Browsed by
Month: March 2016

रफाएल विमानं केव्हां येणार ?

रफाएल विमानं केव्हां येणार ?

रफाएल विमानं केव्हां येणार ?
।।।
आज २०१६ सालचा एप्रिल उजाडतोय. एक वर्षं झालं. एप्रिल २०१५ साली विकत घ्यायचं ठरलेल्या  ३६ लढाऊ रफाएल विमानांच्या  खरेदीचा करारही झालेला नाही, विमानं येण्याचं राहू द्या.
१५ एप्रिल २०१५ रोजी फ्रान्सच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरील  विमानं तयार स्थितीत भारताच्या ताब्यात येतील अशी घोषणा केली. दौऱ्यात त्यांच्या सोबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर होते.  
रफाएल विमानांचा एकूण लोचाच दिसतोय.
२००० साली भारतीय हवाई दलातली मिग-२१ जातीची  विमानं म्हातारी झाली होती, अपघात होत होते. त्यांच्या जागी योग्य लढाऊ विमानं भारत सरकारला हवी होती. भारताला सुदृढ हवाई दलासाठी एकूण १२६ लढाऊ विमानांची गरज होती. ती विकत घेण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला.
२०००. भारत सरकारनं  १२६  मध्यम बहुभूमिका विमानांबाबत (मबवि)फ्रेंच सरकारकडं विचारणा केली.  
 २००१ साली भारत सरकारनं १२६ मबवींची मागणी फ्रेंचांकडं नोंदवली. 
२००१ ते २००६ विमानं घेण्याबाबत फार घोळ चालला, निर्णय होऊ शकला नाही. 
२००७ साली भारत सरकारनं १२६ मबविसाठी ४२,००० कोटी रुपयांचं आंतरराष्ट्रीय टेंडर काढलं. अमेरिकन, रशियन, युरोपियन आणि फ्रेंच कंपन्यांनी टेंडरं भरली.
२०११ साली भारत सरकारनं अमेरिकन, रशियन, युरोपीय कंपन्यांची टेंडरं नाकारली आणि फ्रेंच कंपनी दसॉल्टचं टेंडर स्वीकारलं. 
२०१२ साली फ्रेंच कंपनीनं कळवलं की पुढल्या ३ वर्षात १२६ पैकी १८ विमानं भारताला दिली जातील आणि उरलेली विमानं भारताच्या बंगळुरुतल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स कारखान्यात तयार होतील.
२०१३ साली वाटाघाटी चालू राहिल्या.
२०१४ साली भारतान कळवलं की बजेटात पैसे नसल्यानं २०१५ पर्यंत खरेदीचा करार सरकार करू शकत नाही.
१५ एप्रिल २०१५ रोजी नरेंद्र मोदींनी पॅरिसमधे ३६ रफाएल विमानांच्या खरेदीची घोषणा केली. पत्रकारांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांना विचारलं की आधीच्या १२६ विमानांच्या खरेदीचं काय झालं. त्यावर पर्रीकर उद्गारले ‘ कोणतीही कार एका वेळी एकाच रस्त्यावर चालू शकते, दोन रस्त्यांवर नाही.’
२०१५ च्या नोव्हेंबर महिन्यात पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर भारत सरकारनं सांगितली रफाएल विमानाच्या खरेदीची बोलणी चालली असून अगदी काही दिवसांतच खरेदीचा निर्णय पक्का होऊन करारावर सह्या होतील, विमानं भारतीय हवाई दलात सामिल होतील. किती विमानं आणि केव्हां सामिल होणार याचा तपशील सांगितला गेला नाही.
रफाएल खरेदीच्या  निर्णयावर चर्चा झाली. रशियन सुखोय विमान रफाएलइतकंच कार्यक्षम आणि उपयुक्त असून त्याची किमत रफाएलपेक्षा कमी होती.  भारताची गरज १२४ विमानांची होती आणि मिळू घातली होती ३६ विमानं. दसॉल्ट कारखान्याची रफाएल विमानांची  उत्पादन क्षमता मर्यादित होती. कंपनी इजिप्तला ही विमानं वेळापत्रकाप्रमाणं पुरवू शकली नव्हती. भारताच्या वेळापत्रकानुसार कंपनी रफाएल विमानं पुरवू शकणार नाही असं विमान क्षेत्रातले अभ्यासक म्हणत होते. रफाएल भारतीय हवाई दलात सामिल होई पर्यंत त्यापेक्षा अधिक विकसित आणि पुढल्या पिढीची लढाऊ विमानं बाजारात येत होती, चीन आणि पाकिस्तानच्या हवाई दलात सामिल होण्याची शक्यता होती.मग भारत सरकार रफाएलची खरेदी कां करतंय असा प्रश्ण विचारला जात होता.
सुरवातीला ३६ रफाएलची किमत १२ अब्ज डॉलर सांगण्यात आली. भारती हवाई दलाच्या विशेष गरजा या विमानात अंतर्भूत नव्हत्या. त्या गरजा पूर्ण करायच्या तर १८ अब्ज डॉलर द्यावे लागतील असं फ्रेंच म्हणाले. मधल्या काळात एकूणच जगातल्या किमती वाढल्यानं आणि विमानात कराव्या लागणाऱ्या सुधारणांची   किमत वाढल्यानं फ्रेंचांनी २४ अब्ज डॉलर मागितले.
या साऱ्या गोष्टी माध्यमांतून चर्चिल्या जात होत्या, दोन्ही सरकारं या बाबत काहीही बोलत नव्हती.
करार होत नव्हता.
भारत सरकारची मागणी होती की विमानं वेळेवर मिळाली नाहीत तर दिरंगाईसाठी  फ्रेंचांनी दंड द्यावा. फ्रान्स तसा दंड द्यायला तयार नाही. भारत सरकारनं बँक हमी मागितली. फ्रेंच तयार नाहीत. त्या बदल्यात फ्रेंच सरकार एक comfort letter देऊ म्हणतय. comfort letterचा अर्थ काय? घाबरू नका, आम्ही जरूर विमानं देऊ, चिंता करू नका अशा आशयाचं गोड भाषेत लिहिलेलं पत्र. फ्रेंच सरकारची इच्छा आहे की विमानांची ठरलेली किमत  भारत सरकारनं फ्रेंचांना आधीच द्यावी, प्रत्यक्ष विमानं हातात पडायच्या आधीच. भारत सरकार तयार नाही कारण अनेक बाबतीत भारत सरकारला खात्री वाटत नाही.
ऑफसेट कलम हा एक मोठ्ठा वादाचा मुद्दा अनिर्णित आहे. १२६ विमानांची मागणी करताना भारतानं ५० टक्के रक्कम ऑफसेट मागितली होती. ऑफसेट म्हणजे मोबदला. म्हणजे असं की विमानाची किमत शंभर रुपये असेल तर फ्रेंचानी ५० रुपयांची गुंतवणूक भारतामधे कारखाने उभारण्यात खर्च करावी जेणेकरून भारतातले रोजगार वाढतील. अशी भरपाई देणं म्हणजे शेवटी विमानाचा उत्पादन खर्च वाढवणंच असल्यानं फ्रेंचांनी नकार दिला आणि १२६ विमानांची मागणी कोसळली. ३६ विमानांचा करार करताना भारतानं ३० टक्के भरपाई मागितली आहे. फ्रेंच सरकार त्याला तयार नाही. 
मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत भारत सरकार परदेशी गुंतवणूक भारतात यावी आणि भारतात रोजगार वाढावा या प्रयत्नात आहे. रफाएलच्या बदल्यात अशी गुंतवणूक विमान उद्योगात किंवा इतर उद्योगात फ्रेंचानी करावी असा सरकारचा प्रयत्न आहे. फ्रेंच सरकार आणि भारत सरकार यांमधे कोणत्या उद्योगात किती पैसे फ्रेंचांनी गुंतवावेत यावर एकमत होत नाहीये.
आणखी एक मुद्दा संभाव्य भांडणं सोडवण्याचा. काही मतभेद झाले, भांडणं झाली, कराराचं पालन झालं नाही  तर त्यासाठी आवश्यक लवाद भारतातच  नेमला जावा अशी भारत सरकारची मागणी आहे. फ्रेंच सरकारचं म्हणणं आहे की लवाद जेनेवात असावा.
एकूणात करार होत नाहीये हे जगाच्या लक्षात आल्यावर लॉकहीड या अमेरिकन कंपनीनं भारतासमोर अमेरिकन लढाऊ विमानं स्वस्तात द्यायची तयारी दाखवली. ही विमानं स्वस्तात मिळत होती कारण या विमानाची उत्पादन प्रणाली आता कालबाह्य झाली होती. भंगारमधे जाऊ पहाणारी उत्पादन प्रणाली अमेरिका भारताच्या गळ्यात मारू पहात होती. खुद्द रफाएलसुद्धा कालबाह्य होत असल्याची चर्चा आहे.
२६ जानेवारी २०१६ रोजी फ्रान्सचे अध्यक्ष होलाँ प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. या भेटीचा गाजावाजा झाला.  भेटीच्या वेळी करारावर सह्या होतील असं वातावरण भारत सरकारतर्फे तयार करण्यात आलं.
 चीनकडं आज ९१३ लढाऊ विमानं आहेत. २०२० पर्यंत चीनमधल्या अद्यावत लढाऊ विमानांची संख्या १३०० होणार आहे. पाकिस्तानजवळ नाना पिढ्यांची २८९ विमानं आहेत. भारताजवळ सध्या ३२२ विमानं आहेत, त्यातली बरीच (म्हणजे नेमकी किती ते कळत नाही) निरूपयोगी ठरत आहेत. चीन आणि पाकिस्तानशी तुल्यबल होण्यासाठी  २०२७ सालपर्यंत भारताला  ७५० ते ८०० विविध जातीच्या अद्यावत विमानांची जरूर असेल.  
आधीचं काँग्रेसचं सरकार असो की आताचं भाजपचं सरकार असो, विमानांची खरेदी कां जमत नाहीये? पैसे नाहीयेत की आंतरराष्ट्रीय व्यवहारात आवश्यक असलेली चलाखी, माहिती आणि सरावाचा अभाव आहे? राजकीय इच्छाशक्ती आणि हुशारीचा अभाव आहे?
विमानाचा करारही झालेला नसताना सुरवातीपासून सरकार सतत गाजावाजा कां करतंय? 
चांगली आणि भरपूर विमानं लवकरात लवकर भारताच्या हवाई दलात सामिल होवोत म्हणजे मिळवली.

