Browsed by
Month: November 2016

ट्रंप निवड, माध्यमांचे अंदाज कां खोटे ठरले

ट्रंप निवड, माध्यमांचे अंदाज कां खोटे ठरले

माध्यमांचं भाकित, अंदाज, अभ्यास खोटे ठरले.  
Image result for Donald trumpडोनल्ड ट्रंप निवडून येणार नाहीत असं अमेरिकन आणि युरोपिय माध्यमांना वाटत होतं.   लॉर्ड मेधनाद देसाई या बहुदा एकट्याच पत्रकारानं   ट्रंप निवडून येतील असं भाकित केलं होतं. ट्रंपना हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा दोन लाख मतं कमी पडली हे खरं. ते इलेक्टोरल व्होट या चमत्कारिक अमेरिकन निवडणुक पद्धतीमुळं प्रेसिडेंट झाले हेही खरं. परंतू इतकी मतं ट्रंप यांना मिळतील असं कोणीही माध्यमातलं माणूस माणूस म्हणत नव्हतं.
२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी जिंकतील असं माध्यमं म्हणत होती.  भरघोस मताधिक्य मोदींना मिळणार नाही, थोड्याशा मताधिक्यानं, निसटता विजय मोदींना मिळेल असं माध्यमं म्हणत होती. मोदींच्या  सॉलिड मतांनी माध्यमांना खोटं ठरवलं. पाठोपाठ दिल्लीच्या निवडणुका. माध्यमं म्हणत होती की केजरीवाल हरतील, फार तर फार हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच जागा केजरीवालांना मिळतील. केजरीवालांनी भाजपचा धुव्वा उडवून ऐतिहासिक विजय मिळवला. पाठोपाठ बिहारच्या निवडणुका. नितीश कुमार यांची आघाडी हरेल, फार तर फार भरुपूर जागा पण सत्ता स्थापन करण्यासाठी अपुऱ्या जागा मिळतील असा माध्यमांचा अंदाज होता. तोही खोटा ठरला.
ट्रंप यांना हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा फक्त दोन लाख मतं कमी पडली. लोकांना आश्चर्य वाटतंय ते अशाचं की इतकी मतं ट्रंप यांना कशी पडली. काळे, आशियाई, लॅटिनो यांची बहुतेक मतं क्लिंटनना पडतील आणि ट्रंप यांच्या स्त्री विषयक वाह्यात वक्तव्यांमुळं गोऱ्या स्त्रियांची मतंही क्लिंटन यांना पडतील असा माध्यमांचा अंदाज होता. ट्रंप यांना केवळ मध्यम वर्गीय आणि गरीब गोऱ्यांची मतं मिळतील असं माध्यमांना वाटत होते. पण तसं घडलं नाही. काही प्रमाणात काळे आणि लॅटिनो यांनीही ट्रंपना मतं दिली. मुख्य म्हणजे गोऱ्या लोकांनी सरसकट ट्रंपना मतदान केलं, त्यात गोऱ्या स्त्रियाही होत्या असं दिसतंय. 
गोऱ्या स्त्रियांनी ट्रंपना मतं कशी काय दिली आणि काळे-लॅटिनोंनीही ट्रंपना मतदान कसं काय केलं याचा उलगडा होत नाहीये. वरील मतं क्लिंटनना न जाता ट्रंपकडं जातील याचा अंदाज आपल्याला कसा काय नाही आला याचा विचार माध्यमं करत आहेत.
माध्यमं  पक्षाच्या घोषणा, कार्यक्रम, उमेदवार, प्रचार, पूर्वेतिहास इत्यादी घटकांचं   विश्लेषण करून अंदाज व्यक्त करतात. नरेंद्र मोदी, केजरीवाल,नितीश कुमार, ट्रंप यांचं राजकीय व्यक्तिमत्व आणि ताकद,  त्यांच्या पक्षांची ताकद, काँग्रेस-रिपब्लीकन  व इतर पक्षांचे कार्यक्रम आणि ताकद,  इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून तीनही निवडणुकांचे अंदाज माध्यमांनी बांधले.
Image result for narendra modiमाध्यमं मतदारांशी नाना प्रकारे संपर्क साधून त्यांच्या मनाचा आणि मतांचा अंदाज घेतात. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली की विविध टप्प्यांवर माध्यमं लोकमताची पहाणी करतात. नंतर मतदान केंद्रातून बाहेर पडलेल्या मतदारांशी बोलून त्यानी कोणाला मत दिलंय ते ठरवतात. या दोन घटकांचा एकत्र विचार करून माध्यमं निवडणुकीत कोणाला किती मतं मिळणार याचा अंदाज जाहीर करतात. 
  कार्यक्रम, पक्ष-उमेदवाचं चरित्र, मोहिम इत्यादी गोष्टींचं रूपांतर प्रत्यक्ष मतदानात किती होईल याचे अंदाज म्हणजे एक जुगार असतो. प्रचार मोहिम सुरु झाल्यावर राजकीय पक्षांकडून वापरले जाणारे दबाव आणि मतदार क्षेत्रातली बदलती समीकरणं यांचा कोणता परिणाम मतदानावर होईल ते सांगता येत नसतं. भारतात  पैसे वाटून, जात आणि धर्माचा वापर करून मतदारांचे गठ्ठे तयार केले जातात. ही बांधाबांध गुप्तपणे आणि बेकायदेशीर रीतीनं होत असते. पक्षाची आणि उमेदवाराची लोकहित साधण्याची क्षमता आणि इच्छा या गोष्टी तोंडी लावण्यापुरत्याच असतात, इतर दबावांखालीच मतदार मतदान करत असतात. त्यामुळं मतदानाचं रूप कसं असेल याची कुणकुण माध्यमांना लागते पण पक्के अंदाज बांधता येत नाहीत. कारण मतदानाच्या आधी अठ्ठेचाळीस तासातही मतदार संघातलं वारं फिरतं. त्यामुळं पक्ष, कार्यक्रम, लोकहिताची क्षमता इत्यादी गोष्टीवर आधारलेलं भाकित अंदाजपंचे  दाहोदरसे या रुपाचं असतं.  
डेमॉक्रॅटिक उमेदावर आणि हिलरी क्लिंटन यांचे कार्यक्रम मतदारांना पसंत पडतील आणि ट्रंपचे कार्यक्रम पसंत पडणार नाहीत असं पत्रकाराला-जाणकाराला वाटलं  पण मतदाराला तसं वाटलं नाही.   ट्रंप स्त्रैण आहेत, ट्रंप अनैतिक आणि बेकायदेशीर वागतात, ट्रंप खोटारडे आहेत, ते ढ आहेत, त्यांच्याकडं कार्यक्रम नाहीत असं जाणकार आणि पत्रकारांना वाटलं. ट्रंप यांचे स्त्रीविषयक विचार आणि वागणं यांची चर्चा माध्यमांनी केली. मुस्लीम, लॅटिनो, काळे यांच्याबद्दलची ट्रंप यांची भूमिका माध्यमांनी उघड केली. देशांतर्गत आणि परदेश विषयक निश्चित धोरण ट्रंप यांच्याकडं नाही हे माध्यमांनी सिद्ध केलं. ट्रंप यांच्याकडं कोणतंच ठाम धोरण नसून ते प्रसंगी जे सुचेल ते बोलतात हेही माध्यमांनी दाखवून दिलं. ट्रंप कसेही असोत परंतू ते गोरे आहेत, ते ख्रिस्ती आहेत, ते गोऱ्या बेरोजगार तरूणांची काळजी घेणार आहेत या कारणांसाठी आपण त्याना मतदान करणार आहोत हे गोऱ्या स्त्रियांनी ठरवलं असावं. आपलं मत त्यांनी माध्यमांना सांगितलं नाही. कदाचित माध्यमांनी त्या बाजूनं त्यांना विचारलंही नसेल. ट्रंप भले वाईट असले तरी त्यांना स्त्रिया मतदान करतील ही शक्यताच माध्यमांनी लक्षात घेतली नाही. भारतातही स्त्रिया त्यांची मतं व्यक्त करत नाहीत आणि अनेक निवडणुकांचा अनुभव आहे की स्त्रियांची मतं निवडणुकीचा निकाल फिरवतात.
ट्रंप यांच्यावरचे  आरोप खरे असले तरीही आम्हाला त्यांनाच मत द्यायचं आहे कारण तेच बदल आणू शकतील असं मतदारांना वाटलं. हा पत्रकार आणि मतदार यांच्या समजुतीतला  फरक आहे. हा समजुतीतला फरक कां आणि कसा असतो हे आता माध्यमांनी अभ्यासायला हवं.
अनेक गोऱ्यांना कुचंबणा जाणवत असावी. ट्रंप हा योग्य उमेदवार नाही पण आपल्याला त्याला मत द्यायचं आहे असं मत व्यक्त करणं गोऱ्यांना प्रशस्त वाटलं नाही. ट्रंप पक्षाबाहेरून आलेले असल्यानं आणि त्यांचं वर्तन प्रक्षोभक असल्यानं त्यांना जाहीर पाठिंबा देणं अनेक रिपल्बिकन मतदारांना योग्य वाटत नव्हतं. काळे आणि हिस्पॅनिक यांच्यावर ट्रंप यांनी टीकेची झोड उठवली होती तेही पक्षाच्या अधिकृत विचाराशी विसंगत होतं. पॉल रायन असोत की जॉन मॅक्केन दोघांनीही ट्रंप यांच्यावर जाहीर टीका केली होती.  पोलिटिकल करेक्टनेसच्या हिशोबात त्यांना टीका करणं भाग होतं. परंतू वरील मताच्या लोकांनी आपल्या जाहीर भूमिकेला टांग मारून ट्रंप यांना मतदान केलं. हा व्यवहारही माध्यमांना समजला नाही.
  मुलाखती, पहाण्या आणि एक्झिट पोल ही साधनं वापरून तयार केलेले अंदाज खोटे ठरले.  यामधे काही शक्यता दिसतात. लोकमत जाणून घेण्याची साधनं अपुरी आणि अकार्यक्षम ठरत असावीत.  समाजातले खूप मतदार त्यांची मतं माध्यमाकडं व्यक्त करत नसावेत. मतदार  त्यांचं खरं मत माध्यमांना सांगत नसावेत.  माध्यमं ‘ त्या ‘ मतदारांपर्यत पोचत नसावीत.
Image result for boston globeमनात एक आणि बाहेर एक हे वागणं कसं हेरायचं? ते हेरण्याची साधनं माध्यमाकडं नाहीत.
समाजातल्या कित्येक गटात आणि टापूत काय घडतं ते माध्यमांना कळत नाहीये अशीही शक्यता आहे. माध्यमं एका पारंपरीक रीतीनं पारंपरीक गटांत जातात आणि तिथली मतं गोळा करतात. ते काम परंपरेनं सोपं झालेलं असतं. व्यापार, फॅशन, कला, फायनान्स, सैन्यदलं, परीघ आणि परिघाचा परिसर अशी अनेक क्षेत्रं माध्यमाच्या आवाक्यात नाहीत. 
 अनेक अमेरिकन मतदारांनी सांगितलं जुलैमधे दोन्ही उमेदवार पक्के झाल्यावरच, पुढली प्रचार मोहिम सुरू व्हायच्या आधीच त्यांनी मतं पक्की केली होती. हिलरी क्लिंटन यांच्या सरकारी ईमेल हाताळण्याची चौकशी एफबीआयनं ऑगस्ट उलटून गेल्यानंतर खूप आठवड्यांनी उकरून काढली. बायकांची शारीरिक हाताळणी कशी करावी या बाबतच्या ट्रंपच्या जुन्या उद्गारांची  स्फोटक माहिती ऑगस्ट उलटून गेल्यानंतरच माध्यमांनी प्रसिद्ध केली. त्याचा काहीही परिणाम त्या मतदारांवर झाला नाही. हे वास्तव माध्यमांना कळलं नाही.
उमेदवारांबद्दलची माहिती मतदारांपर्यंत पोचवणं आणि मतदारांना निर्णय घ्यायला मदत करणं हे माध्यमाचं काम असतं. माध्यमांनी ते केलं. क्लिंटन किंवा ट्रंप यांच्याबद्दलची त्यांनी प्रसारित केलेली माहिती योग्य होती, साधार होती. पण त्याचा परिणाम मतदारांवर झाला नाही. याचा अर्थ माहितीची परिणामकारता कमी होती असा होतो. 
माहिती परिणामकारक करता आली नाही की लोकांची माहिती (सत्य) स्वीकारण्याची तयारी नव्हती? ट्रंप याचं चारित्र आणि क्षमता संशयास्पद आहे असं सांगणारे पुरावे माध्यमं सतत प्रसिद्ध करत होती.  जितके जास्तीत जास्त पुरावे माध्यमांनी मांडले तितकं ट्रंप समर्थकांचा ट्रंप यांचा पाठिंबा अधिकाधीक पक्का होत गेला. ज्या अर्थी माध्यमांना ट्रंपांची अयोग्यता ठसवण्यासाठी सतत प्रयत्न करावा लागतोय त्या अर्थी ट्रंप खरोखरच योग्य आहेत असं ट्रंप समर्थक मानू लागले.
Image result for washington post

