Browsed by
Month: August 2017

” बिघडत चाललेल्या ” समाजाला विचार करायला लावणारे निबंध

” बिघडत चाललेल्या ” समाजाला विचार करायला लावणारे निबंध

‘ अगेन्स्ट एवरीथिंग ‘ हा मार्क ग्रीफ यांचा ताजा निबंध संग्रह. संग्रहात मार्क ग्रीफ अमेरिकेच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण करतात. अमेरिकेतली माणसं खातात म्हणजे काय करतात, अमेरिकेतली माणसं संगित ऐकतात किंवा व्यायाम करतात म्हणजे काय करतात, अमेरिकेतल्या लोकांचं टीव्ही वाहिन्या पहाणं म्हणजे नेमकं काय असतं याचा विचार लेखक या पुस्तकात करतात. पुस्तकातले सर्वच्या सर्व संदर्भ अमेरिकेतले असल्यानं बिगर अमेरिकन वाचकाला संदर्भ विसरून पुस्तक वाचावं लागतं. तरीही अमेरिका समजायला पुस्तकाची मदत होते. अमेरिकेत जे घडतं ते कालांतरानं जगात, भारतात घडत असतं. त्यामुळं एका परीनं बिगर अमेरिकन समाजाला एक इशारा म्हणा, ताकीद म्हणा, हे पुस्तक देतं.

वानगीदाखल एक धडा. अगेन्स्ट एक्सरसाईझ. अमेरिकन माणसं खा खा खात सुटलीत. माध्यमांतून अन्न आणि त्याचे उपयोग यावर भरमसाठ मजकूर येतो त्यामुळं. खाण्यामुळं आनंद मिळतो असं लोकांना वाटतं. शिवाय शिडशिडीत रहाणं, स्मार्ट दिसणं म्हणजेच आरोग्य असंही माध्यमांनी लोकांच्या मनावर ठसवलंय. त्यामुळं माणसं खात सुटतात नंतर व्यायाम करायला जिममधे जातात. ज्या हालचाली घरी, खाजगीत, निवांतीनं करायच्या असतात त्या माणसं जिममधे करू लागतात. त्यासाठी अब्जावधी डॉलरची यंत्रं खपवली जातात. माणसं शिडशिडीत रहाण्यासाठी उपाशी राहून लुकडी होतात, रोगट होतात. नियमित, साधा आहार घेण्याऐवजी वचावचा आहार घेणं, दैनंदिन जीवनातल्या हालचाली केल्या तरी पुऱ्या असतात असं असताना त्या करायच्या नाहीत आणि मूर्खासारखं जीममधे जाऊन पैसे उडवायचे आणि कधी कधी मरायचंही. मार्क ग्रीफ या स्थितीवर प्रकाश टाकतो.

वानगीदाखल ‘ आफ्टरनून ऑफ दी सेक्स चिल्ड्रन ‘. अमेरिकेत तारूण्याचं उदात्तीकरण असं एक फॅड पसरलंय. तारूण्य म्हणजे चांगलं दिसणं, तारूण्य म्हणजे गोरं दिसणं, तारूण्य म्हणजे स्त्रीचे स्तन-कंबर इत्यादीचं मोजमाप, तारूण्य म्हणजे सेक्सानंद असं पसरवलं गेलंय. तारूण्यही मध्यम वयात नव्हे तर षोडशे वर्षे या वयाच्या एकदोन वर्ष अलिकडचं, तेही स्त्रीचं. या कल्पनेभोवती माध्यमं फिरत असतात आणि या कल्पनेभोवती जाहिरातीचं जग आणि तारूण्यटिकवी वस्तू-उपकरणं-प्रक्रिया उद्योग. माणसाच्या एकूण जगण्यात तारूण्य हा एक भाग असतो. प्रौढत्व, म्हातारपण, त्यातलं शहाणपण आणि समजूत हाही जगण्याचा महत्वाचा भाग असतो, हे आधुनिक माध्यमं आणि उद्योग विसरायला लावतात. ग्रीफ यावर विचार करायला लावतात.

या लेखात एके ठिकाणी लेखक म्हणतात सेक्समुक्ती नव्हे, सेक्सपासून मुक्ती हवीय. सेक्स जीवनाचं अविभाज्य आणि आवश्यक अंग आहे. परंतू सेक्स म्हणजेच सर्व काही या दिशेनं जग चाललंय त्यावर विचार करा असं लेखक म्हणतो.

वानगीदाखल ‘ रेडियोहेड ऑर दी फिलॉसफी ऑफ पॉप ‘. अमेरिकेत ब्ल्यूज, जॅझ, रॉक अशा संगिताच्या परंपरा आहेत. यात लोकगीतं लोकसंगितात गुंफली जातात आणि ती उघड्यावर ऐकवली जातात. बॉब डिलन हा एक मोठ्ठा कलाकार. अमेरिकेतलं लोकसंगित जन्मलं ते विद्रोहातून. काळे, गुलाम, कामगार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला या संगितातून वाचा फुटली. हे संगित अँटीएस्टाब्लिशमेंट  असतं. ते गोऱ्यांविरोधातही असतं आणि वियेतनाममधे विनाकारण मारल्या जाणाऱ्या लोकांच्या बाजूनंही असतं. मार्क ग्रीफ या निबंधात प्रश्न विचारतो की हे संगीत क्रांतीकारी आहे कां. हे संगीत काही नवं सांगतं का असं प्रश्न ग्रीफ विचारतो. उठाव करायला सांगणं वेगळं आणि क्रांती करणं वेगळं या बिंदूभोवती निबंध फिरतो.

‘ ऑक्टोमॉम अँड दी मार्केट इन बेबीज ‘ मथळ्याचा एक धडा आहे. नादिया सुलेमान नावाची एक स्त्री बाजाराच्या हिशोबात आपल्या गर्भाशयात बीजं पेरून घेते. आधीची सहा मुलं असताना ती एका डॉक्टरच्या हौसेवरून आणखी सहा बीजं पेरते. त्या पैकी एक बीज दुभागतं आणि त्यातून नादियाला आठ मुलं होतात. त्यातली तीन विकलांग असतात, बाकीचीही अशक्त असतात. मोठ्ठी बातमी होते. माध्यमात घनघोर चर्चा होते.

अमेरिकेत मिळवत्या नसलेल्या किंवा गरीब स्त्रीला मुलं झाली तर सरकार प्रत्येक मुलामागं काही पैसे देतं. जेवढी मुलं जास्त तेवढे पैसे जास्त. या मुद्दयावर लोक तुटून पडले. मुलं होऊ देणं हा बेजबाबदारपणा, ते जगण्याचं एक साधन, अमेरिकन जनतेवर त्याचा पडणारा बोजा या विषयावर चर्चा झाली. मुलं होऊ देणं, न होऊ देणं यावर अमेरिकेत दुफळी आहे. ती दुफळीही चर्चेत पडली. नादिया म्हणजे मुसलमान. नादिया म्हणजे आफ्रिकन. म्हणजे चर्चेला आणखी मुद्दे. गर्भाशयावर स्त्रीचा अधिकार असणं ही एक गोष्ट, ते एक  उत्पन्नाचं साधन असावं काय असा आणखी एक मुद्दा. बाप रे. अमेरिकेत काय काय चर्चा होतात, काय काय प्रश्न असतात.

लेखक या मुद्द्याला एक नवंच वळण देतो. नादिया अष्टपुत्राची  चर्चा झाली तेव्हा अमेरिकेत बाजार वितळला होता, आर्थिक संकट होतं. नादियाच्या मुद्द्याला आर्थिक संकटाचीही बाजू आहे असं लेखक म्हणतो. नादियावर चर्चा करताना माध्यमं आर्थिक संकटाचा मुद्दा बाजूला ठेवतात असं लेखक म्हणतो. माध्यमांना काहीही करून थरारक गोष्टी हव्या असतात, एकामागून एक. नादिया प्रकरण हे माध्यमांच्या थरारभुकेचाच एक भाग आहे असं लेखक सुचवतो.

पुस्तकाचा शेवट थोरो यांच्यावर आहे. थोरोनी निसर्गप्रेमी विचार मांडले, गरज आणि हव्यास यातला फरक सांगितला. अन्यायाविरोधात बंड करणं, त्यासाठी शांततेचा मार्गानं तुरुंगात जाणं थोरोनी शिकवलं. अमेरिकेत त्या काळात येऊ घातलेल्या आधुनिक औद्योगीक जगावर त्यांनी कोरडे ओढले. लेखक थोरोची आठवण काढतो, त्यावर विचार करा असं म्हणतो. ” मी मध्यमवर्गी आहे, मी  आजच्या वस्तूगंडाच्या जमान्यात वावरतो हे मला समजतंय. तरीही मला थोरोचं आकर्षण वाटतंय ” असा सूर लेखकानं पुस्तकात लावलाय.

