Browsed by
Month: September 2017

युस्कारा या भाषेची जगण्याची धडपड

युस्कारा या भाषेची जगण्याची धडपड

भाषेची जगण्याची धडपड.

स्पेनमधे अनेक भाषा बोलल्या जातात. मुख्य भाषा स्पॅनिश. स्पॅनिशचीही अनेक रुपं बोलली जातात.

युस्कारा ही भाषा स्पेनमधे आज सुमारे ७ लाख माणसं, म्हणजे स्पेनच्या लोकसंख्येच्या दोन टक्क्यापेक्षा कमी माणसं, बोलतात. नेमका आकडा कळायला मार्ग नाही. बास्क आणि नवारा  विभागातच ही भाषा बोलली जाते. ही भाषा स्पॅनिशपेक्षा इतकी वेगळी आहे की स्पॅनिश लोकांना त्यातलं हो की ठो कळत नाही.

ही भाषा दडपण्याचा प्रयत्न कित्येक शतकं होतोय. गुप्तरीत्या घराच्या अंधाऱ्या माजघरांत ही भाषा आजांनी नातवांकडं सरकवली.

स्पेनमधे बाहेरची माणसं येणं जाणं हा प्रकार इसवी सनापुर्वी अनेक शतकं चालला आहे. फ्रान्स, पोर्तुगाल हे देश तर लागूनच आहेत. परंतू ग्रीस, मध्यसमुद्राच्या किनाऱ्यावरचे आफ्रिकी देश, आखातातले देश इथली माणसं स्पेनमधे सतत येत होती. ख्रिस्ती,  ज्यू आणि अनेक आदिधर्म स्पेनमधे होते. ख्रिस्ती धर्म स्थापित झाल्यानंतर पूर्वकडून अरब-मुस्लीम देशांची आक्रमणं झाली. त्यांनी इस्लाम स्पेनमधे आणला.  स्पेनमधे अनेक धर्म, अनेक संस्कृत्या, अनेक भाषांची येजा राहिल्यानं युरोपातल्या भाषाही स्पेनमधे बोलल्या जातात. स्पॅनिश ही अधिकृत आणि जास्तीत जास्त लोकांकडून बोलल्या जाणारी भाषा आहे.

आज स्पेनमधे स्पॅनिश (कॅस्टिलियन) अधिकृत भाषा आहे. सुमारे ६५ टक्के माणसं ही भाषा पहिली किंवा दुसरी भाषा म्हणून वापरतात. सुमारे १७ टक्के माणसं कॅटेलोनियन भाषा बोलतात आणि ७ टक्के माणसं गॅलिशियन भाषा बोलतात. २ टक्के किंवा त्याहून कमी माणसं बास्क भाषा बोलतात.

कॅटेलोनियन, गॅलिशियन, बास्क या त्या त्या विभागातल्या भाषा आहेत, त्या त्या विभागाची सांस्कृतीक-राजकीय-आर्थिक वैशिष्ट्यं त्या त्या भाषांत विकसित झाली आहेत. कॅटेलोनियन आणि गॅलिशियन लोकांचं स्पॅनिशशी जवळ जवळ वाकडंच असतं. भारतात जसं हिंदी आणि तामिळांचं आहे तसला प्रकार.

काळाच्या ओघात ज्या ज्या सत्ता विकसित झाल्या त्यांनी कॅस्टिलियन भाषा स्वीकारल्यानं त्या भाषेला महत्व आलं.

युस्कारा ही एक प्राचीन भाषा आहे असं मानलं जातं. सुमारे ३५०० वर्षांपूर्वी पुर्वेकडून इंडोयुरोपीय भाषा युरोपात आल्या. त्या आधी, त्या वेळी  स्पेनमधे म्हणजे बास्क प्रांतात आयबेरियन भाषा बोलली जात होती.बास्क प्रांतात १४ हजार वर्षांपूर्वीच्या गुहा आहेत. त्या काळात आयबेरियन भाषा बोलली जात असे. परंतू तिची लिपी किंवा बोलण्याची पद्धत काय होती त्याचा अभ्यास झालेला नाही. बाहेरून आलेल्या भाषा, उदा. लॅटिन, राज्यकर्त्यांच्या भाषा झाल्या, प्रतिष्ठित झाल्या. त्यावेळी स्थानिक आयबेरियन बोलणारी मंडळी म्हणजे बंडखोर आहेत असं मानलं जात असे. सत्ता आयबेरिनकडं दुस्वासानं पहात असे, आयबेरियन दडपण्याचा प्रयत्न करत असे. परिणामी माणसांना आपली आयबेरियन भाषा टिकवण्यासाठी कष्ट करावे लागले. ही लायबेरियन टिकली ती युस्कारा या स्वरूपात.

बास्क विभाग सुंदर आहे. पर्वत, खोरी, नद्या, जंगलं, नितळ समुद्र, समुद्राच्या पाण्याचा पारदर्शक नितळ निळा रंग, प्राणी, नाना ढंगाचे वारे. युस्कारा भाषेत निसर्गाशी संबंधित शब्द, कल्पना, रुपकं फार आहेत. युस्कारा भाषेत फुलपाखरू १०० पेक्षा अधिक शब्दांनी  वर्णिलं जातं.

स्पेनमधे दोन हजार वर्षांत अनेक बदल घडले पण युस्कारा भाषा बोलणाऱ्यांनी ते बदल हातभर अंतरावर ठेवून आपली संस्कृती आपल्या भाषेत टिकवली. सभोवतालचं जग विकसित होत गेलं, बास्कमधल्या लोकांनी आपलं वेगळेपण जपलं. निसर्ग आणि इतर साधनांच्या विपुलतेमुळं बास्क मंडळी श्रीमंत होती आणि आहेत. त्यामुळंही त्यांना आपली संस्कृती भाषेच्या रुपात टिकवावीशी वाटते. जगात टिकायचं असेल, तरायचं असेल तर स्पॅनिशशिवाय गत्यंतर नाही हे लक्षात घेऊन इथल्या लोकांनी व्यवहारात स्पॅनिश भाषा वापरली तरी आपली युस्कारा भाषा मात्र घर आणि चर्चमधे टिकवली. युस्कारा भाषेतलं पहिलं पुस्तक छापलं गेलं १५४५ साली. विसाव्या शतकाच्या सुरवातीला बास्क प्रांतात युस्कारा भाषेत चालणाऱ्या शाळा उघडण्यात आल्या.

बास्क लोकांची स्वतंत्र वृत्ती स्पेनला आवडत नाही. १९३९ मधे जनरल फ्रँकोची हुकूशाही स्पेनमधे सुरु झाली.  फ्रँको हुकूमशहा होता, तो स्पॅनिश राष्ट्रवादी होता. स्पेनमधे फक्त स्पॅनिश संस्कृती-भाषा असली पाहिजे, इतर प्रांतांनी आपलं अस्तित्व स्पेन राष्ट्रासमोर दुय्यम मानलं पाहिजे असा त्याचा आग्रह होता. स्पेनमधल्या सर्व संस्कृत्या,भाषांनी आपलं वेगळेपण स्पॅनिशमधे विरघळवलं पाहिजे असा त्याचा आग्रह होता. त्याच्या या धोरणामुळंच स्पेनमधे यादवी युद्ध झालं होतं.

फ्रँकोनं युस्कारा भाषेवर बंदी घातली. युस्कारा बोलणारा सापडला तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होत असे. बास्क प्रांतातल्या लोकांनी चर्चेस आणि प्राथमिक शाळांमधून या भाषेमधे चोरून चोरून व्यवहार केले. फ्रँकोला कळलं की त्याचे सैनिक चर्चमधे घुसत आणि बास्क लोकांना पकडत. युस्कारा बोलणारी, युस्कारा शिकवणारी एक शिक्षिका सैनिकांना सापडली. तिचं मुंडण करून तिची धिंड काढून तिला तुरुंगात घालण्यात आलं. लोकांवर दहशत बसावी म्हणून.

फ्रँकोशाही संपली. नंतर जगभरातलंच वातावरण बदललं. देशांच्या सीमा सच्छिद्र झाल्या. बहुमताची दादागिरी जगाला अमान्य झाली.  अल्पसंख्य संस्कृती, भाषा आणि माणसांचा आदर राखला पाहिजे, त्यांना विकासाची संधी दिली पाहिजे हे तत्व हळू हळू जगानं स्वीकारलं. स्पेनमधे असलेले विविध प्रांत, तिथल्या भाषांना स्वायत्तता देण्याचं धोरण स्पेननं अवलंबलं. त्यानुसार बास्कमधे युस्कारा भाषेतून शिक्षण घेण्याची सोय करण्यात आली. एक वेबसाईट तयार करून युस्कारा भाषा वापरणाऱ्याना माहिती आणि प्रशिक्षणाची सोय करून देण्यात आली. युस्कारा शब्दकोष आणि त्या भाषेतली पुस्तकं स्थानिक सरकार प्रसिद्ध करू लागलं. बास्क प्रांतातल्या रस्त्यावरच्या पाट्या, दुकानावरच्या पाट्या युस्कारा भाषेत दिसू लागल्या.

बास्क विभाग नितांत सुंदर आहे. बिलबाव या गावात जगभरातले लाखो लोक येतात. कामधंध्यासाठी स्पॅनिश माणसंही बास्क प्रांतात येतात. तिथं रेस्टॉरंटमधे गेले की त्यांचं स्वागत युस्कारा भाषेत होतं, चर्चमधल्या प्रार्थना युस्कारा भाषेत ऐकू येतात. रेस्टॉरंटमधला मेनू युस्कारा भाषेत असल्यानं त्यांना कळत नाही. विमानतळावरच्या पाट्या युस्कारामधे असल्यानं माणसं बुचकळ्यात पडतात. पण बास्क माणसं मात्र खुष असतात, आपण आपलं बास्क जीवन जगतोय याचा आनंद त्यांना होत असतो.