‘एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो’.व्हेलबेकची कादंबरी.

‘एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो’.व्हेलबेकची कादंबरी.

एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो? व्हेलबेक या फ्रेंच कादंबरीकारानं तशी कल्पना करून फ्रेंच समाज कसा बदलू शकतो याचं वर्णन सबमिशन या कादंबरीत लिहिलंय. २०१५ शार्ली हेबडो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या संपादकांना आयसिसच्या जिहादींनी पॅरिसमधे ठार मारलं त्याच दिवशी ही कादंबरी  फ्रेंचमधे प्रसिद्ध झाली. आता या कादंबरीचं इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध झालंय.
।।
 व्हेलबेकच्या कादंबरीचा काळ आहे, २०२०. त्या वर्षी फ्रान्समधे सार्वत्रिक निवडणुका होतात. चार पक्ष निवडणुकीत उभे असतात. कोणालाच बहुमत मिळत नाही. पक्षांमधली फूट वापरून, पक्षांच्या आपसातल्या मारामारीचा उपयोग करून मुस्लीम ब्रदरहूड हा राजकीय पक्ष आघाडी स्थापन करतो, सरकार स्थापन करतो.  महंमद बेन अबेस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो. राष्ट्रपती झाल्यानंतर  पॅरिसमधील ऐतिहासिक सॉरबॉन विद्यापीठ एक सौदी श्रीमंत माणूस विकत घेतो. सौदी पेट्रोडॉलर ओतून.  इस्लामी वळणाचे अभ्यासक्रम विद्यापीठात सक्तीचे होतात.
 सौदी शेख प्राध्यापकांना अगदीच भरपूर पगार देतो रहायला उत्तम आणि मोठ्या जागा देतो. कॅथिलक, फ्रेंच प्राध्यापकांना सतत मद्यपान आणि स्वैर सेक्सची सवय असते. या दोन्ही गोष्टी करायची सोय विद्यापीठ करतं. चार लग्न किंवा काँट्रॅक्ट लग्न इस्लामला मंजूर असतात. सॉरबॉनमधल्या इस्लामी अभ्यासक्रमात स्त्रियांना माध्यमिक शिक्षणापलिकडं शिकायला परवानगी नसते. त्यानी नोकऱ्याही करायच्या नसतात. पतीला हवं असेल तसं आणि तेव्हां सुख देणं आणि मुलं वाढवणं हेच त्यांचं काम आहे हे त्यांना इस्लामनं पटवून दिलेलं असतं. लग्न हवी तेव्हां मोडायला आणि नवी लग्न करायला इस्लामची मुभा असते. फ्रेंच प्राध्यापकांना यापेक्षा जास्त काय हवं असतं? त्यांच्या मते हीच तर फ्रेंच संस्कृती असते. त्यामुळं प्राध्यापक विद्यापीठातली नोकरी आनंदानं घेतात. कादंबरीचा कथानायक कादंबरीच्या शेवटी इस्लाम स्वीकारतो. 
 सबमिशन ही कादंबरी आहे. तो धार्मिक किंवा राजकीय पाठ नाही.   कादंबरीतलं मुख्य पात्र आहे एक साहित्याचा प्रोफेसर. हुसमान्स नावाच्या एका कादंबरीकारावर  कथानायक प्राध्यापकानं संशोधन केलं आहे. कादंबरीत हुसमान्स आणि त्याचे समकालीन फ्रेंच कादंबरीकार, फ्रेंच तत्वज्ञ, फ्रेंच राजकीय विचारक यांच्यावर भरपूर चर्चा आहे. अकॅडमिक रीतीची.  चर्चा काही ठिकाणी इतकी लांबते की साहित्य या विषयावरच ही कादंबरी आहे असं वाटतं. पॅरिस शहरातलं खाणं पिणं, फॅशन्स, भौगोलिक खाणाखुणा यांची रेलचेल आहे. हा कादंबरी जगातले इतर वाचकही वाचतील अशी अपेक्षा लेखकानं केलेली नाही.फ्रेंच संस्कृती, साहित्य, तत्वज्ञान यांचा परिचय नसणाऱ्या माणसाला पानं उलटून पुढं सरकावं लागतं इतकी खोलातली साहित्य चर्चा.
कादंबरी म्हटली की कथानक येतं, पात्रं येतात आणि शैली येते. सबमिशन वाचवते. पण कादंबरीला खास शैली नाही. फ्रेंच संस्कृती म्हटल्यावर त्यात सेक्स ही गोष्ट जवळपास अटळ असते. सेक्स उपभोगाची वर्णनं कादंबरीत आहेत. परंतू टीएच लॉरेन्स (लोलिता) सारखी सेक्स चवीनं खायला देणारी शैली या कादंबरीला नाही.
  सबमिशनमधे कथानायक आणि त्याच्या विद्यार्थिनी यांच्यातल्या सेक्सक्रियांची तपशीलवार वर्णनं आहेत. कथानायक वेश्यांकडंही जातो. सेक्ससाठी मैत्री करणाऱ्या स्त्रियाही कादंबरीत आहेत, वर्णनं आहेत. सेक्स उपभोग अगदी तपशीलात आहेत.  ही वर्णनं उपरोधिक आणि विनोदी होतात. कादंबरीतला सेक्स केवळ सेक्ससाठी नसून तो एकूण समाजाच्या स्थितीचा पर्सपेक्टिव समजावा यासाठी कादंबरीत येतो.
