Browsed by
Month: July 2014

मध्यंतरी महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉमवर मी गाझा हल्ल्यावर एक पोस्ट टाकली होती. तीच पोष्ट माझ्या स्वतःच्या ब्लॉगवरही टाकली होती. माझ्या स्वतःच्या ब्लॉगला आलेल्या प्रतिक्रिया समतोल आणि सभ्य होत्या. महाराष्ट्र टाईम्सवर आलेल्या प्रतिक्रिया अगदीच असभ्य, विषयाला सोडून, द्वेषमूलक इत्यादी होत्या. त्यातल्या काही मुस्लीमद्वेषी आणि इसरायलप्रेमी होत्या. आणखी एक. प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी काही जणांना माझ्याबद्दल काही माहिती होती, त्यातून त्यांनी काही समजुती करून घेतल्या होत्या. त्यांच्या आधारे ते मला टोले मारत होते, विषयाशी संबंध नसतांना. उदा. गाझाचा विषय असताना मी लवासाचा म्हणजे शरद पवारांचा समर्थक-अनुयायी आहे असं एकानं लिहिलं होतं. विचार करण्याची ही पद्धत  अयोग्य आहे. एक तर माणसं न वाचता, विचार न करता आततायी प्रतिक्रिया व्यक्त करतात. नव्या तंत्रज्ञानानं जाहीर बोलणं सोपं करून टाकल्यानं, जाहीर लिहिणं सोपं करून टाकल्यानं लिहितांना विचार करायचा असतो, लिहितांना काही जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतात हा नियम ही माणसं पाळत नाहीत. दुसरं म्हणजे माहिती ताडून न पहाता, वाचन न करता माणसं बेधडक लिहून मोकळी होतात. वाचन, चिंतन, विचार तयार करण्यासाठी करावी लागणारी मेहनत ही पद्धत त्यांना माहित नाही.
असो.
तर गाझा, इसरायल आणि माझा व्यक्तिगत लवासा हा विषय याबाबतची माहिती वाचकाला उपयुक्त ठरावी म्हणून खालीप्रमाणं टीप टाकतो आहे.
मी रूढार्थानं समाजमान्य असलेला धर्म मानत नाही. परमेश्वर ही गोष्ट ज्या विचारप्रणाली किंवा आचारप्रणालीच्या मध्यभागी आहे ती प्रणाली मी मानत नाही. ती मानणाऱ्यांचा मी शत्रू नाही. फक्त  कोणतीही विचार प्रणाली माना पण दुसऱ्याचा जीव घेणं, दुसऱ्याचे हक्क हिरावून घेणं कोणत्याही धर्म वा देवाच्या नावे हे मला मान्य नाही. जगण्याचा अधिकार माणसाला  कोणी देत नाही, तो त्याला जन्मानं मिळत असतो. माणसानं कसं वागावं हे माणसं ठरवू शकतात आणि ते ठरवण्यासाठी आवश्यक आणि लवचिक पैस लोकशाहीत आहे. फाशी आणि युद्ध अशा दोन गोष्टी लोकांचे जीव घेत असतात. लोकशाहीत या दोन गोष्टीवरही खूप चर्चा होते, विचार होतो, त्यात पारदर्शकता अपेक्षित असते आणि सार्वजनीक विचारांती वरील िनर्णय घेतले जातात. देवाधारित प्रणालीत ही सोय नसते कारण देवाला काय वाटतं आणि काय नाही ते कळणं कठीण असतं. काही माणसंच देवाच्या वतीनं बोलतात आणि तिथं घोटाळा संभवतो. या विषयावर जगभर खूप विचारविनिमय झालेला आहे होतो आहे. या विषयावर खूप पुस्तकं आहेत. पुरोगामी, प्रतिगामी, समाजवादी, धर्मद्वेष्टे, इत्यादी विशेषणं आणि लेबलं आता कालबाह्य झाली  आहेत, संदर्भहीन झाली  आहेत. त्यांचा वापर भावनेच्या आहारी  जाऊन किंवा माहिती ज्ञानाच्या अभावी केला जातो. ते टळलं तर बरं होईल. 
नवीन शहरं, उपलब्ध असलेल्या नव्या तंत्रज्ञानांचा अवलंब करून नवी शहरं उभारणं योग्य आहे, एका परीनं अटळ आहे असं माझं मत आहे. शहरं या विषयावरच्या माझ्या ब्लॉगमधे मी त्या बाबत माहिती देत असतो.लवासा हे शहर मला त्यासाठी आवश्यक  वाटतं, ते  भविष्याचं निदर्शक आहे. मी शरद पवार यांचा समर्थक  नाही, उथळ विचारांची सवय जडलेल्या, जनतेच्या अगतीकतेचा, अज्ञानाचा आणि असलेल्या काही दोषांचा गैरफायदा मतांसाठी घेणाऱ्या राजकीय पक्षांचा मी समर्थक नाही, मी समर्थक आहे तो भविष्यात घडू पहाणाऱ्या मानवी जीवन समृद्ध करणाऱ्या कल्पनांचा. 