लेखक अमेरिकन आहे, १९७५ मधे जन्मलाय. त्यानं हारवर्डमधून पीएचडी केलीय.

समाजाच्या विविध अंगांवर विचारमंथन घडवून आणण्याची परंपरा लेखक पुन्हा एकदा नव्यानं सुरु करतोय. विसाव्या शतकाच्या तिसऱ्या आणि सहाव्या दशकात विचारवंत, लेखक, चिंतक, पत्रकार, शैक्षणीक इत्यादी लोक गंभीर चर्चा आणि निबंध निर्माण होत असत. पार्टिझन रिव्ह्यू, दी नेशन अँड कॉमेंटरी, अशी नियतकालिकं गंभीर चर्चा घडवून आणत असत. लायनेल ट्रिलिंग नावाचा एक समीक्षक म्हणजे त्या काळातला एक दबदबा, टेरर होता. न्यॉ यार्क रिव्ह्यू ऑफ बुक्समधे त्याचे गंभीर निबंध प्रसिद्ध होत असत. त्याच्या दबदब्याची वूडी एलन जाम खिल्ली उडवत असे. आताशा अशी गंभीर चर्चा संपत चाललीय. उथळ टीव्ही चॅनेल्सनी चर्चेचा ताबा घेतला आहे. आता टीव्हीचर्चक, टीव्ही स्टार, टीव्हीविचारवंत निर्माण झाले आहेत. मोठमोठ्या कढयांमधून ते चॅनेलच्या गरजेनुसार ताजी ताजी विचारभजी तळत असतात. ही भजी अर्ध्या तासात निरुपयोगी ठरतात. ही भजी म्हणजे नुसतं पीठ, नुसतं तेल आणि नुसतं मीठ असतं.

मार्क ग्रीफनी एन प्लस वन नावाचं एक नियतकालिक चालवलंय. त्यात वरील प्रस्तुत पुस्तकात एकत्रित केलेले निबंध प्रसिद्ध झाले होते. इतरही अनेक तरूण विचारवंत त्यात लिहितात. या निबंधांची भाषा काहीशी जड असते. पारिभाषिक भाषिक शब्द जरा जास्तच वापरले जातात. माध्यमांतून जितक्या प्रासादिक पद्धतीनं विषय मांडले जातात त्यापेक्षा वेगळी काहीशी समजायला कठीण रचना या निबंधांत असते. गंभीर लिखाण कळायला कठीणच असावं अशी समजूत एकेकाळी होती. पण आता गंभीर विषयही समान्य माणसाला कळेल अशा भाषेत मांडले जातात. रिचर्ड डॉकिन्स जेनेटिक्सवर लिहितात, एटकिन्सन अर्थशास्त्रावर लिहितात, डॅनियल डेनेट तत्वज्ञानावर लिहितात, फ्रीमन डायसन जैविकशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयावर लिहितात. ते सामान्य माणसाला समजतं. मार्क ग्रीफ काहीसे जड आहेत.

।।

Against Everything

Mark Greif

Pantheon

 

 

मराठवाड्यात ७ दिवसांत ३४ शेतकरी आत्महत्या कां करतात?

मराठवाड्यात ७ दिवसांत ३४ शेतकरी आत्महत्या कां करतात?

मराठवाड्यात ११ ते १७ ऑगस्ट या ७ दिवसांत ३४ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र सरकार आपण शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचे आणि योजनांचे ढोल बडवत आहे. जलयुक्त शिवार काय, पीक विमा योजना काय, कर्जमुक्ती काय आणि कायन् काय. २०१४ साली भाजप आणि सेनेनं आधीच्या काँग्रेसनं महाराष्ट्र कुठं नेला होता त्याचा शोध घेऊन महाराष्ट्र पुन्हा वळणावर आणण्यासाठी सरकार स्थापन केलं. त्यालाही आता तीन वर्षं झालीत.

भाजपनं महाराष्ट्र कुठे नेलाय असं म्हणायची संधी काँग्रेसला मिळाली नव्हती कारण त्यांना स्वातंत्र्यानंतर सत्ता उपभोगण्याचा कायमचा परवाना मिळाला होता असं वाटत होतं. ती हुकलेली संधी आता त्यांना भाजपच्या सत्तेमुळं मिळणार आहे. पुढल्या दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत भाजप-सेनेची घोषणा काँग्रेस वापरणार हे नक्की.

सत्ता येतात, सत्ता जातात. शेतकऱ्यांची किवा असं म्हणूया की दुःखी लोकांची स्थिती बदलत नाही.

नेमकं काय घडलं आणि काय घडू शकतं याची एक झलक आत्महत्या घडत असतानाच झालेल्या दोन कार्यक्रमांतून मिळाली.

मराठी विज्ञान परिषदेनं १३ ऑगस्टला पाणी या विषयावर एक व्याख्यान कार्यक्रम घडवून आणला. कार्यक्रम नेमका, विषयाला घट्ट धरून होता. तीन मुख्य वक्ते  प्रत्येकी २५-३० मिनिटं बोलले. कार्यक्रमाचे अध्यक्ष परांजपे पाच मिनिटं बोलले. कार्यक्रमात मंचावर  हजर असलेले परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी एकच  मिनिट बोलले. अर्धा तास प्रश्नोत्तरं झाली. प्रश्न नेमके होते, प्रश्नाच्या आडून कोणी भाषणं ठोकली नाही. दोन तासात कार्यक्रम संपला.

कार्यक्रम  माहिती आणि ज्ञानानं भरलेला होता. कणभरही वायफळ गोष्टी नव्हत्या.  कोणाही वक्त्यानं चमकोपण केलं नाही. आरोप, प्रत्यारोप, चमकदार विधानं नव्हती.

धरणं या विषयावर बोलणारे दि. बा. मोरे हे एकेकाळी महाराष्ट्र सरकारात आधिकारी होते, ते इंजिनियर आहेत. त्यांनी धरण या विषयाचा इतिहास मांडला. धरणं आवश्यक आहेत, धरणं हीच आपली संस्कृती आहे, लहान मोठी धरणं हवीतच.   पाण्याचा न्याय्य वापर झाला पाहिजे आणि धरणग्रस्ताना न्याय मिळाला पाहिजे हे मुद्दे त्यांनी  मांडले.

मोरे यांनी मांडलेले मुद्दे असे. महाराष्ट्रात अनेक धरणं बांधून पाणी साठवण्यात आलं. परंतू धरणांची काळजी न घेतल्यानं धरणांची साठवण क्षमता कमी झाली आहे. लाभ क्षेत्रातल्या लोकांना न्याय मिळाला नाही, त्यांचं पुनर्वसन झालं नाही. धरणं बांधण्यातला भ्रष्टाचार, सिंचन क्षमतेची काळजी न घेणं. यामुळं धरणांबद्दल जनतेच्या मनात विनाकारण आक्षेप निर्माण झालेत. पाणी धरून ठेवणं, म्हणजेच धरण ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.

प्रदीप पुरंदरे, सिंचन या विषयाचे प्राध्यापक, जययुक्त शिवार या विषयावर बोलले. ही योजना काय आहे आणि तिचं काय झालंय हे त्यांनी आकडे, ग्राफ, चित्रं यांच्या सहाय्यानं सांगितलं. त्या सोबतच त्यांनी जलयुक्त शिवार ही उपकल्पना ज्या मुख्य कल्पनेचा भाग आहे ती जलसंधारण ही कल्पनाही समजून सांगितली.

पुरंदरे यांनी मांडलेले मुद्दे. प्रत्येक शेतकऱ्यानं शेतात खोलगट जागा शोधून, त्या जागेत पाणी येण्याचा ओहोळ, त्या जागेतून पाणी वाहून जाण्याचा ओहोळ शोधून, त्या जागेत खड्डा करून पाणी साठवणं ही जलयुक्त शिवाराची शास्त्रीय व्याख्या आहे. पावसाळ्यात पाणी साठवणं आणि मुरू देणं हा मुख्य उद्देश. पाणी वर्षभरासाठी साठवणं हा उद्देश नाही. मोठे तलाव करून आणि अस्तर घालून पाणी साठवणं म्हणजे पाण्याची वाफ करून ते वाया घालवणं होय. तसंच हे पाणी साठतं, मुरत नाही, त्यामुळं भूजलाचं पुनर्भरण होऊन ते पाणी वर्षभर वापरता येणं ही गोष्ट पाणी साठवण्यामुळं घडत नाही.