एका सिनेमाची आठवण होते. जेरी मेंझिलचा क्लोजली ऑबझर्व्ड ट्रेन्स नावाचा सिनेमा आहे. त्याला उत्तम सिनेमाचं ऑस्कर मिळालं होतं. सिनेमाचं कथानक तसं गंभीर. नाझींची   दारुगोळा घेऊन जाणारी गाडी उडवायचा बंडखोरांचा कट. कट शिजत असतो, तडीला जातो. कटात सामिल असतात रेलवेचे कर्मचारी. त्यांचं जगणं सिनेमात समांतर पातळीवर दिसत असतं. सेक्सबाबत अपेशी ठरलेला एक तरूण मुलगा आहे. रेलवे स्टेशनात सेक्स चालतो तो त्यानं पाहिलेला असतो. तरूण मुलगाही प्रयत्न करतो.  त्याला सेक्सगंड असतो. आपल्याला सेक्स जमत नाही असं त्याला वाटत असतं. या बाबतीतला अनुभवी स्टेशनातला एक मध्यमवयीन कर्मचारी सेक्सचं शास्त्र त्याला सांगतो. हा वेडा मुलगा म्हाताऱ्या बाईकडंही सेक्स मागायला जातो.
 सिनेमात सेक्स दिसतो. खळखळून हसवणारा. जेरी मेंझिलच्या बहुतेक सिनेमात सेक्सची गंमत पहायला मिळते.
व्हेलबेकची सेक्स हाताळण्याची एक पद्धत, जेरी मेंझेलची आणखी एक वेगळी पद्धत. सेक्स नावाची मूलभूत नैसर्गिक मानवी प्रेरणा प्रत्येक माणसाच्या शरीरात असते,   मनात असते. ती प्रेरणा हाताळण्याची व्हेलबेक-जेरी मेंझेलची पद्धत लक्षात रहाते. 
सबमिशन या  कादंबरीत एक राजकीय स्टेटमेंटही आहे. एकूण फ्रेंच जगण्याचा राजकीय अंश त्या स्टेटमेंटमधून बाहेर येतो. फ्रेंच बुद्धीजीवी बेजबाबदार आहेत असं लेखक निवेदनात म्हणतो.  उजवे असोत की डावे  की आणखी कोणी. सभोवतालचं वास्तव (इस्लामचा प्रसार) त्यांना कळत नाही. फ्रेंच संस्कृती म्हणजे केवळ मद्य, सेक्स आणि स्वैराचार असं बुद्धीजीवींना वाटतं. पश्चिमी संस्कृतीच्या मुळात मानवी स्वातंत्र्य, समता, आधुनिकता, लोकशाही ही मूल्य आहेत हे बुद्धीजीवींना समजत नाही असं लेखक सुचवतो. विविधता (मल्टीकल्चरिझम) या कल्पनेचा खरा अर्थ फ्रेंचांना कळत नाही, ती कल्पना मतं मिळवून सत्तेत जाण्यापुरतीच अमलात आणली जाते.  त्यातून इस्लामी परंपरा-दहशतवाद वाढतोय हे बुद्धीवादी लोकांच्या लक्षात येत नाही असं लेखक तिरकसपणे, आडवळणानं, उपरोधी शैलीत सांगतो. सबमिशन म्हणजे शरण जाणं. फ्रेंच बुद्धीजीवी अयोग्य संस्कृतीला शरण जातातेत असं लेखक सुचवतो. इस्लाम या शब्दाचा अर्थही शरण जाणे असा आहे.
  व्हेलबेकच्या  प्लॅटफॉर्म या कादंबरीची आठवण येते. या कादंबरीत एक फ्रेंच माणूस आणि एक अरब मुसलमान बँकॉकच्या हॉटेलमधे असतात.त्यांच्यात चर्चा चालते. फ्रेंच माणूस अरबाला म्हणतो ‘ तुम्ही तरी काय माणसं आहात. अरे सुंदर मादक बायका आणि दारू मिळावी यासाठी तुम्ही जिहाद करता, माणसांना मारता. जिहाद केल्यावर स्वर्गात तुम्हाला त्या गोष्टी मिळायच्या असतात. कशाला यासाठी मरायचं, येवढा खर्च करायचा. पाच दहा डॉलरमधे इथं समोर वाट्टेल ती बाई मिळते आणि वाट्टेल ती दारू मिळते. अरे स्वर्ग इथंच तर आहे. पैसे खर्च करा आणि स्वर्ग उपभोगा. त्यासाठी विनाकारण माणसं मारू नका.’
साहित्य हे फिक्शन असतं, ते कल्पित असतं. सभोवतालचं वास्तव लेखक त्याच्या पद्धतीनं पहातो, पचवतो. साहित्यिकाकडं प्रतिभा नावाची एक दुर्मिळ गोष्ट असते. वास्तव समजून घेणं, ते घुसळणं, पचवणं या प्रक्रियेत प्रतिभा हा घटक प्रभावी असतो. एकच घटना सामान्य माणूसही पहातो आणि कलाकारही. पण त्या घटनेची सामान्य माणसाची प्रतिक्रिया आणि कलाकाराची प्रतिभानिर्मिती प्रतिक्रिया यात कायच्या काय फरक असतो. या प्रक्रियेचं अंतीम रूप म्हणजे कादंबरी किंवा कथा किंवा कविता किंवा नाटक किंवा सिनेमा. 
वाचकाला एकादा राजकीय विचार शिकवणं, एकादा धर्म त्याच्या गळी उतरवणं इतक्या छोट्या गोष्टीसाठी चांगला लेखक साहित्य निर्मिती करत नाही. तशा हेतूनं लिहिणारे लेखक जरूर असतात आणि तसं लिहिण्याचा त्यांचा अधिकारही असतो. परंतू असं साहित्य अभिजात ठरत नाही. साहित्य वाचकाला सभोवतालच्या जगाचं एक भान देतं, विचार करायला लावतं, वाचक तयार करतं.  वाचकानं पुढं काय करायचं ते त्या वाचकाचा स्वतंत्र प्रश्न असतो.
व्हेलबेकची कादंबरी विद्यमान फ्रेंच जीवन, फ्रेंच परंपरा, फ्रेंच संस्कृती या गोष्टींचं भान आणून देतो. व्हेलबेकला त्याची मतं आहेत. ती कादंबरीत व्यक्त होतात. हळूच. ती मतं लोकांच्या गळी उतरवण्यासाठी त्यानं कादंबरी लिहिलेली नाही. 
संघर्षग्रस्त फ्रेंच समाज समजायला कादंबरी  मदत करते. कादंबरी वाचकाला चक्रावून टाकते, विचार करायला लावते. 
।।।
Submission.
Michel
Houellebecq.
Groupe Flammarion publication.
कामसूत्र.

कामसूत्र.