मलेशियन विमान क्षेपणास्त्रानं पाडलेलं आहे असं आतापर्यंतच्या पुराव्यावरून दिसतय.
विमान पडलं ते ठिकाण रशिया युक्रेनच्या हद्दीवरचं आहे. युक्रेन आणि फुटीर बंडखोर यांच्यात लढाई चाललीय. फुटीर बंडखोर रशियन भाषा-संस्कृतीचे आहेत. युक्रेनची भाषा वेगळी आहे. पूर्व युक्रेनच्या लोकांना युक्रेनमधे रहायचं नाहीये. त्यांना रशियात जायचं आहे. त्यामुळं रशियाची बंडखोरांना सशस्त्र फूस आहे. सोवियेत युनियन कोसळल्यामुळं घटक राज्यं स्वतंत्र झालीत. ती राज्य पुन्हा काबीज करण्याची प्युतीन यांची इच्छा आहे.
बंडखोरांजवळ रशियन शस्त्रं आहेत. युक्रेनकडं जुनी रशियन आणि कदाचित अमेरिकन शस्त्रं आहेत. एकमेकांची विमानं पाडणं असा उद्योग सध्या चालला आहे. त्याच उद्योगामधे मलेशियाचं विमान पाडण्यात आलं आहे.
रशिया म्हणतं की युक्रेननं ते विमान पाडलं. त्याच हवाई वाटेनं प्युतिन यांचं विमान जाणार होतं आणि मलेशियन विमान हे प्युतिन यांचं विमान आहे असं समजून युक्रेननं मलेशियन विमान पाडलं असं रशियन लोकांचं म्हणणं आहे. उलट युक्रेनचं म्हणणं आहे की रशियानंच ते िवमान पाडलंय, आपल्याकडं इतक्या उंचीवरची विमान पाडण्याची व्यवस्था नाही.
इतक्या उंचीवरची विमानं रेडारवर एक छोटा ठिपक्यासारखी दिसतात. ती कोणत्या देशाची आहेत, कोणत्या बनावटीची आहेत, कोणत्या प्रकारची आहेत या गोष्टी रेडारवर कळत नाहीत. त्यामुळं चुकून नको ते विमानही पाडलं जातं. विमानाची हवाई वाट ठरलेली असते. ती वाट सोडून विमान गेलं की संशय येऊन विमानं पाडली जातात. सामान्यपणे वाट चुकलेल्या विमानावर कारवाई करायची असेल तर त्याची प्रणाली ठरलेली असते. नियंत्रण कक्षातून संपर्क साधला जातो. पायलटशी बोलणी होतात.इशारा दिला जातो. ही प्रणाली पार पडल्यानंतरच कारवाई होते. न्यू यॉर्कच्या जुळ्या टॉवरवर हल्ला यशस्वी होऊ शकला कारण हवाई नियंत्रण प्रणालीला जो वेळ लागतो त्याच्या आतच दहशतवाद्यांची विमानं टॉवरवर आदळली.
मलेशियाच्या विमानाच्या बाबतीत काय घडलं? पायलटशी बोलणी झाली कां? झाली असती तर मलेशियाचं विमान पाडण्याची आवश्यकता भासली नसती. त्या विमानात ना दहशतवादी होते, ना संघर्षाच्या कोणत्याही पक्षाचे विरोधक. तेव्हां रेडावरवर विमान पाहिलं आणि ते पाडलं असं घडलं असण्याची शक्यता आहे. मलेशियन विमान कदाचित ठरलेल्या हवाई वाटेपासून दूर गेलं असावं कारण हा प्रदेश संघर्षाचा होता.
रेडार, क्षेपणास्त्रं ही तंत्रज्ञानं आणि उपकरणं यांचा सुळसुळाट झालाय. त्यांची िनर्मिती सहज शक्य असते. त्यांची विक्रीही सहज होते. ती बाजारातही मिळतात. शस्त्रनिर्मिती करणारे देश ( अमेरिका, रशिया इ. ) व्यापारासाठी आणि राजकीय हेतू साध्य करण्यासाठी शस्त्रं आणि तंत्रज्ञानं अनिर्बंध वाटतात. पाकिस्ताननं अणुतंत्र अशाच रीतीनं मिळवलं आणि इतर देशांना दिलं. इराण, उत्तर कोरिया हे देश त्यात गुतलेले आहेत. 
घातक शस्त्रं आणि तंत्र ज्याच्या हातात असतं ते देश किंवा संघटना कसे असतात? ते लोकशाहीनं चालणारे असतात की हुकूमशाहीनं? त्यांचे निर्णय शांतपणे होतात,  देशातल्या माध्यमांचं आणि मोकळ्या संसदेचं त्यांच्यावर नियंत्रण असतं कां? किती उघडपणे आणि पारदर्शी पद्धतीनं तिथं निर्णय होतात?
