Browsed by
Month: December 2016

कार्ल मार्क्सचं काहीसं स्फोटक बरंचसं माहितीपूर्ण प्रज्ञात्म चरित्र.

कार्ल मार्क्सचं काहीसं स्फोटक बरंचसं माहितीपूर्ण प्रज्ञात्म चरित्र.

कार्ल मार्क्सचं काहीसं स्फोटक बरंचसं माहितीपूर्ण प्रज्ञात्म चरित्र.

KARL MARX – GREATNESS AND ILLUSION By  GARETH STEDMAN JONES.                                Penguin .  Hard Cover- Rs. 2561. Kindle- Rs. 1223.

मार्क्सचं एक नवं प्रज्ञात्मक चरित्र नुकतंच प्रसिद्ध झालंय. मार्क्स आणि मार्क्सवाद या दोन गोष्टी लेखक स्टेडमन जोन्स यांनी कौशल्यानं वेगळ्या केल्या आहेत.  मार्क्सनं जे लिहून ठेवलं त्यात बदल करून, त्यात गाळ साळ करून एंगिल्सनं मार्सवाद तयार केलाय असं लेखकाचं म्हणणं आहे. मार्क्सवाद म्हणून जे काही सांगितलं जातं ते सर्वच्या सर्व मार्क्सचं म्हणणं नसून त्यात काही भाग एंगल्सचा आहे असा लेखकाचा दावा आहे.

लेखक आहेत स्टेडमन जोन्स. ते तत्वज्ञानाच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत, लंडनच्या क्वीन मेरी विश्वशाळेत शिकवतात.  १९५६ ला सुवेझ कालव्याचं राष्ट्रीकरण झाल्यापासून ते समाजवाद या विषयाकडं वळले. तिथून ते डावे झाले.  काही काळ ते न्यू लेफ्ट या नियतकालिकाचे संपादक होते. हॉब्सबॉन इत्यादी डाव्या इतिहासकारांचा लेखकावर प्रभाव होता. कालांतरानं ते स्त्रीवादी झाले, मार्क्सवाद अपुरा आहे, मार्क्सचा विचार काळाच्या मर्यादेत विकसित झालेला असल्यानं त्याच्या मर्यादा आहेत, विसाव्या आणि एकविसाव्या शतकातल्या घटना मार्क्सवादाची भाकितं खोटी ठरवतात असं लेखकाला वाटू लागलं. १९९० नंतर लेखकानं मार्क्सचा सविस्तर अभ्यास करायचं ठरवलं, त्यातून प्रस्तुत पुस्तक सिद्ध झालंय.

इसाया बर्लिन, डेविड मॅकलेलन, फ्रान्सिस व्हीन, पीटर सिंगर यांनी मार्क्सची चरित्रं लिहिली आहेत. या सर्वांनी साधारणपणे मार्क्सवादी विचार पुरतेपणानं पक्का झाला असून स्थिर आहे असं मानलं. जोनाथन स्पर्बरनं २०१३ साली लिहिलेल्या ‘ कार्ल मार्क्स, ए नाईनटीन्थ सेंच्युरी लाईफ ‘ या पुस्तकात मार्क्सवादी विचारातली काही मिथकं उद्धस्थ केली.

जोन्स यांचं चरित्र मार्क्सवादी काही मार्क्सवादी मिथकं उघडी पाडत असतानाच मार्क्सवादी विचारांचं महत्वही अधोरेखित करतं.

व्यक्ती म्हणून मार्क्सचं जीवन अनंत विक्षिप्त गोष्टींनी भरलेलं होतं. मार्क्सनं गरीबीत दिवस काढले. मार्क्स  दिवसेंदिवस, सलगपणे अनेक दिवसरात्री, नुसतं लिहित असे, शरीराला इतर कोणताच व्यायाम देत नसे. मसालेदार, महागडे पदार्थ मार्क्सला आवडत. प्रचंड दारू पीत असे. दारु पिऊन गोंधळ घालत असे. तो कमालीचा अहंमन्य होता, वेगळं मत ऐकून घेत नसे.   त्याला त्याच्या घरकाम करणाऱ्या स्त्रीपासून अनौरस मुल होतं. इत्यादी गोष्टी फ्रान्सिस व्हीन या लेखकानं लिहिलेल्या चरित्रात आल्या आहेत. असल्या गोष्टीत स्टेडमन जोन्स यांना रस नाही. मार्क्सची प्रज्ञा, त्याची विश्लेषण शक्ती, त्याची बौद्धिक वाढ या गोष्टीमधे लेखकाला रस आहे.

कार्ल मार्क्स ज्या काळात जन्मला आणि विकसित झाला तो काळाचा विस्तृत पट लेखकानं या पुस्तकात चितारला आहे. त्यामुळं मार्क्स नीट समजतो. लेखकाच्या मते मार्क्सचं आधुनिक राजकीय इतिहास आणि तत्वज्ञानात अढळ स्थान आहे. अर्थ आणि उत्पादन या कसोट्यांवर सखोल चिंतन करणारा आणि विचार करणारा तो पहिला तत्वज्ञ असं मार्क्सचं वर्णन लेखक करतो.  अर्थोत्पादन आणि अर्थव्यवस्थेच्या  भांडवलशाही या रुपाचं मार्क्सनं केलेलं विश्लेषण अजोड आहे असं लेखकाचं मत आहे.  परंतू राजकारणातून धर्म नाहिसा न होता तो आता समाजाच्या केंद्रात येणं, जगभर देशीवाद लोकप्रिय होत जाणं, भांडवलशाही विकसित होत जाऊन टिकणं, समाजवादी व्यवस्था कोसळणं या गोष्टी मार्क्सवादाचा पराभव दाखवतात असं लेखकाचं म्हणणं आहे.

कार्लचा जन्म ऱ्हाईनलॅंडमधल्या ट्रायरमधला. ऱ्हाईनलँड म्हणजे जर्मनी आधी प्रशियन साम्राज्याचा भाग होता. प्रशियन राजा ख्रिस्ती होता. त्यामुळं राज्यात ख्रिस्ती तत्वज्ञान प्रस्थापित होतं. ख्रिस्ती विचारात समष्टीपेक्षा व्यक्तीला महत्व होतं. व्यक्तीनं स्वतःचा विकास साधणं याला त्या विचारात प्राधान्य होतं. शेती आणि कारखान्यात मालक असे आणि तो आपला जास्तीत जास्त नफा होईल अशा रीतीनं व्यवस्था चालवत असे. देव माणसाला घडवतो असा विचार ख्रिस्ती धर्माच्या केंद्रात होता. ज्यू शोषक असल्यानं त्यांना समाजात बहिष्कार होता, त्यांना शाळेत शिक्षण घ्यायला बंदी होती, त्यांना सरकारी नोकऱ्या मिळत नसत.

मार्क्सचे वडील आणि काका ज्यू होते. मार्क्सही जन्मानं ज्यू.                      फ्रान्सनं, नेपोलियननं जर्मनीवर कबजा केल्यानंतर वातावरणात फरक पडला. नेपोलियनचाही ज्यूंवर राग असला तरी त्याना दिली जाणारी हीनतेची वागणूक फ्रेंचांना मंजूर नव्हती. फ्रेंच क्रांतीनं धर्माला राज्यवस्थेत दुय्यम ठरवलं होतं, समानतेवर आधारलेला समाज आणि कायदा फ्रेंचांनी सुरु केला होता. याचा फायदा मार्क्सच्या वडिलांनी आणि काकांनी घेतला. दोघं ख्रिस्ती झाले, वकिली करू लागले.

प्रशियन राजानं पुन्हा फ्रेंचांचा पराभव करून ऱ्हाईनलँड-जर्मनीचा ताबा मिळवून फ्रेंचांनी निर्माण केलेलं स्वातंत्र्याचं वातावरण उलट फिरवलं.

सामाजिक बदल घडत असतानाच जर्मनी, युरोप, ब्रीटनमधे औद्योगीक क्रांती झाली. ऊर्जेवर चालणारं महाउत्पादन आणि त्यातून निर्माण होणारा महाउद्योग युरोपीय समाजात निर्माण झाला. ( त्या आधी उद्योग कुटिरोद्योगाच्या रुपात होते.) भांडवल गुंतवून मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचं, ते मोठ्या बाजारपेठांत ओतायचं आणि त्यातून मोठ्ठा नफा मिळवायचा ही रीत समाजात सुरु झाली. उद्योग या महायंत्रामधे कामगार हा एक अतीछोटा भाग उरला, त्याचं स्वातंत्र्य आणि व्यक्तिमत्व संपलं. कामगार स्वतःच्या जगण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त उत्पादन करतो आणि ते भांडवलदार मालक ताब्यात घेतो, त्यातून आपल्या भांडवलात वाढ करतो अशा रीतीनं स्वतःचं भांडवल वाढवत जातो. या शोषणातून निर्माण होणाऱ्या विषमतेवर मार्क्सनं बोट ठेवलं.

