अमेरिकेचं महागडं इराण युद्ध
इराण युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरु झालं.
इराण युद्धात अमेरिकेनं विमानवाहू नौकांसह १५ युद्ध नौका आणि १०० लढाऊ विमानं वापरली. अमेरिकन नौदलातल्या २६ टक्के बोटी आणि हवाई दलातली २५ टक्के विमानं अमेरिकेनं युद्धात लोटली आहेत. एकूण सैनिक सुमारे ५० हजार.
अमेरिकेनं इराणवर १३ हजार हवाई हल्ले केले.
अमेरिकेचं अंदाजपत्रक ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांना संसदेनं युद्धावर किती खर्च झाला अशी विचारणा केली. दोन वेळा. अधिकारी म्हणाले आकडा देता येणार नाही कारण तो सतत बदलत असतो, नेमका खर्च किती झाला ते सांगता येणार नाही.
अमेरिकन सेनापती खासदारांशी अनौपचारिक गप्पा करत असतात. त्या गप्पांत सेनापतीनी पहिल्या आठवड्यात ११ अब्ज डॉलर खर्च झाले असं सांगतलं. त्यानंतर मार्चच्या शेवटल्या आठवड्यात युद्धमंत्र्यांनी अमेरिकन संसदेकडं २०० अब्ज डॉलरची मागणी केली. संसदेनं तपशील विचारला. मंत्री तो द्यायला तयार झाले नाहीत. ती मागणी पूर्ण होण्याची वाट पहात पडून आहे.
प्रेसिडेंट डोनल्ड ट्रंप यांनी एप्रिलच्या सुरवातीला पुढल्या वर्षासाठी लष्करी खर्चासाठी १.५ ट्रिलियन डॉलरची मागणी केली.
भारताचं एका वर्षाचं उत्पन्न सुमारे ४.५ ट्रिलियन डॉलर आहे.
अमेरिकेचं लक्झरी युद्ध कसं चालतं त्याची एक झलक.
३ एप्रिलची गोष्ट.
F-15E Strike Eagle हे लढाऊ विमान इराणच्या खोलवर डोंगराळ भागात उडत होतं. त्यात दोन कर्मचारी होते. ते विमान काय करत होतं? माहित नाही.
इराणच्या विमानवेधी शस्त्रांनी विमान पाडलं.
विमान कोसळून नष्ट होण्याआधी वैमानिकांनी बाहेर उडी मारली. दोघांकडच्या संदेश पाठवण्याच्या बिनतारी यंत्रणेमुळं अमेरिकन लष्कराला त्यांचं ठिकाण कळलं.
प्रस्तुत घटनेच्या ठिकाणापासून काही अंतरावर एक पडीक धावपट्टी होती. त्या धावपट्टीवर एक तात्पुरता तळ उभारण्यात आला. कुवैतमधून चार हेलेकॉप्टर आणि मदतीसाठी एक मोठं विमान पाठवण्यात आलं. डोंगरी विभागात, जमिनीच्या जवळ लपलेल्या माणसाला शोधायचं असल्यानं खूप खालच्या स्तरावरून उडायचं होतं. अशी विमानं साध्या बंदुकांनाही बळी पडू शकतात.
सहा तासांनी एक वैमानिक सापडला. सोडवणूक करणाऱ्या विमानानं त्याला उचलून अमेरिकन तळावर आणलं.
दुसरा वैमानिक मधून मधून संदेश पाठवत होता. आठेक तासांनी अमेरिकन सैन्याला त्याचा ठाव सापडला.
अमेरिकन सैन्यानं विमानं,हेलेकॉप्टर्स पाठवली, शंभरेक विशेष प्रशिक्षित (सील्स, मरीन कमांडो, डेल्टा फोर्स, आर्मी रेंजर्स इत्यादी) सैनिक पाठवले. अत्यंत अडचणीतून वैमानिकाला सोडवायचं होतं.
अमेरिकेत वैमानिक सोडवायचे प्लॅन सुरु झाल्यावर अमेरिकेनं इराणची दिशाभूल करण्यासाठी बातमी पसरवली की वैमानिकाला अमेरिकेनं सोडवलं असून सडकेच्या मार्गानं वैमानिकाला अमेरिकन तळाकडं पाठवलं जातंय.