वॉशिंग्टन पोस्ट  या दैनिकानं निक्सन यांचं वॉटरगेट वर्तन उघड केलं. किती तरी महिने पोस्ट बातम्या देत होतं. निक्सन यांचे पाठिराखे सतत पोस्टवर पक्षपाती असण्याचा आरोप करत होते. पक्की माहिती हा पोस्टचा आधार होता. शेवटी निक्सन यांचा भ्रष्टाचार मान्य झाला आणि परिणामी निक्सन यांना सत्ता सोडावी लागली. बॉस्टन ग्लोब या वर्तमानपत्रानं ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या हीन वागणुकीवर पुरावे गोळा करून कित्येक आठवडे मोहिम करून माहिती प्रसिद्ध केली. ख्रिस्ती अमेरिका हादरली, ग्लोबवर धर्मनिंदेचे, पक्षपाताचे आरोप झाले. शेवटी जनतेनं सत्य स्विकारलं.
ट्रंप यांच्या विरोधात माध्यमांनी एकतरफी मोहिम चालवली हे खरं आहे. परंतू त्या मोहिमेला सत्याचा आधार होता. ट्रंप युनिवर्सिटी ही ट्रंप यांची संस्था बोगस, अनैतिक आणि बेकायदेशीर होती. विद्या, शिक्षण या कल्पनांच्या चिंधड्या ट्रंप युनिव्हर्सिटी उडवत होती. अमेरिकन शिक्षण खात्यानं त्या संस्थेची चौकशी करून संस्थेवर खटला भरला. हे सारं माध्यमांनी प्रसिद्ध केलं. आता बातमी आहे की ट्रंप आता कोर्टाबाहेर २.५ कोटी डॉलर देऊन मांडवळ करणार आहेत. मांडवळ कां? सत्य जर ट्रंप यांच्या बाजूचं असेल तर त्यांनी खटला लढवायला हवा.
अजूनही ट्रंप यांनी आपल्या आर्थिक व्यवहाराची, कर भरण्याची माहिती जाहीर केलेली नाही. अजूनही ओबामांचा जन्म अमेरिकेत झालेला नाही या आपल्या विधानाला ट्रंप चिकटून आहेत. प्रचार मोहिमेत ते म्हणाले की त्यांनी अनेक डिटेक्टिव या कामी लावले असून त्यांच्या हाती ओबामा यांच्या जन्माबाबतचं सॉलिड सत्य त्यांच्या हाती लागलं आहे. आजवर ते सत्य त्यांनी जाहीर केलेलं नाही.  तरीही लोकांनी ट्रंप यांनाच मतं द्यायचं ठरवलं असलं तर माध्यमं काय करणार?
माणूस निवडून आला की त्याला पवित्र करण्याची एक प्रथा समाजात रूढ होऊ पहात आहे. माध्यमांनी ज्याच्यावर टीका केली तो माणूस निवडून आला याचा अर्थ माध्यमं चुकीची असतात असं म्हणून निवडून आलेल्या माणसाला प्रतिष्ठा देण्याचीही एक रीत रूढ होऊ पहात आहे. फिलिपिन्सचा अध्यक्ष जाहीरपणे म्हणाला की ओबामा हा एका वेश्येचा मुलगा आहे. माध्यमं खवळली. त्यांनी त्यांच्याकडं खुलासा मागितला. गडी खुलासा द्यायला तयार नाही. फिलिपिन्सचा अध्यक्ष भले बहुमत मिळवून निवडून आला असेल. तरीही तो माणूस जसा कसा आहे तसा तो असतोच आणि माध्यमं त्याचं असणं प्रसिद्ध करत असतात. तो निवडून आला आहे याचा अर्थ तो थोरच असतो असं मानायचं कारण नसतं. निदान माध्यमांनी तरी तसं मानता कामा नये.
ट्रंप यांना मतं द्यायचं लोकांनी ठरवलं होतं. माध्यमांना या लोकमताचा अंदाज आला नाही हे खरं आहे. लोकमत आजमावण्याची आपली साधनं या निमित्तानं माध्यमांनी तपासली पाहिजेत. परंतू लोकमताचा नेमका अंदाज आला नाही याचा अर्थ लोकमत शंभर टक्के योग्य असतं असंही  मानायचं कारण नाही. हिलरी क्लिंटन यांच्यावर लोकांचा राग होता. ओबामा यांच्या आठ वर्षाच्या कारकीर्दीत देशाची परिस्थिती बिघडली होती. बेकारी वाढली होती, विषमता वाढली होती, आरोग्य व्यवस्था बिघडली होती, शिक्षण व्यवस्था बिघडली होती. ओबामांचीच धोरणं पुढं चालवण्यात अर्थ नव्हता. अशा परिस्थितीत   उपलब्ध पर्याय  लोकांनी निवडला. ट्रंप यांच्या जागी रुबियो किंवा जेफ बुश किंवा कोणी तरी असता तरीही कदाचित लोकांनी त्यांना निवडलं असतं. क्लिंटन यांच्या जागी बर्नी सँडर्स उभे असते तर कदाचित रिपब्लिकन लोकांनीही त्यांना निवडून दिलं असतं.   सँडर्सना क्लिंटननी हुसकलं आणि   चौदा प्रतिस्पर्ध्यांना ट्रंप यांनी हुसकलं.   दोन बेकारांमधल्या एकाला निवडलं येवढंच. 
 माध्यमांची लोकमत जाणण्याची साधनं काहीशी अपुरी आणि अकार्यक्षम आहेत असाच या निवडणुकीचा अर्थ होतो. परंतू माध्यमं चुकली, ती पक्षपाती होती असं मानणं बरोबर नाही.
।।

नेटफ्लिक्सवरच्या मालिका-एक नवा कलाप्रकार

नेटफ्लिक्सवरच्या मालिका-एक नवा कलाप्रकार

Image result for narcos  

नेटफ्लिक्सनं नार्कोज या मालिकेचा तिसरा सीझन दाखवण्याचं जाहीर केलंय. नार्कोज ही एक स्पॅनिश भाषेतली इंग्रजी उपशीर्षकाची मालिका आहे. या मालिकेचे प्रत्येकी दहा भागांचे दोन सीझन्स झाले आहेत. आता तिसरा सीझन सुरु होतोय. ही मालिका लोकांना तुफ्फान पाहिली कारण ती कोलंबियातल्या पाब्लो एस्कोबार या नशाद्रव्य टोळीच्या प्रमुखावर आहे.

कोलंबिया या दक्षिण अमेरिकेतल्या देशात पाब्लो एस्कोबारचं नशाद्रव्यांचं उत्पादन आणि वितरणाचं मोठ्ठं साम्राज्य होतं. कोलंबियात द्रव्यं तयार करून ती अमेरिकेत चोरून पाठवणं आणि तिथून ती जगभर पाठवण्याचा व्यवसाय पाब्लोनं केला. हज्जारो माणसांची यंत्रणा त्यानं उभी केली होती. विमानं, बोटी, ट्रक्स यांचे ताफे त्याच्याजवळ होते. सशस्त्र फौज त्याच्याजवळ होती. त्याला पकडायला जाणाऱ्या पोलिसांना तो मारून टाकीत असे. त्याच्या माणसांवर ज्या कोर्टात घटला उभा रहाणार असे तो कोर्ट तो बाँब लावून उडवत असे. एक वेळ अशी होती की पोलिस किंवा सैनिक त्याच्या वाटेला जात नसत, न्यायाधीश त्याच्या विरुद्द खटला दाखल करून घेत नसत.वाटेत येणारे पोलीस, सैनिक, पुढारी, न्यायाधीश, वकील, मंत्री इत्यादी सर्व लोकांना तो बेधडक मारून टाकत असे. सरकार त्याच्यापुढं शरण होतं. मिळालेले पैशांपैकी काही पैसा तो गरीबांना वाटत असे. त्यानं दवाखाने, शाळा आणि चर्चेसही उभारली होती. त्याला आपण मोठे नेते आहोत असं वाटत असे. राजकीय पक्षाचे भ्रष्ट आणि खुनी लोक देशाची वाट लावत असल्यानं निवडणुक लढवून स्वतः देशाचा अध्यक्ष होऊन देशाचं कल्याण करायची त्याची योजना होती. तो निवडणुकीला उभा राहिला. त्यानं भरमसाठ पैसे वाटले. तो भरघोस मतांनी निवडूनही आला.

नार्कोजच्या उद्योगांचं सविस्तर चित्रण नार्कोजच्या वीस भागात करण्यात आलंय. पाब्लो मारला गेला  या बिंदूवर दुसरा सीझन संपला.   पाब्लोचा प्रतिस्पर्धी कॅली याच्यावर आणि उरलेल्या नशाद्रव्य टोळ्यांवर पुढला सीझन असेल. प्रचंड हिंसा पडद्यावर दिसते. गाळीबार, स्फोट, रक्त या मालिकेत भरपूर  आहे. सेक्स तर विचारायलाच नको.
चित्रण, एडिटिंग उत्तम आहे, प्रत्ययकारी आहे. कोणत्याही चित्रपटात कास्टिंग महत्वाचं असतं. अगदी छोट्या भूमिकेपर्यंत. माणसं गाठणं, त्यांच्याकडून अभिनय करवून घेणं हे मोठंच काम. अनेक चित्रकलाकारांना   स्वाभाविकपणे वाटतं की आपण दिसतो थोर, आपला आवाज थोर, आपला अभिनय थोर.  तेचतेच दिसणं, तोचतोच अभिनय, त्याच त्याच लकबी प्रत्येक भूमिकेत छापून ही कलाकार मंडळी स्वतःवर खुष असतात. दिग्दर्शक   नटांना  व्यक्तीमत्व व लकबींच्या चौकटीबाहेर काढून  पात्रांच्या भूमिकेत बसवतो. हे कसब फारच मोठं. नार्कोज पहातांना पात्रं पहात असताना ते दिसतं. कित्येक दृश्यं रस्त्यावर घेतलेली आहेत. शेकडो हज्जारो माणसं दृश्यांत दिसतात. ती कॅमेऱ्यात पहात नाहीत. लहान मोठ्या अमेक भूमिकेतली पात्रं अगदी छान वागत असतात, ती नट आहेत असं वाटत नाहीत.
नार्कोजमधली काही मासलेवाईक दृश्यं अशी:

  • पाब्लो निवडणुकीचं भाषण करताना भ्रष्ट राजकारण्यांवर टीका करतो. मंचाच्या खाली पाब्लोचे लोक पैसे वाटत असतात. 
  • सरकारनं फारच लावून धरल्यानं पाब्लो अज्ञातवासात असतो. त्याची बायको त्याला सांगते की त्यानं शरण जावं, तुरुंगात जावं. तुरुंगवास पत्करून बाहेर पडला की त्याचा नेल्सन मंडेला होईल, तो राष्ट्रपती होईल, सारं जग त्याला मान्यता देईल.
  • बायकोची ही सूचना पाब्लो अज्ञातवासात आपल्या सेवकाला सांगतो. त्याचा सेवक विचारतो- हा मंडेला कोण. असो.
Image result for borgiaनार्कोजच्या आधी बोर्जिया नावाची मालिका झाली. तीस भागांची. पंधराव्या शतकातला एक व्यसनी आणि गुन्हेगार पोप या मालिकेत रंगवला आहे. रोम, व्हेनिस, मिलान, पॅरिस इत्यादी लोकेशन्स असल्यानं मालिकेला देखणेपण आणि भव्यता आली आहे. भव्य चर्चेस आणि राजवाडे दिसतात.तिथलं ऐश्वर्य दिसतं. तिथली गुन्हेगारी आणि चैन दिसते. हे पोप महाशय बिनधास्तच होते. अनेक बायकांशी संबंध. पैशाच्या चोऱ्या करायचे. लाचबाजी करूनच ते पोप झाले होते. रोमच्या विकासासाठी लोकांकडून गोळा केलेल्या कराचे पैसे खाऊन रोमचे कार्डिनल गब्बर होतात आणि त्यांना लाच देऊन पोप निवडला जातो. पोप घाऊक प्रमाणावर खून करतो. कार्डिनल सर्रास वेश्यागृहात सापडतात.सारं काही देवाच्या नावानं. पोप आणि त्याचं राज्य म्हणजे माफियाचं राज्य असतं.