युरोपातील धार्मिक विचार, सांस्कृतीक वातावरण, तत्वज्ञ, औद्योगीकरण, भांडवलशाही या सर्व घटनांचा अभ्यास मार्क्सनं एकत्रितपणे केला.

जमीन, जमिनीची मालकी, जमीन आणि खाणीच्या मालकाना मिळणारा रेंट, शेती आणि खाण उत्पादनाचा मुख्य भाग असणाऱ्या कामगारांची उत्पादनक्षमता,उत्पादनात गुंतलेलं भांडवल (त्यात यंत्रं आणि तंत्रंही आली) या घटकांचा मार्क्सनं बारकाईनं अभ्यास केला. उत्पादनाचं मूल्य, बाजारातली किमत, सरासरी किमतीपेक्षा जास्त मिळणारी किमत याचा अभ्यास मार्क्सनं फार बारकाईनं मांडला. मार्क्सच्या एकूण सामाजिक-राजकीय-आर्थिक अभ्यासाचा हा एक महत्वाचा भाग होता. भांडवलशाहीत मार्क्सनं कामगारांचं होणारं शोषण आणि विषमता यांचं विश्लेषण करताना युरोपातील शेती, खाणी, टेक्सटाईल उद्योग आणि बाजारपेठांचा अभ्यास केला.

त्या काळातलं एक उदाहरण मार्क्स ज्या मोझेल नदी खोऱ्यातल्या मोझेल वाईनच्या उत्पादनाचं आहे. मोझेल खोऱ्यात द्राक्षाच्या बागा होत्या. द्राक्षांपासून होणारी वाईन विशिष्ट लाकडाच्या पिंपात मुरण्यासाठी ठेवली जात असे. त्यासाठी लागणारं लाकूडही मोझेलच्या जंगलांत तयार होत असे. मोझेलपासून अंतरावर असलेल्या रुहर नदीच्या खोऱ्यात लोखंडाच्या   खाणी होत्या, तिथं पोलाद उद्योग सुरु झाला. मोझेल खोऱ्यातलं लाकूड रुहर पोलाद उद्योगासाठी वापरलं गेलं. लाकडाच्या टंचाईमुळं मोझेल खोऱ्यातला वाईन उद्योग संपला, तोट्यात गेला.

या घटनांमधे नेमकं काय घडलं? मोझेलमधल्या शेतकऱ्यांची कार्यक्षमता किंवा मालकांची गुंतवणूक किंवा मालकी हे घटक वाईन उद्योग बसण्यात आणि कामगार बेकार होण्यास जबाबदार होते काय? की बाजारातली पोलादाची मागणी वाढणं, त्यामुळं पोलाद उद्योग भरभराटणं? मार्क्सच्या विश्लेषणानुसार कामगारांचं वेतन, कार्यक्षमता या घटकांचा परिणाम अधिक फायदा आणि शोषण यात होतो. परंतू मोझेलमधे तसं घडलं नाही. द्राक्ष आणि वाईनची किमत समाजात निर्माण झालेल्या एका नव्या उत्पादनामुळं हेलकावली.

वस्तूचं मोल मागणी आणि पुरवठ्यातल्या तोलावरून ठरतं असं मार्क्सवादी विचार मानतो. तसंच कामगाराचे श्रम हाही एक घटक वस्तूचं मोल ठरवतो. लेखक प्रश्न विचारतो की स्ट्रॉबेरीची किमत सफरचंदापेक्षा जास्त कां ठरते? त्याचा मागणी-पुरवठा-श्रममूल्याशी संबंध नाही. समाजाला, माणसाना एकादी वस्तू जास्त आवडते हेही वस्तूची किमत ठरण्याचं कारण आहे असा एक मुद्दा लेखक पुस्तकात मांडतो.

मार्क्स आणि मार्क्सवाद या दोन गोष्टी लेखकानं कुशलतेनं वेगळया केल्या आहेत. पुस्तकभर लेखक कार्ल मार्क्स असा उल्लेख न करता कार्ल या नावानं मार्क्सला संबोधतो. याचं कारण कार्ल हा माणूस वेगळा होता आणि मार्क्सवादासाठी प्रसिद्ध झालेला कार्ल मार्क्स वेगळा होता.

१८४४ मधे मार्क्सनं Economic and Philosophical Manuscripts लिहिलं. नंतर कम्युनिष्ट मेनिफेस्टो १८४८ मघे प्रसिद्ध झाला.नंतर मार्क्सनी तत्वज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी विषयावर अनेक पेपर्स लिहिले.   मार्क्सनं भांडवलशाही, बाजारव्यवस्था, जागतीक बाजार इत्यादी मुद्द्यांच्या अभ्यास करून एक ८०० पानांचं हस्तिलिखित सिद्ध केलं. त्यानंतर कॅपिटल या विषयावर एका भल्यामोठ्या ग्रंथाची उभारणी मार्क्सनं सुरु केली. त्याचा पहिला भाग कॅपिटल या नावानं १८६७ साली प्रसिद्ध झाला. त्या नंतरही मार्क्सचा अभ्यास सुरु होता, नोंदी होत होत्या. मार्क्सचा अनेकांशी पत्रव्यवहार होता, त्यातही मार्क्स आपले विचार मांडत असे. कॅपिटल या ग्रंथानंतरचं मार्क्सचं सारं लिखाण आणि नोंदी एकत्र करून  एंगल्सनं  कॅपिटलचे पुढले तीन खंड प्रसिद्ध केले.

मुळात मार्क्सवाद आणि मार्क्सचं लिखाण हे वेगळं कसं करायचं? जोन्स यांनी कम्युनिष्ट मॅनिफेस्टो आणि कॅपिटल (भाग१) हे मार्क्सचं प्रसिद्ध झालेलं साहित्य एकीकडं ठेवलं. मार्क्सनं अनेकांना पाठवलेली पत्रं, कॅपिटलच्या पहिल्या भागानंतर केलेली अप्रसिद्ध टिपणं आणि एंगल्सनं प्रसिद्ध केलेले कॅपिटलचे खंड हा मजकूर  लेखकानं वेगळ्या केला आणि ते साहित्य एंगल्सनं संपादित केलेलं साहित्य आहे असं मांडलं.

जोन्स यांनी एंगल्सनं प्रसिद्ध केलेलं साहित्य, अप्रसिद्ध साहित्य आणि मार्क्सचं प्रसिद्ध साहित्य याची तुलना करून आपलं पुस्तक सिद्ध केलंय. जोन्स यांचं म्हणणं असं की मार्क्स काळाच्या ओघात बदलत गेला, त्याची मतं बदलत गेली. एंगल्सनं त्यातली त्याला आणि तत्कालीन समाजवादी पक्षाला सोयीची मतं प्रसिद्ध केली.  त्यांनी काही मतं गाळली आणि काही ठिकाणी खाडोखोड करून मार्क्सचं म्हणणं बदललं.

युरोपातल्या त्या काळातल्या राजकीय आणि आर्थिक उलथापालथींमुळं समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था हादरेल असं मार्क्सनं लिहिलं होतं. एंगल्सनी हादरेल हा शब्द खोडून त्या जागी नष्ट होईल असा शब्द टाकला असं लेखक हस्तलिखिताचा दाखला देऊन सांगतात.

एंगल्स डार्विन आणि मार्क्स यांच्या विचारधारेची तुलना करतात. मार्क्सवाद म्हणजे सोशल डार्विनिझम आहे असं एंगल्स म्हणत. मार्क्सला ते मंजूर नव्हतं. उत्क्रांती निसर्गात घडली, ती कोणी विशेष हेतू ठेवून घडवून आणली नव्हती असं मार्क्सचं म्हणणं. या उलट मार्क्स जी क्रांती, परिवर्तन घडवून आणणार होता ते परिवर्तन माणसाच्या हस्तक्षेपानं घडणार होतं.

खेड्यातलं प्राचीन जीवन समाजवादी क्रांतीच्या आड येतं असं मार्क्स मानत असे असं सामान्यतः मानलं जातं.   भांडवलशाही जाऊन त्या जागी समाजवादी व्यवस्था येईल, खेड्यातली व्यवस्था जाऊन त्या ठिकाणी औद्योगिक कामगारांनी स्थापन केलेली समाजवादी व्यवस्था स्थापित होईल असं मार्क्स १८६७ पर्यंत  म्हणत असे. परंतू १८६८ नंतर रशियातली सामुहिक शेतीची व्यवस्था  समानतेवर आधारलेली व्यवस्था आहे असं मार्क्सचं मत झालं. रशियामधे सामुहिक शेती होत असे आणि वेळोवेळी खेडुत समाज जमिनीच्या व्यवस्थेची फेर मांडणी करत असे. याच पद्धतीनं आधुनिक समाज कां असू नये असं मार्क्सला वाटू लागलं होतं.  मार्क्स  आधुनिकतेवर नव्हे तर पुरातनतेवर आधारेल्या समाजाची कल्पना करत होता. १८८१ साली एका पत्रात मार्क्सनं म्हटलं होतं की क्रांती योग्य वेळी झाली तर ती रशियातील ग्रामीण सामुहिक मालकीची व्यवस्था टिकवून ठेवेल. एंगल्सनं कॅपिटलच्या पुढल्या भागाचं संपादन केलं तेव्हां हा भाग वगळला. कारण तेव्हाना कम्युनिष्ट चळवळीनं भांडवलशाहीकडून  ग्रामीण व्यवस्था खतम होईल आणि समाजवादी क्रांती भांडवलशाही खतम करेल असं तत्व (मार्क्सच्या मताशी विपरीत) स्वीकारलं होतं. एंगल्सलनं त्याला सोयीची गोष्ट निवडली, गैरसोयीची गोष्ट वगळली.

