सिनेमे. झोन ऑफ इंटरेस्ट. कुरतडणारा चित्रपट

सिनेमे. झोन ऑफ इंटरेस्ट. कुरतडणारा चित्रपट

सिनेमे/झोन ऑफ इंटरेस्ट

झोन ऑफ इंटरेस्ट या चित्रपटाला २०२४ च्या ऑस्कर स्पर्धेत उत्कृष्ट चित्रपट (परदेशी) आणि ध्वनी या दोन वर्गात बक्षिसं मिळाली.

हा चित्रपट मुंबईत मामी महोत्सवात दिसला होता.

‘झोन’ ही हिटलरच्या छळछावणीची गोष्ट आहे. ऑशविझ या पोलंडमधल्या छावणीत हिटलरनं लाखो ज्यू जाळून मारले. छावणीचा प्रमुख रुडॉल्फ हस छावणीच्या कंपाऊंड भिंतीला लागून असलेल्या घरात रहात असे. रुडॉल्फ हस, त्याची पत्नी हेडविग, त्यांची पाच मुलं. कुटुंब अत्यंत सुखात आणि आनंदात रहात होतं. माणसं जाळण्याचं  महान काम कार्यक्षमतेनं पार पाडल्याबद्दल हिटलरनं हसला बढती दिली.  हसचं अत्यंत सुखात जगणं आणि त्याची बढती हा चित्रपटभर दिसतं. 

चित्रपट सुरु होतो तोच मुळी काळोखात. चित्रपटाचं नाव येतं आणि नंतर दोनेक मिनिटं पडद्यावर काळोख असतो. काही तरी बिघडलय असं वाटून प्रेक्षक चुळबुळ करतो. नंतर तळ्याच्या काठी सहल करणारं कुटुंब दिसतं. 

संथ वाहणारी नदी. काठावर हिरवळ. मुलं खेळत आहेत. एका छोट्या मुलाला कवेत घेऊन आई बाप इकडं तिकडं करत आहेत. सारं काही संथ आणि शांतपणे चाललेलं असतं. माणसं सुखात दिसतात.

  प्रशस्त घर. रात्र झाल्यावर हस दिवे मालवत फिरतो. ही खोली. ती खोली. खालची खोली.वरची खोली. जिन्यातला दिवा.किचनमधला दिवा,कोठीतला दिवा. सर्वात शेवटी बैठकीच्या खोलीतला दिवा बंद करण्याआधी हस दाराला आतून कुलूप लावतो. सारं संथपणे चालतं, काही मिनिटं यात जातात.

जेवणाच्या टेबलवर न्याहरी मांडली जाते. जेवण होतं. हा पदार्थ, तो पदार्थ. पाहुणे येतात. नोकराणी निगुतीनं एक ग्लास काढते. ट्रेमधे ठेवते. काळजीपूर्वक एक बाटली काढते. अगदी काळजीपूर्वक त्यातली दारू ग्लासमधे ओतते. दोन तीन खोल्या पार करून ती बाहेर पडते,  घराला लागून असलेल्या छज्जातल्या टेबलावर नेऊन ठेवते. हस तिथं येतो. ग्लास रिता करतो.

सारं कसं छान, आखलेलं, गोड, नाजूक, प्रशस्त, ऐसपैस.  चित्रपटभर हे दिसत असतं. 

मधे मधे घराची भिंत दिसते. भिंती पलिकडं असलेल्या चिमणीतून काळा धूर येताना  दिसतो, कधी लाल जाळ उसळी मारतो.  चिमणीखाली माणसं जाळली जात असतात ते मात्र दिसत नाही. ते आपलं आपण समजून घ्यायचं.

 काही सेकंद.

रात्री नवरा बायको प्रेमानं बोलत असतात,  छावणीत किंचाळण्याचे आवाज येतात.

काही सेकंद.

हेस मुलासोबत घोड्याची रपेट करत असताना पलिकडून माणसांना मारझोड केल्याचे आवाज येतात.

काही सेकंद.

हेडविगची आई अपरात्री जागी होते,तिला किंचाळण्याचे आवाज ऐकू येतात. 

काही सेकंद. 

५७०० सेकंदांच्या चित्रपटात हत्याकांडाची चुणूक फक्त २० सेकंद. बाकीचा वेळ हस कुटुंबाचं सुखी जीवन.