 कामसूत्र. जगाला भारताचं सांस्कृतीक योगदान.
THE MARE’S TRAP, NATURE AND CULTURE IN KAMSUTRA हे वेंडी डॉनिजर यांचं पुस्तक  २०१५ मधे प्रसिद्ध झालं आहे. अर्थशास्त्र हा कौटिल्याचा ग्रंथ अभ्यासल्यानंतर कामसुत्राचे नव्याने समजलेले संदर्भ लेखिकेनं या पुस्तकात मांडले आहेत.
वात्स्यायनाचं कामसूत्र इसवी तिसऱ्या शतकात पाटलीपुत्रमधे (पाटणा) प्रसिद्ध झालं. तेराव्या शतकात यशोधरानं कामसूत्रावर ‘जयमंगल’ ग्रंथातून भाष्य केलं. १८८३ साली रिचर्ड बर्टननं कामसूत्राचं इंग्रजीतलं भाषांतर लंडन आणि बनारसमधे प्रसिद्ध केलं. त्यानंतरचं डॉनिजरांचं हे पुस्तक. 
  इसवी पू. २ मनु – धर्मशास्त्र-मनुस्मृती
इसवी १ कौटिल्य – अर्थशास्त्र.
इसवी ३       वात्स्यायन – कामसूत्रं.
इसवी १३ यशोधर-कामसूत्र भाष्य, जयमंगल.
इसवी १७९४ विल्यम जोन्स – मनुस्मृती इंग्रजीत.
इसवी १९०४ शामशास्त्री – अर्थशात्र इंग्रजीत
इसवी १८८३ रिचर्ड बर्टन – कामसूत्र इंग्रजीत.
        इसवी २०१५  वेंडी डॉनिजर – कामसूत्र भाष्य.
 वेंडी डॉनिजर हे नाव इतिहासाच्या अभ्यासकांना माहित आहे. त्या शिकागो विद्यापिठात भारतीय आणि आफ्रिकी धर्माचा इतिहास  शिकवतात, त्यावर संशोधन करतात. The Hindus: Anlternative History; On Hinduism; Siva, The Erotic Ascetic; Hindu Myths; Rig Veda (translation) ही त्यांची हिंदू धर्मावरील प्रसिद्ध पुस्तकं. भारतात उपलब्ध आणि प्रसिद्ध असलेल्या संस्कृत ग्रंथांचा आधार घेऊन, मुळातले संस्कृत भाषेतले ग्रंथ वाचून, ते ते संदर्भ देऊन डॉनिजर यांनी लेखन आणि संशोधन केलं आहे. इतिहासाला मान्य असलेले संदर्भ त्यांनी वापरले आहेत. 
भारतीय तत्वज्ञानावरील साहित्यात कामसूत्र या पुस्तकाचं  स्थान काय आहे ते वेंडी डॉनिजर सांगतात.
 भारतीय तत्वज्ञानात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ सांगितले आहेत. इसवी सनापूर्वी दुसऱ्या तिसऱ्या शतकात मनूनं मनुस्मृती, धर्मशास्त्र लिहिलं. त्यात काम या प्रेरणेला केवळ पुनरुत्पादनासाठी होणारी क्रिया येवढंच स्थान दिलं आहे. काम या प्रेरणेबद्दल तत्वज्ञानात असलेली द्विधा स्थिती तिथून सुरु होते. 
नंतर येतं इसवी पहिल्या शतकातलं कौटिल्याचं अर्थशास्त्र. 
 कौटिल्याच्या अर्थशास्त्रात काम या भावनेबद्दल तटस्थ भूमिका आहे. काम हा माणसाच्या जीवनाचा एक भाग आहे, त्यात पुढली पिढी जन्माला घालणं आणि थरार या दोन्ही गोष्टी आहेत असं अर्थशास्त्रं म्हणतं आणि मामला तिथंच सोडून देतं. व्यभिचाराला फार कडक शिक्षा मनुनं सांगितल्या, ठेचून मारणं वगैरे. अर्थशास्त्राची त्या शिक्षेला ना नाही पण नवऱ्यानं क्षमा केली तर व्यभिचारी स्त्री आणि जार दोघांना सोडून द्यावं इतपत अर्थशास्त्र उदार आहे.   काम या भावनेचा वापर राजानं करून राज्याचं हित साधायला हरकत नाही असंही अर्थशास्त्र सांगतं.
त्यानंतर येतं वात्स्यायनाचं कामसूत्रं. त्यात काम या क्रिया-भावनेबद्दलचा द्विधाभाव पूर्ण नष्ट होतो.काम केवळ पुनरूत्पादनासाठी नसून त्यातल्या आनंदासाठीही आहे असं वात्स्यायन निःसंदिग्धपणे लिहितो. पुरुषानं स्त्रीला, स्त्रीनं पुरुषाला आकर्षून घेणं;  पुरुष आणि स्त्री दोघांनीही   गुणी आणि कलासक्त असणं; संभोग ही आनंददायक घटना घडण्याच्या आधी आणि नंतरचं आनंददायक वातावरण; ज्या समाजात वा शहरात कामजीवन सिद्ध होत असतं तो समृद्ध समाज इत्यादी गोष्टींची वर्णनं कामसूत्रात आहेत. 
निरामय कामजीवन कसं सिद्ध करावं याच्या सूचना कामसुत्रात आहेत. तिसऱ्या शतकात किंवा त्या आधी अवंतिका, पाटलीपुत्र इत्यादी भारतीय नगरांतलं नागरी जीवन कसं होतं याचं चित्रण  कामसुत्रात आहे. कामजीवन ही एक सुंदर, प्रसन्न, मूलभूत गोष्ट आहे हे कामसुत्रात कळतं.
कामसूत्रात संभोगाची वर्णनं आहेत पण एकूण पुस्तकाचा तो एक अगदीच लहान अंश आहे. कामसूत्र म्हणजे संभोगशास्त्राचं पुस्तक नाही.
