकानं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करून भारतातल्या टीबीची परिस्थिती सांगितली आहे. जगात ९६ लाख टीबीचे रोगी असून त्यातले ३५ लाख भारतात आहेत. त्या ३५ लाखातले लाखभरापेक्षा मुंबईत असण्याची शक्यता आहे. मुंबई पालिका, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारची संबंधित खाती नेमकी माहिती देऊ शकत नाहीत. अचूक माहिती गोळा करण्याची प्रथा भारतीय संस्कृती आणि परंपरेत नाही.  व्यावसायिक
शिस्त पाळणाऱ्या काही विदेशी संस्था पहाण्या करतात तेव्हां आपल्याला वास्तव कळतं. मुंबईबाबत सध्या नेटवर उपलब्ध असलेली पहाणी २०१० सालची आहे आणि तिच्यातही अंदाजे भाग बराच आहे.
टीबी या त्रासदायक प्राणघातक रोगाची कारणं उघड आहेत. अस्वच्छता हे एक कारण आहे. अपुरा आणि सदोष आहार हेही एक कारण आहे.  रोगजंतू गरीब-श्रीमंत असा भेद करत नसल्यानं अगदी सुखवस्तू घरातही या रोगाची लागण होते. हा रोग व्यक्तिगत पातळीवर आटोक्यात आणणं कठीण असतं, तो सार्वजनिक पातळीवरच हाताळावा लागतो.   एकूण वातावरण रोगाला उपकारक असल्यानं व्यक्तिगत काळजी अपुरी ठरत असते.
मुंबईच्या हद्दीपर्यंत बोलायचं झालं तर सार्वजनिकतेची काळजी घेणाऱ्या संस्थांना या भयानक परिस्थितीची जबाबदारी टाळता येणार नाही. पालिका आणि महाराष्ट्र सरकार या बाबत अपेशी ठरलेलं आहे. उत्तरोत्तर परिस्थिती बिकट होत असतांना राजकीय पक्ष आपले कार्यकर्ते आणि नेते आपले  खिसे भरण्यात मशगूल दिसतात. निवडणुका जिंकणं येवढ्या एकाच गोष्टीत राजकीय पक्षांना रस दिसतो. मतं आकर्षित करण्यासाठी गोविंदा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, ईद, साईबाबा उत्सव, जैनांचे सण इत्यादीवर राजकीय पक्ष वेळ खर्च करतात. वरील बहुतेक सर्व उत्सव अप्रत्यक्षपणे अस्वच्छता वाढवत असतात, नागरिकांची प्रतिकारक्षमता कमी करत असतात याकडं राजकीय पक्षांचं लक्ष नाही.
शुद्ध पर्यावरण आणि शिक्षण या सरकार व पालिकेच्या जबाबदाऱ्या आहेत. माणसाला पोषक आहार मिळेल इतपत रोजगार माणसाला उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार आणि पालिका या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत म्हणून टीबीसीरखं संकट अधिकाधीक गडद होत चाललंय.
काय करायचं या पक्षांचं आणि कंठाळी-भ्रष्ट पुढाऱ्यांचं?

।।
सुरवातीचे चित्रपट

सुरवातीचे चित्रपट

इटालीतल्या बलोनी (Bologna) गावात एक चित्रपट उत्सव पार पडला. उत्साही मंडळी कित्येक महिने आधी नीटपणे ठरवून बलोनीच्या उत्सवाला   जातात.
तिथं गेली ३० वर्षं दरवर्षी जुलै महिन्यात Cineteca ही संस्था चित्रपट उत्सव भरवते. त्यात जीर्णोद्धार केलेले सिनेमे दाखवले जातात. Cineteca ही संस्था गेली पन्नास वर्षं चित्रपट जीर्णोद्धार करत आली आहे. बलोनीमधे या संस्थेच्या कचेरीसमोर फूटबॉल मैदानाच्या आकाराचा चौक आहे. तिथं उघड्यावर हा उत्सव होतो. भलामोठा पडदा लावला जातो. हज्जारो माणसं जमिनीवर बसून सिनेमा पहातात. परवाच्या जुलै महिन्यात झालेल्या उत्सवात लाखभर माणसांनी सिनेमे पाहिले.