बोर्जिया निर्माण करणारी सगळी माणसं ख्रिस्ती. बोर्जिया पहाणारे करोडो लोकही ख्रिस्ती. कोणी मालिकेवर बंदी घालण्याची मागणी केली नाही, दगड फेकले नाहीत, आंदोलनं केली नाहीत.  ऑस्कर  मिळवणाऱ्या  स्पॉटलाईट सिनेमात हज्जारो ख्रिस्ती धर्माधिकारींनी लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण दाखवलं. ख्रिस्ती माणसं सारं काही निमूट पहातात.
बोर्जियाच्या आसपास ट्युडॉर ही  पंधराव्या शतकातल्या ट्युडॉर घराण्यातल्या (इंग्लंड) आठव्या हेन्री या राजावर मालिका झाली. हेन्रीनं जाम लफडी केली. पाच सहा लग्नं केली.   लग्नाला किंवा मनमानी कारभाराला विरोध करणाऱ्यांना त्यानं उकळत्या पाण्यात लोटलं, जिवंत जाळलं, त्यांची डोकी उडवली.  कॅथिलक चर्चचं- पोपचं वर्चस्व झुगारून इंग्लंडचं स्वतंत्र चर्च तयार केलं आणि स्वतःच त्या चर्चचा प्रमुख झाला. बरं हे सारं कशासाठी तर आधीचं लग्न मोडायला आणि नवं लग्न करायला रोमचं चर्च परवानगी देत नव्हतं म्हणून. आपल्या हाती निरंकुष सत्ता यावी यासाठी चर्चला आणि देवाला हुसकून लावतांना न कळत त्यानं लोकशाहीचा पाया घातला. संसद  जन्माला घातली. धर्म ही पायातली एक बेडी   हेन्रीनं तोडली. 
इंग्लंडमधे एक तृतियांश जमीन चर्चकडं होती. चर्च आणि चर्चचे पुरोहीत  या जमिनींचे आर्थिक व्यवहार करत, कुळांना-कामगारांना लुबाडत. देवाच्या नावानं. दाद विचारायची सोय नाही. चर्चशी भांडण करण्याच्या नादात हेन्रीनं जमिनी चर्चच्या हातून काढून घेतल्या. चर्चेस उध्वस्थ केली, चर्चची संपत्ती लुटली.
Image result for tudor tv series  एक महत्वाची गोष्ट हेन्रीच्या नकळत घडली. धर्म आणि ऐहिक व्यवहार या दोन गोष्टी वेगळ्या झाल्या. धर्म आणि राजसत्ता वेगळ्या झाल्या. पोप राजासारखाच वागत असे. पोपसत्ता, धर्मसत्ता देवाच्या नावानं कर गोळा करत असे, लढाया करत असे, त्यासाठी सैन्य बाळगत असे, लढाईसाठी लोकांकडून कर वसूल करत असे. हेन्रीनं तो सारा प्रकार संपवला.  
  हेन्ही हे उद्योग करत होता तेव्हां चर्च मुळातूनच हादरवणारी मार्टिन लूथरची प्रोटेस्टंट क्रांती घडत होती. पादरी आणि पोप भ्रष्ट आहेत, धर्माच्या नावानं लोकांना लुटत आहेत असं मार्टिन लुथर सांगत होता. लोकाना न कळणारं लॅटिन बायबल त्यानं लोकांना कळणाऱ्या  इंग्रजीत भाषांतरीत केलं.  बायबल आणि माणूस यांच्यात थेट संबंध असावा, मधे पोप किंवा चर्च असू नये असं त्यानं लोकाना समजावलं. हेन्री   विद्वान आणि विचारवंत वगैरे अजिबात नव्हता. संपट, स्वैराचारी आणि भ्रष्ट होता.स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठीच  त्यानं मार्टिन लूथरच्या विचारांचा उपयोग  केला.
ट्युडॉर आणि बोर्जिया या मालिका पहाताना इतिहासाचा अभ्यास होतो, एक भान येतं. 
मार्को पोलो हीही मालिका नेटफ्लिक्सनं सादर केली. तीही बोर्जिया, ट्यूडॉरसारखी देखणी, विशाल. 
नेटफ्लिक्सनं दाखवलेल्या मालिका हे दृश्यकलेच्या अंगणातलं एक नवं प्रकरण आहे. टीव्ही आणि सिनेमा या दोन प्रकारांचं मिश्रण या मालिकेत झालेलं आहे. टीव्हीच्या पडद्यावर दाखवलेला एक भव्य आणि दीर्घ सिनेमा. टीव्हीच्या पडद्यावर माणसं जवळून दिसतात, पाच दहा माणसं. मोठ्या पड्यावर मोठ्ठा कॅनव्हास, युद्ध, शेकडो नव्हे हजारो माणसांच्या हालचाली इत्यादी गोष्टी दिसतात. 
टीव्हीवर दीर्घ मालिका असतात. दोन चार वर्षं चालणाऱ्या. त्यात   एक चमचा कथानक आणि हौदभर पाणी असला प्रकार असतो. नेटफ्लिक्सवरच्या मालिका हा एक स्वतंत्र कलाप्रकार झाला आहे. एकेक तासाचा एक स्वतंत्र चित्रपट असल्यागत मालिका तयार होते. एकाच कथानकाचे पन्नास चित्रपट. पटाचं कथानक गुंत्याचं, दीर्घकाळात पसरलेलं असतं. खूप तपशील असतात.  एक मोठ्ठा काळ आणि विषय प्रेक्षकासमोर उलगडतो.  
टीव्ही मालिका दररोज पहावी लागते, नेटफ्लिक्सची मालिका स्ट्रीमिंग असल्यानं केव्हांही पहाता येते. स्ट्रीमिंग असल्यानं कोणी डीव्हीडी वगैरे घेण्याच्याही भानगडीत पडत नाही. चित्रपटघरात न जाता घरात सिनेमा पहाता येतो. घरात जर मोठा स्क्रीन असेल, चांगली ध्वनीव्यवस्था असेल तर सिनेमागृहाचा अनुभव घेता येतो. नेटफ्लिक्सवरची मालिका हा सिनेमागृहातला सिनेमा आणि टीव्हीवरची मालिका यांना एक पर्याय झाला आहे.
।।

शहरांचं रूप बदलणारी व्यवस्था-ऊबर

शहरांचं रूप बदलणारी व्यवस्था-ऊबर

ऊबर क्रांती।।
ऊबर टॅक्सी भारतात गाजली ती दिल्लीतल्या बलात्कार प्रकरणानंतर, एका ऊबर ड्रायव्हरनं बलात्कार केल्यानंतर. मुंबईत ऊबर गाजतेय ती त्या टॅक्सीला काळ्या पिवळ्या टॅक्सीवाल्यांनी केलेल्या विरोधामुळं.

ऊबर टॅक्सी एसी असते. सेल फोनवरून ती बोलावता येते. पूर्ण टॅक्सी वापरता येते किंवा इतर सहप्रवासी घेऊन ती स्वस्तात वापरता येते. ऊबर टॅक्स्यांची स्थिती चांगली असते. त्यामुळं मुंबईत ऊबर फार लोकप्रिय झाली. काळीपिवळीचे ड्रायव्हर नकार देतात. टॅक्सी बंद करायची वेळ झालीय, जेवायची वेळ झालीय,तुमच्या दिशेला मला जायचं नाहीये अशा नाना सबबी सांगून काळीपिवळी भाडं नाकारते. उबरच्या बाबतीत ते घडत नसल्यानं मुंबईचे नागरीक खुष आहेत.

ऊबर टॅक्सीनं एकूण सार्वजनिक प्रवासात क्रांती केलीय. २००९ साली स्थापन झालेली ही कंपनी जगभरच्या ४२५ शहरात टॅक्स्या फिरवतेय.ऊबरची बाजारातली किमत आता ७० अब्ज डॉलर झालीय.जगभर टॅक्सी व्यवसाय सुमारे १०० अब्ज डॉलरचा धंदा करतो. त्यातला बहुतांश भाग आपल्या खिशात घ्यायचा ऊबरचा विचार आहे. त्यासाठी ऊबर विविध नव्या तंत्रांचा वापर करतेय.

ऊबर काय करते? अगदी साधी गोष्ट ऊबरनं केलीय. उबरकडं न टॅक्सीची मालकी आहे ना पदरी बाळगलेले चालक. ऊबरनं चालक, वाहन आणि प्रवासी यांची गाठ घालणारं अप तयार केलंय. प्रवासी फोन करतो, टॅक्सी त्याच्या दारात पोचते. टॅक्सी चालवल्यानंतर लावलं जाणारं भाडं चालक, टॅक्सी मालक आणि ऊबर या तिघांत वाटलं जातं. मालकाला किंवा चालकाला चिंता नसते. त्यांना ऊबर गिऱ्हाईक आणून देतं. जीपीएस व इतर तंत्रंज्ञानं वापरून नकाशा, रस्ते इत्यादी सगळी माहिती ऊबर चालकाला पुरवते. चालक आणि प्रवासी यांची गाठही ऊबर घालून देतं. 


आज मुंबईत कित्येक सुखवस्तू माणसं स्वतःची कार न ठेवता ऊबर वापरतात. स्वतःच्या कारपेक्षाही चांगल्या स्थितीतली ऊबर वापरणं नागरिकाला सोयीचं जातं. चालक बाळगा, कार मेंटेन करा, पार्किंग शोधा, घराजवळ गाडी उभी करा इत्यादी भानगडीतून नागरीक मुक्त झाले आहेत. ऊबरची सोय अशीच वाढत गेली तर हज्जारो मुंबईकर कार विकत घेणार नाहीत, कार रस्त्यावर आणणार नाहीत. रस्त्यावरची गर्दी कमी होईल, मुंबईचं पर्यावरण कायच्या कायच शुद्ध होईल.

ऊबरची पुढची वाटचाल चालकविरहित टॅक्सीच्या दिशेनं आहे. टेक्सला, गूगल इत्यादी कंपन्या चालकाशिवाय चालू शकेल असं तंत्रज्ञान तयार करत आहेत. ते तंत्रज्ञान आता नव्वद टक्के तयार झालं आहे. कारमधे वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळं कार रस्त्यावरचे सर्व अडथळे लक्षात घेऊन मार्गक्रमण करते. खड्डे, अचानक रस्ता ओलांडणारी माणसं, रस्त्यावर येणारी जनावरं, अचानक ब्रेक लावणारे समोरचे चालक इत्यादी संकटंही वरील तंत्रज्ञान पार पाडतं. थोडक्यात म्हणजे कारच्या समोर, मागं आणि दोन्ही बाजूला असणाऱ्या वस्तूंची दखल घेऊन कार मार्गक्रमण करते. अशा कार सध्या प्रयोग म्हणून जगात काही रस्त्यांवर चालत आहेत आणि त्यांना अपघात झालेला नाही. आज घडीला या कारना सरकारांनी परवानगी नाकारली आहे. हे तंत्रज्ञान विकणाऱ्या कंपन्यांनी पर्यायी सुरक्षा व्यवस्था म्हणून चालकही कारमधे बसवला आहे. तो करत काहीही नाही, नुसता बसून रहातो जेणेकरून एकादं संकट आलं तर तो कारचा ताबा घेऊ शकतो. प्रयोग संपतील, तंत्रज्ञान परिपूर्ण होईल तेव्हां वरील पर्यायी चालकाशिवाय कार चालवायला सरकारं परवानगी देतील अशी त्या कंपन्यांची अपेक्षा आहे.

कार उत्पादक केवळ कारचं उत्पादन करतात. त्या कारचं रस्त्यावर काय होतं या बद्दल ना त्यांना माहिती असते ना चिंता. टेक्सला, गुगल, अपल या कंपन्या कार आणि रस्ता यांची सांगड घालत आहेत. शहरातल्या रस्त्यांची स्थिती, कुठल्या रस्त्यावर किती गर्दी आहे किंवा वाहतुक तुंबली आहे याची माहिती अप कंपन्या संकलित करत आहेत. अमूक रस्ता तुंबला असेल तर त्याला पर्यायी रस्ता कुठला इत्यादी माहितीही अपवर उपलब्ध करून दिली जाईल. ही माहिती सार्वजनिक बसेससाठीही उपलब्ध असेल. परिणाम असा की बसेस आणि टॅक्सी मिळून प्रवास हे प्रकरण जवळपास पूर्णतया हाताळतील. सेल फोनवर प्रवाशाला कळेल की कोणती बस घरापासून किती अंतरावर आहे आणि किती मिनिटात ती घराजवळच्या स्टॉपवर पोचू शकेल. घरापासून ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी पोचण्यासाठी किती वेळ लागेल आणि किती पैसे खर्च होतील याचाही अंदाज सेलवरून प्रवाशाला मिळेल. पर्याय म्हणून टॅक्सीसुद्धा उपलब्ध असेल. टॅक्सीमधेही साधी आणि मर्सिडीझ-बीएमडब्ल्यू अशी विविधता माणसाला उपलब्ध असेल. प्रतिष्ठितानं जादा पैसे देऊन मर्सिडीझ वापरावी साध्या माणसानं मारुती वापरावी.