कामसुत्रं अनीती आणि व्यभिचाराचं समर्थन करत नाही पण कामजीवन हे मानवी जगण्याचा अविभाज्य भाग आहे, त्यात पाप नाही, स्त्री आणि पुरुष दोघांनाही कामजीवनात समान अनुभव मिळतो असं कामसुत्रं सांगतं. पुरुषानं (विवाहित असला तरीही) इतर स्त्रियांना कशा प्रकारे आकर्षिक करावं याच्या सूचना कामसुत्रात आहेत. पुरुषांना वश करण्यासाठी स्त्रियांनी काय काय करावं तेही सांगितलं आहे. परंतू परस्त्री आणि परपुरुषाशी संबंध ठेवण्यातून नुकसान कसं होतं तेही सांगितलं आहे.
कामसूत्र हे पुस्तक कसं आहे ते अनुभवायचं असेल तर दि बा मोकाशी यांची वात्स्यायन ही कादंबरी वाचावी. एक प्रेमी युगुल नाहिसं झालेलं असतं त्याच्या शोधाला वात्स्यायन बाहेर पडतो. प्रवासात त्याला जे दिसतं, जे कानावर पडतं ते वात्स्यायन मांडतो. त्यात कामजीवनाबद्दलच्या कथा गुंफलेल्या आहेत. शैली कामसुत्राची पण विसाव्या शतकातल्या मराठी वाचकाला समजेल अशा रीतीनं नावं, स्थळं, रुपकांची मांडणी मोकाशींनी केली आहे. (महाराष्ट्र, कर्नाटक असे राज्यांचे उल्लेख आहेत, तिसऱ्या शतकात अशी राज्यं नव्हती). आपल्या घरात उघडपणे वाचावी अशी ही कादंबरी आहे. अश्लील अजिबात नाही.  
कामसूत्र म्हणजे अश्लीलता असं भारतात एकोणिसाव्या शतकापर्यंत मानलं जात नव्हतं. कामजीवनाला समाजात एक वास्तव आणि नैसर्गिक स्थान होतं. काम या प्रेरणेला पुरुषार्थात स्थान मिळालं याचं कारण भारतीय समाजातच कामजीवन हा एक मोकळा व्यवहार होता. 
वेंडी डॉनिजर दाखवून देतात की राणी व्हिक्टोरियाच्या काळात भारतात रिचर्ड बर्टनचं आगमन झाल्यानंतर भारतीय समाजामधे काम या घटकाला एक लाजीवरवाण्या गोष्टीचं स्थान दिलं गेलं. ख्रिस्ती विचारात काम हा गुन्हा मानला गेला असल्यामुळं तसं घडलं. रिचर्ड बर्टननं लिहिलेलं, रूपांतरीत केलेलं कामसुत्रं चुकीचं आहे, मुळ ग्रंथातले उतारे त्यांनी गाळले आहेत, चुकीचं भाषांतर त्यांनी मुद्दाम केलं आहे असं डॉनिजर पुराव्यानिशी मांडतात. व्हिक्टोरियन ख्रिस्ती मूल्यं लादण्यासाठी त्यांनी हा उद्योग केला असं डॉनिजर यांचं म्हणणं आहे.
भारतातल्या साक्षर वर्गानं व्हिक्टोरियन दृष्टी ब्रिटिशांच्या नादाला लागून स्वीकारली. कामजीवन, संभोग या गोष्टी विकृत आहेत, लाजीरवाण्या आहेत असं भारतातले लेखन करू शकणारे लोक मानू लागले. मोकळेपणानं कामजीवन अनुभवणं त्यामुळं दुरापास्त झालं. रस्त्यावर हातात हात घालून फिरणं हेही अश्लील मानलं जाऊ लागलं. पायापासून डोक्यापर्यंत स्त्रीला कपड्यात लपवणं सुरू झालं. शतकानुशतकं मोकळं कामजीवन जगण्याची सवय निपटून काढायच्या प्रयत्नामुळं कामजीवनाबद्दलचे विकृत आणि अनैसर्गिक विचार समाजात पसरू लागले. त्यातूनच संभोगाची अनेक आसनं रेखाटलेली पिवळ्या कव्हरची पुस्तकं बाजारात दिसू लागली. कामसूत्रांची मोकळेपणानं चर्चा करणाऱ्या स्त्री पुरुषांचा समाज अस्ताला गेला आणि विकृत आसनांची पुस्तकं चोरून वाचणारा समाज विकसित झाला. त्यामुळंच मूळ ग्रंथ न वाचताही भारतातली माणसं आजही कामसूत्रं हे पुस्तक घरात लपवून ठेवतात.
 हिंदू समाज परिपूर्ण होता, त्यात कामजीवनाकडं निरोगी आणि आनंदी पद्धतीनं पाहिलं जात होतं, ती हिंदू समाजातली कित्येक शतकांची परंपरा होती, ती एकोणिसाव्या शतकात नष्ट झाली याचं दुःख डॉनिजर यांना आहे.
कामसूत्र पुस्तकाची गोष्टही उद्बोधक आहे.
रिचर्ड बर्टननं हे पुस्तक, कामसूत्राचं इंग्रजी भाषांतर, १८८३ साली प्रसिद्ध केलं. पुस्तकावर बंदी येईल या भीतीनं त्यानं पुस्तक खाजगी वितरणासाठी आहे असं पहिल्या पानावर लिहिलं. अस्तित्वात नसलेल्या कामशास्त्र सोसायटी ऑफ लंडन अँड बनारस या संस्थेचं नाव प्रकाशक म्हणून टाकलं. असा कोणताही पत्ता बनारसमधे नव्हता. जगातलं सर्वात जास्त चोरून प्रसिद्ध झालेलं पुस्तक (पायरेटेड) अशी या पुस्तकाची ख्याती झाली. १९६२ पर्यंत हे पुस्तक इंग्लंड आणि अमेरिकेत अधिकृतरीत्या प्रसिद्ध झालेलं नव्हतं.
हे पुस्तक बर्टनच्या नावावर असलं तरी काही प्रतींवर बर्टनबरोबर Forster Fitzgerald यांचंही नाव आहे. नंतर काही प्रतींवर Fitzgeraldचं भाषांतर असा उल्लेख आहे. खरं म्हणजे हे भाषांतर भगवानलाल इंद्रजीत आणि शिवराम परशुराम भिडे या दोघांनी केलं आहे. पण तशी नोंद पुस्तकात कुठंही नाही. हे भाषांतर आपण केले नसून दोन भारतीयानी केलं आहे असं Fitzgerald नं  आपल्याला शिक्षा होईल अशी भीतीनं १९८५ साली एका निवेदनात सांगितलं. 
।।