।।

अशीच एक भाषा म्हणजे ब्रेटन. ही फ्रान्सच्या पश्चिम किनाऱ्यावरील ब्रिटेनी या विभागात बोलली जाते. मध्य युगात म्हणजे पाच ते पंधरा या शतकांत ही भाषा ब्रीटनमधून स्थलांतरित झालेल्या लोकांनी ब्रिटेनीत, फ्रान्समधे आणली. इंग्लीश भाषेचं ते एक रूप होतं. १२ व्या शतकापर्यंत ब्रेटन ही भाषा ऊच्च वर्णियांची, कुलीनांची होती. तत्कालीन राजकारणापोटी तसं घडलं असणार.  ब्रिटीश संस्कृती त्या भागात प्रतिष्ठेची मानली जात असे. (महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गावं, महाराष्ट्र गुजरात सीमेवरील गावं लक्षात घ्यावीत.) बदलत्या काळानुसार आणि राष्ट्रवादाच्या बदलत्या कल्पनांनुसार फ्रान्समधे फ्रेंच भाषा प्रतिष्ठित, अधिकृत झाली आणि समातल्या कुलीनांनी ती स्वीकारली. तस तसं ब्रेटन या भाषेचं महत्व कमी होत गेलं,

एकेकाळी ब्रेटनमधे साहित्य, तत्वज्ञान, विज्ञान या क्षेत्रातलं ज्ञान होतं. ब्रीटनशी असणाऱ्या संबंधांमुळं.पंधराव्या शतकापासून फ्रेंच राजकारण बदललं. फ्रेंच राजानं फ्रेंच भाषा अधिकृत केली. इतर भाषा फ्रेंच राजांनी कमी प्रतीच्या ठरवल्या. त्या नादात ब्रेटन भाषा सरकारच्या आणि म्हणूनच वरच्या वर्गाच्या मर्जीतून उतरल्या. ब्रिटेनीमधे बहुसंख्यांकडून बोलली जाणारी भाषा मागं पडली. जगायचं असेल तर फ्रेंच वापरली पाहिजे. शाळा कॉलेजात फ्रेंचला स्थान मिळालं. हळू हळू ब्रेटन ही एक बोली भाषा होत गेली. खेडवळ, शेतकरी, कामगार, गरीब माणसांपुरतीच ब्रेटन उरली. या भाषेचा उपयोग न होता त्रासच होतो असं कळल्यावर माणसं ती भाषा वापरेनाशी झाली. हळू हळू ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या कमी होत गेली. नंतर नंतर ब्रेटनकडं अपनामास्पद पद्धतीनं पाहिलं गेलं. ब्रेटन बोलणारी माणसं फ्रेंच विरोधी, देशद्रोही आहेत असं लोक म्हणू लागले.त्या भाषेत व्यवहार करण्यावर जवळजवळ बंदीच घालण्यात आली.

भाषेची हीच गंमत असते. भारतावर मुगल राज्य करत होते तेव्हां फारसी राज्यभाषा होती, कुलीन माणसं ती भाषा वापरत. राजा राममोहन रॉय यांचं शिक्षण फारसी भाषेत झालं. मुगल गेले आणि ब्रिटीश आले. राज्यकारभाराची भाषा इंग्रजी झाली. लगोलग माणसं इंग्लीशकडं सरकली. फारसी ही एक समृद्ध भाषा भारतातून जवळजवळ नाहिशीच झाली.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात ब्रेटन वापरणं म्हणजे राजाला विरोध करणं असं मानलं गेलं.   सुरवातीला ब्रेटन बोलणारी माणसं फ्रेंच आणि ब्रेटन अशा दोन्ही भाषा बोलत. परंतू ब्रेटन शाळेतून शिकवणं बंद झाल्यावर ब्रेटन बोलणाऱ्यांची संख्या १९५० पर्यंत जेमतेम १ लाखावर पोचली. १९७० नंतर ही एक समृद्ध भाषा मरू नये यासाठी फ्रेंच सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांनी विशेष प्रोत्साहन प्रयत्न सुरु केले. परिणामी १९९७ च्या सुमाराला ब्रेटन बोलणाऱ्यांची संख्या ३ लाख झाली. पण या ३ लाखात बहुतेक लोक साठीत पोचले होते.

ब्रेटनला राजभाषेचा दर्जा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण फ्रेंच राज्यघटनेत फक्त फ्रेंचच राज्यभाषा असेल असं लिहिलं आहे. परंतू निदान तिला विभागीय भाषेचा दर्जा मिळावा असा प्रयत्न चाललाय. ब्रेटन शब्दकोष तयार केला जातोय. ब्रेटन भाषेतल्या साहित्याचं पुनर्मुद्रण केलं जातंय. ब्रेटन विकिपेडिया होतोय, फेसबुकवर ब्रेटन भाषेत व्यवहार सुरु झालाय, मायक्रोसॉफ्टनं ब्रेटन भाषेची सोय कंप्युटरवर केलीय.

ब्रेटन निदान जगेल तरी.

।।

 

 

आतबट्ट्याचा, राजकीय, अविवेकी बुलेट ट्रेन प्रस्ताव

आतबट्ट्याचा, राजकीय, अविवेकी बुलेट ट्रेन प्रस्ताव

मुंबई ते अमदाबाद हे ५०८ किमीचं अंतर सरासरी ताशी ३२० किमी या वेगानं सुमारे अडीच तासात कापणारी बुलेट ट्रेन सुरु करण्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.

जपान सरकार या ट्रेनसाठी ८८ हजार कोटी रुपयांचं कर्ज एक शतांश टक्का दरानं देणार आहे. भारत सरकार २२ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. म्हणजे हा प्रकल्प १.१ लाख  कोटी रुपयांचा असेल. २०१३ साली मनमोहन सिंग यांनी या प्रकल्पाची  शक्यता तपासणीचा करार जपान सरकारबरोबर केला होता. त्या वेळी नरेंद्र मोदींनी या करारावर टीका केली होती, ही योजना पुढं नेऊ नये असं म्हटलं होतं.

असं सांगताहेत की जपान सरकार स्वस्त दरानं देणार आहे, कर्जाचा दर एक शतांश टक्का असा असेल. म्हणजे ८८० कोटी रुपये व्याज असेल. यात एक खोच आहे. जपानी येन आणि रुपया यातला विनिमय दर पहाता येन सतत महाग होत असतो. २००७ साली एक येन ३५ पैसे होता, २०१७ साली तो ५८ पैसे झालाय. पुढल्या दहा वर्षात येन आणखी वधारू शकतो. अपेक्षेनुसार तो वधारला तर कमी दर या गोष्टीला काही अर्थ उरणार नाही, दर कमी असला तरी जास्त रुपये मोजावे लागतील. म्हणजे व्याजाची ८८० कोटी रुपयांची रक्कमही किती तरी वाढेल.

मुख्य म्हणजे जपान कर्ज देणार आहे आणि ते फेडण्याची जबाबदारी, कितीही वर्षांनी कां होईना, भारतावर असेल.

हा प्रकल्प फायद्याचा ठरेल असं मोघम वक्तव्य सरकारनं केलं आहे.परंतू आकडे पाहिले तर फायदा कसा होणार आहे ते कळत नाही. गोखले अर्थशास्त्र संस्थेचे डॉ. नीलकंठ रथ यांनी दिलेल्या हिशोबानुसार रेलवे उभारणीचा भांडवली खर्च आणि रेलवे चालवण्याचा खर्च हिशोबात घेतला तर दररोज ४५०० माणसांकडून प्रत्येकी २५ हजार रुपये तिकीटापोटी घ्यावे लागतील. सरकार म्हणतंय की तिकीट ३ हजार रुपयांच्या आसपास असेल.

एकूण आकडेवारी पहाता हा प्रकल्प तोट्यात असणार आहे.    ही ट्रेन चालवायची असेल तर प्रत्येक प्रवाशाला काही हजार रुपयांची सबसिडी द्यावी लागणार आहे. प्रकल्प तोट्यात गेल्यावर सरकारला कधी तरी  आपण कर्ज फेडू शकत नाही असं म्हणून हात वर करावे लागतील. त्या वेळी कदाचित नरेंद्र मोदी सरकार नसेल. म्हणजे खापर त्या काळातल्या सरकारच्या माथ्यावर फुटेल.

या प्रकल्पात बऱ्याच अंधाऱ्या जागा आहेत. अमदाबाद मुंबई ट्रेनच्या उभारणीचा इन्फ्रा स्ट्क्चर खर्च जपाननं २७.४४ दशलक्ष डॉलर दर किमीमागे असा लावला आहे. हा खर्चाचा आकडाच जपाननं फुगवून सांगितला आहे असं आंतरराष्ट्रीय तज्ञांचं म्हणणं आहे. चीननं अशाच प्रकारच्या बुलेट ट्रेन १७ ते २१ दल डॉलर/किमी या खर्चात केल्या आहेत. युरोपात अशाच ट्रेनचा इन्फ्रा खर्च सुमारे २३ दल डॉ/किमी इतका होतो. तज्ञांचं म्हणणं आहे की जपाननं खर्चाचा आकडा ३.२ अब्ज डॉलरनं फुगवला आहे.

आणखी एक अंधारी जागा आहे. भविष्यात अनेक यंत्रं आणि उपकरणं जपानकडून घ्यावी लागतील. त्यांच्याही किमती फुगवून लावल्या जाण्याची शक्यता आहे.

गेल्या दहा पंधरा वर्षात जगभर बुलेट ट्रेन फोफावल्या आहेत. विमानापेक्षा स्वस्तात प्रवास होत असल्यानं युरोपात, चीनमधे, कोरियात बुलेट ट्रेन फायद्याच्या ठरल्या आहेत. या ट्रेनवर बराच खर्च होत असला तरी त्या फायद्याच्या ठरतात कारण त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्था अधिक वेगवान आणि बलवान आहेत. भारतीय माणूस ३००० रुपये अमदाबाद मुंबई प्रवासासाठी खर्च करेल असं सरकार म्हणतं (प्रत्यक्षात ते किती तरी अधिक), माद्रीद बार्सेलोना प्रवासालाचं तिकीटही तेवढंच आहे. परंतू भारतीय माणसाचं दरमाणशी उत्पन्न १७०० डॉलर आहे आणि स्पॅनिश माणसाचं तेच उत्पन्न २६ हजार डॉलर आहे. भारतीय माणसापेक्षा किती तरी पटीनं जास्त पैसे मिळवणाऱ्यानं तीन हजार खर्च करणं आणि भारतीयानं तीन हजार खर्च करणं याचा अर्थ लक्षात घ्यायला हवा.

भारतीय रेलवे मंत्री म्हणाले की हा पैशाचा प्रश्न नसून अभिमानाचा प्रश्न आहे. अवकाशयान, अंतराळ तंत्रज्ञान या गोष्टीतून किती फायदा होतो याचा विचार केला जात नाही. ते खरं आहे. परंतू अंतराळ तंत्रात पैसे गुंतवले जातात त्या वेळी देश विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकत असतो, ज्याचा फायदा नंतर होत असतो. बुलेट ट्रेनबाबत असं काही घडणार नाहीये.

कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसे खर्च करायचे याचाही विवेक करावा लागतो. शिक्षण आणि आरोग्य ही इन्फ्रा मूलभूत महत्वाची आहेत. शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान ६ टक्के खर्च व्हायला हवा. तेवढा खर्च आपली सरकारं करत नाहीत. १९९९ साली भारतानं ४.४ टक्के खर्च केला आणि २०१७-२०१८ सालच्या अंदाजपत्रकात सरकारनं तो खर्च कमी करून ३.७१ टक्क्यांवर आणला आहे. भारतात आरोग्यावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या १.४ टक्के खर्च होतो. चीन आरोग्यावर ३.१ टक्के खर्च करतो, ब्राझीलचा खर्च ३.८३ टक्के आहे. वेगवान प्रवासाचा फायदा नक्कीच होतो, वेगवान प्रवास हेही इन्फ्रा आहे. परंतू समाजाची सर्वांगीण प्रगती झाल्यानंतर वेगवान प्रवासाला अर्थ प्राप्त होतो.

इंडोनेशियानं बुलेट ट्रेन करायचा निर्णय घेतला तेव्हां जगभर चौकशी केली. नंतर त्यांनी जपानला नव्हे तर चीनला कंत्राट दिलं कारण जपान महाग आहे असं त्यांना कळलं.

इंडोनेशियाचं दरमाणशी उत्पन्न ३५७० डॉलर आहे आणि भारताचं दरमाणशी उत्पन्न  १७०९ डॉलर आहे.

अमदाबाद मुंबई ट्रेनचा निर्णय जसा एकीकडं प्रतिष्ठेचा आणि अभिमानाचा केला जातोय तसाच त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा रंग दिला जातोय. पूर्वेकडं आणि आशियात चीन भारताशी स्पर्धा करतोय. भारताच्या सीमेवरची पुंडाई आणि पाकिस्तानशी घनिष्ट संबंध ही चीनच्या वागण्याची दोन चिन्हं आहेत. भारतानं चीनला शह देण्यासाठी जपानशी सख्य वाढवलंय, जपानची मदत घेतलीय असं भारतीय परराष्ट्र एस्टाब्लिशमेंट म्हणतय.

जपानशी संबंध वाढवायला हरकत नाही. जपान तंत्रज्ञानात अग्रेसर असल्यानं त्या अंगानं भारताला फायदा होईल. जपानकडं गुंतवायला बराच पैसा आहे हेही खरं आहे. पूर्वेकडलं राजकारण खूप बदलतंय. अमेरिका कदाचित तिथून अंग काढून घेईल असं दिसतंय. तसं होणं भारताला तापदायक ठरू शकतं. तेव्हां चीनला शह देण्यासाठी जपानशी संबंध वाढवणं समजण्यासारखं आहे.

पण त्या पायी जपाननं आपल्याला शेंडी लावणं आणि आपण एक आतबट्ट्याचा व अनावश्यक उद्योग करणं योग्य नाही.

।।

प्रकल्प तांत्रिक दृष्ट्या योग्य आहे की नाही याची खात्री तंत्रज्ञ देतात. प्रकल्प यशस्वी व्हायचा असेल तर त्यात किती गुंतवणुक करावी आणि परतावा मिळवण्यासाठी काय व्यवस्था करावी याचं गणित अर्थशास्त्रज्ञ सांगतात.

चंद्रावर पोचण्यासाठी एकादा रस्ता कसा तयार करता येईल याचा तांत्रिक आराखडा अलिकडं तंत्रज्ञ देतात. या प्रवासासाठी पैसे मोजायला तयार असणारे अब्जोपती जगात किती आहेत आणि त्यामुळं ही प्रवास योजना फायद्याची कशी ठरेल याचेही आकडे अर्थशास्त्रज्ञ सांगतात. पण अशी योजना आखायचा निर्णय अमेरिका किंवा जर्मन सरकार घेत नाही. ती मस्ती एलन मस्क इत्यादींनी  स्वतःच्या उत्पन्नातून करायची असते.

बुलेट ट्रेनचा प्रस्ताव नेमक्या गुजरातच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मांडण्यात आला. त्या मांडणीचा इवेंट दिल्लीत किंवा मुंबईत न करतात जिथं निवडणुका व्हायच्या आहेत तिथं अमदाबादमधे करण्यात आला, पंतप्रधान एबे यांना उघड्या गाडीतून रस्त्यांवरून फिरवण्यात आलं.

त्याच वेळी दिल्लीत देशाचे अर्थमंत्री अधिकारी आणि इतर मंत्र्यांना गोळा करून अर्थव्यवस्था कशी सुधारायची याची चर्चा करत होते. मोदी यांच्या व्यक्तिगत हट्टापोटी सरकारनं नोटारद्दीकरणाचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक त्रुटी असलेली जीएसटी योजना सुरु करण्यात आली. त्याच काळात उत्तर प्रदेश या महत्वाच्या राज्यात लोकप्रियता मिळवण्यासाठी शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर करण्यात आली. सरकारकडं किती पैसे जमा होतात, त्यातले किती पैसे कशावर खर्च करायचे, अर्थव्यवस्था कशी सुधारायची, रोजगार कसे निर्माण करायचे   याचा विवेकी विचार न करता वरील उद्योग सरकारनं केले. आर्थिक विचार न करता, राजकीय आणि निवडणुकीचा विचार करून सरकारनं निर्णय घेतले.

परिणामी अर्थव्यवस्था घसरली. बँकांनी वेड्यासारखी दिलेली कर्ज थकली आणि बँका तोट्यात गेल्या, त्या नीटपणे कर्जपुरवठा करू शकत नाहीत. देशाची एकतृतियांश अर्थव्यवस्था अनौपचारिक अर्थव्यवस्था असते. या अर्थव्यवस्थेला काळी अर्थव्यवस्था ठरवून सरकारनं नोटारद्दीकरण केलं. परिणामी एकतृतियांश अर्थव्यवस्था कोसळली, ती अजूनही वर येत नाहीये. कर्ज मिळत नसल्यानं आणि देशातलं वातावरण बिघडल्यानं खाजगी उद्योगी लोकं पैसे गुंतवायला तयार नाहीयेत. तळातली दफ्तरदिरंगाई आणि भ्रष्टाचार जैसे थे आहे. त्यामुळं एकूणातच रोजगार निर्मिती होत नाहीये.

हे सारं दिसत असताना बुलेट ट्रेनसारखा निर्णय घेणं ही घटना सरकार आणि भाजप हा सत्ताधारी पक्ष यांच्याकडं आर्थिक विचाराचा अभाव दर्शवते.

विरोधक आणि अर्थशास्त्रज्ञ यांनी सरकारवर टीका केल्यावर सरकार आणि सत्ताधारींनी या मंडळींना अर्थशास्त्रच कळत नाही असा आरोप केला. विरोध करणारा माणूस जर अमेरिकेत शिकलेला वाढलेला असेल तर तो देशद्रोही आहे आणि त्याला भारत कळत नाही असं ही मंडळी बोलली. पंतप्रधानानं कधी काळी चहाची टपरी चालवली असल्यानं त्याला अर्थशास्त्र बरोब्बर कळतं असं ही मंडळी म्हणत आहेत.

कोण काय म्हणतंय हे बाजूला राहू द्या.

देशाची अर्थव्यवस्था ठीक नाहीये याचा विचार व्हायला हवा.

।।

 

 

 

 

शुभमंगल, बरेलीकी बर्फी.. चित्रपट सृष्टीतली नवी वळणं

शुभमंगल, बरेलीकी बर्फी.. चित्रपट सृष्टीतली नवी वळणं

माझ्या मागल्या रांगेत दोघी जणी शुभमंगल सावधान हा सिनेमा मराठीत आहे असं समजून आल्या होत्या. सिनेमा हिंदीत सुरु झाल्यावर ” शी: हे काय ” म्हणाल्या. पण काही वेळातच सिनेमाला सरावल्या, खिंदळू लागल्या.

मुदीत सुगंधाच्या  प्रेमात पडतो. रीतसर लग्न ठरतं. सुगंधाला सरळपणे लग्न नको असतं, काही तरी थरार असावा असं वाटत असतं. लग्नापूर्वी सेक्सचा अनुभव घ्यावा असं दोघं ठरवतात. मुदीत कंडोम आणतो.  सभोवतालचं वातावरण, आपण करतोय ते ठीक आहे की नाही याची  धास्ती.  त्याचं लिंग उभं रहात नाही.

शुभमंगल सावधान

इथून घोटाळा सुरु होतो. मुदीत निराश होतो. नाना उपाय योजतो. मित्र, बुजुर्ग, डॉक्टर्स  नाना उपाय सांगतात.  जमत नाही. सुगंधाला मुदीतची व्यथा समजत असते. ती त्याला  समजून घेत असते. टेन्शनमुळं तसं घडतंय, नंतर सुरळीत होईल असं ती सांगते. समजा सेक्स नाही करता आला तरी हरकत नाही, जीवनात सेक्स येवढी एकच गोष्ट असते असं नाही, इतर अंगानी आपलं वैवाहिक जीवन पूर्ण करू असं ती समजावते. मुदीत तणाव आणि निराशेच्या दरीतून बाहेर यायला तयार नाही. बरीच धमाल झाल्यावर एके दिवशी अचानक  लिमलेटची गोळी चघळत चघळत मुदीत कोंडी फोडतो.

या सिनेमाची गंमत संवादांत आहे. सेक्ससारखा विषय. तरूण मुलं, आई वडील इत्यादी माणसं सेक्सबद्दल काय काय विचार करतात ते पडद्यावर ऐकताना धमाल येते.मुदीतचा पहिला प्रयत्न कसा फसला ते दाखवणारं एक  एक दृश्य आहे. त्यात सुगंधाची मैत्रिण  एक बिस्कीट चहात बुडवून बाहेर काढते. बिस्कीट टुईईईं करून मधेच मोडतं आणि कपात पडतं.

मुदीत-सुगंधाचे मित्र, दोघांचे आईवडील, गणगोत इत्यादी माणसं हिलॅरियस आहेत. आपल्याला आसपास नेहमी दिसतात तशीच. त्यांची शरीरयष्टी, त्यांचे कपडे, त्यांचा वावर सारं काही अगदी आपल्या आसपासचं. स्टुडियोतली चकचकीत, कातीव  पात्रं    नाहीत.

मुदीत आणि सुगंधाही आपल्यातलेच. कोणतंही ग्लॅमर नाही. हिरो आणि हिरॉईन सुंदर दिसायला हवीत वगैरे नियम आता हिंदी चित्रपटांनी भिरकावून दिले आहेत.

कथानक दिल्लीत आणि हरिद्वारमधे घडतं. या दोन्ही शहरातल्या गल्ल्या, घरं, घरांतल्या खोल्या इत्यादी सगळं जसं असतं तसंच दिसतं. स्टुडियोतला चकचकाट नाही. कथानक जिथं घडतं तिथला भूगोल, तिथली घरं, तिथली घरं, तिथली माणसं, दुकानं या सगळ्या खुणा सिनेमात ठेवल्या आहेत.

                                बरेलीकी बर्फी

बरेली की बर्फीमधे बरेली दिसतं. छोटी दाटीवाटीनं भरलेली खोली, छतावर अगदीच संथपणे चालणारा पंखा. पंख्याखाली आईवडील झोपलेत. वडिलांनी डोक्याला टापशी बांधलीय. थेट बरेली. अनारकली ऑफ आरामधे आरा हे बिहारमधलं गाव दिसतं. गँग्ज ऑफ वासेपूरमधे वाराणसी दिसतं. तिथल्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून कॅमेरा फार कष्टानं फिरतो. एलिझाबेथ एकादशीची आठवण होते. त्या सिनेमात झपाटून टाकणारं  पंढरपूर दिसतं. पंढरपूरमधली दाटीवाटीतली घरं पहाताना चकित व्हायला होतं. सिनेमॅटोग्राफरची कमाल.

एके काळी सिनेमातल्या गावांची नावं रामपूर, लक्ष्मणपूर असली काही तरी असायची. पात्रांची नावं साधारपणे नटांचीच असायची किंवा खोटी नावं असायची. त्यावरून त्यांची जात, धर्म, गाव इत्यादींचा काही पत्ता लागू नये असा हिशोब असायचा. नोकर कमरेत वाकून, खांद्यावर पंचा टाकून फिरणारा रामू असायचा. भारतभर सिनेमा खपावा म्हणून स्थानिक वैशिष्ट्यं कटाप करून स्टुडियोत भरड गावं उभारली जात असत.

आता चित्रपट सृष्टीनं नवं वळण घेतलंय. गल्ल्यांत, घरात, गच्च्यांवर कॅमेरा जातो. दक्षिणेतल्या चित्रपटात तिथली गावं दिसू लागलीत.  विरसनाई ही फिल्म आंध्रातल्या एका गावात घडते. अंगमली डायरीज ही मलयाळम फिल्म अर्नाकुलम गावात घडते. दंगल या सिनेमात हरयाणवी भाषा असते, तनू वेड्स मनूमधे पंजाबी-हरयाणवी भाषा असते, ‘विरसनाई’ मधे तामिळ आणि तेलगू. या देशभरच्या गावात घडणाऱ्या फिल्मा भरपूर चालतात, बऱ्यापैकी व्यवसायही करतात. शुभमंगल सावधाननं २४ कोटी खर्च केले आणि सुमारे ५० कोटी रुपये मिळवले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळं एकाच वेळी सोळासतराशे पडद्यांवर सिनेमा दाखवता येत असल्यानं एकाद दोन आठवड्यातच भरपूर नफा मिळतो. पूर्वी नफा मिळवण्यासाठी शंभर,  दोनशे, हजार आठवडे वगैरे सिनेमा चालवावा लागत असे.

शुभमंगल सावधानची नायिका, सुगंधा. अगदी आजच्या काळातली मुलगी. लग्नाआधी सेक्सानुभव घ्यायला तयार आहे. पण सेक्स म्हणजेच सगळं काही नाही असंही ती म्हणते.

बरेलीकी बर्फीची नायिका, बिट्टी. सांगून आलेला मुलगा घटिया आहे हे पाहिल्यावर ती लग्नच करायचं नाही असं मनात घेते आणि घरून पळून जायचा प्रयत्न करते. बरेली या छोट्या गावातली बिट्टी उत्तर प्रदेशात रुतलेल्या  परंपरा फाट्यावर मारते. पार्ट्या, दारू, मुक्तपणे नाचणं या तिच्या आवडत्या गोष्टी. आपलं हे व्यक्तिमत्व ज्याला मान्य असेल त्याच्याशीच लग्न करायचं असा तिचा निर्धार.

अनारकली ऑफ आरामधली अनारकली. बेभान उत्तान नाचणारी आणि गाणारी. आपल्यातल्या कलेचा वापर ती पुरुषांना आकर्षित करण्यासाठी वापरते. पण पुरुषांना एक हद्द ओलांडू देत नाही, स्वतःचं स्वातंत्र्य प्राणपणानं जगते.

तनू वेड्स मनू मधली तनू. तिला आयुष्यात थरार हवा असतो. निव्वळ थरार. दर आठवड्याला मित्र बदलायची तिची तयारी असते.’ क्वीन ‘ मधली राणी. साखरपुड्यानंतर होणारा नवरा लग्न करायला नकार देतो. घरट्याच्या सुरक्षित वातावरणात पिलासारखी  वाढलेली राणी. तिचं लग्न ठरतं, साखरपुडा होतो. लग्न  ठरलेलं असतं,  मधुचंद्रासाठी पॅरिस आणि एमस्टरडॅमला जायचंही ठरलेलं असतं. इतकं ठरल्यानंतर तिच्या साखरपुडी नवऱ्याला वाटतं की राणी मागास आहे, त्याच्या लायकीची नाही. तो लग्न मोडतो. राणी हादरते. पण आधी ठरलेला मधुचंद्र साजरा करायचं ठरवते, नवऱ्याविना. घर आणि रहात्या परिसरातच राहिलेली राणी पॅरिस आणि एमस्टरडॅमला एकटी जाते. तिथं हिमतीनं स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या मैत्रिणींना भेटते, तीन तरुणांच्या सोबत काही दिवस रहाते, एका शेफशी दोस्ती करते. एक पूर्ण वाढलेला स्वच्छंदी पक्षी बनून भारतात परत येते आणि मांडवळ करायला साखरपुडी माणसाला  त्यानं दिलेली अंगठी परत देऊन फुटवते.

                                       क्वीन

आजच्या काळातल्या स्त्रिया. काळानं लादलेल्या चौकटी मोडून स्वतंत्र विचार करणाऱ्या, स्वतंत्र जगू पहाणाऱ्या स्त्रिया. लिपस्टिक इन माय बुरखामधली  रेहाना ही दोन मुलांची आई आपलं कुटुंब सुखात रहावं यासाठी मरमर करत असते पण तिचा नवरा मात्र तिच्याकडं केवळ वासना भागवणारी एक वस्तू असं पहात असतो.  हिंदी-भारतीय सिनेमानं अशा खूप  रेहाना दाखवल्या, सोशीक स्त्री, नवरा-सासरनं केलेले अन्याय सहन करणारी स्त्री. आता रेहानापेक्षा वेगळ्या  सुगंधा, बिट्टी, अनारकली, राणी दाखवल्या जाताहेत.

नायिकाकेंद्री, स्त्रीकेंद्री सिनेमा हेही एक नवं वळण चित्रपटात आलंय. दंगलमधे कुस्ती खेळणाऱ्या तरुणी आहेत. पूर्णा या सिनेमात वयाच्या बारा तेराव्या वर्षी एव्हरेस्ट चढणारी पूर्णा दिसते. नील बटे सन्नाटामधे घरकाम करणारी स्त्री खस्ता खाणारी, मुलीला शिकवण्यासाठी स्वतः शिकत शिकत मुलीला आयएएस करवणारी  चंदा दिसते. अडचणी स्त्रीच्या पाचवीला पुजलेल्या असताना आधुनिक जगात तिला मुक्त करणाऱ्या संस्था, विचार आणि माणसं निर्माण होतांना दिसत आहेत. दंगलमधे बापानं प्रोत्साहन दिलं. पूर्णामधे एका वरिष्ट आयएएस अधिकाऱ्यानं प्रोत्साहन दिलं. निल बटे सन्नाटामधे एक पुरुष शिक्षक मदतीला आला. अनारकलीमधेही एक भला माणूस अनारकलीला वाचवतो. स्त्रिया  पूरक-उपकारक गोष्टींचा उपयोग करून पुढं जाताना दिसतात. बरं वाटतं.

शुभमंगलमधे भूमी पेडणेकर आहे. उत्तम आहे. या आधी दम लगाके हैशामधेही तिची भूमिका उत्तम होती, गाजली होती. अनारकलीमधे स्वरा भास्कर आहे. निल बटे सन्नाटामधे तिनं चंदाची, एक वेगळीच भूमिका साकारली आहे. कंगना राणावत तर धमालच आहे. क्वीनमधे तिला अनेक पारितोषिकं मिळाली, तनू वेड्सच्या दोन्ही भागात तिची तुफ्फान भूमिका आहे. तिघीही निरनिराळ्या भूमिकात  कमालीच्या सहजतेनं घुसतात.

।।

 

 

 

मूर्ती, सिक्का, निलेकणी

मूर्ती, सिक्का, निलेकणी

 

१९८१ मधे स्थापन झालेल्या इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान कंपनीमधे मोठी घालमेल झाली. २०१४ साली नेमलेल्या विशाल सिक्का यांनी आपल्या प्रमुख कारभारी पदाचा राजिनामा दिला. त्यांच्या जागी इन्फोसिसचे माझी प्रमुख कारभारी नंदन निलेकणी यांची नेमणूक झालीय.

वरील बदल सहजपणे झालेला नाही. बऱ्याच ठिणग्या उडाल्या, बरेच आवाज झाले.

सिक्का यांनी पद सोडताना आरोप केला की त्यांच्यावर आणि कंपनीच्या त्यांच्या सोबतच्या संचालक मंडळावर हीन स्वरूपाचे व्यक्तिगत आरोप करण्यात आले. या आरोपांची दखल घेऊन कंपनीनं दोन प्रतिष्ठित संस्थाना आरोपांची चौकशी सोपवली. त्या संस्थांनी आरोप खोटे, निराधार होते असा अहवाल दिला. तरीही संचालक मंडळावर आरोप होणं थांबलं नाही. कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती हे पत्रं लिहून, आरोप करून,भाषणं करून बदनामी मोहीम चालवत होते.  अशा परिस्थितीत कारभार करणं अशक्य झाल्यानं आपण आणि आपल्या मंडळानं कंपनीबाहेर पडायचा निर्णय घेतला असं सिक्का आपल्या नाराजीनामा पत्रात म्हणतात.

इन्फोसिसच्या स्थापकांकडं १२.५ टक्के शेअर्स आहेत.उरलेले शेअर्स छोटे धारक आणि सार्वजनिक संस्थांकडं आहेत. भांडण होतं ते मुख्यतः मूर्ती  आणि शिक्का यांच्यामधे. मूर्तींची तक्रार काय होती? शिक्का यांचा अमल ठीक नव्हता, कॉर्पोरेट गव्हर्नन्स ठीक नव्हता, नैतिक नव्हता असं मूर्तींचं म्हणणं होतं.

कंपनीत काही गैरकारभार झाले. त्या बद्दल नाराजी दाखवणाऱ्यांना कंपनी सोडून जायला सांगण्यात आलं आणि त्यांचं तोंड बंद करण्यासाठी त्यांना मोठ्ठ्या मोबदल्याचा तोबरा वापरण्यात आला असं मूर्तींचं म्हणणं आहे. पण कंपनीत गैरकारभार कोणता झाला ते मूर्तींनी जाहीर केलं नाही, चौकशी अहवालातही तसे उल्लेख नाहीत. पनाया नावाची एक कंपनी सिक्कांनी खरेदी केली, तो व्यवहार चुकीचा होता असं मूर्तींचं म्हणणं. पण व्यवहार चुकीचा होती की अनैतिक आणि बेकायदेशीर होता त्याचा खुलासा मूर्तींनी केलेला दिसत नाही.

मुद्दा आर्थिक नव्हता, आक्षेप आर्थिक नव्हता.  कंपनीची आर्थिक स्थिती ठीक होती, फायदा होत होता, या बद्दल मूर्तींची तक्रार दिसत नाही.

सिक्का कंपनीत दाखल होणाऱ्यांना आणि कंपनी सोडून जाणाऱ्यांना अव्वाच्या सव्वा मोबदला देत होते असं मूर्तींचं म्हणणं आहे. असे पगार देणं कंपनीच्या संस्कृतीत बसत नाही असं मूर्तींचं म्हणणं होतं. सिक्का यांचं वेतन  गेल्या वर्षी   ६ कोटी रुपयांवरून ६५ कोटी रुपयांवर गेलं. त्यांच्या नंबर दोनच्या  सहकाऱ्याचं वेतन ४ कोटीवरून १२ कोटीवर गेलं.

मूर्तींचा आक्षेप सिक्का यांनी आणलेल्या नव्या कार्यसंस्कृतीबद्दल होता. मूर्ती स्पष्टपणे या संस्कृतीबद्दल बोलत नाहीत पण कंपनीत नव्यानं लागलेले तरूण त्या बद्दल माध्यमांशी बोलले आहेत. नव्यानं कंपनीत आलेली लोकं सिलिकॉन संस्कृतीत शिकलेली-वाढलेली आहेत. जीन्स, टी शर्ट घालून माणसं कामावर जातात. अर्ध्या चड्ड्याही घालतात. कामाच्या ठिकाणी संगित दरवळत असतं. कंटाळा आला तर कर्मचारी आसपासच्या खेळकेंद्रात जाऊन खेळतात किंवा कॅफेमधे गप्पा मारत कॉफी वगैरे पितात. टाय आणि कोट वापरत नाहीत. पायात चपला घालतात किवा अनवाणीही हिंडतात. कंटाळा आला तर बाहेरच्या उद्यानात उघड्यावर फेरफटका मारतात. पोरं पोरी फार मोकळेपणानं एकमेकात मिसळतात. चोविस तासात केव्हाही आणि कुठंही काम करतात. काम झाल्याशी मतलब. अमेरिकन विश्वशाळातही ही रीत रूढ झालीय. सिक्का स्वतः या रीतीनं वागत. बिनधास्त टी शर्ट घालून फिरत. सेल्फी काढून घेत, अनौपचारिक वागत.

स्टीव जॉब्जनी ही कामाची रीत अवलंबली आणि शिक्का त्याच रीतीनं वागत आहेत.

मूर्ती यांनी लावलेल्या शिस्तीत ठराविक वेळी कामावर येणं, वेळेची शिस्त पाळणं, गणवेष वापरणं इत्यादी गोष्टी महत्वाच्या असतात. विशेषतः मोठ्यांसमोर,वरिष्टांसमोर आदरानं वाकणं वागणं इत्यादी. नव्या पोरांना असल्या गोष्टी आवडत नाहीत. आपापली कामं चोखपणे करणं हीच आदर दाखवण्याची पद्धत आहे असं नवी मुलं मानतात. ती वाकत नाहीत, बिनधास्त पहिल्या नावानं हाक मारतात, वरिष्ठांसमोर सिगरेट ओढतात, वरिष्ठ समोर उभा राहून बोलत असला तरी आपण आपल्या खुर्चीवर बसणं यात अनादर नाही असं तरूण पोरं मानतात.

मूर्ती ज्याला भारतीय संस्कृती मानतात त्यात इमाने इतबारे परंपरा चालवणं अभिप्रेत असतं. माणूस एकदा चिकटला निवृत्त होईपर्यंत चिकटून रहाणं याला मूर्ती संस्कृतीत महत्व असतं. नव्या संस्कृतीत मुलं येतात, त्यांना भरपूर काम करून भरपूर पैसे मिळवायचे असतात. प्रत्येकाच्या कुवतीनुसार बाजारात प्रत्येकाला काही एक किमत असते. ती किंमत एकाद्या कंपनीनं नाही दिली तर मुलं खुश्शाल दुसऱ्या कंपनीत जातात. मरमर मेहनत, एकतानतेनं नव्या गोष्टी शोधण्यावर लक्ष ही नव्यांची कामाची पद्धत असते. मूर्ती संस्कृतीच्या तुलनेत ही रीत बरीचशी क्रूर आणि जीवघेणी असते. घरून डबा घेऊन कामाच्या वेळेच्या आधी पंधरा मिनिटं पोचायचं. लंच टाईममधे डबा खायचा. सहावर काटा गेला की काम बंद करून घरोघरी आपल्या कुटुंबात परतायचं ही कार्यसंस्कृती सिलिकॉन वळणात बसत नाही. मूर्तींनी कंपनी स्थापन केल्यावर १९८४ साली कंपनीत दाखल झालेले राव नावाचे गृहस्थ आजही कंपनीत आहेत आणि ते मूर्तींना फार प्रिय आहेत यावरून मूर्तींना काय आवडतं याची कल्पना यायला हरकत नाही.

भारतातल्या मूर्तींच्या पिढीतल्या आणि संस्कृतीतल्या लोकांच्या काही साधेपणाच्या कल्पना आहेत. उदा. साधी गाडी बाळगणं, विमानात इकॉनॉमी क्लासनं प्रवास करणं, कपड्यांचे दोनच जोड बाळगणं, स्वतःचे कपडे धुण, संडासही धुणं. वरील सर्व गोष्टी केल्यानंतर माणसाची कार्यक्षमता अगदीच सामान्य असली तरी तो माणूस मोठा ठरतो ही भारतीय परंपरा आहे.

सिक्का यांच्यावर एक आरोप होता की ते फार खर्चीक आहेत,  बैठकींना ते खाजगी जेट घेऊन जातात. खाजगी जेटनं प्रवास करणं, खूप खर्च करणं म्हणजे कार्यक्षमता असा गैरसमज असायचं कारण नाही. परंतू वेळेला महत्व असेल आणि एकाद्या माणसाची कामाची शैली तशी असेल तर खाजगी जेटनं प्रवास करणं म्हणजे खर्चीकपणा असंही मानायचं कारण नाही. सिक्का हे खर्चीक असले, भरपूर पगार घेत असले तरी कंपनी चांगली चालवत होते, फायदा मिळवत होते या गोष्टीला महत्व आहे. कार्यक्षमता, कार्यकुशलता या गोष्टीची सांगड साधेपणाशी-परंपरांशी घालायचा पाहिजे असं नाही. एकादा माणूस समजा केवळ लंगोटी लावून बैलगाडीनं प्रवास करत असेल आणि तरीही कंपनी चांगली चालवत असेल तर त्यालाही आक्षेप असायचं कारण नाही. मुद्दा असतो तो संस्था फायद्यात रहाण्याचा. ते सिक्का यांनी साधलं होतं.

सिक्का आणि मूर्ती यांच्यातलं भांडण पैशावरून नसावं. सिक्का हा अमेरिकेत वाढलेला, उद्योगात वरच्या थरात वावरलेला माणूस आर्थिक दृष्ट्या दांडगा जरूर असेल. पण मूर्तीही काही कमी नाहीत. इन्फोसिसचे ३.४ टक्के शेअर्स त्यांच्याकडं आहेत. त्या शेअर्सची बाजारातली किमत सुमारे ७२०० हजार कोटी रुपये होते. त्यामुळं दोघामधलं भांडण कोणाला किती पैसा मिळतो हा भांडणाचा मुद्दा नसणार.

सिक्का यांना मुख्य कारभारी नेमतांना मूर्ती यांनी पुर्ण विचार नक्कीच केला असणार. सिक्का यांची कार्यपद्धती आणि कार्यशैली आणि एकूण नैतिक बैठक इत्यादी गोष्टी मूर्तींना नक्कीच माहित असणार. असं असूनही सिक्कांचं वागणं नैतिक नाही असं मूर्तीना वाटू लागलं ते कशामुळं? शक्यता अशी आहे की ज्या गोष्टींची कल्पना होती त्या प्रत्यक्ष घडताना मूर्तीना सहन झालं नसावं. जे ऐकीव होतं ते वास्तवात अनुभवाला आल्यावर मूर्ती खवळले असावेत.

चालायचंच. माणसं म्हटली की असं होणारच.

मूर्तीची प्रतिष्ठा आणि वजन वरचढ ठरल्यानं सिक्का यांना बाहेर पडावं लागलं आणि नंदन निलेकणी मुख्य कारभारी झाले. इन्फोसिस तीनसाडेतीन वर्षं आपली जुनी वाट सोडून एका नव्या वाटेनं गेली आणि आता पुन्हा बहुदा जुन्या वाटेवर आली आहे.

मूर्तींची इन्फोसिस ही एक सर्विस प्रोवायडर कंपनी होती. एकादं उत्पादन तयार होण्यासाठी लागणाऱ्या पूर्वरचना, पूर्व माहिती, सॉफ्टवेअर पुरवणं हा इन्फोसिसचा फंडा होता. अमेरिका आणि युरोपातल्या कंपन्या नवनव्या वस्तू व प्रक्रिया बाजारात आणत होत्या, उत्पादन आणि विक्री करून त्यातून भरपूर पैसा मिळवत होत्या. त्या वस्तू व प्रक्रियांना आवश्यक त्या पूर्वगोष्टी पुरवणं हे कमी महत्वाचं काम त्या कंपन्या भारतातून करवून घेत होत्या. जे काम अमेरिकेत केलं तर शंभर रुपये खर्च करावे लागले असते ते काम अमेरिकन लोकं भारतातून समजा चाळीस पन्नास रुपयात करून घेत होते. ते चाळीस पन्नास रुपये भारतातल्या माणसाला खूपच होते आणि परकीय चलनात मिळत होते.

वरील व्यवहारावर भारतातल्या आयटी कंपन्या स्थापन झाल्या आणि वरील उद्योग पार पाडणारी शिक्षण सोय भारतीय शिक्षण व्यवस्थेनं केली.

भारताच्या इतिहासात असं नेहमीच घडताना दिसतं. कापूस किंवा सूत भारतातून न्यायचं आणि तयार कापड भारतातल्या लोकांना विकायचं किंवा जगाला इतरत्र विकायचं या धंद्यावर ब्रिटीश भरभराटले. उत्पादन आणि विक्रीची तंत्रज्ञानं त्यांनी विकसित केली. कच्चा माल कसाबसा पुरवणारं पुरातन तंत्र भारतीय वापरत राहिले. आजही भारतातून नाना प्रकारचे कपडे बनवून नेले जातात आणि त्याचं ब्रँडिंग आणि विक्री करून किती तरी पटीनं जास्त पैसे पश्चिमी देश मिळवतात. कुठले कपडे जास्त खपतील याचा अंदाज बांधून डिझायनिंग तिथली माणसं करतात आणि तसे कपडे बाजारातल्या किमतीच्या एक चतुर्थांश किंवा त्याही पेक्षा कमी किमतीत भारतातून बनवून घेतात.

गॅप असो की व्हर्साशे असो की गुच्ची असो की आणखी काही. कपडा इथं तयार होतो, शिवला इथं जातो आणि त्यावर शिक्का मारून तो चौपट किमतीला जगभर विकला जातो. कच्चा माल भारत पुरवतो, पक्क्या मालावर जग मालामाल होतं. इन्फोसिसनं १९८१ साली तेच केलं आणि आजही बहुत करून तेच चाललं आहे.

२०१४ साली  बाजाराच्या नव्या मागण्या पाहून इन्फोसिसला नव्या उत्पादनांकडं सिक्का नेतील असं मूर्तींच्या डोक्यात असणार. २०१४च्या सुमारास  रोबो, बॉट्सची चलती होती. कारखान्यात तयार केलेली बुद्धीमत्ता आणि त्यावर आधारलेल्या वस्तू बाजारात येत होत्या. आरोग्य, खेळ, मनोरंजन, चिकित्सा, वाहनं या गोष्टींकडं उद्योगांचं लक्ष गेलं होतं. त्या उत्पादनांना मदत करणाऱ्या माहिती व्यवस्थेची मागणी होती. ती मागणी पुरवण्यासाठी नव्या दमाचा माणूस म्हणून  सिक्का यांची नेमणूक करण्यात आली. सिक्कांनी ती मागणी पूर्ण केली, कंपनी चांगली चालवली, फायदा मिळवला.

सिक्का यांनी एकूणच उद्योग व्यवस्थेला, अर्थव्यवस्थेला कच्च्याकडून  पक्क्याकडं नेण्याचा प्रयत्न केला काय? बहुदा त्यांच्याकडून तशी अपेक्षाही नसावी. सर्विस प्रोवायडर हेच रूप अधिक काळसुसंगत करणं ही अपेक्षा होती.  मूर्ती किंवा सिक्का यांना कच्च्या मालातच सुख मानणारे आहेत. एका नव्या क्षेत्रात एक यशस्वी कंपनी चालवून त्यांनी भरपूर धन कमावलं, देशाची आर्थिक स्थिती सुधारली.त्यामुळंच त्यांनी  मोठी क्रांती वगैरे केली नव्हती, अर्थव्यवस्थेला क्रांतीकारक वळण वगैरे दिलं बिलं नव्हतं.

देश श्रीमंत व्हायचा तर जगात खपणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करावं लागतं.  मेक इन इंडिया ही घोषणा भारताला उत्पादनाकडं नेणारी घोषणा आहे.  मेक इन इंडिया वास्तवात उतरायची तर तशी शिक्षण व्यवस्था हवी, तसं आर्थिक इन्फ्रास्ट्रक्चर हवं, तसं मानस हवं. या तीन गोष्टी भारतात नव्हत्या, नाहीत.

मूर्तींनी सिक्कांना आणलं. मूर्तींनी सिक्काना हाकललं. मूर्तीनी नीलेकणींना आणलं. हे सारं नैसर्गिक आहे, समजण्यासाऱखं आहे. पक्क्या मालाचं वळण भारतीय अर्थव्यवस्था कशी घेणार हा महत्वाचा प्रश्न अनुत्तरीतच रहातो.

।।

 

 

 

 

त्यांना गुरूचं स्थान कोणी दिलं? त्यांच्या पायवर डोकं कोणी ठेवलं? जनतेनंच ना?

त्यांना गुरूचं स्थान कोणी दिलं? त्यांच्या पायवर डोकं कोणी ठेवलं? जनतेनंच ना?

                                      राम रहीम

गुरमीत राम रहीम याला बलात्काराच्या आरोपावरून वीस वर्षाची सजा कोर्टानं सुनावलीय. गुरमीतचा आश्रम, आश्रमातले अनैतिक, बेकायदेशीर व्यवहार इत्यादी गोष्टी आता साऱ्या जगाला माहीत झाल्या आहेत. गुरमीत विकृत होता. मनोरोगी होता.गुरमीतनं एक स्वतंत्र देशच चालवला होता आणि भारत नावाच्या देशातले कायदे गुरमीतच्या डेरादेशाला लागू नव्हते याची माहितीही बाहेर येतेय. गुरमीतचं साम्राज्य उभं राहिलं ते राजकीय आश्रयामुळं हेही आता पुरेसं स्पष्ट झालंय.

दुसरे एक भीषण आसाराम बापू सध्या तुरुंगाची हवा खाताहेत. टँकरनं लोकांवर रंग शिंपडणारे, गर्भार स्त्रीला डोहाळे येतात तेव्हां तिला मुकुट, कमरपट्टा, मनगटपट्टा वगैरे घालून झोपाळ्यावर बसवतात, तसेच झोपाळ्यावर झुलणारे हे आसाराम बापू. त्यांच्यावरही बलात्काराचे आरोप आहेत, खुनाचे आरोप आहेत.

संत रामपालही सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर खून आणि बलात्काराचे आरोप आहेत.

असे अनंत विकृत अद्यात्मिक धार्मिक पुरुष देशभर पसरलेले आहेत.गुरमीतला मिळालेल्या प्रसिद्धीमुळं या महाराज सत्पुरुष परमात्म्यांबद्दलचे तपशील जगाला माहित झाले.

गुरमीत यांच्यापेक्षा वेगळी  गुन्हेगार वर्तणुक श्रीश्रीरवीशंकरनी केली आहे. त्यांनी यमुनेच्या काठावर एक मोठ्ठाच्या मोठ्ठा कार्यक्रम घडवला. यमुनेच्या पात्राची वाट लावली, भरुन न येणारं नुकसान केलं. न्यायालयानं रोखलं असतानाही न्यायालयाला धाब्यावर बसवून श्रीश्रीनी प्रचंड बांधकामं पात्रात केली. समाजाचं धार्मिक, सांस्कृतीक, अद्यात्मिक बळ पर्यावरणापेक्षा जास्त  महत्वाचं आहे असं ठासून सांगत त्यांनी कायदे पायाखाली तुडवले. कोर्टानं सांगितलेला दंडही भरायला हा माणूस तयार नाही.

गुरमीत ते श्रीश्री अशा विविध छटांच्या गुन्हेगार माणसांना राजकीय आश्रय आहे.सर्व राजकीय पक्षांनी त्यांना आश्रय दिला आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, सेनापती, उद्योगपती इत्यादी मंडळी या गुन्हेगारांची भक्त आहेत. या सर्व मंडळींच्या पाठिंब्यामुळं आणि मदतीमुळंच वरील गुन्हेगारांची साम्राज्यं उभी राहिली आहेत. या गुन्हेगारांच्या प्रभावामुळं राजकीय पक्षांना मतं मिळत असतात.

गुन्हेगार नसलेलेही अनेक गुरु भारतभर आहेत.  सद्गुरु पै, नानासाहेब धर्माधिकारी, पांडुरंगशास्त्री आठवले हे सज्जन,  अद्यात्मिक धार्मिक लोक होऊन गेले,पण त्यांचे वारस अजूनही आहेत.  अनिरुद्ध बापूंची मोजदाद वरील माणसांमधे करता येईल. ही काही प्रसिद्ध नावं. गावोगावी प्रचलीत असलेले पण तेवढा गवगवा नसलेले अनंत महाराज, सत्पुरुष महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. या सर्वांचे आश्रम असतात, मठ असतात, भेटण्याच्या जागा असतात, कार्यक्रम असतात. यातल्या अनेकांचं काम पिढीजात चालतं, सद्गुरुंचा मुलगा, धर्माधिकारींचा मुलगा, पांडुरंगशास्त्रींची मुलगी अशा रीतीनं पिढ्यानपिढ्या हे काम चालतं. याला कोणी व्यवसाय म्हटलेलं त्यांच्या अनुयायांना आवडणार नाही पण एकूण व्यवहार व्यवसाय या सदरात मोडावा अशा प्रकारचा असतो.

गुरमीत आणि वरील सज्जन माणसं यात फरक आहे. वरील सज्जन माणसांनी अनेक समाजोपयोगी कामं केली आहेत. वरील लोकांनी राजकारणाची वाट घेतलेली नाही, राजकीय पक्षांना त्यांचा थेट वापर करता आलेला नाही. वरील सज्जन माणसांचं एक महत्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे ही माणसं प्रवचनकार आहेत, ते  प्रवचनातून लोकांना  चांगलं वागायला शिकवतात. चांगलं म्हणजे काय तर साधारणपणे संत वगैरे सांगतात ते किंवा गीतेत सांगितलंय ते. कुटुंबात रहा, आपापली कामं सचोटीनं करा, परोपकार करा असं ही माणसं सांगत असतात. कोणत्याही बेकायदेशीर, अनैतिक वर्तनाचं समर्थन ही माणसं करत नाहीत,   तसं वागणं बरोबर नाही असंच सांगतात.

अशा प्रकारच्या  सज्जन प्रवचनकार अद्यात्मिक पुरुषांमधे काहीनी  एकेक जात पकडून ठेवली आहे. कोणी उघडपणे कबूल करत नाही पण विशिष्ट जातींचे पाठिराखे त्यांनी गोळा करून ठेवले आहेत. वरवर ही माणसं जातीपाती नष्ट करा, जाती पाळू नका असं सांगतात पण  वागतात मात्र नेमकं वेगळं. बोलणं एक आणि वागणूक दुसरीच ही भारतीय परंपरा हे अद्यात्मिक पुरुष पाळत असतात.

                                 आसाराम बापू

गुरमीत ते सज्जन ते गावोगावचे महाराज यांमधे एक समान सूत्र आहे. ही सर्व मंडळी धर्म, संस्कृती, अद्यात्माची भाषा करतात आणि त्यासाठीच त्यांना करोडो अनुयायी लाभतात. या मंडळींचे उत्सव होतात, सत्संग होतात, निरनिराळी धार्मिक सामुहीक कृत्यं होतात आणि त्यात करोडो माणसं वर्षातून अनेक वेळा सामिल होत असतात. गंमत म्हणजे ही अनुयायी माणसं स्वतंत्रपणे देवळात जात असतात, सतत आणि वेगळी निमित्त साधून. नवी गाडी घेतली की देवळात, लग्न झालं की देवळात, मूल झालं की देवळात, बढती मिळाली की देवळात, आजार दूर झाल्यावर देवळात. लग्न होत नसेल, बढती होत नसेल, भ्रष्टाचाराचं बालंट आलं असेल तरीही ही मंडळी सुटका मागण्यासाठी देवळात जातात.  शिवाय गणेशोत्सव असतो, नवरात्र असतं, इतरही जत्रोत्सव असतात.

वरील सर्व गोष्टी शेकडो वर्षं, दिवसरात्र, बारोमास चालू असतात. यातून माणसांना चांगलं वागा असा संदेश दिला जात असतो. प्रश्न असा पडतो की इतकी शतकं दिवसरात्र चांगलं वागा असा संदेश कां द्यावा लागतो? गीता आहे, गीतेवर अनेकांनी केलेली भाष्यं आहेत, शेकडो संत आहेत आणि त्यांनी केलेल्या रचना आहेत, अनंत देव आहेत आणि त्यांची स्तोत्रं आणि आरत्या आहेत. हे सारं कायम कानावर पडत असताना पुन्हा पुन्हा महाराज, बुवा, प्रवचनकार, बाबा यांच्याकडं कां जावं लागतं?

अद्यात्म आणि धर्मवाल्यांचं म्हणणं असतं की लोकं असहाय्य झाल्यामुळं देवाधर्माकडं वळतात.

देशात गरीबी आहे, विषमता आहे, शेतीची अवस्था वाईट आहे, उद्योगात बेकारी आहे, पर्यावरणाचा सत्यानाश झाला आहे, अनारोग्य पसरलं आहे. हे सारं दूर करण्यासाठी सरकार, शाळा कॉलेजं, इस्पितळं, न्यायालयं इत्यादींची सोय आहे परंतू त्या साऱ्या गोष्टी निरुपयोगी ठरलेल्या आहेत. सगळा देशच भ्रष्टाचारानं आणि बिनकामाच्या शॉर्टकनं भरलेला आहे अशा परिस्थितीत लोकांनी कोणाकडं पहावं असा प्रश्न अद्यात्मवाले विचारतात.

