अमेरिकेत राजकीय नेत्यांवर हल्ले कां होतात

अमेरिकेत राजकीय नेत्यांवर हल्ले कां होतात

अमेरिकेत राजकीय नेत्यांवर हल्ले कां होतात

डोनल्ड ट्रंप जिथं हजर रहाणार होते त्या हॉटेलमधे घुसण्याचा प्रयत्न कोल ॲलन नावाच्या माणसानं केला. पोलिसांनी त्याला अडवलं. डोनल्ड ट्रंप वाचले. ट्रंप आणि त्यांचे सत्ताधारी नेते यावर कोल ॲलन याचा राग होता.

ट्रंप यांच्यावर आधी दोन वेळा हल्ले झाले. एकदा ट्रंप यांच्या निवासस्थानाबाहेर एक शस्त्रधारी सापडला होता. ट्रंप तेव्हां परगावी होते.

गेल्या वर्षी चार्ली कर्क या ट्रंप समर्थक कार्यकर्त्यावर हल्ला झाला, कर्कचा मृत्यू झाला. चार्ली युटा विद्यापिठात विद्यार्थ्यांसमोर ट्रंप यांचा प्रचार करत होता. चार्ली देशभर भाषणं करून ट्रंप यांच्यासाठी फंड गोळा करत असे.

ट्रंप म्हणतात की विरोधकांच्या (डेमॉक्रॅट्सच्या) चिथावणीमुळं त्यांच्यावर हल्ले झाले.

गेल्या वर्षी मिनेसोटा राज्यातली डेमॉक्रॅट रिप्रेझेंटेटिव मेलिसा हॉर्टमन आणि तिचा नवरा मार्क यांना बोल्टर नावाच्या एका माणसानं गोळा घालून ठार मारलं. हा गोळीबार आटोपल्यावर बोल्टर पुढे राज्यातल्या सेनेटचा डेमॉक्रॅट सदस्य जॉन हॉफमन यांच्या घरी पोचला. तिथं जॉन व त्याची पत्नी येवेट यांच्यावर त्यानं गोळीबार केला. सुदैवाने ते दोघेही वाचले.

मारेकरी बोल्टरचा डेमॉक्रॅट्सवर खुन्नस होता. त्यानं डेमॉक्रॅट विधीमंडळ सदस्यांचा अभ्यास करून त्याच्या मते मरायला लायक माणसांची यादी केली होती. बोल्टरनं पोलिसांचा वाटेल असा युनिफॉर्म शिवून घेतला आणि आपली कार पोलिसांची वाटेल अशा रीतीनं रंगवली. गोळ्याना बळी पडलेल्यांना संशय आला नाही, पोलिस आहे असं दर्शवत बोल्डर त्यांच्या जवळ पोचला.

गेल्याच वर्षी पेनसिल्वानियाचे डेमॉक्रॅटिक गव्हर्नर जोश शॅपिरो यांच्या घरावर हल्ला झाला. गुन्हेगार भिंत ओलांडून घरात घुसला, पेट्रोल बाँब टाकले. घराला आग लागली. घर जळालं, शॅपिरो पतीपत्नी सटकले, वाचले.

२०२२ मधे सेनेटच्या डेमॉक्रॅट स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या घरावर हल्ला झाला. नॅन्सी घरी नव्हत्या. त्यांचे पती हल्लेखोराला सापडले. लोखंडी हातोड्याचे अनेक घाव मारेकऱ्यानं मिस्टर पेलोसी यांच्यावर घातले. बरेच उपचार झाल्यानंतर पेलोसी वाचले.

अमेरिकेत राजकीय नेते, कार्यकर्ते इत्यादींवर चिंता वाटावी इतके हल्ले होत आहेत. काही राज्यात डेमॉक्रॅटिक पक्षाचं सरकार आहे, काही राज्यात रिपब्लिकन सरकार आहे. डेमॉक्रॅटिक राज्यात रिपब्लिकनांचा डेमॉक्रॅटवर खुन्नस आसतो; रिपब्लिकन राज्यात डेमॉक्रॅट्सचा रिपब्लिकनांवर खुन्नस असतो.

भिन्न मत असणारे लोक ऑफिसांत, सार्वजनिक ठिकाणी, हजर होतात, दंगा करतात. अलीकडं तर लोकांच्या घरी जाऊन हल्ले करणं सुरु झालंय. राजकीय कार्यकर्ता-नेता असलेली स्त्री आपल्या मुलाला शाळेत सोडायला गेली तेव्हां विरोधकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला, त्यांना घाणघाण शिवीगाळ केली.