दहशतवाद आणि भावनेच्या आहारी जाऊन चक्रम निर्णय होणं ही गोष्ट   अल कायदा, तालिबान, तहरीके तालिबान, लष्करे तय्यबा, बोको हराम, आयसिस इत्यादी संघटनांच्या उद्योगातून  दिसली. युक्रेन-रशिया संघर्षात भाषा आणि संस्कृती गुंतलेली आहे, तिथं हुकूमशाही वर्तनाची परंपरा आहे. भाषा, धर्म, संस्कृती या प्रांतात अनिर्बंध वर्तणुकीचा प्रसार आणि प्रभाव दिसतो आहे. 

क्षेपणास्त्र, बाँब यांच्या बटनावर असणाऱ्या हाताचा मेंदू कसा आहे ते आता पहावं लागणार. माथेफिरू, असंतुलित, अतिरेकी विचार पोसणारी माणसं आणि संघटना आता काय करू शकतात हे मलेशियन विमान पडण्यावरून लक्षात येतं.

इसरायलनं गाझावर रॉकेट हल्ले केले. २०० पेक्षा जास्त माणसं मारली. गाझातून इसरायलवर हल्ले होतात हे कारण सांगितलं. गाझातून झालेल्या हल्ल्यात इसरायलचा एकही माणूस मेलेला नाही. गाझात मेलेल्या माणसांत १७० पेक्षा अधिक स्त्रिया, मुलं आणि वृद्ध आहेत. 
इसरायल आणि पॅलेस्टाईन हे भांडण १९४७ साली इसरायलची निर्मिती झाली तेव्हांपासून. ज्यू लोक दोन तीन हजार सतत परागंदा अवस्थेत फिरत राहिली. ठिकठिकाणच्या राज्यकर्त्यांनी त्यांना हाकलून लावलं. या परागंदा अवस्थेत ज्यू समाजाचं मानस तयार झालं. आपल्याला आपली स्वतःची भूमी असावी असं ज्यूंचं मत होतं. आपण मुळातले पॅलेस्टाईनमधले, तिथून त्यांचं जगभरचं स्थलांतर होत राहिलं. तेव्हां पॅलेस्टाईनच्या भूमीतच आपल्याला आपला देश मिळायला हवा असं ज्यूंचं म्हणणं. ज्यूंचं हे म्हणणं तयार झालं तेव्हा जगात ख्रिस्ती धर्म नव्हता आणि इस्लामही नव्हता. या दोन्ही धर्मियांनी ज्यूंच्या स्थलांतराला नंतर हातभार लावला. 
ज्यूंना भूमी हवी होती. आपल्या आर्थिक आणि राजकीय बळाचा वापर करून पॅलेस्टाईनमधे ज्यूनी इसरायल तयार केलं. ते करत असताना स्थानिक ज्यू नसलेल्या अरबांना हाकलून लावलं. दादागिरी केली. सुरवातीच्या काळात ज्यूनी दहशतवादी कारवाया करून ब्रिटीश आणि अरबांना मारलं. नंतर किंवा समांतर पातळीवर पॅलेस्टिनी लोकांनी दहशतवादी कारवाया करून ज्यूना मारलं. दहशतवाद दोन्ही बाजूंनी झाला, तेव्हां आणि आजही तो चालू आहे. इसरायलचा दहशतवाद विरूद्ध हमासचा दहशतवाद.बेकायदेशीर रीतीनं दुसऱ्या महायुद्धानंतर  इसरायल स्थापन झालं. नंतर आपल्या ताकदीचा वापर करून त्यांनी हा बेकायदेशीर देश रेग्युलराईज केला.
हे घडत असताना विस्थापित झालेले, टिकून असलेले अरब-पॅलेस्टिनी आपला अधिकार आणि आपली भूमी मागत होते. त्यांच्या या मागणीला अरब देशांनी पाठिंबा दिला. त्यातूनच इसरायल-अमेरिका इत्यादी एका बाजूला आणि पॅलेस्टाईन व अरब देश दुसऱ्या बाजूला असा राजकीय आणि हिंसक बखेडा तयार झाला. आजही तो तसाच चालू आहे. अनेक करार झाले. पॅलेस्टाईनला काही एक प्रदेश देऊन त्यांचा देश तयार करा आणि काही एक भूमी घेऊन इसरायल तयार करा आणि असे दोन्ही देश एकत्र नांदवा असं जगानं त्या दोघांना सांगितलं. परंतू दोन्ही बाजूनी प्रत्येक वेळी काही तरी खुसपटं, काही तरी सबबी काढून स्वतंत्र देशस्थापना करू दिली नाही. 
दोन्ही बाजूला मनोगंड तयार झाले आहेत. आपल्यावर समोरच्या बाजूनं अन्याय केला आहे, भविष्यातही तो अन्याय होतच रहाणार आहे, आपलं अस्तित्व धोक्यात आहे असं दोघंही मानतात. ही भावना वास्तव कमी, गंड जास्त.
