रविवार/घटनेची गुंडाळी

रविवार/घटनेची गुंडाळी

मी ‘कालनिर्णय’ साठी बॉब सिल्वर्स या संपादकावर लेख लिहीत होतो.  न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स या एका जगन्मान्य पाक्षिकाचे सिल्वर्स हे संपादक. ६१ वर्षं ते संपादक होते. अनेको नोबेल विजेते लेखक, शास्त्रज्ञ, विचारवंत इत्यादींनी सिल्वर्ससाठी लेखन केलं. 

सिल्वर्सनी लेखक तयार केले. लेखनातली क्लिष्टता काढून टाकणं, लेखन प्रवाही ठेवणं, लेखन सोपं ठेवणं, ते अगदी स्पष्ट आणि समजेल असं ठेवणं या सवयी त्यांनी लेखकाना, भल्या भल्या लेखकांना लावल्या.

मुख्य म्हणजे लेखन साधार असलं पाहिजे, तपशील असले पाहिजेत, पुरावे असले पाहिजेत असा त्यांचा आग्रह असे. त्यांचा आग्रह प्रेमळ असल्यानं तो कधी हट्ट किंवा दुराग्रह झाला नाही.

तर अशा सिल्वर्स यांच्याकडं जोन डिडियन या पत्रकार बाई एका घटनेबद्दलचा वृत्तांत घेऊन गेल्या. घटना अशी. १९८९ सालच्या एप्रिल महिन्यात न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कमधे संध्याकाळी जॉगिंगला गेलेल्या त्रिशा मेली यांच्यावर बलात्कार झाला. पोलिसांनी पटापट हालचाली करून तीन लॅटिनो आणि दोन काळ्या तरुणांना पकडलं. पटापट खटला निकाली निघाला आणि पाचही तरूण तुरुंगात रवाना झाले.

डिडियन क्राईम रिपोर्टर होत्या. त्यांनी बातमीदारीचे नियम पाळून वृत्तलेख तयार करून बातम्या दिल्या. परंतू सारा मामला गडबडीचा आहे, पोलिसांचा तपास सदोष आहे असं त्याना वाटलं. त्या टिपण घेऊन सिल्वर्स यांच्याकडं गेल्या.

तिथून पुढं डिडियनचा ‘छळ’ सिल्वर्सनी सुरु केला. त्यांचा मजकूर आला की मजकुरातल्या नोदीबद्दल ते हज्जार प्रश्न विचारत. याला पुरावा काय, हे खरं कशावरून, तू म्हणतेस हा पुरावा खात्रीलायक वाटत नाही, कायद्यातले संदर्भ दाखव असं विचारत सिल्वर्सनी डिडियनना भंडावून सोडलं. स्वतः सिल्वर्सनी अशा घटनांवरचे आधीचे निकाल, कायद्यातल्या तरतुदी इत्यादी वाचलं होतं. डिडियन भेटायला येत त्या वेळी सिल्वर्स जय्यत तयार असत.

८९ साली घडलेल्या घटनेवर ९१ साली म्हणजे दोन वर्षांनी डिडियन यांचा १६ हजार शब्दांचा लेख रिव्ह्यूमधे प्रसिद्ध झाला. लेखात न्यू यॉर्कचे पोलिस, तुरुंग व्यवस्था, न्याय व्यवस्था, पेपर इत्यादी सगळ्या व्यवस्था  उघड्या पडल्या. न्याय झालेला नाही हे त्या दीर्घ लेखातून सिद्ध झालं.

डिडियनचा लेख आणि न्यू यॉर्क रिव्ह्यू हा विषय ९१ च्या लेखानंतर संपला.

तिथून बलात्कार प्रकरण नवी वळणं घेत गेलं.

बलात्कार झालेल्या स्त्रीचं नाव होतं त्रिशा मेली (Trisha Melili). कायदा आणि संकेत या दोन गोष्टीमुळं ते नाव प्रसिद्ध झालं नव्हतं.

त्रिशा मेली ही महिला सालोमन या इनवेस्टमेंट बँकिंग संस्थेमधे कामाला होती. महात्वाकांक्षी होती, प्रकृती सांभाळून होती, मॅरेथॉन पळत असे. दिवसाचे बारा चौदा तास काम करत असे. संध्याकाळी काम आटोपल्यावर सेंट्रल पार्कमधे जॉगिंगला जात असे.