खून की धर्मकर्तव्य. पाकिस्तानी गोंधळ.

खून की धर्मकर्तव्य. पाकिस्तानी गोंधळ.

खून की धर्मकर्तव्य. पाकिस्तानी गोंधळ. 
।।
सलमान तासिर या राज्यपालांना मुमताझ काद्री या त्यांच्याच अंगरक्षकानं गोळ्या घालून ठार मारलं. त्या बद्दल काद्री याला पाकिस्तानी न्यायालयानं फाशी दिली. पण पाकिस्तानी जनतेला फाशी मंजूर नाही, त्यानं धर्मकर्तव्य केलं असं तिथल्या लोकांना वाटतं.
।।
मुमताझ काद्री या माणसाला १ मार्चच्या पहाटे इस्लामाबाद तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार. सलमान तासिर या पाकिस्तानच्या राज्यपालाला गोळ्या घालून ठार मारल्याचा गुन्हा त्यानं केला होता. काद्री तासिर यांचा शरीररक्षक होता.
  पाकिस्तानभर या फाशीविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. अफगाणिस्तानात तालिबान मंडळींनी काद्रीच्या फाशीविरोधात एक आत्मघाती स्फोट करून वीस पंचवीस माणसं मारली.  लाखो माणसं पाकिस्तानात ठिकठिकाणी रस्त्यावर आली.   काद्रीला फाशी द्यायला नको होती, काद्रीचा सन्मान करायला हवा होता, तो धर्मात्मा होता असं त्यांचं  मत होतं. 
फाशीच्या बाजूनं बोलायला माणसं रस्त्यावर उतरली नाहीत. 
कोर्टमत  आणि लोकमत यात किती फरक आहे हे या निमित्तानं सिद्ध झालं.
।।। 
४ जानेवारी २०११ रोजी पंजाबचे राज्यपाल सलमान तासिर इस्लामाबादेतल्या   कोशर मार्केट विभागात एका रेस्टॉरंटमधून जेवण घेऊन बाहेर पडताना  मुमताझनं त्यांना २७ गोळ्या घातल्या.  कोशर मार्केट या भागात मध्यम वर्गी माणसं रहातात. हा भाग अगदी सुरक्षित मानला जात असे.  
मुमताझनं बंदुक खाली ठेवली. गुडघे जमिनीवर टेकून आपण धार्मिक कृत्य केलंय असं ओरडून म्हणाला.
तासिर यांचा  गुन्हा असा की आसियाबीबी नावाच्या एका ख्रिस्ती शेतमजूर महिलेला झालेली धर्मनिंदा (ब्लाशफेमी) कायद्याखालची फाशीची शिक्षा रद्द करावी अशी त्यांची मागणी होती. धर्मनिंदा कायदा भोंगळ आहे, त्याचा गैरवापर होतोय म्हणून त्या कायद्यात सुधारणा करावी अशी तासिर यांची मागणी होती. 
आसियाबीबीनं धर्मनिंदा केली म्हणजे काय केलं होतं? आसियाबीबी एक ख्रिस्ती भूमीहीन शेतमजूर. सहकारी मुस्लीम स्त्रियांशी तिचा वाद झाला. त्यावेळी आसियाबीबी म्हणाली की आपली ख्रिस्ती धर्मावर श्रद्धा आहे आणि येशू जिवंत आहे.  हे ऐकून आसपासच्या गावकऱ्यांनी पोलिसांत वर्दी दिली की आसियाबीबीनं धर्मनिंदा केली.आसियाबीबीवर खटला झाला, फाशी जाहीर झाली.
तासिर आसियाबीबीची बाजू घेतात आणि धर्मनिंदा कायद्यात सुधारणा मागतात यावरून पाकिस्तानी जनता चिडली. देशभरच्या मुल्लांनी पत्रकं काढून तासिर यांना धर्मनिंदक ठरवलं, फाशीची मागणी केली. मुल्लांनी तमाम मुसलमानांना आवाहन केलं की त्यांनी तासिर यांना मारून टाकावं. 
।।
काद्रीचं  शिक्षण शालांत परिक्षेपर्यंतच झालेलं होतं. त्यानं इस्लामचं धार्मिक शिक्षण घेतलेलं नव्हतं. त्याला धर्मातलं हो का ठो कळत नव्हतं.  इस्लामी परंपर न पाळता तो सफाचट दाढी करत असे. त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध होते.
काद्रीवर तासिर यांना मारल्याचा  खटला सुरु झाला. काद्री कोर्टात गेला की जमा झालेली माणसं गुलाबाच्या पाकळ्या उधळून त्याचं स्वागत करत. वकील आणि पोलिसही. कोर्टाच्या बाहेर मुल्ला मंडळीनी खूप माणसं जमवलेली असत. कोर्टात काद्री म्हणत असे की त्यानं गुन्हा केला नसून धर्मकर्तव्य केलं आहे.  शिक्षा सोडाच, त्याचा सत्कार झाला पाहिजे असं त्याच्या वकिलांचं म्हणणं होतं.
काद्रीची रवानगी  रावळपिंडीतल्या अदियाला तुरुंगात झाली. काद्री तुरुंगाचा प्रमुख असल्यासारखा वागे. तो आज्ञा करी,  तुरुंगातले अधिकारी त्याची आज्ञा ऐकत. याच तुरुंगातल्या  एका बराकीत महंमद असगर आणि झफर भट्टी हे दोघं धर्मनिंदा कायदा मोडल्याच्या आरोपाखाली तुरुंगवासी होते. एकदा मुमताझ त्या बराकीत गेला आणि ७० वर्षाच्या महंमद असगरला गोळ्या घातल्या.   नंतर भट्टीलाही गोळ्या घातल्या. तुरुंगाधिकाऱ्यांनी मुमताझवर कोणतीही कारवाई केली नाही, उलट त्याचा सत्कारच केला. 
काद्री   तुरुंगातून पाकिस्तानातल्या आपल्या लोकांना धर्मनिंदकाना मारण्याची आज्ञा देत असे. कराची विद्यापिठातला प्राध्यापक शकील औजला  गोळ्या घालण्यात आल्या. औजनं कोणतीही धर्मनिंदा केली नव्हती. तो हुशार होता. तो विद्यापीठातल्या गैरप्रकारांबद्दल बोलत असे. कॉपी करणं, कॉपी पेस्ट करून पीएचडी करणं वगैरे. त्यामुळं विद्यापीठातले लोक त्याच्या विरोधात होते. तो कुलगुरू  होणार होता. त्याचं वागणं पसंत नसलेल्या लोकांनी त्याला धर्मनिंदक ठरवलं. 
  रशीद रहमानला नावाच्या वकीलाला कोर्टाच्या आवारात गोळ्या घालण्यात आल्या. तो धर्मनिंदा बळींची बाजू कोर्टात मांडत असे. 
।।
खोमेनी यांनी सलमान रश्दींना मारून  टाकण्याचं आवाहन साऱ्या मुस्लीम जगाला केलं होतं. सलमान रश्दीला मारणाऱ्या माणसाला या जगात आणि स्वर्गात बक्षीस मिळेल असं त्यानी जाहीर केलं. रश्दीनं सेटॅनिक व्हर्सेस ही कादंबरी लिहून धर्मनिंदा केली होती असं खोमेनींचं म्हणणं होतं. सेटॅनिक व्हर्सेस इंग्रजीत होती. इंग्रजीत असल्यानं ती कादंबरी अगदीच नगण्य लोकांनी वाचली होती. भारतात ती न वाचलेल्या लोकांनी मोर्चे काढले. खोमेनींच्या फतव्यापुढं मान तुकवून भारत सरकारनं सेटॅनिक व्हर्सेसवर बंदी घातली.  धर्मनिंदेची फाशीची शिक्षा देण्याची जबाबदारी खोमेनी यांनी प्रत्येक मुसलमानावर सोपवली. फाशी किंवा ठार मारणं हे प्रत्येक मुसलमानाचं धर्मकर्तव्य ठरत असल्यानं कोणीही मुसलमान व्यक्ती ते करू शकत होत्या.
एकादी गोष्ट बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार धार्मिक राज्यात धर्माकडं असतो, कोर्टाकडं नसतो. कारण त्या देशांत धर्माचं म्हणणं चालतं, कायद्याचं नाही. ख्रिश्चॅनिटीमधे धर्माचं उल्लंघन झालं की नाही हे ठरवण्याचा अधिकार धर्मानं चर्च या संस्थेला आणि पोप या सर्वोच्च धर्मनेत्याला दिला आहे. इस्लाम या धर्माला संघटित संस्थेचं रुप नसल्यानं इस्लाममधे संस्था नाही. कोणीही माणूस धर्मोपदेशक होऊ शकतो, निका लावू शकतो, धर्मप्रवेश वा धर्मबाह्यता ठरवू शकतो. अगदीच अडाणी, नुसतं कुराणाचं वाचन करणारा माणूसही धर्माबाबत निर्णय घेऊ शकतो. धर्माधिकारी कोण हे इस्लाममधे अगदीच भोंगळपणानं ठरत असल्यानं मुमताझ किंवा झिया उल हक, इस्लामचा हो का ठो माहित नसतांना  इस्लामच्या वतीनं वाट्टेल ते करू शकतात. ही इस्लामची खासियत आहे.
।।