आज खाजगी कार उभी करण्यावर शहरांतला फार पैसा खर्च होतो. जसजशी शहरं वाढू लागली आहेत तसतशी जागा कमी पडू लागल्यानं कार उभी करण्यासाठी फार पैसे नागरिकाला मोजावे लागतात. सिंगापूर, हाँगकाँगमधे कार उभी करण्याची व्यवस्था ज्यांच्याकडं आहे त्यांना श्रीमंत आणि भाग्यवान मानलं जातं. स्वयंचलित कार आणि बसेस सुरु झाल्यावर कार उभी करण्याचा प्रश्न सुटेल आणि त्या जागा उद्यानं, करमणूक, व्यायाम इत्यादी गोष्टींसाठी वापरता येतील. शिवाय पर्यावर शुद्ध होईल ते वेगळंच.

आता ऊबर हे नाम म्हणून न वापरता क्रियापद म्हणून वापरलं जातय. चला ऊबरगिरी करूया असं लोक म्हणू लागलेत. कार उत्पादक उद्योगावर ऊबरगिरीचा परिणाम होईल. कारचं उत्पादन काही प्रमाणात कमी होईल, बशींचं उत्पादन वाढेल. कार आणि बस उत्पादकांना नवं तंत्रज्ञान आणि अप त्यांच्या वाहनांत बसवावं लागेल. येव्हाना त्यांनी त्या बदलाची पूर्वतयारी केलीही असेल.

नवी कादंबरी, माओ ते तिएनानमेन काळाचं चित्रण

नवी कादंबरी, माओ ते तिएनानमेन काळाचं चित्रण

 Do Not Say We Have Nothing
Madeliene Thien.
||
यंदाच्या मॅन बूकर पारितोषिकासाठी सहा पुस्तकं निवडली गेली. मेडलीन थियेनची ‘ डू नॉट से वुई हॅव नथिंग ‘ ही कादंबरी त्या निवडीत होती. समीक्षकांना या कादंबरीला बक्षीस मिळेल असं वाटत होतं. पॉल बीटी याच्या ‘ दी सेल आऊट ‘ या कादंबरीची निवड झाल्यानं मेडेलिनचं बक्षिस हुकलं.
‘ डू नॉट से वुई हॅव नथिंग ‘ या ४७२ पानांच्या कादंबरीत लेखिका मेडलीन थियेन यांनी सुमारे पन्नास  वर्षाचा चीनचा तुंबळ इतिहास चितारला आहे. माओ झेडॉंग यांची कम्युनिष्ट क्रांती नंतर मोठ्ठी उडी ( दी ग्रेट लीप फॉरवर्ड) नंतर सांस्कृतीक क्रांती आणि नंतरची १९८९ सालची तिएनानमेन चौक घटना कादंबरीच्या नेपथ्यात आहेत.
 लि लिंग आणि आय मिंग या दोन मुलींचे वडील आणि आजोबा-पणज्यांचं जीवन या कादंबरीत आहे. मुलींच्या आधीच्या पिढ्या गाणाऱ्या, वाजवणाऱ्या, लोककथा सांगणाऱ्या. मुलींचे वडील अभिजात संगितकार. बीथोवन, मोझार्ट यांच्या रचना ते वाजवत, सादर करत. आज्ज्या चहाच्या दुकानात लोकगीतं गात आणि गावात चावडीवर लोककथा सांगत. माओनं या मंडळींना देशोधडीला लावलं. त्यांच्या जमिनी आणि घरं जप्त केली. त्यांचे अनन्वीत हाल केले. अख्ख्या गावासमोर त्यांच्या थोबाडात मारायला लावून, नाकदुऱ्या काढून अपमानित केलं. शांघायमधल्या संगीत शाळा बंद करून, तिथले पियानो आणि व्हायोलिन मोडून जाळून वडिलांना छळछावणीत लोटलं. हे सारं सारं हळुवारपणे या कादंबरीत लेखिकेनं सांगितलेलं आहे. छळाची वर्णनं मोजकी, आकारानं लहान आणि न रंगवता, ओकाबोक न करता मांडलेली आहेत. 
आय मिंग ही टीनएजर तिएनानमेन चौक घटनेनंतर चीनमधून पळते आणि कॅनडात येते. ली मिंगच्या घरी पोचते. तिथून त्या दोघींची दोस्ती होते. दोघी एकमेकांच्या वाड वडिलांबद्दल बोलायला लागतात. तिथून कादंबरी,  कथानक उलगडत जातं. 
कित्येक शतकांचा चीनचा अनुभव  आहे की राज्यकर्ते कहर माजवतात. जनतेला पिळतात. लोकांनी सोसलेला त्रास, छळ    लोकगीतं-लोककथांच्या द्वारे कलाकार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं, एका गावातून दुसऱ्या गावात पोचवतात. राज्यकर्त्यांचा राग आणि वरवंटा टाळण्यासाठी त्यांना कथा-कादंबरीचं रूप  दिलं जातं. या कथा म्हणजे एका वेगळ्या रुपात लिहिलेला इतिहास असतो. हा इतिहास सरकारच्या नजरेस येणार नाही अशा रीतीनं लिहिला जातो, त्याच्या नकला हातानं लिहून काढल्या जातात, या नकला गुपचुप हातोहात या गावातून त्या गावात जातात. घरांमधे त्या लपवल्या जातात, खड्डे खणून पुरल्या जातात. मेडलिन थियेन यांनी ती शैली वापरून १९५० ते १९९० पर्यंतचा चाळीस वर्षाचा काळ या कादंबरीत चितारला आहे. 
आई मिंगची आज्जी शांघायमधून आपल्या बिंगपाई या गावात पोचते  तेव्हां तिला गावाचा सत्यानाश झालेला दिसतो. तिथं घर उध्वस्थ झालेलं असतं. घरातल्या वस्तू नाहिशा झालेल्या असतात, घराचे दरवाजे-कमानीही नाहिशा झालेल्या असतात. जनावरांचा पत्ता नसतो. सारा गावच उध्वस्थ झालेला असतो.
आज्जीला बिंगपाई गावात  शिल्लक असलेली मावसबहीण गावात घडलेल्या घटना सांगते. शहरातून आलेले कम्युनिष्ट पार्टीचे नेते शाळेत बैठक भरवतात. गावातल्या दोन शेतकऱ्यांच्या कुटुंबांना गोळा केलं जातं. मुलं, आई बाप, आजी आजोबा अशी सर्व माणसं. नेत्याच्या सांगण्यावरून गोळा झालेले गावकरी शेतकऱ्यांच्या थोबाडात मारतात, त्यांचा अपमान करतात. शेतकऱ्यांनी आपणहून कबूलीजबाब द्यावा यासाठी बळजोरी केली जाते. म्हणा –  मी शोषक आहे, मी समाजाचं नुकसान केलं आहे, मी समाजाला लुटलं आहे, मला शिक्षा झाली पाहिजे. नाही म्हटलं तरी शिक्षा आणि म्हटलं तरीही शिक्षा. कारण ही माणसं गुन्हेगार आहेत असं पक्षानं आधीच ठरवलेलं असतं. 
प्राध्यापक, अर्थशास्त्री, वकील, डॉक्टर, संगितकार इत्यादी लोकांना दूरवर खेड्यात पाठवलं जातं. खेडी अशी की तिथून पळून जाणं शक्य होणार नाही. खड्डे खणा, डुकरं पाळा, शेती करा, खडी फोडा इत्यादी कामं करायला लावली जात. धान्याची पोती जशी इकडून तिकडं हलवतात तसं या माणसांना हलवलं जायचं. अनेकांना कोळशाच्या, लोखंडाच्या खाणीत पाठवलं गेलं. या कामांची सवय नसल्यानं बहुतेक माणसं मेली. सतत स्वतःवर टीका करायची, स्वतःचं आत्मपरिक्षण करायचं,  आपण किती वाईट आहोत ते बोलत रहायचं. त्या बरोबरच सतत माओ आणि कम्युनिष्ट पार्टीचं गुणवर्णन करत रहायचं.
(कोणीही माणूस समोर दिसला की अल्ला हो अकबर अशी घोषणा दहशतवादी करतात. तसंच हे कम्युनिष्ट लोक एकमेकाला भेटले की चेयरमन माओ झिंदाबाद, झाऊ एन लाय झिंदाबाद, लिन बियाओ झिंदाबाद, कम्युनिष्ट क्रांती झिंदाबाद अशा घोषणा देऊन एकमेकांचं स्वागत करायचे, संवाद सुरु करायचे.)
माओनं आधी आर्थिक क्रांती केली. शेतीचा वाट लावली, उद्योगांची वाट  लावली. नंतर सांस्कृतीक क्रांती केली.  संगित, कला, साहित्य इत्यादी गोष्टी नष्ट-विकृत केल्या.
कादंबरीत या घटनांची हाडीमाशी वर्णनं आहेत. 
मेडलीन थियेनचे आई वडील हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि कॅनडात वाढले. ते चीनमधे कधीच गेले नव्हते. आईच्या आग्रहाखातर मेडलीन चीनमधे एक धरण पहायला गेल्या, तिथे त्यांनी चीनच्या इतिहासाचा अभ्यासाला सुरवात केली.मेडलीन कॅनडात जन्मल्या, तिथंच स्थाईक झाल्या आहेत. कादंबरी व्हायला पाच वर्षं लागली. ही त्यांची तिसरी कादंबरी.
