पुस्तकं. बेडुक कसा शिजवावा

पुस्तकं. बेडुक कसा शिजवावा

पुस्तकं. दूषित लोकशाही.

Tainted Democracy: Viktor Orbán and the    Subversion of Hungary 

by Zsuzsanna Szelényi.

Hurst, 438 pp., £25.

।। 

प्रस्तुत पुस्तक हंगेरीचे सध्याचे प्रधान मंत्री (प्रमं) व्हिक्टर ओर्बन यांचं राजकीय चरित्र आहे. १९९८ ते २००२ आणि २०१० ते २०२४ अशी १८ वर्षं ते हंगेरीचे प्रधान मंत्री आहेत.

कसे  आहेत हे व्हिक्टर ओर्बन?

‘बेडुक घ्यायचा. पसरट भांड्यात पाण्यात ठेवायचा. बेडुक सुखात असतो. हळूहळू पाणी तापवायला सुरवात करायची. बेडकाच्या ते लक्षात येत नाही. पाणी उकळू लागतं तोवर वेळ निघून गेलेली असते….’

हे शब्द आहेत व्हिक्टर ओर्बन यांचे. समाज कसा घडवायचा असतो या बद्दलची आपली कल्पना वरील शब्दात ओर्बन यांनी मांडलीय. 

२०१४ साली त्यांनीच स्थापलेल्या ‘फिडेस’ पार्टीला निर्णायक बहुमत मिळालं आणि ते प्रमं झाले. त्यांनी जाहीर केलं ‘माझी महत्वाकांक्षा आहे की हंगेरी हा एक Illiberal, अनुदार देश व्हावा. चीन, भारत, तुर्कस्तान, रशिया या देशांसारखा. त्या देशातल्या व्यवस्था पश्चिमी नाहीत, लिबरल नाहीत, त्या देशातल्या व्यवस्था लिबरल लोकशाह्या नाहीत.’ 

२०१८ साली ओर्बन यांनी ‘अनुदार’ या कल्पनेची त्यांना हवी असलेली व्याख्या लोकांसमोर ठेवली. अनुदार म्हणजे ख्रिस्ती. ख्रिस्ती धर्माचा आधार कुटुंब व्यवस्था आहे; स्त्रीपुरुष यांच्या संबंधातून तयार झालेलं कुटुंब हा ख्रिस्ती विचार आहे; ख्रिस्ती कुटुंबात स्त्री शक्यतो घर सांभाळते. 

ओर्बन यांचं दर्शन त्यांच्या वर्तणुकीतून सिद्ध झालं. 

२०१४ साली सीरिया व अरब प्रदेशातून स्थलांतरितांचे लोंढे युरोपात येऊ लागले तेव्हां ओर्बन यांनी स्थलांतरीताना स्वीकारायला विरोध केला. देशाच्या सीमांवर काटेरी कुंपण आणि भिंती उभारून त्यांनी स्थलांतरिताना मज्जाव केला. हद्दीवर पोचलेल्या स्थलांतरितांचा छळ केला.

हंगेरी हा देश युरोपियन युनियनचा सदस्य आहे; युरोपीय समुदायाच्या मेहेरबानीवर हंगेरीची अर्थव्यवस्था टिकून आहे; युरोपनं स्थलांतरिताना सामावून घ्यायचं धोरण ठरवलं होतं. ओर्बननी ते धुडकावून लावलं. त्या काळात त्यांनी भाषणं करून सांगितलं की ‘अरब, मुस्लीम, आशियाई, आफ्रिकी लोक हंगेरीला नको आहेत.’

ओर्बन यांच्या मते हंगेरी हा फक्त गोऱ्या ख्रिस्ती लोकांचा देश आहे.

२०१८ नंतर त्यांनी हंगेरीत समलिंगी संबंध बेकायदेशीर आणि ख्रिस्तीधर्मविरोधी आहेत असा कायदा केला; लिंगबदल केलेल्या लोकांचा कायद्यानं अस्वीकार केला. 

आज ओर्बन हे लोकशाही वाटेनं निवडून जाणारे हुकूमशहा झाले आहेत. 

१९८८ मधे कम्युनिष्ट हुकूमशाहीशी लढणारा एक लिबरल माणूस हुकूमशहा कसा होतो  ते प्रस्तुत पुस्तकात लेखिका झेलेनी सुझान्ना यांनी मांडलं आहे.लेखिका फिडेस या पार्टीच्या संस्थापक आहेत, एकेकाळी ओर्बन यांच्या सहकारी होत्या, त्यांनी ओर्बन यांना जवळून पाहिलं आहे. 