मुलीकडं आलेल्या आईला मात्र ते सहन होत नाही, एक चिठ्ठी टेबलावर ठेवून ती न सांगताच निघून जाते. 

पावणेदोन तास चित्रपट प्रेक्षकाच्या मनाला आणि मेंदूला कुरतडत रहातो. चित्रपट असह्य होतो. पाहणं नकोनकोसं होतं.

 एक दृश्य जाऊन दुसरं दृश्य सुरु होताना पडदा लालभडक होतो. रक्ताचा लालपणा. बर्गमनच्या क्राईज अँड व्हिस्पर्स या सिनेमाची आठवण येते.

हस हा एक सामान्य माणूस होता. पत्नी, मुलं, कुटुंब. छान जगायचं, त्यासाठी चाकरी करायची.   काम पार पाडतोय,आपल्याला वेतन मिळतंय, घर मिळतंय, सुखसवलती मिळत आहेत. लाखो माणसं मारली, हाही कामाचा भाग होता, नोकरीचाच भाग होता. किती सामान्य गोष्ट, किती सामान्य जीवन. 

ऑशविझमधे लाखोना मारण्याची आज्ञा आईकमननं दिली होती. आईकमन हा एक सरकारी नोकर,अधिकारी होता, हिटलर या प्रेसिडेंटची आज्ञा पाळत होता. त्याला आपण दुष्कृत्य केलं असं वाटत नव्हतं, आपण निर्दोष आहोत, आपण देशानं दिलेली आज्ञा पाळली असंच त्याचं मत होतं. क्रूर हत्या करणारी माणसं नराधम वगैरे नसतात, सामान्य माणसंच असतात. आईकमनला न्यूरेंबर्ग न्यायालयानं फाशी दिली. त्या खटल्याचा वृत्तांत हॅना अरंट यांनी लिहिला होता, त्या वृत्तांताला अरंटनं Banality of Evil हे शीर्षक दिलं होतं. 

चित्रपट पहाताना सतत आरंटच्या शब्दांची आठवण येत होती. सकाळी उठणं, तोंड धुणं, न्याहरी करणं, हगूमुतू करणं, पोहायला जाणं, मुलांना झोपताना गोष्टी सांगणं, सुंदर दारू पिणं इत्यादी गोष्टी जशा आहेत तसंच मधल्या वेळात जाऊन माणसं जाळणं, जिवंत माणसं जाळणं.

बाप रे बाप. काय चित्रपट आहे.

हसच्या पत्नीची भूमिका सँड्रा हुल्लर या जर्मन नटीनं केलीय. कमाल अभिनय आहे. आपला पती काय करतो ते तिला माहीत आहे. पण तिच्या वागण्यात ती कुठंही गुन्हेगार आहे वगैरे दिसत नाही. एक गृहिणी दिसते. याच नटीची मुख्य भूमिका असलेला ॲनाटॉमी ऑफ ए फॉल हा चित्रपटही यंदा ऑस्कर स्पर्धेत होता. ॲनाटॉमीमधे हुल्लरवर पतीचा खून केल्याचा, पतीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप आहे. झोनमधे तर ती हत्याकांड घडवणाऱ्या माणसाची पत्नी आहे. दोन्ही भूमिका अवघड आहेत, खूप गुंत्याच्या आहेत. हुल्लरनं दोन्ही भूमिका उत्तम केल्या आहेत.दोन्ही भूमिका ऑस्करच्या लायकीच्या आहेत.

मार्टिन अमिसनं लिहिलेल्या कादंबरीवर चित्रपट आधारलेला आहे. रूडॉल्फ हा खरोखरचा एक माणूस होता. त्याचा कसून अभ्यास करून त्याची भूमिका मार्टिन अमिसनं कादंबरीत रेखाटली आहे. माणूस खरा, त्यानं केलेली कृत्यंही खरी पण त्याचं घरातलं वर्तन कल्पित.

प्रस्तुत पटकथा हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे. वास्तव आणि कल्पिताचं मिश्रण. ऑशविझ हत्याकांडाची एक बाजू या साहित्यात सापडते. ऑशविझचं समर्थन? क्रूरकर्म्याचं समर्थन? तसं म्हणता येणार नाही. ऑशविझ घडवणारा माणूस कोण होता ते चित्रपट दाखवतो.  

।। 

Comments are closed.