कादंबरी दीर्घ आहे. कादंबरीत अनेक उपकथानकं आहेत. कादंबरीत तीन पिढ्या, प्रत्येक पिढीतली सुमारे चार ते पाच माणसं असा माणसांचा पसारा आहे. चार साडेचारशे पानांच्या पसाऱ्यात या माणसांचा माग ठेवतांना तारांबळ उडते. कादंबरीत अनेक गीतं, कविता आहेत. त्यात निसर्ग आणि जीवनविषयक विचार आहेत. कादंबरीतली मुख्य पात्रं सांगितीक असल्यानं संगीत हा कादंबरीतला एक महत्वाचा धागा आहे. बाख, बीथोवन, मोझार्ट  यांच्या संगित रचनांचे उल्लेख कादंबरीत येतात. संगिताचं अंग असणाऱ्या वाचकांना ही कादंबरी एक वेगळा आनंद देईल.
कम्युनिष्ट राजवटीत संगीत ही एक मोठ्ठी गोची असते. स्टालिन असो की माओ, त्यांना संगिताची भीती वाटत असावी. संगीत माणसाला विचारांपासून, तर्कापासून दूर नेतं असं त्यांना वाटत असावं. त्यामुळं दोघेही अभिजात संगित दडपण्याचा प्रयत्न करत, संगीताची व्याख्या नव्यानं करून संगीत कम्यूनिझममधे घुसवण्याचा प्रयत्न करत. पुरोगामी संगित, क्रांतीकारी संगित, समाजवादी संगित, प्रतिगामी संगिताची वर्गवारी माओनं केली होती. माओच्या मते मोझार्ट, बीथोवन यांचं संगीत समाजवादविरोधी होतं.  
प्रतिगामी संगित वाजवणारे शांघायमधले संगिताचे जलसे, संगित घरं बंद करण्यात आली. पियानो, व्हायोलिन इत्यादी वाद्यं जाळून टाकण्यात आली. कारण अभिजात संगित कम्युनिझममधे बसत नव्हतं. लोकांनी व्हायोलिन खड्यात लपवून ठेवली.
या कादंबरीमधे चिनी भाषेची ओझरती ओळख होते. इतर भाषांप्रमाणं मुळाक्षरं, मुळाक्षरांचा शब्द आणि अनेक शब्दांची गुंफण करून कथन अशी चिनी भाषेची रचना नाही. अनेक रेषा, त्या रेषांची जाडी आणि लांबी, रेषांना जोडलेल्या रेषा, रेषांची वळणं अशा नाना रचना वापरून एक अक्षरचित्र तयार होतं. 
प्रत्येक अक्षरचित्र हे एक मूळ चिन्ह (radical) असतं. अनेक चिन्ह एकाखालोखाल लिहिल्यानंतर त्यांचा एक अर्थ निघतो. 
एक अक्षरचित्र असतं ‘दार’. दुसरं अक्षरचित्र असतं माणसाचं तोंड म्हणजे माणूस. तिसरं अक्षरचित्र असतं कुत्रा. दार या  चित्राच्या आतमधे तोंड आणि कुत्रा ही  चित्रं गुंफली की घरात शांतता आहे असा शब्द तयार होतो. यात गंमत अशी की कुत्रा हे चित्र कोणीही चार पायाचा प्राणी असाही अर्थ संदर्भानुसार घेतला जातो.
दार या अक्षरचित्रात सूर्यप्रकाश हे अक्षरचित्र गुंफलं की दारातून सूर्यप्रकाश येतो असा अर्थ घेतला जातो. 
एक झाड म्हणजे झाड. दोन झाडं म्हणजे विरळ जंगल आणि तीन झाडं म्हणजे दाट जंगल.
एक स्त्री म्हणजे स्त्रीचं चित्र. दोन स्त्रियांची चित्रं एकत्र केली गोंगाट असा अर्थ घेतला जातो. (असं चिनी लोकांचं म्हणणं आहे!)
आय मिंग प्रवासात असेल, घरी पोचली नसेल तर पूर्ण वाढ न झालेलं झाड असं अक्षरचित्र वापरलं जातं. 
बिग मदर एका गावातल्या स्त्रीला विचारते- पूर्वी या गावात राहिलेल्या लोकांना मला भेटायचंय, ती कुठं सापडतील.
चिनी भाषेत तिनं जे शब्द उच्चारले त्याचे दोन अर्थ होते, प्रवास झालाय, ठार मारले गेलेत. दोन्ही शब्दांचे उच्चार सारखे होते पण त्यांची चित्राक्षरं वेगळी होती.
संदर्भानुसार अर्थ घ्यायचा. माणसं निघून गेलीत किंवा माणसं ठार झाल्यानं इथं हजर नाहीत.
कादंबरीत काही ठिकाणी चिनी चित्राक्षरं काढून संभाषणं दिली आहेत. त्यांतून चिनी भाषेबद्दल उत्सुकता वाढते. चिनी समाज, चिनी माणूस आणि चिनी भाषा यांच्यात एक समान धागा दिसतो. गूढतेचा. चिनी माणसाचं बोलणं आणि लिहिणं समजून घेणं हे काम कठीण. चिनी राजकारण, चिनी माणसांचं त्यांच्या देशातलं आणि जगातलं वागणं,   साराच कठीण मामला.
जवळ जवळ दुसऱ्या महायुद्धापर्यंत चिनी भाषा आणि चीनचं जगापासून तुटलेपण यामुळं जगाला चीनबद्दल फार कमी माहिती होती. माहितीच्या अभावी चीन म्हणजे एक चमत्कारिक रहस्य आहे असं लोकांना वाटे. पर्ल बक यांच्या दी गुड अर्थ या कादंबरीनं चीनच्या खिडक्या उघडल्या.  तरीही चीनभोवती एक बांबूचा पडदा होताच. चीनमधे भीषण दुष्काळ झाले, जगाला त्या बद्दल काही कळलं नाही. माओनं चीनमधे कम्युनिष्ट राजवट आणली, सांस्कृतीक आणि आर्थिक उलथापालथ केली. त्यात साडेतीन ते चार कोटी माणसं मारली गेली. जगाला ते कळलं नाही. माओच्या मृत्यूनंतर डेंग यांच्या राजवटीत चीन आणि जग यांच्यात व्यापारी-शैक्षणिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर चीनबद्दल जगाला माहिती होऊ लागली, चीनवर संशोधनपर पुस्तकं लिहिली गेली.
युंग चान यांनी १९९१ मधे वाईल्ड स्वान्स या पुस्तकात स्वतःचा, आईचा आणि आजीचा इतिहास लिहिला. चीनचं एक भीषण चित्र त्यातून उभ रहातं. विशेषतः चीनमधे स्त्रीला काय स्थान आहे ते या पुस्तकातून कळतं. स्त्रीची पावलं छोटी असणं हे सौंदर्याचं लक्षण चिनी समाजानं ठरवलं होतं. पावलं छोटी राहावीत यासाठी वर्षानुवर्ष ती घट्ट बांधून ठेवली जात. त्यामुळं पावलं सुजत, सडत, पू होत असे, दुर्गंधी येत असे. स्त्रीला ते सारं जन्मभर सहन करावं लागे. माओच्या क्रांतीच्या काळात क्रांतीकारक पुरुष पुढारी जीपमधून हिंडे आणि त्याची पत्नी जीपच्या पाठी पायी पायी प्रवास करत असे. निसर्गानं दिलेलं सारं स्त्रीनं सहन केलं पाहिजे असं माओ म्हणत असे.  बाळंतपणासाठी इस्पितळात जायलाही माओची मनाई असे. स्त्रिया उन्हातान्हात, रस्त्यावर, शेतात बाळंत होतं, त्यांचे गर्भपात होत. युंग चानचं पुस्तक अंगावर काटा उभा करतं. या पुस्तकाची ३७ भाषांत भाषांतरं झाली होती.
 १९५८ चा दुष्काळ  या विषयावर आता खूप पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत.
 एका अभ्यासकानं दुष्काळात चीनमधल्या पोष्टांत पडून राहिलेली पत्रं गोळा केली. हज्जारो पत्रं. ती एकत्र करून एक पुस्तक लिहिलं. पत्रं पडून होती कारण पत्रं न्यायला पोष्टमन शिल्लक नव्हते. दुसरं म्हणजे माओच्या सरकारनं लोकांना आपसात संपर्क करायला मनाई केली होती. आपण आणि क्रांती बदनाम होईल अशी भीती माओला वाटत होती.
  म्हातारी माणसं पत्रांतून आपल्या दुरवरच्या नातेवाईकांकडं मदत मागत होती. “अन्न पाठवा, पाणी पाठवा, आम्हाला इथून घेऊन जा.” गावातली तरूण माणसं गाव सोडून निघून गेली होती. ” अन्नाचा कणही गावात शिल्लक नाही. कोणतीही हालचाल करणारी गोष्ट म्हणजे प्राणी माणसांनी खाल्लेत. गाई गुरं खाऊन झाली, कुत्रे खाऊन झाले, किडे खाऊन झाले, पक्षी खाऊन झाले. पानं खाऊन झाली. गाव उजाड झालंय. आम्हाला इथून न्या ” असा मजकूर पत्रांत असे.
गावठी पद्धतीनं पोलाद तयार करून औद्योगीकरण करायच्या धोरणापायी घरातली धातूची भांडी वितळवली गेली. भट्टी तयार करण्यासाठी घरातलं फर्निचर, दरवाजाच्या चौकटी, झाडं, लाकूडफाटा सारं सारं जाळून फस्त करण्यात आलं. पोलाद तर झालं नाहीच पण दुष्काळ पडला. 
कादंबरीचा विषय भेदक असला तरी लेखिकेनं कादंबरी प्रक्षोभक केलेली नाही.
।।