पाकिस्तानी फौजदारी कायद्यात धर्मनिंदेचं २९८ हे कलम झिया उल हक यांनी घातलं. इस्लामबद्दल अनुदार उद्गार, इस्लामला विरोध, इस्लामी माणसाचं मन दुखावणं, धर्मविरोधी वर्तन, धर्मात सांगितलेल्या गोष्टी न पाळणं, धर्मविरोधी बोलणं, धर्मविरोधी चित्र काढणं, इत्यादी गोष्टी धर्मनिंदा या कलमाखाली येतात. धर्मनिंदा म्हणजे नेमकं काय हे कधीच कायद्यात ठरवण्यात आलेलं नाही. सत्ताधारी म्हणतील ती धर्मनिंदा. धर्मनिंदा करणाऱ्याला फाशीची तरतुद या कलमात आहे.
इस्लाममधे हनाफी परंपरा आहे.या परंपरेत धर्मिनिंदेचा आरोप असणाऱ्यानं पश्चात्ताप व्यक्त केला तर फाशी देऊ नये अशी तरतूद आहे. धर्मनिंदा करणारी व्यक्ती इस्लामी नसेल तर त्या व्यक्तीला फाशी देऊ नये अशीही तरतूद आहे. झियांनी ही तरतुद केली तेव्हां आणि आसियाबीबीला फाशी झाली तेव्हां मुल्लांनी हनाफी परंपरेचा विचार करण्याची विनंती केली होती. हनाफी तरतूद मान्य करणं  म्हणजे पश्चिमी समाज, इतर धर्मीय आणि सेक्युलर यांच्यापुढं सरकार झुकलं असा अर्थ घेतला जाईल अशी सबब सांगण्यात आली.  
गेल्या १० वर्षात शेकडो माणसं धर्मनिंदेच्या नावाखाली मारली गेलीत. राजकीय विरोध, जमिनीवरून भांडण, पैशावरून भांडणं, अनैतिक वागण्यावरून भांडण, व्यक्तिगत वैर, एकाद्या विषयावरील मतभेद अशा कोणत्याही कारणावरून धर्मनिंदा झाली असा परस्पर निर्णय घेऊन खून केला जातो किवा खटला भरला जातो. खटल्यात फाशी होते.
हे धर्मनिंदा प्रकरण राजकीय कारणांसाठी वापरलं जातंय हे लक्षात घेऊन बेनझीर भुत्तो आणि मुशर्रफ दोघांनीही तो कायदा दुरुस्त करावा असं अनेक वेळा म्हटलं. पण येवढं बोलल्यावरून त्यांच्याही विरोधात मुल्लांनी धर्मनिंदेचा फतवा काढून त्याना मारून टाकण्याचं आवाहन केलं.
१९८० पासून २०१६ पर्यंत धर्मनिंदा कायद्यात बदल झालेला नाही.
।।
धर्मनिंदा प्रकरण व्यवहारात कसं घडतं त्याचं एक उदाहरण.
 ४ जुलै २०१२. ठिकाण बहावलपूरमधील पोलिस चौकी. पोलिस चौकीत आहे एक मलंग. त्याच्यावर धर्मनिंदा केल्याचा आरोप आहे.
मलंग म्हणजे अवलिया, भटक्या, भणंग. हे मलंग सुफी संतांच्या समाधीच्या   आसपास असतात. रंगीबेरंगी भरपूर घोळ असलेला ड्र्स. डोक्यावर लाल फेटा. अंगावर नाना चिन्हं, लोटा, लाकडी वस्तू टांगलेल्या.  दाढी वाढलेली. या मलंगानं   कित्येक दिवस आंघोळ केली नसावी. मशिदीतून किंवा गावातल्या लोकांकडून मिळणाऱ्या भिक्षेवर जगे.  करत काहीच नव्हता. स्वतःशीच बडबड करत फिरे.  असंबद्ध बोले. सामान्य माणसं अशा माणसाला वेडचाप म्हणतात किंवा स्क्रू ढिला आहे असं म्हणतात. यांचा उपद्रव नसतो. आपल्याच नादात असतात. कधी कधी गाणीबिणी म्हणतात.तर असा हा मलंग लोकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कोठडीत ठेवला होता. 
मलांगाविरोधात लोकांची तक्रार होती की त्यानं कुराण अपवित्र केलं. म्हणजे काय केलं? कुराणाची प्रत फाडली? जाळली? की कुराणाचं पावित्र्य नष्ट करणारे काही उद्गार काढले? मुळातच मलंग असंबद्ध असतात. ते काय बोलतात ते कळतही नाही. त्यांच्या बोलण्यात अनंत विसंगती असतात. त्यांच्या बोलण्याचा अर्थ लागत नाही. म्हणून तर त्याला लोक वेडा असं म्हणतात. मलंग मुसलमान असतात, सुफी असतात. तेव्हां अशा माणसानं केलं तरी काय?  माणूस ठिकाणावर नसतो हे माहित असताना त्यानं विचारपूर्वक कुराण अपवित्र केलं असं कसं म्हणायचं? त्याच्या कृत्याचे कोणतेही पुरावेही लोकांकडं नव्हते.
बाहेर जमलेले लोक म्हणत होते की मलंगाला आमच्या हातात सोपवा. 
पोलिस म्हणत होते की त्याच्यावर धर्मनिंदेचा खटला होईल, कोर्ट निकाल देईल, लोकांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये. 
जमाव ऐकत नव्हता. हिंसक झाला. जमाव येवढा मोठा होता की गोळीबार करणंही शक्य नव्हतं. पोलिस हतबल झाले. 
जमावानं कोठडीचे दरवाजे फोडले, मलंगाला बाहेर काढलं. रस्त्यावर आणून त्याला बुकल बुकल बुकलं. मलंग मेला. 
जमाव शांत झाला आणि अल्ला हो अकबरच्या घोषणा देत पांगला.
।। 
चिकित्सा ही मानवी ज्ञानाची वाट आहे. माणूस चिकित्सा करायला लागला त्यातूनच धर्म निर्माण झाला. सभोवतालच्या स्थितीचे अर्थ लावणं, सभोवतालच्या घटनांमधला कार्यकारण संबंध शोधणं या माणसाच्या खटपटीतूनच धर्म जन्मला. चिकित्सा हा  धर्माचा मुख्य आधार आहे. प्रत्येक काळात धर्माची चिकित्सा होणं हे मुळात धर्मातच अपेक्षित आहे.
पाकिस्तानी जनता चिकित्सेला तयार नाही. धर्मापासून फटकून असलेले पाकिस्तानमधले डावेही इस्लामबद्दल फारच सावधगिरीनं, गुळमुळीत बोलतात. गवगवांकित पुरोगामी कुराण अंतिम आहे अशी भूमिका घेतात. 
धर्मनिंदा कायदा कुठून आला? शरियात तो कसा आणि केव्हां गुंफला गेला? वेळोवेळी राज्यकर्त्यांनी आणि बाहुबलींनी  अनेक प्रथा आणि परंपरा इस्लाममधे   घुसडल्या आणि त्यामुळंच त्या विद्वानांनी मान्य केल्या हे खरं की खोटं? अरबस्तानात किंवा आणखी कुठं तरी निर्माण झालेल्याच प्रथा खऱ्या इस्लामी, भारतात तयार झालेला प्रथा इस्लामी नाहीत हे ठरवण्यात तर्क कोणता? 
शरिया या शब्दाचा अर्थ पाणवठ्याकडं जायची वाट असा आहे. अरब जनजीवनात पाणी, पाणवठा या गोष्टींना एक विशिष्ट भौगोलिक आणि वहिवाटीचा संदर्भ आहे. कोकणात किंवा गंगेच्या काठावरच्या पाणवठ्याकडं जाणाऱ्या वाटा वेगळ्या असतात. गंगेच्या काठची किंवा कोकणातली वाट ही शरीया कां मानायची नाही? अरब सांगतात तीच वाट म्हणजेच धर्माची वाट हे कां मानायचं?
इस्लाम सोडा,  धर्म नावाची  एक स्वतंत्र गोष्ट आहे. एकविसाव्या शतकात जगभरातली माणसं एकूणच धर्म या संकल्पनेची आणि व्यवहाराची  चिकित्सा करत आहेत. पश्चिमी जगात चर्चमधे न जाणारे, देव आणि येशूला न मानणारे ख्रिस्ती आता खूप आहेत.  त्यांना ख्रिस्ती परंपरेतल्या समाजातल्या काही गोष्टी आवडतात म्हणून ते ख्रिस्ती असतात. नस्सीम निकलस तालेब हा लेखक-फायनान्स जाणकार म्हणतो की चर्चमधलं धीरगंभीर संगीत आणि सूर, उदबत्त्यांचे वास, वातावरण आवडतं म्हणूनच तो चर्चमधे जातो, बाकी त्याला ना देव मंजूर ना ख्रिस्ती धर्म. माणसावर प्रेम करावं या एकाच अनेक जण स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात, बायबल वगैरे गोष्टी त्यांच्या लेखी महत्वाच्या नसतात. पोप कोण लागून गेला, आमचे आम्ही स्त्रियांना प्रीस्ट-बिशप करू असं म्हणून अमेरिकेत, ब्रीटनमधे, अनेक ठिकाणी स्थानिक लोकांनी परंपरा धाब्यावर बसवून स्त्रियांना बिशप केलंय. या बिशप स्त्रिया ख्रिस्ती लोकांची लग्न लावतात, मुलांना बाप्तिस्मा देतात, चर्चमधे प्रार्थना करतात आणि व्याख्यानं देतात. त्या म्हणतात भले पोपनी आम्हाला धर्मबाह्य म्हणावं, आम्ही पोपांचं ऐकत नाही, आम्ही ख्रिस्ती आहोत.
 धर्म आणि धर्मनिंदा, धर्मात घेणं आणि धर्माबाहेर ढकलणं, धर्मपालनाच्या तरतुदी अशा एकूणच धर्मप्रकरणाचा विचार जगभर चालला आहे, व्हायला हवा. पाकिस्तानातही.
।।