जलयुक्त शिवार ही जलसंधारण या मुख्य कल्पनेची उपकल्पना आहे. वाहणारं पाणी वेगानं वाहून जमिनीची धूप करतं. म्हणून ते वळणावळणानं वहाणं आवश्यक असतं, लांबलचक सरळ नाला काढणं अशास्त्रीय आहे. नाला खोल खणून खडकापर्यंत जाऊन भगर्भाच्या खडकव्यवस्थेत हस्तक्षेप करणं म्हणजे जमिनीचं कायमचं नुकसान करणं आहे. नाला खोल करणं म्हणजे आसपासची माती ढासळून नाल्यात पडून नाला बुजणं आणि ती माती वाहून जाणं होय म्हणून अती खोल करणं अशास्त्रीय आहे. नाल्याच्या आसपासची झाडं तोडून नाला रुंद करणं म्हणजे महाघोडचूक आहे कारण त्यामुळं जमिनीची धूप होते. वरील शास्त्रीय आवश्यकतांचं पालन न करता जलसंधारणाची कामं, जलयुक्त शिवार योजनांची कामं फार मोठ्या प्रमाणावर झाल्यानं फार मोठं नुकसान झालं आहे. माथा ते पायथा ही जलसंधारणाची शास्त्रीय कल्पना दूर सारून माथ्याकडं लक्ष न देता पायथ्याकडं लक्ष देण्यामुळंही फार नुकसान झालं आहे.

अमीर खान यांनी उभ्या केलेल्या पाणी फाऊंडेशन या संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते डॉ. पोळ यांनी त्यांच्या संस्थेच्या कामाची ओळख करून दिली. पाणी फाऊंडेशन पाणी साठवण्याचं-मुरवण्याचं तंत्रज्ञान व विज्ञान खेड्यातल्या लोकांपर्यंत   पोचवतं.  त्या ज्ञानाच्या आधारे गावकरी स्वतंत्रपणे जमिनीची बांधणी करत पाणी मुरवतात.

पोळ यांनी मांडलेले मुद्दे. पाणी डोंगरावरून उतारानं वहातं. उतार वरून खाली असतो तसाच बाजूला म्हणजे डावीकडं किंवा उजवीकडंही असतो. नेमका उतार शोधून बांध बांधावा लागतो, ताल घालावी लागते किंवा खड्डा करावा लागतो. शोष खड्डे करावे लागतात त्याचीही खोली नेमकी असावी लागते. रोपं लावतांनाही नेमक्या खोलीचे खड्डे करावे लागतात. संधारणाची कामं  करण्यासाठी उपकरणं वापरावी लागतात. संधारणाच्या कामातलं विज्ञान, उपकरणांचा वापर लोकांना कळला तर योजना अमलात आणणं शक्य होतं. पाणी फाऊंडेशन लोकांपर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान आणि उपकरणं पोचवतं. प्रशिक्षण घेतलेली माणसं जलसंधारणाच्या योजना आपल्या आपण पार पाडतात, पार पडणाऱ्या योजनांना पाणी फाऊंडेशन बक्षिसं देतं.

महाराष्ट्रात धरण बांधली गेली परंतू सिंचनाची व्यवस्था सदोष राहिल्यानं साचवलेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर होत नाही, धरणं बहुतांशी निकामी होत आहेत. पैसे खूप खर्च झाले, होतील, पण कालांतरानं ते वाया जातात असं मोरे यांच्या भाषणातून समजलं. त्यांचं भाषण ऐकताना आपण एक शास्त्रीय भाषण ऐकतोय, राजकीय नव्हे हे जाणवलं.  समारोपात ते म्हणाले की पाणी आलं म्हणजे सगळं काही झालं असं होत नाही. पाणी मिळाल्यानंतर पिकं, त्यांना भाव इत्यादी गोष्टीही तितक्याच महत्वाच्या असतात, सामाजिक न्यायही महत्वाचा असतो हे त्यांनी मोजक्या शब्दात सांगितलं.

धरण बाधणं असो, कालवे काढणं असो, वितरिका तयार करणं असो. पाणी साठवण्यासाठी माथा ते पायथा कल्पना असो की शेततळ्याचा जलयुक्त शिवार कार्यक्रम असो. तंत्र, विज्ञान जाणणारे व्यावसायिक योजना आखतात. त्या योजना अमलात आणण्याची जबाबदारी सरकार घेतं. योजना फेल जातात. लोकांना सुख लाभत नाही, दुःखच वाढतं, आत्महत्या होतात.

योजना लोकांपर्यंत पोचत नाहीत, लोकांना विज्ञान आणि तांत्रिक कौशल्य मिळत नाहीत हे योजनांच्या अपयशाचं एक कारण. पाणी फाऊडेशन ती त्रुटी भरून काढत आहे.

योजनांतलं तंत्र आणि विज्ञान समजणं ही एक गोष्ट. परंतू मुळात योजना समजणं, त्या योजनेत नाना कागदं भरून भाग घेणं, संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना योजनांचा अमल करण्यासाठी भाग पाडणं हेही काम होणं महत्वाचं असतं. सरकारी यंत्रणा भ्रष्ट झाल्यानं  योजना अमलात येत नाहीत. अमल होण्यासाठी आवश्यक दबाव तयार करण्याचं मानस आणि शक्ती राजकीय पक्षांकडं उरलेली नाही. कार्यकर्ते चोर झाले आहेत. निवडणुका जिंकणं, त्यासाठी जातींचा-धर्माचा-पैशाचा खेळ करणं येवढाच उद्योग राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करत असतात. राजकारण हा त्यांचा व्यवसाय झाला आहे. राजकारणातल्या या अवस्थेला अपवाद आहेत सांगोला मतदार संघातून १९६२ पासून निवडून येणारे आमदार गणपतराव देशमुख.

मविपनं घेतलेल्या चर्चेनंतर दुसऱ्याच दिवशी एबीपी माझा या वाहिनीनं नव्वदी पार केलेल्या आमदार गणपतराव देशमुख यांची एक दीर्घ मुलाखत घेतली. नव्वदी ओलांडलेले गणपतराव  वर्षातून किमान दोन वेळा मतदार संघातल्या प्रत्येक गावात जातात. आपल्या मतदार संघातल्या लोकांचं सुख हा त्यांचा अग्रक्रम.

मतदार संघात फिरून ते काय करतात? सरकारनं आखलेल्या कल्याणकारी योजना ते मतदारांना समजून सांगतात. नंतर त्या योजनांचा फायदा लोकांना मिळेल यासाठी ते खटपट करतात. योजना आली की संबंधित माणसांना अर्ज करायला शिकवतात, अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडं पोचवतात, अर्ज पुढे जातो याची काळजी घेतात. सतत पाठपुरावा झाल्यानं योजना अमलात येऊन लोकांचं कल्याण होतं. १९६२ नंतर महाराष्ट्रात, काँग्रेस, पुलोद आणि भाजप आघाडी अशी सरकारं आली. सरकारं कोणतीही असोत शेका पक्षाच्या तिकिटावर निवडून येणाऱ्या गणपतरावांनी सरकारी योजनांचा फायदा लोकांपर्यंत पोचवला.

देशाचा विकास का होत नाही आणि कसा शक्य आहे ते  मविपनं पार पाडलेला कार्यक्रम आणि एबीपी माझावरची मुलाखत यामधून समजलं.

मोरे, पुरंदरे हे जाणकार तंत्रज्ञ. पाणी फाऊंडेशन आणि गणपतराव देशमुख हे कार्यक्रम अमलात आणणारे घटक. त्यांना एकत्र आणणारी मराठी विज्ञान परिषद आणि एबीपी माझा. हे बिंदू जोडले तर विकासाचं चित्र रेखाटता येतं.

