रशिया युक्रेनच्या पलिकडं जायचं म्हणतोय
रशियाचं एक ड्रोन रोमानिया या देशातल्या गलाटी या शहरातल्या इमारतीवर कोसळलं, त्यात चार माणसं जखमी झाली. ड्रोन शक्तीशाली नसल्यानं नुकसान फार झालं नाही. रोमानियाची झोप मात्र उडाली.रोमानिया युक्रेनला लागून आहे.
रशियानं ड्रोनची जबाबदारी घेतली नाही. रशियाचे माजी अध्यक्ष आणि पुतीन यांचे सल्लागार मेदवेदेव यांनी हल्ल्याचा उल्लेख न करता युरोपला इशारा दिला. ‘आता तुमचे शांतपणे झोपायचे दिवस गेले आहेत’
नेटोचे नेते, जर्मनीचे चॅन्सेलर, फ्रान्सचे सेनापती या मंडळींनी ड्रोन हल्ल्याची गंभीर दखल घेतलीय. आता निर्णायक क्षण जवळ आलाय असं वरील नेते म्हणत आहे. रशियानं लक्ष्मण रेषा ओलांडली असून युरोप आता रशियाशी मुकाबला करायला सिद्ध झालंय असं युरोपियन नेत्यांनी म्हटलंय.
ड्रोन हल्ला झाल्यावर गलाटीतले नागरीक हादरले. युद्ध गोष्टी या पिढीनं पाहिलेलं नाही. दुसऱ्या महायुद्धाचा घेतलेले लोक आता रोमानियात शिल्लक नाहीत.
ड्रोन हल्ला झाल्यावर रोमानियन हादरले, म्हणू लागले की त्यांच्याकडं हवाई संरक्षण यंत्रणा कां नाहीये? रशियाच्या तुलनेत या पिटुकल्या देशाची संरक्षण यंत्रणा अगदीच तोकडी आहे. राखीव आणि खडं असं मिळून जेमतेम सव्वा लाखाचं सैन्य रोमानियाकडं आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी लढाऊ विमानं आहेत. रशियानं जोरदार हल्ला केला तर आपलं काय होईल या चिंतेनं रोमानियन हैराण झालेत.
रोमानिया नेटोचा सदस्य आहे, युरोपियन युनियनचा सदस्य आहे. रोमानियाच्या संरक्षणाची जबाबदारी नेटोकडं आहे. नेटोकडं वीस बावीस लाखाचं खडं सैन्य आहे. रशियातही जवळपास तेवढेच सैनिक आहेत. नेटोचं सैन्य ३२ देशांत विभागलं आहे. त्यामुळं एकेका देशाला युद्धाला तोंड देणं कठीण आहे. रोमानियाला रशियापासून वाचवायचं असेल तर नेटोला सैनिक आणि विमानं रोमानियात तैनात करावी लागतील.
२०२२ मधे युक्रेनवर रशियानं आक्रमण केल्यापासून युरोपियन युनियनला स्वतःच्या संरक्षणाचा विचार करावा लागत आहे. युक्रेनवर हल्ला म्हणजे युरोपवर हल्ला. उद्या रशिया बाल्टिक देशांवर हल्ला करेल आणि कधीही सैन्य पोलंड, जर्मनीच्या हद्दी ओलांडू शकेल. युक्रेनवर हल्ला होण्याच्या क्षणापर्यंत युरोपियन देश बिनधास्त होते. अमेरिेकेचे चार लाख सैनिक युरोपमधे होते. रणगाडे, विमानं, तोफखाने, क्षेपणास्त्रं यांच्यासकट अण्वस्त्रंही अमेरिकेनं युरोपमधे ठेवली होती. अमेरिकेची शस्त्रं हा युरोपच्या संरक्षणाचा मुख्य खांब होता. ट्रंप नेटोच्या बाहेर पडले. जवळ जवळ. ते नेटोला पैसे देणार नाहीत, शस्त्रं देणार नाहीत, युरोपातले सैनिकही ट्रंप त्यांना हव्या त्या देशात फिरवत आहेत. युके आणि युरोपीय देशांनी ट्रंपशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. राजा चार्ल्स ट्रंपना लोणी लावण्यासाठी अमेरिकेतही जाऊन आला. पण ट्रंप ऐकायला तयार नाहीत.