लेखकाची वरील विषयावरची टिप्पणी अशी आहे- एकोणिसाव्या शतकातील रशियन ग्रामीण व्यवस्थेचा विचार हा मार्क्सचा भ्रम होता, एक मृगजळ होतं. लेखक म्हणतो की ग्रामीण व्यवस्था किंवा क्रांतीनंतर निर्माण होणारी औद्योगिक व्यवस्था हे दोन्ही गोष्टीही एक भ्रम होता हे विसाव्या शतकात घडलेल्या घटनांनी सिद्द केलं आहे.

मार्क्सनं आधुनिक औद्योगीक जगाचं केलेलं विश्लेषण मर्मभेदक आणि अचूक होतं असं लेखक म्हणतो. ” आधुनिक जगात तयार झालेल्या जागतिक बाजारपेठेनं अपूर्व अशा औद्योगिक उत्पादक शक्ती जन्माला घातल्या. ही गोष्ट मांडणारा मार्क्स हा पहिला विचारवंत होता. आधुनिक भांडवलशाही ही एक निरंतर घडत असणारी, अविश्रांत आणि पूर्णत्वाला न गेलेली घटना मार्क्सनं चितारली. भांडवलशाही नव्या गरजा शोधून काढते आणि त्या गरजा पूर्ण करणारी उत्पादनं निर्माण करते,  संस्कृती आणि श्रद्धांचे तीन तेरा वाजवते, सरहद्दी जुमानत नाही, ती सेक्युलर वा धार्मिक वा कुठल्याही सत्तेची उतरंड मानत नाही, ती सत्ताधारी किंवा नागरीक असा भेद मानत नाही, ती मूल आणि पालक यातला फरक जाणत नाही, ती स्त्री आणि पुरुष यातला भेद जाणत नाही, ती सर्व गोष्टींचं रूपांतर विकाऊ वस्तूत करते असं मार्क्सनं लिहिलं…”

Reproduction of “Before the Sunrise” (Karl Marx and Friedrich Engels walking in night London) painting by artist Mikhail Dzhanashvili.

भांडवलशाहीचं इतकं मर्मभेदक विश्लेषण करणाऱ्या मार्क्सला  ही नित्य बदलणारी  व्यवस्था पुढं चालून कसा आकार घेईल, कशी विकसित होईल, कशी टिकेल याचा अंदाज बांधता आला नाही असं लेखक म्हणतो.

मार्क्सच्या विचारांच्या मर्यादा, समाजवादी व्यवस्थेचं अपयश,  विकसित भांडवलशाही टिकणं या गोष्टी लेखकानं पुस्तकात मांडल्या आहेत. उत्पादनसंबंध ही मार्क्सनं शोधलेली विश्लेषणाची कसोटी अपूर्व होती असं लेखक म्हणतो. मार्क्सनं मेनिफेस्टोमधे लिहिलेल्या कित्येक गोष्टी (उदा. मोफत शिक्षण देणारी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था, वाढत्या उत्पन्नावर वाढते कर लावणारी कर व्यवस्था) भांडवलशाही देशांनीही स्वीकाल्या याचीही नोंद लेखक घेतो. पुस्तक वाचल्यानंतर हे पुस्तक मार्क्सची किंवा एंगल्सची बदनामी करणारं पुस्तक आहे असं वाटत नाही.

अमेरिकेत ओबामा आरोग्य व्यवस्थेत सरकारी हस्तक्षेप करतात आणि बर्नी सँडर्स श्रीमंतांवर अधिक कर लावा अशी मागणी करतात.  दोघांवर ते समाजवादी आहेत असा आरोप होतो, दोघांनाही अमेरिकेतल्या मोठ्या लोकसंख्येचा पाठिंबा आहे. अमेरिकेत अतीश्रीमंत एक टक्का आणि आर्थिक त्रास सहन करणारे ९९ टक्के अशी विभागणी अमेरिकेतल्या समाजाला समजली आहे, ती नाहिशी केली पाहिजे असं समाज म्हणतो. थॉमस पिकेटी, टोनी अँडर्सन हे विचारवंत विषमता दूर करणाऱ्या उपायांची मागणी करतात, त्यांच्यावरही ते फिक्कट समाजवादी आहेत असा आरोप होतोय.

जगभर समाजवादी विचारांबद्दल हरकती आणि आक्षेप मांडले जात आहेत.कम्युनिष्ट, समाजवादी विचारांमधे, व्यवस्थेमधे अनेक जन्मजात दोष आहेत. मुख्य म्हणजे समाजातल्या प्रश्नांवरचे एकमेव आणि अंतिम उत्तर नव्हतं. काळाच्या ओघात तो विचार विकसित झाला, त्यावर काळाच्या मर्यादा होत्या. (इस्लाम असं म्हणतो की देवाचा शेवटला प्रेषित महंमद, त्या नंतर कोणताही प्रेषित पाठवायचा नाही असं देवानं ठरवलं.)समाजवादी विचार एक पोथी झाला. मुळ विचारांत काही दोष आहेत का याचा विचार पोथीनं केला नाही. लोकशाही विचाराचा अभाव हे पोथी होण्याचं एक कारण आहे. समाजवादी व्यवस्था अमानवी होती, तिच्यात क्रूरता होती, मार्क्सही क्रांतीसाठी दहशत-हिंसा झाली तरी हरकत नाही असं म्हणत असे. तंत्रज्ञान आणि उत्पादनव्यवस्था यामधे झालेल्या बदलांची दखल समाजवादी विचारांना घेता आली नाही, देश-धर्म-संस्कृती-परंपरा यांचं समाजातलं स्थान समाजवादी विचारांना समजलं नाही. पोथीबद्ध विचार – व्यवहार हेच या त्रुटींचं मोठ्ठं कारण आहे. मार्क्सनं जे काही सांगितलं ते सगळ्या प्रश्नांवरचं अंतिम उत्तर आहे असं मार्क्सवाद्यांनी ठरवलं आणि ते हिंसा व भावनात्मक ब्लॅकमेलिंग करून समाजावर ठसवलं.

प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकानं वरील प्रमाणे थेट आक्षेप घेतलेले नाहीत. लेखकाचा सूर चढा नाही. मार्क्सच्या विचारांचा आलेख लेखकानं शांतपणे मांडलेला असल्यानं मार्क्सवादी आणि मार्क्सवादी नसलेले अशा सर्वांना हे पुस्तक वाचावंसं वाटेल.

आजवर मार्क्सच्या विचारांवर अनेक भाष्यं झाली. जोन्स यांचं भाष्य त्यातलं सर्वात वेधक आणि स्फोटक आहे.

हे पुस्तक मार्क्सचं प्रज्ञात्मक चरित्र आहे. मार्क्स आणि मार्क्सचा काळ, त्या काळातले तत्वज्ञ, विचारवंत, राजकारणी यांचा तपशीलवार विचार या पुस्तकात आहे. भांडवलशाही ही विचारधारा किती लवचीक, प्रवाही आहे याचं दर्शन मार्क्सच्या लिखाणातून ध्यानात येतं असं लेखक म्हणतो.