।।

सिनेमा शैलीच्या पत्रकारीची जन्मदाती पत्रकार. लिलियन रॉस,

सिनेमा शैलीच्या पत्रकारीची जन्मदाती पत्रकार. लिलियन रॉस,

लिलियन रॉस या बातमीदार महिलेचं रिपोर्टिंग ऑलवेज हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालंय. रॉसनी १९४५ च्या २१ जुलैच्या न्यू यॉर्कर या साप्ताहिकाच्या अंकात टॉक ऑफ टाऊन या सदरासाठी पहिला मजकूर लिहिला. न्यू यॉर्करमधे येणाऱ्या माणसांना भेटून छोटी टिपणं, वृत्तांत, फीचर्स त्या लिहीत. २०११ साली त्यांनी त्याच सदरात इराक या विषयावर बंगाल टायगर अट द बगदाद झू या शीर्षकाचा शेवटला मजकूर लिहिला. १९२६ साली जन्मलेल्या लिलियन रॉस आता  सक्रीय पत्रकार नाहीत. मुलाखती देतात, गप्पा मारतात, त्यांच्या मागल्या लेखांचे संग्रह प्रसिद्ध करतात. केस पूर्ण पांढरे झालेत तरी त्यांच्या डोळ्यातली आणि व्यक्तिमत्वातली मिस्किली आणि कधीही न संपणारी उत्सुकता शिल्लक आहे. अजूनही त्या न्यू यॉर्कर वाचतात, त्यातल्या तरूण पत्रकारांनी लिहिलेला मजकूर वाचतात,   फोन करून त्यांना प्रोत्साहन देतात, कधी कधी कान उघाडणीही करतात. लिलियन रॉस यांचा फोन आला की पत्रकारांना धन्य वाटतं.

लिलियन रॉस यांनी पत्रकारीमधे एक स्वतंत्र प्रांत निर्माण केला. सिनेमॅटिक पत्रकारी असं नाव या पत्रकारीला ठेवता येईल. जे डोळ्याला दिसतं ते लिहायचं. जे कानावर पडतं ते लिहायचं. सिनेमात दृश्यांचे तुकडे एकाला एक जोडून चित्रपट तयार होतो. लिलियन रॉस यांचे लेख, वृत्तांत अनेक दृश्य तुकड्यांचा एक माहितीपट असतात. रॉस यांना दिसत असतं, जे ऐकू येत असतं ते त्यांच्या लेखनात येतं.

प्रस्तुत पुस्तकात अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्यावर एक लेख आहे. हेमिंग्वे क्यूबातल्या आपल्या घरून इटालीत व्हेनिसला जात असताना वाटेत न्यू यॉर्कला तीन दिवस थांबतात. रॉस  त्यांना विमानतळावर भेटतात, तीन दिवस त्यांच्या सोबत हिंडतात. हेमिंग्वे दुकानांत जाऊन कपडे विकत घेतात, चष्मा नीट करून घेतात. रॉस त्यांच्या सोबत असतात.  हेमिंग्वेंची मैत्रिण म्हणजे त्या काळात गाजलेली नटी मार्लिन डिट्रीच. डिट्रीचच्या प्रेमातच असतात हेमिंग्वे. डिट्रीच मुद्दाम हेमिंग्वे भेटायला येते. कित्येक तास ती दोघं  एकत्र असतात. रॉस ते सगळे क्षण तिथं हजर असतात. हेमिंग्वे गप्पा मारतांना समीक्षकांना झोडतात, त्याना साहित्यातलं काहीही समजत नाही असं सविस्तर बोलतात. तेही रॉस टिपतात. विमान तळावर उतरता उतरता हेमिंग्वे दारू प्यायला सुरवात करतात. आपल्याला न्यू यॉर्कर आवडत नाही, ते संस्कृती नसलेलं शहर आहे असं हेमिंग्वे धावपट्टीवर उतरता उतरता बोलून जातात.पुढले तीन दिवस झोपण्याचे तास सोडले तर हेमिंग्वे सतत दारू पीत असतात.

हेमिंग्वेंच्या सोबत त्यांची पत्नी असते. पत्नीसमोरच हेमिंग्वे आपण डिट्रिच किंवा इन्ग्रीड बर्गमन यांच्यावर कसं प्रेम करत होतो, त्यांच्याशी लग्न कसं करू इच्छित होतो ते सांगतात. डिट्रीचलाही ते सांगतात की इन्ग्रीडबरोबर आपलं लग्न झालं नाही याची हळहळ आपल्याला आहे.

हे सारं सारं लिलियन रॉस आपल्या १३ हजार शब्दाच्या लेखात, न्यू यॉर्करमधे मांडतात. गंमत म्हणजे इतका मोठा लेख न्यू यॉर्करमधे प्रसिद्ध होतो आणि लोकांनाही असले लांबलचक लेख वाचायला आवडतात.

हेमिंग्वे जसे होते तसे या लेखात दिसले.  अमेरिकन मूल्यांना काळीमा फासणारा अशी टीका हेमिंग्वे यांच्यावर झाली. हेमिंग्वे यांचे भक्त म्हणाले की हेमिंग्वे यांना बदनाम करण्यासाठीच मुद्दाम सुपारी घेऊन हा लेख लिहिला गेला होता.

रॉसनी लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी हेमिंग्वेना दाखवला होता. लेख वाचल्यावर आणि प्रसिद्ध झाल्यावर हेमिंग्वे यानी रॉसचं कौतुक केलं. हेमिंग्वे रॉसना डॉटर, म्हणजे आपली मुलगी असं संबोधत.न्यू यॉर्करच्या सर्व गाळण्या आणि कसोट्या पार पडल्यानंतरच लेख प्रसिद्ध झाला होता.

एक लेख आहे न्यू यॉर्कपासून साताठशे मैल दूरवरून आलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या न्यू यॉर्क सहलीवर. ही मुलं आणि त्यांचे शिक्षक कधीही आपल्या गावाच्या वीसेक मैलाच्या परिघाबाहेर गेलेले नसतात. न्यू यार्कमधल्या गगनचुंबी इमारती, तिथली महाग आणि विशाल रेस्टॉरंट्स, मेट्रो ट्रेन, रस्त्यावरची गर्दी, चोविस तास गडबड, नागरिकांचं कायम स्वतःत मग्न असणं इत्यादी गोष्टीवर मुलांच्या प्रतिक्रिया लेखात वाचायला मिळतात.

अमेरिकेत सौंदर्य स्पर्धा भरतात. या स्पर्धेत भाग घ्यायला निघालेली एक गरीब मध्यमवर्गीय मुलगी रॉसनी हेरली. ती, तिचा प्रियकर यांच्यासह रॉस स्पर्धेच्या जागेपर्यंत प्रवास करत गेल्या, त्या मुलीच्या कारमधून. स्पर्धेत रजिस्ट्रेशन होतं तिथपासून ते निकाल लागेपर्यंतची पूर्ण प्रक्रिया रॉसनी पाहिली, अनुभवली. या प्रक्रियेतल्या प्रत्येक महत्वाच्या माणसाला त्या भेटल्या, मुलाखती घेतल्या. त्या मुलीचा प्रियकर तिला प्रथम पासूनच सांगत असतो की तू स्पर्धा हरणार आहेस. पण या मुलीनं आधी स्थानिक स्पर्धेत बक्षीसं मिळवलेली असल्यानं तिला आशा होती. स्पर्धा जिंकली तर मिळणाऱ्या बक्षिसातून पुढं कॉलेजातलं शिक्षण करायचं, आपली स्थिती सुधारायची असं तिच्या डोक्यात होतं. मुलगी स्पर्धा हरते.

स्पर्धेच्या ठिकाणी येणाऱ्या सुंदऱ्या काय प्रकारच्या असतात त्याचं वर्णन लेखात वाचायला मिळतं. चार पैसे जास्त असणाऱ्या आणि समाजाच्या बऱ्या वर्गातून आलेल्या मुली स्पर्धेत कसं शाईन मारत फिरत असतात, इतर मुलींना कमी लेखून त्यांचा आत्मविश्वास घालवण्याचा प्रयत्न कसा करतात याचं चित्रण या लेखात आहे. अमेरिकन समाजाचा एक पदर या लेखात वाचकाला समजतो.

स्पर्धक मुलगी घरून निघते ते स्पर्धा आटोपून घरी परत येते हा सगळा घटनाक्रम पत्रकारानं अनुभवणं ही पत्रकारी शैली रॉसनी विकसित केली.

लिलियन रॉस टेप रेकॉर्डर बाळगत नसत. यंत्रं वापरलं की मजकूर शोषून घेण्याची क्षमता कमी होते असं त्यांना वाटे. कानावर पडणाऱ्या गोष्टी नीट लक्ष देऊन, लक्ष केंद्रित करून ऐकणं आणि जागच्या जागी टिपणं घेणं ही पद्धत त्यांनी अवलंबली. त्या कॅमेराही बाळगत नसत. त्यांच्या बद्दल सहकारी आणि संपादक म्हणत की लिलियन रॉस म्हणजेच एक कॅमेरा आणि टेप रेकॉर्डर आहे.