दोन्ही देशांत किंवा समाजात बहुसंख्य जनतेला ही हिंसा नको आहे, शांततेनं एकत्र नांदायची इच्छा आहे. पूर्वी आणि आजही ज्यू आणि पॅलेस्टिनी ( दोघंही खरं म्हणजे अरबच आहेत ) जनतेमधे सामान्यपणे सामान्य जनतेचे आपसात जसे चांगले संबंध असतात तसे होते आणि आहेत. परंतू दोन्ही ठिकाणचे टोकगामी राजकीय पक्ष, अतिरेकी धर्मवादी राजकीय पक्ष सामान्य प्रजेचं मत दूर सारून, भयगंड जोपासून, जनतेला भीती घालतात. तुमचं जगणं धोक्यात आहे, आम्हीच तुम्हाला वाचवू शकतो असं दाखवून अशांतता टिकवून ठेवतात. हमास आणि इसरायलमधे अतिरेकी पक्ष सारखेच आहेत. दोन समाजामधे सतत मारामाऱ्या होण्यातच या पक्षांचं भलं आहे. 
इसरायल नव्या वस्त्या तयार करतं, अरब वस्त्या व गावांच्या भोवती भिंती उभारतं, चेकनाके उभारतं. अरब गावं बेकायदेशीररीत्या उध्वस्थ करतं, अरबांना फारच क्रूरतेनं वागवतं. अरब आपल्या जिवावर उठले आहेत असं कारण सांगत. त्यांचं कारण अगदीच अंशतः खरं ठरतं कारण हमास ही मुस्लीम ब्रदरहुडी इस्लामी विचारांची हिंसक संघटना दहशतवादी वाटेनंच जाण्यात धन्यता मानते.
भारत सरकारनं काय करावं? इसरायलमधलं सरकार लोकशाही पद्धतीनं निवडून येतं, त्याला जगानं मान्यता दिली आहे. असं सार्वभौम सरकार बेकायदेशीर-अमानवी पद्धतीनं वागत असेल तरी शेवटी तो त्या देशाचा प्रश्न आहे. त्यांचं वागणं बरोबर नाही अशी प्रतिक्रिया कोणतंही सरकार व्यक्त करू शकतं, भारत सरकार व्यक्त करू शकतं. पण त्या पलीकडचं काही करायचं असेल तर युनायटेड नेशन्स सारख्या प्रातिनिधीक संघटनेवर दबाव आणून तिथं ठराव करून ते ठराव अमलात आणण्याची खटपट भारत सरकारनं करायला हवी. दोन कारणांसाठी. एक तर इसरायलचं वागणं बेकायदेशीर, आंतरराष्ट्रीय कराराचा भंग करणारं आहे. युनायटेड नेशन्सनं ठराव करून सांगितलेल्या गोष्टी इसरायल पाळत नाहीये. आणि हज्जारो भारतीयही त्या परिसरात ( पश्चिम आशिया-आखात ) रहातात, त्यांच्याही जिवाला धोका आहे. युनायटेड नेशन्सच्या वाटेनंच भारत सरकारला जावं लागेल. जे घडतंय ते चिंताजनक आहे, तसं घडू नये असं आपलं मन भारत सरकारनं व्यक्त करायला काहीच हरकत नाही. निषेध-कारवाया इत्यादी गोष्टी संकेत आणि परंपरात किती बसतात त्याचा विचार करायला हवा.
इसरायल, पॅलेस्टाईन या प्रश्नी देशभर चर्चा झाली पाहिजे. माध्यमात आणि संसदेतही. चर्चेच्या निमित्तानं सर्व बाजू जनतेसमोर येता, शहाणपणा विकसित व्हायला मदत होते. अतिरेक नावाची गोष्ट कशी असते ते ज्यू-मुसलमान, इसरायल-पॅलेस्टाईन या संदर्भात लक्षात येते, त्यातून आपण काय धडे घ्यायचे तेही लक्षात येतं. काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांनी काळाच्या ओघात आपली काही मतं तयार केली आहेत. ती कालबाह्य झाली आहेत, संदर्भ निसटले आहेत, वास्तव आणि त्यांची मतं यांत एक अंतर तयार झालं आहे. दोन्ही पक्षांना या निमित्तानं आपली मतं तपासता येतील. 

 सरकारच्या पातळीवर सावधपणानं, संकेत सांभाळतच जावं लागेल. 

वैदिक प्रकरण
वैदिक हे गृहस्थ पाकिस्तानात गेले होते. एका शिष्टमंडळाबरोबर. शिष्टमंडळासोबतचं जे काही काम होतं ते झाल्यावर ते स्वतंत्रपणे हफीझ सैद या दहशतवादी पाकिस्तानी माणसाला भेटले. मुंबई, काश्मीर इत्यादी ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधे त्यांचा हात होता. एकेकाळच्या लष्करे तैयबा आणि आताच्या जमात उद दवा या दशहतवादी संघटनेचे ते निर्माते आहेत. त्यांच्याशी वैदिक काही तरी बोलले. ते प्रसिद्ध झालं, त्या बद्दल वैदिक यांनी काहीही लिहिलेलं नाही ते फक्त प्रतिक्रियेच्या स्वरूपात माध्यमांसोर बोलत राहिले. ते जे काही बोलले ते क्षुल्लक होतं, निरर्थक होतं. आपला भारतावरील हल्ल्यात हात नव्हता, मोदी यांचं आपण स्वागत करू वगैरे.