जगभरात दोनेकशे चित्रपट उत्सव भरतात. युरोप, आफ्रिका, आशिया, चीन, जपान, अमेरिका, दक्षिण अमेरिका, सर्व ठिकाणी. भारतातही मुंबई, दिल्ली, कलकत्ता, गोवा, चेन्नई इत्यादी ठिकाणी उत्सव भरतात. प्रत्येक उत्सवाचं एकादं वैशिष्ट्यं असतं. शॉर्ट फिल्म्स, अॅनिमेटेड फिल्म्स, डॉक्युमेंटरी, आशियाई, जागतीक, सांगितीक, विशिष्ट भाषिक इत्यादी. कान, बर्लिन, टोरंटो, एडिंबरा, व्हेनिस, लंडन, दोहा, सॅन फ्रान्सिस्को इत्यादी शहरांत भरणाऱ्या उत्सवात जगभरातले चित्रपट येतात. कान महोत्सवात सर्वसामान्य प्रेक्षकाला अगदीच कमी वाव असतो. व्यवसायातले, डेलेगेट्स, ज्युरी, पत्रकार इत्यादींना तिथं प्रवेश असतो. प्रत्येक उत्सवाला स्वतंत्र प्रतिष्ठा असते. तिथं चित्रपट दाखवला जाणं, जाणकारांनी दखल घेऊन त्याला गुण देणं याला महत्व असतं. माध्यमांतूनही चित्रपटांची वाखाणणी होते किंवा चंपी होते. सामान्यतः सर्वात शेवटी ऑस्करमधे चित्रपट पोचणं आणि त्याला बक्षिसं मिळणं ही या सर्व उत्सवांची शेवटली पायरी असते. कित्येक लोक मात्र तसं मानत नाहीत. ऑस्कर म्हणजेच सर्व काही असं त्यांना वाटत नाही. ऑस्करमधली गुण ठरवणारी यंत्रणा आणि प्रक्रिया सदोष आहे, परिपूर्ण नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. एक मात्र खरं. जगभरच्या  उत्सवांत गाजलेल्या चित्रपटांकडं ऑस्करमधल्या परीक्षकांचं लक्ष असतं.
काही उत्सव बक्षिसासाठी नसतात. ते प्रेक्षकांची चित्रपटांची जाण वाढावी, त्यांनी नाना प्रकारचे चित्रपट पहावेत या उद्देशानं  भरवले जातात. तिथं बक्षिसं  नाममात्र दिली जातात. खरी गंमत असते ती जमणाऱ्या प्रेक्षकांची, त्यांनी आपसात केलेल्या चर्चांची, त्या वातावरणात डुंबण्याची. बलोनी चित्रपट उत्सव या वर्गातील एक महत्वाचा उत्सव आहे.
बलोनीमधे Cinetecaच्या इमारतीत चित्रपट, यंत्रं, कॅमेरे, पुस्तकं इत्यादींचा संग्रह आहे. त्यात दरवर्षी भर पडत असते. चित्रपट कलेचा इतिहास बलोनीत अभ्यासता येतो. चित्रपट निर्मितीचं तंत्रज्ञान, यंत्रं इत्यादीच्या इतिहासाची जणू एक कार्यशाळाच महोत्वाच्या काळात घडते. जुने चित्रपट पहायला मिळतात.
यंदाच्या उत्सवाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे १८९९ साली तयार झालेला पहिला  प्रोजेक्टर दुरुस्त होऊन प्रेक्षकांसमोर आला.  १८९९ मधे दिव्याच्या जागी कार्बनच्या दोन कांड्या असत. या कांड्या एकमेकापासून थोड्या अंतरावर ठेवून त्यामधे वीज प्रवाह सोडला जात असे. दोन कांड्यांमधे हवा असे. हवा वीज प्रवाह विरोधी असल्यानं वीज प्रवाहाला विरोध होऊन   ठिणग्या पडत. त्या ठिणग्यांचा प्रकाश म्हणजे चित्रपट दाखवणारा प्रकाश.  त्या प्रकाशामुळं समोरच्या पडद्यावर चित्रपट दिसे. प्रकाश सारख्याच तीव्रतेचा आणि सतत नसे. मधे मधे प्रकाश मंद होत असे. त्या प्रकाशात सिनेमा पहाणं कष्टाचं असे.  
