रविवार. धटिंगण देशप्रमुखाची वाह्यात पत्रकारानं घेतलेली मुलाखत.

रविवार. धटिंगण देशप्रमुखाची वाह्यात पत्रकारानं घेतलेली मुलाखत.

टकर कार्लसन यांनी पुतिन यांची घेतलेली मुलाखत सध्या गाजतेय, चर्चेत आहे. 

टीव्ही अँकर-मुलाखतकार टकर कार्लसन मॉस्कोत गेले.पुतिन यांच्या आमंत्रणावरून, त्यांचे पाहुणे म्हणून. दोन तासांची पुतीनची मुलाखत कार्लसननी घेतली.

पुतिन मुलाखती देत नाहीत. त्यांच्या अख्ख्या आयुष्यात त्यांनी एकदाच पत्रकारांना दीर्घ मुलाखत दिली, काही तासांची. मी सांगतो ते उतरवून घ्यायचं आणि छापायचं असा आदेश होता. त्या काही तासांच्या मुलाखतीच्या आधारे नंतर  पुतिन यांचं चरित्र प्रसिद्ध झालं.

एकदा रशियाची एक अणुपाणबुडी अपघात होऊन बुडाली होती, पाणबुडीवरचे शेकडो लोक मेले होते. बोट नादुरुस्त असतांना, समुद्रात जायला योग्य नसताना समुद्रात लोटलेली होती; बोटीवरचे कर्मचारी प्रशिक्षित नव्हते. एका परीनं तो एक घाऊक  खून होता.

अपघात झाला तेव्हां पुतिन एका रिसॉर्टवर सुटी उपभोगत होते. तिथून त्यांनी अपघाताबद्दल साधी प्रतिक्रियाही व्यक्त केली नव्हती. रशियाभर बोंब झाल्यावर, मृतांच्या नातेवाईकांनी आवाज केल्यानंतर पुतिन पत्रकार परिषद घ्यायला, मुलाखत द्यायला तयार झाले. समोर मृतांचे नातेवाईक बसले होते. पत्रकारांनी अपघाताचा तपशील मागितला. पुतीन चिडले. पत्रकार नालायक आहेत, आपल्याला बदनाम करण्याचा अजेंडा घेऊन असतात असं म्हणत ते पत्रकार परिषद सोडून गेले. 

कार्लसन यांनी पहिलाच प्रश्न विचारला की पुतिननी युक्रेनवर हल्ला कां केला.  प्रश्न थेटपणे न विचारता कार्लसन म्हणाले ‘ अमेरिका, नेटो, रशियावर हल्ला करेल अशी भीती आपल्याला वाटली होती असं तुम्ही म्हणाला होतात.’ अशा प्रश्नाला लोडेड प्रश्न असं म्हटलं जातं. मुलाखत देणाऱ्याची सोय म्हणून असा प्रश्न विचारला जातो.

पुतिनचं उत्तर एकदम अनपेक्षीत होतं. पुतिन म्हणाले  ‘अमेरिका हल्ला करणार आहे अशी भीती मला वाटली असं मी बोललोच नाही.’  

आता पहा हं. 

समजा कार्लसन यांच्या जागी स्टीफन ॲकर (बीबीसी) किंवा ख्रिस्तियान अमानपूर, झकेरिया (सीएनएन) हे व्यावसायिक पत्रकार असते तर त्यांनी पुतिनना थांबवलं असतं. हातातल्या कागदाकडं पाहून म्हणाले असते की हे विधान तुम्ही अमूक दिवशी अमूक ठिकाणी केलं आहे आणि ते अमुक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे.  

गंमत म्हणजे युक्रेन युद्ध सुरु करताना पुतिन यांनी माध्यमांना जाहीरपणे सांगितलं होतं की ते युद्ध नसून लष्करी कारवाई आहे आणि युक्रेनमधल्या नाझींचा बंदोबस्त करण्यासाठी ते ही कारवाई करत आहेत. 

पुतिन  पुढं म्हणाले ‘तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला आहे असं मला वाटतं.म्हणूनच प्रथम काही सेकंदात मी तुम्हाला इतिहास सांगणार आहे.’ तुम्हाला इतिहास कळलेला नाही, मी तुम्हाला शिकवतो अशा थाटात त्यांनी  पुढला अर्धा रशियाचा इतिहास या विषयावर व्याख्यान दिलं. 

नवव्या शतकात रशिया हे स्टेट (राज्य म्हणा, देश म्हणा, साम्राज्य म्हणा) आकार घ्यायला लागलं. इथपासून सुरु करून पुतीन ताज्या युद्धापर्यंत येऊन ठेपले.  युक्रेन हा रशियाचाच भाग आहे आणि तो रशियाला पुन्हा जोडणं ही आपली ऐतिहासिक कामगिरी असेल असं पुतीन यांच्या भाषणाचं सूत्र होतं. ते नवीन नव्हतं, पुतीन यांनी ते अनेक वेळा मांडलं होतं, तेच पुन्हा कार्लसन यांच्यासमोर पुतिननी ठेवलं.

नवं काही नाही, जुनं उगाळायचं यासाठी मुलाखत?

युक्रेन हा एक स्वतंत्र समाज होता, एक स्वतंत्र देशही होता, वेळोवेळी सभोवतालच्या दांडग्या साम्राज्यांनी युक्रेनला गिळलं होतं, झारनं आणि सोवियेत युनियननही युक्रेन साम्राज्यात खेचला होता. हा इतिहास कोणीही व्यावसायिक मुलाखत घेणाऱ्यानं पुतिनच्या नजरेस आणून दिला असता.