रॉस यांनी १५ पुस्तकं लिहिलीत. त्यातली बरीच पुस्तकं त्यांच्या न्यू यॉर्करमधील लेखांचे संग्रह आहेत. त्यांनी स्वतंत्रणे एक कादंबरी आणि एक कथासंग्रह प्रसिद्ध केलाय. जॉन ह्यूस्टननं दी रेड बॅज ऑफ करेज नावाची एक फिल्म केली. ही फिल्म दिद्गर्शकाच्या डोक्यात आकार घ्यायला लागली तेव्हांपासून तर ती सिनेमाघरात पोचेपर्यंत अनेक कारणांसाठी गाजली. लिलियन रॉस दिद्गर्शकाला भेटल्या, नटांना भेटल्या, चित्रणाच्या वेळी हजर राहिल्या, संकलन प्रक्रिया पाहिली. पाच भागात त्यांनी सिनेमा निर्मितीचा वृत्तांत सिनेमासारखाच लिहिला. तो कादंबरीसारखा उलगडत गेला. हे वृत्तांत न्यू यॉर्करनं छापले आणि नंतर त्याचं पुस्तक झालं. पत्रकारी आणि साहित्य यांच्या सीमारेषेवर असलेला हा मजकूर अमेरिकेत आणि जगात शैलीचा एक वस्तुपाठ म्हणून पाहिला जातो.

आज लिलियन मॅनहॅटनमधे रहातात. वय आहे ९१. लोक त्यांना विचारतात की त्या पत्रकार कशा काय झाल्या. रॉस म्हणतात की पत्रकार होणं वगैरे त्यांनी ठरवलंच नव्हतं. त्या शाळेत असताना एकदा वर्गातल्या बाईनी त्याना निबंध लिहायला सांगितला. विषय होता पुस्तकालय. रॉसनी निबंधाची पहिली ओळ अशी लिहिली- जड पुस्तकं, जाड पुस्तकं, किडकिडीत पुस्तकं, नवी पुस्तकं, जुनी पुस्तकं… बाईंनी बहुदा रॉसना मार्क दिले नसतील.  बाई म्हणाल्या असतील. ‘ हा काय निबंध झाला? पुस्तकालयावर लिहायचं म्हणजे ‘ पुस्तकं म्हणजे ज्ञानाचे भांडार, पुस्तकं म्हणजे प्रकाश, पुस्तकं म्हणजे देवानं पाठवलेला संदेश, पुस्तकं म्हणजे जगण्याचं मार्गदर्शन.. वगैरे वगैरे..’

वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी म्हणजे १९४४ साली त्या एका राजकीय साप्ताहिकात उमेदवारी करत होत्या. त्यांच्या संपादकबाईना न्यू यॉर्करचे संपादक विल्यम शॉन यांनी बातमीदार म्हणून बोलावलं. संपादकबाईना आपलं संपादक पद सोडायचं नव्हतं. त्यांनी लिलियन रॉसना न्यू यॉर्करमधे पाठवलं. तो दुसरा महायुद्धाचा काळ होता. पुरुष बातमीदार युद्धावर लिहिण्यासाठी युरोपात गेले होते. स्थानिक बातमीदारांची टंचाई होती. लिलियन रॉसना शॉननी  टॉक ऑफ टाऊन या सदरात लिहिण्यासाठी नेमलं. त्या काळात पुरुष बातमीदारापेक्षा स्त्री बातमीदाराला कमी पैसे दिले जात. रॉस यांना पैशाचं वेड नव्हतं. त्यांना लिहायचं होतं. त्या न्यू यॉर्करमधे चिकटल्या.

रॉस यांचे वृत्तांत म्हणजे एक गोष्ट असते. त्या गोष्टीला, कथेला, एक प्रवाह असतो, एक वेग असतो. न्यू यॉर्कच्या शाळेत मुली गोळा होतात तिथून गोष्टीला सुरवात होते आणि शाळा संपल्यानंतर मुली घराकडं किवा आणखी कुठं तरी परततात तेव्हां गोष्ट संपते. मुलींचं बोलणं जसजसं पुढं सरकत जातं तसतसं गोष्ट वेग घेते, वाचकांची उत्कंठा वाढत जाते. आई बाप या नात्यानं वाचकांनी आपल्या मुलांना जसं पाहिलेलं असतं त्या पेक्षा या मुली कायच्या काय वेगळ्या आहेत हे आईबाप वाचकांना कथेत कळू लागतं. त्यांच्या जीवनातलं सेक्सचं, चैनीचं, वस्तूंचं स्थान वाचकाला अस्वस्थ करत जातं. जीवनाकडं ही मुलं किती कॅज्यूअली पहातात ते कळतं. शिक्षण वगैरे गोष्टींचा त्यांच्यावर काहीही प्रभाव नसतो हेही आपल्याला या गोष्टीतून कळतं.

रॉस यांची गोष्ट पत्रकारी शैलीतून वाचकांसमोर येतो. त्यातली माणसं खरीखुरी असतात, घटना खऱ्या असतात, त्यात कल्पना वगैरे गोष्टी तिळमात्र नसतात. पण खुबी अशी की घटना आणि पात्रं कादंबरीसारखी कल्पित वाटू लागतात, महाकथेसारखी बोलू लागतात. न्यू यॉर्क ऐवजी दुसरं शहर कल्पा. काळ १९५० च्या ऐवजी १७५० कल्पा. अमेरिकेऐवजी दुसरा एकादा देश कल्पा. स्थळ, काळ, संस्कृती इत्यादी घटकांच्या पलिकडं जाऊन काही तरी वाचकाला समजतं. बरं गंमत अशी की यावर वाद घालायची आवश्यकता नाही. असं आमच्या देशात होत नाही, असं पूर्वीच्या काळात होत नव्हतं वगैरे म्हणायचं असेल तर म्हणा बापडे. रॉस बाईचं यावर काहीच म्हणणं नाही. त्या म्हणतात ” मी कुठं काय म्हणतेय. मी तर न्यू यॉर्कमधे जे पाहिलं तेच सांगतेय.”

रॉस यांच्या लेखणीतून उतरलेली शैली आता त्यांची शैली राहिलेली नाही. अतुल गावंडे हे व्यवसायानं डॉक्टर असलेले गृहस्थ न्यू यॉर्करमधे आरोग्य, उपचार, चिकित्सा इत्यादी गोष्टी वृत्तांतांमधे मांडतात. अमेरिकेत माणसं भरमसाठ औषधं विनाकारण घेतो. चार वर्षं सुखानं जगून मरू शकणारा माणूस हॉस्पिटलं आणि वेदनामय उपचार करून घेत घेत चार वर्षंच जगतो हे गावंडे यांच्या लेखातून कळतं. रोगी, माणूस मधोमध ठेवून गावंडे गोष्टी लिहितात. खऱ्याखुऱ्या.

पीटर हेसलर हा गडी २००० साली न्यू यॉर्करमधे दाखल झाला. तो चीनमधून आणि आताशा कैरोमधून वार्तापत्रं लिहितो. चीनच्या गल्लोगल्ली फिरतो, तिथल्या माणसांचं जगणं पहातो, त्यावर लिहितो. कॅथरीन बू ही अभ्यासू पत्रकार अमेरिकेतल्या गरीब वस्तीत जाते, तिथं रहाते, तिथल्या माणसांचं जगणं पहाते, अभ्यास करते आणि वृत्तांत लिहिते. कॅथरीनचं ब्युटिफूल फॉरएव्हर्स हे मुंबईतल्या झोपडपट्टीवरचं पुस्तक सध्या गाजतंय. अख्ख्या पुस्तकात मी असा शब्द एकदाही येत नाही. जॉर्ज ऑरवेलनं रोड टु विगन पियर नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. विगनच्या परिसरातल्या गिरण्यामधे काम करणाऱ्या, त्या विभागातल्या कामगारांच्या जगण्याचा वृत्तांत ऑरवेलनी लिहिलाय. साहित्य-पत्रकारीतेच्या सीमारेषेवरचं हे पुस्तकही जगाच्या सडकेवरचा एक मैलाचा दगड मानला जातो. कॅथरीनच्या पुस्तकाची तुलना ऑरवेलच्या पुस्तकाशी केली जातेय.