बलोनीतल्या चौकात लोकांनी अगदी तशाच रीतीनं त्या प्रोजेक्टवर ल्युमिये बंधूंनी केलेल्या ५० सेकंदांच्या फिल्मा पाहिल्या. या फिल्मा १८९५ मधे चित्रित केल्या होत्या. त्या बहुदा जगातल्या पहिल्या फिल्मा होत्या. लोकांनी त्या माना वाकड्या करकरून पाहिल्या.  वातावरण थरारलं होतं.
Cineteca नं चार्ली चॅप्लीन, बस्टर कीटन यांच्या फिल्मा सुधारून नव्या केल्या आहेत. त्याही उत्सवात दाखवल्या गेल्या. हज्जारो माणसं हातात धरलेले  आईसक्रीम कोन विसरून, बियरचे मग विसरून कित्येक तास पोट धरधरून हसली. सिनेमांनी पोटं भरल्यानं त्यांना इतर काही खावंसंही  वाटलं नसावं. १९२० ते १९४० या काळातल्या अनेक गाजलेल्या फिल्मा उत्सवींनी  पाहिल्या.
टे गार्नेटची हर मॅन ही १९३० सालची फिल्म बलोनी महोत्सवात लोकांनी पाहिली, त्या फिल्मचा आनंद घेतला. स्कोर्सेसे या फिल्मचं नेहमी कौतुक करतो. या चित्रपटातली स्टंट दृश्यं आणि विनोदी दृश्यं चित्रपट सृष्टीतले धडे झाले, टप्पे झाले, मैलाचे दगड झाले. दोन दारुडे या दीड तासाच्या चित्रपटात धमाल उडवतात. त्याच काळात चार्ली चॅप्लीन, बस्टर कीटन आणि जाड्या रड्या (लॉरेल-हार्डी) विनोद घडवत होते. टे गॅरेटनं विनोदाची एक गतिमान शैली या चित्रपटात निर्माण केली. 
या चित्रपटाचं वैशिष्ट्यं म्हणजे कॅमेऱ्याची हालचाल. आधीच्या काळात   कॅमेरा एका जागी स्थिर असे. टे गॅरेटनं कॅमेरा ट्रॉलीवर घालून, कॅमेरामनच्या खांद्यावर ठेवून फिरवला. त्या सिनेमात एका दृश्यात वेटर ट्रेमधे दारुचे ग्लास घेऊन बारटेंडरकडून निघतो आणि पार्टीत दीर्घकाळ लोकांमधून वाट काढत फिरतो. कॅमेरा त्या वेटर पाठोपाठ फिरतो, दीर्घ काळ.  एका दृश्यात हीरो  रस्त्यावरून जात असतो. वाटेत त्याला माणसं थडकतात, धडकतात. तो अनेकांना दूर सारत पुढं जात असतो. नंतर तो एका गुत्त्यात शिरतो. बराच काळ चालणारा शॉट. चित्रपटाच्या रचनेतला हा महत्वाचा टप्पा गार्नेटनं सुरु केला.
 चित्रपट पर्वाचा सुरवातीचा काळ असं म्हटलं की साहजिकच भारतात चित्रपट पर्व केव्हां सुरु झालं, त्या काळात काय घडलं असा विचार मनात येतो. 
जगात चित्रपट निर्मिती सुरु झाली त्याच्या फार तर एकाद दोन वर्षं पलिकडं भारतात चित्रपटांनी जन्म घेतला. भारत आणि ब्रीटन यातल्या संबंधांमुळं, लंडन आणि भारत यातील संबंधांमुळं ते घडलं.
१८९५ मधे ल्युमिये बंधूनी केलेल्या फिल्मा लंडनमधे दाखवल्या गेल्या. लगोलग १८९६ मधे त्या फिल्मा मुंबईतल्या मोजक्या प्रेक्षकाना पाह्यला मिळाल्या. त्या पाहून कोण्या एका एच एस भाटवडेकर नावाच्या माणसाच्या डोक्यात ट्यूब पेटली. तो मलबार हिलवरच्या हँगिंग गार्डनमधे गेला. तिथं कुस्त्यांची स्पर्धा भरत असे. भाडवडेकरांनी ती स्पर्धा चित्रित करून दी रेसलर्स या नावाची डॉक्युमेंटरी तयार केली, दाखवली. ही भारतातली पहिली डॉक्युमेंटरी. साल होतं १८९९.