स्पॉटलाईटला दोन ऑस्करं मिळाली

स्पॉटलाईटला दोन ऑस्करं मिळाली

‘स्पॉटलाईट’ ला सर्वोत्तम चित्रपट आणि पटकथा अशी दोन ऑस्करं मिळाली.
गेली सातेक वर्षं हा पट  घडत होता. हॉलिवूडमधले पैसेवाले, स्टुडियोंचे मालक या पटात पैसे घालायला तयार नव्हते. मोठमोठे स्टार्स, त्याना अगडबंब पैसे, चित्रीकरणावर भरमसाठ पैसे, वितरणावर भरमसाठ पैसे, जाहिरातबाजीवर पैसे. हे हॉलिवुडचं वैशिष्ट्यं झालंय. या जाचक चौकटीत राहूनही चांगले चित्रपट निघत असतात. (स्पीलबर्ग, स्कॉरसेसे इ).  आशयघन ‘स्पॉटलाईट’ काढणं हॉलिवूडमधे जवळजवळ अशक्य झालंय. स्पॉटलाईटच्या लोकांनी कष्ट करून ते जमवलं. जाहिरात आणि पैसे पाठीशी नसल्यानं या चित्रपटाची वाच्यता झाली नव्हती. ऑस्कर मिळाल्यानंतर या चित्रपटाची कथा कळू लागलीय.
निव्वळ करमणुकीसाठी सिनेमाघरात जाणाऱ्यांसाठी हा चित्रपट नसेल असं निर्मात्यानं सुरवातीलाच ठरवलं होतं. चर्चची बदनामी, चर्च उध्वस्थ करणं असा चित्रपटाचा उद्देश दिद्गर्शकाच्या मनाशी नव्हता. समाजात निर्माण झालेल्या कुप्रथांकडं लक्ष वेधणं आणि त्या बदलायला समाजाला भाग पाडणं हा उद्देश होता. समाजातल्या दुर्लक्षितांकडं लोकांचं लक्ष जात नाही. त्यांचं म्हणणं लोकांसमोर आलं पाहिजे असं ग्लोबमधे पत्रकारी  करणाऱ्या लोकांच्या डोक्यात होतं. चित्रपट निर्मात्याचंही तेच मत होतं. लोकांनी विचार करावा, चिंतन करावं, आपल्या अंतरंगात डोकावून पहावं असं पत्रकारांना आणि चित्रपट निर्माता याना  वाटत होतं.
  मुख्य विषय शक्यतो अनाकर्षक पद्धतीनं मांडायचा, विषयाला झगमगीत कपडे घालायचे नाहीत, दागिने घालायचे नाहीत. मुळ विषयातच ताकद आहे. विषय जसा आहे तसा लोकांना दाखवायचा. स्पॉटलाईटमधल्या भूमिकांना कपडे घातलेले नाहीत. विषयाला कपडे घातलेले नाहीत. माणसं आणि विषय जसे असतात तसे चित्रपटात दिसतात.  खाकी तुमानी घातलेली पात्रं चित्रपटात वावरतात. जमिनीलगत फूट दोन फूट अंतरावर कॅमेरा ठेवून माणूस दाखवला की तो आकाशायेवढा दिसतो, सारा पडदा व्यापतो. पात्र  फार  मोठ्ठं आहे दाखवण्याचा हा खटाटोप असतो.  असं चित्रीकरण केलं की पात्राची ‘ उंची ’ काय आहे ते ठरवण्याचं स्वातंत्र्य प्रेक्षकाला रहात नाही. दिग्दर्शकच सांगू टाकतो की पहा हे पात्र किती महान आहे. तसं या चित्रपटात कुठंही नाही. 
बॉस्टन ग्लोबचा खराखुरा संपादक रॉबी परवा प्रेक्षकांसमोर आला. तो म्हणाला ‘ मी तसा कणखर माणूस आहे, भावनाविवश होत नाही. पण प्रीस्टांच्या विकृतीला बळी पडलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हां मी दोन वेळा रडलो.’  सिनेमात संपादक रॉबी रडताना दाखवलेला नाही.
  चित्रपट काढतांना दिद्गदर्शक आणि सहायकांनी   मुळातल्या पत्रकारांसमवेत अनेक दिवस खर्च केले. पत्रकारांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक, वावरण्याच्या आणि  बोलण्याच्या लकबींचा अभ्यास त्यांनी केला.  पिफर ही पत्रकार महिला या मुलाखतींनंतर हादरली. आपल्या   जीवनातलं नाट्य, खाजगी गोष्टी चित्रपटात येणार या विचारानं ती अस्वस्थ झाली. चित्रपटात तसं काही नाही याचं तिला आश्चर्य आणि सुख वाटलं.
वॉटरगेट प्रकरण खोदून काढणारे ‘वॉशिंग्टन पोस्टचे’ पत्रकार वूडवर्ड आणि बर्नस्टिन काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी बोलत होते. वॉटरगेटनंतर शोध पत्रकारी   कां होत नाहीये असा प्रश्न   विचारल्यावर ते म्हणाले. ‘ तसं नाहीये. बोस्टन ग्लोबनं केलेली प्रीस्टांच्या वर्तनाची छाननी हे शोध पत्रकारीचं उत्तम उदाहरण आहे. आणि तुम्ही विकीलिक्स विसरताय. असांजे आणि स्नोडेन यांनी साऱ्या जगातली गुपितं उघड केली.’ स्पॉटलाईट ही चित्रपट क्षेत्रातली शोधपत्रकारी आहे.
स्पॉटलाईट हा चित्रपट जसा चर्चवर आहे तसाच पत्रकारीवरही आहे. पत्रकारी कशी चालते त्याचा एक घडा स्पॉलाईटनं दिलाय. 
वर्तमानपत्रात बातमीदार असतात. प्रत्येक बातमीदाराला एक बीट दिलेला असतो. कोण कोर्टातल्या बातम्या गोळा करतो, कोण पोलिसातल्या, कोण विधानसभेतल्या, कोण शिक्षणक्षेत्रातल्या.  शोधपत्रकारी करणारा बातमीदार  बीट बातमीदारापेक्षा वेगळा असतो. बॉस्टन ग्लोबमधले चार ते सात पत्रकार कित्येक महिने केवळ चर्चमधल्या घटनांचीच चौकशी करत होते. एकच एक विषय.  लोकांना भेटायचं, फोन करायचे.  माहिती गोळा करायची. स्पॉटलाईटमधे पत्रकार अनंत खोक्यात साठवलेले अनंत कागद डोळे फोडून तपासताना दिसतात. रात्रं दिवस. अमेरिकाभर पसरलेल्या चर्चमधे किती प्रीस्ट आहेत, ते कुठं काम करतात, कुठं कुठं जात येत असतात याचा अभ्यास करण्यासाठी पत्रकारांनी अनंत कागद तपासले. हे काम अत्यंत कंटाळवाणं असतं.
 बॉस्टनमधे काम करणारा प्रीस्ट बॉस्टन सोडून कुठं तरी जातो. कुठं तरी म्हणजे? म्हणजे विशाल अमेरिकेत कुठंही. अशा प्रीस्टचा माग घ्यायचा, कोणताही मागमूस नसतांना.  कोणतीही चावी हातात नसतांना कुलुप उघडण्याचा प्रयत्न. अत्यंत म्हणजे अत्यंत  कंटाळवाणा. इंग्रजीत याला ड्रजरी असा शब्द आहे.  कित्येक दिवसांच्या कंटाळवाण्या खटाटोपातून कधी तरी एकादी छोटीशी माहिती मिळते. तेवढ्या माहितीनं सारं चित्रं बदलतं, स्पष्ट होतं. शोध पत्रकारी हे असं प्रकरण आहे.
स्पॉटलाईटमधे असलेली भूमिका खऱ्या आयुष्यात निभावलेल्या ग्लोबमधल्या पत्रकारानं परवा मुलाखत दिली. तो म्हणाला ‘ शोध पत्रकार म्हणजे कोण? जो सत्तेला प्रश्न विचारतो, सत्ताधाऱ्याला आणि सिस्टीमच्या प्रमुखांना प्रश्न विचारतो.’ पोपला, पंतप्रधानाला, राष्ट्राध्यक्षाला, लष्कर प्रमुखाला, पोलिस प्रमुखाला, हॉस्पिटलच्या प्रमुखाला प्रश्न विचारणं. त्यासाठी अभ्यास हवा. धैर्य हवं. पर्सपेक्टिव  हवा. त्या व्यक्तीला उघडं पाडणं हा हेतू नसतो, व्यवस्था उघड करायची असते.
निक्सन उघडे पडले. वॉटरगेट प्रकरणात.
जॉर्ज बुशनी  कोणतीही विश्वास ठेवण्यालायक माहिती हाताशी नसताना इराकमधे संहारक शस्त्रं आहेत असं जाहीर केलं. खोटं बोलले. त्या माहितीची सबब वापरून त्यांनी इराकवर आक्रमण केलं.
 चर्चमधे अमानवी अत्याचार होतात. पोपना ते माहित असतं. पोप ती माहिती दडवून ठेवतात. पोप  गुन्हेगार प्रीस्टांना शिक्षा करत नाहीत, त्यांना कोर्टामधे जाण्यापासून वाचवतात. 
 हे सारं अमेरिकेतले पत्रकार उघडं पाडतात. त्या  विषयावर चित्रपट निघतात. चित्रपटांवर बंदी येत नाही, पुस्तकांवर बंदी येत नाही. BETRAYAl. CRISIS IN THE CHURCH हे पुस्तक ग्लोबनं प्रसिद्ध केलं. कॅथलिक बहुसंख्य असलेल्या अमेरिकेनं त्या पुस्तकावर  बंदी आणली नाही. अमेरिकन लोकानी संपादक, वार्ताहरांवर हल्ले केले नाहीत. पुलित्झर हे प्रतिष्ठित बक्षीस त्या पुस्तकाला मिळालं. त्या पुस्तकावर आधारलेल्या स्पॉटलाईट या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळालं.
भारतात धार्मिक कपडे घातलेली माणसं अत्याचार करतात, भ्रष्टाचार करतात. सरकार, सामाजिक संस्था, लष्कर, पोलिस, शिक्षणव्यवस्था, संसद, मंत्रीमंडळ यामधे भयानक गुन्हे करणारी माणसं सुखानं वावरत असतात.
चला. आपण बॉस्टन ग्लोबची, स्पॉटलाईटची वाट पाहूया.

।।