वैदिक हे पत्रकार आहेत. त्यांचं म्हणणं असं की ते काँग्रेसच्या जवळ आहेत, नरसिंह राव यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. त्यांचा रास्व संघाषी, संघानं उभ्या केलेल्या दिखाऊ संघटनांशी त्यांचा संबंध आहे, ते बाबा रामदेव यांच्याही निकटवर्ती आहेत असं प्रसिद्ध झालं आहे. वैदिक असं म्हणतात की ते मार्क्स आणि रुसो यांच्या सारखे, त्या वर्गातले विचारवंत आहेत.
त्यांच्या एकूण वर्णन आणि वर्तनावरून ते एक संमिश्र माणूस दिसतात. वर्तमानपत्रात लिहिणं या अर्थानं ते पत्रकार आहेत. पत्रकारी करत असतानाच त्यांची राजकीय पक्षात, सामाजिक संघटनात ऊठबस असते. सामाजिक-राजकीय विचार आणि पत्रकारी अशा दोन गोष्टी ते करत असतात. त्यामुळं ठामपणाने ते राजकारणी आहेत असंही म्हणता येत नाही आणि पूर्णपणे पत्रकार आहेत असंही म्हणता येत नाही.
सैद यांची भेट ते घेऊ शकले याचा अर्थ उघड आहे की त्यांना पाक सरकार, आयएसआय या संस्थानी परवानगी दिली, मदत केली. लष्करे तैयबा ही संघटना आयएसआयनं उभी केली वापरली हे आता सिदध झालेलं आहे. अफगाण लढाईसाठी अमेरिकेकडून आलेला पैसा आणि शस्त्रं आयएसआयनं भारताविरोधात वापरण्यासाठी लष्करची निर्मिती केली होती हे सिद्ध झालंय, त्याचे असंख्य पुरावे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य झालेले आहेत. भारतविरोधी मोहिमेसाठी ही जिहादी संघटना उभी करण्यात आली आहे. सैद पाकिस्तानात उघडपणे फिरत असतात. त्याना आणि त्यांच्या दहशतवादी संघटनाना प्रसिद्धी हवीच असते. त्यामुळं आयएसआयनं आनंदानं वैदिकांची भेट घडवून आणली.
या भेटीमागं भारत सरकार आहे काय? तसा निश्चित पुरावा नाही. या पाठी संघ परिवार आहे काय? तसा पुरावा सापडत नाही. संघाची कामाची पद्धत पहाता ते शक्यही आहे आणि तसं न घडल्याचीही शक्यता आहे. एका अपरिपक्व आचरट माणसानं काही तरी उद्योग केला असं घडलं असण्याचीही शक्यता आहे. संघ किंवा भारत सरकारनं  काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी,  पाकिस्तानशी पाठल्या दारानं संपर्क ठेवण्यासाठी वैदिक यांचा आडवाट प्रयत्न केला काय? तसे प्रयत्न जगात अनेक वेळा झालेले आहेत. तसं घडलं असेल तर ते कदाचित आणखी काही वर्षांनी उघड होईल, आताच कळणार नाही. परंतू समजा संघ किंवा सरकारनं तसा प्रयत्न केला असेल तर ते हास्यास्पद म्हणायला हवं. कारण वैदिक हे गृहस्थ उठवळ आहेत, त्या लायकीचे नाहीत. या विषयावर त्यांनी गंभीर अभ्यास केला आहे, काही संशोधनात्मक काम केलेलं आहे असं दिसत नाही. ज्या माणसाला वजन नाही आणि धड डोकंही नाही अशा माणसाचा उपयोग कूटनीती कामासाठी करणं हे मूर्खपणा, अपरिपक्वतेचं लक्षण मानता येईल.
राजकीय पक्षांचं वर्तन? सैद या माणसाला भेटणं हा देशद्रोह आहे असं शिवसेनेचं म्हणणं दिसतंय. सेनेची भृूमिका अपरिपक्व आणि चुकीची आहे. पत्रकार किंवा कोणीही अभ्यासाठी, माहिती काढण्यासाठी, आपली समजुत चांगली करण्यासाठी भेटणं यात गैर नाही. वैदिक समजा शस्त्रं-पैसा-रणनीतीविषयक माहितीची देवाण घेवाण करण्याासाठी गेले असतील तर मात्र तो गुन्हा ठरेल. त्याची चौकशी करायला हरकत नाही आणि त्यात जर ते दोषी आढळले तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई हवी. पण त्यातलं काहीही घडलेलनं नसतांना केवळ सैदची भेट घेतली म्हणून निषेध करणं, कारवाईची मागणी करणं बरोबर नाही.
