सिनेमा शैलीच्या पत्रकारीची जन्मदाती पत्रकार. लिलियन रॉस,

सिनेमा शैलीच्या पत्रकारीची जन्मदाती पत्रकार. लिलियन रॉस,

लिलियन रॉस या बातमीदार महिलेचं रिपोर्टिंग ऑलवेज हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालंय. रॉसनी १९४५ च्या २१ जुलैच्या न्यू यॉर्कर या साप्ताहिकाच्या अंकात टॉक ऑफ टाऊन या सदरासाठी पहिला मजकूर लिहिला. न्यू यॉर्करमधे येणाऱ्या माणसांना भेटून छोटी टिपणं, वृत्तांत, फीचर्स त्या लिहीत. २०११ साली त्यांनी त्याच सदरात इराक या विषयावर बंगाल टायगर अट द बगदाद झू या शीर्षकाचा शेवटला मजकूर लिहिला. १९२६ साली जन्मलेल्या लिलियन रॉस आता  सक्रीय पत्रकार नाहीत. मुलाखती देतात, गप्पा मारतात, त्यांच्या मागल्या लेखांचे संग्रह प्रसिद्ध करतात. केस पूर्ण पांढरे झालेत तरी त्यांच्या डोळ्यातली आणि व्यक्तिमत्वातली मिस्किली आणि कधीही न संपणारी उत्सुकता शिल्लक आहे. अजूनही त्या न्यू यॉर्कर वाचतात, त्यातल्या तरूण पत्रकारांनी लिहिलेला मजकूर वाचतात,   फोन करून त्यांना प्रोत्साहन देतात, कधी कधी कान उघाडणीही करतात. लिलियन रॉस यांचा फोन आला की पत्रकारांना धन्य वाटतं.

लिलियन रॉस यांनी पत्रकारीमधे एक स्वतंत्र प्रांत निर्माण केला. सिनेमॅटिक पत्रकारी असं नाव या पत्रकारीला ठेवता येईल. जे डोळ्याला दिसतं ते लिहायचं. जे कानावर पडतं ते लिहायचं. सिनेमात दृश्यांचे तुकडे एकाला एक जोडून चित्रपट तयार होतो. लिलियन रॉस यांचे लेख, वृत्तांत अनेक दृश्य तुकड्यांचा एक माहितीपट असतात. रॉस यांना दिसत असतं, जे ऐकू येत असतं ते त्यांच्या लेखनात येतं.

प्रस्तुत पुस्तकात अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्यावर एक लेख आहे. हेमिंग्वे क्यूबातल्या आपल्या घरून इटालीत व्हेनिसला जात असताना वाटेत न्यू यॉर्कला तीन दिवस थांबतात. रॉस  त्यांना विमानतळावर भेटतात, तीन दिवस त्यांच्या सोबत हिंडतात. हेमिंग्वे दुकानांत जाऊन कपडे विकत घेतात, चष्मा नीट करून घेतात. रॉस त्यांच्या सोबत असतात.  हेमिंग्वेंची मैत्रिण म्हणजे त्या काळात गाजलेली नटी मार्लिन डिट्रीच. डिट्रीचच्या प्रेमातच असतात हेमिंग्वे. डिट्रीच मुद्दाम हेमिंग्वे भेटायला येते. कित्येक तास ती दोघं  एकत्र असतात. रॉस ते सगळे क्षण तिथं हजर असतात. हेमिंग्वे गप्पा मारतांना समीक्षकांना झोडतात, त्याना साहित्यातलं काहीही समजत नाही असं सविस्तर बोलतात. तेही रॉस टिपतात. विमान तळावर उतरता उतरता हेमिंग्वे दारू प्यायला सुरवात करतात. आपल्याला न्यू यॉर्कर आवडत नाही, ते संस्कृती नसलेलं शहर आहे असं हेमिंग्वे धावपट्टीवर उतरता उतरता बोलून जातात.पुढले तीन दिवस झोपण्याचे तास सोडले तर हेमिंग्वे सतत दारू पीत असतात.

हेमिंग्वेंच्या सोबत त्यांची पत्नी असते. पत्नीसमोरच हेमिंग्वे आपण डिट्रिच किंवा इन्ग्रीड बर्गमन यांच्यावर कसं प्रेम करत होतो, त्यांच्याशी लग्न कसं करू इच्छित होतो ते सांगतात. डिट्रीचलाही ते सांगतात की इन्ग्रीडबरोबर आपलं लग्न झालं नाही याची हळहळ आपल्याला आहे.