ऑटोहेड-हिंदी चित्रपटसृष्टीतलं नवं वळण

ऑटोहेड-हिंदी चित्रपटसृष्टीतलं नवं वळण

रोहित मित्तल यांची ऑटोहेड ही फिल्म यंदाच्या मामी चित्रपट उत्सवाच्या स्पर्धेत दाखवली गेली.राम गोपाल वर्मा यांच्या सत्या या फिल्मनं हिंदी चित्रपट जगात एक नवं दालन उघडलं होतं. ऑटोहेडनंही  हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवी शैली प्रस्तुत केलीय.
नारायण नावाचा एक ऑटो चालवणारा माणूस हे मुख्य पात्र. नारायण सहा खून करतो. ते खून तो कॅमेऱ्यासमोर करतो. एक सनसनाटी खरी गोष्ट चित्रीत करून टीव्हीवर नाव कमवायच्या खटपटीत असलेल्या दोघांसमोर नारायण आपली कहाणी सांगतो, आपले विचार मांडतो आणि आपण कसे खून करतो तेही दाखवतो.
 नारायण मुंबईतल्या रस्त्यांवर रिक्षा चालवतो. दिवस रात्र. प्रवाशांची ने आण करतो. त्या भानगडीत त्याला कधी कार चालकांकडून मार खावा लागतो. कधी एकादा मराठी अभिमानी प्रवासी त्याला बिहारी आहे म्हणून बदडून काढतो. कधी प्रवासी खुष होऊन जास्त पैसे देतात कधी कटकट करतात, पैसे न देता निघून जातात. नारायण एका सेक्सवर्करच्या प्रेमात असतो आणि तिची भडवेगिरीही करतो. तिच्यासाठी गिऱ्हाईकं शोधतो आणि तिची गिऱ्हाईकांकडे ने आण करतो.
नारायण बिहारचा.  बिहारमधे त्याच्या कुटुंबाकडं जमीन आहे.  बिहारमधलं वास्तव आणि टीव्हीच्या प्रभाव यामुळं  मर्यादित साधनांमधे रहाण्यात नारायणला गंमत वाटत नाही. त्याला मुंबई-दिल्लीतले धनिक, तिथली चैन दिसते. श्रम करायची त्याची तयारी नाही, त्याला शॉर्टकट सुख हवं असतं. त्याच नादापायी तो गावात दोन खून करतो आणि मुंबईला पळून येतो. त्याच्या आईला वाटत असतं की लग्न करून दिलं की तो सुखी होईल. खून करणाऱ्या, काम न करणाऱ्या मुलाचं लग्न करून एका मुलीचा जीव धोक्यात घालणं चूक आहे असं माउलीला वाटत नाही.नारायण मुंबईतल्या एका अतीदाट रोगट वस्तीत दाखल होतो. एका अरूंद खोलीत इतर पाच जणांसोबत रहातो. त्याच दाटीवाटी खोलीत त्याची आईही येतो, मुलाचं मन वळवून त्याचं लग्न लावण्यासाठी.
नारायण आणि खोलीसोबती. त्यांची मुळं मुंबईत नाहीत. मुंबईच्या संस्कृतीशी त्यांचं देणंघेणं नाही. महाराष्ट्र त्यांना माहित नाही. हिंदी चित्रपटानं तयार केलेली कोणाचीच नसलेली आणि केवळ भासमान अशी संस्कृती ही त्यांची संस्कृती. हिंदी सिनेमात दिसणारा शृंगार, तिथं दिसणारी श्रीमंती, तिथली गाणी, तिथलं संगित, तिथली व्यसनं हे नारायणचं जीवन. सलमान खान हे त्याचं दैवत. सलमानची गाणी – संवाद हे त्याचं साहित्य. राजीव गांधी आणि मोदी यांची फिल्मी भाषणं हे त्याचं राजकारण.   सभोवतालचं क्रूर वास्तव आणि फिल्मी संस्कृती-राजकारण यांच्या तावडीत घडलेला शहरी माणूस.
अशा माणसांची कोणतीही मोजदाद सरकारकडं किंवा समाजाकडं नाही. त्यांनी गुन्हे केले, कायदे पाळले नाहीत, समाजाचा एक भाग म्हणून कर्तव्यं पार पाडली नाहीत तरी त्यांच्या कृत्यांची ना नोंद, ना त्यांच्यावर कोणतीही कारवाई. सभोवतालाचे फायदे ही माणसं घेतात पण सभोवतालाप्रती कर्तव्य पार पाडत नाहीत.दिल्लीत बलात्कार करणारी माणसं नेमकी याच प्रकारातली होती.
दिद्गर्शकानं नारायणची गोष्ट डॉक्यूमेंटरीच्या शैलीत सांगितलीय. अलीकडं चित्रपटी लोकांना डॉक्युमेंटरीचं आकर्षण वाटू लागलंय. ऑटोहेड या शैलीला मॉक्यूमेंटरी असं नाव पडलंय. चित्रण मुंबईतलं आहे. मुंबईतल्या टपऱ्या, कटिंग चहाचे अड्डे, दाटवस्तीतली निरुंद घरं, खिडकीतून डोकावणारी माणसं, माणसांची आणि वाहनांची गर्दी, कलकलाट या साऱ्या गोष्टी चित्रपटात आहेत. जशाच्या तशा. स्टुडियोचा, सेटचा वापर केलेला नाही. कृत्रीम दिवे नाहीत. सध्या भरपूर वापरला जाणारा गोप्रोसारखा छोटा कॅमेरा ऑटोमधे पुढल्या बाजूला ठेवून ऑटो चालवणारा आणि प्रवाशांचं चित्रण आहे. दुसरा कॅमेरा एकूण चित्रण करतो. बहुतेक वेळा चित्रण ऑटोमधून केलेलं असल्यानं दृश्य काहीशी थरथरतात.  चित्रणासाठी कॅमेरा ट्रायपॉडवर, ट्रॉलीवर, क्रेनवर ठेवायची पद्धत आहे. त्यामुळं दृश्यं नाना कोनांतून दिसतात. या चित्रपटात त्यातलं काहीही केलेलं नाही.   रात्रीची दृश्यं अंधुक प्रकाशातली आहेत. रूपा या सेक्सवर्करशी नारायण भांडतो आणि शेवटी तिचा खून करतो हे दृश्य शेदोनशे फुटावरून आहे आणि एकाच शॉटमधे चित्रीत केलंय. दोघांमधलं संभाषण दुरून असल्यानं हलक्या आवाजात आहे. आवाज आणि दृश्यं चकचकीत रुपात पहायची सवय झालेल्या प्रेक्षकाला हे नवं असेल, कदाचित आवडणार नाही.
चित्रपटात गाणी नाहीत. सेक्सची निकटदृश्यं नाहीत.  
 चित्रीकरण आणि सादरीकरणाच्या या पद्धतीमुळं आपण खरीखुरी घटना पहातोय असं वाटत रहातो. Suspsnsion of disbelief. समोरचं दृश्य खोटं आहे हे आपल्याला नाटक (सिनेमा) पहातांना कळत असतं. समोर जे घडतंय ते मुद्दाम घडवलेलं आहे, त्यातली पात्रं हे नट आहेत हे आपल्याला माहित असतं.  पडद्यावर दिसतय ते सारं खोटं आहे हे सिनेमा  पहाताना नजरेआड करतो.  चित्रपट निर्मितीचं हे प्राणतत्व ऑटोहेड सिनेमात अधिकाधीक चितारण्याचा  प्रयत्न आहे.
सत्या सिनेमानं मुंबईतलं अपराध जग व्यवस्थित मांडलं. सत्या सिनेमा हिंदी चित्रपटातलं एक महत्वाचं वळण आहे. ऑटोहेडमधे गाणी नाहीत, नाच नाहीत, शृंगाराचे संकेत नाहीत. तरीही हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतलं एक नवं वळण आहे. सत्यानं गुन्हाजगताचं प्रोफाईल मांडलं, ऑटोहेड समकालीन भारतीय-शहरी जीवनाचं प्रोफाईल त्यातल्या अनेक पदरांमधून दाखवतो.
ऑटोहेड या नावाशी ऑटोशंकर या १९८८-९० मधे गाजलेल्या एका नावाशी साम्य आहे. ऑटोशंकर हा तामिळनाडूतला एक भाई होता, अंडरवर्ल्डमधला एक डॉन होता. दारू, वेश्या, चोरट्या वस्तू, ड्रग्ज, खून इत्यादी सर्व प्रकारचे गुन्हे त्याच्या राज्यात होत असत. पोलिस, तुरुंग, सरकार आणि राजकारणी अशा सर्वांशी त्याचं घट्ट नातं होतं. सारा मामला बटबटीत होता, त्यात कोणतीही तरलता नव्हती. त्याच्यावर त्याच नावाचा सिनेमा कानडी भाषेत निघाला आणि तो तामिळमधे डब झाला. ऑटोशंकरची भूमिका उपेंद्र या बदबदीत नटानं, ऑटोशंकरची व्यवसाय शत्रू माया हिची भूमिका शिल्पा शेट्टीनं केली होती. अगदीच बटबटीत दक्षिणी सिनेमा. काय ती उघडी शरीरं, काय त्यांचे क्लोज अप्स, काय ते एकमेकांना घामट चिकटणं, काय ते एक थप्पड मारल्यावर माणूस पन्नास फूट हवेत उडणं. काय अन् काय.
ऑटोहेड आणि ऑटोशंकर यांच्यात तुलना होऊ शकत नाही.
१९९२ साली man bites dog नावाची एक फ्रेंच फिल्म झाली. गुन्हेगार नायक, टीव्हीच्या कॅमेऱ्याला साक्षी ठेवून गुन्हे करणं आणि स्वतःची कहाणी सांगणं, भीषण खून. खास फ्रेंच भीषणता. नायकाची एक मैत्रिण आहे, ती बासरी वाजवते. तिचा खून होतो तो तिच्या गुदद्वारात बासरी घुसवून. हा सिनेमा काळापांढरा होता. त्यात गाणीबिणी नव्हती. हा सिनेमा पश्चिमी सिनेमातलं एक वळण मानला जातो. यू ट्यूबवर तो पहाता येतो. ऑटोहेड आणि  man bites dog या दोन सिनेमात फार फार साम्य आहे.
रोहित मित्तलची ही पहिलीच फिल्म. रोहितनं अमेरिकेतून चित्रपट निर्मितीची पदवी घेतली आहे. अमेरिकेतला अभ्यास साधारणपणे हॉलिवूड, फ्रेंच, ब्रिटीश, पोलिश इत्यादी  फिल्मवर आधारलेला असतो. त्याच अभ्यासात कदाचित रोहितनी man bites dog ही फिल्म पाहिली असावी. १९३० च्या दशकात  हॉलिवूडमधे डॉक्युमेंटरी आणि फीचर फिल्म यांच्या संकरातून मॉक्यूमेंटरी शैली तयार झाली. त्याच शैलीतली  man bites dog ही फिल्मही त्या दिग्दर्शकाची पहिलीच फिल्म होती.
ऑटोहेड मुंबईतल्या रस्त्यांवर आणि पडक्या एकांत ठिकाणी चित्रीत झालीय. फक्त १४ दिवसांत. केवळ १२ जणांनी ही फिल्म केलीय. मुंबईच्या गर्दीत चित्रीकरण करणं ही गोष्ट सोपी नाही. त्यासाठी रोहितनी काटेकोरपणे सर्व स्थळांचा अभ्यास केला, कोणते त्रास आणि कोणते अडथळे येऊ शकतात ते हेरलं. उपकरणं इतकी लहान आणि कमीत कमी ठेवली  की सिनेमाचं चित्रीकरण होतंय असं वाटू नये. शूटिंग चाललंय असं  कळलं की लोक फार गर्दी करतात आणि पोलिसांची मदत घ्यावी लागते.
चित्रपटामधे व्यक्तींना असलेलं महत्व मर्यादित आहे. मुंबई, मुंबईतलं जगणं, बकालपणा, आवाज, मुळं नसलेली अधांतरी माणसं, वास्तवात नसलेलं भासमान जगणं आणि त्यात अडकलेली माणसं अशा गोष्टी चित्रपटात महत्वाच्या आहेत. त्यामुळं एकादी भूमिका, एकादा नट, एकादी नटी फार ठळक आणि आकर्षक होणं चित्रपटाच्या एकूण प्रारूपाशी विसंगत ठरतं. नारायण हा माणूस नट वाटता कामा नये तो अगदीच साधा माणूस, म्हणजे कोणीही  दिसायला हवा. त्याचे हावभाव, त्याचे शब्दोच्चार, त्याचा वावर nondescript असायला हवा, stylize असता कामा नये. nondescript रहाण्याचं कौशल्य फार कमी कलाकारांना जमतं. नसिरुद्दीन शहा हे त्या प्रकारचे दुर्लभ नट आहेत. नारायण ही भूमिका करण्यासाठी व्यावसायिक नट घेतला तर त्याच्यावर दिद्गर्शकाला फार मेहनत घ्यावी लागते कारण तो व्यावसायिक नट आपली कला दाखवण्याच्या खटाटोपात असतो. व्यावसायिक, स्टार, नावाजलेल्या नटांमधलं नटपण खुडून नटाला भूमिकेत शिरायला लावायचं हे फार कठीण काम असतं. नटालाही दिद्गर्शकाचं म्हणणं समजून घेऊन भूमिका पार पाडावी लागते. अमिताभ बच्चन हा एक त्या वर्गातला कलाकार आहे. पिकू असो की पिंक, अमिताभ स्वतःचे सगळे कंगोरे दूर सारून भूमिकांत शिरतो.  ऑटोहेडमधे दिद्गर्शकानं माहित नसलेले कलाकार घेऊन मामला सोपा करून टाकला. सर्व भूमिकांसाठी अभ्यासू, गवगवा न झालेले कलाकार दिद्गर्शकानं निवडलेले आहेत. डोक्यात हवा गेली नसल्यानं ते कलाकार समंजसपणे भूमिका निभावतात.त्यात आणखी एक फायदा असा की कलाकारांच्या तारखा मिळवणं, त्याना भरमसाठ पैसे मोजणं यातूनही दिद्गर्शकाची सुटका झाली. दिद्गर्शकानं सगळी पात्रं, सगळे कलाकार छान हाताळले आहेत.
चित्रणाची हाताळणी मजेशीर होती. जान्हवी द्विवेदी या कलाकारानं नारायणच्या आईची भूमिका केलीय. नारायण आणि आई यांच्यात वादावादी झाल्याचा प्रसंग चितारला तेव्हां जान्हवीला माहितही नव्हतं की चित्रीकरण चाललंय. जणू तालीमच चालली होती. तो सीन फार खरा उतरला आहे.
दीपक संपत या नटानं नारायणची भूमिका केलीय. रोंजिनी चक्रवर्तीनं रूपा या सेक्सवर्करची भूमिका केलीय. रोंजिनी पुण्यातल्या फिल्म इन्सटिट्यूटची विद्यार्थिनी. दीपक हा रंगमचावरचा नट. दीपकचा चेहरा निर्विकार. तीन पत्ता जुगार खेळणाऱ्या माणसासारखा. जुगारीच्या हातात तीन एक्के असले तरी तो मख्ख् असतो आणि फालतू तीन पानं असली तरी तितकाच मख्ख असतो. दीपकचा चेहरा प्रसंगानुसार जशी मागणी असेल तसा आकार घेतो. त्यातही स्टायलायझेशन नाही. हळूहळू दारू चढत जाते आणि नंतर अती झाल्यावर नारायण ओकतो, हे दृश्य स्टायलाईज्ड नाही.
हा चित्रपट भारतात आणि बाहेर महोत्सवांत दाखवला गेला. साधारण सिनेमाघरात तो चालला नाही. याचं कारण काय असेल? बहुतांश प्रेक्षकांना सिनेमा हा स्वप्नासारखा हवा असतो. त्यांना  वास्तव किंवा वास्तवावरचं चिंतन सिनेमात पहायचं नसतं. वास्तव तर दररोजच जगतो, ते पुन्हा पडद्यावर कशाला पहायचं असं त्यांना वाटतं.   सिनेमा असो की सीरियल लोकांना झक्कास कपडे, दागिने, छान घरं, सुखावणारे संवाद इत्यादी गोष्टी हव्या असतात. ऑटोहेड ते देत नाही.
सत्या आणि कंपनी या सिनेमांनी गुन्हेगारी वास्तव दाखवलं. पण त्या पटांत गाणी, विनोदी दृश्यं, रिलीफ इत्यादी गोष्टींची पेरणी केली. अब तक छप्पन थोडा वेगळा होता. त्यात गाणी आणि रिलीफ नव्हता. परंतू त्यातला हीरो इन्सपेक्टर ध्येयवादी दाखवला होता. इन्सपेक्टर दणादण एनकाऊंटर करत असे पण त्यात पाप विरुद्ध पुण्य, मंगल विरुद्ध अमंगल अशी लढाईही होती. त्यातला हीरो लोकांना आवडेल अशा रीतीनं बेतलेला होता. वास्तव काही कां असेना एक थोर मनुष्य इन्सपेक्टरच्या रुपात समाजाचं कल्याण करतांना दाखवला होता. सिनेमात लोकांच्या फलद्रूप न होणारी  स्वप्नं दाखवली जातात. ऑटोहेडमधे त्यातलं काहीही नाही. म्हणूनच तर ऑटोहेड या फेस्टिवलमधून त्या फेस्टिवलमधे असा फिरतो.
।।

