विजयचा विजय का झाला
२०२४ साली स्थापन झालेल्या तमिळ वेत्री कळहम (तवेक) पक्षानं २०२६ सालच्या २३४ सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत १०८ जागा मिळवणं ही सामान्य गोष्ट नव्हे. थलपती विजय (सी जोसेफ विजय) यांनी ती करामत करून दाखवलीय.
विजय यांनी पहिल्यांदाच निवडणुक लढवली, मुख्यमंत्री स्टालिन यांचा ८७०० मतांनी पराभव केला. स्टालिन द्रमुक या १९६७ पासून आलटून पालटून सत्तेत असलेल्या तामिळनाडूत रुतलेल्या द्रविड पार्टीचे नेते होते. स्टालिन यांना करुणानिधी यांचा वारसा लाभला होता.
तामिळनाडूमधे एक राजकीय पॅटर्न दिसतो. द्रमुकनं काँग्रेसची सत्ता उलथवली (१९६७). अद्रमुकनं द्रमुकची सत्ता उलथवली (१९७७). आता तवेकनं (तमिळ वेत्री कळहम) द्रमुकची सत्ता उलथवली आहे. द्रमुकचे करुणानिधी, अद्रमुकचे एमजी रामचंद्रन आणि तवेकचे थलपती विजय, चित्रपट सृष्टीतलेच आहेत. करूणानिधी पटकथा लिहीत, रामचंद्रन आणि विजय अभिनेते होते-आहेत. यातही एक गंमत आहे. सत्ता स्थापन करण्याच्या आधी दोनच वर्षं रामचंद्रन यांनी त्यांचा अद्रमुक स्थापन केला होता, विजय यांनीही दोनच वर्षांपूर्वी त्यांचा पक्ष स्थापला आहे.
तमिळ समाजात सिनेमा हा घटक निर्णायक असतो. सिनेमातून तयार होणाऱ्या प्रतिमा जनमानसावर राज्य करतात. मतदारांचं राजकीय मन तयार करणारे कार्यक्रम पटकथालेखक लिहितात. पटकथा पडद्यावर साकार करणारे नट सिनेमात आणि राजकीय जीवनातही हीरो होतात. हीरो आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि लोकप्रियतेचं रुपांतर तिकीट खिडकीवरच्या गर्दीत करण्यासाठी फॅन क्लब तयार करतात. हीरो हिरॉईनची महाकाय पोस्टरं लागतात, त्यांची मंदिरं तयार होतात. वगैरे.
विजय त्याच परंपरेतले आहेत.
विजयनी २००९ च्या सुमारास तमिळनाडूत ८० हजार फॅन क्लब उभे केले. विजय मक्कल इयक्कम ही संघटना स्थापली. विजय जनचळवळ.
इयक्कमनं राज्यभर हजारो कँटिन स्थापली. त्यातून लोकांना मोफत अन्न वाटलं. हज्जारो माणसं या अन्न छत्रात जेवत होती याचा अर्थ तितक्या माणसांना अन्नाची जरूर होती. त्या काळात स्टालिन तमिळनाडूत उप मुख्यमंत्री होते. २००९ पासून ते २०२६ पर्यंत मोफत अन्न वाटावं लागतं याचा अर्थ त्या राज्याची स्थिती फारशी चांगली नाही असा होतो.
सत्तांनी भरपूर लोक अर्धपोटी रहातील असं राज्य चालवायचं, अन्न वाटपाचं पुण्य घ्यायचं, अन्न वाटण्याच्या आश्वासनावर मतं घ्यायची.
इयक्कमनं राज्यभर विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्रं उभारली. ज्यांना घरं नाहीत त्या विद्यार्थ्यांची सोय झाली. विजय यांनी शाळाशाळामधे कंप्यूटर वाटले. तेव्हापासून आजवर इयक्कम विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतं. विविध परीक्षात पहिल्या दहामधे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार इयक्कम करतं. २०१७ सालची गोष्ट. ए अनिता नावाची विद्यार्थिनी बारावीत टॉपला होती. तिला राष्ट्रीय प्रवेश परिक्षेत (नीट) अपयश आलं. तिनं आत्महत्या केली. जनता हळहळली. विजय तिच्या घरी गेले, तिच्या आई वडिलांचं सांत्वन केलं.
२०११,२०१५,२०१८ या तीन वर्षात अनेक नैसर्गिक संकटं तमिळनाडूवर कोसळली. इयक्कमचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन संकटग्रस्तांना पैसे देत, वस्तूंचं वाटप करत. स्वतः विजय जागोजागी हजर असत.