।।

 

इजिप्तमधील राजकारणाचं, समाजाचं दर्शन घडवणारी कादंबरी

इजिप्तमधील राजकारणाचं, समाजाचं दर्शन घडवणारी कादंबरी

इजिप्तमधील राजकारणाचं, समाजाचं दर्शन घडवणारी कादंबरी.
Chronicle Of A Last Summer. 
       Yasmine El Rashidi
       Tim Duggan Books
       120 pages
 कचऱ्यानं भरलेले रस्ते. घाण आणि क्रूर इमारती. पोचे आलेल्या गाड्यांचे कर्कश्श हॉर्न. कार, टेंपो,सायकली, रेकले यांच्या गर्दीतून वाट काढणारी गाढवं, उंट गाड्या. वाहतुक तुंबल्यावर कारमधल्या माणसांना वस्तू विकणारी मुलं. दुर्गंधी. बेढब घरं. गिलावा नसलेल्या भिंती. …
एल रशिदीच्या क्रॉनिकल ऑफ लास्ट समर या कादंबरीतून कैरो शहराचा एकही तपशील निसटत नाही. कैरोत राहिलेल्या माणसांना, कैरो पाहिलेल्या माणसांना आपण थेट कैरोत वावरतो आहोत याचा प्रत्यय कादंबरीत येतो. आणि केवर वावर नव्हे तर कैरोतलं जगणं, तिथली घुसमट, तिथली राजकीय अस्थिरता या साऱ्या गोष्टी या कादंबरीमधून वाचकाला भिडतात.
तथापि  कैरोत जन्म गेलेल्या माणसांनी अनुभवलेली आणि बाहेरच्या माणसांना कदापी कळणार नसलेली एक गोष्ट म्हणजे तिथली पोलिस आणि गुप्तचरांची दहशत. एल रशिदीच्या कादंबरीत ती दहशत जाणवते. बोलायचं असतं पण बोलता येत नाही अशी एक वातावरणात निरंतर असणारी गोष्ट एल रशिदीच्या कादंबरीत जाणवत रहाते.
‘ समर ‘ ही एल रशिदी यांची कैरोतल्या तीन पिढ्यांवरची कादंबरी आहे. कादंबरी राजकीय आहे. इजिप्तमधील तीन  संक्रमण काळ या कादंबरीत आहेत. जमाल नासर यांनी सत्ता ताब्यात घेणं, अन्वर सादत यांचा खून झाल्यानंतर हुस्न मुबारक यांनी सत्ता घेणं आणि अरब स्प्रिंग.
कादंबरीची सुरवात मुलगी हे मुख्य पात्र आणि तिची आई यांच्यातल्या निःशब्द भेटीच्या प्रसंगांतून होते.
”   एकादा पोलीस इमारतीत जाताना दिसे..मला वाटे तो आता कोणाला तरी पकडून नेणार. वर्गात मी एक गोष्ट लिहिली. गोष्टीचं शीर्षक- नाहिशी होणारी माणसं. त्यात मी नाहिशा होणाऱ्या लोकांबद्दल लिहिते. माणसं रात्री नाहिशी होतात. टीचर मला दहात शून्य मार्क देतात. म्हणतात की या वयात मी तशा गोष्टी लिहिता कामा नयेत. मी घरी येते. रडत रडत आईला गोष्ट  दाखवते. आई गोष्ट मनातल्या मनात वाचते. एक शब्दही बोलत नाही. मला वाटलं की ती रागावलीय.ती रागावली की मला भीती वाटते. कधी कधी ती रागावल्यावर माझ्यावर ओरडते. कधी कधी रागावते तरी शांत रहाते. ती शांत रागवते तेव्हां भयंकरच…” मुलगी गप्प असलेल्या आईबद्दल बोलण्याच्या या प्रसंगातून कादंबरीची सुरवात होते.
हा प्रसंग घडतो तेव्हां मुलीचे वडील नाहिसे झालेले असतात. नासर यांनी क्रांती केली आहे, इजिप्शियन सम्राटाची सत्ता उलथवून लावलीय. मुलीचे वडील समाजातल्या प्रस्थापित ऊच्च स्तरातले असतात,सत्तेच्या वर्तुळातले असतात. ते नाहिसे झाले आहेत. पण ते नाहिसे कां झाले, ते कुठं आहेत, त्यांचं काय झालंय किंवा होणार आहे इत्यादी गोष्टी मनात येतात पण बोलत येत नाहीत.  
सत्तेशी पटलं नाही, सत्तेच्या विरोधात असणं या कारणानं असंख्य माणसं नाहिशी होत होती. घराघरात तसं घडत होतं.
अन्वर सादत यांनी अमेरिकेच्या दडपणाखाली म्हणा किंवा इतर कारणानं म्हणा इस्लामी आणि समाजवादी लोकांवर दात धरला. माणसं नाहिशी झाली. सादत यांच्यावर राग असणाऱ्या इस्लामी गटांनी (मुस्लीम ब्रदरहूडनं) सादत समर्थकांना  नाहिसं केलं. नंतर २०११ साली तहरीर चौक क्रांती.मुबारकना विरोध करणारी माणसं नाहिशी होऊ लागली. नंतर क्रांती झाली. नंतर पुन्हा क्रांती झाली आणि अल सिसी यांच्या लष्करी सत्तेला विरोध करणारी माणसं नाहिशी होऊ लागली.
साधारणपणे १९८४, १९९८, २०१४ या सालातले तीन उन्हाळे कादंबरीत आहेत. नाईलच्या काठ, तेहरीर चौकापासून काही अंतरावर असलेल्या मोहमंद महमुद स्ट्रीट. या दोन ठिकाणांनी उन्हाळ्यातल्या उलथापालथी अनुभवल्या. गर्दी. टँक्स. गोळीबार. धरपकड. रेटारेटी. पळापळ. चिरडलेली माणसं.
कादंबरी गोष्ट सांगणारी मुलगी, तिची आई, तिचे नाहिसे झालेले-परत आलेले वडील, काका आणि कम्युनिष्ट चुलत भाऊ या पात्रांभोवती, या कुटुंबाभोवती  फिरते.
लंबाण न लावता पटापट गोष्ट सांगणं ही लेखिकेची शैली आहे.   पत्रकारी शैली. लेखिका न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्समधे इजिप्तमधल्या घडामोडींवर लिहित असते. अरब स्प्रिंग या उलथापालथीच्या काळात लेखिकेनं घटनांचं ग्राफिक वर्णन करणारी वार्तापत्रं रिव्ह्यूसाठी लिहिली.
लेखिका एल रशिदी
लेखिकेचा पिंड पत्रकाराचा आहे. लेखिका  राजकारण, समाजकारण, त्यात गुंतलेले मुद्दे यांनी घडलेली आहे. इजिप्तमधल्या राजकीय उलथापालथी हा लेखिकेच्या चिंतनाचा विषय आहे. लेखिकेनं तिच्या मनातले राजकीय विचार एका कथानकात गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं कथानक वरचढ होतं, पात्रं फारशी विकसित होत नाहीत. अर्थात त्यानं बिघडत नाही. अशा कादंबरीला आपण राजकीय कादंबरी म्हणावं. जोवर ही कादंबरी आपल्याला काही तरी सांगते, काही तरी नवं सांगते तोवर तिची रचना कशी आहे हा मुद्दा फारसा महत्वाचा नाही.
अरब स्प्रिंग या विषयावरचं एल घोनिम या माणसानं लिहिलेलं एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. एल घोनिम कंप्यूटर इंजिनियर होता. तो कैरोत वाढला. कामासाठी दुबाईला असताना इजिप्तमधे मुबारक यांची दादागिरी सुरु झाली होती, कामगार संप करत होते, विद्यार्थी आंदोलन करत होते. खालेद सैद या माणसाला मुबारकच्या पोलिसांनी छळ करून ठार मारलं. तेव्हां we are all khaled said या नावाचं एक फेसबुक पेज वाएल घोनिमनं सुरु केलं. ते व्हायरल झालं. लाखो तरूण त्या पेजवर पोचले. फेस बुक आणि ट्विटरचा वापर करून घोनिमनं दुबाईत बसून इजिप्तमधल्या तरुणांना चेतवलं, संघटित केलं. इजिप्शियन सरकारनं नाना तांत्रिक आयडिया वापरून घोनिमचे सोशल मिडियातले उद्योग बंद पाडायचे प्रयत्न केले. घोनिम निष्णात कंप्यूटर इंजिनियर असल्यानं त्यानं सरकारला सतत हुलकावण्या दिल्या. परिणामी इजिप्शियन जनता, विशेषतः तरूण तहरीर क्रांती करते झाले. क्रांतीत भाग घेण्यासाठी घोनिम इजिप्तमधे परतला. पोलिसांनी त्याचा क्रूर छळ केला. परंतू एका क्षणी त्याची सुटका झाली. पुढं अरब स्प्रिंग उलथापालथ झाली, नंतर फुस्स झालं, मोरसी निवडून आले, त्यांना हाकलून पुन्हा अल सिसी सत्ताधारी झाले वगैरे. 
रेव्होल्युशन व्हर्शन टू या पुस्तकात घोनिमनं त्यानं केलेल्या प्रयत्नांची साद्यंत हकीकत मांडली आहे. इजिप्तमधे काय घडत होतं याचं थरारक वर्णन त्या पुस्तकात आहे. ती कादंबरी नाही, घोनिमनं सांगितलेली हकीकत आहे. पण कादंबरीतले अनेक गुण त्या पुस्तकात आहेत. थरार आहे, पात्रं आहेत, पात्रांची गुंतागुंत आहे, दोन वा अनेक दृश्य घटनांमधील अंधाऱ्या जागा आहेत.
घोनिमचं पुस्तक आणि एल रशीदीची कादंबरी यांना सांधणारा दुवा म्हणजे दोन्ही पुस्तकांमधून निघणारा निष्कर्ष. रशिदी कादंबरीत एका विक्रेत्याबरोबर होणाऱ्या चर्चेमधून सुचवते की इजिप्शियन

ताहरीर चौक

समाजाला बदल पचत नाहीत. इजिप्शियन समाज गतानुगतीक आहे, वरखाली होतं परंतू समाज पुन्हा आपली जुनी स्थिती प्राप्त करत असतो. नासरनं समाजवादी व्यवस्था आणायचा प्रयत्न केला, सादतनी इस्लामी विचार दूर सारून सेक्यूलर विचार प्रस्थापित करायचा प्रयत्न केला, अरब स्प्रिंगमधे तरूणांनी लोकशाही आणायचा प्रयत्न केला. उपयोग झाला नाही. इजिप्त पुन्हा जैसे थे. घोनिम जैसे थे वगैरे म्हणत नाही. तो जे घडलं, जसं घडलं ते सांगत जातो. पण २०११ साली सुरु झालेली उलथापालथ २०१४ साली थंड होते आणि इजिप्शियन गाडा, उंट गाडा म्हणा हवं तर, पुन्हा पूर्वीसारखा चालू लागतो हे घोनिमच्या पुस्तकाच्या शेवटाला लक्षात येतं.