१९९३ सालची गोष्ट. पक्षाची बैठक.  सरकारनं पक्षाला एक मोठ्ठी जागा कार्यालयासाठी कवडीमोल किमतीत दिली होती. ती प्रॉपर्टी कोणाला तरी कोट्यावधी फ्लॉरिंटना (हंगेरियन चलन) विकण्यात आली होती. या विक्रीबद्दल पक्षाला सांगण्यात आलं नव्हतं, सरकारच्या चौकशीत ही विक्री झाल्याचं उघड झालं होतं. पक्षाचे अध्यक्ष होते व्हिक्टर ओर्बन.

कार्यकर्ते विचारू लागले की किती कोटींचा व्यवहार झाला, कोणी प्रॉपर्टी विकत घेतली, त्याचे किती पैसे पक्ष कार्यालयात जमा झालेत. काळे चष्मे लावलेले दोन वकील बैठकीत हजर झाले. त्यांची एकूण चर्या आणि वागणूक उद्धट होती. ओर्बन यांच्या सांगण्यावरून ते आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं ‘व्यवहार कायद्याला धरून झाला आहे, त्यातून पक्षाला फायदा झाला आहे. काहीही काळंबेरं नाहीये.’

उत्तरं न देता वकील निघून गेले, ओर्बन यांनी बैठक गुंडाळली.

बैठकीत हजर असलेले वकील ओर्बन यांचे व्यक्तिगत मित्र होते. त्यांनीच व्यवहार पार पाडला होता. काही कंपन्यांना प्रॉपर्टी विकण्यात आली होती, पक्षाला एक दमडाही मिळाला नव्हता. विकत घेणाऱ्यांनी कर भरला नव्हता. त्यांनी कंपनी दिवाळ्यात काढली. ती कंपनी कवडीमोल भावात तिसऱ्यानं विकत घेतली. या व्यवहारात रोखीनं पैशाची देवाण घेवाण झाली होती. पैसे गडप झाले, ओर्बन यांच्या मित्रांच्या खिशात पोचले. 

 लेखिका व इतर कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरलं, ओर्बन यांनी लेखिका व तिच्या सहकाऱ्यांना पक्षातून हाकलून दिलं.

लॉरिन मेसारोस नावाचा एक साधा प्लंबर होता. त्याला सरकारी कंत्राटं मिळत गेली. मेसारोस कायच्या काय श्रीमंत झाला, हंगेरीतला एक नंबरचा श्रीमंत माणूस झाला. असे कित्येक लोक. त्यांना करमाफी असे. त्यांना अनेक सरकारी सवलती मिळत. सरकारचा त्यांच्याकडं काणाडोळा असे. ही सर्व माणसं ओर्बन यांचे मित्र असत. ओर्बन यांना ते मित्र पैसे पुरवत.

याच मित्रांनी  टीव्ही चॅनेल काढली, रेडियो स्टेशन्स काढली, पेपर काढले. ओर्बनवाणी!

विरोधी किंवा वेगळं मत मांडणाऱ्या माध्यमांवर धाडी पडल्या, खटले झाले, शेवटी ती माध्यमं बंद पडली. २०१८ आणि २०२२ च्या निवडणुकांत विरोधी पक्षांना विजेच्या खांबांवर पोस्टर चिटकवणं येवढाच मार्ग त्यांच्यासमोर उरला. तोही ओर्बननी बंद केला. शहराचं सौदर्य बिघडवणं, घातक प्रचार करणं अशी कलमं लावून पोस्टर चिकटवणंही बेकायदेशीर ठरवण्यात आलं.

हंगेरीत फक्त ओर्बन यांचाच आवाज ऐकू येतो, फक्त त्यांचंच म्हणणं लोकांच्या कानावर येतं. 

ओर्बन यांची भूमिका स्पष्ट आहे.  सरकार, संसद, न्यायालय, माध्यम या व्यवस्थांना अधिकार देऊन  सत्तेचं विभाजन ही कल्पना पश्चिमी असून, मठ्ठ युरोपीयांनी ती स्वीकारलीय. सरकारवर (आणि अर्थातच सरकार प्रमुखावर) कोणताही अंकुष असू नये असं ओर्बन यांचं मत आहे. हंगेरीतल्या राज्यघटना न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात ओर्बन  यांनी त्यांचे न्यायाधीश नेमलेत, ते ओर्बन यांचे निर्णय योग्य असल्याचे निकाल देतात.

ओर्बन यांनी एक मंडळ स्थापलं आहे. ते  माध्यमांवर लक्ष ठेवतं, माध्यमाना वठणीवर आणतं. 

डोनल्ड ट्रंप ओर्बन यांना अमेरिकेत बोलावतात. अमेरिकन रिपब्लिकन पक्षाच्या बैठकांना ओर्बन मार्गदर्शन करत असतात.  

प्रस्तुत पुस्तक वाचतांना ओर्बन यांच्या जगभर पसरलेल्या मावसचुलतआत्ते भावांची आठवण येते.

।।

Comments are closed.