व्यापम प्रकरणाची आठवण

व्यापम प्रकरणाची आठवण

  
मिहीर कुमार हा तरूण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक के सुदर्शन यांच्याकडं काम करत असे. सेवादार होता. त्याची अन्न निरीक्षक, फूड इन्सपेक्टर या पदावर मध्य प्रदेश सरकारच्या खात्यात काम करायची इच्छा होती. त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. ही २००७ सालातली हकीकत. मिहीरनं परीक्षेबाबत चौकशी केली, केव्हां, कुठं, विषय कोणते वगैरे. 
मिहीरला माहित असावं की परिक्षा देऊन रीतसर नोकरी मिळणं वगैरे खरं नाही, वशीला लागतो, भानगडी कराव्या लागतात. तो तसं सुदर्शनांकडं बोलला नसेल पण त्यानं परीक्षेबाबत मार्गदर्शन करा, ओळख बिळख सांगा असं सुदर्शनना सांगितलं असावं. सुदर्शननी त्याला त्या वेळचे शिक्षण मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांच्याकडं पाठवलं. भाजपचं सरकार होतं.शर्मा यांनी त्याला परीक्षा नियंत्रक पंकज त्रिवेदींकडं पाठवलं. 
मध्य प्रदेश व्यावसायिक परिक्षा मंडळ ही सरकारनं स्थापन केलेली संस्था विविध पदांवरील आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या कॉलेजेसमधील प्रवेशासाठी परिक्षा घेते. शिक्षक, कॉन्स्टेबल, अन्न निरीक्षक, वजन माप निरीक्षक इत्यादी पदं या परिक्षेमधून भरली जातात. तसंच मेडिकल कॉलेजमधे प्रवेश देण्याआधी व्याशिमंची परिक्षा द्यावी लागते. विद्यार्थ्यानं परिक्षेचा अर्ज भरल्यावर त्याला रोल नंबर दिला जात असे. त्यानंतर त्यानं परिक्षा दिल्यावर पेपर तपासून झाल्यावर मार्क इत्यादी गोष्टींची नोदणी होऊन विद्यार्थी पास किवा नापास होत असे, तसं त्याला कळवलं जात असे. हा सारा व्यवहार कंप्यूटरवर होत असे. एक स्वतंत्र कंप्यूटर प्रणाली त्यासाठी व्याशिमंनं विकसीत केली होती. पंकज त्रिवेदी हे या व्यवस्थेचे प्रमुख होते.
मिहीर पंकज त्रिवेदींकडं गेला. तो तिथं गेला तेव्हां त्रिवेदींना एक मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांच्याकडून फोन गेला ‘ मिहीर हा सुरेश सोनींचा खास माणूस आहे.’ सुरेश सोनी कोण? हे संघाचे एक वरिष्ठ अधिकारी आणि भाजप आणि संघ यांतील संयोजन ही त्यांची जबाबदारी होती.
सुदर्शननी मिहीरला सांगितलं ‘ जेवढी चांगली माहित असतील ती उत्तरं लिही, ज्या  प्रश्नांची उत्तरं येत नसतील ते प्रश्न सोडून दे.’
मिहीरला अनेक प्रश्न आले नाहीत. 
परिक्षेचा निकाल लागला आणि मिहीर परिक्षेत सातव्या क्रमांकावर पास झाला.
राहुल यादव. शालांत परिक्षेत नापास झाला होता. तरीही व्याशिमं परिक्षेला बसला. त्यानं लखनऊमधून मुनीर यादव नावाचा माणूस आणला. त्याला पैसे दिले. अशी माणसं पुरवणाऱ्या अनेक संस्था उत्तर प्रदेशात आहेत. मुनीर राहुलच्या जागी परीक्षेला बसला.  त्याला कोणी अडवलं नाही. अशा माणसाला स्कोरर असं म्हणतात. स्कोरर परिक्षेला बसणार हे व्याशिमंला माहित होतं. तशी रीतसर व्यवस्थाच झालेली होती. राहुल यादव परिक्षा पास झाला.
राज्य दूध संघात कर्मचाऱ्यांची भरती होती. त्यासाठी प्रवेश परिक्षा. मनीष श्रीवास्तव या आयएसअधिकाऱ्याचा जावई तरंग शर्मा यानं एक रॅकेट तयार केलं होतं. संतोष गुप्ता हा त्याचा सहकारी. त्यांनी पाच जणांना ३० लाख रुपये घेऊन दूध संघाची परिक्षा पास करवलं. या व्यवहाराचं कमीशन म्हणून तरंगनं ६ लाख रुपये घेतले आणि उरलेली रक्कम व्याशिमंमधल्या प्रमुख सिस्टिम अनॅलिस्ट नितीन महिंद्र यांच्याकडं सरकवली. परिवहन, पोलीस इत्यादी खात्यातल्या नोकऱ्यांसाठी कामं करून देणारे गट काही माणसं घेऊन त्यानं तयार केला होते. 
२००४ ते २०१३ या काळात दरवर्षी ३०० ते ४०० विद्यार्थी घोटाळे करून पास झाले. त्यातले बरेचसे मेडिकल परिक्षेला बसले होते. अनेक वाटांनी ते पास झाले. एक वाट म्हणजे परिक्षार्थीचा रोल नंबर व्याशिमंला आधीच कळवला जात असे. त्यानंतर त्यानं पेपरात काहीही लिहिलं तरी तो पास होत असे. दुसरी वाट म्हणजे उत्तर प्रदेशातून मेडिकल कॉलेजमधले विद्यार्थी भाड्यानं आणले जात. त्यानं पेपर लिहायचा. कधी परीक्षार्थीच्या नावानं पेपर लिहायचा तर कधी स्वतंत्रपणे लिहायचा आणि नंतर तो विद्यार्थ्याच्या नावावर खपवायचा.
हे झाले राज्य पातळीवरचे संघटित प्रकार. जागोजागी, स्थानिक पातळीवर भुरटे उद्योगही भरपूर चालले होते. एक उदाहरण भोपाळमधलं. मेडिकल प्रवेशाची परिक्षा. परिक्षा पार पडली. केद्रावरून पेपर गोळा करून विद्यापिठात  न नेता तिसरीकडंच नेण्यात आले. तिथं ते पेपर बोगस लोकांकडून तपासून घेण्यात आले. गुण वगैरेची पत्रकं तयार करून नंतर ते विद्यापीठात नेऊन रीतसर निकाल जाहीर करण्यात आला.
हे सारं रॅकेट भाजपचे मंत्री लक्ष्मीकांत शर्मा वर्षानुवर्षं चालवत होते. शर्मा उमा भारती मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रीमंडळात होते. त्यानंतर त्यांनी दहा वर्षं खाणी, शिक्षण इत्यादी खाती सांभाळली. खाण माफियाशी त्यांचा संबंध होता. २००८ मधे शर्मा खाण मंत्री होते. सतनाची एक खाण त्यांनी बिर्लागटातल्या एका कंपनीला दिली. खाण वाटपासाठी आलेले सर्व अर्ज शर्मांनी कोणतंही कारण न देता रद्द करून बिर्ला कंपनीला खाण दिली. हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयानं दिला. 
वरील सर्व घोटाळ्यांमधे सुधीर शर्मा हे गृहस्थ मध्यस्थाचं काम करीत. सुधीर शर्मा भारतीय जनता पक्षाच्या शिक्षण सेलचे प्रमुख होते. सरकारच्या तांत्रिक शिक्षण विभागातले अग्रवाल आणि दांधीर मोठी रक्कम गोळा झाली की सुधीर शर्माकडं सोपवीत. रात्री सुधीर शर्मा ती रक्कम लक्ष्मीकांत शर्मा यांच्या व्यक्तिगत स्टाफमधले मोहरसिंग यांच्याकडं पोचवत. जानेवारी १२ रोजी अग्रवाल यांनी शर्मांच्या हाती  १५ लाख रुपये दिले. पैकी १० लाख रुपये मंत्र्यांकडं पोचले  ( उरलेले? कमीशन? की मधल्या मधे मारले?). नंतर एकदा १०लाख, पुन्हा १५ लाख मंत्र्यांकडं पोचल्याची नोंद आहे.   
किती कोटी रुपयांची उलाढाल झाली असेल? १२०० ते ४००० व्यवहार झाले असतील. काही लोकांनी पाच लाख दिले काहीनी दोन दिले असतील. तीनेक लाख सरासरी धरली तर १२० कोटींचा व्यवहार झाला असेल. पैशाचा व्यवहार ही एक गोष्ट. लायकी नसलेली मंडळी पोलिस, मेडिकल कॉलेजमधे नेमली गेल्याचे कसे परिणाम होतील आणि किती काळ ते चालत रहातील ते सांगता येत नाही.
२००७ मधे व्यापमं चं ऑडिट झालं तिच्यातून सारं लफडं बाहेर आलं. ऑडिटमधे  अनेक गैरव्यवहार दिसले. उत्तर पत्रिका परवानगी नसताना नष्ट करणं हा गंभीर प्रकार कळल्यावर ऑडिटरनं ताशेरे मारले. पुढली कारवाई अटळ असल्यानं घोटाळा बाहेर आला.
घोटाळा घडला तो सगळा काळ भारतीय जनता पक्षाचे शिवराज सिंह चौहान यांचं राज्य होतं. घोटाळा बाहेर आल्या आल्या भाजपच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती म्हणाल्या ‘ हा तर बिहारच्या चारा घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा आहे.’  
उमा भारती या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्या बंडखोर आहेत. मध्य प्रदेशचं त्यांच्या पक्षाचं राजकारण त्याना मंजूर नाही. त्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार होत्या. चौहान यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं त्यांना आवडलेलं नव्हतं.
बातमी फुटल्यावर मुख्यमंत्री चौहान म्हणाले ‘ सरकारच्या एकाद्या विभागात भ्रष्टाचार असणं शक्य आहे. परंतू सारं सरकारच भ्रष्ट आहे असं म्हणणं बरोबर नाही. या घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे.’ चौहान यांनी स्पेशल टास्क फोर्सकडं हे प्रकरण सोपवलं. नंतर तपासावर न्यायालयानं नजर ठेवायला सुरवात केली.
टास्क फोर्सनं १३० जणाना पकडलं. प्रथम लक्ष्मीकांत शर्मा फरार होते. नंतर सापडले. सुधीर शर्मांनीही काही काळ फरार राहून पोलिसांच्या स्वाधीन झाले. टास्क फोर्सनं जबान्या घ्यायला सुरवात केली. त्यातली माहिती माध्यमांकडं पोचायला लागली. लाचेचे नेमके आकडे, देणाऱ्या घेणाऱ्यांची नावं, तारखा इत्यादी तपशील माध्यमांना मिळाले. व्यापमंच्या कंप्यूटरमधे तर मजाच होती. नितीन महिंद्र हे सिस्टिम अनॅलिस्ट असल्यानं त्यांनी सारी माहिती पद्धतशीर एक्सेल शीटमधे लिहून ठेवली होती. पैसे देणाऱ्याचं नाव, किती पैसे दिले, किती पैसे शिल्लक आहेत, पैसे कोणाला गेलेत ही सारी माहिती एक्सेलशीटमधे होती. पैकी एक शीट माध्यमांनी छापली.
जबानीमधे सरसंघचालक सुदर्शन आणि संघाचे नेते सुरेश सोनी यांची नावं आल्यावर  धमाल उडाली. सुरेश सोनी हे भाजप-संघ यांच्यातले संबंध हाताळतात. भाजप आणि संघाच्या शिबिरात ते नीतीमत्ता या विषयावर व्याख्यानं देत असतात. असंच एक नीतीमत्ता शिबीर भोपाळमधे व्हायचं होतं. सोनी नागपूरला असतांना म्हणाले की सुदर्शनजी आणि आपल्यावरचे आरोप तद्दन खोटे आहेत. नागपूरहून ते विमानानं भोपाळला पोचले. शहराच्या बाहेरच्या दाणापाणी नावाच्या हॉटेलात ते मुख्यमंत्री चौहान याना तीनेक तास भेटले. भेटीत काय घडलं ते संघसंस्कृतीतल्या सवयीनुसार अंतर्गत होतं, प्रसिद्धीसाठी नव्हतं. दुसऱ्या दिवशीच्या नीतीमत्ता शिबीरात सोनी हजर होते पण चौहान मात्र प्रकृती बिघडली असल्यानं ( तसं पत्रक काढण्यात आलं) गैरहजर होते. आणखी एकदा सोनी, संघचालक मोहन भागवत आणि चौहान यांची बंद खोलीत तीनेक तास बोलणी झाली. त्यातही काय घडलं ते कळायला मार्ग नाही.
या दरम्यान घडलेल्या दोन घटना अशा. एके दिवशी भोपाळच्या पोलिस मुख्यालयातून पत्रक निघालं की चालू असलेल्या चौकशीमधे सुदर्शन आणि सोनी यांची नावं आलेली नाहीत, त्यांच्याबद्दल केल्या जाणाऱ्या आरोपांबाबत पोलिसांना कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. खुलासा पोलिसांनी केला.
पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ संघामधे सक्रीय कार्यकर्ते असलेले कर्मठ गृहस्थ रघुनंदन शर्मांनी पत्रकारांना सांगितलं ‘ घोटाळ्याच्या चौकशीचे तपशील माध्यमांना कसे पोचतात त्याचं आश्चर्य वाटतं. सरकारातलं, पोलिसांतलं कोणी तरी हे तपशील माध्यमांना पुरवत आहे. या प्रकरणाची चौकशी टास्क फोर्सकडून काढून घ्यावी, सीबीआयकडं सोपवावी.’