हे सारं सारं लिलियन रॉस आपल्या १३ हजार शब्दाच्या लेखात, न्यू यॉर्करमधे मांडतात. गंमत म्हणजे इतका मोठा लेख न्यू यॉर्करमधे प्रसिद्ध होतो आणि लोकांनाही असले लांबलचक लेख वाचायला आवडतात.

हेमिंग्वे जसे होते तसे या लेखात दिसले.  अमेरिकन मूल्यांना काळीमा फासणारा अशी टीका हेमिंग्वे यांच्यावर झाली. हेमिंग्वे यांचे भक्त म्हणाले की हेमिंग्वे यांना बदनाम करण्यासाठीच मुद्दाम सुपारी घेऊन हा लेख लिहिला गेला होता.

रॉसनी लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी हेमिंग्वेना दाखवला होता. लेख वाचल्यावर आणि प्रसिद्ध झाल्यावर हेमिंग्वे यानी रॉसचं कौतुक केलं. हेमिंग्वे रॉसना डॉटर, म्हणजे आपली मुलगी असं संबोधत.न्यू यॉर्करच्या सर्व गाळण्या आणि कसोट्या पार पडल्यानंतरच लेख प्रसिद्ध झाला होता.

एक लेख आहे न्यू यॉर्कपासून साताठशे मैल दूरवरून आलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या न्यू यॉर्क सहलीवर. ही मुलं आणि त्यांचे शिक्षक कधीही आपल्या गावाच्या वीसेक मैलाच्या परिघाबाहेर गेलेले नसतात. न्यू यार्कमधल्या गगनचुंबी इमारती, तिथली महाग आणि विशाल रेस्टॉरंट्स, मेट्रो ट्रेन, रस्त्यावरची गर्दी, चोविस तास गडबड, नागरिकांचं कायम स्वतःत मग्न असणं इत्यादी गोष्टीवर मुलांच्या प्रतिक्रिया लेखात वाचायला मिळतात.

अमेरिकेत सौंदर्य स्पर्धा भरतात. या स्पर्धेत भाग घ्यायला निघालेली एक गरीब मध्यमवर्गीय मुलगी रॉसनी हेरली. ती, तिचा प्रियकर यांच्यासह रॉस स्पर्धेच्या जागेपर्यंत प्रवास करत गेल्या, त्या मुलीच्या कारमधून. स्पर्धेत रजिस्ट्रेशन होतं तिथपासून ते निकाल लागेपर्यंतची पूर्ण प्रक्रिया रॉसनी पाहिली, अनुभवली. या प्रक्रियेतल्या प्रत्येक महत्वाच्या माणसाला त्या भेटल्या, मुलाखती घेतल्या. त्या मुलीचा प्रियकर तिला प्रथम पासूनच सांगत असतो की तू स्पर्धा हरणार आहेस. पण या मुलीनं आधी स्थानिक स्पर्धेत बक्षीसं मिळवलेली असल्यानं तिला आशा होती. स्पर्धा जिंकली तर मिळणाऱ्या बक्षिसातून पुढं कॉलेजातलं शिक्षण करायचं, आपली स्थिती सुधारायची असं तिच्या डोक्यात होतं. मुलगी स्पर्धा हरते.

स्पर्धेच्या ठिकाणी येणाऱ्या सुंदऱ्या काय प्रकारच्या असतात त्याचं वर्णन लेखात वाचायला मिळतं. चार पैसे जास्त असणाऱ्या आणि समाजाच्या बऱ्या वर्गातून आलेल्या मुली स्पर्धेत कसं शाईन मारत फिरत असतात, इतर मुलींना कमी लेखून त्यांचा आत्मविश्वास घालवण्याचा प्रयत्न कसा करतात याचं चित्रण या लेखात आहे. अमेरिकन समाजाचा एक पदर या लेखात वाचकाला समजतो.

स्पर्धक मुलगी घरून निघते ते स्पर्धा आटोपून घरी परत येते हा सगळा घटनाक्रम पत्रकारानं अनुभवणं ही पत्रकारी शैली रॉसनी विकसित केली.

लिलियन रॉस टेप रेकॉर्डर बाळगत नसत. यंत्रं वापरलं की मजकूर शोषून घेण्याची क्षमता कमी होते असं त्यांना वाटे. कानावर पडणाऱ्या गोष्टी नीट लक्ष देऊन, लक्ष केंद्रित करून ऐकणं आणि जागच्या जागी टिपणं घेणं ही पद्धत त्यांनी अवलंबली. त्या कॅमेराही बाळगत नसत. त्यांच्या बद्दल सहकारी आणि संपादक म्हणत की लिलियन रॉस म्हणजेच एक कॅमेरा आणि टेप रेकॉर्डर आहे.