तमिळ कोळ्यांना लंकेचं नौदल आणि पोलिस त्रास देत असत. पकडत, तुरुंगात टाकत. कोळ्यांनी केलेल्या चळवळीला विजयनी पाठिंबा दिला, त्यांच्यासाठी उपोषणं आणि निदर्शनं केली. तमिळनाडूत जल्लीकट्टू या बैलांशी झटापट करण्याच्या खेळाला कोर्टानं बंदी घातली होती. बैलांना त्या खेळात क्रूरतेनं वागवलं जातं असं कोर्टाचं म्हणणं पडलं. विजय जल्लीकट्टूच्या बाजूचे होते. जल्लीकट्टू सुरू रहावं यासाठी त्यांनी आदोलन केलं.
२०१८ साली स्टरलाईट उद्योगाच्या विरोधात आंदोलन झालं. स्टरलाईट उद्योगातून बाहेर पडणारा गाळसाळ आणि सांडपाणी सभोवतालच्या जमिनीत झिरपत होतं, दूषित पाण्यामुळं नागरिकांत अनेक रोग पसरले होते. आंदोलनाच्या काळात एकदा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १४ माणसं मेली. विजय या आंदोलनाला पाठिंबा देत होते, सहभागी होत होते. मृतांच्या घरी जाऊन विजयनी सांत्वन केलं, त्यांना मदत दिली.
विजय अभिनेते होते. कौटुंबिक चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकांमुळं ते घरात थेट आतवर पोचलेले होते. ते जिथं जात तिथं त्यांना पहायला गर्दी उसळे. सांत्वन करायला जात तर तिथंही पत्रकार पोचत. तोंडावर रुमाल घेऊन, कधी बाईकच्या मागल्या सीटवर बसून ते अपरात्री सांत्वनाला जात. या घटनांचीही दुसऱ्या दिवशी बातमी होत असे. ते जातील तिथं कॅमेरा जात असे. सिनेमावालेच ते, त्यामुळं ते अगदी स्वाभाविक होतं.
विजय राहूल गांधीना भेटले. सोबत कॅमेरे. विजय अण्णा हजारेंना त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी भेटत. तिथं तर अगणीत कॅमेरे. विजय नरेंद्र मोदीना भेटले. तिथं तर विचारायलाच नको. दोघंही कॅमेराभोक्ते.
गोळा बेरीज अशी की विजय चोविस तास प्रकाशात असत.
तामिळ चित्रपट व्यवसायातल्या व्यक्तींच्या डीएनएमधे राजकारण असतं. विजय ऑटोमॅटिकली २०२१ साली निवडणुकीकडं सरकले. एक ट्राय मारला. स्थानिक निवडणुकांमधे कार्यकर्ते उभे केले. १०० जणं निवडून आले. आता पक्ष स्थापन करायला हरकत नाही अशी खात्री झाली. २०२४ साली तवेक पक्ष स्थापन केला.
जनता वाट पहात होती. त्याच त्याच चेहऱ्यांचा त्यांना कंटाळा आला होता. स्टालिन, कनिमोळी इत्यादी. विजय चेहरा नवा. गेलं दशकभर जनतेला दिसत होता. मोफत अन्न वाटणं हा तमिळ राजकारणाचा फंडा असतो. गरजूंकडं जाणारा कनवाळू माणूस त्यांना हवा असतो. हा तर सिनेमातही कनवाळू होता आणि प्रत्यक्षातही. अनीताच्या घरी अपरात्री जातो, आपलं तिथं जाणं हा जाहिरातीचा भाग होऊ नये म्हणून चेहरा लपवत जातो. लोकांना हे पुरेसं होतं. गुप्त भेटी बरोब्बर कशा प्रसिद्ध होतात? पटकथेत लिहिलेलं असतं. प्रेक्षकांना माहित असतं की आपला नायक गुप्तपणे निघालाय. प्रेक्षकाना सारं काही माहित असतं. फक्त चित्रपटातल्या इतर भूमिकांना (हवं तर किरदार म्हणा) माहित नसतं.