युरोपीय देशानी एकला चालो रे या धोरणाची तयारी सुरु केली. रोमानियावरच्या हल्ल्यावरची युरोपीय देशांची प्रतिक्रिया पहाण्यासारखी आहे. फ्रान्सनं तरुणानी सैन्यात भरती होण्याची, राखीव सैनिक म्हणून सज्ज होण्याची तरतूद करणारा कायदा केलाय. जर्मनीनं आपलं सैन्य मोठं करायला सुरवात केलीय. दुसऱ्या महायुद्धानंतर सैन्य मर्यादित ठेवण्याचं बंधन जर्मनीवर घालण्यात आलं होतं. आक्रमकता जर्मनीच्या रक्तातच आहे असं दोस्त राष्ट्रांचं म्हणणं होतं. पहिल्या महायुद्धानंतर दोस्त देशांनी जर्मनीवर दंड लादला, जर्मनीची सेना छोटी केली. याच गोष्टीचं भांडवल करून हिटलरनं सत्ता काबीज केली होती.आता जर्मनीचं सैन्य तर मोठं होतंच आहे पण आता आपण युरोपचे संरक्षक आहे अशी स्वतःची प्रतिमा जर्मनी तयार करतोय. रशियापासून वाचवण्यासाठी जर्मनीनं लिथुआनिया या छोट्या बाल्टिक देशामधे आपलं सैन्य तैनात केलंय. जर्मनी श्रीमंत आहे, बलाढ्य आहे, तेव्हां आपल्या रक्षणाची जबाबदारी जर्मनीनं घ्यावी असं युरोपातल्या अनेक छोट्या देशांना वाटतंय.
मतलब असा की दुसऱ्या महायुद्धापूर्वीची स्थिती पुन्हा निर्माण होतेय. रशिया आक्रमक होतोय,त्याला तोंड देण्यासाठी जर्मनी (युरोपीय देश) आक्रमक होत आहेत. युक्रेन पुरतं (आता तरी) मर्यादित असलेलं युद्ध आता युरोपभर पसरेल असं वाटू लागलंय.
पुतीन युक्रेनला पूर्ण संपवल्याशिवाय रहाणार नाहीत? पुतीन नंतर बाल्टिक देश आणि मध्य आशियातल्या देशांकडं आपला मोर्चा वळवतील?
इतिहासाचे अभ्यासक सांगतात की रशिया ही एक संस्कृती आहे. अनेक राजकीय देशांची मिळून रशिया ही संस्कृती तीन शतकं किंवा त्याआधीपासून तयार होत आलीय. ती कधी स्लाव संस्कृती होते, कधी कम्युनिष्ट संस्कृती होते, कधी राजकीय होते, कधी धार्मिक होते, कधी भाषिक होते. धार्मिक, भाषिक,त्या त्या काळात तयार झालेले राजकीय-आर्थिक विचार यांना पोटात घेऊन रशियन संस्कृती (सिविलायझेशन) तयार झालीय. ही संस्कृती पश्चिम युरोपीय किंवा युरोपीय संस्कृतीशी न जुळणारी आहे, त्या संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यामुळं रशियन माणसाच्या मनात युरोपीय देशांच्या विरोधात एक सुप्त परंतु प्रबळ राग आहे असं अभ्यासकांचं मत आहे.
रशियन लोक आपलं सांस्कृतीक (सिविलायझेशन) वेगळेपण प्रत्येक शतकात वेगवेगळ्या पद्धतीनं साकारतात. आज युरोपीय संस्कृती ही उदार लोकशाही (लिबरल, डेमॉक्रॅटिक) संस्कृती अस रशियातल्या खूप लोकांना वाटतंय.
अभ्यासकांच्या व्याख्या, त्यांनी केलेलं विश्लेषण समजायला कठीण आहे, त्यात खूप फटीही आहेत. पण रशियन पुढारी युरोपशी भांडण करू इच्छितात आणि रशियातले मोठ्ठे समाजगट या विचाराच्या पुढाऱ्यांना (उदा पुतीन) मदत करत असतात ही तर वस्तुस्थिती दिसतेय. त्यामुळं अभ्यासकांचं किचाट क्षणभर दूर ठेवलं तरी रशिया आणि युरोपमधे खूप दुरावा आणि तणाव आहेत हे तर उघड दिसतंय.
एक नवी लढाई आकार घेतेय. ती दुसऱ्या महायुद्धासारखी असेल अशीही शक्यता दिसतेय.
।।