रॉस यांनी १५ पुस्तकं लिहिलीत. त्यातली बरीच पुस्तकं त्यांच्या न्यू यॉर्करमधील लेखांचे संग्रह आहेत. त्यांनी स्वतंत्रणे एक कादंबरी आणि एक कथासंग्रह प्रसिद्ध केलाय. जॉन ह्यूस्टननं दी रेड बॅज ऑफ करेज नावाची एक फिल्म केली. ही फिल्म दिद्गर्शकाच्या डोक्यात आकार घ्यायला लागली तेव्हांपासून तर ती सिनेमाघरात पोचेपर्यंत अनेक कारणांसाठी गाजली. लिलियन रॉस दिद्गर्शकाला भेटल्या, नटांना भेटल्या, चित्रणाच्या वेळी हजर राहिल्या, संकलन प्रक्रिया पाहिली. पाच भागात त्यांनी सिनेमा निर्मितीचा वृत्तांत सिनेमासारखाच लिहिला. तो कादंबरीसारखा उलगडत गेला. हे वृत्तांत न्यू यॉर्करनं छापले आणि नंतर त्याचं पुस्तक झालं. पत्रकारी आणि साहित्य यांच्या सीमारेषेवर असलेला हा मजकूर अमेरिकेत आणि जगात शैलीचा एक वस्तुपाठ म्हणून पाहिला जातो.

आज लिलियन मॅनहॅटनमधे रहातात. वय आहे ९१. लोक त्यांना विचारतात की त्या पत्रकार कशा काय झाल्या. रॉस म्हणतात की पत्रकार होणं वगैरे त्यांनी ठरवलंच नव्हतं. त्या शाळेत असताना एकदा वर्गातल्या बाईनी त्याना निबंध लिहायला सांगितला. विषय होता पुस्तकालय. रॉसनी निबंधाची पहिली ओळ अशी लिहिली- जड पुस्तकं, जाड पुस्तकं, किडकिडीत पुस्तकं, नवी पुस्तकं, जुनी पुस्तकं… बाईंनी बहुदा रॉसना मार्क दिले नसतील.  बाई म्हणाल्या असतील. ‘ हा काय निबंध झाला? पुस्तकालयावर लिहायचं म्हणजे ‘ पुस्तकं म्हणजे ज्ञानाचे भांडार, पुस्तकं म्हणजे प्रकाश, पुस्तकं म्हणजे देवानं पाठवलेला संदेश, पुस्तकं म्हणजे जगण्याचं मार्गदर्शन.. वगैरे वगैरे..’

वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी म्हणजे १९४४ साली त्या एका राजकीय साप्ताहिकात उमेदवारी करत होत्या. त्यांच्या संपादकबाईना न्यू यॉर्करचे संपादक विल्यम शॉन यांनी बातमीदार म्हणून बोलावलं. संपादकबाईना आपलं संपादक पद सोडायचं नव्हतं. त्यांनी लिलियन रॉसना न्यू यॉर्करमधे पाठवलं. तो दुसरा महायुद्धाचा काळ होता. पुरुष बातमीदार युद्धावर लिहिण्यासाठी युरोपात गेले होते. स्थानिक बातमीदारांची टंचाई होती. लिलियन रॉसना शॉननी  टॉक ऑफ टाऊन या सदरात लिहिण्यासाठी नेमलं. त्या काळात पुरुष बातमीदारापेक्षा स्त्री बातमीदाराला कमी पैसे दिले जात. रॉस यांना पैशाचं वेड नव्हतं. त्यांना लिहायचं होतं. त्या न्यू यॉर्करमधे चिकटल्या.

रॉस यांचे वृत्तांत म्हणजे एक गोष्ट असते. त्या गोष्टीला, कथेला, एक प्रवाह असतो, एक वेग असतो. न्यू यॉर्कच्या शाळेत मुली गोळा होतात तिथून गोष्टीला सुरवात होते आणि शाळा संपल्यानंतर मुली घराकडं किवा आणखी कुठं तरी परततात तेव्हां गोष्ट संपते. मुलींचं बोलणं जसजसं पुढं सरकत जातं तसतसं गोष्ट वेग घेते, वाचकांची उत्कंठा वाढत जाते. आई बाप या नात्यानं वाचकांनी आपल्या मुलांना जसं पाहिलेलं असतं त्या पेक्षा या मुली कायच्या काय वेगळ्या आहेत हे आईबाप वाचकांना कथेत कळू लागतं. त्यांच्या जीवनातलं सेक्सचं, चैनीचं, वस्तूंचं स्थान वाचकाला अस्वस्थ करत जातं. जीवनाकडं ही मुलं किती कॅज्यूअली पहातात ते कळतं. शिक्षण वगैरे गोष्टींचा त्यांच्यावर काहीही प्रभाव नसतो हेही आपल्याला या गोष्टीतून कळतं.