चौकशीबाबत मुख्यमंत्री चौहान म्हणाले होते की टास्क फोर्स कायद्यानुसार चांगलं काम करत असल्यानं चौकशी सीबीआयकडं देण्याची आवश्यकता नाही, देणार नाही.’
लक्ष्मीकांत शर्मा अर्थातच भाजपचे आणि संघाचे कार्यकर्ते. घोटाळ्यातले पैसे गोळा करून त्यांच्याकडं पोचवायचा उद्योग करीत सुधीर शर्मा. ते भाजप आणि संघाचे कार्यकर्ते. बरं तसे सामान्य कार्यकर्ते नव्हते. झाबुआ जिल्ह्यात त्यांची एसआर फेरोअलाईज नावाची खाण आहे. त्यांचे काही व्यवहार ( कायदेशीर?) इंडोनेशियात आहेत. त्यांच्याकडं ऑडी, स्कोडा इत्यादी गाड्यांचा ताफा आहे. संघाचे नेते सुरेश सोनी यांचा विमान प्रवासाचा खर्च त्यांनी काही वेळा केलेला आहे. 
या घोटाळ्यातले एक आरोपी अजय शंकर मेहता २५ जुलै २०१४ रोजी दोन महिन्यांच्या तुरुंगवासानंतर बाहेर पडले. ते जन अभियान परिषद या एनजीओचे उपाध्यक्ष होते. पोलीस कॉन्स्टेबलच्या लफडंभरतीच्या आरोपाखाली ते तुरुंगात होते. या संस्थेचे अध्यक्ष होते मध्य प्रदेशचे मुख्य मंत्री शिवराज सिंह चौहान. अनेक सनदी अधिकारी या संस्थेच्या कार्यकारिणीत होते. सरकार आणि एनजीओ यांना ही संस्था जुळवून देत असे, सरकार आणि एनजीओ यांच्यात ही संस्था मध्यस्थ होती. 
मेहता बाहेर कसे पडले? त्यांना जामीन मिळाला. जामीन कोणी दिला? भोपाळमधले एक बिझनेसमन पुरुषोत्तम तोतलानी यांनी. तोतलानींची हॉटेलं आहेत, इतर अनेक उद्योग आहेत. मेहतांना आपल्याला कोणी जामीन दिला ते माहित नव्हतं. बाहेर पडल्यावर कळलं. याच घोटाळ्यातले  मुख्य आरोपी नितीन महिंद्र तुरुंगात होते. त्यानाही तोतलानी यांनीच जामीन देऊन सोडवलं. त्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले सिंडिकेट बँकेचे सीएमडी एस के जैन यांनाही जामीन देऊन कोठडीबाहेर काढलं. तोतलानी हे मध्य प्रदेशातलं मोठ्ठं प्रस्थ आहे. त्यांचे खूप बिझनेसेस आहेत. ते संघ-भाजपच्या लोकांना आर्थिक मदत करत असतात.
  ।।
मध्य प्रदेशात चाळीसेक माणसांचे मृत्यू या ना त्या वाटेनं व्यापम घोटाळ्यात गुंतले आहेत. कोणाचा हृदय विकारानं मृत्यू झालाय, कोणी दारूचा डोस जास्त झाला म्हणून मेलंय, कोणी आत्महत्या केलीय.  मध्य प्रदेश सरकारचे गृहमंत्री बाबुलाल गौर यांची यातल्या काही मृत्यूंबद्दलची प्रतिक्रिया अशी- ‘ माणसं मरतच असतात. माणसाला हार्ट अटॅक येत असतो. जगण्यातल्या तणावामुळं माणसं आत्महत्या करत असतात. नेहमीच अशा गोष्टी घडत असतात. ‘
मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान म्हणाले ‘ झालेले मृत्यू दुःखद आहेत पण ते व्यापम घोटाळ्याशी जोडणं योग्य नाही.’
 ८ जानेवारी २०१५ रोजी डॉ. रामेंद्र सिंग भदोरियाचा मृतदेह त्याच्या ग्वाल्हेरमधल्या खंचमिल मोहल्ल्यातल्या घरात पंख्याला टांगलेला आढळला. गळ्याभोवती उशी गुंडाळलेली होती आणि त्या भोवती टीव्हीची वायर गुंडाळलेली होती. वायरचं एक टोक छतावरच्या  पंख्याला गुंडाळलेलं होतं.
रामेंद्रचे वडील नारायण सिंग एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षकाची नोकरी करत असत. तुटपुंजा पगार. मुलं शिकून मोठी झाली तरच जगणं सुखी होणार. मोठा होण्याचा एकच मार्ग म्हणजे डॉक्टर होणं. रामेंद्रचा शिक्षणातला रेकॉर्ड ठीकठाक, सामान्य होता. तरीही त्यानं डॉक्टर व्हावं असं त्याच्या वडिलांना वाटत असे. 
वैद्यकीय शिक्षणाची पूर्व परिक्षा व्यापम या मंडळासाठी रामेंद्रनं २००५ साली दिली. नापास झाला. पुन्हा ०६ आणि ०७ साली तीच परिक्षा दिली. नापास झाला. ०८ साली त्याला व्यापमच्या परिक्षेत कसं पास व्हायचं ते तंत्र कळालं. ( त्यानं तोतयाला परिक्षेला बसवलं की कॉपी केली की पैसे देऊन मार्क वाढवले त्याची चौकशी चालू आहे. ). ०८ साली रामेंद्र परिक्षा पास होऊन मेडिकल कॉलेजमधे दाखल झाला. २०१४ साली तो एमबीबीएस झाला.
 २०१३ साली व्यापम घोटाळा उघड झाल्यावर पोलिसानी केलेल्या चौकशीत रामेंद्र सापडला. ०८ साली रामेंद्रनं खोटेपणा करून प्रवेश मिळवला. नंतर २०१३ पर्यंत रामेंद्र व्यापम परिक्षात तोतया विद्यार्थी आणि कॉपी करून देणारा या नात्यान कार्यरत होता.  पोलिसानी २०१४ च्या एप्रिल महिन्यात त्याला नोटिस बजावली आणि त्याची एमबीबीएसची पदवी रद्द केली. 
 रामेंद्र हादरला. तरीही २०१४ च्या जून महिन्यात त्यानं एमबीबीएस पदवीच्या जोरावर ग्वाल्हेरच्या बिर्ला इस्पितळात डॉक्टर म्हणून नोकरी मिळवली. येवढंच नाही तर त्यानं पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्जही केला. पदव्युत्तर शिक्षणाला प्रवेश मिळवण्यासाठी एमबीबीस सर्टिफिकेटची आवश्यकता होती. पण  ते त्याच्याकडून पोलिसानी काढून घेतलं होतं.  त्याला पुढलं शिक्षण घेता येईना. परंतू बिर्ला इस्पितळातली त्याची डॉक्टर म्हणून नोकरी चालू होती, तो रोग्याना तपासत, उपचार करत होता. सप्टेंबरात त्यानं लग्नही ठरवलं. 
पोलिसांची चौकशी आणि ससेमिरा त्याची पाठ सोडत नव्हता.
८ जानेवारी 2015 रामेंद्रनं आत्महत्या केली.
।।
१६ जानेवारी २०१५.
मुरैना जिल्ह्यातलं नूराबाद हे गाव. गावातून वहाणाऱ्या संक नदीत  ललित कुमार गोलारियाचं प्रेत सापडलं. पुलावरून उडी मारून त्यानं जीव दिला होता. त्यानं घरी चिठ्ठी लिहून ठेवली होती. व्यापम प्रकरणी कंटाळून आपण जीव देत आहोत असं त्यानं चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं.
ललित कुमार ग्वाल्हेरच्या गजरा राजा मेडिकल कॉलेजमधे शेवटल्या वर्षात शिकत होता. २००३ ते २००५ असं तीन वेळा ललितकुमार मेडिकलच्या प्रवेश परिक्षेत बसला आणि नापास झाला. २००६ साली त्याला प्रवेश परिक्षेत पास होण्याचं तंत्र आत्मसात करून एमबीबीएसला प्रवेश मिळवला. रडत खडत त्याचं गाडं पुढं सरकत होतं. 
१९ जानेवारी २०१४ रोजी ललित कुमारला अटक झाली. खोटा प्रवेश, व्यापम परिक्षेतल्या घोटाळ्यातला सहभाग असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले. तीन महिने ललित कुमार तुरुंगात होता. सुटल्यानंतर तो सतत तणावाखाली असे. मिटवा मिटवी, घेतलेले  किंवा देणं असलेले पैसे असला काही तरी मामला असावा. ललित कुमार आपल्या भावाकडं पैसे मागू लागला. या सगळ्या प्रकरणामुळं त्याच्या वैवाहिक जीवनातही तणाव झाले, त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली. 
२०१५ च्या जानेवारीत ललित कुमारनं आपल्या मोठ्या भावाकडं १० हजार रुपये मागितले. कारण सांगितलं नाही. तणावाखाली होता असं भावाचं निरीक्षण. नंतर ८ हजार मागितले. भावानं दिले. नंतर १५ जानेवारीला पुन्हा ३ हजार मागितले. भावानं दिले. तो भावाशी शेवटला संपर्क. १६ जानेवारी २०१५ रोजी संक नदीच्या पुलावरून उडी घेऊन ललित कुमारनं आत्महत्या केली.
।।
अनुज, अंशुल आणि शामवीर असे तीन तरूण. 
कारनं प्रवास करत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. तिघंही मेले.
व्यापमसाठी तोतये गोळा करणं, खोटी प्रवेश पत्रं तयार करणं, विद्यार्थ्यांचे नंबर आणि पैसे व्यापम अधिकाऱ्यांकडं पोचवणं अशी एक मोठ्ठी इंडस्ट्री हे तिघं चालवत होते. तिघं उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश ही तीन राज्यं सांभाळत. प्रत्येक राज्यात यांनी व्यापमसाठी केंद्र उभारलेलं होतं.
उदा. उत्तर प्रदेशात लखनऊ, अलाहाबाद आणि कानपूर या ठिकाणी केंद्रं होती. या गावातल्या कोचिंग क्लासवर लक्ष ठेवलं जात असे. आयएस, परदेशी जाण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परिक्षा यांसाठी क्लासमधे जाणारी मुलं शोधली जात. सामान्य घरातली. ही मुलं मरमर अभ्यास करत, हुशार असत. त्यामुळं मध्य प्रदेशातल्या व्यापम सारख्या एकदम लल्लू पंजू परिक्षा म्हणजे त्यांच्या हातचा मळ असे. या विद्यार्थ्यांमधून तोतया विद्यार्थी तयार केले जात. या तोतयाना मध्य प्रदेशात परिक्षेच्या काळात नेलं जात असे. सर्व रचना काळजी पूर्वक केलेली असे. वर्गात एका विद्यार्थ्याच्या नावान हा तोतया परिक्षेला बसे.
 हे त्याला कसं जमे? 
परिक्षा वर्गात प्रवेश मिळण्यासाठी एक ओळख पत्र लागत असे. या ओळख पत्राच्या वरच्या अर्ध्या भागात विद्यार्थ्याचा फोटो असे आणि खालच्या अर्ध्या भागात विद्यार्थ्याचं नाव, पत्ता, सही इत्यादी तपशील असे. काम सोपं होतं. वरच्या भागातल्या  मुळ विद्यार्थ्याच्या फोटोच्या जागी तोतया विद्यार्थ्याचा फोटो लावला जात असे, खालच्या भागात बाकीचा तपशील जसाच्या तसा असे.
तोतया विद्यार्थी अशा ठिकाणी बसवला जाई जिथ त्याच्या आसपासचे तीन चार विद्यार्थी कॉपी करू शकत. म्हणजे एक अधिक चार अशा पाच जणांकडून पाच ते दहा लाख रुपये घेतले जात. ज्याच्या नावानं तो परिक्षेला बसे त्याच्याकडून जास्त पैसे, कारण तो विद्यार्थी काहीही न करता पास होत असे. म्हणून तो दहा लाख देणार. बाकीच्या मुलाना कॉपी करताना कां होईना थोडी तरी मेहनत करावी लागत असे. त्यामुळं त्यांना समजा दोन तीन लाख रुपये.
शिवाय स्वतंत्रपणे विद्यार्थ्याचे परिक्षा क्रमांक व्यापमला कळवणं, पैसे पोचते करणं आणि पास करवून घेणं हेही काम हे तिघं करत असत. तिघंही सतत फिरत असत, एकमेकाच्या संपर्कात असत. मध्य प्रदेशात ठिकठिकाणी त्यांना सतत जावं लागत असे.
तिघं अनेक वेळा एकत्र असत, पैकी एका वेळी अपघात झाला.
।।
 करप्शन इंटरनॅशनल या एका युनोच्या संस्थेनं जगातल्या देशांची पहाणी केली तेव्हां त्यात भारताचा क्रमांक ९४ वा लागला. म्हणजे जवळ जवळ भ्रष्टाचार नाहीच अशा स्वीडनचा क्रमांक एक होता तर भारताचा ९४ वा. १७७ देशांची पहाणी होती. या पहाणीत कोणकोणत्या क्षेत्रात भ्रष्टाचार आहे आणि तो किती आहे याची पहाणी करण्यात आली. भारतीय लोकांनीच दिलेल्या उत्तरांनुसार भारतातल्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार आहे. राजकारण, शिक्षण, आरोग्य पोलीस या क्षेत्रात तो कमालीचा आहे पण लष्कर, न्यायव्यवस्था यातही तो आहे असं पहाणीत आढळून आलं. भ्रष्टाचार म्हणजे सार्वजनिक संस्था-व्यवस्था यातील पैशाचा अपहार  अशी कसोटी वरील संस्थेनं गृहीत धरली होती. भारतीय ३६ टक्के सार्वजनिक जीवन भ्रष्टाचारी आहे असा निष्कर्ष निघाला. 
।।