एकादं पुस्तक किवा एकादी कलाकृती तयार होते तेव्हां तिला स्थानिक आणि स्थानिक नसलेले असे वाचक असतात. स्थानिकांना पुस्तकातले तपशील लक्षात येतात. उदा. न्यू यॉर्कमधील खाणावळींवरचं   पीटर वेल्सनं लिहिलेलं पुस्तक न्यू यॉर्कमधला माणूस वाचतो तेव्हां तो कधी तरी त्या खाणावळीत जाणार असतो किवा गेलेला असतो. खाणावळी आणि पदार्थांवरचं पुस्तक त्याला वेगळं समजतं. ते पुस्तक मुंबई, बीजिंग, काबूल इत्यादी ठिकाणचा माणूस वाचतो तेव्हां तो कधीही न्यू यॉर्कच्या खाणावळीत जाणार नसतो हे त्याला माहित असतं. तरीही ते पुस्तक तो वाचतो, त्याला ते पुस्तक वेगळं समजतं. एकच पुस्तक स्थानिकांना आणि दूरस्थांना वेगवेगळं समजतं, आवडतं.
घोनिम आणि रशिदी यांची पुस्तकं अर्थातच इजिप्शियन आणि अरब वाचकांना वेगळी समजतात परंतू भारतातल्या माणसांनाही ती स्वतंत्रपणे वेगळी समजतात. इजिप्शियन समाज समजून घ्यायला ती पुस्तकं मदत करतात. 
जाता जाता तहमीमा अनाम या बंगाली ब्रिटीश लेखिकेच्या तीन कादंबऱ्यांचा उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी Golden Age (2007), The Good Muslim (2011), The Bones of Grace (2016) या कादंबऱ्या लिहिल्या. रशिदीनी तीन उन्हाळे, तीन कालखंड घेतले. अनाम यांनीही बांगल देश निर्मितीचा काळ, बांगला देश झाल्यानंतरचा काळ आणि बांगला देशात इस्लामी अतिरेकाचा आताचा    काळ असे तीन कालखंड कादंबऱ्यात चितारले आहेत.एकाच कुटुंबातल्या व्यक्तींचं पुढं काय होतं असा प्रवाह या कादंबरीत आहे.

।।

जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावानं ओळखली जाणारी इमारत

जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावानं ओळखली जाणारी इमारत

ही इमारत २०४ चर्नी रोड या नावानं ओखळली जात असे. 
१९६७ ची स.का.पाटील यांना हरवणारी ऐतिहासिक निवडणुक जॉर्जनी इथून लढवली. या इमारतीत हिंदू मजदूर पंचायत, बाँबे लेबर युनियन, म्युनिसिपल मझदूर युनियन इत्यादी अनेक कामगार संघटनांच्या कचेऱ्या असत. संयुक्त समाजवादी पक्षाचंही कार्यालय इथंच होतं.
जॉर्ज फर्नांडिस इथंच बसत. याच इमारतीत जॉर्ज यांची कामगार चळवळ कारकीर्द  आकाराला आली. असं सांगतात की जॉर्ज मुंबईत प्रथम आले तेव्हां गोदीबाहेरच्या फूटपाथवर रहात आणि या कचेरीत येत. नंतर यथावकाश ते हाकेच्या अंतरावर ह्यूजेस रोडवरच्या पानगल्लीतल्या एका छोट्या घरात रहायला गेले.
 इमारतीच्या तळ मजल्यात एक बँक होती. तिथं फारशी गर्दी दिसत नसे. जी काही गर्दी असे ती पहिल्या मजल्यावर. 
सुरवातीच्या  चार पाच पायऱ्या चढून गेल्यावर मुख्य अंधारी जिना सुरू होई. जिन्याच्या सुरवातीला डाव्या हाताला भिंतीत फूटभर रुंदीची जागा असे. तिथं मगन बसलेला असे. विड्या ओढत. खाकी शर्ट, खाकी अर्धी पँट आणि डोक्यावर कधी कधी टोपी. तीनही कपडे मळलेले. पहिल्या मजल्यावरची कचेरी उघडणं, साफ करणं हे त्याचं काम. वर जाताना ओळखीची माणसं विचारत ” मेंडोंसा आलाय का, सातव आलाय का, बेंडके आलाय का, वसंत हेळेकर आलाय का.”  मगन जाड गेंगाण्या आवाजात त्याचं काही तरी उत्तर असे ” आलाय, नाही आलाय, तुम्हीच बघा ” असं काही तरी.
पहिल्या मजल्यावर पोचल्यावर समोर एक मोठ्ठा हॉल. समोरच्या भिंतीला लागून विविध युनियनचे सेक्रेटरी बसत. सातव, शेट्टी, एमयू खान, सोमनाथ डुबे. डाव्या हाताच्या भिंतीशी मेंडोंसा. काही वेळा अण्णा साने. उजव्या बाजूच्या भिंतीशी शरद राव, गोपाळ शेट्टी, आणि महाबळ शेट्टी. त्यांच्या समोर टेबलं. टेबलांसमोर बाकं. बाकांवर  बसत भेटायला आलेले कामगार.
डाव्या हाताला एक खोली, तिथं जॉर्ज फर्नांडिस बसत असत. समाजवादी मंडळीतली  पद्धत अशी की माणूस वयानं आणि कीर्तीनं कितीही मोठा असला तरी त्याचा एकेरी उल्लेख केला जात असे. त्यामुळं जॉर्ज आलाय का, जॉर्ज काय करतोय, जॉर्जकडं कोण बसलंय असे उल्लेख होत. 
जॉर्ज दुपारी कधी तरी ऑफिसमधे पोचत. खोलीत एका खिडकीशी जॉर्जची खुर्ची आणि समोर भलं मोठं टेबल. त्या टेबलाभोवती, खोलीभर कामगार बसलेले किवा उभे असत. टेबलावर लोखंडी काडीवर लावलेला भारताचा झेंडा. 

उकाडा. डोक्यावर गरगरणारा पंखा. जॉर्ज खुर्चीवर बसायच्या आधी शर्ट काढून ठेवत असत. बिनबाह्यांच्या बनियनमधेच सर्वाना भेटत. निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर होण्याच्या आधीच जॉर्ज ही प्रसिद्ध व्यक्ती असल्यानं देशी आणि विदेशी पत्रकार जॉर्जची मुलाखत घ्यायला येत. जॉर्ज बिनबाह्यांच्या बनियनमधेच मुलाखती देत.
जॉर्जचे एक सहकारी जगन्नाथ जाधव म्हणत ”  छतावरच्या पंख्यात एक पॉवरफुल मॅग्नेट आहे, दुनियाभरचे मॅड लोकं त्या मॅग्नेटकडं आकर्षित होतात.”
१९६६-६७ हा काळ या जागेचा धामधुमीचा आणि सुवर्णकाळ होता. जॉर्जनी स.का.पाटील यांच्या विरोधात निवडणुक लढवायचा निर्णय घेतला तो इथूनच.ही जागा निवडणुकीचं मुख्य कार्यालय होतं.
दिवस रात्र कार्यकर्त्यांचा राबता असे. दिवसरात्र बैठका. जॉर्जचे कामगार चळवळीतले सहकारी मोहिम आखत होते. काही तरी फार महत्वाचं घडतय असं वातावरण असे. कोण काय बोलतंय ते नीट कळत नसे कारण त्या हॉलमधे अनेक गट असत आणि कलकलाट असे

