बिच्चारे स्टार्मर

बिच्चारे स्टार्मर

बिच्चारे स्टार्मर 

कीर स्टार्मर यांना ब्रिटीश संसदेत भरभक्कम बहुमत आहे. तरीही त्यांचं प्रधान मंत्रीपद डळमळीत झालं. मंत्रीमंडळातल्या  ४मंत्र्यांनी राजीनामे दिले,  ८० खासदारांनी राजीनामा मागितला.  

दोनच वर्षांपूर्वी ज्या माणसाला भरघोस बहुमत दिलं त्याला त्याचा पक्ष आणि देश कां घालवून द्यायला निघालाय? 

लोकांनी त्यांची नाराजी मे च्या पहिल्या आठवड्यात पार पडलेल्या निवडणुकीत व्यक्त केली. युकेच्या स्कॉटलंड, वेल्स आणि इंग्लंड या तीनही विभागात स्थानिक संस्थांची निवडणूक झाली.   स्टार्मर यांच्या लेबर पार्टीला जबर मार बसला. ५०९६ जागांसाठी निवडणुक झाली. लेबर पार्टी १०६८ जागांवर जिंकली आणि १४९८ जागांवर हरली. २८ पालिका लेबर पक्षानं जिंकल्या,३८ पालिका घालवल्या.

युकेमधे स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमधेही लोक देशाच्या व्यापक प्रश्नांचा विचार करतात.

 आरोग्य, शिक्षण, महागाई, घरं या प्रश्नांवर गेल्या दोन वर्षाच्या काळात सामान्य माणसाच्या हिशोबात परिस्थिती अधीक बिकट झाली असं जनतेचं मत पडलं. स्टार्मर १० वर्षांचा कार्यक्रम देत होते, लोकांना तेवढा वेळ थांबायचं नाही.

 वेल्स या लेबर पक्षाच्या पारंपरीक विभागात वेल्स स्वतंत्र व्हावा अशी मागणी करणाऱ्या पक्षाला प्रचंड यश आलं;  लेबरचा सुपडा साफ झाला.  फुटीर मत लेबरच्या विरोधात गेलं. या बाबतीत गेल्या दोन वर्षात स्टार्मर काय करू शकणार होते? एकात्मिक देश या कल्पनेवर विश्वास असलेल्या लेबर पक्षाच्या प्रधान मंत्र्यानं वेल्सला फुटायला परवानगी द्यायला हवी होती असं म्हणायचं कां?

जवळपास तसंच स्कॉटलंडमधे घडलं. स्कॉटलंडला युकेमधून फुटायचं आहे. स्वतंत्र स्कॉटलंडवाल्यांना लोकांनी मतं दिली. स्टार्मरनी काय करावं अशी जनतेची अपेक्षा होती? 

वरील मुद्द्यांवर स्टार्मरना लोकांनी मतं दिली नसतील तर स्टार्मरना नावं ठेवण्याला अर्थ नाही.

 स्टार्मर यांच्या जेवढ्या जागा गेल्या तेवढ्या जागा नायजेल फराज यांच्या रिफॉर्म या पक्षाला मिळाल्या. हा पक्ष नवा आहे. हा पक्ष कंझर्वेटिव पक्षाचा फुटवा आहे. या पक्षाला युरोपियन युनियनमधे रहायचं नाही.हा पक्ष डोनल्ड ट्रंप यांचा दोस्त आहे.  म्हणजे एका परीनं हाही एक फुटीर पक्ष. बाहेरून येणाऱ्या निर्वासिताना मज्जाव व्हावा अशी या पक्षाची इच्छा आहे. 

स्टार्मर यांचा पक्ष निर्वासितांची संख्या आटोक्यात ठेवू इच्छितो पण त्या पक्षाचा निर्वासितांवर राग नाही. 

युकेच्या जनतेनं स्टार्मरना नाकारलं आणि फराज यांच्या पक्षाला मतं दिली याचा अर्थ लोकमत आता लेबर या डाव्या पक्षापासून दूर गेलं आहे, ते अधिक उजवीकडं सरकलं आहे. पण त्यातही गंमत अशी की सरकलेलं मत कंझर्वेटिव या पारंपरीक उजव्या पक्षाकडं गेलेलं नाही. 