अमेरिकेत राज्यं कमालीची स्वतंत्र असतात. त्यांचे कायदे स्वतंत्र आणि वेगळे असतात, त्यांच्या योजना स्वतंत्र व वेगळ्या असतात. भिन्नमत असणाऱ्यांना धोरणं आणि कायदे आवडत नाहीत. ते हल्ले करू लागलेत.

गव्हर्नर, सेनेटर, रिप्रेझेंटिटिव, विविध आयोगांचे सदस्य (उदा. निवडणुक आयोग) संरक्षण अपुरं आहे, वाढवून द्या अशी मागणी करत आहेत. सुरक्षा व्यवस्था वाढवायची म्हटली की पोलिस, कार, बुलेट प्रूफ कार इत्यादी व्यवस्था करावी लागेल.

खुट्ट झालं तरी रस्त्यावर उतरण्याची सवय अमेरिकेला आहे. ही राजकीय सवय अमेरिकेनं ब्रिटिशांकडून वारस धेतलीय. लाखो लोक रस्त्यावर उतरतात. ही प्रतिक्रिया सार्वजनिक असते, व्यक्तींविरोधात नसते. १९६०-१९७० च्या दशकांत काळ्यांचे अधिकार व स्वातंत्र्य; वियेतनाम युद्ध, हे मुद्दे होते. अमेरिकेत संतापाची प्रचंड लाट उसळली होती. निदर्शनं हिंसक वळण घेत. माणसं मरत. देश दुभंगला होता. मार्टिन लुथर यांचा खून झाला, केनेडी यांचा खून झाला. तरीही सामान्यतः व्यक्तिगत माणसं हे लक्ष्य नव्हतं.

आताचा दुभंग आणि हिंसा वेगळी आहे. वेगळ्या मतांच्या माणसांना लक्ष्य केलं जातंय.वेचून माणसांवर हल्ले होत आहेत.

विरोधी मताची माणसं दुष्ट आहेत, राक्षस आहेत असं आता सर्रास बोललं जातय. विरोधी पक्षाच्या माणसाना मारणं यात काही चूक नाही; एकूणात राजकीय हिंसा आता अटळ आणि आवश्यक आहे असं लोक बोलू लागलेत.

कारण?

अमेरिकन समाजाचं बदलू घातलेलं रूप. अमेरिका सुरवातीला पूर्ण गोरी होती. आफ्रिकी गुलाम आले तिथून समाजाची घडण बदलू लागली. उद्योग व शेती चालावी यासाठी गोऱ्यांना माणसांची गरज होती. कॅरिबियन, चिनी, दक्षिण अमेरिकन, भारतीय लोक अमेरिकेत आले. सुरवातीला गोरे नसलेले हे लोक श्रमिक होते, भद्रलोक नव्हते. काळाच्या ओघात त्या वर्गातले लोक सुशिक्षीत झाले, श्रीमंत झाले, भद्रलोक झाले. पुढल्या दहा पंधरा वर्षात गोरे अल्पसंख्य होतील. गोऱ्यांना ते बोचतंय.

नुसतं गोरेपण नाही. भाषा, जगण्याची रीत, धर्म इत्यादी अनेक बाबतीत गोऱ्यांपेक्षा वेगळे असणारे बहुसंख्य होतील. एक काळा प्रेसिडेंट झाला होता. एक आशियाई-कॅरिबियन स्त्री प्रेसिडेंट होणार म्हणतेय. अर्थव्यवस्थेतले अनेक कोपरे भारतीयानी, चिन्यांनी, कोरियनांनी व्यापलेत. ख्रिस्ती गोऱ्याना याचा त्रास होतोय.

ट्रंप हे बदलत्या प्रवाहाचे प्रवक्ते आहेत. बाहेरून येणाऱ्या लोकांना बाहेर घालवण्याची खटपट ते करत आहेत. आजच्या तणावाचं ते एक मोठ्ठं कारण आहे.

अमेरिका हा आपला आहे या गोऱ्यांच्या भावनेलाच सुरुंग लागल्यानं त्या समाजात हताशा आणि राग आहे. बहुसंख्या हा लोकशाहीचा मुख्य आधार आहे. लोकशाहीच्या वाटेनं, सनदशीर वाटेनं जाणं शक्य नाही. हिंसा हाच मार्ग उरतो. लोकशाहीनं दिलेले सर्व कठडे उध्वस्थ करणं, दांडगाई करणं हाच मार्ग उरतो. ट्रंप त्याच वाटेनं जात आहेत.

विरोधकांबद्दल घाण भाषा वापरणं, विरोधकांवर हल्ले करणं ही गोष्ट नॉर्मल आहे, त्यात काही वावगं नाही असं समाजातला मोठा वर्ग मानू लागलाय.

हे अमेरिकेचं नवं रूप आहे.

।।

Comments are closed.