म्युनिसिपल मजदूर युनियनचे बाळ दंडवते आणि बेस्ट वर्कर्स युनियनचे नारायण फेणाणी ही माणसं (इतरही कित्येक ) लक्षात रहाण्यासारखी प्रमुख माणसं होती. तुम्ही स. का. पाटलांना पाडू शकता ही घोषणा दंडवतेंनी तयार केली होती असं म्हणतात. दंडवते मिश्कील माणूस होता. शीर्षकं, घोषणा, एका ओळीची चमकदार वाक्य हे त्यांचं वैशिष्ट्यं होतं. डोळे मोठे करून ते गंभीरपणे एकादं चमकदार वाक्य टाकत आणि हास्याचा फवारा उडे.नारायण फेणाणींच्या तोंडातल्या पानाच्या तोबऱ्यातून वाट काढून मोलाचे आणि वल्ली    सल्ले बाहेर पडत. या माणसांच्या सहवासात निवडणुकीचे ताणतणाव खलास होत.
खादी भांडारातल्या कामगार संघटनेचे एक पदाधिकारी दाते नावाचे गृहस्थ कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असत.  गोरे. अनुवठीपुरती दाढी. घारे. चित्रपटात पहायला मिळतात तशी एक कॅरेक्टर. आतल्या गाठीचे, गूढ वाटत. यांना जगातलं सारं माहित आहे पण बोलत नाहीत असं वाटायचं. त्यांच्या भोवती बरीच माणसं असत.
गटागटांची  गर्दी.
निवडणूक मोहिम जसजशी गती घेऊ लागली तसं या हॉलमधल्या गर्दीचं रूप बदलू लागलं. कामगारांसोबत मध्यमवर्गी माणसं दिसू लागली. त्यातही गुजराती माणसांचं प्रमाण उठून दिसावं इतकं वाढू लागलं. तरूणांची गर्दी वाढली.
या गर्दीत एक असत जवळच्याच तारा बागेतले माधव साठे. बँकेतलं काम आटोपलं की दुसऱ्या दिवशी बँकेत जाईपर्यंत सगळा वेळ इथंच असत.  दीपक मेपाणी असत, मिसेस कुटिन्हो असत, मातोंडकर असत. मातोंडकर म्हणजे उर्मिला मातोंडकर यांचे वडील. त्या घोळक्यात  एक शरद देसाई असत. ते अर्थशास्त्रातले डॉक्टर होते. त्यांच्याकडं अर्थशास्त्र या विषयावरील जाड जाड ग्रंथ असत. प्राण या हिंदी नटासारखे दिसायचे म्हणून नव्हे पण त्यांच्याकडल्या ग्रंथांसाठी त्यांची थोडीशी भीती वाटायची.  आणखी एक असत राजन कोचर. ते पुढं हायकोर्टात न्यायाधीश झाले. ही काही नमुना नावं. अशी किती तरी म्हणजे किती तरी माणसं जमा असत.  आपणही तिथं होतो असं सांगणारी गेला बाजार चार दोन हजार माणसं आज जिवंत असतील.
कार्यालयात ही सगळी धामधूम चालली असताना  जॉर्ज तिथं असतच असं नाही. ते केव्हा येउन जात तेही लक्षात नसे. ही निवडणूक जॉर्जची नव्हतीच, ती तमाम लोकांची होती. स.का.पाटील आणि त्यांची काँग्रेस पार्टी यावर लोकांचा राग होता, त्या रागाला जॉर्जनी तोंड फोडलं होतं.जॉर्जची निवडणूक म्हणजे एक मोठ्ठी सामाजिक घटनाच झाली होती.
माणसं बोलता बोलता दमून भुकावली की समोरच्या कुलकर्ण्याच्या हॉटेलात जाऊन भजी खात.
संध्याकाळी पोस्टर्सचे गठ्ठे येऊन पडत. कार्यकर्ते गोळा होत. गिरगावात आसपास रहाणारे तरूण कार्यकर्ते. मराठी, गुजराती, मारवाडी असा मिश्र गट.
रात्रीचे दहा वाजून गेले की आसपासच्या हॉटेलात कामं करणाऱ्या  पोरांची झुंड हजर होत असे. ही पोरं युनियनचं काम करत. दक्षिण आणि उत्तर भारतातून स्थलांतरित झालेली. मुंबईत त्यांना घर नसे. दिवसभर हॉटेलात काम आणि रात्री हॉटेलची साफसफाई करून तिथंच झोपणं. उन्हाळ्यात उकडत असे, ही पोरं रस्त्यावर पथाऱ्या पसरून गप्पा  करत झोपत. हॉटेलात काम करणाऱ्यांची जॉर्जनी बांधलेली युनियन जगातली अपूर्व युनियन होती असं त्या काळात पेपरात छापून आलं होतं. पोरं जोसात असायची. शेट्टी हा त्यांचा संघटक त्या पोरांना घेऊन पोस्टर लावायला निघायचा. काही ठिकाणी पोस्टर लावायला विरोध व्हायचा.  विरोध करणारे सका पाटलांचे समर्थक असावेत. मग ही चाबरट पोरं तिथं राडा करायची. राड्याला घाबरून विरोधक पळून जायचे. पोरं तोडफोडही करायला कमी करत नसत. त्यांना त्यात मजा यायची.
मतदार संघात एक मोठी वेश्या वस्ती होती. तिकडं पोस्टर लावायला जाण्याचा काहींचा  आग्रह असे. विशेषतः हॉटेलमधे काम करणारी मुलं. पोस्टरं लावायच्या नादात खिडक्यांतून आत डोकावायचं आिण खिखि हसायचं.
पोस्टरं लावून झाली की प्रार्थना समाजाच्या नाक्यावर पावभाजीच्या गाड्याभोवती झुंड गोळा व्हायची. रात्रीचे सहज एक दोन वाजलेले असायचे. पावभाजीच्या गाड्यावर पाणी मिळायचं. त्या पाण्यानं  चिकटलेली खळ खरवडून खरवडून हात धुवायचे आणि पावभाजी खायची. नंतर छोट्या काचेच्या ग्लासातली कटिंग कॉफी. काही पोरं पुन्हा कचेरीत परतायची, तिथं घुटमळायची. काही जणं तिथंच झोपायची. सकाळी गोळा होणारी कार्यकर्त्यांची गर्दी या पोरांना जागं करायची.
वातावरण जाम भारलेलं. कचेरीत बातम्या यायच्या. अमूक ठिकाणी आपल्या सभेवर दगडफेक झालीय. तमूक ठिकाणी सभा उधळायचा प्रयत्न झालाय. मग कार्यकर्त्यांची  झुंड तिकडं सूंसाट निघायची.
कार्यालयात गजबज असताना  तिकडं जॉर्ज आसपासच्या प्रत्येक इमारतीत जाऊन नागरिकांना व्यक्तिगत भेटत फिरायचे. बंदसम्राट जॉर्ज म्हणजे राक्षस आहे अशी लोकांची समजूत असे. कुठल्याही कार्यालयात काम करणाऱ्या माणसासारखा पँट शर्ट घातलेले जॉर्ज समोर उभे पाहिल्यावर लोकांना आश्चर्य वाटत असे.
जॉर्जच्या सोबत कधी कधी  रामदास संघवी नावाचा माणूस असे.  गुजराती व्यापारी. तो जॉर्जवर फिदा. एकंदरीतच गुजराती प्रजा जॉर्जवर फार प्रेम करत असे. विशेषतः तरूण मुली आणि बायका. तर हा माणूस कोणाच्याही दारात उभा राहिला की चक्क लोटांगण घालत असे. गुजराती वळणाच्या मराठीत स्वतःचं नाव सांगे आणि जॉर्जना मत ” दियायलाच पायजे ” असं म्हणत असे. स्वच्छ कडक इस्तरी केलेली पांढरी पँट आणि शर्ट घातलेला  व्यापारी आहे असं दिसणारा हा माणूस पाया पडू लागला की लोकांची पंचाईत होत असे.
पाया पडण्याचा कार्यक्रम आटोपला की हा माणूस  कार्यालयात येई.   एक शिवी प्रेमळपणे हासडून लोकांना जमा करे आणि कुलकर्ण्याची भजी खायला नेई. 
याच गर्दीत  साराभाई शहा नावाचे गृहस्थ असत. खादीची पँट आणि शर्ट. यशस्वी व्यावसायिक होते. त्यांना कोड फुटलेलं होतं त्यामुळं ते गर्दीत उठून दिसत.  जॉर्जचे फॅन. दररोज संध्याकाळी कचेरीत येत, उशीरापर्यंत थांबत. मधे मधे कार्यकर्त्यांना गोळा करून कुलकर्ण्याच्या हॉटेलात जाऊन चहा पाजत. ते स्वतः प्रत्येक वेळी अर्धा कप चहा पीत आणि उरलेला अर्धा कप समोरच्या माणसाला प्यावा लागे. भज्यांची प्लेट मागवली की त्यातलं एक भजं खात आणि उरलेली समोरच्यांना खावी लागायची, भले त्या भज्यांसाठी पोटात जागा असो वा नसो.  मोहिमेत काय काय चाललंय ते ऐकायची त्यांना जाम हौस होती. पाटलांच्या सभा होत नाहीत, त्यांना कोणी विचारत नाहीये असं कोणी सांगितलं की खुष होत. चहा मागवत, भजी मागवत.
याच गर्दीत एक गंगू काका नावाचे गृहस्थ असत. खूपच वयस्क होते. पांढरेशुभ्र धोतर आणि शर्ट. व्यापारी होते. त्यांनाही जाहीर सभांमधल्या घटना, जॉर्जची मोहीम कशी जोरात चाललीय ते ऐकण्यात मजा यायची. त्यांची कृष पत्नीही त्यांच्या बरोबर असे. दिवसभर हे मेहूण कार्यालयात असायचं.
मतदानाच्या दिवशी कार्यालयात खास बैठक झाली. बैठक कसली, तुडुंब गर्दीतली एक चर्चा झाली असं म्हणायचं. सका पाटील मतपेट्या पळवतात अशी ख्याती असल्याचं कोणीतरी सांगितलं. पाटीलांनी हेच तंत्र वापरून आजवरच्या निवडणुका जिंकल्यात असं लोकं बोलत होती. तेव्हां मतपेट्यांचं संरक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे असं जमलेल्या गर्दीनं ठरवलं. आपलं आपणच.  मतदान केंद्राच्या इमारतीच्या भोवती पहारा करण्याचं ठरलं. कार्यकर्त्यांनी आपसात केंद्रं वाटून घेतली आणि रवाना झाले. 
पाटील हरले.   कार्यालयासमोर नुसता जल्लोष झाला. लोकांनीच जल्लोष केला. द. मुंबई मतदार संघातले सर्व नागरीक कार्यकर्ते झाले होते. आपले आपणच पेढे वाटत होते, मिठाई वाटत होते, फटाके उडवत होते. सारं काही परस्परच घडत होतं.
२०४ चर्नी रोड ही इमारत तेव्हां सगळ्या मुंबईच्या नजरेत भरली. पुढली कित्येक वर्षं या इमारतीवरून जाणारे येणारे इमारतीकडं बोट दाखवून ” जॉर्ज फर्नांडिसचं ऑफिस ”  असं कौतुकानं म्हणत.