सुटकेची कारवाई रात्री व्हायची होती. संध्याकाळपासून अमेरिकन विमानं आणि तोफांनी त्या टेकडीच्या आसपास प्रचंड गोळाबारी सुरु केली, बाँब टाकले, सगळा आसमंत हादरून टाकला. स्फोटानंतरच्या ज्वाळा आकाशात इतक्या उजळत होत्या की वैमानिकाच्या ठिकाणापर्यंत पोचणं सैनिकांना शक्य व्हावं. इतका मारा केला की साधा नागरीक असो वा सैनिक, कोणीही त्या बाजूला फिरकू नये.
एका हेलिकॉप्टरनं वैमानिकाला उचललं. तात्पुरत्या उभारलेल्या तळावर आणलं. दोन C-130 विमानं तयार होती, त्यात वैमानिक आणि इतर सैनिक बसले. विमानं निघाली. लोचा झाला. उडण्याच्या स्थितीत असताना चाकं रेतीत अडकली. पंखाची पाती मोडली.
तास चालले होते. वैमानिक अडकला होता. बातम्या पेंटॅगॉनमधल्या लष्कर मुख्यालयात पोचत होत्या. तिथून व्हाईट हाऊसमधे पोचत होत्या. ट्रंप भडकत होते. इराणचे तीन तेरा वाजवायचे असा जप चालला असताना या बातम्या येत होत्या.
आता इराणचं युद्ध दुय्यम झालं. वैमानिक सोडवणं हाच इराणचा पराजय असेल, अमेरिकेचा विजय असेल असं ट्रंप म्हणू लागले. काहीही करा, त्याला सोडवा, ट्रंपकडून निरोप जात होते. ‘अमेरिकेचा एकही सैनिक शत्रूच्या प्रदेशात अडकता कामा नये’ ट्रंप म्हणत होते. या घटनाक्रमाची माहिती बाहेर पसरता कामा नये याची काळजी घेतली जात होती.
कुवैतमधल्या तळावरून ३ विशेष विमानं निघाली, घटनास्थळावर पोचली. वैमानिक व सर्व सैनिक त्या विमानात बसले आणि कुवैतला रवाना झाले.
सुरवातीला आलेली MH-6 ही ४ विशेष कामगिरी हेलेकॉप्टर तळावरच उरली होती. तसंच दोन्ही C-130 विमानंही नादुरुस्त अवस्थेत धावपट्टीवर उरली होती. सहाही विमानं अमेरिकन सैनिकांनी त्यावर स्फोटकं टाकून नष्ट केली. तशी पद्धतच असते. अमेरिकन तंत्रज्ञान इत्यादी शत्रूला कळू नये असं गणित असतं. ओसामा बिन लादेनला सोडवायला गेलेल्या हेलकॉप्टरांतलं एक कंपाऊंडवर आदळून बिघडलं होतं. सैनिकांनी स्फोटकं टाकून ते नष्ट केलं होतं.
३ तारखेला त्याच सुमाराला त्या ठिकाणापासून दूरवर A-10 Warthog या अमेरिकेच्या लढाऊ विमानावर इराणनं हल्ला केला. विमान जखमी झालं. वैमानिकानं ते कुवैतच्या हद्दीत आणलं, विमानाबाहेर उडी मारली. नंतर ते विमान कोसळलं.
वैमानिकाला वाचवण्यासाठी अमेरिकेनं केलेल्या खटपटीचा तपशील असा. सील टीम सिक्स चे कमांडो (संख्या माहित नाही). काही शेकडा (नेमके किती ते लष्कर जाहीर करत नाही) लष्कराचे सैनिक. १०५ विमानं, त्यात ६४ फायटर जेट. ४८ रिफ्युएलिंग टँकर. १३ सोडवणूक विमानं. ४ बाँबर विमानं. विमानांच्या संख्येवर विश्वास बसत नाही.
हा सारा तपशील अन्यथा कधी बाहेर आला नसता कारण त्यात अमेरिकेची नाचक्की झाली असती. पण आपण किती हुशारीनं आपल्या दोन वैमानिकांना सोडवलं हे दाखवण्यासाठी वरील माहिती सरकारनं बातमीदाराना दिली. अमेरिकेची विमानं इराणमधे हरवणं, ती इराणकडून पाडली जाणं, एकूणात अमेरिकेचं इंटेलिजन्स इत्यादी मुद्दे यातून हलकेच लक्षात येतात.
।।