जनता संकटात तर आहेच. जनतेतल्या प्रत्येक माणसाच्या हाती सेल फोन असतो. सेल फोनवर तो जागेपणीचे सर्व तास रील्स पहात असतो, सिनेमे पहातो, सीरियल्स पहातो, आल्बम पहातो. व्हॉट्सपची ज्ञानगंगा तर चोविस तास वहात असते. त्याला चिप्स माहीत असतात,त्याला पॉप कॉर्न आणि पिझ्झा माहित असतं. त्याला बड्डे पार्ट्या माहित असतात. त्याला जीन्स माहीत असतात, ड्रेसेस माहीत असतात, दागिने माहीत असतात. पत्नी-मैत्रिणीला लगटून काश्मिरच्या खोऱ्यात जाणं म्हणजे काय ते त्यानं ९ चौरस इंचाच्या पडद्यावर पाहिलेलं असतं. हे सर्व त्याला हवंसं वाटतं. पुढाऱ्यांनी त्याला सांगितलेलं असतं की ते सगळं मिळणं हा त्याचा हक्क आहे आणि पुढारी तो हक्क पुरवणार आहे.
रोजगार मिळत नाही, मिळाला तर गेल्या शतकातल्या सारखा असतो, त्याच्या गरजा मात्र २०२६ सालच्या असतात. पुढारी सांगतो, काळजी करू नका, तुमच्या गरजा मी भागवणार आहे. तुम्हाला मी स्वर्ग देणार आहे, पण त्याला वेळ लागेल. तोवर तूर्तास तुमच्या बहिणीला,आईला महिना १५०० देतो. तोवर तुम्हाला गॅस सिलिंडर फुकट देतो. तोवर तुमच्या बापाला १५०० किंवा २००० देतो. तुम्हाला दर महा ४००० रुपये बेकारी भत्ता देतो. तुमची विम्याचा हप्ता भरतो.
सरकार देतंय ते पदरात पाडून घ्या. पुढला सत्ताकांक्षी जास्त देईल. देणाऱ्यानं देत रहावं, घेणाऱ्यानं घेत रहावं.
गावात खड्डे शिल्लक. खड्ड्यात डास शिल्लक. वीज असेल नसेल. शिक्षण पोकळ. आरोग्य व्यवस्था पोकळ. शेतमालाला किंमत नाही. नोकरीची शक्यता नाही. सरकार जे जे देतंय ते मिळवायचं तर पक्षाच्या कार्यकर्त्याकडं जावं लागतं. कार्यकर्ता, त्याचा तालुक्याचा नेता, त्याचा जिल्ह्याचा नेता, त्याचा राज्याचा नेता, त्याचा देशाचा नेता अशी वरपर्यंत ओळख पोचली की काम होणार, मर्जीतले नसाल तर काम होणार नाही, विरोधक असाल तर काहीच नाही.
या देशात आता कोणतीही गोष्ट आता ऑटोमॅटिकली मिळत नाही, राजकीय पक्षाच्या मध्यस्थी शिवाय चालत नाही.
एव्हाना जगभर निवडणुका जिंकण्याचं तंत्र बाजारात स्थिर झालं आहे. निवडणुकीचे पडघम वाजायच्या आधी लोकांची पूर्वतयारी करून घेतली जाते. सोशल मिडिया, कुजबूज, शिजवलेल्या बातम्या यांच्या आधारे एक कथानक (नरेटिव) तयार केलं जातं.
या काळात फडतूस गोष्टींकडं लोकांचं लक्ष वेधलं जातं. त्यात क्रिकेट असतं, त्यात टीव्हीवरच्या सीरियल्स असतात, त्यात शिजवलेले सिनेमे असतात, त्यात व्यक्तींबद्दल समज पसरवलेले असतात. ज्ञान आणि विश्लेषणाचा पाया शिक्षणातून गायब झाला असल्यानं लोक सोशल मिडियातून भरवलं जाणारं ज्ञान भाविकपणे आत्मसात करतात. ताटावर बसून शांतपणे घास ३२ वेळा न चावता स्क्रीनकडं लक्ष देत समोरचे सत्वहीन पदार्थ बकाबका खातात.
कथानकात सर्व प्रश्नांवर एका ओळीचं उत्तर असतं, कथानकाला एक जाहिरात व्यावसायिकानं तयार करून दिलेलं आकर्षक शीर्षक असतं आणि एक सतत लोकांच्या डोळ्यासमोर राहिलेली व्यक्ती असते. लोकांना घोषणेची फोटोसहित ओळ पुरेशी असते. गोळा होतात पुरेशी मतं.
मुंबईतल्या चित्रपट व्यवसाला बॉलिवूड म्हणतात. कन्नड चित्रपट उद्योगाला सँडलवुड म्हणतात. मलयालम व्यवसायाला मॉलीवुड म्हणतात. तमिळ व्यवसायाला कॉलिवूड म्हणतात.
विजय विजय हा कॉलिवूडमधला ताजा ब्लॉक बस्टर आहे.
।।