जॉर्ज फर्नांडिस खासदार झाले. दिल्लीत गेले. नंतर  आणीबाणीत तुरुंगात गेले. नंतर त्यांनी बिहारमधून निवडणुक लढवली. या कार्यालयातला त्यांचा वावर संपला. संपत गेला संपत गेला आणि संपला.
जॉर्ज फर्नांडिसांचा या कचेरीतला  वावर संपला.  ज्या कामगार चळवळीत आणि राजकीय पक्षात  ते वाढले तिथलाही वावर संपला. हळू हळू कामगार चळवळ थंडावली. जॉर्जचे सहकारी वारत गेले. हे कार्यालय ओकं बोकं झालं.
आता त्या कार्यालयाच्या जागी एक नवी इमारत उभी राहील.
।।

कातीन हत्याकांडाची फिल्म तयार करणारा आंद्रे वायदा

कातीन हत्याकांडाची फिल्म तयार करणारा आंद्रे वायदा

आंद्रे वायदा (Andhrzej Wajda) या पोलिश चित्रपट दिद्गर्शकाचं ९ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झालं. वयाच्या नव्वदाव्या वर्षी. वायदानं ४० पेक्षा जास्त चित्रपट केले. थिएटरही केलं. चित्रपट आणि थिएटर अशा दोन्ही ठिकाणी तो आलटून पालटून असे. २००० साली वायदाना मानद ऑस्कर मिळालं. त्यांच्या तीन चित्रपटांना ऑस्कर नामांकनं मिळाली.
  वायदाच्या  एका फिल्मचं नाव होतं अॅशेस अँड डायमंडस. पोलंडवरच्या नाझी सत्तेविरोधातल्या लढाईची पार्श्वभूमी होती. सिनेमाच्या शेवटल्या दृश्यात नाझींच्या विरोधात लढणारा कार्यकर्ता कचऱ्याच्या ढिगावर मरून पडलाय. ही फिल्म दाखवण्यात आली त्या १९५८ सालात पोलंडमधे कम्युनिष्ट सत्ता होती. फिल्मा सेन्सॉर होत होत्या. शेवटल्या दृश्यातला मेलेला कार्यकर्ता कम्युनिष्ट होता. कम्युनिष्ट सत्तेनं अर्थ घेतला की नाझींविरोधात लढलेल्या कम्युनिष्ट कार्यकर्त्याला नाझींनी किती वाईट वागवलं पहा, त्याला मारून कचऱ्याच्या ढिगावर टाकला. पोलिश जनतेनं वेगळाच अर्थ घेतला. पोलिश कार्यकर्ता मेला खरा पण तो मरताना कम्युनिष्ट राजवट थंडपणे बघ्यासारखी दूर होती. पोलिश माणसं परस्पर मरत आहेत याचा रशियनांना आनंद होत होता.
१९५६ साली प्रदर्शित झालेल्या कनाल (Kanal) या पटाच्या शेवटचं दृश्यंही हेलावणारं होतं. नाझींच्य विरोधात १९४४ साली झालेल्या पोलिश उठावाची पार्श्वभूमी होती. उठावात भाग घेणारा माणूस शेवटल्या  दृश्यात नाझींकडून मारला गेलाय आणि गटारात पडलाय. पुन्हा तेच. कम्युनिष्टांना वाटलं की वायदा कम्युनिष्टांचं कौतुक करतोय, पोलिश जनतेला वाटलं की वायदानं खुबीनं कम्युनिष्टांचं क्रूर थंडपण दाखवलंय. पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याचा प्रकार रशियन करत होते.
पोलंडच्या दुःखदायक इतिहासानं वायदा पछाडलेला होता. अठराव्या शतकाच्या शेवटाला पोलंडचे लचके शेजारच्या प्रशियन आणि रशियन साम्राज्यांनी तोडले. नंतर  पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात  नाझी जर्मनी, रशिया, ऑस्ट्रिया यांनी पोलंड परस्परात वाटून घेतला. दीडशे वर्षं परकीयांच्या टाचेखाली असलेल्या पोलंडला मोकळा श्वास घेता आला नाही हे सत्य वायदा मांडू शकत नव्हता कारण तो जगत होता, फिल्म करत होता तो काळही जर्मनी-रशियाच्या  टाचेखाली होता. दोन अर्थ निघणाऱ्या दृश्यांमधून प्रतिकात्मक दृश्यांमधून त्यानं पोलिश जनतेवरचे अन्याय दाखवले. अन्याय मग ते कोणीही  केलेले असोत. ग्लासातला मद्य एका पेटत्या काडीनं भडकतं हे प्रतिक वायदानं वापरलं.
फ्रान्स, जर्मनी, ब्रीटन, साऱ्या युरोपभर नव्या नव्या कल्पना आणि जीवनानंद दाखवणारे सिनेमे तयार होत असले तरी  तसे सिनेमे करण्याचं स्वातंत्र्य पोलिश चित्रपट जगाला नव्हतं, दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासूनच सुरु झालेल्या नाझी-कम्युनिष्ट राजवटींमुळं. जर्मनी आणि सोवियेत रशियानं परस्पर मोलोटोव-रिबेनट्रॉप करारानं पोलंड वाटून घेतला होता. युरोपातली समृद्धी, संस्कृती दाखवणं म्हणजे न परवडणारी चैन होती.  
१९८०च्या दशकात पोलंडमधे सॉलिडॅरिटीचं आंदोलन सुरु झालं. लेक वालेसा पोलिश स्वातंत्र्याचे हीरो होते. वायदानं तो विषय कामगारांचं आंदोलन या रुपात दाखवला. वालेसाला कामगार पुढारी दाखवला. नंतर यथावकास वायदानं लेक वालेसा यांच्यावर एक डॉक्युमेंटरी केली आणि नंतर एक रीतसर चित्रपटही केला. 
वायदानं केलेले काही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडले. पोलिश संस्कृती आणि माणसं तपासण्याचा प्रयत्न साहित्य कृतींवर आधारलेल्या चित्रपटात वायदांनी केला. पोलिश माणूस  भ्रष्ट आहे, संधिसाधू आहे असं चित्रण काही चित्रपटात झालं. मूळ साहित्यकृती पोलिश संस्कृतीतले गुंते तपासत होती, पोलिस समाज परकीयांविरोधात कां लढू शकला नाही याचा वेध त्या साहित्य कृती घेत होत्या. वायदाचा प्रयत्न पोलिश जनतेच्या पचनी पडला नाही.
१९८९ मधे सोवियेत युनियन मोडलं. पोलंडमधली कम्युनिष्ट सत्ता नाहिशी झाली. तिथून पुढं वायदाला मोकळेपणानं सिनेमे करता आले.वायदाच्या मनात एक खोल जखम अनेक वर्षं ठुसठुसत होती. १९४० साली स्टालीनच्या आज्ञेवरून २२,००० पोलिश माणसांचे खून झाले. वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट, सेनाधिकारी अशी पोलिश समाजातली महत्वाची माणसं स्टालीननं वेचून मारली. नेतृत्वच खलास केल्यानंतर पोलंड कधीही आपल्या विरोधात उभा रहाणार नाही अशी व्यवस्था स्टालिननं केली. कातिन या जंगलात नेऊन माणसं मारली. त्यात वायदाचे वडील याकुब होते. आंद्रे तेव्हा अगदीच लहान होते.   नाहिसे झालेले वडील हुडकण्यासाठी  आईनं केलेली वणवण वायदांच्या मनात रुतली. वडिलांच्या पश्चात आईनं संसार रेटण्यासाठी सोसलेले हास त्यांच्या मनात रुतले. कम्युनिष्ट सत्ता कोसळ्यावर वायदांनी कातिन (Katyn) याच नावानं फिल्म केली.