बाकीच्या राजकीय पक्षांनी दिवस भर संसदेचं कामकाज बंद पाडणं अयोग्य आहे. संसदेसमोर, देशासमोर किती तरी प्रश्न प्रलंबित आहेत. जमीन अधिग्रहणाचा कायदा होतोय. त्यात खाचाखोचा आहेत. गंभीरपणे त्या खोचा चर्चेत घेतल्या पाहिजेत. नृपेन मिश्र यांना थेट ट्रायमधून सरकारमधे घेणं घातकच आहे. जनरल व्हीके सिंग सरळ सेनापतीपदावरून भाजपच्या वाटेनं लोकसभेत दाखल झाले. मुंबईचे कमीशनर सत्यपाल सिंगही तसेच. हा पायंडा चुकीचाच आहे. अशानं सर्व सरकारी अधिकारी निवृत्त होण्याच्या सुमाराला राजकीय पक्षांकडं जाण्यासाठी फील्डिंग लावतात आपले निर्णय राजकीय पक्षाला उपकारक ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनेकानेक गंभीर प्रश्न आहेत. त्यावर समतोल, अभ्यासपूर्ण भूमिका घ्यायचं सोडून वैदिक प्रकरणावर इतका वेळ खर्च करण्याची जरूर नव्हती. वैदिक यांनी देशद्रोहासारखं काही केलेलं नाहीये याची चौकशी करावी अशी मागणी नोंदवून पुढं सरकता आलं असतं.

 

पन्हा एकदा धर्म

  मुद्दा
आहे धर्म आणि संस्कृती,धर्म आणि चालीरीती यांच्यातल्या नात्यांचा.
पन्नास हजार ते एक
लाख वर्षं हा धर्म, देव, श्रद्धा यांच्या निर्मितीचा काळ मानला जातो. सभोवतालचं
वास्तव आणि माणसाचं जगणं-मरणं यातल्या अनेक गोष्टींचा खुलासा विज्ञान-तंत्रज्ञान-उपकरणं
 यांच्या नसण्यामुळं होत नव्हता.  त्या त्या काळात लोकांनी देव, उपासना इत्यादी
गोष्टी कल्पिल्या. माणसं काहीही खात होती. कोणालाही मारत होती. कोणाशीही शरीर
संबंध ठेवत होती. शक्तीवान प्रबळ ठरत असे.
काळ पुढं सरकल्यावर
जगात नाना ठिकाणी नाना  स्थितीनुसार देव, माणसांनी
उपासना या गोष्टी समाज बांधणीसाठी वापरायला सुरवात केली. चालीरीती, संस्कृती या
गोष्टी नियंत्रित करण्यासाठी देव, उपासना 
यांतील क्रिया, प्रक्रिया, चालीरीती, कर्मकांडं यांचा वापर केला.
कोणी अनेक
स्त्रियांशी लग्न करणं धर्मात बसवलं,कोणी एक पती एक स्त्री अशी गोष्ट धर्मात
बसवली. कोणी लढाया करून, माणसं मारून इतरांना जिंकणाऱ्याला देव-देवाचा अवतार मानलं.
कोणी जगातल्या सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग 
करणाऱ्याला देव-देवाचा अवतार मानलं. कोणी मांस खाऊ नका म्हटलं कोणी मांस
खाणं हे एक पवित्रकर्म मानलं. एके काळी मासिक पाळी अपवित्र मानून स्त्रीला घरात
बसवलं गेलं, नंतर विज्ञानानं वास्तव समोर 
आणल्यावर  मासिक पाळी ही नैसर्गिक
गोष्ट  मानून स्त्रीला मोकळं करण्यात आलं.
धर्म आणि संस्कृती, धर्म आणि चालीरीती यांच्यातलं नातं लवचीक असतं.  कधी पुरावे सापडल्यामुळं, कधी ज्ञान झाल्यामुळं
तर कधी सोय पाहून माणसानं चालीरीती बदलल्य, यम नियम बदलले, पाप पुण्याचे नियम
बदलले. काही चालीरीती-कर्मकांडं नव्यानं धर्मात घुसवली  तर काही चालीरीती धर्माच्या शिकवणुकीतून काढून
टाकल्या. धर्म-संस्कृती-चालीरीती-कर्मकांडं  या गोष्टींतलं नातं लवचीक असतं. काही
धर्मात  लवचीकता टिकते,  काही धर्मात ते नातं ताठर रहातं. त्या त्या
धर्मातल्या लोकांची काळाबरोबर  जाण्याची
तयारी किती असते यावर लवचिकता टिकते.
  बहुतेक वेळा व्यवहार  समजलेली माणसं व्यवहारात लवचीक असतात परंतू
काही कारणानं तत्वाच्या बाबतीत ताठर 
रहातात. तिथंच घोळ सुरु होतो. धर्माची तत्व आणि लोकांचं धर्माचरण  यात दुफळी निर्माण होते. आज कित्येक
मुस्लीम  देशांत माणसं सर्रास दारू पितात,
व्याज बट्टा करतात, कुराणात सांगितलेल्या अनेक गोष्टींच्या विपरीत वागतात. तेच
हिंदूंच्या बाबतीत  घडतं आणि जैनांच्या
बाबतीतही. कित्येक जैन माणसं घराबाहेर 
जाऊन दारू पितात, जुगार खेळतात, मांसाहार करतात, स्त्रीच्या  बाबतीत धर्मानं सांगितल्यापेक्षा वेगळं आचरण
करतात. आज देशात भ्रष्टाचार करून शोषण करणाऱ्यांत कित्येक  जैन आघाडीवर 
आहेत. अपरिग्रहाचा सिद्धांत 
मांडणारे कित्येक जैन जाम पैसा करतात, 
वापरतात, उपभोगतात आणि दाखवण्यासाठी दानधर्म करतात, देवळं बांधतात.