ऑरवेल, कॅथरीन बू यांच्या शैलीला आज शोधपत्रकारी शैली असं लेबल लावण्यात येतं. ऑरवेलचं रोड टु विगन पियर हे पुस्तक १९३७ साली प्रसिद्ध झालं, ब्रीटनमधे. लिलियन रॉस याचं लिखाण १९४५ नंतर सुरु झालं. अमेरिकेमधे.

तर अशा या लिलियन रॉस. साहित्यिक शैलीच्या पत्रकार. सिनेमासारखं लिहिणाऱ्या पत्रकार. त्यांचा वारसा आता न्यू यॉर्करनं पुढं चालवला आहे आणि रॉस आज नव्वदीच्या पलीकडं जाऊनही तो वारसा चालवणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत.

।।

 

 

लेखक घडवणारा संपादक मॅक्सवेल पर्किन्स

लेखक घडवणारा संपादक मॅक्सवेल पर्किन्स

मौज प्रकाशनाचे संपादक  श्रीपु भागवत यांचा अभ्यास करत असतांना मी लेखक मिलिंद बोकिल यांची भेट घेतली. त्या वेळी  मी पर्किन्स यांचं चरित्र वाचत होतो, त्यांच्यावर केलेली फिल्म पहात होतो. तसा उल्लेख केल्यावर बोकिल म्हणाले की त्यांच्या श्रीपुंच्या झालेल्या अनेक भेटींमधे श्रीपु पर्किन्स यांचा उल्लेख करत असत. श्रीपु पर्किन्सनं प्रभावित झाले होते असं बोकिल म्हणाले.

।।

मेडलिन बॉईड एक कागदांचं बाड घेऊन मॅक्स पर्किन्सकडं पोचल्या. मॅक्स पर्किन्स हे स्क्रिबनर या न्यू यॉर्कमधील प्रकाशनामधले एक संपादक होते. म्हणाल्या की हा लेखक चांगला आहे. छापा. तुमची इच्छा असेल तर कॉपी पाठवते. मॅक्स म्हणाले, पाठवा. मेडलिन म्हणाल्या अहो कॉपी हवी असेल तर एक ट्रक पाठवावा लागेल.

दुसऱ्या दिवशी कॉपी पोचली. 1200 कागद होते. सुमारे 3 लाख शब्द होते.

थॉमस वुल्फ या लेखकाची ही पहिलीच कादंबरी होती. तिच्या लांबीमुळं अनेक प्रकाशकांनी ती नाकारली होती. टेबलावर पोचल्या पोचल्या मॅक्सनी मजकुर वाचायला सुरवात केली आणि दोनच दिवसात मेडलीनला सांगितलं की वुल्फला   बोलावून घ्या.

एके दिवशी साडेसहा फूट चार इंची  वुल्फ मॅक्सच्या दारात उभा झाला.

अस्ताव्यस्त कपडे. टाय ओघळलेला. केस अस्ताव्यस्त. वुल्फ मॅक्ससमोर बसला. आपलं आपणच न विचारता बोलू लागला की मला माहित आहे की तुम्ही माझी कादंबरी छापणार नाही आहात. सारी दुनिया मला नाकारतेय. जाम आरडाओरड केली. ऑफिसमधले इतर लोक आश्चर्यानं पहात होते. मॅक्स गप्प. वुल्फ उठला ओरडा करत बाहेर जायला निघाला.

तुमची कादंबरी छापायचा निर्णय झालाय. मॅक्स थंडपणे आवाजात चढउतार न करता बोलला.

वुल्फ थबकला.

काय म्हणालात असं विचारत मागं फिरला.

हां. मी आता जे बोललोय तेच पुन्हा सांगेन. मॅक्स म्हणाले.

मॅक्सनं एक पत्र आणि त्याबरोबर एक चेक वुल्फच्या हातात ठेवला.

वुल्फ उडालाच. खोलीच्या बाहेर जाऊन छप्पर भेदेल अशा आवाजात ओरडला. तसाच बेभान अवस्थेत रस्त्यावर आला. गाडीखाली येता येता वाचला. माझी कादंबरी प्रसिद्ध होणार असं ओरडत, हातातला लिफाफा नाचवत रस्ताभर फिरला.

कादंबरी म्हणजे वुल्फचं आत्मकथन होतं. अशविल या गावात वुल्फ वाढला होता. गावाचा परिसर, गावातली माणसं, आई वडील, भावंडं इत्यादी माणसं वुल्फनं नावं बदलून कादंबरीतली पात्रं केली होती.

मॅक्सनी पूर्ण मजकूर वाचला होता. दिवसभर, घरी परतताना ट्रेनमधे, घरी, घरातून ऑफिसमधे येताना.मॅक्सनी वुल्फची चौकशी केली. त्याला रहायला जागा नव्हती. मॅक्सनी त्याला एक अपार्टमेंट भाड्यानं घेऊन दिलं आणि चरितार्थ चालावा यासाठी अनामत रकमेचा चेक दिला. वुल्फ दररोज दुपारनंतर मॅक्सच्या टेबलापाशी पोचत असे. रात्री उशीरापर्यंत बसून मजकुराची चर्चा करत असे. खडाजंगी होत असे.

मॅक्सनी अगदी सुरवातीलाच सांगून टाकलं की कादंबरी उत्तम आहे परंतू तिच्यावर खूप काम करावं लागेल, खूप मजकूर कापावा लागेल. वुल्फ भडकला. नकार दिला. मॅक्स त्याला समजून सांगत. मग नाईलाजानं तो मजकूर कापायला परवानगी देई.

पुस्तकाच्या सुरवातीलाच नायकाच्या वडिलांच्या लहानपणाची गोष्ट होती. मॅक्स म्हणाले की ते  काही हजार शब्दांचं वर्णन कापावं लागेल. वुल्फ तयार नव्हता. मॅक्स म्हणाले की नायकाच्या डोळ्यातून कादंबरी व्यक्त झालीय. त्याचे अनुभव हे कादंबरीचं मुख्य सूत्र आहे. त्याचे वडील लहानपणी कसे होते वगैरे गोष्टी ऐकीव असल्यानं त्या नायकाच्या अनुभवाच्या नाहीत. सबब तो मजकूर कटाप.  वुल्फ म्हणाला  एक अक्षरही कापायचं  नाही.  मॅक्सनं त्याला थंडपणे सांगितलं की कादंबरी चांगली व्हायची असेल तर हा निरुपयोगी भाग काढावा लागेल. हज्जारो शब्द कापले गेले.

कादंबरीत एक प्रसंगात दोन तरुणांची भेट, त्यांची मारामारी इत्यादी दाखवलं होतं. मॅक्स म्हणाले ते कापायला हवं. वुल्फ म्हणाला की त्या प्रसंगावरून ते गाव कसं आहे ते दिसतं. मॅक्स म्हणाला ते सिद्ध करण्याची आवश्यकता नाही ते इतरत्र इतर प्रसंगांमधून सिद्द झालंय.

कादंबरीत नायकाची मावशी, भावंडं इत्यादी व्यक्तिचित्र रंगवणारे प्रसंग होते. मॅक्स म्हणाला की ते प्रसंग स्वतंत्रपणे चांगले आहेत, तिथली भाषाही उत्तम आहे. पण त्यामुळं नायकाबद्दलची समजूत अधिक विकसित व्हायला मदत होत नाही, ते भरताड आहे.

कादंबरीमधे अनेक ठिकाणी वुल्फनं त्या काळच्या (कादंबरीतल्या नव्हे तर ज्या काळात कादंबरी प्रसिद्ध व्हायची होती त्या  काळातल्या) स्थितीवर टिप्पण्या केल्या होत्या. मॅक्स म्हणाले की कादंबरीचा काळ काही वर्षांपूर्वीचा आहे, लेखकानं विद्यमान काळ त्यात घुसवून आपले विचार घुसडता कामा नयेत.

वुल्फनं लिहिलेलं हस्तलिखित मॅक्सच्या ऑफिसात टाईप होत होतं आणि त्याच वेळी दोघं जण हस्तलिखित वाचत होते. लाल पेन्सिल झिजत होती.

एकदा दैनंदिन चर्चा आणि वाद झाल्यानंतर वुल्फ म्हणाला की चल मी कुठं बसून कादंबरी लिहीलीय ती जागा दाखवतो.