 कम्युनिष्ट पोलिस किती क्रूरपणे माणसं मारतात ते चित्रपटात फार प्रत्ययकारी रीतीनं दाखवलंय. बसमधून पोलिश माणूस उतरवला जाई. गळ्याभोवती वायर, वायरच्या  दुसऱ्या टोकानं हात पाठीमागं बांधले जात. पाठीमागून पोलिस गोळी झाडी. 
काही ठिकाणी खड्ड्याच्या काठवर माणूस उभा केला जाई. गोळी घातली की खाली जमा झालेल्या  प्रेतांवर तो पडे.
काही वेळा एका खोलीत गोळ्या घातल्या जात. गोळीचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी आवाज करणारे पंखे लावले होते.
बसमधून उतरवलेल्या माणसाला आपलं नेमकं काय होणार आहे ते माहित नसे. आपल्याला दुसऱ्या एकाद्या छावणीत नेलं जातय असं वाटत असे.  हात मागं बांधून गुडघ्यावर बसायला सांगितल्यावर त्याला काय होणार आहे त्याची कल्पना येई.  क्रुसात गुंतवलेली जपमाळ तो माणूस बाहेर काढून मणी खेचायला लागे, तोंडानं प्रार्थना पुटपुटू लागे. मागं उभ्या असलेल्या रशियनांचे चेहरे कोरे. कोणताही भाव नाही. अगदी थंड. थंडपणे चाप ओढला जाई. मग पुढला माणूस. तोच थंडपणा. पुन्हा नवा माणूस. तोच थंडपणा.
खड्डा प्रेतांनी भरला की बुलडोझर त्यावर माती लोटे.
एका खड्ड्यात बुलडोझर माती लोटत असताना   माणसाचा जपमाळ धरलेला एक मनगटापर्यंतचा हात बाहेर रहातो. हात क्षणभर थरथरतो. माणूस आत जिवंत असावा. थरथर थांबते. वरून माती लोटली जाते.
गोळीबारासाठी सुरवातीला रशियन पिस्तुल वापरलं जाई. त्याचा दर्जा वाईट होता. गोळी सुटल्यावर पिस्तुल मागं झटका देई आणि त्याचा त्रास होई. पोलिसांनी जर्मन पिस्तुलं मागवली. लोण्यासारखी वापरता येत, गोळी मारणाऱ्याच्या मनगटाला जराही त्रास नसे.
एका पोलिसानं तीन हजार माणसं मारली म्हणजे पहा.
कातिनची सुरवात एका पुलावर होते. दोन्ही बाजूनी पोलिश माणसं आपली गबाळं आणि कुटुंब कबिला घेऊन दुसऱ्या टोकाला जातात. घोडागाडीत, कारमधे लादलेलं सामान आणि त्यावर बसवलेले म्हातारे कोतारे. गाडीसोबत चालणारी कुत्री आणि सायकलवर बसलेली छोटी मुलं. डावीकडली माणसं जर्मनांच्या कचाट्याबाहेर पडत होती आणि उजवीकडली रशियन कम्युनिष्टाच्या कचाट्यातून पळत होती. जर्मन विभागातली माणसं नंतर रशियनांच्या तावडीत. रशियन विभागातली माणसं जर्मनांच्या तावडीत.
वायदावर विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकातल्या सिटिझन केन या कल्ट चित्रपटाचा प्रभाव होता. क्लोज अप्सचा वापर. प्रतिकांचा भरपूर वापर. अनेक ठिकाणी डॉक्युमेंटरी शैली. कातिन या पटात सुरवातीच्या काही मिनिटात एका छावणीचं दृश्य येतं. दृश्यात एका भिंतीवर एक तोडलेला हात लटकताना दिसतो. लक्षात येतं की तो हात माणसाचा नाही, एकाद्या प्रतिमेचा आहे. ही प्रतिमा ख्रिस्ताची असणार असं त्या हाताच्या रुपावरुन लक्षात येतं. ते लक्षात येईपर्यंत पुढल्या दृश्यात पांघरुणाच्या खाली एक दडलेलं शरीर असल्याचं दिसतं. एक डॉक्टर  आणि प्रीस्ट त्या शरीरापाशी उकीडवे बसलेले असतात. नायिका आपल्या नवऱ्याला शोधताना  ते शरीर आपल्याच नवऱ्याचं नाही ना हे तपासायला ती जाते, पांघरूण दूर करते. तर आतमधे ख्रिस्ताची मूर्ती असते. वर लटकलेला हात याच मूर्तीचा एक भाग असतो.
   रशियनांनी केलेल्या क्रूर अत्याचाराला पटामधे प्राधान्य नाही. ते अत्याचार पटाच्या शेवटल्या भागात दाखवले आहेत. सुरवातीपासून चित्रपटात रशियनांनी गायब केलेल्या अधिकाऱ्याची पत्नी, अधिकाऱ्याची बहीण आणि त्यांचे कुटुंबीय दिसतात. या माणसांची परवड, हाल,  सिनेमाभर पसरलेले आहेत. सिनेमाभर नाहिशा झालेल्या बावीस हजार माणसांची उध्वस्थ घरं दिसतात, सैरभैर माणसं दिसतात. जे मेले ते सुटले असं म्हणावं अशी स्थिती.
  २००० साली वायदांना   मानद मिळालं  त्या वेळी वायदांनी पंचाहत्तरीत प्रवेश केला होता.  बर्गमन, फेलिनी या थोर युरोपीय दिद्गर्शकांचा रांगेत वायदा यांना स्थान मिळालं. पण हा माणूस थांबायला तयार नव्हता. त्यांनी कातीन करायला घेतला. कातीनची पटकथा मनासारखी होईपर्यंत वायदा थांबले. २००७ साली कातीन प्रदर्शित झाला. २००८ सालच्या ऑस्करसाठी त्याला नामांकन मिळालं. काय गंमत आहे पहा. २००८ साली काउंटरफिटर या चित्रपटाला ऑस्कर मिळालं. काऊंटरफिटर या चित्रपटाची कथा आणि मांडणी वेधक होती. ब्रिटीश अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीनं पाऊंडाच्या खोट्या नोटा छापून ब्रीटनमधे पसरवायचं ठरवलं. त्याची गोष्ट काऊंटरफिटरमधे आहे. नोटा तयार करणारी माणसं छळछावणीतली होती. ती नकोशी झाल्यावर त्यांचे खून केले जात. ते खून थेट कातीन सिनेमातूनच घेतले आहेत असं वाटावं.  प्रमुख भूमिकाही छान होती. दोनमधला कोणता चित्रपट उजवा आहे ते ठरवणं तसं कठीणच होतं. वायदांचं ऑस्कर   हुकलं खरं.
युरोप, अमेरिकेत करोडो लोकांनी कातीन पाहिला. रशियात आणि चीनमधे या चित्रपटावर बंदी होती. कातीन हत्याकांड आपण केलं नाही असं रशियन सरकारनं जाहीर केलं. नाझींवर त्यांनी टेपर ठेवलं.  १९९० मधे गोर्बाचेव यांनी कबूली दिली होती हे रशियन सरकार विसरलं.   सुरवातीला नाझी सरकारनं कातीनमधे पुरलेली प्रेतं बाहेर काढली आणि प्रचार पटांमधून ते कांड रशियानं  केलं युरोपला सांगितलं. युरोपात कम्युनिझम विरोध फोफावत असल्यानं जर्मन प्रचाराला उठाव मिळाला. नंतर रशियनांनी तीच प्रेतं वापरून हत्याकांड नाझींनी केल्याचं दाखवणारे प्रचारपट तयार केले.  
कातीन या चित्रपटाची गणना आधुनिक क्लासिक चित्रपटामधे होते.
तर असा हा थोर चित्रपट निर्माता-दिद्गर्शक आता शिल्लक नाही.