त्यानंतर तयार झाली ती तोरणे यांची फिल्म ‘ पुंडलिक ‘. १८ मे १९१२ रोजी कोरोनेशन सिनेमॅटोग्राफ या मुंबईतल्या  सिनेमाघरात दाखवली गेली.  या फिल्मला भारतातली पहिली फिल्म मानलं जात नाही. कारण एक तर ही फीचर फिल्म नव्हती. ते पुंडलीक या नाटकाचं चित्रीकरण होतं.  नाटक चाललं असताना कॅमेरा समोर  स्थिर ठेवून चित्रीकरण केलं होतं. जॉन्सन या ब्रिटीश फोटोग्राफरनं चित्रीकरण केलं होतं. फिल्मचं प्रोसेसिंग लंडनमधे झालं होतं. 
पहिल्या फिल्मचा मान जातो तो दादासाहेब फाळकेंच्या राजा हरिश्चंद्रला. पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन फाळकेंचं होतं. प्रत्येक शॉट त्यांनी लिहिलेला, नियोजन केलेला होता. फोटोग्राफी त्रिंबक तेलंग यांची होती. रुळावर कॅमेरा सरकवून चित्रीकरण करण्यात आलं होतं.
राजा हरिश्चंद्र ३ मे १९१३ रोजी कोरोनेशनमधेच दाखवण्यात आला.
कोरोनेशन सिनेमाघर दादासाहेब फाळकेंचे मित्र नारायण गोविंद चित्रे यांनी १९१२ मधे बांधलं. नारायण चाळीच्या पटांगणात. पोर्तुगीझ चर्चकडून खोताच्या वाडीकडं निघाल्यावर उजव्या  हाताला ही नारायण चाळ होती. चौपाटीपासून इथपर्यंत पोचणाऱ्या रस्त्याचं नाव होतं सँडहर्स्ट रोड. कोरोनेशन सिनेमापासून काही अंतरावर सेंट्रल सिनेमा होता. कालांतरानं कोरोनेशन सिनेमा जाऊन त्या ठिकाणी मॅजेस्टिक सिनेमा तयार झाला, अगदी अलिकडं तो सिनेमाही गेला आणि त्या ठिकाणी कचेऱ्या आणि रहाण्याच्या जागा सामावणारी टोलेजंग इमारत आहे. पलिकडचा सेंट्रल सिनेमा मात्र आजही आहे.
नारायण चित्रेंना सिनेमाघर बांधावंसं कां वाटलं? 
दादासाहेब फाळकेंनी सिनेमा करायला घेतला तेव्हां प्रश्न असावा की त्यांचा सिनेमा कोण पहाणार आणि कुठं पहाणार. त्या वेळी मुंबईमधे थेटरं होती पण त्यात गोरे लोक जात, देशी माणसं जात नसत. ती थेटरं सिनेमासाठी तयार झालेली नव्हती. तिथं संगिताचे जलसे होत आणि ऊच्चभ्रू गोरे लोक तिथं जात. बोरीबंदरसमोर कॅपिटल होतं (१८७९), बाँबे सेंट्रलला आल्फ्रेड होतं. त्यानंतर इंपिरियल (१९०५) होतं. या ठिकाणी कोण मराठी-हिंदी माणसं सिनेमे पहाणार होती? नारायण चित्रेंनी कोरोनेशन उभारलं.
कालांतरानं कॅपिटल, आल्फ्रेड, इंपिरियल थेटरात सिनेमे दाखवले जाऊ लागले. आज कॅपिटल थेटर बंद पडलंय. आल्फ्रेडमधे गेली कित्येक वर्षं मारधाडी-पिवळे सिनेमे दाखवले जातात. इंपिरियल अजूनही भडकमकर रोडवर उभं आहे.  त्या सिनेमाघरात आत जायचं दार वेगळं आणि बाहेर जायचं दार  वेगळं होतं. बाहेर पडायच्या दारात दोन मोठे हत्ती होते, अजूनही आहेत.  घराचा  पत्ता सांगताना इंपेरियल सिनेमा असं न सांगता दोन हत्ती जवळ असा पत्ता आजही लोक सांगतात. एकादा सिनेमा इतका गाजे की इंपिरियलमधे तो दोन तीन वर्षं सतत चालत राही. 
कॅपिटल, इंपिरियल, कोरोनेशन, सेंट्रल या सिनेमाघरांचा इतिहास म्हणजे जवळपास भारतीय चित्रपटाचा इतिहास ठरेल.एका  डॉक्युमेंटरीला चांगला विषय आहे.
।।