सेंट्रल पार्क ८४३ एकरांवर पसरलेलं आहे. तिथं वाटमारी, बलात्कार असे गुन्हे सर्रास घडतात. त्रिशा पळायला गेली होती तेव्हां त्या आधी काही तास पोरांच्या एका टोळक्यानं पार्कच्या एका भागात मारहाण, बलात्कार इत्यादी प्रकार केले होते. त्याचा फटका बसलेला एक नागरीक तक्रार घेऊन पोलिसांत गेल्यावर पोलिसांची गाडी पार्कात पोचली. तिथं धरपकड झाली. पोलिसांना फिरत असताना एका ठिकाणी एका स्त्रीचं शरीर सापडलं. रक्तबंबाळ. विवस्त्र. बलात्कार झालेलं. बेशुद्ध. पोलिसांनी त्या स्त्रीला हॉस्पिटलमधे नेलं. स्त्री मेल्यातच जमा होती. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करायला सुरवात केली.

ती स्त्री म्हणजे त्रिशा मेली.

पोलिसांनी दुसऱ्या दिवशी धावपळ करून वर उल्लेख केलेले पाच तरूण पकडले होते. 

त्रिशा मेली ही २८ वर्षांची तरुणी जबरदस्त होती. वैद्यकशास्त्राची कमाल आणि दुर्दम्य इच्छा शक्ती या जोरावर त्रिशा चार महिन्यात ठीक झाली, सातव्या महिन्यात कामावर रुजू झाली.

इकडे पाच जण तुरुंगात. यथावकाश कोर्टात केस चालली. पोलिस आणि वकीलांनी कोर्टासमोर एक नाट्यमय घटना उभी केली. यंव झालं, त्यांव झालं, इथून हा आला, तिथून तो आला, यानं हे केलं, त्यानं ते केलं वगैरे वगैरे.

कोर्टात ही ड्रामेबाजी चालली होती तेव्हां डिडियन, सिल्वर्स यांनी पुरावे तपासले. बलात्कार झालेल्या स्त्रीच्या अंगावर, कपड्यावर, योनीमधे बलात्कारी पुरुषाचं वीर्य सापडायला हवं. तोच एकमेव पुरावा ठरतो. त्रिशाच्या अंडरपँटवर वीर्य सापडलं होतं. पण ते वीर्य पाचही आरोपींपैकी कोणाशीही जुळत नव्हतं.

आरोपींनी गुन्हा कसा केला याची ड्रामेबाज गोष्ट पोलिस आणि वकील कोर्टात सांगू लागले तेव्हां आरोपी पोरं म्हणाली की आपण निर्दोष आहोत, आपण घटनेच्या वेळी घटनेच्या ठिकाणीही नव्हतो, पोलिसांनी आपल्याला मारहाण करून कथन रचलंय.

पोलीस म्हणाले की गुन्हेगारांची ही नेहमीचीच तऱ्हा आहे, जबाब देतात आणि कोर्टात उलटतात.

त्रिशाची दोन वेळा जबानी झाली. तिनं आरोपींना ओळखलं नाही. डॉक्टरांनी कोर्टाला समजावलं. घटनेचा मानसीक आणि शारीरीक आघात खूप मोठा होता आणि प्रत्यक्ष मेंदूवरच होता. त्यामुळं घटना घडल्यापासून नंतरचे काही आठवडे काय घडलं याची नोंदच त्रिशाच्या मेंदूत झालेली नसल्यानं त्रिशा काही सांगू शकणार नाही.

पोलिसांच्या हे पथ्थ्यावरच पडलं. परिस्थितीजन्य पुरावे या एक निसटत्या मुद्द्यावर आरोप सिद्ध होतात असा दावा पोलिसांनी केला, न्यायालयानं तो मान्य केला. घटनेला एकही साक्षीदार नव्हता.

डिडियननी लिहिलं की समाजात येवढं रंगद्वेषाचं वातावरण होतं की लॅटिनो आणि काळे हे गुन्हेगार समाजच आहेत असा प्रचार होत होता. गंमत म्हणजे या प्रचारात त्या वेळचे एक उदयाला येत असलेले पुढारी, डोनल्ड ट्रंपही होते. त्या दबावाखाली न्यायव्यवस्था, पेपर आणि पोलिस वागले असं डिडियननी लिहिलं.