2500 वर्षांपूर्वीच्या वास्तवात
त्या त्या काळातल्या विचारवंतांनी जे जे मांडलं ते आज लागू पडत नाही. याला त्या
विचारवंतांना जबाबदार धरता येत नाही, परिस्थितीचा तो परिणाम असतो. आता दर दहा
वर्षांनी समाज बदलू घातला आहे.
 तेव्हां वास्तव लक्षात घेऊन कोणत्याही  धर्मातले लोक कसे वागतात हा मुद्दा आहे.
चालीरीती म्हणजे धर्म नाही. एकाद्या माणसानं मांस खाल्लं आणि मद्य प्याला तरी
तो  जैन असायला हरकत नाही. माणसानं समाजात
कसं वागावं याचं मूलतत्व सांभाळलं तर तो काय खातो, काय पितो, कोणते कपडे घालतो,
कोणतं संगित ऐकतो या गोष्टी बाजूला ठेवायच्या असतात. अर्थात हे पृथ्वीतलावरच्या
सर्व माणसांना लागू असायला हवं, पाळता यायला हवं.तसं घडण्यासाठी  सर्व धर्मीय म्हणतात तसं धर्माचं एकादं मूलतत्व
असायला हवं, जे काळाच्या ओघात बदलायचं कारण 
नसेल.
 असं तत्वं कोणतं? सर्वांना जगण्याचा अधिकार
आणि  स्वातंत्र्य असणं, सर्व माणसं समान
असणं. माझ्या घरासमोर  चिकन,मटन, मासे
विकण्याचा अधिकार असणं आणि मी ते न खाणाऱ्या माणसानं त्यासकट जगणं. दोन्ही बाजूनी
समजुतीनं मार्ग काढणं.
जबरदस्ती न करता, भीती न
घालता, समजुतीनं मार्ग काढणं हे तत्व देवाधर्माशिवाय लोकशाहीत सांगता येतं.
लोकशाही पाळत  असताना कोणी  धर्म पाळला तर ना असायचं कारण नाही. फक्त
इतरांचे अधिकार, इतरांचं स्वातंत्र्य यांच्याशी दादागिरी न करता जुळवून घेता आलं
पाहिजे. लोकशाहीचं मुख्य मर्म ‘लोक’ या गोष्टीत आहे. कसं  जगायचं हे
लोक ठरवतात, कित्येक शतकापूर्वी घडलेल्या गोष्टी, विचार, आदेश, नियम इत्यादी
गोष्टी लोकशाहीत माणसं सांभाळून हाताळतात, काळसंमत असं हित स्वतः शोधतात,ठरवतात.
पंचवीसशे वर्षांपूर्वी, दोन
हजार वर्षांपूर्वी, चौदाशे वर्षांपूर्वी. भारतात, मेसापोटोमियात, पॅलेस्टाईनमधे,
सौदी अरेबियात. परिस्थिती वेगळी, जगणं वेगळं, माणसं वेगळी, जगण्याच्या वाटा
वेगळ्या, उपासना पद्दती वेगळ्या. ते सारं आताच्या काळात लागू करायचं, जगातल्या इतरांनाही
ते लागू करायचं ही गोष्ट कशी काय स्वीकारायची?
पंचवीसशे वर्षांपूर्वीच्या
गोष्टींचा अभ्यास करायला हरकत नाही. आजच्या काळाचा आणि उद्या येऊ घातलेल्या काळाचा
अभ्यासही तितकाच महत्वाचा. प्राचीनतेचा अभ्यास करणारे थोर आणि आताच्या गोष्टीवर
विचार करणारे म्हणजे त्यांच्या तुलनेत कमी प्रतीचे असं असत नाही.
धर्माचा,तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे थोर, विज्ञान-तंत्रज्ञान-अर्थ इत्यादी
गोष्टींचा अभ्यास करणारे कमी प्रतीचे असं मानणं बरोबर नाही.

   जिहादी आणि जैन    
सध्या एकाच
वेळी घडणाऱ्या घटना.
       इराकमधे
आयसिस या जिहादी संघटनेनं त्यानी मिळवलेल्या टीचभर प्रदेशात खलिफाची, म्हणजे
प्रेषितांच्या प्रतिनिधीची, म्हणजे इस्लामची खिलाफत जाहीर केली आहे.
ती साऱ्या जगात करायची त्यांची इच्छा आहे. या खिलाफतमधे स्त्रिया बुरख्यात वावरतील, त्याना
घरात रहावं लागेल, समाजात मद्य नसेल, समाजात
संगित-चित्रपट-नाटक इत्यादी नसेल.