दोघे जण ब्रुकलिन हाईट्स या विभागातल्या एका घराच्या दारात पोचले.   घराला कुलुप होतं. कारण तिथं आता नवे भाडेकरू रहात होते.दोघांनी मागल्या बाजूनं खिडकी तोडून घरात प्रवेश केला आणि दिवाणखान्यात बसले. तिथं एक फ्रीज होता. वुल्फ म्हणाला की या फ्रीजवर कागद ठेवून मी लिहीत असे. त्या फ्रीजजवळ खुर्च्या ठेवून दोघं जण पीत बसले.

काही वेळानं मालक जोडपं आले. दोन उपटसुंभ दारू पीत बसलेत असं पाहिल्यावर त्यांनी पोलिसांना फोन केला. मॅक्सनं मालकाला समजावलं.  आम्ही सभ्य माणसं आहोत, हा एक लेखक आहे, तो आपल्या पूर्वायुष्याबद्दल बोलतोय वगैरे. वुल्फ हा लेखक आहे आणि मॅक्स हा स्क्रिबनर या प्रकाशनातला एक संपादक आहे असं कळल्यावर तो निवळला. नव्हे खुष झाला. मग वुल्फ खुलला. त्यानं आपल्या भणंग जीवनातले किस्से सांगायला सुरवात केली. घरमालकही मैफलीत सामिल झाला. यथावकाश पोलिस आले. घरमालकानं पोलिसांना सांगितलं की चुकीच्या  समजुतीनं फोन केलाय, सॉरी. पोलिस गेले. मग ही मंडळी पहाटेपर्यंत पीत बसली.

काही दिवसांनी वुल्फ हस्तिलिखिताचा एक गठ्ठा घेऊन आला. तीस हजार शब्द होते. वरील प्रसंगाचं वर्णन वुल्फनं त्या पानांत केलं होतं आणि ती पानं कादंबरीत घालायची असं म्हणत होतं. मॅक्सनं कपाळाला हात लावला. आधीच कादंबरी जडजंबाळ. तीन साडेतीन लाख शब्दांपैकी लाखभर शब्द मॅक्सनं कापले होते. त्यात हा गडी आणि काही हजार शब्द घुसवू पहात होता.

वर्षभराच्या खटपटीनंतर सुमारे ९० हजार शब्द कापून झाल्यावर, असंख्य तास भांडणात आणि तितकेच तास दोघांनी भरपूर दारूच्या सान्निध्यात काढल्यानंतर लुक होमवर्ड, एंजल ही कादंबरी प्रसिद्ध झाली. या एकाच कादंबरीनं वुल्फला अमेरिकेतला श्रेष्ठ कादंबरीकार केलं.

वुल्फ त्याच्या दुप्पट वयाच्या स्त्रीच्या प्रेमात पडला. ती तऱ्हेवाईक होती. भांडायची. तिची मानसीक प्रकृती बिघडायची, तिला हॉस्पिटलात ठेवावं लागे. तो खर्च. तिचे उपचार, तिच्याशी झालेले संघर्ष याचं चित्रण वुल्फनं कादंबरीत केलं. त्यावरूनही ती भांडली. ती वुल्फशी भांडायची आणि मॅक्सशीही. एकदा तर ती पिस्तूल घेऊन मॅक्ससमोर बसली आणि म्हणाली की आत्महत्या, वुल्फचा खून किंवा मॅक्सचा खून यातला एक पर्याय निवडायचा होता. आत्महत्येचे प्रयत्न तिनं स्वतंत्रपणे केले होते.

मॅक्सनं तिला सांभाळून घेतलं.

वुल्फ खर्चिक माणूस. दारूला सुमार नाही. पॅरिसला जाई. लंडनला जाई. तिथं हॉटेलात उतरे. बेसुमार खर्च होई. त्याला सारखे पैसे हवे असत. लेखनाशिवाय उत्पन्नाचं दुसरं साधन नव्हतं.  मॅक्स त्याच्या कथा मासिकात छापे, त्याचे भरपूर पैसे मिळत. तरीही पैसे कमी पडत. नाना वाटांनी मॅक्सनं पैसे दिले. शेवटी अनामत इतकी वाढली की रॉयल्टीच्या पलिकडं रक्कम गेली. मग कधी तरी भविष्यात लिहिल्या जाणाऱ्या कादंबरीपोटी वुल्फ पैसे घेऊ लागला.

एकदा मॅक्सची पत्नी, वुल्फ आणि मॅक्स असे एका बारमधे बसले होते. वुल्फचं एका पेगनं कधी भागत नसे. तो चवथ्या पाचव्यावर फाटकन पोचत असे.  तिसरा झाला की त्याचा तोल सुटत असे. त्या दिवशी चार झाल्यावर तो मॅक्सवर घसरला. त्याला जाम शिव्या दिल्या. मॅक्स शांत होता.

एक एलेनॉर नावाची काउंटेस होती. सोसायटी लेडी. श्रीमंत. खानदानी. वरच्या  थरात वावर. अशा मंडळींना लेखक, कवी, नट अशा सेलेब्रिटींचं आकर्षण असतं. या बाईंनी वुल्फला भेटायचा आग्रह मॅक्सकडं धरला. मॅक्स टाळत असे. शेवटी तिनं परस्पर वुल्फची वेळ घेतली आणि एका बारमधे मॅक्स, मॅक्सची पत्नी लुईजी इत्यादींना जेवायला बोलावलं. मोठ्या लोकांचा नामी बार. वुल्फ तिथं पोचलाच तो प्यालेल्या स्थितीत. एलेनॉरची ओळख झाली. आणि वुल्फ एलेनॉरवरच घसरला. त्या आणि तशा बाया कशा खोट्या आणि उथळ असतात असं त्यानं जोरजोरात सांगायला सुरवात केली. आसपासचे लोक अस्वस्थ. मॅक्सनं वुल्फला रोखायचा प्रयत्न केला तशी तो आणखीनच खवळला. वुल्फनं मोठ्ठा तमाशा केला, शेवटी वेटर लोकांना त्याला बखोट धरून बाहेर काढावं लागलं.

वुल्फ अमेरिकेतला सर्वश्रेष्ठ कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होता त्या वेळची ही गोष्ट.

मॅक्सनी  स्कॉट फिझगेराल्ड यांचंही साहित्य प्रकाशित केलं.  पहिली कादंबरी दी ग्रेट गॅट्सबी प्रसिद्ध होतानाही स्कॉट आणि मॅक्स प्रचंड यानाही खूप मारामाऱ्या कराव्या लागल्या. स्कॉटचं आयुष्यही खूप गुंत्याचं होतं. तो आणि त्याची पत्नी यांच्यात प्रेम,राग, द्वेष यांचे गुंत्याचे संबंध होते. मॅक्सनं त्यांना सांभाळून घेतलं, स्कॉटच्या हातून चांगलं लिखाण व्हावं यासाठी.

अर्नेस्ट हेमिंग्वे हा जागतीक कीर्तीचा नोबेल विजेता लेखकही मॅक्सनी संपादित केला. हेमिंग्वे मोकळेपणानं कबूल करत की मॅक्समुळंच आपण मोठे लेखक झालो. हेमिंग्वे हाही कलंदर माणूस. जगभर फिरत असे. धाडस हा त्याचा फंडा. जंगलं, समुद्र या त्याच्या रहाण्याच्या जागा. मासेमारी, शिकार यात तो रमत असे. पण या दोन्ही गोष्टी तो राजेमहाराजांसारख्या सुरक्षितपणे करत नसे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तो ते उद्योग करी.

एकदा हेमिंग्वे मासेमारी हे प्रकरण काय आहे ते दाखवण्यासाठी मॅक्सना बोटीवर घेऊन गेले. एक पाच सात फूट लांबीचा पन्नासेक किलो वजनाचा मासा गळाला लागला. हेमिंग्वेनी गळ मॅक्सच्या हातात सोपवला. मॅक्सची वाट लागली. मासा जबरदस्त होता, तो मॅक्सनाच समुद्रात खेचत होता. गळ सोडताही येईना आणि धरताही येईना. येवढ्यात वादळ सुरु झालं. बोट हेलकावे खाऊ लागली. मॅक्स टरकले. हेमिंग्वेला मजा येत होती. हेमिंग्वेनं गळ घेतला, तासभर खटपट करून त्यांनी माशाला नमवलं आणि वर काढलं.

हा मरणाचा प्रसंग घडत असतानाही मॅक्समधला संपादक जिवंत होता. त्यांनी हेमिंग्वेना सांगितलं की हा प्रसंग लिहिण्यासारखा आहे आणि हेमिंग्वेनाच ते जमेल.