परंतू कोणताच विश्वासार्ह पुरावा नसल्यानं आरोपी निर्दोष आहेत हेही सिद्ध करता येत नव्हतं.

पाच पोरं ज्या तुरुंगात होती त्याच तुरुंगात मतियास रेज हा गुन्हेगार आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. रेजला बलात्काराची सवयच होती. अनेक बलात्काराचे गुन्हे त्यानं केले होते आणि त्यासाठीच तो तुरुंगात होता. एके दिवशी तुरुंगात मतियास रेज आणि सेंट्रल पार्क गुन्ह्यातला आरोपी कोरी वाईज यांच्यात बाचाबाची झाली, मारामारी झाली. तुरुंगातल्या टीव्ही सेटवरून. मारामारीत रेजनं वाईजला बुकललं. त्या हाणामारीत रेजला कळलं की त्रिशावरच्या बलात्कारासाठी वाईजला शिक्षा झालीय.

मतियासला वाईट वाटलं. कारण त्रिशावर वाईजनं नव्हे रेजनं बलात्कार केला होता. आपण बलात्कार केला आणि त्याची शिक्षा निष्पाप वाईजला होतेय ही गोष्ट त्याला खाऊ लागली. त्याची झोप उडाली.

मतियासनं तुरुंगाधिकाऱ्याला बोलावलं आणि जबाब दिला. आपणहून. 

मतियास बलात्काराची हौस भागवण्यासाठी पार्कात फिरत होता. एका स्त्रीशी त्यानं झटापट केली. त्या स्त्रीनं ओरडा केला, माणसं जमा झाली. मतियासला प्रयत्न सोडावा लागला. मग तो नवं गिर्हाईक शोधत फिरत असताना त्याला त्रिशा दिसली. त्यानं बलात्कार केला. त्रिशाचं डोकं फोडलं. सगळं व्यवस्थित झाल्यावर मतियास तिथून पांगला. नंतर पोलिस तिथं पोचले.

मतियासनं काही दिवसांनी लागोपाठ दोन बलात्कार केले, पैकी एका बलात्कारीत स्त्रीचा खूनही केला. त्या प्रकरणात मथियास सापडला. त्याला जन्मठेप झाली.

२००१ साली मतियासनं कबुली जबाब दिल्यावर कोर्टाची पंचाईत झाली. कोर्टानं केस उकरून काढली. मतियासचं वीर्य आणि त्रिशाच्या अंडरवेअरवरचं वीर्य मॅच झालं, दोन्हीचा डीएनए सारखाच निघाला. हा निर्णायक पुरावा होता.

२००२ साली कोर्टानं निकाल दिला. पाच तरुणानी निर्दोष म्हणून सोडून दिलं. १९८९ ते २००१ अशी १२ वर्षं पाच मुलं विनाकारण तुरुंगात राहिली, मार खात राहिली. कोर्टानं त्या पाच तरुणांना ४.१ कोटी डॉलरची नुकसान भरपाई दिली.

२००१ साली मतियासनं कबुली जबाब दिला तेव्हां बॉब सिल्वर्सं आणि जोन डिडियन दोघंही जिवंत होते. काय वाटलं असेल त्यांना? त्याच वेळी त्रिशा पुस्तक लिहीत होती. 

२०१७ साली बॉब सिल्वर्सचं निधन झालं. २०२१ साली जोन डिडियन यांचं निधन झालं. 

२०२३ साली त्रिशा मेलीचं पुस्तक प्रसिद्ध झालंय. पुस्तकाचं नाव आहे आय ॲम द सेंट्रल पार्क जॉगर. आपण सर्व दुखापती, शारिरीक नुकसान, मोडलेला मेंदू यावर कशी मात केलीय ते त्रिशानं या पुस्तकात लिहिलंय.

पाच पोरांची आयुष्य उध्वस्थ झाली. परंतू त्रिशानं मात्र उध्वस्थ व्हायला नकार दिला. उपचार घेऊन ती पूर्ववत झाली. ती काम करतेय. तिचं लग्न झालंय. ती मॅरेथॉन पळते.

।।

Comments are closed.