रॉस यांची गोष्ट पत्रकारी शैलीतून वाचकांसमोर येतो. त्यातली माणसं खरीखुरी असतात, घटना खऱ्या असतात, त्यात कल्पना वगैरे गोष्टी तिळमात्र नसतात. पण खुबी अशी की घटना आणि पात्रं कादंबरीसारखी कल्पित वाटू लागतात, महाकथेसारखी बोलू लागतात. न्यू यॉर्क ऐवजी दुसरं शहर कल्पा. काळ १९५० च्या ऐवजी १७५० कल्पा. अमेरिकेऐवजी दुसरा एकादा देश कल्पा. स्थळ, काळ, संस्कृती इत्यादी घटकांच्या पलिकडं जाऊन काही तरी वाचकाला समजतं. बरं गंमत अशी की यावर वाद घालायची आवश्यकता नाही. असं आमच्या देशात होत नाही, असं पूर्वीच्या काळात होत नव्हतं वगैरे म्हणायचं असेल तर म्हणा बापडे. रॉस बाईचं यावर काहीच म्हणणं नाही. त्या म्हणतात ” मी कुठं काय म्हणतेय. मी तर न्यू यॉर्कमधे जे पाहिलं तेच सांगतेय.”

रॉस यांच्या लेखणीतून उतरलेली शैली आता त्यांची शैली राहिलेली नाही. अतुल गावंडे हे व्यवसायानं डॉक्टर असलेले गृहस्थ न्यू यॉर्करमधे आरोग्य, उपचार, चिकित्सा इत्यादी गोष्टी वृत्तांतांमधे मांडतात. अमेरिकेत माणसं भरमसाठ औषधं विनाकारण घेतो. चार वर्षं सुखानं जगून मरू शकणारा माणूस हॉस्पिटलं आणि वेदनामय उपचार करून घेत घेत चार वर्षंच जगतो हे गावंडे यांच्या लेखातून कळतं. रोगी, माणूस मधोमध ठेवून गावंडे गोष्टी लिहितात. खऱ्याखुऱ्या.

पीटर हेसलर हा गडी २००० साली न्यू यॉर्करमधे दाखल झाला. तो चीनमधून आणि आताशा कैरोमधून वार्तापत्रं लिहितो. चीनच्या गल्लोगल्ली फिरतो, तिथल्या माणसांचं जगणं पहातो, त्यावर लिहितो. कॅथरीन बू ही अभ्यासू पत्रकार अमेरिकेतल्या गरीब वस्तीत जाते, तिथं रहाते, तिथल्या माणसांचं जगणं पहाते, अभ्यास करते आणि वृत्तांत लिहिते. कॅथरीनचं ब्युटिफूल फॉरएव्हर्स हे मुंबईतल्या झोपडपट्टीवरचं पुस्तक सध्या गाजतंय. अख्ख्या पुस्तकात मी असा शब्द एकदाही येत नाही. जॉर्ज ऑरवेलनं रोड टु विगन पियर नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. विगनच्या परिसरातल्या गिरण्यामधे काम करणाऱ्या, त्या विभागातल्या कामगारांच्या जगण्याचा वृत्तांत ऑरवेलनी लिहिलाय. साहित्य-पत्रकारीतेच्या सीमारेषेवरचं हे पुस्तकही जगाच्या सडकेवरचा एक मैलाचा दगड मानला जातो. कॅथरीनच्या पुस्तकाची तुलना ऑरवेलच्या पुस्तकाशी केली जातेय.

ऑरवेल, कॅथरीन बू यांच्या शैलीला आज शोधपत्रकारी शैली असं लेबल लावण्यात येतं. ऑरवेलचं रोड टु विगन पियर हे पुस्तक १९३७ साली प्रसिद्ध झालं, ब्रीटनमधे. लिलियन रॉस याचं लिखाण १९४५ नंतर सुरु झालं. अमेरिकेमधे.

तर अशा या लिलियन रॉस. साहित्यिक शैलीच्या पत्रकार. सिनेमासारखं लिहिणाऱ्या पत्रकार. त्यांचा वारसा आता न्यू यॉर्करनं पुढं चालवला आहे आणि रॉस आज नव्वदीच्या पलीकडं जाऊनही तो वारसा चालवणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत.

।।

 

 

3 thoughts on “सिनेमा शैलीच्या पत्रकारीची जन्मदाती पत्रकार. लिलियन रॉस,

  1. आपल्याकडे अशा बहुतेक पत्रकारांचा लवकरच लेखकराव होतो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *