प्रासंगिक. बीजू जनता दल संकटात

प्रासंगिक. बीजू जनता दल संकटात

ओदिसामधे भाजप, बीजू जनता दल (बीजेडी) यांची आघाडी  मोडली आहे. भाजप आणि बीजूदल आता स्वतंत्रपणे लोकसभा निवडणुका लढवतील. 

ओदिसात लोकसभेच्या २१ जागा आहेत. आजवर भाजप-बीजूदल अशी अलिखित आघाडी होती. बीजू दलाचे २० खासदार होते आणि भाजपचा १ खासदार होता. आघाडी टिकवायची असेल तर आपल्याला किमान १७/१८ जागा मिळायला हव्यात असा भाजपचा हट्ट होता. तेवढ्या जागा बीजूदल देत नाही या मुद्द्यावर आघाडी मोडली आहे.

भाजपला जास्त जागा कां हव्याहेत? कारण भाजपला ४०० चा आकडा पार करायचा आहे.  गेल्या लोकसभेत भाजपचे एकूण खासदार ३०३ होते, त्यात १०० ची भर भाजपला घालायची आहे. शोधाशोध चालू आहे. ओदिसात मित्रपक्षाचे खासदार चोरायचे आणि आपले वाढवायचे अशी भाजपची रणनीती आहे. 

शत प्रतिशत भाजप ही घोषणा अमलात आणायची तर विरोधी पक्ष संपवायला हवेत. ते साध्य करण्याचा पहिला टप्पा म्हणजे मित्र पक्ष संपवणे. शिव सेना फुटली, आता बीजू दल फोडायचं.   

भाजपची ही रणनीती बरीच आधी ठरलेली होती. त्यानुसार फोडाफोडीला सुरवात झाली होती. व्ही के पांडियन हे आयएएस अधिकारी बीजू पटनायक यांचे खास निकटचे अधिकारी होते. त्यांनी सनदी नोकरीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला आहे. भाजप त्याना ओदिसाचे मुख्यमंत्री करणार आहे. 

बीजू दलाचे संस्थापक आणि सहा टर्म लोकसभा सदस्य भर्तृहरी मेहताब यांनी ‘बीजू दलात आपल्याला स्थान नाही’ असं म्हणत पक्षाचा राजीनामा दिला आहे.

गेले काही दिवस भाजपच्या राज्यशाखेनं प्रचाराचा धडाका लावला आहे. ‘ बीजू पटनाईक यांनी इतकी वर्ष मुख्यमंत्रीपद घेतलं, पक्षाची सत्ता चालवली पण ओदिसाचा विकास केला नाही. ओदिसाची अस्मिता बीजू पटनाईक यांनी जपली नाही. ओदिसाचा विकास फक्त मोदी/भाजप करू शकतं ‘ अशी भाजपची टॅग लाईन आहे. 

वाजपेयी सरकारला बीजू जनता दलाचा पाठिंबा होता. २०१४ ते २०२४ पर्यंत मोदी सरकारलाही बीजू पटनायक यांचा पाठिंबा होता, ते विरोधी आघाडीपासून दूर होते. केंद्रात मोदी राज्यात बीजू असा एक अलिखित करार होता. बीजू केंद्रातल्या सरकारांशी जुळवून घेत असतात.बीजू पटनायक यांना राष्ट्रीय महत्वाकांक्षा नाही. भाजपचं काम आणि माणसं ओदिसात नव्हती. त्यामुळं तिथं भाजपला स्थान नव्हतं. त्यामुळं भाजप-बीजूदल संगत टिकली. गेल्या दहा वर्षात ओदिसात भाजपचे सदस्य नव्हे मोदीभक्त वाढले. सत्तेच्या म्यानात मोदी आणि पटनायक या दोन तलवारी राहू शकत नाहीत. त्यामुळं आता पटनायक तलवार म्यानातून बाद करण्याची खटपट सुरु झाली आहे.

गंमतच आहे. ओदिसात आधी बीजू भक्त होते. आता त्यांची जागा मोदी भक्त घेऊ पहात आहेत. अस्मिता,विकास इत्यादी गोष्टी निव्वळ भावना चेतवण्यासाठी आहेत.

 भाजप आणि बीजू जनता दल उमेदवार उभे करणार. २०१९ मधे बीजूदलाचे २० खासदार होते. भाजपचा पाठिंबा होता. आता या २० जागांची खात्री राहिलेली नाही. त्या जागावर भाजपचा प्रतिस्पर्धी उभा राहिला की बीजू खासदारांचे वांधे. त्यामुळं बीजूदलातले खासदार धास्तावले आहेत. ते आता भाजपशी घरोबा करण्याच्या खटपटीत लागले आहेत.

 केंद्र आणि राज्यात आपल्या हातात सत्ता आलीच आहे अशा हवेत भाजपचे पुढारी आहेत. आमदारकी आणि खासदारकी आपल्याला मिळावी या खटपटीत ते लागले आहेत. एक जागा आणि ५० इच्छुक अशी स्थिती आहे.पण त्यांचीही पंचाईत आहे. इतके वर्षं राज्य केलेल्या बीजू पटनायक यांचाही प्रभाव आहेच. त्याच्याशी लढणं आपल्याला जमेल कां अशी शंका त्यांना वाटतेय. भाजपतून तिकीट नाही मिळालं तर बीजू दलातून प्रयत्न करायला काय हरकत आहे असा विचार भाजपतले उत्साही पुढारी करत आहेत.

भाजप आणि  बीजूदल या दोन्हीतले लोकं स्वतंत्रपणे काँग्रेस या पर्यायाचाही विचार करत आहेत. मधल्या मधे  काँग्रेसचं फावतंय.

काहीही कसंही करून निवडणुक जिंकायची. हे जुनून कार्यकर्ते आणि पक्ष दोघांमधेही घुसलय. 

बाजारवाद ही विचारसरणी आर्थिक होती, ती आता राजकीय झालीय. 

।।

Comments are closed.