दी ओल्ड मॅन अँड सी ही कादंबरी त्यानंतर प्रसिद्ध झाली, या कादंबरीला १९५४ सालचं साहित्याचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं.

मार्जरी रॉलिंग्ज यांना ईयरलिग्ज या एका मुलाच्या घडपडीवर आधारलेल्या कादंबरीसाठी पुलित्झर पारितोषिक मिळालं. मार्जरी ही कादंबरी लिहिण्याच्या प्रयत्नात अनेक वर्षं होत्या. पण जमेना. एकदा निराश होऊन त्यांनी कादंबरी लिहिणं सोडून दिलं. मॅक्सनी पत्र लिहून मार्जरीना सांगितलं की त्यांनी असं करू नये. मार्जरींचं हस्तलिखित वाचून मॅक्सनी मार्जरींना त्यांच्या कादंबरीत सुधारण्याजोग्या जागा कुठल्या आहेत ते सांगितलं. अनेक पत्रं लिहून त्यांना धीर दिला, लिहितं केलं.

मार्जरींच्या कादंबरीतलं मुख्य पात्र झुडुपांच्या प्रदेशातल्या प्राण्याशी खेळत असे, ते प्राणी हेच त्याचं जग होतं. कादंबरी मुलांसाठीच होती. मॅक्सनी मार्जरींना सुचवलं की त्यांनी अस्वल शिकारीचा अनुभव घ्यावा, एकाद्या नदीत फिरावं. नदीत फिरतांना येणारे अनुभव माणसाच्या धाडसी प्रवृत्तीवर प्रकाश टाकतात असं मॅक्सनी लिहिलं. मॅक्सच्या सुचनेवरून मार्जरी अर्नेस्ट हेमिंग्वे यांनाही भेटल्या. मार्जरींचा नायक मुलगा हळूहळू विकसित होत गेला, त्याचा एकेक पैलू उघड होऊ लागला.

कादंबरीचं शीर्षक कसं असावं ते मॅक्सनी सांगितलं. हरणाचं पाडस, फॉन असं शीर्षक मार्जरीनी सुचवलं होतं. मॅक्स म्हणाले की ते फार कवितेसारखं होतं, भावनाप्रधान होतं, त्यातून कादंबरीत काय आहे याचा पत्ता लागत नाही. शीर्षक एकाद्या गावाच्या किंवा भूभागाच्या किंवा इमारतीच्या नावावरूनही असू नये. कारण त्यामुळं वाचकाची पैस फार मर्यादित होते असंही मॅक्सनी सुचवलं.

मॅक्स बराच काळ लेखकाच्या सहवासात असत. मजकुर वाचून लेखक जेवढा कळतो तेवढाच लेखकाशी बोलल्यानंतरही लेखक कळतो. हे शहाणपण मॅक्स त्यांचे सीनियर विल्यम ब्राऊनवेल यांच्याकडून शिकले. ब्राऊनवेल म्हणत ‘ पाणी त्याच्या उगमापेक्षा वरच्या पातळीवर जाऊ शकत नाही.’ लेखन हे लेखकापेक्षा अधिक उंचीवर जाऊ शकत नाही, लेखक आणि लेखन दोन्ही एकच असतं.

मॅक्सवेल पर्किन्स आणि थॉमस वुल्फ यांच्यातल्या संबंधांबद्दल बरंच लिहिलं गेलंय. वुल्फना मॅक्स मुलासारखं मानत असं म्हणतात कारण मॅक्सना पाचही मुली होत्या, मुलगा असावा ही त्यांची इच्छा अतृप्त राहिली होती. दुसऱ्या बाजूला वुल्फला त्याच्या वडिलांचा सहवास लाभला नव्हता, त्यामुळं मॅक्समधे त्यानं आपली वडिल सहवासाची भूक भरून काढली असं काहींचं म्हणणं आहे. वुल्फ आणि मॅक्स यांच्यात टोकाची भांडणं होत असत, वुल्फ मॅक्सचा द्वेष करत असे असंही अनेक उदाहरणातून सिद्ध झालं आहे. विश्लेषकांचं म्हणणं होतं की वुल्फला इडिपस गंड होता.

वुल्फ आणि मॅक्स यांच्या संबंधांवर खूप चर्चा झाल्या खऱ्या परंतू मॅक्सनी इतर अनेक लेखक मोठे केले, सर्वांशीच ते जवळिकीनं आणि आपलेपणानं वागत या वास्तवाचा हिशोब कसा मांडायचा? स्कॉट, हेमिंग्वे इत्यादी अनेक लोकांच्याही सहवासात ते दीर्घ काळ राहिले याचा अर्थ काय लावायचा?

अर्थ येवढाच की मॅक्स हे संपादक म्हणूनच जन्मले होते. त्यांच्यात साहित्यिकाची कसबं होती, ते क्रियेटिव होते. परंतू त्यानी आपलं आयुष्य संपादनातच खर्च करायचं असं ठरवलं होतं, तेच त्यांचं सत्वही होतं. लेखक एकाद्या पुस्तकापुरता संपादकाच्या, प्रकाशकाच्या सहवासात असू नये, नसतो असं मॅक्स म्हणत. पुस्तक छापलं की संपला लेखकाचा संबंध  असं संपादकाला वाटता कामा नये असं मॅक्स म्हणत असत. लेखकाच्या सर्व आयुष्याची संगत मॅक्सनी केली. वुल्फचे अलिन बर्नस्टीनशी संबंध होते. अलिन विवाहित होती, तिला दोन मुलं होती. मॅक्सनी वुल्फच्या अलीनशी संबंध ठेवण्याला वा वाढवण्याला कधी पाठिंबा दिला नाही. वुल्फ अलिनच्या प्रेमात पडला तेव्हां त्याचं वय २४ वर्षाचं होतं आणि अलीन ४० वर्षाची होती. वयातला आणि अनुभवातला फरक म्हणजे काय असतं ते मॅक्सना कळत होतं. परंतू हा प्रश्न ज्याचा त्यानं सोडवावा, आपलं काम लेखक लिहिता असला पाहिजे, लेखकाचं लिखाण सतत परिपक्व होत गेलं पाहिजे येवढंच संपादकानं पाहिलं पाहिजे असं म्हणत मॅक्स वुल्फला मदत करत राहिले.

मॅक्स चांगलेच विक्षिप्त होते. ते घरी, ऑफिसात, सर्वत्र हॅट घालून फिरायचे. घरातल्या घरगुती कपड्यांतही त्यांची हॅट असायचीच. हॅट म्हणायचे की नको असलेल्या माणसाला चुकवण्यासाठी त्यांना हॅटचा उपयोग व्हायचा. डोक्यावर हॅट असल्यानं ते बाहेर पडायच्या मार्गावर आहेत असं वाटल्यानं अनेक लोक पुन्हा भेटू असं म्हणून निघून जात. मॅक्स कधीही समारंभात गेले नाहीत, त्यांनी कधीही मुलाखती दिल्या नाहीत. एकदा त्यांच्या समोरच, त्यांच्या ऑफिसातच  हेमिंग्वे आणि ईस्टमन यांच्यात मारामारी झाली. चक्क मारामारी. सुरवातीला हेमिंग्वे यांनी ईस्टमनना झापड मारली. नंतर ईस्टमननी हेमिंग्वेना खाली पाडून ते त्यांच्या उरावर बसले. सारं ऑफिस हा प्रसंग पहात होतं. दुसऱ्या दिवशी पेपरवाले गोळा झाले. त्यांच्यासाठी तर हे घबाडच होतं. पण मॅक्सनी बोलायला नकार दिला.

मॅक्सच्या पत्नी लुईझी या रंगकर्मी होत्या. त्यांचं नाटक प्रकरण मॅक्सना आवडत नसे. मॅक्स यांच्या बौद्दिक जगण्याला लुईझी प्रतिसाद देऊ शकत नव्हत्या. तो प्रतिसाद त्यांना एलिझाबेथ लेमन या महिलेकडून मिळाला. पंचवीसेक वर्ष लेमन आणि मॅक्स एकमेकांशी पत्रव्यवहार करत असत. फार तर दोनतीनदाच त्यांच्या भेटी झाल्या. न्यू यॉर्कमधली माणसं याला इंटलेक्चुअल प्रेम प्रकरण असं म्हणत असत.

मॅक्सवेल पर्किन्स यांच्या जीवनावर जीनियस या नावाचा एक सिनेमाही झाला. मॅक्सवेल हे साहित्य आणि प्रकाशन विश्वातलं एक फार मोठं नाव आहे.

।।