त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल हलक्या आवाजात मोदी, ठाकरे, पवार, पनीरसेल्वम, लालू यांची नावं घेतात. वरवर उल्लेख  गणपती, शंकर, ब्रह्मदेव, सरस्वती, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी असे करतात पण प्रत्यक्षात वरील नावांशी विपरीत वर्णन करणाऱ्यांची पाठराखण करतात, त्यांच्या मदतीवर आपापली कामं चालवतात. सगळीच नसली तरी बरीचशी मंडळी हा उद्योग करत असतात.

धर्म किंवा ही संत महाराज इत्यादी माणसं जे जे करा म्हणून सांगतात ते अगदी साधं आणि उघड आहे.  भारतीय राज्यघटना आणि कायद्यात ते सारं सांगितलेलं आहे.  हुंडा घेतला तर शिक्षा होते. लुटालूट केली, खोटे चेक दिले, कबूल केलेले पैसे दिले नाहीत, रस्त्यावर घाण केली, संगीत वाजवून व इतर वाटांनी शेजाऱ्याला त्रास दिला, प्रदूषण केलं, अत्याचार केला, बलात्कार केला, खोटं बोललं, केलेले करार पाळले नाहीत, नेमून दिलेलं काम केलं नाही या साऱ्या गोष्टींना शिक्षा होते. मग वरील गोष्टी सांगण्यासाठी अद्यात्मिक गुरु माणसाला कां लागतो?

                                 संत रामपाल

आपल्या देशातली माणसं मनानं कमकुवत आहेत काय? त्यांचा नैतिक पाया कच्चा आहे काय? हज्जारो वर्षांच्या धर्मांच्या व सत्पुरुषांच्या संदेशांच्या माऱ्यानंतरही सतत त्याला चांगलं वाग चांगलं वाग म्हणून सांगावं लागतं इतका हा समाज मानसीक अशक्त आहे? कायद्यानंही सांगितलं असताना त्याच्या डोक्यात चांगलं वागणं शिरत नाही याचा अर्थ त्यांना कायदाही समजत नाही असा घ्यायचा काय? माणसानं तयार केलेली राज्यघटना ती देवानं सांगितलेली नाही म्हणून लोकांना अमान्य आहे काय?  धर्म ही गोष्ट हज्जारो वर्षं सांगूनही लोकांना स्पष्ट होत नाही, धर्माचा अर्थ सांगण्यासाठी दर हजार माणसांसाठी एक गुरुबिरू लागतो याचा अर्थ धर्मातच बराच घोळ किंवा संदिग्धता आहे काय?

शंभर, पाचशे, हजार, दहा हजार, पन्नास हजार वर्षांपूर्वी  काही देव नावाच्या कोणी तरी सांगीतली. देव नावाचा फार पॉवरफुल गृहस्थ ती तत्व न पाळणाऱ्यांना शिक्षा करतो असं सांगितलं गेलं.  ती तत्व पाळली तर पॉवरफुल देव लोकांना  नाना प्रकारे बक्षीसं आणि सुख देतो असं सांगितलं गेलं. हे सारं  कित्येक हजार वर्षं माणूस ऐकत आला आहे. काळ बदलत गेला तरी तो पॉवरफुल देव शिल्लकच दिसतो. स्त्रीला पाळी आली असताना ती अशुद्ध असते असं सांगणारा देव आता स्त्रीला पाळी येणं यात अशुद्धता नाही हे सिद्ध झालं तरी  शिल्लक आहे. समाजाला कोण घातक आहे ते सांगून त्यांचा नायनाट करायच्या आज्ञा देव देत असे. देव सांगत असे की तुमच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्यांना मारून टाका. आता असं कोणालाही कधीही मारून टाकता येत नाही. कोणतंही कृत्य करतांना कायद्याची चौकट पाळावी लागते, धर्माची आज्ञा नव्हे. कोणाला तुरुंगात घालायचं असेल, कोणाची इस्टेट जप्त करायची असेल, कोणाला दंड करायचा असेल तर  योग्य कायदेशीर  प्रक्रिया करावी लागते. असं असलं तरी लोकांना शिक्षा करायला देव शिल्लक आहे.

खरं म्हणजे माणसाच्या जगण्यातल्या बहुतेक सर्व गोष्टींचा विचार आता कायद्यानं केला आहे. राज्यघटना सार्वभौम झाली आहे. कायदा आणि राज्यघटना यात परिस्थितीनुसार बदलही केले जातात.  माणसाच्या जगण्याचा सार्वजनिक भाग आता कायद्याच्या कक्षेत येतो.

अशा परिस्थितीत देव, धर्म आणि त्याचे अर्थ सांगणाऱ्या लोकांना समाजात कोणत्या प्रकारचं स्थान आहे? एक लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारली आहे.  देशाची अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था कशी असायला हवी हेही या व्यवस्थेत माणसं ठरवतात. अन्याय झाला, त्रुटी शिल्लक असल्या तर त्याही दूर करण्याची संस्थात्मक व्यवस्था समाजात सिद्ध झाली आहे.असं असताना  बाबा, गुरु, महाराज, प्रवचनकारांची आवश्यकता काय?

                                       श्रीश्री

आज घडीला देव, धर्म आणि अद्यात्माचं श्रेत्र अतीशय निरुंद आणि मर्यादित झालेलं आहे.  जगण्यातल्या अनेक गोष्टींबाबत पुरेशी स्पष्टता आली आहे. तरीही कित्येक बाबतीत विज्ञान, कायदा अपुरा पडतो.  जगातल्या सर्व गोष्टींवर विज्ञानात उत्तरं नाहीत. विज्ञान माहिती देतं पण जितकी माहिती देतं तितकं अजून किती तरी अज्ञान शिल्लक आहे हेही स्पष्ट करतं. माणसाचं आणि समूहाचं वर्तन कित्येक वेळा इतकं बुचकळ्यात पाडतं की विज्ञान, कायदा इत्यादीमधे उत्तरं सापडत नाहीत. नीतीमत्तेनं आणि सचोटीनं वागूनही आपल्यावर अन्याय का होतो याचं उत्तर माणसाला सापडत नाही. अशा स्थितीत माणूस असहाय्य होतो, सैरभैर होतो. तराफा शोधण्याचा प्रयत्न करतो. या संदिग्ध अवस्थेत, पोकळीत देवानं स्थान मिळवलं, टिकवलं आहे.

गेल्या दोनेकशे वर्षात विज्ञान, तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, वस्तू, बाजार या घटकांनी समाजाचं नियंत्रण करायला सुरवात केली. धर्म आणि देव यांचा समाजाचं नियंत्रण करण्याचा एकाधिकार वरील गोष्टींनी हिरावून घेतलाय. धर्म आणि देवाचं स्थान खूपच नियंत्रित झालंय. देवाधर्मामधे त्यातून एक असुरक्षितता निर्माण झालीय. आपलं स्थान, आपलं महत्व, पुन्हा प्रस्थापित करण्याची धडपड देवधर्म बुवा महाराज प्रवचक इत्यादींच्या वाटेनं करतोय.

समाजाचं नियंत्रण म्हणजे नेमकं काय, कोणकोण नियंत्रक आहेत इत्यादींची जाणीव शिक्षण, माध्यमं, कला, ज्ञान निर्मिती या क्षेत्रामधून होत असते. ही क्षेत्रं माणसाच्या जाणीवा अधिक प्रगल्भ करतात,  माणसाला अधिक जबाबदार आणि जगण्याला लायक बनवतात. या प्रक्रियेत लोकनियुक्त सरकार आणि राज्यघटना हे दोन महत्वाचे घटक आणि टप्पे आहेत. नियंत्रणाचा हा खटाटोप भारतीय माणसानं अजूनही समजून घेतलेला नाही.

समाजातला दुराचार आणि दुःख यावर देव,  व्रतं-विधी-उत्सव हे उपाय नाहीत, त्या गोष्टी म्हणजे डोकं दुखताना लावायचा बाम आहे हे लोकांच्या अजून लक्षात आलेलं नाही. गरीबी, विषमता, अनारोग्य, अस्थिरता हे दोष दूर करण्यात  लोकशाही व्यवस्था अपुरी  पडत आहे हे खरं.  पण उपासना हा उपाय नाही, आपल्या समाज बांधणाऱ्या संस्था अधिक मजबूत करणं, त्या अधिक निर्दोष करणं, त्या प्रभावी करणं हाच उपाय आहे. भले तो उपाय दीर्घ काळ घेणारा आणि कष्टाचा असेल.

गुरमीत तुरुंगात गेला. तुरुंगात पडलेल्या आसारामलाही उद्या भरपूर शिक्षा होईल. रामपालवरचे गुन्हेही सिद्ध होतील. चार दिवसांनी सारं काही पूर्वीसारखंच सुरु होईल. भ्रष्ट आणि अकार्यक्षम भाजपच्या जागी भ्रष्ट आणि अकार्यक्षम काँग्रेस किंवा जनता दल किंवा शिव सेना किंवा अद्रमुक राज्यावर येईल. टीबी, मलेरियाचे बळी वाढतच रहातील. विषमता शिल्लक राहील, बहुसंख्य माणसं दुःखात रहातील. बंडल विद्यापीठाच्या साच्यातून बंडल विद्यार्थी  बाहेर येत रहातील. माणसं अधिक असहाय्य आणि हताश होतील.

कमकुवत, मनानं हरलेला आणि शरण गेलेला, उपकारशरण    समाजच गुरमीत इत्यादी अद्यात्मिक-धर्मपुरुषांना जन्मला घालतोय.

भावना आटोक्यात ठेवून  बुद्धी आणि विचारशक्ती आणि तर्काचा जास्त वापर करणारा समाज तयार होणं आवश्यक आहे.

।।