       गुजरातेत
पालिताणा नावाचा एक भाग आहे. तिथं जैनांची धार्मिक स्थळं आहेत. असा पालिताना पूर्ण
मांसाहारमुक्त करायचं गुजरात सरकार ठरवतंय,
त्याला सध्याच्या भारत
सरकारची मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
       मुंबईत
मरीन लाईन्स परिसरात खूप जैन रहातात. त्यांना तो विभाग मांसाहारमुक्त करायची इच्छा
आहे, तसे दबाव त्यांनी सुरु केले आहेत. मुंबईत अन्यत्र
रहाणारे जैन आपल्या इमारतींत मांसाहार करणाऱ्यांना येऊ देत नाहीत. मरीन लाइन्सला असणाऱ्या
इराणी हॉटेलांना हाकलून लावायचा जैनांचा विचार आहे.
       गोव्यातले
भाजपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्हटलंय की तोकडे आणि कमी कपडे घालणाऱ्या स्त्रियांच्यामुळं
गोव्याची संस्कृती बिघडत आहे. श्रीराम सेनेचे मुतालिक यांनी पब संस्कृतीमुळं हिंदू
संस्कृती धोक्यात आल्याचं म्हटलंय आणि त्यांनी ढवळीकरांना पाठिंबा दिलाय.
       माणसानं
काय खावं आणि कोणते कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याची जबरदस्ती होता
कामा नये. काही जैन साधूंना नागडं फिरावंसं वाटतं म्हणून उद्या मरीन लाईन्समधे कपडेही
घालायला बंदी करतील. जैनांचे साधू कमी कपडे घालतात आणि हिंदू साधू स्त्रियांनी कमी
कपडे घालू नये म्हणतात. आणि तिकडं जिहादी म्हणतात की स्त्रीनं तर पूर्णपणे झाकून घ्यावं.
आयसिसच्या स्त्रीकपडे fवषयक मागणीला श्रीराम सेनेचा पाठिंबा.
( आम्ही कुठं बुरखा घाला म्हणतोय. आम्ही पुरेसे कपडे घाला म्हणतोय. असं सेनेचं म्हणणं
असण्याची शक्यता आहे.)
       कपडे, खाणं
पिणं, लिहिणं वाचणं,
नाटक करणं, संगित
ऐकणं, सिनेमे काढणं पहाणं, फूटबॉल
किंवा हुतूतू विटी दांडू खेळणं हा ज्याच्या त्याच्या आवडी निवडीचा भाग आहे. त्यालाच
संस्कृती असं म्हणतात.  माणसाच्या या सर्व क्रियांमधे
उपासना नावाची एक क्रिया आहे. तिला धर्म म्हणता येईल. संस्कृतीमधे धर्म हा एक घटक असतो, असू
शकतो. यावर धर्मवाल्यांचं म्हणणं की देव,उपासना यांच्या भोवतीच जग उभारलेलं असल्यानं
धर्माचार हा मॅक्रो व्यवहार आणि संस्कृती हा त्याचा एक भाग. ही धर्म आणि संस्कृती यातली
मारामारी आहे. ती चालत राहील.
       यातला
मुख्य मुद्दा आहे तो धर्म-संस्कृती या दोन्ही गोष्टी ऐच्छिक असायला हव्यात, त्याची
जबरदस्ती करणं बरोबर नाही. एकीकडं पालिताणा मांसाहार मुक्त करणं, गुजरात
मद्यमुक्त करणं ही जबरदस्ती आहे. दुसरीकडं मद्य घेतलंत, मांसाहार
केलात तर पाप होतं, देव तुमचं वाईट करतो, तुम्हाला
रोग लागतात, तुम्हाला पुढला जन्म मगर, कुत्रा, डुक्कर, साप
किवा तत्सम मिळू शकतो अशी भीती घालणं ही सुद्धा जबरदस्ती आहे. एकविसाव्या शतकापर्यंत
या दोन्ही जबरदस्त्या लादल्या-पाळल्या गेल्या. पण आता ते खरं नाही हे लक्षात आलंय.
तसं करण्याचा प्रयत्न केला तर काय होतं हे जिहादी कारभार, हिटलरचं
राज्य, रशियातलं कम्युनिष्ट राज्य यातून माणसाला कळलंय.
       मोकळेपणा, स्वातंत्र्य, सहनशीलता
या मुद्द्यांवर आधारलेला लोकशाहीचा िवचार उपकारक आहे हे आता समजू लागलंय. तो विचार
अधिक कार्यक्षम, कमीत कमी दोषपूर्ण करणं याकडं लक्ष द्यायला
हवं.

       

शहरं. आज जी काही  आहेत त्यांची दुरवस्था आहे. जी काही नव्यानं होताहेत त्यांचीही दुरवस्था आहे. याचं एक कारण शहराचा कारभार हे आहे. न्यू यॉर्क, लंडन या शहरांना एक स्वतंत्र जबाबदार मेयर असतो. शहर कसं चालवायचं ते तो ठरवतो. ते ठरवण्याचा, नियोजन अमलात आणण्याचे अधिकार त्याला असतात. तसंच काही तरी भारतात व्हायला हवं.
 http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/cityspace/entry/city-want-resposible-owner