जॉर्जिया सोवियेत युनियनमधून बाहेर पडला होता. तरीही तो रशियाचाच भाग आहे असं म्हणून पुतिननी जॉर्जियावर २००८ साली आक्रमण केलं, जॉर्जिया गिळला. क्रायमिया हा युक्रेनचा भागही एकेकाळी रशियाचाच भाग होता म्हणून २०१४ साली पुतिननी क्रायमिया गिळला. लाटविया, लिथुआनिया, ईस्टोनिया हे देशही रशियाचाच भाग आहेत असं पुतिनना वाटतं, तेही गिळायचा पुतिनचा प्लॅन आहे. अख्खा युक्रेनच पुतिनना हवाय. 

हेही नवं नव्हतं, पुतीन तेच सतत बोलत आहेत.

 युक्रेनमधील नाझीवादी सत्ता संपवण्यासाठी आपण आक्रमण केलं अशी रेकॉर्ड पुतिननी लावली. युक्रेनचे झेलिन्सकी स्वतः ज्यू आहेत, ते नाझीवादी कसे असतील?  युक्रेनमधे नाझींच्या अस्तित्वाचे पुरावे दाखवा असं कार्लसन विचारू शकले असते. 

आपण सुरवातीपासून वाटाघाटींना तयार आहोत, युद्ध थांबवायला तयार आहोत पण अमेरिकाच प्रतिसाद देत नाही असं पुतीन म्हणाले. पुतिनची एकच मागणी होती, युक्रेननं शरण जावं. पुतिननी केलेली त्या संबंधींची विधानं कार्लसन तारीखवार मांडू शकले असते.

पुतिननी एक थाप मारली. युद्ध थांबवावं यासाठी आपण एक पाऊल मागं घ्यायला तयार होतो म्हणून आपण कीवमधलं आपलं सैन्य मागं घेतलं असं पुतिन म्हणाले. वास्तव असं होतं की युक्रेनच्या सैन्यानं रशियन सैन्याचा कीवमधे पराभव केला होता, रशियन सैन्य कीवमधून पळून गेलं होतं. कार्लसननी ही गोष्ट पुतिनच्या निदर्शनास आणायला हवी होती.

मुलाखत अगदीच एकतरफी आणि फुसकी होती. त्यात काहीही नवं पुतिननी सांगितलं नाही की नव्या सूचना केल्या नाहीत. मग हा खटाटोप पुतिननी कां केला?

  निरीक्षकांचं म्हणणं आहे की युक्रेनमधल्या कोंडीतून काही तरी वाट निघावी अशी पुतीनची अपेक्षा होती. युक्रेनचा पार कुप्पा होत असला तरी युक्रेन मागं फिरायला तयार नाही. अमेरिका आणि युरोप या युद्धातून रशियाची दमछाक करत आहे. निर्णय लागूच नये आणि रशियाचं दूरगामी आर्थिक नुकसान व्हावं अशी युरोपची रणनीती आहे. यातून काही तरी वाट निघावी, रशियाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी वाव मिळावा अशी पुतीन यांची इच्छा असावी. ती इच्छा अप्रत्यक्षपणे प्रकट करण्यासाठी  पुतीननी हा खटाटोप केला असं काही निरीक्षकांना वाटतं.

पुतीनना जर ते गंभीरपणानं करायचं असतं तर पश्चिमेतल्या गंभीर मुलाखतकारांना आणि अभ्यासकांना बोलावून पुतीननी मुलाखत द्यायला हवी होती, चर्चा करायला हवी होती, तोडगा सुचवायला हवा होता. तसं न करता निव्वळ वाफ सोडली. टकर कार्लसन सारख्या उथळ वाह्यात माणसाला बोलावून पुतिन फसले.

मुलाखत हा एक अत्यंत कौशल्याचा खेळ असतो. अमेरिकेचे प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन यांची एक मुलाखत ब्रिटीश पत्रकार डेविड फ्रॉस्ट यांनी घेतली होती. मुलाखतीत निक्सन उघडे पडले. पण खुद्द निक्सननाही वाटलं की त्यांची बाजू लोकांसमोर आली. मुलाखत पहाणाऱ्या करोडो प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडली. मुलाखत घेणं हा किती कलात्मक, जीवघेणा, जबर मेहनती उद्योग आहे याची उत्तम कल्पना त्या मुलाखतीतून आली. या मुलाखतीवर आधारलेला एक पूर्णलांबीचा  चित्रपटही आहे, तो पहाण्यासारखा आहे.

चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाज यांच्यात झुंज होते तेव्हां फलंदाज-गोलंदाज-प्रेक्षक-खेळ अशा सर्वानाच सुख मिळत असतं. या मुलाखतीतून कोणाचा फायदा झाला?

अर्थात हेही खरं की धटिंगण राज्यकर्त्यांच्या जमान्यात फडतूस पत्रकारी होणं स्वाभाविक असल्यानं कार्लसन-पुतीन मुलाखतीबद्दल काही अपेक्षाही बाळगणं व्यर्थ आहे. पुतीन हा एकरफी खोटं बोलणारा माणूस आणि कार्लसन हा एक वाह्यात आणि उथळ पत्रकार. समसमा संयोग होता. 

वरील मुलाखत पहाताना एका भारतीय नेत्याची मुलाखत एक भारतीय पत्रकार घेतोय असंच वाटत होतं. 

।। 

Comments are closed.