ग्रीन्स या पक्षानं त्यांच्या जागांमधे ४४१ जागांची भर घातलीय. ५ पालिका ग्रीन्सनं जिंकल्या आहेत. ग्रीन्सना १८ टक्के मतं मिळालीत, ग्रीन्सचा मतटक्का ७ टक्क्यांनी वाढलाय. ग्रीन्स हा डावा पक्ष आहे. डावा म्हणजे समाजवादी नव्हे, तो पर्यावरणवादी पक्ष आहे. 

याचा अर्थ असा होतो की लोक पारंपरीक उजव्यांपासून दूर जाऊन वेगळे उजवे होत आहेत आणि पारंपरीक डाव्यांपासून दूर जाऊन वेगळे डावे होत आहेत. उजव्या आणि डाव्या विचारांच्या नव्या छटा  युकेमधे तयार होताना दिसतात.

युकेमधे हुजूर आणि मजूर असे दोन पक्ष असत. जसे अमेरिकेत आजही रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅट असे दोन पक्ष असतात. काळ बदलला आहे. आता लोकमताच्या छटा बदलत चालल्या आहेत. त्यातून युकेमधे डाव्या आणि उजव्या बाजूला एकेक नवा पक्ष आकाराला येतोय. एके काळी लेबर पक्षापासून वेगळा असा लिबरल डेमॉक्रॅट हा पक्ष युकेमधे उदयाला आला. तोही अजून शिल्लक आहेच. त्यामुळं आता युकेमधे किमान ५ पक्ष झालेत. स्कॉटलंड आणि वेल्समधे स्वतंत्रतावादी पक्ष आहेत. म्हणजे ७ पक्ष झाले. परिणामी मतदानही सात ठिकाणी विभागून होतं. अर्द्यापेक्षा जास्त मतं मिळवून एका पक्षाचं राज्य  निर्माण होणं ही परिस्थिती आता गेली.

मतांची विभागणी, विविध छटांचे विविध पक्ष या रचनेतून अनेक प्रश्नही उभे रहातात. आधुनिक काळात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि प्रत्येक प्रश्नाभोवती एक नागरीक समूह संघटित होतो. त्यामुळं जेवढे प्रश्न तेवढे पक्ष अशी स्थिती येऊ घातलीय. त्यातून गोंधळ उडतो. प्रत्येक धोरणावर पाच पन्नास मतं होतात, एकमत होत नाही. त्यातून सत्तेचा जुगार सुरु होतो. सरकार चालवण्यासाठी पक्ष गोळा करावे लागतात. सत्ताबाज लोकांचं फावतं, काही लाख मतं गोळा झाली की सत्तेत पोचता येतं. यातून लोकशाहीचा खेळखंडोबा होतो. तसं आज जर्मनीत घडतंय, फ्रान्समधे घडतंय, इस्रायलमधे घडतंय. अनेक वेळा संसदेत पक्षाचा एकच माणूस निवडून येतो आणि तो मंत्री होतो. कारण त्याच्या एका मतावरही सरकारचं टिकणं ठरत असतं.

युकेच्या संसदेत ६५० सदस्य आहेत. त्यात लेबर पार्टीचे ४०३ सदस्य आहेत. तरीही लेबर पार्टीला प्रधान मंत्री बदलावा लागतो. याचं कारण लेबर पार्टीतच अनेक उपपार्ट्या झाल्यात.

युकेच्या संसदेत सध्या १६ पक्ष आहेत. कित्येक पार्ट्यांचा फक्त एकेक सदस्य आहे.

युकेसमोर अनेक समस्या आहेत. इराण युद्धानं युकेच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजवलेत. अमेरिका युकेची वाजवायला निघालं आहे. ज्यूनी गाझात येवढा गोंधळ घातलाय की त्यांच्या विरोधात (म्हणजे इस्रायलविरोधात) ब्रिटीश लोकमत खवळलेलं आहे. युक्रेन युद्धानं रशियाशी पंगा घ्यायला लावलाय. स्कॉटलंड आणि वेल्स फुटू मागत आहेत. एकेकाळच्या साम्राज्याच्या केवळ आठवणींवर जगायची वेळ युकेवर आलीय. नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा अशी काहीशी युकेची स्थिती आहे.

स्टार्मर काय करणार? स्टार्मरच्या जागी कोणीही आला तरी काय करणार? युके मतांच्या हिशोबात चिरफाळला आहे, त्यामुळं तिथली राज्यव्यवस्था गोंधळली आहे.

।।

Comments are closed.